Showing posts with label कथा /गोष्ट. Show all posts
Showing posts with label कथा /गोष्ट. Show all posts

Wednesday, July 1, 2026

वडाचे झाड आणि चिमणा



आयुष्यभर
वडाच्या झाडाने हजारो पक्ष्यांना आसरा दिला होता. त्याच्या फांद्यांवर कितीतरी पिढ्यांनी घरटी बांधली, प्रेम फुलवलं, पिल्लांना उडायला शिकवलं. प्रत्येक चिवचिवाटात झाडाचं हृदय धडधडत होतं.

पण आता वड थकला होता. त्याचा बुंधा वाळवींनी पोखरला होता. पाने गळून पडली होती. उरल्या होत्या फक्त कोरड्या, थकलेल्या फांद्या—जणू आठवणींचे अवशेष.

सर्व पक्षी एकेक करून निघून गेले. आकाशात नव्या आश्रयाच्या शोधात. पण एक चिमणा मात्र अजूनही वडाच्या कोटरात रहात होता. एकटा, पण आठवणींनी भरलेला.
 
एक संथ संध्याकाळी वडाने थरथरत्या स्वरात चिमण्याला सांगितले,

"चिमणा भाऊ, तूही निघून जा. माझा आता काही भरवसा नाही. पावसाळा जवळ आलाय. आभाळात विजा चमकत आहेत. मला वाटत नाही की येणाऱ्या वादळासमोर मी तग धरू शकेन."

चिमणा थोडा वेळ गप्प राहिला. मग हळुवारपणे म्हणाला,

"दादा, याच झाडावर मला माझी चिवताई भेटली होती. तिच्या नजरेतून प्रेमाचा स्पर्श मला जाणवला. आम्ही दोघांनी इथेच घरटे बांधलं. तूच आम्हाला दाणा-पाणी आणि आसरा दिला. आमची पिल्लं तुझ्याच फांद्यांवर खेळत मोठी झाली. आणि एक दिवस... माझी चिवताई याच घरट्यात प्राण सोडून गेली. तिच्या आठवणी इथेच दडल्या आहेत. कसा सोडून जाऊ मी तुला?"

त्या रात्री आकाश फाटलं. वादळ कोसळलं. विजांचा कडकडाट, मूसळधार पाऊस. वडाचं झाड उन्मळून पडलं. त्याच क्षणी चिमणाही खाली पडला.

पण दूर, आकाशाच्या एका शांत कोपऱ्यात, चिवताई त्याची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यांत पुन्हा एकदा प्रेमाची ओल होती. ती म्हणाली,

"किती वाट पाहिली तुझी..."

चिमणा हसला, डोळे मिटले. आणि काही क्षणात दोघं पुन्हा एकत्र आकाशात विहार करू लागले—कधीच न विलग होण्यासाठी.

 
 

Monday, March 30, 2026

मोगर्‍या फुलांची वेणी (संपादित)


तब्बल ३५ वर्षांनी ते दोघं पुन्हा भेटले. केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटल्या होत्या, पण डोळ्यांतली ओळख अजूनही ताजी होती. त्याला आठवली ती शेवटची भेट—नेहरू पार्क.  केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती.  त्याने वेणी हुंगण्याचे नाटक करत तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं होतं. “दूर हो! काय समजलं मला? अजून लग्न नाही झालं आपलं,” ती रागावून म्हणाली. “मग केव्हा विचारणार तुझ्या वडीलांना? मला नोकरी लागून वर्ष झालंय.” “अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्‍या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”. ‘मग काय आपण असेच राहायचे’? 

मी सरकारी नौकरी साठी प्रयत्न करते आहे. एकदा मला नौकरी लागली की विचारेल की बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”. ‘मी कंजूष?’ “मग काय, आपल्या प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्‍याला काय म्हणायचे? एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या आई-वडीलांना विचारले का?” ‘दूध देणार्‍या गायीला, कोण नकार देणार’. तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला. ‘आई! ग! किती जोरात मारते’. “आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”. ‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’ “हो, पण लाटण्यानी” ....

पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.

‘कशी आहे’ ती म्हणाली, “राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.

 काय करतात तुझे मिस्टर?” “ ते हयात नाहीत. मोठ्या हुद्द्यावर होते, दारू आणि जुगाराच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते  सैतानासारखे वागायचे. काही वर्षांतच वर गेले. मुलगाही बापाच्या वळणावर गेला. दारूने त्याचे ही प्राण  घेतले. आता बहुतेक वृद्धाश्रमात जावं लागेल.  नशीब एकेकाचे. तुझे काय”.

तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर एकदा बायको सोबत ओडीयन मध्ये बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला , “मैने प्यार किया” तो उगाच हसला. 

“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”. त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्‍या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्‍या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले ‘वेणी घ्यायची का’? “हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी.... त्याने दोन वेण्या घेतल्या. वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ काहीच बोलले नाही. तेवढ्यात तिची बस आली आणि ती निघून गेली... 

काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज... त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्तरंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्‍याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल, तिखट-मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर? त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्‍या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली....

  

Friday, March 20, 2026

स्वप्नील शब्दांची सोनेरी वही


आयुष्याच्या सायंकाळी मला माझ्या आईची आठवण आली. आठवला गावातील जुना वाडा, आठवले पहाटे-पहाटे गुलाब फुलांवर पडणारे मोती सारखे दव बिन्दु. प्राजक्त फुलांचा सडा. मंदिराचा घंटा नाद. खळखळ वाहणारी नदी, गुरांच्या मागे धावणे, अस्ताचलच्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन कुरणे. त्याच स्वप्नील काळात शब्दांना पंख फुटले होते. स्वप्नील शब्दांना रेखाटण्यासाठी आईने आणून दिली होती सोनेरी वही. सारे-सारे आठवले. 

आयुष्यभर मायेच्या मोहात अडकून, पोटासाठी मी निरर्थक धावपळ करत राहिलो. दररोज मी कागदांवर शब्दांचा खोटा हिशोब लिहीत होतो. माझी सृजनशीलता आभासी होती. कवी सम्मेलनांमध्ये निरर्थक शब्दांचा खेळ मांडून भरपूर मानधन घेत होतो. मी स्वतःला ब्रह्मा समजू लागलो होतो. पांडित्याच्या आव आणून दुसर्यांना हीन लेखत होतो. पण फक्त मलाच माहीत होते,  माझे शब्द अर्थहीन, गंध हीन आणि भावना हीन आहेत.  माझी सोनेरी शब्दांची वही  हरवली होती. माझं अस्तित्व, हरवलेले स्वप्न होते. 

पुन्हा ऐकू येईल का मला आईची मधुर अंगाई?  तिच्या कुशीत मी पुन्हा शिरू शकेन का? माझी सोनेरी स्वप्नांची हरवलेली वही ती पुन्हा शोधून देईल का? अनेक प्रश्नांचा गुंता मला चैन पडू देत नव्हता. मी आईचा पुकारा गेला.  तेवढ्यात आईचा स्वर्गीय आवाज कानात गुंजला "बाळ, तुझ्या हृदयाच्या कपाटातच बंद आहे ती सोनेरी वही. फक्त मायेची धूळ त्यावर जमलेली आहे". 

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. "कविवर्य येत्या रविवारी हास्य कवि सम्मेलन ठेवले आहे, आपल्यासाठी मोठे मानधन ही निश्चित केले आहे. मन दोलायमान झाले. अखेर मला उत्तर सापडले. "मी येणार नाही, म्हणतात मोबाइल बंद केला". मला माझी सोनेरी वही सापडली होती. 


Monday, March 9, 2026

छोटू : दंग्यात हरवलेलं बालपण

 


माझं वय १२-१३ वर्षांचं असावं. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पायी निघायचो. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग होता. शाळेत पोहोचायला पाऊण तास लागायचा. रोज सकाळ-दुपारी जवळपास ३-३ किलोमीटर पायी चालल्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजायचेच.

मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैशांत तो जोडे आणि चप्पल दुरुस्त करून द्यायचा. छोटू हे त्याच्या मुलाचं नाव. त्याचं वयही आमच्याच एवढं होतं. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी, म्हणजे ७-८ च्या दरम्यान, तो आपल्या वडिलांच्या कामात मदत करायचा. चप्पल आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे व्हायचेच. आमच्या दृष्टीने ‘दंगा’ म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूटमार. असाच एक दंगा सदर बाजार येथे झाला. त्या दंग्यात कपड्यांची अनेक दुकाने लुटली गेली. ‘बहती गंगेत’ अनेक गरिबांनी आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यांत दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यांत साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याच्या १५-२० दिवसांनंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला होता. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला—या वेळी हा शाळा सोडून इथे का बसला आहे? कदाचित त्याच्या वडिलांची तब्येत खराब असेल. जोडा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होता. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारलं, “अब्बू की तबियत खराब है क्या?” छोटू म्हणाला, “स्कूल छोड़ दिया है। अब दुकान में ही बैठूंगा।” मी विचारलं, “का?” तो निर्विकारपणे म्हणाला, “अब्बू जेल में है।” “क्यों???”

तो म्हणाला, “उस दिन तड़के अम्मी ने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही हैं। पड़ोस का नानके दो-चार कपड़े के थान उठा के लाया है। मोहल्ले के बाकी मर्द भी वहीं गए हैं और तुम हो कि सो रहे हो।”

अब्बू उठला. मनात विचार आला—हे योग्य नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोहल्लाच—हिंदू असो वा मुसलमान—दुकाने लुटायला निघाला होता. अब्बूही त्या गर्दीचा भाग बनला. सदरमध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बूही त्या दुकानात गेला. “लालच बुरी बला होती है” ही म्हण उगाचच नाही. शरीराला पेलवत नव्हतं तरीही ३-४ कपड्यांचे थान डोक्यावर लादून अब्बू बाहेर पडला.

अचानक आवाज आला- “पुलिस! पुलिस!” अब्बू घाबरला. त्याचा तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच, पण पोलिसांनीही त्याला रंगे हाथ पकडलं.

अशा वेळी काय म्हणावं हे कळण्यासारखं वय नव्हतं, तरीही मी हिम्मत करून विचारलं, “कोई वकील किया है क्या?” “हाँ, एक वकील किया है, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत हैं। काही वर्ष तरी अब्बूला जेलमध्ये काढावी लागतीलच.”

छोटू पुढे म्हणाला, “उस दिन अब्बू से गलती हो गई। किस्मत खराब थी, और क्या।” खरंच! किस्मतची मार छोटूवर पडली होती. त्याचं शिक्षण सुटलं. लहान वयातच घराचा संपूर्ण गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.

त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार घेऊन आली होती.




Friday, February 13, 2026

गोटू : क्रिकेटच चेंडू आणि बालपण

 

तेंव्हा माझं वय सुमारे १२ वर्षांचं असेल. अर्थात, थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो होतो. जुन्या दिल्लीत आमचं खेळायचं ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुनेपर्यंत पसरलेले विस्तीर्ण बाग.

मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं मैदान होतं. मैदानाचा एक भाग स्टीफन कॉलेजचा होता, म्हणून त्या मैदानाला लोक ‘स्टीफन ग्राउंड’ म्हणायचे. सुट्टीच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम्स तिथे खेळत असत. एवढ्या गर्दीत कोणत्या क्षणी डोक्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पनाही करता येत नसे.

आम्ही ५-६ मराठी मुले, काही मोहल्ल्यातली आणि दोन-चार मुस्लिम मुले, अशी आमची टीम असायची. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैसे गोळा करून २-३ रुपये जमवून कॉर्कचा चेंडू विकत घ्यायचो. त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १०-१४ रुपयांना मिळत असे.

श्रीमंत मुलं पांढऱ्या शुभ्र कपड्यांत, चांगल्या दर्जाच्या बॅट्ससह आणि खरी क्रिकेट बॉल घेऊन खेळायची. त्यांना पाहून आम्हाला इर्षा वाटणं साहजिकच होतं. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल, असं वाटत नव्हतं.

एक दिवस मैदानात गोटू भेटला. माझ्याच वयाचा असेल. त्याच्याकडे २-३ क्रिकेटचे चेंडू होते. त्याच्या जवळ असलेल्या क्रिकेट बॉल्सची  क्वालिटी पाहून आम्हाला राहवलं नाही. सहज विचारलं, “कितीला देतो?”

तो म्हणाला, “१ रुपयापासून ५ रुपयांपर्यंतच्या बॉल्स आहेत. घ्यायच्या  असतील तर सांग.” माझ्या मित्राला शंका आली. त्याने विचारलं, “इतक्या स्वस्त बॉल्स कुठून आणतोस?”

गोटू ऐटीत म्हणाला, “DDCAमध्ये ओळख आहे. मॅच संपल्यावर जुने बॉल्स ओळखीच्या लोकांना स्वस्तात मिळतात. काही तर एक-दोन ओव्हरच वापरलेले असतात.” तो डझनच्या भावाने बॉल्स घेतो आणि मग ३-४ रुपयांना विकतो. थोडे जुने असतील तर १-२ रुपयांना. आम्हीही कधी १ रुपया, कधी दीड, तर कधी अगदी नवा कोरा बॉल ३ रुपयांना त्याच्याकडून विकत घेऊ लागलो.

गोटू क्रिकेटही चांगला खेळायचा. कधी-कधी सकाळी आमच्यासोबत खेळत असे. २-३ दिवसांनी कळलं की ‘गोटू’ हे त्याचं टोपण नाव आहे. खरं नाव असलम. तो बल्लीमारान भागात राहायचा.

हिवाळी सुट्टी लागली. गोटूने वादा करूनही बॉल आणून दिला नाही. नंतर कळलं की आमच्यासाठी ठेवलेला बॉल त्याने दुसऱ्या टीमला २ रुपयांना विकला होता. माझ्या मित्राने त्याला झापलं. अखेर त्याने सांगितलं की तो सकाळी ११ वाजता फिरोजशाह कोटला येथे जाणार आहे. बॉल मिळाले तर उद्या आणून देईल.

आमचा विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की आपणही तिथे जाऊन पाहू, कुणाकडून तो बॉल घेतो. एकदा कळलं की आपणही थेट थोकात बॉल विकत घेऊ शकतो. आणि विकून पैसे कमवू शकतो.

सकाळी ११च्या सुमारास आम्ही पायी दिल्लीगेटवर पोहोचलो. त्या काळात फिरोजशाह कोटला स्टेडियम आजसारखं मोठं नव्हतं. एक रस्ता दिल्लीगेटहून राजघाटकडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत, मागे दरियागंज, समोर बाग. दुसऱ्या बाजूला फुटबॉल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ स्टेडियमकडे जाते.

गोटू त्या गल्लीच्या टोकावर बसलेला होता. मैदानात मॅच सुरू होती. आम्हाला पाहताच तो म्हणाला, “धंद्याचा राज  जाणायला आला  का? विश्वास नाही माझ्यावर?”

