Friday, November 18, 2022

कणाद, प्रमाण आणि विज्ञान

ज्ञात ज्ञानाच्या आधारावर कुठलीही गोष्ट सिद्ध करणे म्हणजे विज्ञान. पण ज्ञात ज्ञान माणसाची जशी-जशी प्रगति होते तसे-तसे बदलत राहते. प्राचीन काळी कणादला कळले होते प्रत्येक पदार्थ हा अणु पासून बनतो. पण अणुचा आकार त्याकाळी सिद्ध करणे संभव होते का? पहा विद्वानांच्या सभेत काय झाले असेल, 

सभापति विज्ञानवादी विद्वान म्हणाले, कणाद, सर्व जड पदार्थ अणु पासून बनतात हा तुझ्या सिद्धांत सर्वांनाच मान्य आहे. पण तू म्हणतो अणुचा आकार अत्यंत सूक्ष्म असल्याने तो डोळ्यांनी दिसणे शक्य नाही, त्यामुळे त्याचे वर्णन करणे अशक्य. कणाद, जड पदार्थाचा अणु जर डोळ्याने दिसत नसेल  तर तो पदार्थ ही दिसणार नाही. धुळीचे कण अत्यंत सूक्ष्म असले तरी सूर्याच्या प्रकाशात दिसतात. अणुचा आकार आणि तो का दिसत नाही हे स्पष्ट करणे गरजेचे, असे आम्हाला वाटते. कणाद ने काही वेळ विचार केला आणि म्हणाला, सभापति, बहुतेक एक अणु धुळी कणांपेक्षा किमान सहा पट सूक्ष्म असू शकतो त्यामुळे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. सभापती कणादला म्हणाले, कणाद, तू एका धुळी कणाचे सहा तर सोड, किमान दोन तुकडे करून दाखवू शकतो का?  कणाद ने उत्तर दिले, क्षमा करा हे संभव नाही. सभापति म्हणाले, जे संभव नाही त्याच्या स्वीकार विद्वान करत नाही. कणाद, विज्ञानाला प्रमाण हवे असते. अनुमानाच्या आधारावर विज्ञान चालत नाही. बिना प्रमाण लोक सत्याचा ही स्वीकार करत नाही. तूर्त अणु हा धूलि कणा एवढाच म्हणता येईल. त्या काळच्या ज्ञात ज्ञानानुसार धुळीचा कण हा सूक्ष्म  पदार्थ होता. आजच्या मोजमाप करणार्‍या यंत्रांनी आपण अणुपेक्षा ही सूक्ष्म पदार्थांना सहज मोजू शकतो. आज जर कणाद असते तर त्यांचे उत्तर  वेगळे असते.  त्याचे प्रमाण ही ते देऊ शकले असते. असो.  

असाच एक किस्सा स्वामी रामदेव यांनी सांगितला होता. गंगोत्रीच्या वर हिमालयात साधना करीत असताना, अनेक जिज्ञासु योग प्राणायामच्या माध्यमाने कुंडलिनी जागृत करण्यासाठी काय करावे असे प्रश्न विचारीत. स्वामी रामदेव त्यांना योग प्राणायाम कसे करतात इत्यादि शिकवायचे. जेवढा जास्ती अभ्यास तेवढी कुंडलिनी जागृत करण्याची संभावना जास्त. यासाठी जिज्ञासु घरी गेल्यावर रोज अनेक तास प्राणायाम करू लागले. पुढे ते म्हणाले कुंडलिनी कुणाची जागृत झाली कि नाही हे मला माहीत नाही, पण अनेकांनी परत येऊन सांगितले प्राणायाम केल्याने त्यांना असाध्य रोगांपासून मुक्ति मिळाली. असे अनेक दृष्टान्त पाहून मी योग प्राणायामच्या प्रसारासाठी आपले आयुष्य वाहून देण्याचा निश्चय केला. असाच एक जिज्ञासु दिल्लीच्या एका प्रख्यात हॉस्पिटल मध्ये एका असाध्य रोगाचा उपचार घेत होता. प्राणायाम करून काही महिन्यातच तो रोगमुक्त झाला. हे पाहून, त्याच्या उपचार घेणार्‍या डॉक्टरने स्वामीजींना विचारले तुम्ही कोणते औषध दिले जेणे करून हा रोगमुक्त झाला. स्वामीजींनी त्याला कोणते ही औषध दिले नाही हे सांगितले. डॉक्टर विज्ञानवादी होता, त्याच्या मते स्वामीजींनी औषधीचे नाव आणि मात्रा इत्यादींची माहिती दिली तर त्यावर अनुसंधान करून हजारो रुग्णांचे भले करता येईल. फक्त योग आणि प्राणायाम करून रुग्ण रोग मुक्त होऊ शकत नाही यावर डॉक्टर ठाम होते. अखेर डॉक्टरने विचारले, स्वामीजी विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगा प्राणायाम करुन हा कसा ठीक झाला. स्वामीजींना त्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण होते. शेवटी स्वामीजी उदाहरण देत म्हणाले डॉक्टर साहेब मोहरीचे बी शेतात  पेरले, मोहरीचे रोप वाढले आणि त्यातून तेल मिळाले. मोहरीने सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या मदतीने मातीतून तेल सोशून घेतले, असे ही म्हणता येईल पण ते सिद्ध करता येईल का. आता जर मी माती तेलाच्या घाणीतून काढेल तर मला तेल मिळेल का? नाही. या घटकेला प्राणायाम करून माणूस रोगमुक्त कसा होतो, हे मोजण्याचे साधन माझ्याजवळ नाही. त्यामुळे ज्ञात ज्ञानाच्या मदतीने हे मी सिद्ध करू शकत नाही. पण प्राणायाम करून रुग्णांना असाध्य रोगांपासून ही मुक्ति मिळते याचे जीवंत प्रमाण हजारो आहेत. आज पतंजलि रिसर्च फाऊंडेशन ही संस्था योगावर अनुसंधान करते आणि रिसर्च पेपर्स ही प्रकाशित करते. आज ते विज्ञानच्या आधारावर योग आणि प्राणायामाचे परिणाम सिद्ध करू शकतात. असो

आपले ज्ञात ज्ञान जर अपूर्ण असेल तर सत्य ही आजच्या विज्ञानाच्या तराजूवर तोलणे अशक्य. खरा विज्ञानवादी सत्याचा स्वीकार करतो आणि सत्य तपासण्याचा मार्ग शोधतो. पण दुराग्राही सत्याचाच स्वीकार करत नाही. इथेच समस्या निर्माण होते. व्यर्थचे वादविवाद होतात. ज्ञानाचा प्रकाश सामान्य लोकांपर्यंत लवकर पोहचत नाही. 


Friday, November 11, 2022

मनुवाद्यांपासून दूर तिला करा


गढ किल्ल्यांची मोहीम आखतात
सूफी संतावर गरळ ओकतात
धर्माची अफू तरुणांना पाजतात
मनुवादाचा हो प्रचार करतात.
 
शिकली सवरलेली नार ती 
उत्तम लेखिका, विदुषी ती 
नाकी नथ, कपाळी टिकली 
गुरुजींच्या पाया ती हो पडली. 

लिंब्रांडुंच्या अंगाची लाही-लाही झाली 
महाराष्ट्राची इज्जत जगी बुडाली
काळ्या जादूला बहुतेक ती भुलली
उतारा आणा, नजर तिची काढा
मनुवाद्यांपासून दूर तिला करा . 
 




Monday, August 22, 2022

समर्थ रामदास: सुखी संवाद

 
जनी वाद-वेवाद सोडूनि द्यावाl
जनी सुख-संवाद सुखें करावाll
 जगी तोचि तो शोक संतापहारीl
तुटे वाद संवाद तो हीतकारी ll
(मनाचे श्लोक 109)

समर्थ म्हणतात हे मना, लोकांशी सुख संवाद आनंदाने करावा. वाद विवाद  कदापि करू नये. जो संवाद, वाद दूर करतो, सुखी आणि समाधानी करतो. जो आपले दुख हरतो. तोच संवाद करणे योग्य.

घर असो, कार्यालय असो किंवा सामाजिक आणि राजनीतिक संस्था असो. प्रत्येक ठिकाणी काही समस्या असतात किंवा कार्यक्रम असतात. कार्यक्रम  ठरविण्यासाठी आणि समस्येंवर तोडगा काढण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. साहजिकच आहे जिथे दहा लोक असतील, तिथे प्रत्येकाचे विचार आणि कार्य करण्याची पद्धत ही वेगळी असणारच. सर्वांची मते ऐकून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. पण संवादाचे रूपांतरण वादात झाले तर कार्याचा नाश हा होतोच. लोकही तुटून दूर होतात. संवादातून समाधान शोधाचे असेल तर आपल्याला निम्न बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. 

1. आपला अहंकार हा बाजूला ठेवणे.
2. मी म्हणेल ती पूर्व दिशा हा हेका सोडणे.  
3. कुणालाही हीन लेखू नये.
4. अडाणी व्यक्तीच्या मतांचा ही सम्मान करणे.  
5. कुणी काहीही बोलले तरी क्रोध न करणे. 
6. बोलताना सदैव वाणी वर संयम ठेवणे. 
7. व्यर्थचे प्रश्न न विचारणे. 
8. दुसर्‍यांचे दोष न दाखविणे.
9. फक्त विषयवस्तु वरच चर्चा करणे. 

संवाद करताना वरील बाबी लक्षात ठेवल्या तर, समस्यांचे समाधान शोधता येतात. अश्या प्रकारचा संवाद सर्वांना संवाद सुखदायी आणि समाधानी करतो. शेवटी जे काही आपण सुचवितो त्याचे पालन आपल्यालाही करता आले पाहिजे. अन्यथा आपल्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 


Friday, August 19, 2022

समर्थ रामदास: पाण्याचे नियोजन आणि शेती



नदीचे उदक वहात गेले. तो ते निरर्थक चालले.
जरी बोंधोनी काढले. नाना तीरी कालवे.
उदक निगेने वर्तविले. 
नाना जीनसी पीक काढले.
पुढे उदकाचे झाले. पीक सुवर्ण. 
नाना उंच आम्र फळे. अंजीर,ऊस, द्राक्ष, केले; 
नाना पिके यत्नजळे. निर्माण झाली.  

