Monday, April 30, 2018

लेखक बनण्याचे फंडे - चौर्यकला


म्या लेखन चौर्यकला शिकलो 
कवी म्हणूनी प्रसिद्ध जाहलो.

आपले नाव जगात झाले पाहिजे अशी इच्छा सर्वांचीच असते.आपल्या छोट्याशा चौकटीत आयुष्य जगणार्या सामान्य माणसाला हे जमत नाही. मग प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा पूर्ण  करण्याचा सौपा उपाय तो शोधतो. सर्वात सौपा उपाय म्हणजे कवी आणि लेखक होणे. पण त्यासाठी लागणारी कल्पना व वेगळा विचार करण्याची क्षमता हि नसली तरीही चालेल.  ज्या प्रमाणे दुकानदार नकली माल प्रसिद्ध कंपनीचे लेबल लाऊन विकतो. त्याच प्रमाणे कवी बनण्यासाठी प्रसिद्ध कवींच्या कविता, थोडा फेर-फार करून स्वत:च्या नावाने बेधडक खपविल्या म्हणजे कवी म्हणून मान्यता मिळालीच समजा. 

एका कार्यक्रमात गेलो होतो. २०-२५ लोक जमले होते त्यात काही माझे मित्र हि होते. एकाने आपली स्वरचित हिंदी कविता ऐकविली. नंतर ३-४ कवींनी हि त्यांच्या स्वरचित हिंदी कविता ऐकविल्या. मला हि विचारणा केली तू ब्लॉगवर एवढ्या कविता लिहितो, एखादी ऐकव. मी म्हणालो, आजकाल मला स्वत:च्या कविता लक्षात राहत नाही. असा कसा कवी तू ज्याला स्वत:च्याच कविता लक्षात रहात नाही- एक कवियत्री. मी उत्तर दिले नाही, शांत राहिलो. कार्यक्रम संपल्यावर माझ्या एका मित्राने विचारले, तुझी बेइज्जती केली तरीही तू तिला उत्तर का दिले नाही. मी म्हणालो, काय म्हणू, तिने ऐकविली कविता कुठल्या प्रसिद्ध कवीची आहे ते. इथे सर्वांनीच हिंदीच्या प्रसिद्ध कवींच्या कविता स्वत:च्या नावाने खपविल्या आहेत. मला त्यांच्यातला एक व्हायचे नव्हते, म्हणून मी चूप राहिलो. मी त्या कवितांच्या मूळ कवींची नावे हि आपल्या मित्राला सांगितली. नकल करताना डोक वापरण्याचे कष्ट सुद्धा या तथाकथित कवींनी घेतले नव्हते. माझ्याजागी दुसरा असता तर निश्चित त्यांची सर्वांसमोरअब्रू घालविली असती. दुसर्याची कविता स्वत:च्या नावाने खपवायची असेल तर किमान प्रसिद्ध कवींना तरी टाळले पाहिजे. शब्दांना थोडे फिरविले तर अति उत्तम. सरकारी कार्यालयात हिंदी पखवाड्यात अश्या कवींच्या भरपूर कविता ऐकायला मिळतात. थोडीफार प्रसिद्धी त्यांना मिळतेच. शिवाय आजकाल कुणी वाचन करत नाही त्यामुळे अश्या कवींची चलती झाली आहे. 

तीस एक एक वर्ष आधीची गोष्ट, एक प्रसिद्ध हिंदी मासिक वाचत होतो. वाचता-वाचता ध्यानात आले, आपण हि गोष्ट वाचली आहे. सहज लेखकाच्या नावाकडे लक्ष गेले. लेखक आपला मराठी माणूस होता. त्याने चक्क मराठी गोष्ट हिंदीत अनुवाद करून स्वत:च्या नावाने खपविली होती आणि त्याला मानधन हि मूळ मराठी लेखकापेक्षा जास्त मिळाले असेल. हिंदीच्या प्रसिद्ध मासिकात चोरीची गोष्ट टाकणाऱ्या लेखकाला सलाम करण्याची इच्छा झाली.  पूर्वी प्रसिद्ध हिंदी सिनेमाचे मराठीत रिमेक होत होते, तसेच एका भाषेची कहाणी अनुवाद करून दुसर्या भाषेत स्वत:च्या नावाने सहज खपविता येतात. ९९ टक्के कुणालाही कळणार नाही याची शाश्वती. एखाद्याला कळले तरी तो तक्रार करणार नाही. आजकाल तर लोक पुस्तके आणि मासिक वाचत नाही. मराठी भाषेचे सोडा हिंदीचे अनेक मासिक केंव्हाच बंद झाले आहेत. अनुवाद आणि थोडा फेरफार करून दुसर्याचे लेखन स्वत:च्या नावाने सहज खपविता येते. यात रिस्क हि कमी. 

काही वर्ष आधी ब्लॉग लेखनाला चालना मिळाली. अनेक संकेतस्थळांवर हि लोक लिहू लागले. गेल्या तीन -चार वर्षांपासून इथे हि मंदी आली आहे, हे वेगळे. मराठीचे अनेक संकेतस्थळ बंद झाले. तरी हि जिथे पुस्तकाच्या ३०० प्रतीही खपण्याची संभावना नसते, तिथे ब्लॉग किंवा संकेतस्थळांवर लिहिले तर तुमचे लेखन जास्त वाचकांनी वाचण्याची शक्यता आहे. 

मीही मराठीसृष्टी या संकेतस्थळावर पहिल्यांदा आपल्या मोडक्या-तोडक्या मराठीत लिहायला सुरवात केली. लिहिताना भाषा किती हि अशुद्ध असली तरीही संकेतस्थळांवर लेखन प्रसिद्ध होतेच. नंतर स्वत:च्या नावाने ब्लॉग हि बनविला. पूर्वी मराठीसृष्टी या संकेतस्थळावर लिहिलेले लेख हि आपल्या ब्लॉग वर टाकले. माहितीच्या या युगात ब्लॉगवर टाकलेले लेखन कुणी चोरणार नाही, त्यात शिक्षित नेटकर  मराठी माणूस असे कदापि करणार नाही असे वाटले होते. आपले लेख अधिक लोकांनी वाचावे हि इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. एक दिवस नेट वर सर्च करताना ऐसी अक्षरे नावाच्या संकेतस्थळा बाबत माहिती मिळाली. 