मी म्हणालो, “विश्वास असता तर इथे आलो नसतो. आम्हाला फक्त बॉल पाहिजे.” तो म्हणाला, “सध्या मॅच सुरू आहे. थोडा वेळ इथे उन्हात बसावं लागेल.”

मी म्हणालो, “इतक्या दूरून मॅच पाहण्यापेक्षा झाडाखाली हिरवळीवर बसू.”तो हसला आणि म्हणाला, “अब आ ही गये हो, तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.”

थोड्याच वेळात फलंदाजाने एक जोरदार फटका मारला. चेंडू आमच्या दिशेने उसळत रस्त्यावर आला. गोटू जणू याच क्षणाची वाट पाहत होता. तो धावत गेला, बॉल उचलला आणि ओरडला, “भागो, भागो!”

आम्ही काही समजण्याच्या आत तो रस्ता पार करून पळत होता. आम्हीही त्याच्या मागोमाग धूम ठोकली. भिंतीसमोरच्या बागेत बरीच मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांची पर्वा न करता आम्ही भिंतीतल्या एका भेगेतून आत शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.

गोटू हसत म्हणाला, “क्यों, मजा आया ना? अबे बेवकूफों की तरह बैठे क्यों रहे. थोडी अजूनच वेळ झाली असती तर पकडले गेलो असतो. खूप मार पडतो. कधी-कधी पोलिसांकडेही सोपवतात.”

मी विचारलं, “इतका धोका पत्करून तू बॉल चोरून विकतोस. मिळालेल्या पैशाचं काय करतोस?” काही क्षण तो माझ्याकडे पाहत राहिला. डोळे पाणावले. म्हणाला, “घरात माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ आणि एक बहिण आहे. दोन वर्षांपूर्वी आई गेली. वडिलांनी दुसरी लग्न केले. संध्याकाळी वडील भाजीची रेडी लावतात. मी त्यांना मदत करतो. पण ते एक छदामही देत नाहीत. सावत्र आई भावंडांना नीट खायला देत नाही. वडिलांना काही सांगितलं तर ओरडतात, कधी हात उगारतात.”

“या जान-जोखिममध्ये टाकून मिळवलेल्या पैशांनी मी भावंडांना खायला आणतो. आईला न कळता.” पुढे काय बोलावं, हे त्या वयात मला कळलं नाही. मुकाट्याने घरी निघालो. जाताना त्याला वचन दिलं की आजची घटना कुणालाही सांगणार नाही. त्या हिवाळी सुट्टीत आम्ही वचन पाळलं. पुढच्या उन्हाळी सुट्टीत मात्र तो मोरीगेटच्या मैदानात दिसला नाही.

या वर्षी आयपीएलचा सामना पाहताना, कुणास ठाऊक, तब्बल ४२ वर्षांनंतर त्याची आठवण आली. काय करत असेल तो?

Tuesday, February 3, 2026

शोध अंतर्मनातील प्रेमाचं

 

खरं प्रेम शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला. संध्याकाळच्या कुंद प्रकाशात-पायाखाली वाळलेली पाने चुरडत, तो चालत होता. त्याला अनुभवायचा होता प्रेमाचा खरा स्पर्श- जो शब्दांपलीकडचा होता. पण प्रेमाच्या वर्तुळाचे दुसरे टोक त्याला कधीच सापडलं नाही. तो आयुष्यभर कोरडाच राहिला… आणि खरं तर, कोणालाच सापडले आहे का?

हे जग म्हणजे  मोह, माया आणि वासनांचे भोवरे. आपण या भोवर्‍यांतच  गटांगळ्या खात राहतो. प्रेमाच्या गूढ, अथांग महासागरचा स्पर्श आपल्याला होतच नाही. तो अनुभवायचा असेल तर, गरज आहे अहंकाराने बंद झालेल्या हृदयाच्या कपाटांना उघडण्याची. जेव्हा हे कपाट उघडतील, तेव्हा प्रेमाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसेल.

त्या प्रकाशात कळेल, जल, थल, नभ- संपूर्ण चराचर सृष्टीत फक्त एकच तत्त्व व्यापलेलं आहे. ते म्हणजे प्रेम.  प्रेम दृश्य ही आहे आणि अदृश्य ही आहे. ह्या प्रेमामुळे जगाचे अस्तित्व टिकून आहे.ते अनुभवायचं असेल, तर स्वतःच्या आत डोकवावं लागत, बाहेर ते कधीच मिळणार नाही. 

 

 

Wednesday, January 14, 2026

राजकुमारी आणि दर्पण


एक राजकुमारी होती. तिचे सौंदर्य म्हणजे तिच्या अस्तित्वाचा श्वास. तिचे दात मोती सारखे नाजुक मलिन होणारे नव्हते. तिचे दात होते हिर्‍यासारखे पांढरे शुभ्र, टणक, होते. जेंव्हा ती हसायची तेंव्हा असे वाटायचे जणू निसर्गाने पांढर्‍या शुभ्र फुलांची बरसात केली आहे.   

राजकुमारीला नटण्या-मुरडण्याची विलक्षण हौस होती. तिचा वार्डरोब म्हणजे एक जागतिक संग्रहालय होता. त्यात पॅरिसच्या रॅम्पवर चालणारे कपडे, राजस्थानच्या रंगीबेरंगी लहंग्यांपासून ते महाराष्ट्राच्या नववारी साड्यांपर्यंत विविध प्रकारचे वस्त्र होते. तिच्या प्रत्येक वस्त्रात सौंदर्याची एक नवी कथा विणलेली होती. महालात एक दर्पण होता— साधा नव्हे, बोलणारा. तो तिचा विश्वासू सखा होता. दर सकाळी ती नटून-थटून त्याच्यासमोर उभी राहायची आणि विचारायची,

“सांग दर्पणा, कशी मी दिसते?”

दर्पण उत्तर द्यायचा,

“सुंदर... सुंदर... सुंदर...”

ती हसायची, सेल्फी काढायची, आणि सोशल मीडियावर टाकायची. पण एक दिवस काहीतरी वेगळं घडलं. ती नववारी साडी नेसून दर्पणासमोर उभी राहिली. तिच्या मनात एक विचार चमकून गेला—

“आज सेल्फी दर्पणातल्या माझ्या प्रतिमेसोबत घेते.”

ती दर्पणातळ्या प्रतिमेसोबत  सेल्फी घेतते आणि विचारते,

“सांग दर्पणा, मी जास्त सुंदर दिसते की माझी प्रतिमा?”

दर्पण गोंधळला. तो राजकारणी नव्हता, जे डिप्लोमॅटिक उत्तर देतात. त्याला खरे बोलण्याची सवय होती. तो म्हणाला,

“राजकुमारी, तुझी प्रतिमा तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते.”

राजकुमारीचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला. तिच्या सौंदर्याला तिच्याच प्रतिमेने आव्हान दिले होते.  तिला ते सहन होणे शक्यच नव्हते. 

दुसऱ्या दिवशी सफाईवाल्याला कचर्‍याच्या ढिगात काही काचेचे तुकडे सापडले...

 

Friday, January 2, 2026

"विरही स्पर्श"

(काल्पनिक कथा)

त्या दिवशी शनिवार होता, कनॉट प्लेस इथल्या सरकारी कार्यालयातून  दुपारी अडीच वाजता काम पूर्ण करून बाहेर पडलो. मेट्रो स्टेशनकडे  जाताना, मला ती माझ्याच दिशेने चालत येताना दिसली. तिने ही मला पाहिले, 

"विवेक", ती धावतच माझ्या जवळ आली. जणू तिला मला मिठी मारायची होती. पण जवळ येताच ती थबकली. आज ही ती तशीच दिसत होती. सड-पातळ, पंजाबी उजळ रंग, फक्त केस थोडे पांढरे झालेले होते. तिच्या चेहर्‍यावर आनंद आणि भीतीचे मिश्र भाव  दिसत होते. 

