Thursday, May 25, 2023

पौलोमी शची : नवरा माझ्या मुठीत


एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको त्याला ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून  जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात. तिच्या आदेशानुसारच सर्वांना जगावे लागते. जी तुझी अवस्था तीच माझीहि आहे. पुरुषांना वैदिक काळापासूनच बायकोच्या मुठीत राहण्याचा श्राप मिळालेला आहे. एवढेच काय, वज्र धारण करणारा देवांचा राजा इंद्रहि त्याच्या बायकोच्या मुठीत होता. माझा सहकर्मी उद्गारला, काहीही बोलू नको, पूर्वी कोण पुरुष बायकोच्या मुठीत राहत होता. काहि पुरावा आहे का?

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५९ ( सपत्नी नाशनसूक्त)
(ऋषिका - शची पौलोमी : देवता - आत्मस्तुती)l

उत् असौ सूर्यः अगात् उत् अयं मामकः भगः  
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः 

अर्थ: हा पहा सूर्य जसा उदय पावला, तसे माझे दैवहि उघडले. मी हे जाणूनच आपल्या पतीला पूर्णपणे वश केले. मी त्याची स्त्री आहे; तरी पण त्याला अगदी माझ्या मुठीत ठेवणारी अशी आहे.

देवांचा राजा महापराक्रमी वज्र  धारण करणारा इंद्र. असुरांचे दुर्ग उद्ध्वस्त करणारा इंद्र. वृत्रासुराचा वध करणारा इंद्र. इंद्र कृपेसाठी ऋषीमुनी त्याची स्तुती करायचे. त्याच्या विजयाची गाथा गायचे.  त्याकाळच्या परंपरेनुसार देवराज इंद्राच्या अनेक पत्नी होत्या.  इंद्राची एक पत्नी शचीहि होती. इंद्र पत्नी शचीचा त्या काळी एवढा दरारा होताकि तिने स्वत:च्या स्तुतीसाठी सवतीचा नाश सूक्त रचले आणि त्या सूक्ताला ऋग्वेदात स्थानहि मिळाले. 

स्वत:ची आत्मस्तुती करताना ती म्हणते. मीच घराण्याची शोभा आहे. मीच मस्तक आहे. मी कठोर स्वभावाची आहे. मी विजय शालिनी आहे. मी सर्व सवतींचा वर चष्मा नाहीसा केला आहे. माझे पुत्र शत्रूचा फडशा उडवितात. माझी पुत्रीहि चक्रवर्ती  आहे. माझे पती ओजस्वी व सर्वश्रेष्ठ आहेत. जो भक्त त्यांना हविभाग अर्पित करतो त्यांचे इच्छित  पूर्ण करतात. तेच मीहि केले आहे अर्थात मीही भक्तांकडून हवि भाग स्वीकार करते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते.  त्यामुळे मी सवत रहित झाले आहे.  माझ्या प्रत्येक कृत्याचे अनुमोदन माझे पती करतात. (करणे भाग आहे). मी माझ्या पतीला पूर्णपणे वशमधे केले आहे. तो माझ्या मुठीत आहे. जसे मी माझ्या पतीवर अधिकार गाजवते तसेच मी इतरांवरहि गाजवते.

आजच्या काळातही बायकोच्या अधीन राहणारे नवरे सुखी असतात. बायकांच्या मुठी सारखी सुरक्षित जागा जगात दुसरी नाही. बायकांच्या अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या नावर्यांवर सरकारी पाहुणचार घेण्याची नौबत येते.  माझ्या त्या सहकर्मीने पूर्वापारपासून चालत आलेले कठोर सांसारिक सत्य जाणले. नंतर त्याने कधीही त्याच्या  बायकोची तक्रार केली नाही.

माझे म्हणाल तर मी माझ्या गृहराज्याचे प्रधानमंत्री पद सौ.ला अर्पित केले आहे आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले आहे. माझ्या नावावर सौ. सर्व निर्णय घेते आणि मी तिच्या सर्व निर्णयाचे राजी खुशी समर्थन करतो. मी सुखी आहे कारण मी बायकोच्या मुठीत आहे.


Monday, May 8, 2023

वार्तालाप (12): अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले

जनी हीत पंडीत सांडीत गेले
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले.

ब्रह्मराक्षस हा शब्द समर्थांनी कुणा विशिष्ट व्यक्ति विशेषसाठी प्रयुक्त केलेला नाही. समर्थांच्या मते ब्रह्मराक्षस म्हणजे भूत प्रेतांची योनी ही नाही. समर्थ म्हणतात, पंडीत अहंकारामुळे ब्रह्मराक्षस झाले. साहजिकच आहे, मनात प्रश्न उत्पन्न झाला पंडीत कोण. त्यांचे कार्य काय?