ऐसी अक्षरेवर "प्रेम म्हणजे काय" हा लेख टाकला. [http://aisiakshare.com/node/2406]. लगेच अड्मीन ने विचारले हा लेख तुमचा आहे का? मला विजेचा शॉकच बसला. मी उत्तर दिले आपल्या ब्लॉग वरून हा लेख इथे टाकला आहे. अड्मीन ने तीन-चार लिंक पाठविल्या त्या वरून कळले नितीन ठाकूर, युवराज मोहिते, पवारजी इत्यादी लोकांनी हा लेख चोरून स्वत:च्या नावाने खपविला होता. एक चांगले होते, मराठीसृष्टी साईट बंद झाली नव्हती. त्यामुळे  लेखाची लिंक पाठवून मूळ लेखक मीच आहे, हे मला सिद्ध करावे लागले. आपल्या चिरंजीवाची मदत घेऊन चोरांचे इमेल शोधले व जाब विचारला. त्या पैकी मोहिते आणि पवार यांनी माफी मागितली. नंतर कळले हा लेख आणिक ३-४ लोकांनी स्वत:च्या नावानी खपविला आहे. नेटवर अधिक तपासल्यावर कळले माझ्या अनेक कविता आणि लेख दुसर्यांनी त्यांच्या नावावर खपविले आहेत. काय करणार. मराठी ब्लॉग लेखनात पैसे मिळत नाहीत. पण चोरांविरुद्ध कार्रवाई करण्यासाठी पैसे लागतात. यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते, बिना कष्ट करता, दुसर्यांचे लेखन ब्लॉग, फेसबुक व व्हाट्सअप वर स्वत:च्या नावाने खपवा, मूळ लेखक काही ही करू शकणार  नाही.  

तर मित्रांनो वाट कसली पाहता,दुसर्याचे लेखन चोरी करा आणि स्वत:च्या नावाने खपवा. लेखक म्हणून तुम्हाला प्रसिद्धी नक्कीच मिळेल. कुणी जाब विचारला तर बेशरम बना. चोरांच्या उलट्या बोंबा हि मारा. असो. 

Wednesday, April 25, 2018

आठवणीतून -चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग! खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात का तोडले? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. 'चिवताई ये दाणा खा', म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. एसीवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

Sunday, April 22, 2018

तीन क्षणिका : कवी



(१) 

कवी दरबारात गेला 
चारण-भाट तो झाला 
खोटी प्रशस्ती गायली 
कवी कोट्याधीश झाला

(२) 

कवी अरण्यात गेला 
प्रकृती सवे रमला 
स्वान्त:सुखाय रचना केली 
महाकवी तो झाला

(३)

कवी बाजारात गेला 
शून्य भाव मिळाला 
शून्याने केली निर्मिती 
कवी सृष्टा झाला 

सृष्टा: जगाची निर्मिती करणारा 


Thursday, April 19, 2018

आठवणीतून - तपश्चर्येचे फळ



मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते.  गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते. माझा नाईलाज आहे, असे म्हणत त्याने धूम ठोकली. लोकांपासून दूर तो घनघोर अरण्यात पोहचला. स्वर्ग प्राप्ती साठी त्याने कठोर तपश्चर्या सुरु केली. वल्कल परिधान केले. झोपायला धरती आणि पांघरायला आकाश. कंद मूळ, फळे हाच त्याचा आहार. कधी ही संसारिक भोगांचा विचार त्याचा मनात आला नाही. सतत नामस्मरणात तो दंग राहायचा. काळ लोटला. तो म्हातारा झाला आणि मरण पावला. 

चित्रगुप्ताने त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब केला. एक दिवस स्वर्गात राहण्याचे पुण्य त्याचा पदरी पडले. त्याला आनंद झाला. एक दिवस का होईना, त्याला स्वर्गीय देवतांचे दर्शन घेता येईल. जन्माची तपस्या सफल होईल. देवदूत त्याला स्वर्गात घेऊन आले. अनेक सुगंधित उबटने अंगाला लाऊन, त्याला स्नान घातले. उंच भरजरी रेशमी वस्त्र त्याला नेसायला दिले. इंद्राच्या सभेत त्याला घेऊन पोहचले. सभेत इंद्र आणि इतर देवता, रम्भा, उर्वशीचे इत्यादी अप्सरांचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून उठला, त्याचे स्वागत केले. त्याला आपल्या जवळच्या मंचकावर बसवले. एक अप्सरा सोमरसाचे पात्र घेऊन त्याच्या  जवळ आली. इंद्र त्याला म्हणाला, स्वर्गीय अप्सरांचा नृत्याचा आनंद घेत सोमरसाचे प्राशन कर. आज आपल्या आवडत्या अप्सरे बरोबर तू मनसोक्त रमण करू शकतो. वेळ घालवू नको. हा एका दिवसाचा स्वर्गीय आनंद तुझ्या कठोर तपस्येचे फळ आहे. उचल ते सोमरसाचे पात्र. त्याने समोर पहिले, रम्भा-उर्वशी सोमरसाच्या धुंदीत देहभान विसरून नाचत होत्या. दोघींचे वस्त्र अस्तव्यस्त झाले होते, दिसू नये ते सर्व दिसत होते. पण त्यांना त्याची लाज नव्हती. सर्व देवता ही मद्याच्या धुंदीत होते. चिरयौवना सुंदर अप्सरांच्या ओठांचे स्पर्श झालेले सोमरस देवगण आनंदाने प्राशन करीत होते. आजच्या सिने तारकांना लाज वाटेल असे वस्त्र अप्सरांनी परिधान केले होते. अप्सरांच्या गळ्यात गळे घालून देवगण कामोत्सव साजरा करण्यात मग्न होते. हे सर्व पाहून, त्याला आठवले, काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र त्याला फार्म हाऊस वर नवीन वर्षाच्या पार्टीत घेऊन गेला होता. तिथे तोडक्या वस्त्रातल्या बारबाला लोकांना ड्रिंक्स सर्व करीत होत्या. तिथे सर्व स्त्री-पुरुष लोक-लाज विसरून मद्याच्या धुंदीत नाचत होते. खुलेआम भोगविलास सुरु होता. त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली.  इथे येऊन पाहतो तर स्वर्गात ही तोच प्रकार. त्याला प्रश्न पडला, त्याच्या कठोर तपस्येचे फळ हेच का? असा आनंद तर काही पैका खर्च करून पृथ्वीवर सहज प्राप्त होतो. संपूर्ण आयुष्य अश्या स्वर्ग सुखा साठी मोजले. त्याला त्याचीच लाज वाटली. परित्यक्ता पत्नीची आठवण आली. आपण तिची प्रतारणा केली, एवढ्या शुल्लक गोष्टी साठी. तिची माफी मागितली पाहिजे. इंद्रसभा सोडून तो निघाला, पण तिला शोधणार कुठे?  कुठे असेल ती आज. अचानक त्याला एक अंधुक आकृती दिसली, तीच ती त्याची पत्नी. तो जोरात ओरडला, माफ कर मला. अहो, काय झाले तुम्हाला, कसली माफी, काही स्वप्न पहिले का?  तो दचकला, आपण बिछान्यावर झोपलेलो आहे, हे त्याच्या लक्ष्यात आले. त्याने लगेच स्वत:ला सावरले. तिच्या हातातला केशरमिश्रित दुधाचा गिलास आपल्या हातात घेत तो म्हणाला, मधुमिलनाची रात्र जागून काढायची असते, डोळा लागला, गुनाह घडला आहे हातून. अपराधीला दंड हा मिळालाच पाहिजे. तिला त्याचे ऐकून हसू आले, ती म्हणाली अजून भरपूर रात्र उरली आहे, तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला शिक्षा करीन. त्या नंतर काय झाले कुणी-कुणाला शिक्षा केली, कशी केली, अंधार असल्या मुळे काहीच कळले नाही.

 ( २ जुन २०१५ हा लेख त्या वेळी हि सर्वांना आवडला होता).       .


Wednesday, April 18, 2018

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत


अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ  हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते. डोळे लाल होणे, खोकला सुरु होणे, एलर्जी व अस्थमाचा त्रास वाढणे हे सर्व सामान्य झाले आहे. आठवड्यात किमान एकदा तरी प्रदूषित धुळीची आंधी येतेच. इतर ठिकाणी प्रचंड उन्हामुळे लू लागते पण दिल्लीत लू सोबत प्रदूषित धुळीचा त्रास ही सहन करावा लागतो.

संध्याकाळचे पाच एक वाजले असतील. जोरात आंधी सुरु झाली. खिडक्या वाजू लागल्या. धावत जाऊन खिडक्या बंद केल्या. दरवाजा बंद करताना एक स्त्री आवाज आला, गाढवा किती हि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला तरी तू मला रोखू शकत नाही. मी चमकून इकडे-तिकडे पहिले कुणीच दिसले नाही, वाटले मनाचा भ्रम असावा. पुन्हा आवाज आला, मूर्खा, मी धुळीची आंधी बोलते आहे, कुणी मानवी स्त्री नाही, जी तुला डोळ्यांनी दिसेल. मला हि राग आला म्हणालो, तसे हि मला सध्या डोळ्यांनी काहीच  दिसत नाही. तू धुळीची आंधी आहे, मान्य करतो. माझेच घर सापडले का तुला, त्रास द्यायला. जोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. मी म्हणालो, हसतेच कशाला, मी काही चूक म्हंटले का, कुणालाच आवडणार नाही, तुझे घरात शिरणे. त्या वर धुळीच आंधी म्हणाली, पूर्वी मी रस्त्याच्या काठी असलेल्या झाडांवर किंवा आंगणातल्या झाडांवर विसावा घ्यायचे. तुझ्या घराच्या आंगणात एखादे पेरूचे झाड असते तरी त्यावर आपली हाडे टाकून मस्त झोपले असते. हो आलं लक्ष्यात, तुझ्या घरात आंगणच नाही, तर झाड कुठून येणार. शोभे साठी ठेवलेली प्लास्टिकची झाडे दिसत आहेत बैठकीत.  चालेल, फूल न फुलाची पाकळी इथेच विसावा घेते.  

मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही.  थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी. 

थोड्या वेळात आंधी संपली. झाडू-पोंछा घेऊन घरभर पसरलेली धूळ स्वच्छ केली. डोळ्यांत जळजळ होऊ लागली होती, खोकलता-खोकलता हालत खराब झाली होती. शेवटी नाईलाज होऊन डॉक्टर कडून औषध आणावे लागले. 
 

Tuesday, April 17, 2018

बिहारच्या चिमुरडीची व्यथा




कॅन्डल मार्च नाही काढला
कुणी नेत्याने माझ्यासाठी.

शर्मसार नाही झाला 
धर्म कुणाचा माझ्या साठी.

रान नाही उठविले जगभर
पेड मिडीयाने माझ्यासाठी 

मोर्चे नाही निघाले मला 
न्याय मिळवून देण्यासाठी .

माझा  काहीच उपयोग नव्हता 
वोट बँक राजनीती साठी.


(प्रत्येक बलात्कार घृणित असतो. बलात्कारीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आपल्या देश्यात बलात्कारचा उपयोग घृणित राजनीती साठी होतो.  पीडिता आणि बलात्कारीच्या धर्माच्या आधारावर ठरविल्या जाते कि शांत राहायचे कि हल्ला करायचा.  घृणित वोट बँक राजनीती).

Monday, April 16, 2018

प्रदूषण (२६) गोवर्धन गिरधारी



हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली अरावलीची पर्वतराजी, आकाशात उंच मान डोकावून उभा गौवर्धन पर्वत. दूर यमुने पर्यंत पसरलेले हिरवेगार कुरण. पर्वतांच्या पायथ्याशी असलेली कमळदलांनी सजलेली सुंदर-सरोवरे. सारस, हंस सारखे सहित अनेक चित्र-विचित्र पक्षी, हत्ती, व्याघ्र,हरीणे इत्यादी जनावरे त्या रम्य परिसरात बागडत होती. कदंब, पिंपळ, कडूलिंब, वटवृक्ष, आंबा,पेरू नानाविध वनस्पती ने हा हिरवागार वन्य प्रदेश नटलेला होता.  हेच ते नयनाभिराम -गोकुळ-वृंदावन. 