मी "तुझ्यात काहीच बदल नाही. अगदी तशीच दिसते आहे जशी 35 वर्षांपूर्वी दिसत होती". ती हसत म्हणाली तू ही अगदी तसाच आहे, फक्त केस पांढरे झाले आहे. 

मी हसत म्हणालो "वय झाले आहे आता आपले. कॉफी हाऊस चलते का? आपल्याला गप्पा ही मारता येतील".  न कळत मी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि आम्ही कॉफी हाऊसच्या दिशेने चालू लागलो. 

1981 बहुतेक ऑगस्ट महिना असेल. मला राजेंद्र प्लेस इथल्या एका व्यापारीक संघटनेत तात्पुरती नौकरी मिळाली होती. तीही याच परिसरात एका दुसर्‍या कंपनीत काम करत होती. माझ्याच वयाची होती. तिळक नगर येथे राहत होती. चार्टर बस मध्ये तिची ओळख झाली. ती बी.कॉमच्या  फायनल मध्ये होती. तिला अकाऊंट मध्ये समस्या होती. माझे अकाऊंट उत्तम होते. रविवारी आणि वेळ मिळाल्यास अकाऊंटच्या अभ्यासासाठी आमच्या घरी येऊ लागली. असेच एक दिवस अभ्यास झाल्यावर, मी तिला सोडायला जेल रोड जात असताना, आमच्या भागातील काही टवाळखोर मुले माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत गेले. मला चुकचुकल्या सारखे वाटले. मला जाणवले, माझ्या हात तिच्या खांद्यावर ठेवलेला आहे. मी हळूच हात हटविला आणि तिला म्हणालो, "चुकून हात खांद्यावर ठेवला, सॉरी". तिने माझा हात पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवला आणि माझ्याकडे पहात हसत म्हणाली, मूर्ख आहे तू, तुला काहीच कळत नाही. ती माझ्या प्रेमात पडली होती. त्याकाळी शनिवारी आफिसांमध्ये दुपारी एक वाजता सुट्टी होत होती. सुट्टी झाल्यावर तिच्या सोबत राजेंद्र प्लेसच्या रचना सिनेमा हॉल मध्ये दोन-तीन सिनेमे बघितले असतील. बॉलीवूड हीरो-हिरोईन आम्ही  सारखे बुद्ध गार्डन मध्ये ही फिरलो. 

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. काही दिवसांपासून ती भेटली नव्हती. एक दिवस तिची ऑफिस मधली मैत्रीण लंच टाइमला तिचा निरोप घेऊन आली. ती म्हणाली, विवेक तिला भेटण्याचा प्रयत्न करू नको, आमच्या ऑफिस मध्ये ही येऊ नको. मी विचारले, काय झाले. ती म्हणाली, काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी, तिच्या मोठ्या भावाच्या मित्रासोबत तिला लग्ना बाबत विचारले. तिने नकार देत म्हंटले, त्याच्या दारुड्या मित्राशी मी लग्न करेल असा विचार तुमच्या मनात आला तरी कसा. तिचा भाऊ भडकला, वडिलांना म्हणाला, "मी म्हणत होतो तिला नौकरी करू देऊ नका. बाहेर  "नैनमटका" करत असेल". भावाचे म्हणणे ऐकून, तिला ही राग आला, हो करते, काय करणार तू. तो तुझ्या सारखा दारुडा नाही. निर्व्यसनी आहे आणि चांगल्या ब्राह्मण परिवाराचा आहे. त्या काळात दिल्लीत खालिस्तानी वारे वाहत होते. तिच्या बापाचा पारा चढला. कमरेवरचा बेल्ट काढून तिला मारणे सुरू केले. तिच्या बापाला तिच्या कडून तुझे नाव वदवून घ्यायचे होते. पण ती मार खात राहिली पण तिने तोंडातून तुझे नाव घेतले नाही. शेवटी तिच्या आईने कसे-बसे तिला वाचविले. तिच्या भावाने तर तुला मारण्याचा प्रण केला आहे. मी विचारले, तुला हे सर्व कुणी संगितले. त्या दुर्दैवी घटनेच्या दोन किंवा तीन दिवसांनी तिचा भाऊ ऑफिसला आला आणि म्हणाला तिचा अपघात झाला आहे. तिला भरपूर मार लागला आहे. बहुतेक ती आता ऑफिसला येऊ शकणार नाही. नंतर माझ्या जवळ येऊन म्हणाला, "तिचा एक बॉयफ्रेंड आहे, तिला त्याला भेटायचे आहे. मला तिचा निरोप त्याला द्यायचा आहे". त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून माझी सहावी इंद्रिय जागी झाली. मी त्याला म्हणाले, माझी तिची मैत्री फक्त ऑफिसची आहे. बाहेर ती काय करते मला माहीत नाही. तो पुटपुटला, नका सांगू कुठे जाईल तो. आमच्या मॅनेजरला ही तिच्या सोबत काही वाईट घडले आहे, याची शंका आली. दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळी मॅनेजरसोबत मी तिच्या घरी गेले. घरी फक्त तिची आई होती. तिची आई आमच्यासाठी चहा ठेवला स्वैपाक घरात गेली. तेंव्हा ती हळूच मला म्हणाली, "विवेकला सांग सध्या काही महीने मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. माझा भाऊ कॅनडा जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तो गेला की मी  स्वत:हून विवेकला  भेटेल". 

नोव्हेंबर महिन्यात मला सरकारी नौकरी लागली. घरची आर्थिक परिस्थिति थोडी बदलली. जानेवरी 83 मध्ये आम्ही हरिनगर येथील एलआयजी फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो. एक दिवस मी तिच्या ऑफिस मध्ये गेलो. तिची मैत्रीण म्हणाली "ती काही पुन्हा ऑफिसला आली नाही. काही दिवसांपूर्वी मी, तिच्या घरी गेली होती. तिचे घर बंद होते. मला एवढेच कळले तिच्या वडिलांनी मुलाला कॅनडा पाठविण्यासाठी घर विकले आणि उरलेल्या पैश्यांनी एक फ्लॅट विकत घेतला आहे". 

मी निस्तब्ध झालो. एवढ्या मोठ्या दिल्लीत मी  तिला शोधणार कुठे? माझी प्रेमाची कथा इथेच अर्धवट संपली होती. 