एका टीव्ही वाहिनीवर एक छोट्या शेतकर्‍याची गोष्ट दाखविली होती. त्याच्या छोट्या शेतात नाना पिके, भाज्या, फळे घेऊन तो चांगली कमाई करत होता. तो कार्यक्र्म बघताना मला समर्थांच्या वरील ओळी आठवल्या. पुराणात म्हण आहे, जे कृषि करतात ते ऋषि. आपले सर्व ऋषि मुनि हे शेती ही करायचे. वैदिक काळात त्यांच्या आश्रमात शेतीवर अनुसंधान ही होत होते. बहुतेक त्यामुळेच आपल्या देशात शेतीत विविधता आली असेल. समर्थ ही एक ऋषि होत. समर्थांनी 12 वर्ष देशाचे भ्रमण केले होते. समर्थांनी भ्रमण करताना देशातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणल्या. पाणी आणि पिकांचे नियोजन केल्या शिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. हे त्यांनी जाणले. समर्थांनी शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपायही सुचविले. समर्थ म्हणतात, व्यर्थ वाहणारे नदीचे पाणी अडवून बंधारे बांधले पाहिजे. कालवे बांधून पाणी शेतात पोहचविले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाण्याची जेवढी उपलब्धता आहे त्यानुसार पिके घेतली पाहिजे. पिकाला जेवढे पाहिजे, तेवढेच पाणी दिले पाहिजे. एकाच वेळी शेतात नाना प्रकारची पिके घेतली पाहिजे. अनेकदा शेतकरी लोभाला बळी पडून संपूर्ण शेतात एकच पीक घेतात. वादळ, वारे, कमी-जास्त पाऊस, पिकाला लागणारी कीड इत्यादि कारणांमुळे पीक हातात येत नाही. शेतकर्‍याचे नुकसान होते.  कधी कधी नगदीच्या लालची ने एखाद्या भागात अनेक शेतकरी एकच पीक घेतात. मग बाजारात भाव मिळत नाही. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. बाजारात टमाटो, कांदे इत्यादींचे भाव अचानक गडगडण्याचे हेच मुख्य कारण.  नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. अधिकान्श आत्महत्या करणारे शेतकरी एकच पीक घेणारे असतात. शेतात एकापेक्षा जास्त पीक घेतले असेल तर, शेतकर्‍यावर अशी विपरीत परिस्थिति येणार नाही. समर्थ म्हणतात, शेतात  निश्चित जागी विविध प्रकारची फळ देणारी झाडे ही लावली पाहिजे. झाडे वार्‍यापासून पिकांची सुरक्षा तर करतातच पण फळे देऊन शेतकर्‍याची आर्थिक मदत ही करतात. समर्थांनी सुचविलेल्या वरील उपायानुसार जर शेतकर्‍यांनी शेती केली तर आज ही ते सुवर्ण पीक घेऊ शकतात. 

Wednesday, August 17, 2022

भारतीय शिक्षा बोर्ड

 

1835 पूर्वी देशात 6 लाख गुरुकुल होते. विद्यार्थी गुरुकुलांत सुरवातीच्या पाच-सहा वर्ष स्थानिक भाषा, गणित इत्यादीचे जीवनावश्यक ज्ञान अर्जित करायचे। सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकान्श विद्यार्थी गुरूंकडून पारंपरिक पेशेवर ज्ञान प्राप्तकरून आत्मनिर्भर होत असे.  उरलेले हुशार विद्यार्थी गणित, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, तलाव निर्मितीचे शास्त्र, वैद्यक शास्त्र, विज्ञान, संस्कृत भाषा, व्याकरण, दर्शन, वेद उपनिषद  इत्यादि विषय शिकायचे. परिणामी शिक्षित बेरोजगारी हा शब्द अस्तित्वात नव्हता. या शिवाय 1850च्या पूर्वी जगात सर्वात जास्त साक्षर लोक आपल्या देशात होते.  

ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट करून मैकाले शिक्षण भारतात आणले. शिक्षणाचे मुख्य उद्देश्य होता, भारतीयांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, त्यांच्यात हीन भावना भरणे आणि ब्रिटीशांसाठी चाकर निर्मिती करणे. या व्यवस्थेत 11/12 वर्ष शालेय शिक्षण घेऊन ही, पारंपरिक ज्ञानापासूनही वंचित झालेले, अधिकान्श विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नव्हते. भारत स्वतंत्र झाला. पण शालेय शिक्षणात बदल झाला नाही. आपल्या इतिहास, परंपरा आणि मुळांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. आजची भारतीय शिक्षा म्हणजे 'बिना नींव की  इमारत'. आज देशातील सीबीएससी समेत अधिकान्श शैक्षणिक बोर्डांचा  उद्देश्य,  '"इधर से आलू डालो, उधर से सोना निकलो"  अर्थात सर्वांना पास करून 12वी पास प्रमाणपत्र देण्या इतका राहिला आहे.  12 वर्ष शिकूनही अर्जित ज्ञांनाच्या मदतीने  विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नाही, हे कटू सत्य आहे. आपल्याच मुळांशी नाते तुटल्यामुळे तो आत्म सम्मानरहित हीनभावनेने ग्रस्त ही असतो. परिणाम आज देशात डिग्रीधारिच सर्वात जास्त बेरोजगार आहेत. कारण त्यांच्यापाशी अर्थार्जन करण्याचे ज्ञान नाही आणि सर्वांना सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही. 

देशात अनेक सरकारी बोर्ड आहेत. मग भारतीय शिक्षा बोर्डाची आवश्यकता कशाला. देशाच्या लोकांशी  नाळ मुळांशी जोडून त्यांच्यात आत्मसम्मांनाची भावना भरण्याचे शिक्षण आजच्या व्यवस्थेत दिले जात नाही. सरकारी नौकरशाही आणि राजनीति मुळे शिक्षणात बदल काळानुसार होणे शक्य नाही. त्यासाठी गैर सरकारी बोर्डाची आवश्यकता आहे. या शिवाय सरकारचा शिक्षणावर होणारा खर्च ही कमी होईल. 

भारतीय शिक्षा बोर्डाचे गठन झाले आहेत. भारत सरकारने ही या बोर्डाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांची नाळ आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी जोडण्यासाठी संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. प्रत्येक भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्‍या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही असू शकते. विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले जाईल. गणित, विज्ञान ,इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले जाईल. ज्ञान विज्ञानात होणारे बदल वेळोवेळी समाविष्ट केले जातील. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले जाईल. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य जवळपास पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आशा आहे, हा बोर्ड शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांति घडवून आणेल. 

Monday, August 8, 2022

आज मी पेढे केले

आज सकाळी  फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे,  महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का?  उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.

पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई  गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळले.  ते चार ते पाच मिनिटे

व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे  मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून  जाईल. मला काम  करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले. 

मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला,  काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम  तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.      

Wednesday, July 13, 2022

अग्निवीर आणि रोजगार

अग्निवीर योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पहिला म्हणजे त्यातून रोजगार हिसकावून घेतला जाईल. हे खरंच बरोबर आहे का? गैरसमज पसरवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, अग्निवीर योजनेंतर्गत पहिल्या वर्षी ४६ हजार नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्यापैकी 25 टक्के म्हणजे 11,500 सैन्यात कायमस्वरूपी असतील. उर्वरित 34,500 सैनिक वयाच्या 25 व्या वर्षी सेवेतून निवृत्त होतील. भविष्यात ते काय करतील? प्रश्न महत्वाचा आहे.

आता या, अग्निवीर योजना नसेल तर या पदांवर किती भरती होणार. 4 वर्षांनंतर कायमस्वरूपी होणारे सैनिक 11,500. याशिवाय, तात्पुरत्या 34,500 ला देखील 4 ने भागले जाईल. त्यामुळे आकडा 8625 येईल. म्हणजेच 20125 सैनिकांचीच कायमस्वरूपी भरती होणार आहे. उर्वरित 25875 जणांना सैन्यात नोकरीचा अनुभव मिळणार नाही आणि इतरत्र नोकरी मिळण्याची शक्यता कमी  राहणार. 

आता अग्निवीर योजनेचे फायदे: अग्निवीर 4 वर्षांच्या सैन्यात नोकरीसह अभ्यास, पदवी मिळवू शकणार आहे. त्याचे आरोग्यही चांगले राहील. त्याला लष्करी अनुभवही असेल. पगारही मिळेल आणि त्याच्या खिशात ११ लाख रुपयेही असतील. जेणेकरून त्याला स्वतःचा रोजगारही सुरू करता येईल. त्याच्या कुटुंबीयांवर काहीही खर्च होणार नाही. खरे सांगायचे तर चार वर्षांचा लष्कराचा अनुभव आणि २५ टक्के नोकरी मिळेल असे सरकारने सांगितले असते तर वर्षभरात लाखो रुपये देऊनही तरुण या योजनेत सहभागी होण्यास उत्सुक झाले असते. असेच गाजर दाखवून कोचिंग सेंटर्स बेरोजगारांकडून लाखो रुपये लुबाडतात आणि  जेमतेम 10 टक्के विद्यार्थीही उत्तीर्ण होत नसतील. वीस हजारांऐवजी ४६ ​​हजारांना नोकऱ्या मिळाल्यास कोचिंग सेंटरचा व्यवसाय बुडण्याचा धोका निश्चित आहे. हेच योजनेच्या विरोधाचे प्रमुख कारण आहे.

आता 34,500 निवृत्त सैनिक काय करणार हा प्रश्न आहे. लष्करी अनुभवामुळे त्यांना भविष्यात पोलीस, प्रशासन आदींमध्ये आरक्षण व आरक्षण मिळाले नसले तरी त्यांना नोकरीत निश्चितच पसंती मिळेल. म्हणजेच या योजनेनंतर निवृत्त झालेल्या 34500 पैकी 20125 तरुणांना जिथे रोजगार मिळणार होता, तिथे किमान 15 ते 20 हजारांना सरकारी संस्थांमध्ये नक्कीच नोकरी मिळणार आहे. उर्वरित खासगी क्षेत्रातही लष्करातून निवृत्त झालेल्या तरुणांच्या नोकरीच्या संधी अधिक असतील. उदा. अगदी खाजगी बँक, बी.कॉम.ची पदवी असलेला २५ वर्षांचा निवृत्त सैनिक त्याला नोकरीत इतरांपेक्षा प्राधान्य देईल. सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अतिरिक्त पात्रता असल्याने अग्निवीरांचे उज्जवल राहणार आहे. 

सारांश अग्निवीर योजनेत सहभागी तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. दुर्दैवाने ही योजना राबवण्यापूर्वी त्याचे महत्त्व तरुणांना समजावून सांगण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे माध्यमेही तरुणांना योग्य मार्गदर्शन करत नाहीत. कदाचित  विस्तवात तूप घालून त्यांना जास्त टीआरपी मिळत असावा. बाकी आपल्या देशात विरोधी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात. सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यातही ते कसूर करत नाहीत. त्याच्या प्रभावाखाली येऊन तोडफोड करणाऱ्या उर्वरित तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होणार हे निश्चित. आजच्या माहितीच्या युगात त्यांना सरकारी सोडा, भविष्यात त्यांना खाजगी नोकऱ्या मिळणार नाहीत.


Monday, July 11, 2022

ताज्या क्षणिका: महाराष्ट्राच्या राजनीतिक घटनांवर

ब्रूटस

सीजर कुणीच नव्हता 

सारेच  ब्रूटस होते. 

खंजीरीच्या पात्यांना

रक्ताची तहान होती. 

नेता 

ज्या रंगाची  शिकार 

त्या रंगाची भूषा. 

का सखी सरडा 

ना सखी नेता. 


जो पळतो तो जिंकतो 

बाजीरावाने घुडदौड केली 

निजामचा पराभव केला. 

शिंदेंनी विमानदौड केली 

उद्धवचा पराभव  केला. 

नशीब 

किती षड्यंत्र केले 

किती वेश बदलले 

नशिबी मात्र माझ्या 

फक्त मंत्रिपद आले. 

ज्ञानी 

लोक रात्री झोपतात 

ज्ञानी रात्री जागतात 

गीतेचा संदेश हा 

शिंदेंना कळला होता.  

आजचा पाऊस वेगळा होता 

आसामच्या डोंगर दर्‍यातून

मुंबईत कोसळला होता.

मर्सडीज पाण्यात बुडाली 

रिक्शा तरंगत होता. 

 

 


Thursday, June 23, 2022

मीर जाफरची आठवण आली

 

आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला. नवाब सिराजुदौलाचा सर्व खजाना ईस्ट इंडिया कंपनीने गिळंकृत केला. अडीच लाख पेक्षा जास्त रुपईया राबर्ट क्लाईवच्याही खिश्यातही गेला. सत्ता मिळाल्यावर नवाब मीर जाफर स्वत:चे आणि बंगालच्या जनतेचे कल्याण करण्याच्या विचारही करू शकला नाही. ईस्ट इंडिया कंपनीची सतत वाढती भूक पूर्ण करण्यासाठी त्याला बंगालच्या जनतेलाच पिळावे लागले. राज्यात अराजकता पसरली. तीन वर्षांत त्याची हकाल पट्टी झाली. शेवटी बंगालच्या सत्तेवर ब्रिटीशांचा पूर्ण अधिकार झाला. 

हरियाणा विधान सभेचा निकाल लागला. माननीय दुष्यंत चौटालाच्या पार्टीला 10 जागा मिळाल्या. त्यालाही मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखविल्या गेले होते. पण दुष्यंतने उपमुख्यमंत्री बनण्यात धन्यता मानली. राजनीतीत दुसर्‍यांचे उपकार घेण्यापेक्षा दुसर्‍यांवर उपकार करणे नेहमीच फायद्याचे असते. सत्तेची मलई चाखत तो हरियाणात त्याच्या पक्षाला अधिक सदृढ  करू शकतो. शिवाय त्याच्या सोयीने योग्य वेळी सत्तेतून बाहेर ही पडायचा मार्ग मोकळा. आज त्याच्या निर्णय योग्य होता, याची खात्री त्याला निश्चित झाली असेल. 

दुर्भाग्य माननीय उद्धव ठाकरे जवळ योग्य सल्लागार नव्हते. जे होते ते बहुधा मा. उद्धव एवजी मा. शरदजींने हित साधणारे होते. आपले अधिकान्श मतदार हे कॉंग्रेस विरोधी हिंदुत्ववादी विचारधारेचे आहे, ह्याचाही मा. उद्धवजींना विसर पडला. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात मोठी किंमत मा. उद्धवजींना द्यावी लागली. सत्तेची सर्व मलाई आजच्या राबर्ट क्लाईवच्या खिश्यात गेली. शिवसेनेच्या आमदारांवर ताकावर गुजराण करण्याची वेळ आली. याशिवाय पालघर ते चितळे पर्यन्त होणारे घटनाक्रम, तरुंगात असलेल्या मंत्र्यांविरुद्ध ही कारवाई करण्याची हिम्मत नसलेला मुख्यमंत्री इत्यादि, राज्यात भाजपला मजबूती प्रदान करत होते.  आज सकाळी यू ट्यूब वर बीएमसीचे महिन्यापूर्वीचे ओपिनियन पोल पाहीले. शिवसेनेला फारच कमी जागा मिळत आहे असे चित्र आहे. साहजिकच आहे, याची जाण अधिकान्श शिवसेनेच्या आमदारांना ही असेलच, की असेच चालत राहिले तर, पुढची  निवडणू  जिंकणे अशक्य आहे. स्वत:चे राजनीतिक अस्तित्व  सुरक्षित करणे हा प्रत्येक राजनेत्याचा धर्मच असतो. बंडखोर शिवसैनिक ही तेच करत आहे. 

बाकी इतिहासात मीर जाफर सोबत मा. उद्धवजींचे नाव ही  घेतले जाणार, हेच दुर्भाग्य त्यांच्या नशिबात येणार. 



Friday, June 17, 2022

करोंना : माझी गल्ली , गाव, आयएमए , पतंजलि इत्यादि


दिल्लीतील अधिकान्श जनता अनिधिकृत भागात राहते. अर्थात त्याचे श्रेय ही पंडित नेहरूंच्या डीडीए अक्ट 1957ला आहे. त्या कायद्यात घरे बांधण्याचा अधिकार फक्त डीडीए मिळाला. डीडीए मागणीनुसार घरे बांधू शकली नाही. नेता आणि प्रॉपर्टी डिलर्सने हात मिळविणी करून अनिधिकृत कालोनीज बांधल्या. लोकांना घरात शिरण्यासाठी रस्ता म्हणून 10, 20 आणि 40 फुटांच्या गल्ल्या आणि रस्ते मजबूरीने निर्मित करावे लागले. त्यामुळे सार्वजनिक सुविधा- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, पार्क इत्यादि या भागांत फारच कमी. घरे ही जमिनीवर १५X६० ft.  आणि वरचे माले दोन-दोन फूट पुढे मागे जास्त. ७० टक्के दिल्लीकर अश्याच भागांत राहतात. माझ्या घरा समोरची गल्ली 20 फूटाची आणि मागची दहा फुटाची आहे. गल्लीत काही घरांत खाली घरमालक आणि वर एक-एक खोल्यांमध्ये भाडेकरू राहतात. कमीतकमी पाच ते सात भाडेकरू एका घरात असतातच. सर्व घरमालकांच्या घरात एसी आणि कारही आहे. आमच्या गल्लीत निवृत सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, किरकोळ समान विकणारे दुकानदार, टॅक्सी -रिक्शा चालक, भाजी विक्रेता, फळ विक्रेता, चहाची टपरी लावणारे, भांडी-धुणी करणार्‍या बाया, फॅक्टरी मजदूर  इत्यादि राहतात.    

आमची कालोनी ही सहा-सात गल्यांची आहे. करोंना काळात आमच्या भागात एक ही मृत्यू झाली नाही. विशेष म्हणजे आमच्या गल्लीत एका ही भाडेकरूच्या परिवारात करोंना हा शिरलाच नाही. बहुतेक त्यांना झाला असेल तरी माहीत पडला नसेल. दुसरीकडे एसीत राहणार्‍या अधिकान्श  घरी कुणा न कुणाला तरी करोंना हा झालाच. त्यातही दुसर्‍या लाटेत अर्थात एप्रिल महिन्यात ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये अडमिशन मिळणे कठीण होते. घरात आम्ही तिघे- मी, सौ. आणि मुलगा. मी रोज एक गोळी श्वासारी आणि कोरोंनील घेऊन कार्यालयात जात होतो. पार्लियामेंट सेशन सुरू झाल्यावर आरटीपीसीआर महिन्यातून एकदा होत असे. नेहमीच रिपोर्ट नेगेटिव्ह याची. पण लस घेतल्यानंतर मला, सौ. आणि मुलाला करोंना झाला. सौ आणि मुलाला सौम्य लक्षणे होती. मला आधीच भयंकर केजरीवाल खोकला आणि त्यात नाकही सतत वाहणारे. रोज रात्री झोपण्यापूर्वी Montek LC घ्यावी लगायची. याशिवाय पेंक्रियाचा क्षयरोग आणि हृदयाची सर्जरी ही झालेली होती. हृदय रोगांची औषधी ही रोज घेत होतो. फॅमिली डॉक्टर ने खोकल्यासाठी औषधी दिली आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा सल्ला दिला. टेस्ट पाजिटीव आल्यावर, सीटी स्कॅन केले. 50 टक्केहून जास्त संक्रमण होते. आता ते आधी पासून होते की करोंना नंतर झाले हे सांगणे कठीण. माझी लेक, तिचा सासरा आणि जाऊ तिन्ही दिल्लीतल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम करतात.  ते ही रोज सकाळी  गिलोय आणि  तुळशी  घेत होते. तसे चहात ही ते गिलोय टाकायचे. त्यांच्या हिमाचलच्या गावात भरपूर होते.  माझ्या लेकीने मला हॉस्पिटलमध्ये अडमिट होण्यास मना केले. बहुतेक तिथे प्रोटोकॉल औषधे घ्यावी लागली असती. फक्त डॉक्टरचा सल्ला घेऊन एक गोळी  steorid (40 रुपयांच्या दहा गोळ्या), विटामीन, कफ काढण्याचे आयुर्वेदिक औषध इत्यादि दिले. steorid गोळ्या एवढ्या स्वस्त असतात तरीही महागडे steorid  का दिले जात होते  हा ही एक मुद्दा आहे.  लेकीच्या हॉस्पिटलमध्येही रुग्णांना रोज काढा दिला जात होता, हे विशेष. दुसर्‍या लाटेत दिल्लीत अधिकान्श हॉस्पिटल्स काढा देऊ लागले होते. पतंजलि वैद्यचा सल्ला ही घेतला, रोज दोन वेळा, दोन-दोन गोळ्या श्वासरी आणि करोंनील घेणे सुरू केले. शिवाय दिवस-रात्र जेवढा वेळ मिळेल दीर्घ श्वास घेत राहिलो. नंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार तीन महीने कोरोंनील घेतले. सतत वाहणारे नाक, जुना खोकला ठीक झाला (40 वर्षांपासून नित्य नेमाने रोज रात्री घेणारे Montek LC औषध बंद झाले). बाकी आमच्या गल्लीतील एक ही करोंना रुग्ण हॉस्पिटलमध्ये अडमिट झाला नाही आणि मेलाही नाही. दिल्लीत अधिकान्श अधिकृत कालोंनीत मरणार्‍यांचे प्रमाण कमीच होते. गेल्या दोन वर्षांत आमच्या गल्लीत फक्त एक ८५ + म्हातारा दगावला. त्याला करोंना झालेला नव्हता. 

समोरच्या घरात सात ते आठ भाडेकरू राहतात. खालच्या फ्लोरवर प. उत्तरप्रदेशचे काही मुस्लिम भाईबंद. ते फळांच्या रेडया लावतात. दर दुसर्‍या दिवशी फळांचा टेम्पो तिथे येतो. सीझनच्या अनुसार टरबूज, खरबूज, आंबा, सफरचंद, डाळिंब, पेरु संतरा इत्यादि विकतात. करोंना काळात ही त्यांना कधी मास्क लावलेले पहिले नाही. कधी-कधी मी त्यांना टोकत ही होतो. नेहमी एकच उत्तर मिळायचे. आम्ही उन्हात फिरतो, आम्हाला करोंना होणार नाही. पण  जवळ  मास्क ठेवतो, मुख्य रस्त्यांवर जातो, तेंव्हा घालतो. एकदा मी विचारले तुमच्या गावांत करोंना आहे का. तो म्हणाला नाही, गावांतील लोक जास्त वहमी असतात. फक्त अफवा पसरली तरी ते त्या गावांत जाणार नाही. गावांत ही प्रत्येक व्यक्ति दुसर्‍याच्या घरात काय चालले आहे ह्यावर नजर ठेऊन असतोच. ह्याच मानसिकतेमुळे गावांत हा रोग कमी पसरला असावा. माझ्या लेकीचे सासरे ही हिमाचलचे. काही कामानिमित्त त्यांना गावी जावे लागले पण तिथे त्यांना एक आठवडा घरातच बंदिस्त राहावे लागले. बहुतेक आपल्या देशात खेड्या-गावातील अशिक्षित जनतेने प्रोटोकॉलचे पालन शहरी लोकांपेक्षा जास्त उत्तम रीतीने केले. त्या मागाचे कारण काही का असेना. आमच्या घरात भांडी, झाडू पोंछा लावणारी बाईच्या परिवारातही कुणालाही करोंना झाला नाही. तिच्या नातेवाईकांत सर्वच स्त्रिया घरात भांडी-धुणी करतात. भाजी विक्रेता, रिक्षाचालक, मेहनत मजदूरी करणार्‍यांपासून करोंना दूरच राहिला. घरगुती काढा मात्र सर्वच घ्यायचे.

दुसरीकडे माझा मोठा भाऊ नोयडात राहत होता. सामाजिक कार्यांत सदैव सहभाग असल्याने साहजिकच होते नोयडाचे सांसद आणि कैलाश हॉस्पिटलचे संचालक श्री महेश शर्मा ही त्याच्या चांगल्या ओळखीचे होते. दोन्ही मुले इंजीनियर आणि आयटी. एक मुलगा मुंबईत आणि दूसरा यूएसए मध्ये. अर्थातच त्याच्या काढा इत्यादीवर विश्वास नव्हताच. साहजिक होते हॉस्पिटलमध्ये अडमिट झाला. मुंबईवाला पुतण्या ही घरी पोहचला.  प्रोटोकॉलच्या उत्तम औषधी दिल्या गेल्या. श्री महेश शर्मा यांनी जातीने लक्ष ही दिले.पण तबियत बिघडत गेली. शुगर वाढली, लीवर, किडनी खराब झाल्या, व्हेंटिलेटर, डायलेसिस, शेवटी जीवन रक्षक इंजेक्शन इत्यादि. लाखोंचे बिल झाले. पण तो वाचला नाही. त्याचे शेवटचे दर्शन ही त्याचे घेता आले नाही. 

प्रोटोकॉलच्या अनेक औषधी निरर्थक होत्या म्हणून प्रोटोकॉल मधून बाहेरही झाल्या. उत्तम औषधींचे सत्य समजले. तेंव्हापासून एकच विचार मनात येतो. दादा करोंनामुळे गेला की चुकीच्या औषधींमुळे. नातेवाईकांमध्ये अनेक डॉक्टर आहेत एक ही सांगू शकला नाही की त्या औषधी का दिल्या गेल्या होत्या. सगळ्यांचे एकच उत्तर प्रोटोकॉलअधिकान्श सुशिक्षित डॉक्टरांनी अंधविश्वासी होऊन बिना आक्षेप घेता प्रोटोकॉल औषधी रुग्णांना दिली आणि स्वत: ही घेतली.  दिल्लीत तर एक नवीन म्हण तैयार झाली. "जो हॉस्पिटल गया वह गया, जो घर रहा वह बच गया". मेडिकल माफियाने अब्जावधी कमविण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांचे प्राण घेतले हे कटू सत्य आहे.

या सर्व काळात डॉक्टरांची आणि रूग्णांच्या हितैषी आयएमएची भूमिका अत्यंत संदेहस्पद होती. स्वास्थ्य मंत्रालयाने कोरोंनीलला नोव्हेंबर २०२० मध्ये 155 देशांत निर्यातीची अनुमति दिलेली होती. मीडियात बातमी नव्हती म्हणून आयएमए ही शांत होती. फेब्रुवरी २१ मध्ये कोरोंनीलवरचा रिसर्च पुस्तिका प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. आमचे मंत्री तिथे होते आणि मी ही तिथे होतो. पहिल्यांतच स्वामी रामदेव यांना पाहण्याचा योग आला.  तसे म्हणाल तर आयुर्वेदिक औषधीवर टिप्पणी करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार आयएमएला नव्हता. आयुर्वेदिक वैद्यांच्या हितैषी संस्थाने आक्षेप घेतला असता तर त्यात काही तथ्य आहे, हे समजले असते. आयएमएने  बहुतेक आयुर्वेदिक फार्मा कंपनीचे औषध होते म्हणून विरोध करून जनतेला भ्रमित करण्याचा असफल प्रयत्न केला. अधिकान्श टीव्ही डीबेट मध्ये आयएमएच्या प्रतींनिधींनी  प्रश्नांचे तार्किक उत्तर देण्याएवजी जोरजोरात ओरडत आणि हातवारे करत समस्त डाक्टरांची इंभ्रत धुळीस मिळविण्यास पुरोजर प्रयत्न केला. आयएमएच्या अश्या कृत्यांमुळे डॉक्टरांच्या विश्वासनीयतेला तडा जात आहे. हे ही ते विसरले. दुर्भाग्य इतकेच की अधिकान्श डॉक्टरांनी, काही अपवाद वगळता, आयएमएच्या कृत्यांचा विरोध केला नाही. 

