Thursday, October 31, 2019

आठवणीतून: ए नौकर अनार उडाव


रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे  बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी. महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडट्टीत रहात होता. इतर लहान मुलांसारखे  त्यालाही दिवाळीत अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. त्याच्या बाबानी एक छोटे से पिस्तुल त्याला दिवाळीसाठी घेऊन दिले होते. दिवस भर टिकल्या उडवून  तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी फटाके आणू शकत नाही. आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला. 

चिन्या आत कशाला बसला आहे, बाहेर ये, समोरचा कोठीवाला मोठा अनार उडविणार आहे. बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला.  कोठी समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला. एक उंच मोठा  रंग-बिरंगी कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. चिन्या, बघ समोरच्या पोरांनी कश्या टाळ्या पिटल्या आणि उड्या मारल्या. त्यांनीही अनार उडविला नाही. बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. त्यांनी नाही पण त्यांच्या नौकराने उडविला नं,  चिन्या उतरला.  "तसे असते तर फक्त नौकराला आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही."  चिन्या काहीच बोलला नाही. बाबा पुढे म्हणाले, हे बघ चिन्या, मोठे लोक, राजा-महाराजे, शेट स्वत: काहीच करत नाही. त्यांचे नौकर त्यांच्यासाठी काम करतात. समज हा नौकर आपल्यासाठी अनार उडवितो आहे, बघ काय मजा येईल. चिन्याला म्हणाला बाबा म्हणजे तो आपला नौकर आहे, असं समजायचे. तेव्हड्यात चिन्याचे लक्ष समोर गेले. बाबा, तो नौकर पुन्हा अनार उडविणार आहे. त्या नौकर कडे पाहत, चिन्या ओरडला "ए नौकर हमारे लिये अनार उडाव". लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांच्या छटा आकाशात पसरल्या. चिन्याने आनंदाने टाळ्या पिटत उड्या मारल्या.  चिन्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

Monday, October 21, 2019

नोटा जिंदाबाद


काय बाळ्या, तुझ्या जातीचे लोक आपल्या पक्षाला मत देत नाही त्यामुळे गेल्या निवडणुकीत मी चार हजार मतांनी पडलो. गेल्यावेळी बहिष्कार नावाच्या शस्त्राचा काहीच उपयोग झाला नाही. कुणीच बहिष्कार केला नाही. आता नोटा नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढावे  लागेल. तुझ्या जातीच्या काही हजार लोकांनी नोटा दाबला तर मी निश्चित निवडून येईल. आता तू सोशल मीडियावर तुझ्या जातीच्या सर्व ग्रुपांवर प्रचार कर.   "आपल्या जातीच्या लोकांची  कुठल्याही पक्षाला  काळजी नाही. सर्वांनी आपला उपयोग केला व जिंकल्यावर ठेंगा दाखविला. आता वेळ आली आहे आपण आपली एकजुटता दाखविली पाहिजे. आपण मतदानावर नोटाचे  बटण दाबून सर्वांना अद्दल घडवू. आपली शक्ती सर्व राजनेत्यांना कळलीच पाहिजे." 

साहेब, लागतोच कामाला पण बदल्यात मला काय मिळेल.

"जिंकल्यावर तुला "पाण्याचा" मिळवून देतो. 

बाळ्या बेंबीच्या देठापासून घोषणा देतो "साहेबांचा विजय असो. नोटा महाराज जिंदाबाद."