कॉफी पिताना तिने मला विचारले, विवेक तुझा संसार कसा काय सुरू आहे. मी म्हणालो, तुझा काही पत्ताच लागला नाही. पंचविसी उलटताच आईने पसंद केलेल्या मुलीशी लग्न केले. दोन अपत्य आहे.  तुझे काय. ती म्हणाली. सहा महिन्यांनी भाऊ कॅनडाला गेला. त्याच आठवड्यात आई-बाबांचा अपघात झाला. त्यांच्या स्कूटरला एका ट्रक ने धडक दिली होती. वडील नहमीसाठी अंथरूण पकडून बसले. आई ही वर्षभर अंथरुणावर होती. माझा पूर्ण दिवस त्यांच्या सेवेत निघून जायचा. स्वत:चा विचार करण्याचा वेळ ही नव्हता. वडिलांची दुकान विकली. लाख रुपये फिक्स मध्ये टाकले. त्या व्याजवर आणि भाऊ पैसे पाठवायचा त्यातच कसाबसा गुजारा होऊ लागला. वर्षभरानंतर आई वाकरच्या मदतीने चालू लागली होती. एक दिवस वेळ काढून तुझ्या घरी गेली. पण तुम्ही तिथून शिफ्ट झाला होता. माझी ऑफिसची मैत्रीण ही नौकरी सोडून गेली होती. तुझा पत्ता कुणापाशी नव्हता. तू कुठे आहे, कळण्याचा मार्ग नव्हता. भावाने कॅनडात लग्न केले आणि पैसे पाठविणे बंद केले. आई-वडिलांच्या उपचारात  बॅंकेतली  जमा बचत ही कमी होऊ लागली होती. मी घरी ट्यूशन घेणे सुरू केले आणि सरकारी नौकरीसाठी जोमाने तैयारी सुरू केली. 1986 अखेर मला सरकारी नौकरी मिळाली. पुन्हा तुझी आठवण आली. एक दिवस तुझी माहिती मिळाली. तुझे लग्न झाले आहे, कळले. मी हताश आणि निराश झाली. बहुतेक माझ्या भाग्यात आई वडिलांची सेवा होती, म्हणून नियतीने आपल्या दोघांना दूर केले असावे. "आता कसे आहेत दोघे", मी विचारले. ती म्हणाली, वडील पुढे चार-पाच वर्षानी गेले. माझे आजोबा पाकिस्तानातून एकटेच जीवंत आले होते. बाबा ही एकुलते एक होते. एक भाऊ होता, तो ही अंतिम संस्कारासाठी आला नाही. मीच वडिलांचा अंतिम संस्कार केला. आई ने मला अनेकदा लग्नाबाबत विचारले. पण अपंग आईला सोडून मी कुठे जाणार. अखेर गेल्या वर्षी ती ही वर गेली.   

काही क्षण थांबून मी तिला विचारले, तुझा पत्ता आणि फोन नंबर देते का? काही गरज पडली तर... 

तिने माझा उजवा हात तिच्या हातात घेतला. तिच्या स्पर्शातील दाहकता मला जाणवली. ती म्हणाली, विवेक, मी आयुष्यात एकाच पुरुषाला स्पर्श केला आहे. त्याला मिठी मारली आहे. जेंव्हा रात्री मी बैचेन होते, जीव कासावीस होतो, तुझा स्पर्श आठवून मनाला सात्वना देते. मला जगण्यासाठी तो प्रेमाचा एक स्पर्श पुरेसा आहे. माझा पत्ता मी देणार नाही. फोन नंबर ही मागू नको. मी दिसली तर दुसर्‍या वाटेने निघून जा. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या भावनांचा बंध फुटला तर त्या ज्वालेत आपण दोघे भस्म होऊन जाऊ. माझ्या सोबत तुझा संसार ही उध्वस्त होईल. बोलताना तिचा वाढता श्वासोश्वास आणि आवाजातील कंप मला जाणवत होता. बोलता-बोलता ती उठली, तिने पर्स हातात घेतली आणि झपाझप पाऊले टाकत विरुद्ध दिशेने बाहेर निघून गेली. एकदाही तिने मागे वळून पहिले नाही. मी अवाक होऊन तिला जाताना पहात राहिलो. स्तब्ध आणि जडवत. माझ्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. तिच्या स्पर्शचा दाह अजूनही जाणवत होता.  ती आतल्या आत जळत होती. तरीही तिने स्वतला सावरले आणि माझा स्पर्श घेऊन पुन्हा माझ्या आयुष्यातून निघून गेली. त्यानंतर मला कित्येक रात्र झोप आली नाही. मनात अनेक प्रश्न उठत होते. मी तिला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? लग्न करायची घाई का केली? तिच्या शब्दांवर विश्वास ठेऊन तिची वाट पाहू शकत नव्हतो का? पण गेलेल्या काळातील प्रश्नांचे उत्तरे कधीच मिळत नाही. शेवटी आपण नियतीचे गुलामच. 

तिला माझी माहिती मिळाली होती तरी एवढे वर्ष तिने माझ्याशी बोलण्याचा किंवा मला भेटण्याचा विचार ही केला नाही. तिला माझ्या सुखी संसाराला तिची नजर लागू द्यायची नव्हती. ती ही गॅजेटड ऑफिसर झालेली होती. तिचा पत्ता आणि फोन नंबर मिळविणे काही कठीण नव्हते. पण तिच्या शब्दांच्या बाहेर जाण्याचा विचार मी केला नाही. आता माझा स्पर्श हृदयात जपून ती उरलेले आयुष्य जगणार होती. तिने माझ्यावर खरे प्रेम केले होते. पण मी.... या प्रश्नाचे उत्तर अनेकदा शोधून ही मला मिळाले नाही. 



Saturday, October 25, 2025

अंतिम सत्य


एकदा सहा ऋषी, जनकल्याणाच्या दिव्य प्रेरणेने प्रेरित होऊन, हिमालयाच्या हृदयात पोहोचले. त्यांच्या नेत्रांत जिज्ञासा होती, हृदयात तपश्चर्या, आणि आत्म्यात एकच ध्यास— सत्याचा शोध.  त्यांनी एका हिमाच्छादित पर्वतावर कठोर तप सुरू केले. काळ थांबला, वारा स्तब्ध झाला, आणि अखेर... सत्य प्रकट झाले.

सत्याचे तेज इतके प्रखर होते की प्रत्येक ऋषीने त्याला वेगळ्या रूपात पाहिले—कोणाला ते करुणेचे प्रतीक वाटले, कोणाला न्यायाचे, कोणाला प्रेमाचे, कोणाला शून्याचे. सर्वांनी सत्याचे वर्णन केले, आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येकाचे वर्णन वेगळे होते. तरीही कुणीही असत्य बोलत नव्हता. अखेर वृद्ध ऋषीने मौन सोडले. ते शिष्यांना म्हणाले,  "सत्य हे एकच असते, पण त्याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या अंतःकरणात वेगळे उमटते.  सत्याचे पालन केले की ते अमृत बनते. आपण अनुभव केलेले सत्य दुसर्‍यांवर लादण्याचा प्रयत्न केला की ते विष बनते. जगाच्या विनाशासाठी करणीभूत बनते". त्याने शिष्यांना पृथ्वीवर परत पाठवले - एकच उपदेश देऊन—सत्याचा प्रचार करा, पण त्याचे बंधन घालू नका.

ऋषी पृथ्वीवर परतले. त्यांनी सत्य सांगितले, पण काळाच्या ओघात ते  वृद्ध ऋषीचा उपदेश विसरले. अहंकाराने अंध झालेले त्यांचे शिष्य सत्याचे झेंडे घेऊन दुसऱ्यांवर चाल करून गेले. सत्य प्रचाराचे माध्यम राहिले नाही, ते शस्त्र बनले. मठ-मंदिरं जळू लागली, विचारांचे युद्ध पेटले, आणि अखेर...

आज सत्यच मानवाच्या विनाशाचे कारण बनू पाहत आहे.  

सत्य हे तेज आहे—जगाला प्रकाशित करणारे, पण अंतःकरण जाळणारे. त्याला पचविण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो, आणि इतरांच्या अनुभूतींचा आदर करावा लागतो. कारण सत्य हे एकच नसून, अनेक रूपांत प्रकटणारे आहे. हेच अंतिम सत्य आहे—ते स्वीकारले पाहिजे, लादले नाही.