एक दिवस माणसाची दृष्ट त्या रम्य परिसराला नजर लागली. दूर-दूर पसरलेली हिरवीगार कुरणे पाहून काही ग्वालपाल आपल्या  गुरांसहित इथे स्थिरावले. मथुरेच्या बाजारात दूध, दही, तूप विकून आपला उदर-निर्वाह करू लागले. जसे-जसे मथुरेचे वैभव वाढले, तसे-तसे वृंदावनात ही गवळ्यांची व गुरांचीही संख्या वाढली. कुरणांवरून त्यांचात आपसात भांडणे होऊ लागली. साहजिकच त्यांनी आपला राजा निवडला. कुरणे वाटण्यात आली. परिणाम वृन्दावानातले वन्य जीवन नष्ट झाले. नंतर मथुरेतल्या महाल व इमारतीत साठी, मोठ्याप्रमाणात झाडे तोडण्यात आले. अरावलीच्या टेकड्या ओसाड झाल्या. नग्न पर्वत पावसाळ्यात ढासळू लागले. पर्वत पायथ्याशी असलेली सरोवरे बुजुन गेली. व्हायचा तोच परिणाम झाला. पावसाचे पाणी आपल्यात सामावणारी सरोवरे आता नव्हती. एकदा श्रावणात अतिवृष्टी झाली. वृक्षविहीन पर्वतराजी पाण्यास थांबू शकली नाही. पर्वतावरून वाहत येणार्या पाण्यास कोणताच अडथळा नसल्यामुळे भयंकर पूर आला. शिवाय नदीच्या काठी वनराई नसल्याने  हजारोंच्या संख्येत गुर-ढोर व माणसे हि पाण्यात वाहून गेली. त्यानंतर पाऊस दगा देऊ लागला. त्या वर्षी एक थेंब ही पाऊस झाला नव्हता. हिरवीगार कुरणे सुकून गेली. आता यमुनेचा काठच ग्वालपाल आणि त्यांच्या हजारों गायींचे एकमात्र आश्रयस्थान उरले होते.  

प्रात:विधी पासून ते पिण्याचे पाणी- 'सर्वकाही यमुनेचा काठीच' आणि त्यात यमुनेचा कमी प्रवाह. माणसांच्या व गुरांच्या घाणी मुळे पाणी प्रदूषित झाले होते. पाण्याला घाण वास येऊ लागला होता. मग व्हायचा तोच परिणाम झाला. दूषित पाण्यामुळे माणसे व गुर-ढोर आजारी पडू लागले. काही दगावले सुद्धा. यमुनेच्या पाण्यात कालसर्प आहे अशी अफवा उडू लागली. मथुरेच्या शिपायांनी यमुनेच्याकाठी काही विषाक्त सर्प ही मारले.  पण काहीही फरक पडला नाही.  रोगराई काही कमी झाली नाही. 

ग्वालांचा राजा नंद चिंतित होता. दुष्काळामुळे गायींना खायला पर्याप्त चारा नव्हता. परिणामी गायी कमी दूध देत होत्या. पण मथुरेला दूध पाठवलं नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही हे ही नंदाला चांगले माहित होत. त्यामुळे ग्वाल-बाल दूध-दह्याला मुकले. दुष्काळ दूर करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक होत. यादवांचे गुरु गर्ग ऋषींनी देवराज इंद्राला प्रसन्न करण्यासाठी इंद्रयज्ञ करण्याचा सल्ला दिला. वृंदावनात यज्ञाची तैयारी सुरु झाली. 

गोकुळापासून काही कोस दूर एका टेकडीच्या पायथ्याशी नंदाच्या मालकीचे कुरण होते. नंदाचा जारूक नावाचा एक वृद्ध सेवक आपल्या परिवारासहित या कुरणाची व्यवस्था पाह्यचा.  तिथे नंदाच्या शेकडो गाई होत्या. दहा-बारा वर्षाचा कृष्ण इथे पहिल्यांदाच आला होता. जिथे गोवर्धन समवेत समस्त पर्वतराजी व कुरणे वृक्षविहीन व वा सुकलेली दिसत  होती. पण इथे चहूकडे हिरवळ होती. कुरण विभिन्न फुल-फळांच्या झाडांनी नटलेल होत. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सरोवरात भरपूर पाणी दिसत होत. त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. कृष्णाने या बाबतीत सेवकास विचारले. तो म्हणाला: कृष्ण कधी पाऊस जास्ती पडतो कधी कमी. पर्वतावर व जंगलातली वृक्षे पावसाच्या पाण्यला जमिनीत मुरवितात, तेच पाणी हळू हळू पायथ्याशी असलेल्या तळ्यांत साचते.  पहिले इथे लहानसे तळे होते. दररोज काही वेळ देऊन या तळ्याला मोठ्या सरोवराचे स्वरूप दिले. गुरांची वाढती संख्या पाहून आणिक दोन तीन ठिकाणी या कुरणात स्व:परिश्रमाने सरोवरे बांधली. माझे सम्पूर्ण आयुष्य यात खर्ची गेले. दर श्रावणात समोरच्या टेकडी वर व आपल्या कुरणात ठीक-ठिकाणी  फळ-फुलांची झाडे नेमाने लावतो. कृष्ण जसे आपण सर्दी व गर्मी पासून वाचण्या साठी वस्त्र परिधान करतो व स्वत:ला सुरक्षित ठेवतो तसेच हिरवी वनस्पती पर्वतांचे व धरणीचे वस्त्र होय. या हिरव्या वस्त्रांशिवाय पर्वत व धरणी उध्वस्त होईल. त्याच बरोबर त्यांचा कुशीत वावरणारे आपल्या सारखे जीव ही. दूर असलेल्या गोवर्धन पर्वताकडे बोट दाखवीत तो म्हणाला हे पहा कृष्णा गौवर्धन वृन्दावानातला सर्वोच पर्वत पण काय त्याची दशा, वृक्षांविना कसा अनाथ दिसतो. गौवर्धन पर्वताच्या पायथ्याशी असलेली सरोवरे कधीच नष्ट झालेली आहे. वृंदावनात जिथे-पहा तिथे हीच परिस्थिती आहे. पाण्याच्या अभावी कुरणे सुकून  गेली आहे. गायी तहानलेल्या व उपाशी आहे. दुध-लोणी कुठून मिळणार. मथुरेला दूध, दही व लोणी पाठविणे सक्तीचे असल्याने ग्वालबालाचींं उपासमार होत आहे. आपल्याच कर्मांचीच फळे. देवराज इंद्राला दोष देण्यात अर्थ नाही. जारूक पुढे म्हणाला, कुठलाही व्यापार एक-पक्षीय नसतो. आपण दूध-दही मथुरेt विकतो त्या एवजी आपण अन्न-धान्य, वस्त्र इत्यादी घेतो. तसेच आपल्यालाही गोवर्धनाला त्याचे वैभव पुन्हा परत करावे लागेल. तरच इंद्राच्या क्रोधापासून तो आपली रक्षा करेल. अग्नीत तुपाची आहुती देऊन इंद्र प्रसन्न होणार नाही. गौवर्धन पर्वताचे जुने वैभव परत केल्यास, अकाल आणि अतिवृष्टी पासून गवळ्यांचे व गुरांचे रक्षण होईल. कृष्णाने विचारले, जारूक हे सर्व तुम्ही बाबांना का नाही सांगत? जारूक उतरला, मी एक सेवक आहे, माझे कोण ऐकणार. शिवाय लोक स्वार्थी असतात. स्वस्त:चाच विचार करता. मला काय फायदा हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. सर्वांच्या उन्नतीत स्वत:ची उन्नती आहे, हे कुणालाच कळत नाही. तू ग्वालांचा राजकुमार आहे, तू मानत आणले तर सर्वांना एकत्र करून, उद्दिष्ट साध्य करू शकतो. 