बहुतेक आपल्याला माहीत आहे की नाही, करोंना काळात पतंजलिचे योगपीठमध्ये असलेले दोन्ही शिक्षण संस्थान (सीबीएससी) एक दिवस ही बंद झाले नाही. रोज एक तास, योग आणि व्यायाम, गिलोय आणि तुळशीचा काढा, हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि ब्रम्हचारी सुरक्षित राहिले. प्राकृतिक चिकित्सेचे केंद्र, योगग्रामला ऑक्टोबर २०२० मध्ये पुन्हा उघडण्याची अनुमति मिळाली. तिथली निवासी रोगी क्षमता फक्त ६०० होती. उन्हाळा सोडला तर तिथे फार कमी रुग्ण उपचार घेत होते. पण करोंना काळात असे काय घडले की, पतंजलिला ती क्षमता  वाढवून १२०० करावी लागली. त्यासाठी टेंट सिटी तैयार करावी लागली. १२०० लोकांना एकाच वेळी योग करवता येऊ शकेल, एवढा मोठा ३५००० sq. ft. डोम एका भारतीय कंपनीने दोन महिन्यात उभा करण्याचा विक्रम केला. एवढेच नव्हते तर योगपीठ इथेही २००० रुग्णांसाठी आयपीडीची नवीन व्यवस्था उभारवी लागलील. मोठ्या संख्येत वैद्य, फिजिओ, प्राकृतिक चिकित्सकांना प्रशिक्षण द्यावे लागले. भारी भीड असूनही इथे कुणाला करोंना होत नाही.  आज ही ३००० हून जास्त निवासी रुग्ण तिथे रोज असतात उपचार घेणार्‍यात अनेक डॉक्टर ही असतात. ज्यांना शंका आहे, सकाळी आस्था आणि वैदिक चॅनल उघडून स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करू शकतात. याचे कारण करोंना काळात पतंजलिच्या हजारो योग शिक्षकांनी ऑन लाइन आणि ऑफ लाइन योग कक्षा घेऊन कोटीहून जास्त करोंना रुग्णांचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्राणांची रक्षा केली. त्यांचे हजारो कोटी वाचविले. परिणाम पतंजलिवर लोकांचा विश्वास वाढला. भारतात एकाच जागी निवासी उपचार देणारी सर्वात मोठी संस्था बनली. अर्थात याचे श्रेय आयएमएला दिले जाऊ शकते. 

माझ्या सारख्या सामान्य माणसाला एक गोष्ट चांगली समजली. करोंना सारख्या रोगांपासून मुक्ति पाहिजे असेल तर समावेशी चिकित्सा प्रणालीची  गरज आहे. परिस्थितीनुसार  योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सा, सर्जरी आणि एलोपैथी औषधी सर्वांचा उपयोग रुग्णांना ठीक करण्यासाठी केला पाहिजे. माझे म्हणाल तर आजच्या घटकेला मी एलोपैथीचे औषध घेणे बंद केले आहे. (डिस्पेंसरीतून फ्री मध्ये मिळतात). फक्त पोटाच्या समस्येसाठी सरकारी डिस्पेंसरीतले आयुर्वेदिक औषध घेत आहे. असो.

 


Tuesday, June 14, 2022

वार्तालाप (२२)श्रीदासबोध : दशक 12: आचार विचार आणि प्रयत्न

श्रीदासबोधात समर्थांनी पूर्वापार पासून निर्मित वेद उपनिषद आणि समस्त शास्त्रांचे ज्ञान सामान्य जनांना कळेल अश्या सौप्या भाषेत सांगितले आहे. या दशकात इच्छित उद्देश्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्ननांची पराकाष्ठा केली पाहिजे, हे संगितले आहे. श्रीदासबोधात समर्थांनी फक्त उपदेश दिलेला नाही. प्रयत्न कश्यारीतीने केले पाहिजे हे ही सांगतात. आपल्या आचरण आणि व्यवहाराचा प्रभाव दुसर्‍यांवर पडतो. त्यासाठी समर्थांनी माणसाचे आचार, विचार आणि व्यवहार कसे असावे, हे सांगितले  आहे. 

समर्थ म्हणतात माणसाने सकाळी लवकर उठले पाहिजे. स्नान इत्यादि करून व्यवसायासाठी घरातून बाहेर निघण्यापूर्वी स्वच्छ वस्त्र परिधान केले पाहिजे. मलिन वस्त्र घातलेल्या, केश आणि दाढी व्यवस्थित केली नसलेल्या  व्यक्तीचा समोरच्यावर सकारात्म्क प्रभाव पडत नाही. अक्षर सुंदर आणि स्पष्ट असले पाहिजे. तुमचे लिखाण वाचणार्‍याला त्रास झाला नाही पाहिजे. फक्त अनुमानाच्या आधारावर कुठलीही चर्चा केली नाही पाहिजे. प्रत्यक्ष आणि तर्क आधारित प्रमाणाच्या मदतीने नेमकी, मुद्देसूद आणि मृदु भाषेत आपली बाजू सदैव मांडली पाहिजे. फक्त अनुमानाच्या आधारावर कार्य केल्याने गोत्यात येण्याची शक्यता जास्त आणि दुसर्‍यांचा विश्वास गमाविण्याची शक्यताही जास्त. भूतकाळात झालेले अन्याय विसरून दुसर्‍यांना क्षमा करता आली पाहिजे. दंभ दर्प आणि अभिमान यांच्या त्याग करता आला पाहिजे.  सत्याची कास कधीही सोडली नाही पाहिजे. इत्यादि. 

पुढे समर्थ म्हणतात पवित्र आचार आणि विचार इच्छित साध्य करण्यास बहुमोल मदत करतात पण इच्छित साध्य करण्यासाठी प्रयत्नांची ही पराकाष्ठा करावी लागते. आजचे उदाहरण, स्वामी रामदेव ही म्हणतात 'अखंड, प्रचंड, पुरुषार्थ' केल्या शिवाय इच्छित उद्देश्य पूर्ण होत नाही. ते स्वत: सकाळी साडे तीन वाजता उठतात. दीड तास प्रात:विधी आणि व्यायाम, त्यात 5 किमी धावणे ही आले. त्यांची योग कक्षा सकाळी 5 वाजता  प्रारंभ होते. त्या विभिन्न वाहिनींवर साडे नऊ वाजे पर्यन्त चालतात. गेल्या वीस वर्षांपासून एक ही दिवस त्यात खंड पडलेला नाही. त्यानंतर विभिन्न संस्थांचे कार्यक्र्म, शेकडो रुग्णांना प्रत्यक्ष भेटणे, देशातील विभिन्न प्रदेशांना भेट देऊन रात्री तीन वाजता परतल्यावर ही सकाळी साडे तीन वाजता पुन्हा नवीन सुरुवात होतेच. समर्थांनी म्हंटलेच आहे 'बोलण्यासारिखें चालणे, स्वयें करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे'. जगातील सर्वच प्रसिध्द व्यक्ति मग त्या वैज्ञानिक असो, राजनेता असो की व्यवसायिक सर्वच 18-18 तास कार्य करतात. बोलतात तसेच वागतात. आपले पंतप्रधान ही रोज 18 तास काम करतात.  सारांश उत्तम मार्गांचा अवलंबन करून आणि सतत निरंतर प्रयत्न केल्याशिवाय आयुष्यात इच्छित उद्देश्य पूर्ण होत नाही. 

Friday, June 3, 2022

पुनर्जन्म सरड्याचा हवा

आयुष्यभर सत्तेचे सुख उपभोगणारा एक भारतीय नेता त्याच्या मृत्यूनंतर चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. चित्रगुप्ताने त्या नेत्याला सांगितले की तुझ्या कर्मानुसार तुला पुढचा जन्म तुझ्या इच्छित पशु योनीत मिळेल. आता मला सांग, तुला काय व्हायचं आहे। सिंह, चित्ता की हत्ती. नेत्याने विनंती केली, प्रभु पुनर्जन्म मला सड्याचा हवा।चित्रगुप्त म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. पण मला एक विचारू का, सिंह, चित्ता आणि हत्ती यांसारखे मोठे शक्तिशाली प्राणी सोडून तुला सरड्याच्या योनीतच पुनर्जन्म का पाहिजे? नेता हसला आणि म्हणाला, सिंह, चित्ता आणि हत्तीसारखे मोठे प्राणी जंगलाचा राजा होण्यासाठी नेहमीच लढत असतात. सर्वकाही असूनही, ते कधीही शांतपणे झोपत नाही. पण जंगलाचा राजा कोणी असला तरी सरड्याला काहीच फरक पडत नाही. सरडा जंगलातही आयुष्यभर मौज करतो.

Thursday, June 2, 2022

वार्तालाप (२३)श्रीदासबोध: श्रवण भक्ति आणि आत्म साक्षात्कार

आध्यात्मिक क्षेत्रात माझ्या गुरु सौ. मंगला ताईंनी मला एक प्रश्न विचारला. भगवंताबद्दल उत्कट प्रेम/ अनुरक्ती असलेल्या आत्मज्ञानी प्रवचन करणारा आणि आत्म साक्षात्कारी ह्या दोघांमध्ये काय फरक आहे.  

पहिला प्रश्न मनात साहजिक येणारच. आत्म साक्षात्कार म्हणजे काय? आत्मा म्हणजे ब्रम्ह आणि वेद म्हणतात "तत त्वं असि" अर्थात तू तोच आहे. दुसर्‍या शब्दांत आपल्याच शरीरात असलेला आत्मा हाच ब्रम्ह आहे. आत्मा हा सत्य, शाश्वत,  निर्गुण, निराकार, निर्मळ आणि आनंद स्वरूप असतो. मायेच्या अधीन असल्यामुळे आपल्याला असे वाटते, आत्म साक्षात्कार आपल्याला होणे असंभव. आत्म साक्षात्कारसाठी काय करावे, असे अनेक प्रश्न ही मनात येतात. पण आपल्यापैकी अनेकांना आत्म साक्षात्कार कधी न कधी हा होतोच. फक्त आपल्याला कळत नाही. अधिक खोलीत न जाता एक छोटासा माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग  सांगतो. श्रीदासबोधात श्रवण भक्ति ही सांगितली आहे. या प्रसंगाचा संबंध श्रवण भक्तीशी आहे. 

