Sunday, January 17, 2016

गाजराचा शिरा
पूर्वभाग: कीस बाप्या कीस गाजर कीस

साहित्य: गाजर ४  किलो, साखर ३-४ वाटी,   दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची)  १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.

प्रारंभिक तैयारी. सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. 

संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री  ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे   भांडे  असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, छोटी इलायची आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.

जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा  बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का? ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो. सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले. 

दुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.    

 

Thursday, January 14, 2016

संक्रांत आणि पतंगबाज

निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात.

आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते.  इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात.  तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद  पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात.  कधी-कधी एकदम घुम्म मौसम.  नाममात्र वारही  नाही.  अश्या  घुम्म वेळी  छोट्या-मोठ्या पतंगांना  आकाशात उड्डाण भरणे अशक्यच. अश्या पावसाळी मौसमात उस्ताद पतंगबाजाच तग धरू शकतात.   इथे पतंग पेच लढविण्यासाठीच उडवितात. पतंगबाजाचा D-Day अर्थात १५ ऑगस्टला तर सतत ‘आई बो काटा’ हि विजयी आरोळी सकाळपासूनच वातावरणात दुमदुमू लागते.

माझे बालपण जुन्या दिल्लीतच गेले. १९८०च्या पूर्वी आम्ही ज्या वाड्यात  भाड्यावर राहायचो तो पूर्वाभिमुख होता. मध्ये बेडा (आंगण) आणि तिन्ही बाजूला बांधकाम. भलीमोठी गच्ची होती. पावसाळ्यात वारे हि पूर्वेचे असतात. त्यामुळे भरपूर पतंगा लुटायला मिळायच्या. पतंगा विकत घेण्याची गरज पडत नसे. या शिवाय गच्चीच्या मागे काबुली गेटची सरकारी शाळा होती. शाळेच्या गच्चीवरच्या पतंगा हि आमच्या नशिबी.  

काबुली गेट वरून आठवले. पूर्वी शाळेच्या जागी मैदान होते व पुढे काबुली दरवाजा. पण १८५७च्या क्रांतीत, अंग्रेजांच्या तोफांच्या मार्याने हा दरवाजा नष्ट झाला. इथे भयंकर युद्ध झाले होते. हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षांचे सैनिक आणि अधिकारी शहीद झाले होते. काहींच्या मते आज हि अमावस्येच्या घुप्प रात्रीत घोड्यांच्या टापांचे आवाज आणि सैनिकांचे विव्हळणे ऐकू येतात. आमच्या राहत्या खोलीची खिडकी शाळेच्या बाजूला होती. कधी हि काही ऐकू आले नाही. फक्त हिवाळी रात्रीत शाळेची इमारत माकडांची झोपण्याची जागा होत असेल. त्यांच्या माकड चेष्टांमुळे (अर्थात तोडफोड, दंगा-मस्ती) लोकांना असे भास होत असावे. असो.

मोठे पतंगबाज शर्त(पण) लाऊनच  पेच लढवितात. किमान ७०-८० गज पतंग उंच उडल्यावरच पेच लागत असे. अशी कटून आलेली पतंग लुटायला मिळाली कि किमान १०० गज मांजा मुफ्त मिळत असे. आमच्या सारख्यांच्या पूर्ण सीजन साठी पुरेसा असे. हा मांजा अत्यंत मजबूत हि असायचा. नेहमीच बोटे कापल्या जायची. तरीही त्या साठी दररोज संध्याकाळी आकाशात टक लाऊन पाहत असू, कुठे उंच आकाशात तरंगत जाणारी कटलेली पतंग दिसते आहे का?

दिल्लीत पतंग उडविणे हि जिगरीचे काम. पतंग उडविण्यासाठी पहिले पतंगाचे कन्ने बांधावे लागतात. नंतर कन्न्याला मांजा बांधताना एक गाढ मारावी लागते. हीच ती कमजोर कडी. जवळ-जवळ घरे असल्यामुळे एकाच वेळी आकाश्यात भरपूर पतंगा उडताना दिसतात. पतंग उडविणार्या पतंगबाज्यांची नजर बाज पक्षी सारखीच असते.   पतंगबाजांची  आकाशात उडत असलेली पतंग, बाज पक्षी प्रमाणे खाली घेप घेणार आणि नुकत्याच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करणार्या पतंगाचे कन्ने कापणार हे ठरलेलेच. अश्यावेळी संधी साधून, चौफेर पाहून, ५-१० सेकंदात पतंग आकाशात ४०-५०  गज उंच उडवावी लागत असे. एकदा कि पतंग ५०-६० गज उंच उडाली कि मग चिंता नसे.