कृष्ण गोकुळात परतला. नंदबाबा, यादवांचे कुलगुरूआचार्य गर्ग व काही प्रतिष्ठित गवळ्यांसोबत इंद्रयज्ञा बाबत चर्चा करीत होते. यज्ञासाठी लागणारी सामग्रीची बद्दल गर्ग ऋषी बोलत होते. किती पोती धान, किती हंडे दूध, दही, लोणी लागणार होते याचा हिशोब होत होता. कृष्ण -विचार करू लागला. इथे गवळ्यांच्या पोरांना दूध-लोणी मिळत नाही आहे. तिकडे अग्नीत अनेक हंडे दूध-लोणी व्यर्थ जाणारआणि देवराज इंद्र प्रसन्न ही होणार नाही. कृष्णाला राहवले नाही. तो म्हणाला आचार्य क्षमा असावी, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. देवराज इंद्र आपल्या वर कधीही रुष्ट नव्हते, आपण आपल्याच कर्मांची फळे भोगत आहोत. वरुणदेव आकाशातून अमृताचा वर्षाव करतो पण पाणी साठवणारी तळी आहेत कुठे? आपल्या स्वार्थापायी आपण पर्वतांना नग्न केले, झाडे तोडली. गौवर्धन पर्वत पावसाचे पाणी आपल्या कुशीत सामावून घेण्यास असमर्थ झाला आहे. परिणाम आपल्याला पाऊस आला कि काही वेळातच गोकुळात पाणी भरते. कृष्ण म्हणाला, बाबा आपले कुरण आज ही हिरवेगार आहे. कुरणात भरपूर झाडे आहेत. सरोवरांत पाणी आहे. जारूकने त्या साठी मेहनत घेतली आहे. धरणीचे वैभव अक्षत ठेवले आहे. आज इंद्र यज्ञाची नव्हे तर गौवर्धन पर्वताला प्रसन्न करणे गरजेचे आहे. गौवर्धन पर्वताची  पूजा करून,  हिरव्या वस्त्रांनी त्याचा श्रुंगार केला तर तो निश्चित  प्रसन्न  होईल. बुजलेली सरोवरे पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे. शिवाय अनेक नवीन सरोवरांच्या निर्मितीची. प्रसन्न झालेला गौवर्धन पर्वत अग्नी,वायु आणि वरुण या तिन्ही शक्तींचा नियंत्रक देवराज इंद्रच्या क्रोधापासून ग्वालपालांचे निश्चित रक्षण करेल. आज वृन्दावानाच्या धरतीला तिचे वैभव परत करण्याची गरज आहे. त्याकरता आपण सर्वाना  कठोर परिश्रम करावे लागेल. चमत्कार कधी होत नसतो. तो आपल्या पुरुषार्थाने घडवायचा असतो. 

तिथे असलेल्या अनेक ग्वालांनी कृष्णाचे समर्थन केले.  आचार्य गर्ग म्हणाले कृष्णा मला हि तुझे म्हणणे पटते. नंदबाबाला हि कृष्णाचे म्हणणे पटले. सभेत सर्वांनी ब्रज मंडळात सरोवरांचा निर्माण, नदी काठी व गोवर्धन सहित सर्व उजाड टेकड्यांवर वृक्ष  लावण्याचा संकल्प घेतला.  

दवंडी पिटली. सर्व गवळी एकत्र झाले. जुन्या सरोवरांचा पुन:उद्धार, नवीन  कुठे सरोवर बांधायचे, यावर चर्चा झाली व सर्वानुमतीने स्थळे निश्चित झाली.  जाणकार गवळ्यांनी कुठे कोणत्या वनस्पती आणि झाडे लावायची हे ठरविले. सर्व गवळी उत्साहाने कामाला लागले. पावसाळ्याच्या आधी काही सरोवरांना पुन:जीवित केले. पावसाळ्यात त्यांत पाणी साचले. गवळ्याचां उत्साह वाढला. 

अशीच १० दहा एक वर्षे निघून गेली.  हिरवे वस्त्रांनी नटलेला गौवर्धन पर्वत नववधू सारखा शोभून दिसत होता. कृष्णाने गौवर्धन पर्वताच्या शिखरावर उभे राहून  दूर यमुने पर्यंत पसरलेला ब्रजमंडळा कडे बघितले. एक, दोन, दहा-वीस नव्हे तर तब्बल ९९ सरोवरे ब्रजच्या गवळ्यानींं बांधून काढली होती. सर्वत्र हिरवळ दिसत होती. दूर यमुनेकाठी लावलेले कुंजवन हि दिसत होते. गायी भरपूर दूध देत होत्या. ग्वाल बाळांना भरपूर दूध व लोणी मिळत होते.  उपासमार संपली अणि समृद्धि आली.

