अ॒ग्निर्जा॑गार॒ तमृच॑: कामयन्ते॒ऽग्निर्जा॑गार॒ तमु॒ सामा॑नि यन्ति ।
अ॒ग्निर्जा॑गार॒ तम॒यं सोम॑ आह॒ तवा॒हम॑स्मि स॒ख्ये न्यो॑काः
अवत्सार काश्यप ऋषी विश्वदेवतांची प्रार्थना करत म्हणतात की, ज्ञानच्या प्रकाशात जागृत असलेला मनुष्य सदैव सजग असतो. तो सांसारिक सुख-वैभवासह अलौकिक नित्य आनंदही अनुभवतो. ऋषि प्रार्थना करतो, हे प्रभु, कृपया आम्हाला सर्व प्रकारचा आश्रय द्या, ज्यामुळे आम्ही तुमच्या मैत्रीतच सदैव निवास करू.
ही ऋचा एक जागृत, ज्ञानप्रकाशयुक्त साधकाच्या जीवनाची महती सांगते. ऋषी प्रार्थना करतात की जसा अग्नी सतत जागृत असतो, तसा साधकही आत्मजागृतीत स्थित असावा. जेव्हा साधक अंतःकरणाने जागृत असतो, तेव्हा त्याच्याकडे ऋचा म्हणजेच ज्ञानाची प्राप्ती आणि सोम म्हणजे आनंदस्वरूप परमात्म्याचे सान्निध्य प्राप्त होते. (सोम म्हणजेच परमेश्वर स्वतः साधकाला संबोधित करतो: "मी तुझा सखा आहे, तुझ्यासोबत आहे:.)
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥
(भगवद्गीता, अध्याय 2, श्लोक 69)
जी वेळ (स्थिती) सर्व प्राण्यांसाठी रात्रसदृश आहे अर्थात विषय वासनारूपी अंधकाराने आच्छादित आहे त्या वेळी संयमी पुरुष जागृत असतो, म्हणजे ज्ञानरूपी प्रकाशात स्थित असतो. ज्या गोष्टींमध्ये सामान्य प्राणी जागृत असतात अर्थात इंद्रियसुख, विषयभोग इत्यादि त्या गोष्टी ज्ञानी मुनीसाठी रात्रसदृश असतात.
तमसचे निरसन करण्याकरता रोज पहाटे उठून ध्यान करणे आणि मन शांत झाल्यावर आत्मचिंतन करणे हे पहिले पाऊल आहे. दुसऱ्यांच्या चुका पाहण्याऐवजी स्वतःच्या त्रुटी तपासून त्यावर विचार करून त्या दूर करण्याचा प्रयास करणे, आणि योग्य-अयोग्य याचा विचार करून विवेकपूर्वक निर्णय घेणे ही सजगतेची वाट आहे. आळस आणि प्रमाद सोडून पुरुषार्थाचा मार्ग स्वीकारल्याने जीवनात खरा प्रकाश येतो.
विषयभोग आणि वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सत्संगात सहभागी होणे, सेवा आणि परोपकाराची कामे करणे हे तमस नष्ट करण्याचे प्रभावी उपाय आहेत. सत्संगाच्या सुवासात अर्थात उत्तम आणि सज्जन लोकांच्या सहवासात मन शुद्ध होते, सेवा आणि परोपकाराच्या स्पर्शाने वासनांचे वलय हळू-हळू विरळ होऊ लागते आणि ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश अंतःकरणात प्रकट होतो. विद्यार्थी असतील तर मोबाईलचा मोह टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हीच खरी साधना आहे. याशिवाय, दररोज एक चांगले वचन मनात ठेवून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणे, आणि "मी कोण आहे?" या प्रश्नाचा विचार करणे. हे आत्मविकासाचे मूलभूत टप्पे आहेत. अशा सजग प्रयत्नांमुळे मनातील अंधार नाहीसा होतो आणि आत्मजागृतीचा दीप उजळतो.
जागृती ही साधनेचा मूलाधार आहे. अंतःकरणाने जागा असलेलाच खरा साधक ठरतो. जागृत साधकाला भौतिक सांसारिक सुखांची प्राप्ती होते, आणि त्याचबरोबर अध्यात्माच्या क्षेत्रातही त्याची सतत प्रगती होते. या मार्गावर चालताना त्याला नित्य आनंदाची अनुभूती होते, जो क्षणिक नसून शाश्वत असतो. अखेरीस, परमेश्वर स्वतः सखा बनून त्याच्या जीवनात प्रवेश करतो आणि त्याच्याशी सख्यभावाने नांदतो.