Sunday, June 1, 2014

मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ

   

 शनिवारी  संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून देत का?  शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळ (हिंदीत– आंधी, या पूर्वी कधी न बघितलेली, १५-१६ तास वीज नव्हती, नुकतीच वीज आल्या मुळे सौ. आराम करायला पलंगावर पहडुली होती).  घरात मुरमुरे संपत आले आहे, शिवाय   काल भाजी बाजार ही लागला नव्हता, कोथिंबीर, लिंबू ही घरात नाहीत- सौ.  मी म्हणालो, मग दडपे पोहे कर. पोहे ही संपत आले आहे- सौ. सौ.चा मूड काही ठीक दिसत नाही. मी चिरंजीवाना म्हणालो, तुझ्या आईची तब्येत काही बरी दिसत नाही आहे.  मीच करतो काही तरी. स्वैपाक घरात गेलो. दीड एक वाटी मुरमुरे होते, शिवाय एका पकेट मध्ये दोन-एक वाटी पोहे ही होते.   पोहे आणि मुरमुर्यांची भेळ करायची कल्पना मनात आली.  फ्रीज उघडून बघितले. टमाटर,  खीरा(काकडी)  आणि मिरच्या होत्या, विनेगरची (सिरका)  बाटली ही होती. विचार केल्या लिंबू एवजी विनेगर वापरले तर काय फरक पडेल. तीन  टमाटर,एक काकडी, तीन कांदे, दोन मिरच्या मोठ्या घेतल्या. दोन चेमचे विनेगर एका वाटीत ओतले आणि मिरच्या कापून त्यात टाकल्या.  मिरच्या विनेगर मध्ये काही वेळ ठेवल्याने त्यांचा तिखट पणा थोडा कमी होत. एका वाटीत दोन चमचे तेल घेऊन त्यात २ छोटे चमचे तिखट टाकले. तेलात तिखट टाकल्याने भेल मध्ये मिसळताना तिखट व्यवस्थित रीतीने सर्वत्र मिसळता येते, शिवाय तिखटाचा जळजळ पणा ही थोडा कमी होतो. कांदे, टमाटर आणि खीरा, जमेल तेवढे छोटे चिरण्याचा प्रयत्न केला. गॅस वर कढई ठेवली. आधी मुरमुरे आणि नंतर पोहे त्यात थोड्या वेळ परतले. (भेळ किंवा दडपे पोहे बनविण्या आधी मुरमुरे आणि पोहे ५-७ मिनिटे कढईत परतून घेते. असे केल्याने पोहे/ मुरमुरे कुरकुरीत होतात. खाताना विशेषकर लहान मुलांना मजा येते. ओली चटणी किंवा चिंचेचे पाणी मिसळले तरी भेळ मिळमिळीत लागत नाही. शिवाय मुंबईत दमट वातावरण असल्यामुळे मुरमुरे किंवा पोहे पुष्कळदा आधीच नरम असतात, असे मुरमुरे वापरल्यामुळे भेळ जास्तीस मिळमिळीत होते, मुबईकरच्या घरी हा अनुभव आलेला आहे). थोडी बुंदी (रायात्यासाठी वापरतात ती)  घरात होती अर्धा वाटी ती ही घेतली. आता एक परात घेतली. त्यात पोहे, मुरमुरे, बुंदी, आलू भुजिया मिसळी. नंतर चिरलेले कांदे, काकडी, टमाटर मिसळले. शेवटी विनेगर सहित मिरच्या मिसळून, अंदाजे मीठ ही मिसळले. सर्वात शेवटी  तिखट तेल व्यवस्थित हाताने मिसळले. आणि त्वरित साबणाने हात धुतले. अश्या रीतीने झणझणीत पोहे आणि मुरमुर्यांची भेळ तैयार केली. भेळ खाल्यावर एक कडक चहा  सौ. तर्फे अस्मादिकास मिळाला-उपकार केले [अर्थात ती हे काही वाचणार नाही याची खात्री, नाहीतर चहाला ही मुकावे लागेल). भेळ चांगली झाल्याची पावती होती. शिवाय सुट्टीच्या दिवशी असले प्रकार तुम्हीच करत जा, तेवढाच  मला आराम मिळेल-सौ. आता काय बोलणार...No comments:

Post a Comment