Thursday, June 29, 2023

वार्तालाप (14) : रेड्यामुखी वेदवाणी

रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची 
ओवी ज्ञानीयाची.

आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला. आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही. मग या कथे मागचे सत्य काय?  ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्‍या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते. आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते. अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्‍यांचा बाजार भरतो. समर्थांच्या शब्दांत "शास्त्रांचा बाजार भरलाl देवांचा गल्बला जालाl लोक कामनेच्या व्रतालाl झोंबोन पडतीl आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी  करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल. समर्थांच्या शब्दांत  समाज नासून गेला होता. समाजाची स्थिति "अजगर करे ना चाकरी. पंछी करे ना काम. दास मलूका कह गये सबके दाता राम" अशी झाली होती. चमत्काराच्या आशेने प्रजा कर्महीन झाली, आळशी झाली। गरीबी आणि भुकेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते. 

समाजात धर्माच्या बाबतीत माजलेला गोंधळ पाहून संत निवृतींनाथांनी संत ज्ञानेश्वरांना भगवद्गीता मराठी भाषेत प्रगट करण्याची आज्ञा दिली. आता भगवद्गीताच का? हा प्रश्न मनात येणारच. वेद, उपनिषद यांचे सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता माणसाच्या मनातून भय, भ्रम, संशय, निराशा दूर करते. आत्मग्लानि आणि अकर्मण्यतेने ग्रस्त माणसाला  स्वकर्तव्य, स्वधर्माची जाणीव करून देते. माणसाला निष्काम कर्म आणि अखंड पुरुषार्थ करत जगण्याचा मार्ग दाखविते. ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने अशिक्षित आणि निरक्षर जनतेला ही वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध झाले. अनेक संतांनी आणि प्रवचनकारांनी वेदांचे ज्ञान महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात पोहचविले. दुसर्‍या शब्दांत रेडा वेद गायन करू लागला होता. 

आज ही तीच परिस्थिति आहे. हजारो पंथ आणि धर्म आहेत. चमत्कारांच्या गाथा आहेत. या शिवाय सरकार मान्य गेमिंग एप ही आहेत. आयपीएल वर  पैसा लावा, दोन कोटी मिळवा. जिंकणार्‍यांच्या नावांचा उदो-उदो होतो.  कोट्यवधी युवा मेहनत मजूरी सोडून विभिन्न गेमिंग खेळयांत त्यांच्या जवळ असलेला पैसा ही कोट्यधीश बनण्याच्या लालसेने उडवीत आहे. चमत्कार होईल या आशेने कथा पारायण, नवस बोलत आहेत, कधी तरी नशीब उघडेल या आशेने. देशात कोट्यवधी लोकांनी कामधंधे करणे सोडून दिले आहे.(राशन पाणी सरकार फ्री देतेच, मग काम करायची गरज काय).  जेंव्हा माणूस स्वकर्तव्य आणि स्वकर्म विसरून जातो त्याच्या नशिबी उपासमार, गरीबी आणि भूक येणारच. थोडक्यात आज ही भगवद्गीतेचा संदेश पुन्हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र पोहचविण्याची गरज आहे.  
 

Friday, June 9, 2023

यक्षप्रिया आणि आषाढचा पहिला पाऊस


आकाशात विजेचा कडकडाट ऐकून यक्षप्रियेचा आनंद गगनात मावेना. आषाढचा मेघ घेऊन येणार होता तिच्या प्रियकराचा संदेश. ती धावत पळत इमारतीच्या गच्ची वर पोहचली. तिला आकाशात भला मोठा काळाकुट्ट मेघ दिसला. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून तिला वाटले, बहुतेक मला शोधण्यासाठीच या विजा चमकतात आहे. तिला प्रियकराचे बोलणे आठवले, प्रिये तू अंधारात हि विद्युतलते समान सुंदर दिसते. साक्षात रंभाच जणू. दिव्याची काय गरज. प्रियकराची आठवण येताच स्त्री सुलभ लज्जा तिच्या गालावर पसरली. ती अधिकच सुंदर दिसू लागली. काही क्षणात जोरात पाऊस सुरु झाला. ती आज पहिल्यांदाच आषाढच्या पावसात मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. आपला चेहरा जळतो आहे, असे तिला वाटले. ती कसेबसे आपल्या कक्षात आली. दर्पणात बघितले. तेजाबी पाण्याने तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जागो-जागी घाव झाले होते. दर्पणात स्वतचा चेहरा बघून ती किंचाळली. अनेक चित्र-विचित्र विचारांचे वादळ तिच्या मनात उठले. आपला कुरूप चेहरा पाहून प्रियकर पूर्ववत प्रेम करेल का? त्याने तिचा त्याग केला तर? यक्षांच्या राज्यात सुंदर शरीरच  स्त्रीचे आभूषण होते. अखेर तिने कठोर निर्णय घेतला. 

पाऊस थांबला. वातावरण स्वच्छ झाले. पण खालील जमिनीवरचे दृश्य बघून आषाढच्या मेघाने धसकाच घेतला. वृक्ष-लता  तेजाबी पाण्याने जळून काळ्या पडलेल्या होत्या. अनेक पक्षी मृत झालेले दिसले. अरेSरे! माझ्या उदारातले अमृत समान पाणी वातावरणात पसरलेल्या तेजाबी हवेत मिसळून विष समान झाले. अचानक त्याला यक्षप्रियेची आठवण आली, तीही प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली असेल. मेघाने खाली चहूकडे पहिले. एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, बहुतेक यक्षाने वर्णन केलेली हीच ती इमारत. पण ईमारती खाली एवढी भीड का? एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे विद्रूप  झालेला होता. लोक कुजबुज करत होते, हिचा नवरा परदेशी गेलेला आणि हिला पावसात भिजायला हौस. माहित नव्हते का हिला, राज्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच पावसापासून सावधान राहण्याचा अलर्ट दिला होता. एवढ्या टीवी, रेडियो वर घोषणा होतात. ऐकल्या नव्हत्या का हिने. एक म्हणाला सौंदर्य नष्ट झाल्यावर जगणार तरी कशी? दूसरा म्हणाला आपण सर्वच या विषाक्त वातावरणात हळू-हळू रोज मरतो आहे. कुणालाच चिंता नाही. राजाच जवाबदार आहे, हिच्या मृत्यूला. जमलेले लोक सरकार विरोधात घोषणा देऊ लागले.  

आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार? काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे आणि समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला.