Sunday, January 29, 2012

मुलीचा जन्म आणि कविता


काल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लाडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनातील मला जाणवलेल्या भावना  शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे: 

वासंतिक सुगंधात 
वंश वेल मोहरली. 
वसंत पंचमीच्या दिनी 
घरी महालक्ष्मी प्रगटली
लक्ष्मी - सरस्वतीची कृपा. 
अशी माझीयावर झाली.
आजीचा आनंद आता 
गगनात सामावेना. 

डोळ्यात अश्रू , मनात आनंद 
आईच्या हृदयी फुटला आता 
मायेचा पाझर. 
उबेच्या कुशीत, असा  सुरु झाला  
चिमुकल्या चिमणीचा संसार. 

चिमणीची चिव-चिव  
अंगणात गुंजली 
जन्मांचे दु:ख सारी, 
पणजी विसरली 
चिमणीला ही मिळाली बघा 
मैत्रीण जीवे - भावाची 
दोघांची  खेळी आता
अंगणात रंगली. 

Thursday, January 26, 2012

मांजरीच्या गळ्यात घंटी


एकदा काही उंदरांनी मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा कट केला. एक धाडसी उंदीर एक घंटी घेऊन ती मांजरीच्या गळ्यात बांधण्यास निघाला. बाकी उंदीर ही दुरून तमाशा बघू लागले. एकदा घंटी मांजरीच्या गळ्यात बांधली की मांजरीच्या येण्याचा पत्ता आपल्याला लागेल व मांजर कुणा ही उंदराचा शिकार करू शकणार नाही. 

पण मांजर ही मोठी धूर्त होती. तिला या कटाचा वास लागला. तीही डोळे बंद करून गुपचूप पडून राहिली.  उंदीर जवळ येताच तिने उंदरावर झडप घातली.  नेहमी प्रमाणे बाकीचे उंदीर आपापल्या बिळात लपून गेले. त्या धाडसी उंदीराची  प्राणांतक किंकाळी आणि सर्व शांत झाल. 

मांजरीने ही एक ढेकर देत आपल्या मिश्यांवर ताव दिला व एका पायाने घंटीला उडविले. मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर 'लोकपालअसे शब्द कोरलेले होते. 


Saturday, January 14, 2012

हिवाळा हिवाळा /चार क्षणिका


या वर्षी दिल्लीत थंडी लवकर सुरु झाली आणि थंडीचा मारा ही जोरदार होता. रात्रीच्या वेळी इंटरनेट उघडण्याची ही हिम्मत होत नव्हती मग काही लिहिण्याचा प्रश्नच नाही. बर्याच दिवसानंतर आज बर्यापैकी ऊन पडले. गोठलेल्या मेंदूलाही चालना मिळाली. अर्थातच दिल्लीतल्या थंडी बद्धल मला काय वाटते - काही क्षणिका ..

हिमालयावर बर्फ 
दिल्लीत थंडी. 
जयपुरी रजाईत 
दडून बसली गर्मी. 

हिवाळा हिवाळा
दातखिळी बसली 
कवीची लेखणीही 
बघा कशी गोठली. 

हिवाळा हिवाळा 
दाट धुक्याचा.
आफिसच्या टाईमला 
उशीर होण्याचा. 

हिवाळा हिवाळा
सर्दी-खोकल्याचा मारा. 
असतो डॉक्टरांचा 
दिवाळी-दसरा.

हिवाळा हिवाळा 
आजार म्हातारपणाचा. 
जीवाला कंटाळून. 
दूर जाण्याचा.