एक प्रश्न पुन्हा मनात येतो. अधिकान्श कीर्तनकार, भजन गायक इत्यादि पैसे घेऊन कार्यक्र्म करतात. ते स्वत: मायेच्या अधीन असतात, मग आपल्याला आत्म साक्षात्कार कसा घडवून आणणार. प्रश्न रास्त आहे, पण मायेने निर्मित शरीराला जीवित राहण्यासाठी कर्म हे प्रत्येकालाच करावे लागते. त्याशिवाय संसाराच्या गरजा पूर्ण करणे शक्य नाही. त्यासाठी दक्षिणा/ पैसा हा घ्यावाच लागतो. पण जेंव्हा प्रवचनकार/ भजन गायक भक्तीत तल्लीन होऊन  परमेश्वराची स्तुति करतो, तो त्याच्यासोबत ऐकणाऱ्यांना ही काही क्षणासाठी का होईना आत्म साक्षात्कार घडवून आणतो. माझा असाच एक अनुभव. त्यावेळी मी २३-२४ वर्षाचा असेन.आपल्या दोन मित्रांसोबत प्रगति मैदानात ट्रेड फेअर पाहायला गेलो होतो. माझे दोन्ही मित्र माईकल जेक्सनचे चाहते. मलाही  संगीतातले काहीच कळत नव्हते. आम्ही  प्रगति मैदानात असलेल्या शाकुंतल थिएटर जवळ पोहचलो. तिथे आम्हाला कळले, पंडित भीमसेन जोशी यांचा गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. पंडितजी हे मोठे नाव होते.आमच्या पैकी कुणालाही शास्त्रीय संगीतात रस नव्हता तरीही पंडितजी मोठे नाव आहे, जरा थोडी झलक बघून घेऊ. आम्ही आत आलो. थिएटर भरलेले होते. एका भिंतीला टेकून आम्ही उभे राहिलो. एक सरदारजी  त्यांच्या सोबत तबल्यावर संगत करत होते. पंडितजींनी गाणे सुरू केले  "जो सदा हरी की भजे वही परम पद पाएगा..." पंडितजी भजनात तल्लीन होते. त्यांचा धीर गंभीर आवाज थिएटर मध्ये गुंजायमान झाला होता. माझे डोळे आपसूक बंद झाले. भान हरपले. मनात सतत सुरू असणारे सर्व विचार नष्ट झाले.  मी पणा संपला होता.  

टाळ्यांच्या आवाजाने माझी तंद्रा भंगली. जी माझी अवस्था झाली होती, तीच माझ्या दोन्ही मित्रांची झाली होती. आम्ही काही भक्त नव्हतो. पूजा पाठ करणारे नव्हतो. तेंव्हा धार्मिक ग्रंथ इत्यादीही  वाचलेले नव्हते. तरीही भक्ती भावाने भजन गणाऱ्याने आम्हाला काही क्षणासाठी का होईना, आमचा मी पणा संपविला होता. आज ही जेंव्हा हे भजन ऐकतो अंगावर शहारे येतात. पण तसा अनुभव मात्र कधीच आला नाही. जेंव्हा परमेश्वराचे गुणगान ऐकताना आपले डोळे बंद होतात, मनातील सर्व विचार नष्ट होतात, आनंदाने डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात. ते क्षण म्हणजे 'आत्म साक्षात्कार'. आत्म साक्षात्कार प्रत्येकाला होऊ शकतो पण आत्म साक्षात्कार घडवून आणण्याची क्षमता  काहींपाशीस असते.  

Monday, May 30, 2022

माझे सैराटी समीक्षा

काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र मला म्हणाला, पटाईत, बर्‍याच महिन्यांपासून तू काही लिहले नाही. मी म्हणालो आजकाल मूड होत नाही. तो म्हणाला, अस कर, काहीतरी नवीन लिह. एखाद्या सिनेमाची समीक्षा तुझ्या शैलीत कर. मी त्याला म्हणालो, मी सिनेमे फारच कमी बघतो. उभ्या आयुष्यात थिएटरमध्ये जाऊन जास्तीसजास्त डझन भर बघितले असतील. तो म्हणाला, अरे सिनेमांची समीक्षा  करायला, जास्त डोक्स लागत नाही. आपल्या सुपर डूपर मराठी सिनेमा सैराटची कर. आता मित्राचा आदेश टाळणे शक्य नव्हते.  

आपल्या बॉलीवूड सिनेमांची एक विशेषता असते. विषय कुठलाही का  असेना, कथेचा मूळगाभा एकच असतो. हीरो बहुतेक गरीब मजदूर, मागासलेला, सुंदर हिरोईन, खलनायक श्रीमंत प्राण  आणि शशिकले सारखी हिरोईनची आई, जिला पैश्यांसाठी हिरोईनला तिच्या इच्छे विरुद्ध  प्राणच्या गळ्यात बांधायचे असते. प्राणला ही सुंदर हिरोईन पाहिजे. सुंदर हिरोईन गरीब हीरो वर प्रेम करते. त्याच्या घरची मीठ भाकर तिला आवडते. हीरो तिच्या सोबत झिंगाट डान्स करतो, गाणी म्हणतो. साहजिकच आहे ,प्राणला हे आवडत नाही. तो हीरोला जाळ्यात अटकविण्यासाठी षड्यंत्र रचत रहातो. हिरोचे  मित्र प्राण पणाला लाऊन हिरोची मदत करतात. प्राणचे षडयंत्र विफल होते. बहुधा तो जेल मध्ये जातो. हीरो हिरोईनचा सुखीचा संसार सुरू होतो आणि चित्रपट संपतो. "बुडत्या जहाजावरच्या प्रेम कथा" या हॉलीवूड सिनेमावर ही बॉलीवूडचा परिणाम दिसला. प्राण, शशिकला, सुंदर हिरोईन आणि गरीब हीरो. सर्वच तिथे दिसले. फरक एवढाच हिरोईनला वाचविताना हीरो शहीद होतो. प्राणला काही हिरोईन मिळत नाही. 

काळानुसार बॉलीवूडच्या चित्रपटांत थोडा फार बदल होत राहिला. पूर्वी हीरो मिल मॅनेजर किंवा मजदूर इत्यादि राहायचा. नंतर कॉलेजमध्ये शिकणारे  प्रेमवीर आले. सैराटच्या निर्मात्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी, ज्यांना प्रेम कशाशी खातात माहीत नाही,  प्रेम प्रकरण दाखविले. बहुतेक "मुलांनो शाळेत शिकू नका प्रेम करा, पोरीला घेऊन घरातून पळा " असा संदेश त्यांना द्यायचा असेल. गावाची पृष्ठभूमी होती, साहजिक मुलगी पाटलाची पोर आणि मुलगा दलित घराण्याचा दाखविला. हीरो हा डशिंग असावा लागतो. आज क्रिकेट खेळाडूंना सुंदर हिरोईन भेटतात. तर आमचा हीरो ही क्रिकेट उत्तम खेळणारा होता. प्रेमाची जागा, पनघट जागी, विहीर आली. हिरोईन आपल्या मैत्रिणींसोबत विहीरीत जलविहार करत होती, तेंव्हाच हीरो ने विहीरीत उडी मारली. काय हा डशिंग पणा, अहाहा! पाहून डोळे तृप्त झाले. हिरोईनला  पटावायला हीरोला असले नानाविध प्रकार करावेच लागतात.  बाकी गावात असे घडले तर संपूर्ण गावात चर्चा होते. तेंव्हाच या कहाणीचा दी एंड झाला असता. पण हिरोईनच्या मैत्रिणींनी याची चर्चा कुठेच केली नाही. तिची प्रेम कहाणी सहज पोटात पचविली. पूर्वीपार चालत आलेल्या बॉलीवूडी परंपरेनुसार झिंगाट डान्स हा झालाच. हिरोईन आणि  हिरोचे प्रेम आता जगा समोर उघड झाले. आपला शाळेकरी नाबालिग हीरो, नाबालिग मुलीला घेऊन पळाला. भरपूर मार खाऊन हिरोच्या  मित्रांनी त्याला हिरोईनलासोबत घेऊन पळण्यास मदत केली. (हिरोचे मित्र मार खाण्यासाठीच असतात). दोघांचा सुखी संसार एका महानगरात सुरू झाला.(आता नाबालिग पोरांना राहण्यासाठी जागा,  नौकरी कशी मिळाली असले फालतू प्रश्न विचारू नये).

प्रेम झाले, झिंगाट डान्स झाला, मस्त गाणे झाले, सुखी संसार सुरू झाला. सर्वसाधारण सिनेमा असता तर इथेच संपला असता. पण निर्मात्याला लक्षात आले की त्याला ऑनर किलिंग ही दाखवायची आहे. सिनेमात  90 टक्के मनोरंजन असल्याने सिनेमा खूप चालला. झिंगाट गाण्यावर खूप शिट्ट्या ही वाजल्या. बॉलीवूडी सिने सिद्धांताचे पालन करत गावातील दाहक वास्तव  दाखविण्याचे श्रेय ही निर्मात्याला मिळाले. 

सिनेमा पाहताना मनात अनेक प्रश्न आले,  प्रेम कथेत वयस्क स्त्री-पुरुष ही दाखविता आले असते. तसे असते तर दाहक वास्तव अजून उठून दिसले असते. पण मग झिंगाट डान्स आणि गाणी दाखविता आली नसती. शाळा आणि कालेजात शिकणार्‍या पोरांना हा सिनेमा अत्यंत आवडला. दिल्लीत आज ही  लग्नाच्या रिसेप्शन मध्ये  डीजे झिंगाट गाणे वाजवितात आणि  कोवळे मुले आणि मुली या गाण्याच्या तलवार झिंगाट डान्स ही करतात. अश्या सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल. शहरात येणार्‍या अल्पवयीन जोडप्यांचे शहरातील गिधाडे काय हाल करतात, हे कोवळ्या मुलांना माहीत असण्याची शक्यता नाही. पण निर्माता तर शिकलेला होता?   मला वाटते कोवळ्या मुलांवर अश्या सिनेमांचे काय परिणाम होतात, याच्याशी निर्मात्याला काही ही घेणे देणे नव्हते.  निर्मात्याचा मुख्य उद्देश्य फक्त गल्ला भरणे होता.  त्यात तो सफल ही झाला. बाकी  ऑनर किलिंग  मुद्दा म्हणजे  हत्तीचे दात दाखविण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे(हे माझे मत आहे, कुणाला सहमत होण्याची आवश्यकता नाही).