मी पेच लढविण्याचा एकच नियम पाळीत असे.  दुसर्याला पेच साठी लालच देणे. पण स्वत: त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही. पेच लागताना ज्या दिशेला वारा वाहतो आहे, ठीक मध्य भागी पतंग ठेवायची, मग मांजा थोडा कमजोर असेल तरी हि ९०% दुसर्यांची पतंग कापण्यात यश मिळणारच. पेच लागताना जर पतंग वार्याच्या दिशेला नसेल तर ९०% टक्के पतंग कापल्या जाईलच.  अर्थातच नेहमीच हे जमत असे नाही. शिवाय दुसर्याचा मांजा जास्त मजबूत आणि पतंग मोठी असेल तर त्याचा फायदा त्याला मिळणारच.

दिल्लीचे पतंगबाज देशात मशहूर आहेतच. पण गुजरातचे पतंगबाज हि काही कमी नाही. दिल्लीकर पतंगबाज्यांशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे.  संक्रांतीच्या दिवशी तिथे हि दिल्ली सारखेच पेच लढविल्या जातात. पण आपले मुंबईकर मात्र पतंगबाजीत फिसड्डीच. गज्जू भाई सहज त्यांच्या पतंगा कापतात.  एक नवखा पतंगबाज गुजराती उस्तादकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला आणि  इथल्या भल्या-भल्या पतंगबाज्यांच्या पतंगा त्यांनी सहजच कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे  एकछत्र राज्य आहे. असो.

     सर्व पतंगबाज्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा.

Saturday, January 9, 2016

कीस बाप्या कीस गाजर कीस


ताजे ताजे गाजर हि  आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला  पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली.  मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे.  गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात).  आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील.  जिभेचा स्वाद माणसा करून काय काय करवून घेतो, निमूटपणे गाजर किसायला घेतली......


कीस बाप्या कीस
गाजर कीस.
किसता किसता
कविता हि कीस.

जिभेच्या स्वदापायी
गाजर कीस.
किसता किसता
बोट हि कीस.

लाल लाल गाजर
लाल लाल रक्त
हलव्याचा  स्वाद
लागणार मस्त.


गाजर किसताना
शेजार्याने पहिले.
गल्लीत आमचे
नाकच कापले. 

कीस बाप्या कीस
गाजर कीस
जोरु का गुलाम
गाजर कीस.


Sunday, January 3, 2016

सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का

(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).

सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली वेतन आयोगानेसरकारी कर्मचार्यांना निराशच  केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे.  विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www. govtempdiary.com/2015/12/7cpc-pay-net-increase from-1-to-4/ 17400) The 7th CPC has cheated the 35 lakhs Central Government Employees and 50 lakhs pensioners, by announcing meagre 14.29% wage hike, in actual term of increase for serving employees after deduction of Income tax, enhanced subscription of CGEIS, licence fee, CGHS etc the net increase is actually varies from 1% to 4 % increase]  असो.

हत्ती पाळणे भारी खर्चाचे काम. पण एकदा हत्ती मेला कि त्या मेलेल्या हत्तीच्या दाताला बाजारात भारी किमंत मिळते. म्हणूनच म्हणतात  ‘मरा हाथी सव्वा लाख का’.  सातव्या आयोगाच्या अनुसार  कार्यरत कर्मचारी मेला तर त्याच्या आश्रितांना विम्याचे १५-५० लाखापर्यंत रकम मिळेल.
 
