Saturday, May 2, 2015

भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात.  वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला  आवडते.   उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग. खायला काय करावे हा ही यक्षप्रश्न मध्यम वर्गीय परीवारांसमोर असतो.   भाजणी  ही पोष्टिक असते आणि तिच्या पासून स्वादिष्ट थालीपीठे ही तैयार करता येतात. वेळ ही कमी लागतो. त्या मुळे केंव्हा ही करता येतात. सकाळच्या नाश्त्याला ही भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे. स्वादिष्ट  थालीपीठे  मुले ही अत्यंत आवडीने खातात.  मला ही थालीपीठ अत्यंत आवडते.  (माझी सौ. नेहमीच म्हणत असते, या वयात ही तुम्ही लहान मुलांसारखे वागतात, केंव्हा अक्कल येणार आहे).  या भाजणीच्या पिठात मुलांना न आवडणाऱ्या भाज्या - दुधी, लाल भोपळा, पालक, बीट  इत्यादी  बारीक किसून किंवा चिरून मिसळता येतात. शिवाय नुसते कांदे -टमाटो बारीक चिरून घातले तरी चालतात.. 

भाजणीत तैयार करताना अनेक धान्यांचा वापर होते, या मुळे आपण केलेली भाजणी कशी होईल या बाबतीत ही अनेकांच्या मनात संशय असतो.     तसे म्हणाल तर भाजणीच्या पीठ तैयार करण्यासाठी घरात जे काही पदार्थ स्वैपाकघरात आहे, ते वापरून भाजणी तैयार करता येते.   आमची सौ. गहू, तांदूळ आणि बाजरी (भरपूर लोह तत्व असल्यामुळे)  सोबत, त्या वेळी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारचे धान्य आणि डाळी करून भाजणी तैयार करते. भाजणी चक्की वर जाऊन दळून आणावी लागते, म्हणून कमीत कमी ३-४ किलो तरी भाजणीचे साहित्य असायला पाहिजे. शिवाय भाजणी, चक्कीवर  जाऊन प्रत्यक्ष समोर दळून घेतली पाहिजे. सौ. ने भाजणी तैयार केली होती, त्यात घातलेले पदार्थ:

मुख्य पदार्थ गहू,  - १किलो, तांदूळ १/२ किलो, बाजरी १/२ किलो.

चण्याची डाळ,  मुगाची  डाळ (साली सकट आणि धुतलेली ), उडदाची डाळ(साली सकट), तुरीची डाळ, मोठ,  मसूर, मक्का  -   प्रत्येकी २ वाटी. पोहे जाड २ वाटी. धने -२ वाटी.  या शिवाय तुमच्या घरी असतील तेवढ्या प्रकारचे कडधान्य भाजणीत वापरता येतात.    सर्व पदार्थ मध्यम गॅस वर   वेगळे वेगळे भाजून घ्या.  प्रत्येक पदार्थाला ४-५ मिनिटे लागतात, घाई करू नका. रात्रीच्या निवांत वेळी हे कार्य केले कि उत्तम. (दरवर्षी असल्या प्रकरचे,  कार्य मलाच करावे लागते).  नंतर चक्की वर पीठ दळून घ्या.  हे पीठ वर्षभर खराब होत नाही. पावसाळ्यात ही टिकते.


शनिवारी संध्याकाळी भाजी बाजारातून सौ. परत आली. भाजीत लाल भोपळा ही होता. घरी पाहुणे म्हणून आलेली १२-१३ वर्षाच्या चिमुरडीने लगेच आपले मत व्यक्त केले, मावशी, मला लाल भोपळा आवडत नाही. आजकालच्या मुलाचं एक चांगल,  आपलली मते व्यक्त करायला ते मुळीच घाबरत नाही. पण त्या चिमुरडीला ठाऊक नव्हते तिची मावशी किती बिलंदर आहे ते.  रविवारी सकाळी सकाळीच चिमुरडीच्या उठण्या आधी सौ. ने लाल भोपळा बारीक किसून भाजणीच्या पिठात  मिसळला, सोबत भरपूर कोथिंबीर , आलं, लसून आणि मिरचीची पेस्ट त्यात घातली, शिवाय जिरे-मिर्याची पूड (स्वादानुसार), थोडा चाट मसाला  व मीठ घालून पीठ व्यवस्थित मळून घेतले.


पाण्याच्या हात लाऊन, हातानी थापून बनविलेले थालीपीठ, तव्यावर टाकून चारी बाजूला थोड तेल सोडून,  मध्यम गॅस  वर खरपूस भाजून घ्या.

कैरी, कोथिंबीर, पुदिनाच्या चटणी  व उन्हाळा असल्या मुळे  दह्याची लस्सी सोबत गरमागरम लाल भोपळ्याचे स्वादिष्ट थालीपीठ चिमुरडीने आनंदाने खाल्ले. अर्थात तिला  २-३ तासांनी  तिच्या मावशीने यात लाल भोपळा घातला होता हे सांगितले, त्या वेळी चिमुरडीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.भाज्यांचे लोणचे


1 comment:

  1. तुमच्या या रेसिपीमधल्या मापाने मी नक्की भाजणी करून पाहेन.

    ReplyDelete