 

Tuesday, October 7, 2025

जिन्नने प्रदूषण दूर केले

अलादीन सकाळी-सकाळी लोधी गार्डनमध्ये फेरफटका मारत होता. अचानक एक झणझणीत वाऱ्याचा झोत आला आणि पेट्रोलच्या तीव्र वासाने त्याचे नाक जळजळले. नाक मुरडत तो पुटपुटला, “निसर्गाच्या कुशीतसुद्धा शुद्ध हवा नाही! या प्रदूषणावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा.”

तेवढ्यात त्याचा पाय एका कठीण वस्तूला लागला. तो थोडा डगमगला, पण पडला नाही. खाली पाहिलं तर एक जुना, मळलेला दिवा पडलेला होता. उत्सुकतेने त्याने तो उचलला. “खूप जुना दिसतोय… कदाचित चांगला भाव मिळेल,” असं म्हणत त्याने रुमालाने दिवा  पुसायला सुरुवात केली.

अचानक दिव्यातून धूर निघाला—आणि एक जिन्न प्रकट झाला.

“काय आज्ञा आहे, मालिक?” जिन्नने विचारलं.

अलादीन दचकला. गोंधळून म्हणाला, “काही आज्ञा नाही. दिव्यात परत जा.”

जिन्नने  मान झुकवली आणि म्हणाला, “मालिक, मी तुमची एखादी आज्ञा पूर्ण केल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. तुम्हाला काहीतरी आज्ञा द्यावीच लागेल.”

अलादीनने स्वतःला सावरलं. “ठीक आहे. सांग—तू काय करू शकतोस?”

“माझ्यासाठी काहीही अशक्य नाही,” जिन्न म्हणाला. “जे मनुष्य करू शकत नाही, ते काम पण मी करू शकतो.”

अलादीन हसला. त्याने जिन्नची फिरकी घ्यायचे ठरविले. त्याने जिन्नला आदेश दिला,  "पृथ्वीवरील सगळं प्रदूषण तात्काळ आणि पूर्णपणे नष्ट करून टाक.”

जिन्न हात जोडून शांत उभा राहिला.

अलादीनने जिन्नला टोमणा मारला, “काय झालं? प्रदूषणाने तुलाही हरवलं का? मला माहीत होतं—हे काम तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तो दिव्यात  परत जा आणि झोप घे. जेव्हा तुझ्या लायकीचं काही काम असेल, तेव्हा मी तुला बोलावीन.”

जिन्नच्या आवाजात एक कंप होता— खोल दुःखाचा. तो म्हणाला “मालिक, मी प्रदूषण मूळासकट नष्ट करू शकतो… पण—”

“पण, किंतु, परंतु!” अलादीन चिडून म्हणाला. “तू तर माणसांसारखी बहाणेबाजी शिकलीस वाटतं. आपल्या मालकाची आज्ञा पाळ—किंवा मान्य कर की तू असमर्थ आहेस.”

जिन्नने मान झुकवली, जणू तो अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करत होता. “जशी आज्ञा, मालिक.” त्याने डोळे मिटले, एक मंत्र उच्चारला आणि आकाशात एक विचित्र शांतता पसरली.

क्षणभरात मानवजातीचा श्वास थांबला. अलादीनसह सर्व मानव—आपापल्या पापांच्या ओझ्याने—नरकाच्या ज्वाळांमध्ये विलीन झाले. पृथ्वीने सुटकेचा श्वास घेतला… आणि पुन्हा एकदा हिरवीगार झाली.

 

Monday, September 22, 2025

"मुक्तीच्या वळणावर थांबलेली नदी"

 (आपण नदीच्या पाण्याचा प्रचंड प्रमाणावर वापर करत आहोत. नदीकाठावरील जंगल उद्ध्वस्त झाले आहे. वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फही झपाट्याने वितळत आहे. भविष्यात नदीला पाणी न मिळाल्यास तिच्या प्रवाहावर व पर्यावरणावर काय परिणाम होईल. या लघु कथेच्या माध्यमाने...)


एक थकलेली, पराजित, तहानलेली नदी पाण्याच्या शोधात भयाण निर्जन वाळवंटात भटकत होती. तिच्या प्रवाही स्वरात आधीचा आत्मविश्वास विरघळून गेला होता. मार्गात तिला जीवनाचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते. तिला काठावर कुठेही मनुष्य दिसला नाही, जनावर दिसला नाही आणि पक्षी ही दिसले नाही. अचानक आकाशात तिला एक गिधाड तिच्या डोक्यावर घिरट्या मारताना दिसला. पूर्ण शक्ति एकवटून नदीने त्याला विचारले, "गिधाड भाऊ, मिळेल का मला कुठे जीवनदायी पाणी? गिधाड राक्षसी हास्य करत म्हणाला, ताई, पाण्याचे विचारू नको. पण पुढच्या वळणावर तुला निश्चित मुक्तीचा मार्ग सापडेल. नदी त्या वळणावर पोहोचली. तिथे एक शुष्क वडाचं झाड होतं. त्याच्या फांदीवर एक प्रेत झुलत होतं. झाडाखाली प्राण्यांच्या कवट्यांचा एक मोठा ढीग साचलेला होता.  गिधाडांची गोंडस मुले त्या कवट्यांच्या ढीगांवर उड्या मारत फुटबॉल खेळताना दिसली. ते हेलावणारे भयाण दृश्य पाहून नदीच्या अंतर्मनातील आशेचा शेवटचा थेंब ही सुकून गेला. त्या भयाण निर्जन वाळवंटात नदीचा अंत झाला. आकाशात घिरट्या मारणाररा गिधाड शांतपणे तिच्या मृत देहावर उतरला.  

 

Friday, September 19, 2025

"धुक्याच्या दोन छटा : शुभ्र स्वप्न आणि काळा सावली


धुकं म्हणजे निद्राग्रस्त धरतीने पांघरलेले एक शुभ्र, शांत वस्त्र. सकाळच्या कोवळ्या वेळी धुक्यातून फिरताना मन प्रसन्न होते. धुक्याच्या ओलसर स्पर्शात दवबिंदू फुलांवर मोत्यासारखे चमकतात. पूर्व दिशेकडून सूर्यदेवता सोनेरी किरणांचा साज घेऊन उगम पावतो, आणि त्या क्षणी धुकंही त्या सोनेरी रंगात न्हालेलं दिसतं. धुक्याला भेदून जेव्हा सूर्यकिरण अंगावर पडतात, तेव्हा त्या आनंदाच्या क्षणांचे वर्णन शब्दांत करणे अशक्यच वाटते. मन प्रसन्न, उत्साही आणि शांततेने भरून जातं.

पण काळ बदलतो. रोजगार आणि सुखसुविधांच्या शोधात लाखो लोक दिल्लीसारख्या महानगरांत स्थलांतर करतात. दिल्ली शहरात हजारो कारखाने धूर ओकत असतात, लाखो वाहनं दररोज रस्त्यावर धावतात. हिवाळी सकाळी हवा शांत असेल, की संपूर्ण आसमंतात धुकं पसरतं. पण हे धुकं शुभ्र नसतं— काळं, कुट्ट आणि गुदमरणारं असतं.

दिल्लीतील या धुक्याला "स्मॉग" म्हणतात. डॉक्टर सकाळी पार्कमध्ये धावणाऱ्यांना सतर्क करतात—या स्मॉगमध्ये फिरणे किंवा व्यायाम करणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. तुम्हाला प्रश्न पडेल, हा स्मॉग नेमका काय आहे?