सौप्या शब्दांत, ज्या व्यक्तीने समस्त सांसारिक आणि आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. ज्याला उत्तम प्रपंच करून मोक्षाच्या वाटेवर जाण्याची विद्या माहीत आहे, तो ब्रम्हज्ञानी आहे. त्याला पंडीत किंवा ब्राम्हण म्हणतात.

एक पंडीत आपल्या ज्ञानाचा वापर करून भावसागर तरून जातो. दूसरा लोकांच्या कल्याणसाठी त्यांना सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा उपदेश देतो आणि स्वत: ही सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो. या श्रेणीत समर्थ रामदास, संत तुकाराम, स्वामी दयानन्द सहित सर्व संत महात्मा येतात.

तिसरा पंडीत ब्रम्हदेवाने निर्मित केलेल्या सृष्टीतील समस्त जीवांचे कल्याण व्हावे, आणि त्यांना मुक्ति मिळावी, हा उद्दीष्ट मनात ठेऊन समस्त प्राण्यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटत राहतो. वेळ प्रसंगी सृष्टीच्या रक्षणासाठी असुरांचा संहार ही करतो. अश्या ब्रम्हज्ञानी लोकांना आपण भगवंताचे अवतार मानतो. श्रीराम आणि श्रीकृष्ण सारखे महापुरुष याच श्रेणीत येतात.
 
आता ब्रह्मराक्षस कोण याची कल्पना आलीच असेल. रावणाने वेद उपनिषद सहित समस्त शास्त्रांचा अभ्यास केला होता. कठोर तपस्या करून दिव्य अस्त्र-शस्त्र ही प्राप्त केले होते. रावण ब्रह्मज्ञानी होता. पंडीत होता. पण त्याला ज्ञानाचा अहंकार झाला. ज्ञानाच्या बळावर त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केली. सत्य आणि धर्माचा मार्ग सोडून, भौतिक सुखासाठी, अधर्माचा मार्ग पत्करला. सोन्याची लंका करण्यासाठी भरत खंडातील जनतेवर आत्याचार केले, आश्रम, गुरुकुल उध्वस्त केले. इथली संपत्ति लुटून नेली. भारतात ही राक्षसी साम्राज्याची स्थापना केली. या ओवीत रावणासारख्या सत्य आणि धर्माच्या मार्ग सोडून अधर्म मार्गावर चालणार्‍या पंडितांना समर्थांनी ब्रह्मराक्षस म्हणून संबोधित केले आहे.



Thursday, May 4, 2023

वार्तालाप (11) नामाची महिमा

  
अखंड नामस्मरण जपत जावे, 
नामस्मरणे पावावें समाधान.

समर्थ रामदासांनी श्रीसार्थ दासबोधात चौथ्या दशकातील तिसर्‍या समासात नामाच्या माहिमेचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात नामस्मरणाचा अधिकार लहान थोर सर्वांना आहे.भगवंताचे नामस्मरण केल्याने मूढ व्यक्ति संसाररूपी समुद्र सहज पार करून जातो. सांसारिक समस्यांचे समाधान ही नाम स्मरणाने सहज होते. प्रभू श्रीरामाने समुद्रात टाकलेला दगड पाण्यात बुडून गेला. वानरांनी राम नाव लिहून टाकलेले दगड पाण्यावर तरंगत राहिले. ही आहे नामाची महिमा. एक जुनी आठवण. एकदा आमच्या मंत्रालयात आलेल्या नव्या अधिकार्‍याला कारचे लाईसेन्स बनवायचे होते. तो दिल्लीच्या एका आरटीओत गेला. तिथे काउंटर वर असलेल्या कर्मचार्‍याला त्याचा परिचय दिला. पण तो कर्मचारी त्याच्या कडे दुर्लक्ष करत म्हणाला, तुमच्या सारखे भरपूर साहेब इथे येतात, जाऊन लाइनीत उभे रहा. तिथली भीड पाहून अधिकारी कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला समस्या सांगितली. पीए म्हणाला चिंता करू नका उद्या तुमचे काम होईल. पीएने  साहेबांचे नाव घेऊन आरटीओच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या स्टाफची बोलणी केली. साहेबांची अपाइंटमेंट फिक्स केली. दुसर्‍या दिवशी साहेब पुन्हा आरटीओ गेले. अर्ध्या तासात साहेबाला लाईसेन्स मिळाले. जे साहेबाला जमले नाही त्यांच्या पीए ने साहेबांचे नाव घेऊन सहज केले. मोठ्या लोकांचे नाव घेऊन संकटातून सहज मुक्ति मिळते असा अनुभव आयुष्यात सर्वांनाच येतो. तसेच आपण कितीही पापी असलो तरी भगवंताचे नाव घेऊन सहज संसार चक्रातून अजामीळ प्रमाणे मुक्त होऊ शकतो.