Sunday, October 26, 2014

दिवाळी -वैचारिक क्षणिका


चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.

फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.

आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.

Saturday, October 25, 2014

फटाक्याचा आनंद (लघु कथा)


रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे  बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी. महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडट्टीत रहात होता. इतर लहान मुलांसारखे  त्यालाही दिवाळीत अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. त्याच्या बाबानी एक छोटे से पिस्तुल त्याला दिवाळीसाठी घेऊन दिले होते. दिवस भर टिकल्या उडवून  तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी फटाके आणू शकत नाही. आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला. 

चिन्या आत कशाला बसला आहे, बाहेर ये, समोरचा कोठीवाला मोठा अनार उडविणार आहे. बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला.  कोठी समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला. एक उंच मोठा  रंग-बिरंगी कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. चिन्या, बघ समोरच्या पोरांनी कश्या टाळ्या पिटल्या आणि उड्या मारल्या. त्यांनीही अनार उडविला नाही. बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. त्यांनी नाही पण त्यांच्या नौकराने उडविला नं,  चिन्या उतरला.  "तसे असते तर फक्त नौकराला आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही."  चिन्या काहीच बोलला नाही. बाबा पुढे म्हणाले, हे बघ चिन्या, मोठे लोक, राजा-महाराजे, शेट स्वत: काहीच करत नाही. त्यांचे नौकर त्यांच्यासाठी काम करतात. समज हा नौकर आपल्यासाठी अनार उडवितो आहे, बघ काय मजा येईल. चिन्याला म्हणाला बाबा म्हणजे तो आपला नौकर आहे, असं समजायचे. तेव्हड्यात चिन्याचे लक्ष समोर गेले. बाबा, तो नौकर पुन्हा अनार उडविणार आहे. त्या नौकर कडे पाहत, चिन्या ओरडला "ए नौकर हमारे लिये अनार उडाव". लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांच्या छटा आकाशात पसरल्या. चिन्याने आनंदाने टाळ्या पिटत उड्या मारल्या.  चिन्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

Thursday, October 23, 2014

दिवाळीच्या फुलझड्या


चंचला कमळा ती
हातातुनी निसटली
दिव्यांच्या उजेडात
कमळावर स्वार झाली

पीएम इन वेटिंग सारखा
सीएम इन वेटिंग राहिला 
कोकणचा राजा 
आज ही उपाशी राहिला 

अंधार दूर झाला 
वनवास आज संपला 
आज वोट पाउलांनी  
सत्ता घरात आली  

धनुष्य बाणाचा नेम
कसा काय चुकला?
शकुनी पास्यानी
दगा कसा दिला.


Saturday, October 18, 2014

बेडूक आणि सर्प


फार जुनी कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेंकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली. तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे? बेडूक म्हणाला इथे जवळच एक विहीर आहे, त्यात शेंकडो बेडूक राहतात, त्यात काही माझे वैरी आहेत. मी तुला विहिरी पर्यंत घेऊन जातो. महिना भर विहिरीत राहून, मी दाखविलेल्या माझ्या सर्व विरोधकांना तू खाऊन टाक. पण अट एकच, महिन्याभरा नंतर तुला विहीर सोडावी लागेल. सर्पाला काय, आनंद झाला, त्याने पटकन बेडूकाची अट मान्य केली. तो बेडूक सर्पाला घेऊन विहिरीत आला. महिन्याभरात सर्पाने त्याच्या सर्व विरोधकांचा फडशा पाडला. आता बेडूकाने पूर्वीच्या अटीप्रमाणे  सर्पास विहीर सोडण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, अटी वैगरे जुनी गोष्ट झाली, बेडूक माझे जेवण आहे, विहिरीतल्या सर्व बेडूकांचा फडशा पडल्या शिवाय मी काही विहीर सोडणार नाही. सर्पाला विहिरीत आमंत्रित करण्याचा हा परिणाम होणारच.

Monday, October 6, 2014

इमानदार माणूस आणि त्याचा झाडूकाल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला.

खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार. झाडू लावत-लावत त्याने भ्रष्टाचार रुपी कचरा गोळा केला आणि तो इंद्रप्रस्थ नगरीच्या सिंहासन जवळ पोहचला. पाहतो तर काय सिंहासनाचा एक पाया तुटलेला. त्याने गोळा केलेला भ्रष्टाचार रुपी कचरा त्या पायाच्या खाली ठेवला आणि सिंहासनावर बसला. भ्रष्टाचार वैगरेह विसरून गेला आणि चमत्कारी झाडू ही अडगळीत ठेऊन दिला. काही महिने राज्य केल्यावर त्याला चैन पडेनासे झाले. दिवसा उजेडी हस्तिनापूरचे स्वप्न दिसू लागले. त्याने सिंहासन सोडले आणि सैन्य घेऊन हस्तिनापूरच्या दिशेने प्रयाण केले. परंतु चतुर द्वारकेच्या कृष्णाने त्याचा डाव हाणून पडला. आता इमानदार माणसाची स्थिती ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. इंद्रप्रस्थी परतल्यावर त्याला अडगळीत ठेवलेल्या चमत्कारी झाडूची आठवण आली. पण त्याला झाडू सापडला नाही.

इकडे द्वारकेच्या राजाने झाडू पळविला या चमत्कारी झाडूने देशातला सर्व कचरा स्वच्छ करेन असे त्याने जनतेस म्हंटले आणि जनतेला ही कचरा स्वच्छ करण्याचे आव्हान केले. आता राजाच जर रस्त्यावर झाडू मारण्यास उतरणार तर नेता अभिनेता, खेडाळू का मागे राहणार.  नेते, अभिनेते सर्व हातात  झाडू घेऊन  कचरा स्वच्छ करण्यास रस्त्यावर उतरले.  अडगळीत पडलेला झाडू आता मोठ्या-मोठ्या लोकांच्या बैठकीत पोहचला. तेंडल्या ही क्रिकेट बेट सोडून सकाळी-सकाळी झाडू हातात घेऊन रस्ते स्वच्छ करताना दूरदर्शन वर दिसू लागला. तेंडूलकर सारखा रोल मोडेल जर हातात झाडू घेईल तर मोठ्या मोठ्या कंपन्या ही झाडूच्या बाजारात उतरतील, हे आलंच. सकाळी सकाळी दूरदर्शन वर विज्ञापनात हातात झाड़ू घेउन  सलमान खान म्हणत आहे,

तेरी गली, मेरी गली से साफ क्यों?
गली को चमकाये, लिवर ब्रांड झाडू.

माधुरी स्टायल स्माईल करत एक हिरोईन म्हणत आहे,

माधुरी के दातों की तरह चमकाए
आपके मोहल्ले को, चमको ब्रांड झाड़ू.

बेचारा इमानदार माणसाच काय झालं. इमानदार माणूस या घडी  कपाळावर हात ठेऊन विचार करीत आहे, गादी गेली, झाडू गेला ...

एकच होता झाडू
तो ही त्याने पळविला
आता स्वच्छ करू कसा
भ्रष्टाचार रुपी कचरा.

पण आता त्याच्या शब्दांवर पुन्हा लोक विश्वास ठेवतील का? 

Wednesday, October 1, 2014

कांदा / क्षणिका


कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते


शेतकऱ्याला      रडवितो     कांदा
ग्राहकाला         लुबाडीतो   कांदा
व्यापारीला       फसवितो   कांदा
नेत्यांना  मात्र   हसवितो    कांदा