लाखो वाहनांच्या धुरातील सूक्ष्म कण, कारखान्यांच्या विषारी धुराने भरलेल्या चिमण्या, औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या रसायनांचा दुर्गंधी वायू—हे सगळं धुक्याच्या थरात मिसळून तयार होतो स्मॉग. सर्दी, खोकला, दमा यांसारख्या आजारांना निमंत्रण देणारा हा काळा धुराचा थर झाडांच्या पानांवरही परिणाम करतो—पाने काळी पडून गळून जातात. जीवसृष्टी असो वा वनस्पती, सर्वांच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा स्मॉग.

प्रगतीच्या नावाखाली निर्माण झालेलं हे काळं धुकं सुख सुविधांच्या मागे धावण्याचं फलित आहे. जर माणूस अशाच वेगाने धावत राहिला, तर एक दिवस तो स्वतःच या काळ्या धुक्यात हरवून जाईल.

 

Wednesday, September 17, 2025

मोदींच्या मिस्कील नजरेतून – एक अकबर-बीरबल

 (आज पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा ही गोष्ट वाचकांसाठी)

पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिनमध्ये बसतो ती एका मोठ्या हॉलमध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूंना साडेतीन फूट उंच पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४–२५ जणांचा स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्याबरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते.

हॉलचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो. तिथे एक तीन फूट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.

त्या दिवशी दुपारचे साडेतीन वाजले असतील. नुकताच सर्वांचा चहा झाला होता. अचानक दरवाजा उघडून एक कर्मचारी आत आला आणि थरथरत्या पण सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला, “पंतप्रधान इकडेच येत आहेत!”

मी चमकलोच. गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत आहे. या आधी पंतप्रधान तर सोडाच, कुणा वरिष्ठतम अधिकाऱ्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिनमध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना—देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावं लागतं, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो.

सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करायला सुरुवात केली. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचार्‍याच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच, पहिलेच केबिन असल्यामुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली आणि विभिन्न विषयांवर माझे मत विचारले. प्रत्येक केबिनसमोर उभे राहून त्यांनी कर्मचार्‍यांची विचारपूस केली आणि त्यांच्या सोबत चर्चा ही केली.

सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिनमध्ये बसणाऱ्या स्टाफची विचारपूस केली. त्यांची नजर अलमारीवर ठेवलेल्या ७–८ रिकाम्या चहाच्या कपांवर गेली. त्यांनी मिस्कीलपणे विचारलं, “बहुत चाय पीते हो आप लोग?”

स्टाफमधल्या एका कर्मचार्‍याने उत्तर दिलं, “सर, सारे कप हमारे नहीं हैं, और लोग भी अपने खाली कप यहाँ रख देते हैं.”

पंतप्रधान हसले आणि म्हणाले, “दोस्तों, आपने अकबर-बीरबल की कहानी सुनी है?”

आम्ही सर्व टक लावून त्यांच्या कडे बघू लागलो. पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.

त्यांनी अकबर-बीरबलची गोष्ट सांगायला सुरुवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत):

एकदा अकबर बादशाह बीरबलच्या घरी गेले. पाहतात काय—बीरबल आणि बीरबलाची बेगम एका मंचकावर बसून आंबे खात होते. आत येताच अकबर बादशाहचं लक्ष जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेलं.

अकबर बादशाहने मनात विचार केला—बीरबल स्वतःला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे की बादशाहही किती बुद्धिमान आहे.

अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या आणि म्हणाले, “बीरबल, मी सांगू शकतो की माझ्या इथे येण्याआधी तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत.”

बीरबल अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे हे त्याने सहज ओळखलं. तो मिस्कीलपणे म्हणाला, “जहाँपनाह, आपण चुकत आहात. या खाली टाकलेल्या कोयी मी खाल्लेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयींसह आंबे खाते.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय स्पष्ट झाला. आम्हीही मुक्तपणे हसलो.

(कहाणीचा अर्थ मला जो कळला—बीरबलने आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनवले असेल, पण मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका. उगाच दुसऱ्यांचे नाव कशाला घेता? हा सर्व चहा तुम्हीच गटकला आहे!)

पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्‍यांशी अशा पद्धतीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर-बीरबलची गोष्ट सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.

Monday, February 10, 2025

बजेट आले आणि लग्न तुटले.


ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले.  ग्राऊंड फ्लोर वर  एक मोठा हॉल, दोन बेड रूम,  मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम  आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर  पाहुण्यासाठी एक रूम ही.  घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती. जाई जुई, मोगरा, गुलाब, सदाफुली  इत्यादि फुलांच्या झाडे आणि वेली ही होत्या. मुंबई पुण्याच्या भाषेत एक बंगलो त्यांनी बांधला होता.

सदाने नागपूरच्या एका महाविद्यालतून आयटी शिक्षण घेतले. एमबीए ही केले. पण  भरपूर प्रयत्न करून ही त्याला नागपुरात नौकरी मिळाली नाही.  अखेर त्याने पुण्याची वाट धरली. त्याला पुण्यात एका आयटी कंपनीत 25 हजार पगारावर नौकरी मिळाली. एका बंगल्यात राहणारा सदा पुण्यात दोन-चार तरुणांसोबत एका फ्लॅट मध्ये राहू लागला. पुण्यात पंचवीस हजारात  एका व्यक्तीचे  जीवन निर्वाह होणे कठीण, संसार थाटणे शक्यच नाही. सदाचा पगार कमी असल्याने पुण्याच्या नौकरी करणार्‍या मुलींनी त्याला भाव देणे शक्यच नव्हते. तसे ही पुण्याच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात. त्यामुळे सदाने लग्नाचा विचार सोडून दिला. त्यात करोंना आला, कंपनी ने दोन वर्ष पगार वाढ रोखून ठेवली. पण अखेर सदाचे नशीब बदलले. 

नागपुरात ही आयटी कंपन्या येऊ लागल्या होत्या. सदाला गेल्यावर्षी एका कंपनीत 50 हजारची नौकरी मिळाली. त्यात नौकरी ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यन्तची. सदा तर भलताच खुश झाला. नुकतीच त्याची 30 उलटली होती. त्याला लग्नाची घाई झाली होती. नौकरी करणारी मुलगी भेटली नाही तरी वडिलांची पेन्शन आणि त्याच्या पगारात उत्तम रीतीने जगता येणे शक्य होते. त्याच्या वडीलांनी वधू संशोधांनाची मोहीम हाती घेतली.  पण इथेही लोचा झाला. जिथे पुण्या-मुंबईच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात, तिथे नागपुरकर मुलींना पुण्या-मुंबईचे डोहाळे लागलेले असतात. अखेर गेल्या महिन्यात एका मुलीने होकार दिला. 

एक तारखेला निर्मला ताईंनी बेजेट पेश केले. इन्कम टॅक्स लिमिट 12 लाखांपर्यंत वाढविली. पाच फेब्रुवारीच्या माघाष्टमीच्या शुभ दिवशी  सदाचे वडील पुढील बोलणीसाठी मुलीवाल्यांकडे केले. सदा ऑफिसात गेला. संध्याकाळी सदा घरी पोहचला. वडील बैठकीत बसलेले दिसले नाही. त्याने आईला विचारले बाबा कुठे, त्याची आई म्हणाली बाबा वरती गच्चीवर गमल्यातील फुलांच्या झाडांना पाणी देत आहे. तू हात पाय धूऊन कपडे बदलून ये, मी चहा ठेवते. सदा हात पाय धूऊन कपडे बदलून बैठकीत आला. त्याची आई चहा घेऊन आली. वडील ही चहासाठी खाली आले. सदाने वडिलांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. त्याचे वडील म्हणाले सदा, मुलीवाल्यांनी नकार दिला. सदाने त्याचे कारण विचारले. त्याचे वडील म्हणाले मुलीवाले म्हणतात मुलगा किमान इन्कम टॅक्स भरणारा असावा. .....