कालचीच गोष्ट ऊन खाण्यासाठी दुपारी लंच मध्ये खाली उतरलो. रस्त्यावर एका झाडाखाली खाली सुनील आणि मेथ्यु उभे होते, त्यांना पाहून कपाळावर आठ्या आल्या. शिकारीसाठी दबा धरून बसलेले हिंस्त्र जनावर आणि या दोघांमध्ये काहीही फरक नाही. त्यांची नजर चुकवून जाऊ लागलो. पण कसले-काय. डोळ्यांवर चष्मा असला तरी सुनीलची नजर उल्लू प्रमाणे दूरचा भक्ष्य ओळखण्यास समर्थ. त्याने दुरूनच आवाज दिली, पटाईत, नजर चुकवून कुठे पळतोस, आम्ही इथे तुझीस वाट पाहतो आहे. कपाळावर आलेल्या आठ्या दिसू न देण्याचा प्रयत्न करीत मी विचारले ‘माझ्यावर एवढी कृपा का?"    

काहीही झाले तरी आम्ही तुझे सहकर्मी, तुझी काळजी आम्हाला राहणारच. कशी प्रकृती आहे तुझी.
मस्त’
छाती वैगरेह तर दुखत नाही न? 
नाही’. 
दवा-दारू वेळच्या-वेळी घेतोस न. 
‘हो’.  
सुनील अत्यंत केविलवाणा चेहरा करून म्हणाला दारू घेणे तुझ्या प्रकृतीस योग्य नाही. तुला तर वास हि घेतला नाही पाहिजे.  

मी रागानेच म्हणालो, तुला माहित आहे, मी दारूला स्पर्श हि करीत नाही. सुनील: स्ट्राने दारू पिणार्यांना, दारूला स्पर्श करण्याची गरज नसते. आता मात्र तळपायाची आग मस्तकात पोहचली, मी त्याला खडसावले, तुला म्हणायचे तरी काय आहे? परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे पाहून,  मेथ्यु मध्ये टपकला, अरे पटाईत आम्ही तुझे सच्चे दोस्त, आम्हाला तुझी काळजी आहे, कालच चर्चमध्ये तुझ्यासाठी दुआ मागितली. गाॅड, पटाईतला निदान सातवे वेतन आयोग लागू होयेस्तो जिवंत ठेव, नंतर बेशक त्याला जहनुमला  डीस्पेच केले तरी चालेल.   

या पेक्षा अधिक काय अपेक्षा तुमच्या सारख्या मित्रांकडून ..

सुनील माझे वाक्य तोडत म्हणाला, पटाईत तुला कळत कसे नाही, तुझ्या सारखा टूटा-फूटा जिगरवाला जवळपास निकामी पुरुष  आज गेला कि उद्या गेला कुणाला  काहीही फरक पडणार नाही.  आम्हाला तर वहिनीची काळजी आहे, जर तू आत्ता वर गेला तर वहिनीला  विम्याचे जास्तीस्जास्त लाख रुपया  मिळेल. पण पे कमिशन नंतर गेला तर, विचार कर, मोटी पेंशन, gratuty दहा लाखांपेक्षा जास्त आणि विम्याचे पन्नाssस लाख. पाहिले आहे का कधी?  एवढे पैशे असले तर वहिनींना या वयात हि निदान तुझ्या पेक्षा चांगला नवरा भेटेल.  शिवाय आमच्या सारखे देवर....

आता माझी सटकलीच. उगारायला हात वर केला. पण काय करणार दोघेही पसार झाले आणि दूर उभे राहून दात दाखवत माकडांसारखे खी-खी हसू लागले.  माझे सहकर्मी मित्र  म्हणजे  एकापेक्षा एक नमुने.  यांचे काय करावे कधी-कधी मलाच समजत नाही.  

पण एकमात्र खरे, सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराश केले असले तरी हि वाढलेल्या विम्याच्या रकमे मुळे  ‘मरा बाबू पन्नास  लाखाचा’ होणार हे निश्चित'.   

Saturday, January 2, 2016

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थकाल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले-पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला  माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेल तर आपण कुठेच पोहचू शकत नाही.  डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.  योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.

अखंड पुरुषार्थ: एकदा लक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा  आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.

स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे.  'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे. 

ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावर चढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.

अनासक्त कर्म:  आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडीबहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड  पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.  

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.