या वर्षी अतिवृष्टी झाली, इद्राला क्रोध आला असे ब्रजच्या ग्वालांना वाटले. पण पावसाचे पाणी गौवर्धन पर्वताने आपल्या हिरव्या वस्त्रांत साठवले तर उरलेले सरोवरांनी आपल्या उदरात सामावून घेतले. नदी काठच्या कुंजवनांनी जनावरांना पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून थांबविले.  इंद्राचा पराजय झाला व गौवर्धन पर्वताचा विजय.

यमुनेकाठचा कालसर्प वृंदावन सोडून केंव्हाच निघून गेला. आता पुनवेचा राती, यमुनेच्या काठावर, कुंज वनात कृष्णाच्या बंशीच्या तालावर गोप-गोपिकांच्या नृत्य आणि गाण्याचे बोल गुंजू लागले. 

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावकरी मिळून अमृत तुल्य पावसाचे पाणी पुन्हा सरोवरांचा निर्माण करून साठविण्याचे कार्य करत आहे, हे पाहून आणि ऐकून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. 

टीप:

ब्रज : जिथे १० हजार गायी पाळल्या जातात. 

ब्रजमंडळात ९९ सरोवर बांधण्याची कथा, स्वर्गीय स्वामी हरीचैतन्य पुरी यांच्या मुखातून ऐकली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य  पर्वतांना नष्ट करणाऱ्या दगड व रेत माफिया विरुद्ध लढ्यात घालविले. 

माझ्या मते ब्रजचा कृष्ण हा महाभारतातल्या कृष्णापेक्षा वेगळा होता. 

Friday, April 13, 2018

दोन क्षणिका -गिधाडी चोचांं व आत्महत्या




 (१)

सुकलेल्या झाडावर
दुष्काळी छाया
लटकलेल्या प्रेतावर
गिधाडी चोचांं.

(२) 

शेतांत टाकले विष 
शेतांत उगवले विष 
विष पिउनी आत्महत्या 
करतो आज बळीराजा. 


१. शेतकर्याचे भल्याचे कार्य करण्याची फुरसत कुठल्या हि तथाकथित शेतकरी नेत्यांची नाही. त्या साठी पुरुषार्थ करावा लागतो. ते त्यांना जमणार नाही. प्रेतांवर लोणी  खाणे अधिक सौपे कार्य. दुर्भाग्य अधिकांश शेतकरी अश्याच नेत्यांच्या मागे धावतात. 

२. विषाक्त शेतीचा परिणाम बळीराजाला हि भोगावा लागतो. पहिले विषाक्त शेती नव्हती,बळीराजा आत्महत्या हि करत नव्हता. विषाक्त शेती महागात पडते, खाणार्यांच्या शरीरात विष जाते हे वेगळे. शेवटी कर्जबाजारी होऊन शेतकरी हि आत्महत्या करतो. 

Thursday, April 12, 2018

प्रदूषण (२५): महानगर - एक प्रदूषित कारागृह


शेरखान जंगलाचा राजा. राजा असला तरी पोट-पाण्यासाठी त्याला शिकार करावीच लागायची. किमान दहा-बारा वेळी प्रयत्न केल्या वर त्याला शिकार  गवसायची. कधी सांभर सारखे मोठे जानवर गवसले तर काही दिवस मेजवानी. तर कधी-कधी सस्या सारख्या छोट्या जनावरा वर ही गुजाराण करावी लागे. कधी-कधी कित्येक दिवस उपासमार ही व्हायची. तरी ही शेरखान खुश होता. कुठल्या जनावराचा शिकार करायची हे ठरविण्याचे स्वतंत्रता त्याच्या पाशी होती. आपल्या मर्जीचा तो राजा होता. तो जंगलात कुठेही फिरू शकत होता. पण म्हणतात न, काळ कधीच एकसारखा नसतो. एक दिवस शेरखान शिकारीला निघाला होता. त्याला एका पिंजर्यात लटकलेले जनावराचे मांस दिसले. आयते भोजन समोर दिसल्यामुळे तो पिंजर्यात घुसला आणि कैद झाला.  

शेरखान शहरातल्या एका प्राणी संग्रहालयात पोहचला. आता चार बाय सहाचा एक  पिंजरा त्याचे घर झाले. शेरखानने अनेकदा पिंजरा तोडण्याचा आपल्या संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केला पण पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या तोडण्यास तो असमर्थ ठरला. शेवटी नियती समोर त्याने हात टेकले. संग्रहालयात वाघाला पाहण्यासाठी तिकीट विकत घेऊन लोक यायचे. लहान पोरे शेरखानला चिडवायचे, कधी-कधी कुणी पोट्टा दगड हि मारायचा.  हे सर्व सहन करण्याशिवाय  शेरखानला गत्यंतर नव्हते.

तसे म्हणाल तर इथे शेरखानला कसलीच काळजी नव्हती. दररोज दुपारी म्हशीचे किंवा कधी-कधी बकर्याचे शिळे मांस जेवणात मिळत होते. अर्थात निर्धारित खुराकपेक्षा अर्धीच खुराक त्याला मिळत असे. नेहमीच त्याला अर्धपोटी राहावे लागायचे. माणसाच्या संसर्गात आल्यामुळे त्याला रोगराई होऊ नये म्हणून विटामिन, विषाणू नाशक आणि जीवाणू नाशक औषधी  त्याच्या खुराक मध्ये मिसळून दिली जायची.  शेवटी तो प्राणिसंग्रहालयाचा कमाऊ पूत जो होता. शेरखानला जंगलातल्या दिवसांची आठवण यायची, कुठे प्राण्यांचे स्वादिष्ट ताजे मांस खायला मिळायचे, तर कुठे इथे बेस्वाद शिळे मांस. कधी-कधी तर कित्येक दिवसांचे शिळे. पण नाईलाज होता, भूक भागविण्यासाठी खाणे हि मजबुरी होती.  पिंजरा तोडून बाहेर जाणे अशक्यच होते.  असेच तीन चार वर्ष निघून गेले