 



Monday, May 23, 2022

वार्तालाप (२१) श्रीदासबोध : दशक ८: दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.

 जय जय रघुवीर समर्थ 

समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात  "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे"  या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न  आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते.  राजाच्या  सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते. श्रीदासबोधच्या आठव्या दशकात समर्थ म्हणतात "घात होतो दुश्चितपणे.., दुश्चितपणे शत्रू  जिणे...". राजा जर  असावधान असेल तर घात होतो. शत्रू  त्याला पराजित करतो. 

मी एसपीजीत असताना एक किस्सा अनेकदा ऐकला होता. त्यात किती सत्य आहे, हे मला माहीत नाही. पण हा किस्सा राजाच्या सुरक्षेची जवाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांची भूमिका काय असावी हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट करतो.  किस्सा असा आहे, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांची एक सभा होती. एक कनिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही शिपाई प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी नियुक्त होते. सभा संपली. आपल्या प्रिय नेत्याचे चरणस्पर्श करण्यासाठी आणि हात मिळविण्यासाठी लोकांनी गर्दी केली. कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या लक्षात आले, लोकांचे हे प्रेम पंडितजींवर भारी पडत आहे. पंडितजींना शारीरिक इजा होऊ शकते.  त्याने शिपायांना आज्ञा केली, लोकांना पंडितजीपासून दूर करा. त्या कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पंडितजींचा हात पकडला आणि त्यांना ओढत कारकडे निघाले. अर्थातच पंडितजींना हे आवडले नाही. ते त्याच्यावर ओरडले, रागावले. पण त्या अधिकार्‍याने पंडितजींच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना कारमध्ये बसविले. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्या अधिकार्‍याला आपल्या चेंबर मध्ये बोलविले. त्याला वाटले, आता पंडितजी रागावणार आणि त्याची  हकालपट्टी होईल. पण झाले उलट. पंडितजींनी त्याची प्रशंसा केली आणि म्हणाले आम्ही नेता लोक प्रजेसोबत असताना, भान विसरून जातो. तुम्ही प्रसंगावधान राहून योग्य निर्णय घेतला. त्या अधिकार्‍याने आपल्या कर्तव्याचे १०० टक्के पालन केले होते.   

आपल्या पूर्वप्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधींचे त्यांच्या शीख अंगरक्षकांसोबत अत्यंत पारिवारीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळची परिस्थिति पाहता, प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनी शीख अंगरक्षकांची बदली करण्याचे ठरविले. त्यांनी प्रधानमंत्रीच्या निजी सचिवला त्यानुसार सूचना केल्या असतीलच. पण श्रीमती इंदिरा गांधींनी परवानगी दिली नाही.  प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनीही योग्य निर्णय घेतला नाही. श्रीमती गांधीची हत्या झाली. संपूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागले.  निष्ठा दोन प्रकारच्या असतात.  त्यांची निष्ठा स्वर्गीय इंदिरा गांधी या व्यक्ति प्रति होती अर्थात "तुम दिन को यदि रात कहो, हम रात कहेंगे" अशी होती. त्यांना प्रधानमंत्रीच्या सुरक्षे एवजी स्वतच्या हिताची जास्त काळजी होती. मी स्वत: अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निजी सचिव राहिलो आहे. प्रधानमंत्री असो किंवा अधिकारी, त्यांनाही भावना असतात. भावनेच्या भरात चुकीचे निर्णय तेही घेऊ शकतात. अश्या वेळी त्यांच्या सोबत कार्य करणार्‍या निजी सचिवांची/ अधिकार्‍यांची जवाबदारी वाढते.  जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तिथे राजाच्या विरोधाला न जुमानता राजाच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी लागते. त्या अधिकार्‍यांची निष्ठा जर प्रधानमंत्री या पदाशी असती तर, त्यांनी  स्वर्गीय  इंदिरा गांधीच्या विरोधाला न जुमानता त्या शीख अंगरक्षकांची बदली केली असती. जास्तीसजास्त त्यांचीही बदली झाली असती. देश एका संकटापासून वाचला असता. समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून सावधान केले होते. तरीही संकटाच्या वेळी त्यांच्या सोबत असणार्‍या सहकार्‍यांनी त्वरित योग्य निर्णय घेतले नाही. परिणाम, घात झाला. त्याची स्वराज्याला आणि महाराष्ट्राला मोठी किमत मोजावी लागली. 

सारांश जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. तिथे मानवीय भावनांना स्थान नाही. राजाची अनुमति असो वा नसो, राजाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता परिस्थितीनुसार राजाच्या सचिव, सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांपाशी  आणि  अंगरक्षकांमध्ये असली पाहिजे. 




Tuesday, May 17, 2022

डासांचे विजय गीत

 

(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी  भारतात घेतो. ) 


शूर वीर  डास आम्ही

बांधुनि कफन डोक्यावरी 

तुटून पडतो शत्रुंवरती 

त्यांचे रक्त  पिऊनी

देतो विजयी आरोळी.

 

डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी 

करतो हल्ला माणसांवरती 

पाठवतो त्यांना यमसदनी.


घाबरून आमच्या फौजेला 

मच्छरदानीत  लपणार्‍या

भित्र्या भागुबाई  माणसांशी 

काहो करता तुलना आमुची.  


करू नका अपमान आमुचा

पावसाळा आता दूर नाही 

रक्ताची आहे भूक आम्हा

रक्त पिऊनी माणसांचे 

देऊ विजयी आरोळी.  






Saturday, April 30, 2022

वार्तालाप (२६) श्रीदासबोध: दशक ५ समास ५ - आधुनिक कृषी तंत्राची माहिती

 जय जय रघुवीर समर्थ 



श्रीदासबोध हा फक्त अध्यात्मिक ग्रंथ नाही. संसारात जगण्यासाठी आवश्यक सर्व ज्ञान यात आहे.  

आजचे कृषी शास्त्रज्ञ म्हणतात, शेती करण्यापूर्वी जमिनीची पोत, उत्तम बियाणे, नर्सरी, पाण्याची गुणवत्ता इत्यादी तपासल्यानंतर शेतात कोणते उत्पन्न घ्यावे हे शेतकऱ्याने ठरविले पाहिजे. तरच त्यांना शेतात जास्त उत्पन्न घेता येईल.  आश्चर्य म्हणजे  साडे तीनशे वर्षांपूर्वी या समासात समर्थांनी   हेच सांगितले आहे. समर्थ म्हणतात - "नाना भूमीची परीक्षा, नाना जळांची परीक्षा,नाना सरितांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा,नाना अंकुर परीक्षा,नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा" इत्यादी.  स्पष्ट आहे, त्या काळी गुरुकुलांत कृषी संबंधी शिक्षण ही दिले जात होते.  बाकी त्याकाळी गुरुकुलांत शिकविणाऱ्या समस्त विद्यांची माहिती या समासात आहे. 
 

Thursday, April 21, 2022

दुसऱ्या दशकातील मोती. तामसी भक्ती एक मूर्खपणा

 


मृत्यू लोक हा कर्म लोक आहे. कर्मा शिवाय इथे मुक्ती नाही. इथे गृहस्थ संसाराची गाडा चालविण्यासाठी कर्म करतो. सन्यासी जगाच्या उद्धारासाठी  कर्म करतो. काही लोक बिना कर्म करता भगवंत कृपेची किंवा मुक्तीची अपेक्षा करतात. त्यांना वाटते शरीराला कष्ट दिले की मुक्ती मिळेल. त्यासाठी ते तामसी उपाय करतात. श्री समर्थ  अश्या  तामसी अघोरी कृत्यांचे वर्णन करताना  म्हणतात:  कर्महीन  लोक नाना प्रकारे स्वतःच्या शरीराला कष्ट देतात. काही जिभेला टोचून घेतात. काही विविध प्रकारच्या शस्त्रांनी शरीरात छेद करतात. काही झाडाला उलटे लटकून तपस्या करतात, तर काही एक हात उंच करून तपस्या करतात. काही स्वतला जमिनीत पुरून घेतात. परिणामी मुक्ती तर मिळत नाही पण शरीराचे अनेक अंग लुळे- पांगळे अवश्य होतात.  काही मुक्तीसाठी देवाला शिर किंवा  शरीर अर्पण करतात अर्थात आत्महत्या करतात. इत्यादी.  निराहार राहून शरीराला कष्ट देऊन तपस्या केल्याने काहीच साध्य होत नाही, हे ज्ञान भगवान बुध्दाला ही झाले होते. त्यांनी सम्यक मार्ग निवडला. व्रत उपवास इत्यादि दिवसांसाठी केल्याने शारीरिक व्याधी दूर होते, हे ही सत्य आहे. पण फक्त उपवास केल्याने भगवंत प्रसन्न होत नाही.  तामसी अघोरी मार्गाने भगवंताला प्रसन्न करणाऱ्या  लोकांना जिवंतपणे नरक यातना सहन करण्या पलीकडे काहीच मिळत नाही. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तामसी मार्गांचा अवलंबन करणे म्हणजे मूर्खपणा.

Monday, February 21, 2022

वसंत फुललेला सदा

 

वसंती उन्हात आज 

सृष्टी सारी न्हाली.

शीत निद्रेतून आज 

कविता ही जागली. 


साठीच्या झाडलाही 

पालवी आज फुटली 

पंचम सुरात आज 

कोकिळा ही गायली.


तिला पाहून मी 

शीळ हळूच  वाजवली. 

मला पाहून तीही 

गालातच लाजली.


वादळ वारे असो 

संसारी कष्ट अमाप 

दिसतो डोळ्यांत तिच्या   

 वसंत फुललेला सदा.  


 




 






  

 



 

 

Sunday, January 23, 2022

पीएनामा (1): गुटबाजी, शिक्षित आणि अशिक्षित

 (पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस  इत्यादींच्या सोबत कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि कल्पना ही, पीएनामाच्या रूपाने सादरीकारण करण्याचा प्रयत्न) किस्से  सांगण्यासाठी काही  टोपण नावे  सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)  

राजाच्या दरबारात गुटबाजी ही असतेच. रायसीना हिल ही याला अपवाद नाही. इथेही मुख्यत: विंध्यांचल पारवाल्या भाषाई जातभाईंचे अनेक शक्तीशाली गुट होते. प्रत्येक गुट त्याची शक्ति वाढविण्यासाठी, इतरांना दरबारातून हाकलून देण्याचे षड्यंत्र रचतच राहायचे. मग त्यांची पोस्टिंग सेक्शनमध्ये असो की अधिकार्‍यांसोबत. एकाच ठिकाणी दोन जातभाई एकत्र आले की त्यांची शक्ति एक और एक ग्यारह होते.  बिहारी, पंजाबी कर्मचार्‍यांचे ही गुट त्यांची शक्ति वाढविण्यात व्यस्त होते. राहीले मराठी माणूस, माझ्या सीएसएसएस केडरमध्ये 18 वर्षांत माझ्याशिवाय कदाचित  एखाद आला असेल. बाकी केडरमध्ये आले (आयएएस सोडून) पण अधिकान्श इथल्या राजनीतीला कंटाळून वर्षाच्या आताच पलायन करायचे. बहुतेक हेच कारण असावे,  श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर  दोन वर्षांच्या आत 7 वर्ष जुन्या सर्व कर्मचार्‍यांची बदली केली आणि गुटबाजीचे अस्तित्व नष्ट करण्याचा सार्थक प्रयत्न केला. अर्थात माझीही बदली झालीच. असो.

त्यावेळी मी दरबारात एका वरिष्ठ आयएएस अधिकार्‍याचा पीएस होतो. अधिकारी अत्यंत हुशार आणि इमानदार होता. महत्वपूर्ण विभागांचे कार्यभार त्याच्या जवळ होते. सकाळी 9 वाजता काम सुरू करायचा आणि पूर्ण झाल्याशिवाय घरी जात नव्हता. या अधिकार्‍याने तीन वर्षांत एकदाही स्टाफला पर्सनल काम सांगितले नाही, हे विशेष. पण मुखातून निघणारी तू तडाक भाषेसाठी तो कुख्यात होता. फक्त याच कारणामुळे तीन वर्षांच्या अवधीत व्यक्तिगत स्टाफच्या, मला सोडून, अर्धा डझनहून जास्त कर्मचार्‍यांनी बदली करून घेतली. डीओ आणि एमटीएस बदलल्या गेले. तोंडाने कितीही तिखट असला तरी अधिकार्‍याने कुणाचीही सीआर खराब केली नाही. साहेबांना गुटबाजीचा अत्यंत तिटकारा होता. माझ्या विषयी म्हणाल तर 'मी अत्यंत शांत डोक्याचा आहे, जसे पालथ्या घड्यावर पाणी टाकण्याचा काही परिणाम होत नाही, तसेच माझ्या माझ्यावर ही होत नाही', असे माझ्या सहयोगी बांधवांचे मत होते. 

साहेबांच्या अधीन एक सेक्शन होते. तिथे दहा एएसओआणि दोन एमटीएस होते. सेक्शनमध्ये कार्यरत अधिकान्श  एएसओ यूपीएससी परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले होते. उच्च शिक्षित होते. एएसओ म्हणजे भारत सरकारची "रीढ़ की हड्डी". असाच एक उच्च शिक्षित सुनील (आयटी, बीटेक आणि एमबीए इत्यादि) त्या सेक्शनमध्ये एएसओ होता. केंद्र सरकारात एएसओला चांगला पगार असतो (आजच्या घटकेला पहिल्याच वर्षी महिना 80 हजारहून जास्त मिळतात). सुनील विंध्य पारवाला होता. त्यावेळी एका अधिकार्‍याची बदली झाली होती. तिथे त्याच्या एक जातभाई एमटीएस होता. सुनील ने  विचार केला असावा, याची बदली त्याच्या सेक्शनमध्ये झाली की 'एक और एक ग्यारह" होणार. इतरांवर नजर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 

त्यादिवशी सकाळी नऊ वाजता साहेबांकडून दिवसभर होणार्‍या मीटिंग, आवश्यक कार्य इत्यादि बाबत निर्देश घेत होतो. सुनील आत आला. त्याने एका आवश्यक फाइलवर चर्चा केली आणि मुख्य विषयावर आला. आंगल भाषेत तो म्हणाला 'सर, बदली झालेल्या त्या अधिकार्‍याच्या स्टाफ मध्ये सुशील नावाचा एमटीएस आहे. तो ग्रॅजुएट आहे. त्याला इंग्लिश आणि हिन्दी दोन्ही भाषा उत्तम येतात. त्याची बदली आपल्या सेक्शनमध्ये झाली तर उत्तम होईल. साहेब अत्यंत मृदु आवाजात त्याला म्हणाले, उत्तम आहे, पण त्यासाठी आपल्या सेक्शनमध्यल्या दोन एमटीएस पैकी एकाची बदली करावी लागेल. 'सर, तो श्यामसुंदर इललिटरेट आहे, त्याला इंग्लिश मुळीच कळत नाही'. आता साहेबांचे कान उभे झाले. साहेबांनी मला विचारले, पीएस साहेब, ज्यावेळी श्यामसुंदर नौकरी पर लागला त्यावेळी एमटीएसच्या नियुक्तीचा आधार काय होता. मी म्हणालो, सर, ज्यावेळी श्यामसुंदर नौकरी पर लागला असेल त्यावेळी रोजगार कार्यालयातून किंवा कुणाच्या कृपेने त्याची नौकरी इथे लागली असेल. कुठूनतरी त्याने आठवी पासचे प्रमाणपत्र ही पैदा केले असेलच. साहेब सुनील कडे पाहत म्हणाले, तो श्यामसुंदर आठवी पास है. जास्त शिक्षित लोकांची डोक्याची ट्यूब लाइट लवकर पेटत नाही, हा माझा अनुभव आहे. सुनीलचीही पेटली नाही. सुनीलला साहेबांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. तो म्हणाला "सर, सुशील जास्त एज्युकेटेड आहे, आपल्या जवळ या घटकेला मौका आहे, तो आल्याने सेक्शन मधल्या सर्वांना फायदा होईल".  साहेबांनी मला विचारले,  पीएस साहेब जरा सांगा, सेक्शन मध्ये काम करणारे लिटरेट आहेत की एज्युकेटेड हे कसे कळेल. साहेबांच्या सोबत काम करताना दोन वर्षे उलटून गेली होती. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, हे कळू लागले होते. मी म्हणालो, ज्याला भारत सरकारची प्रशासकीय नियमावली पाठ आहे तो लिटरेट आणि ज्याला त्या नियमांनुसार कार्य कसे करायचे हे माहीत आहे तो एज्युकेटेड. सुनीलकडे पाहत साहेब म्हणाले, काही कळले का? आता दूसरा कुणी असता तर, मान डोलावून, चुपचाप  साहेबांच्या चेंबरमधून बाहेर गेला असता. पण षड्यंत्र करताना बुद्धी नष्ट होतेच, तो म्हणाला, 'सर, मी तर सेक्शनच्या भल्याचा विचार करत होतो'. आता मात्र साहेबांचे डोके भडकले, ते सुनीलवर हिंदीतच ओरडले,  मी मूर्ख आहे का? अडाणी, गंवार, जाहिल माणसा तुला इथे पैदा होऊन दोन दिवस झाले आणि तू गुटबाजी करतो आहे. माझ्या जागी दूसरा अधिकारी असता तर तुझ्या xxxवर लाथ मारून तुला इथून फेकले असते. पहिली वेळ आहे, म्हणून तुला माफ करतो. पुन्हा असे केले तर तुला इथे कुणी वाचविणार नाही. साहेब एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी सेक्शनमध्ये फोन केला. सेक्शन ऑफिसरला विचारले, तुम्हाला श्यामसुंदर पासून काही समस्या आहे का? कुणी त्याची तुम्हाला तक्रार केली का? अर्थातच उत्तर नाही मध्ये आले. साहेब सेक्शन ऑफिसरला म्हणाले, तुमच्या सेक्शनचा एक अडाणी माणूस इथे बसला आहे, त्याचे जरा कान उपटून त्याला सरकारी नियम आणि काम करण्याची पद्धत समजावून सांगा. 

सुनीलच्या हातून चूक झालीच होती. जे कार्य सेक्शन ऑफिसरचे होते ते तो करु पहात होता. गुटबाजीच्या नादात ऑफिस प्रोसीजर विसरून गेला होता. त्याला वाटले असेल साहेब खुश होतील. पण आयएएस अधिकारी मूर्ख नसतात. सुनीलने विषय काढताच, त्याचा हेतु अधिकार्‍याला समजला होता. साहेबांचे बोलणे सुनीलच्या जिव्हारी लागले होते. सेक्शन ऑफिसरने ही त्याला भरपूर सुनावले. बहुतेक पहिल्यांदाच अश्या शिव्या पडल्या होत्या. नौकरी सोडण्याचा विचार ही त्याच्या मनात आला. पण शेवटी पोटाचा प्रश्न हा असतोच. त्यादिवशी मला ही समजले पुस्तकी ज्ञानाने माणूस साक्षर होतो, पण शिक्षित होत नाही. नियम आणि मर्यादांचे पालन करत जगात कसे वागायचे हे ज्याला कळते तोच शिक्षित.  


Monday, January 3, 2022

जगण्याची कला

 तासंतास एकाच ठिकाणी 

कला  उभे राहण्याची 

आत्मसात केली  बगळ्यांनी 

फक्त जगण्यासाठी.


 कला, कौशल्य, संयम 

पुरुषर्थाची पराकाष्ठा 

आत्मसात केल्या विना 

जगू शकत नाही कुणीच 

बगुळा असो की माणूस.