एक दिवस मध्य रात्री शेरखानची झोप उघडली, त्याने पाहिले पिंजर्याचे दार उघडे होते. हीच सुवर्ण संधी आहे, इथून निसटायची. शेरखान पिंजर्यातून बाहेर पडला थेट जंगलाच्या दिशेने. अर्धा एक मैल पुढे गेला असेल कि त्याला धाप लागू लागली, तो थांबला. त्याच्या मनात विचार आला, एवढे वर्ष पिंजर्यात काढले,  चालताना हि धाप लागत आहे. जंगलात शिकार करण्यासाठी तर कैक मैल चालावे लागते. आता पुन्हा शिकारीसाठी कैक मैल चालणे व धावणे आपल्याला जमेल का? कदाचित नाही. बाकी पिंजरा काय वाईट. बेस्वाद असले तरी  जिवंत राहण्यालायक जेवण तर रोज मिळतेच.  काही वेळ विचार करून, तो मागे फिरला आणि पुन्हा पिंजर्यात येऊन झोपला.  पिंजरा म्हणजे जग हे कटु सत्य शेरखानने स्वीकारले. 

दिल्ली सारखे महानगर- लाखोंच्या संख्येने धूर फेकणारे वाहन, फेक्ट्रीज इत्यादी, सर्वत्र पसरलेला कचरा त्यात प्राणघातक रासायनिक कचरा हि. पिण्यासाठी सरकारी पाणी पूरवठा  एजेन्सीचे घाण पाणी.  या सर्वांमुळे  पसरणारे रोग. कधी डेंगू, कधी मलेरिया तर कधी चिकनगुनिया. दिल्ली सारख्या महानगरात सर्दी पडसे, एलर्जी, अस्थमा, टीबी, केंसर आणि मानसिक तणावामुळे हृदयरोग होणे तर सामान्य बाब झाली आहे. (माझे हि नाकाचे ऑपरेशन झालेले आहे, हृदयाचे हि बायपास झालेले आहे, रोज अलर्जीची गोळी आणि हृदयरोगचे औषध घ्यावे लागते. शिवाय वातावरणात झालेल्या बदलाने होणारे आजार हि). मला तरी दिल्लीत एक हि माणूस ज्याला इथे राहता दहा एक वर्ष झाली असेल, औषधी न घेणारा अद्याप सापडलेला नाही. तरीही इथे अर्धेपोट का होईना जेवण मिळते. अधिकांश लोक दहा बाई दहाच्या खोलीत कसेबसे संसार थाटतात आणि त्यासाठी १२-१२ तास  काम करतात. खरे म्हणाल तर महानगरात कुणीही आपल्या मर्जीने येत नाही, पोटाची भूक त्याला इथे आणते. पण एकदा महानगरात आलेला माणूसाला परतणे शक्य नसते. शेवटी इथेच रोगराई इत्यादींनी खंगत-खंगत तो इहलोकी जातो.  महानगरीय प्रदूषणच्या कैदैत माणूस आणि पिंजर्यात कैद शेरखान, दोघांचे जगणे सारखेच.

Tuesday, April 10, 2018

प्रदूषण (२४)- नदीचा अंत


हिमाच्छादित मुकुट हिचा 
वितळून गेला केंव्हाच . 

गोड पाण्याचा भंडार
नाही उदरात हिच्या 

  समुद्राकांशी नदी जवळ
 नाही 
आज जीवन प्रवाह. 

विरून जावे लागेल  हिला
मनुष्यकृत वाळवंटात

Sunday, April 8, 2018

प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे?


आज एप्रिल ५, २०१८ दुपारी जेवणानंतर सहज एक चक्कर लावायला बाहेर पडलो.  बाहेर भयंकर तापलेले होते, उन मी -मी म्हणत होते. जसा बाहेर पडलो होतो, तसाच २ मिनिटात पुन्हा परतलो. आज तापमान ४१ डिग्रीच्या वर होते. आताच तर उन्हाळ्याची सुरुवात झाली, पुढें काय होणार, कल्पना करताच अंगावर शहारे आले. नागपूरचा उन्हाळा आता दिल्लीत पोहचला,असे वाटले. शाळेतले दिवस आठवले. एप्रिल महिन्यातले पहिले पंधरा दिवस वार्षिक परीक्षेचे. मी जुन्या दिल्लीत राहायचो, शाळा पहाडगंज येथे घरापासून ३ किमी दूर. आम्ही जुन्या दिल्लीतली सर्व विद्यार्थी पाईच चालत शाळेत जात असू. सकाळी साडे सहाला घरातून निघाल्यावर सव्वा सात पर्यंत शाळेत पोहचत असू. सकाळी थंडी राहायची. अर्धे  स्वेटर घालावे लागे. आज कुणाला हे सांगेल तर विश्वास होणार नाही. आजोबा खोटे बोलतात हेच वाटेल. त्या वेळी घरात पंखे नसायचे. वाड्यातील सर्व लोक गच्चीवर झोपायचे. मे महिन्यात हि पहिल्या दोन आठवड्यात, रात्री १२ वाजता नंतर अंगावर पांघरूण घेण्याची गरज भासायची. सकाळी मस्त वातावरण राहायचे, सूर्य मध्यावर येताच गर्मी वाढायची. दुपारचे तापमान ४० डिग्री वर पोहचले कि समजायचे आता धुळीची आंधी येणार आणि ५-७ मिनिटे पाऊस हि. त्या नंतर संध्याकाळ पुन्हा वातावरण मस्त व्हायचें. संध्याकाळी कंपनी बागेत फिरण्यात मस्त मजा यायची.  विकासासाठी ब्रिटीश काळात बांधलेली हि सुंदर बाग रस्ते, कार पार्किंग व मेट्रो साठी नष्ट झाली.

अजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी पक्षी तडफडून मारतील. हरीयाणातून येणार्या कालव्याच्या पाण्याची वाटेतच वाफ होईल. दोन्ही राज्यात पाण्यासाठी भांडणे व पाणी कपात सुरु होईल. पाण्याच्या टेंकर समोर रांगा लागतील. पाण्यासाठी माऱ्यामाऱ्या होतील. काहींचा जीव हि जाईल. एप्रिल मध्ये हि परिस्थिती आहे तर मे जून मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना करवत नाही. असे चालणार नाही, मनात येईल तसे वागणार्या सूर्यदेवाला  जाब विचारायलाच  पाहिजे.  

अरे तू देव आहेस ना? मग माणसासारखे वाटेल तसा का वागतो आहे. जूनचा उन्हाळा एप्रिल मध्ये का? काही तरी दया कर आम्हा दिल्लीकरांवर.  सूर्यदेवाने आकाशातूनच उत्तर दिले, विपक्षी दलान्सारखा काहीचाबाही आरोप लाऊ नको. मी कधीच आपल्या कामात चूक करत नाही.  जेवढी आग ५० वर्ष आधी ओकत होतो, तेवढीच आज हि. मी उत्तर दिले, आत्ताच गुगल केले आहे, गेल्या ५० वर्षांत दिल्लीचे सरासरी तापमान २ डिग्री सेल्सिअसच्या हि वर वाढले आहे.  एवढे जास्त तापमान का?

सूर्यदेवाने मलाच प्रतिप्रश्न केला, आधी तू सांग ५० वर्ष आधी दिल्लीत पाण्याचे तलाव किती होते, तू जिथे राहतो त्या बिंदापूरच्या तलावाचे काय झाले, पाणी आहे का आज त्यात? खरंच दिल्लीत ५00च्या वर तलाव होते आणि ५ लाख जनसंख्या.  मी १९८८ मध्ये जनकपुरीच्या जवळ बिंदापूर येथे राहायला आलो. गावापासून १ किमी दूर मोठा तलाव होता. छोटे से शिवमंदिर, स्त्रियांच्या आंघोळीसाठी एक घाट, भरपूर झाडे असलेले जंगल व तलावच्या दक्षिण दिशेला एक स्मशानघाट. नेहमी पोहणारी बदके, पाण्यावर फिरक्या मारणारे अनेक पक्षी,  तलावात मासे पकडणारे हौशी लोक, हिवाळ्यात येणारे विदेशी पक्षी. हिवाळ्यात तर सकाळी व संध्याकाळी शेकडोंच्या संख्येने आकाशात विहार करणारी विदेशी बदके बघून मन प्रसन्न व्हायचे. मोर तर भरपूर होते कधी-कधी घराच्या अंगणात हि यायचे. २० एक वर्षांपूर्वी विकास आला. मंदिर आणि स्मशानघाट भोवती भिंती बांधल्या. तलावाला हि चौहू बाजूनी बांधून काढले. एक प्राथमिक शाळा, एक वृद्धाश्रम, प्रसूतीगृह, औषधालय आणि उरलेल्या जागी एक छोटासा पार्क. जंगल संपले आणि तलावाचा पाणी पुरवठा हि. वाढत्या जनसंख्येमुळे पाण्याची पातळी हि खाली गेली. आता १५० फुटावर पाणी लागते ते हि खारे. दोन चार वर्षांत तलाव वाळून गेला आणि पक्षी हि अदृश्य झाले. असेच दिल्लीच्या ५०० तलावांच्या बाबतीत झाले.  

मला मौन पाहून, सूर्यदेवाने पुन्हा विचारले, दिल्लीतल्या झाडांचे काय झाले. तुझ्या आंगणातलली झाडे कुठे गेली. घरात समोर आंगण होते, सदाफुलीचे  आणि एक पेरूचे झाड हि होते अलाहाबादी मोठे व गोड पेरू झाडाला लागायचे. पण इतरांनी पूर्ण प्लॉट कवर करून घर वाढवले, मीही तोच कित्ता गिरविला. दोन्ही झाडे शहीद झाली. पूर्ण प्लॉट कवर केला. दिल्लीतल्या ९० टक्के लोकांनी हेच केले. कोठीवाल्यांनी झाडांचा कचरा कारवर  पडतो म्हणून झाडे कापून टाकली.  पूर्वी चांदणी चौक व करोल बाग मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिंपळाची भली मोठी  झाडे होती. दुकानदारांनी दुकाने वाढविली, झाडे अदृश्य झाली. मोठे-मोठे बगीचे  मेट्रोसाठी, रस्त्यांच्या रुंदीकरण व कार पार्किंगसाठी अदृश्य झाले. कुदसिया बाग, यमुना काठावरचे बगीचे, कंपनी बागांचे फक्त अवशेष उरले. अधिकांश छोट्या-छोट्या बगीच्यांचे रूपांतरण कार पार्क मध्ये झाले. अदृश्य झाले मोर,कोकिळा, चिमण्या, फुलपाखरू. उरले फक्त कबूतर आणि कावळे.

मला मौन पाहून सूर्यदेव म्हणाले, तुम्ही झाडे तोडली, हिरवळ नष्ट केली, तेवढ्यावर हि थांबले नाही. लाखो गाड्या व फेक्ट्रीज आकाशात गरमागरम धूर फेकतात.  घरातले एसी ही उष्णता  वाढवितात. आत्ता तूच उत्तर दे, या उन्हाळ्यासाठी मी जवाबदार कि तुम्ही दिल्लीकर जवाबदार आहात. माझ्या जवळ उत्तर नव्हते, मुकाट्याने मान खाली घालून पुन्हा आपल्या कशात परतलो. एसी सुरु केला. एसीने खोली थंड झाली, पण एसी मात्र बाहेर गरम वारे सोडत होता. मनात चिलबिचल सुरु झाली. अशीच उष्णता वाढत राहिली तर  देशांतर्गत पाण्यासाठी युद्ध हि होतील. देशाचे तुकडे -तुकडे होण्याची संभावना नाकारता येणार नाही.  मनात विचारांचे काहूर माजले. शेवटी राहता आले नाही. उठून एसी बंद केला



टीप: दिल्ल्लीचें सरासरी तापमान गेल्या ५० वर्षांत २ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढले आहे.  

Thursday, April 5, 2018

वात्रटिका - म्या कवी जाहलो



आले नाही काही करता
म्हणून म्या कवी जाहलो 
शुद्ध लेखन तपासायला 
इथे परीक्षक नसतो.