होणारा जावई इंकम टॅक्स भरत नाही. ही तर आम्हासाठी लजास्पद बाब आहे. अश्या घरी मुलगी देणे शक्य नाही. सदा आपल्या पे स्लिपला पाहत विचार करू लागला पगार पन्नास हजार ते लाख रुपये पोहचायला किमान पाच वर्ष तरी लागतील. पाच वर्षांनी पुन्हा इन्कम टॅक्स लिमिट वाढली तर आपले कधीच लग्न होणार नाही. 



Thursday, January 30, 2025

एका आगीची छोटीशी गोष्ट

 (काल्पनिक कथा)

दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्‍यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्‍या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्‍यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्‍यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात  होतो. ती आयतकार इमारत होती. मध्यल्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पायर्‍या आहेत. प्रथम माल्यावर डाव्या बाजूला माझ्या अधिकार्‍याचे आणि माझे केबिन ही आहे. या भागात ही सर्वच माळ्यांवर कोपर्‍यावर अवैध निर्माण असल्याने आम्हाला उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध आहे. मजेदार बाब पाचव्या फ्लोर वर अश्याच अवैध निर्मित  भागात आमच्या मंत्र्याचे चेंबर होते.  

त्या दिवशी सकाळी पाउणे नऊ वाजले असतील. मधल्या दरवाज्यातून प्रवेश करताच जाणवले काही वेळापूर्वी डाव्या बाजूच्या पायर्‍यांजवळ आग लागली होती. माझ्या मॅडम अधिकारीने आल्या-आल्या चेंबर मध्ये शिरताच मला बोलावले.  पीएस साहब (दिल्लीत शिपाई सोडून सर्वांना साहब म्हणण्याची पद्धत आहे), सकाळी आग लागली होती का? मी उतरलो, यस मॅडम. पीएस साहब, हे सांगा, आपण इथे असताना पुन्हा अशीच आग लागली आणि जोरात पसरली  तर आपण कसे बाहेर पडणार? दुसर्‍या बाजूला तर बाहेर जाण्याचा मार्ग बंद आहे. मी काही बोलणार त्या आधीच ती उतरली, अरे, आपण पहिल्या माल्यावर आहोत. खिडकीतून खाली उडी मारू शकतो. जास्तीसजास्त एखादा पाय तुटेल. पण प्राण वाचतील. मी उतरलो, मॅडम, आपण खिडकीतून उडी मारू शकत नाही. माकडे आत येऊ नये म्हणून या भागात सर्वच इमारतींच्या खिडक्यांना लोखंडाच्या मजबूत जाळ्या लागलेल्या आहेत. तिने मागे वळून खिडकी कडे पहिले आणि अत्यंत मरगळलेल्या आवाजात मला पाहत म्हणाली, मग आपले प्राण कसे वाचतील? खरे तर तिच्या प्रश्नावर मला हसू येत होते तरीही ही चेहरा गंभीर करत म्हणालो, मॅडम, आपण पहिल्या माल्यावर आहोत. आपण पाणी अंगावर शिंपडून तोंडाला हाताने झाकून आगीतून खाली उतरू शकतो. जास्तीसजास्त एखाद मिनिट लागेल. जर आपल्या कपड्यांना आग असे वाटले तर इमारतीतून बाहेर पडताच जमिनीवर लोट मारून घेऊ. बाहेर असलेले लोक आपल्याला वाचवून घेतील. तिने पुन्हा विचारले, असे उतरणे कितपत योग्य. मी उत्तर दिले, बहुतेक 1992-93 मध्ये कृषि मध्ये आग लागली होती त्यात प्राण हानी ही झाली होती. आगीत अधिकान्श लोकांचे प्राण, विषाक्त वायु फुफ्फुसात आत गेल्याने, जातात. आग आणि धूर युक्त विषाक्त वायु नेहमीच वर जाते. त्यामुळे इमारतीत आग लागल्यावर खाली उतरणे जास्त योग्य. वर जाणार्‍यांची मरण्याची शक्यता जास्त. त्यानंतर काही कर्मचार्‍यांना आग लागल्यावर काय करायचे याचे प्रशिक्षण दिले होते. मी ही ते घेतले होते. माझ्या या उत्तराने तिचे समाधान झाले. ती म्हणाली, म्हणजे आग लागली तरी आपण जीवंत राहू. पण पाचव्या माल्यावर बसणार्‍या आपल्या मंत्र्याचे काय होईल. ते अश्या  आगीत पाच माले खाली उतरु शकतील का. मी म्हणालो, त्यांना वाचवायला हेलिकॉप्टर येईल. फक्त त्या वेळ पर्यन्त ते जीवंत राहिले पाहिजे. माझ्या या उत्तरावर ती हा! हा!हा! करत जोरात हसली. त्या हसण्याचे गूढ मात्र मला कळले नाही. पण  अधिकारी सकाळी प्रसन्न असेल तर त्याच्या खाली काम करणार्‍या सर्वांचा दिवस ही उत्तम जातो. असो 

मोदी सरकार आल्या नंतर सरकारला जाणवले, सचिवालयाच्या अधिकान्श इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत या शिवाय जागेची कमतरता ही आहे. सरकारने नवीन सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. संसद भवन सहित अनेक मंत्रालये आज नव्या इमारतीत शिफ्ट ही झाले आहेत. नव्या इमारती आगीपासून जास्त सुरक्षित आहे. निदान पुढील काही वर्ष तरी या इमारतींच्या आत अवैध निर्माण होणार नाही ही अपेक्षा आपण ठेऊ शकतो. 


Monday, December 16, 2024

दुर्योधन: बेलेट पेपर वर निवडणूक झालीच पाहिजे.

शकुनी मामा (दुर्योधनाचा रडका चेहरा पाहून): दुर्योधन, पुन्हा पडला का निवडणूकीत. 

दुर्योधन: होय मामा, यंदा ही जनतेने मला मत दिले नाही. या वेळी तर भीमाने तब्बल 50 हजार मतांनी पराजित केले. त्या हलकट अर्जुनाने तर तब्बल लाख मतांनी कर्णा वर विजय मिळविला. धर्मराज पुन्हा राजा झाला आहे. मामा, एक ही निवडणूक मी जिंकू शकलो नाही. पण  मामा, मला एक कळत नाही, तुम्ही दहा वेळा निवडणूका कश्या काय जिंकल्या. तुमच्या सारख्या नीss.. म्हणता-म्हणता दुर्योधन मध्येच थांबला. शकुनी म्हणाला, दुर्योधना, तुला काय म्हणायचे आहे, मला कळले आहे. फक्त तूच माझे खरे स्वरूप ओळखतो याचा मला आनंदच आहे. म्हणूनच मी तुला वारसा हक्क दिला आहे. जनता मला मत देत होती, हा तुझा भ्रम आहे. भांजे, मी साम दाम दंड भेद वापरुन निवडणूका जिंकल्या आहेत. म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते. मी जनतेची कधीच पर्वा केली नाही. मी फक्त जनतेला मूर्ख बनविले आहे. पन्नास वर्षांपूर्वी पहिली निवडणूक तुझा मामाने गुंडांच्या मदतीने बूथ लुटून जिंकली होती. पण काळ एक सारखा रहात नाही. जेंव्हा बूथ लुटणे अशक्य झाले तर मामा नकली बेलेट पेपर छापून निवडणूक जिंकायचा. अश्या रीतीने वेगवेगळे मार्ग वापरुन तुझ्या मामाने दहा निवडणूका जिंकल्या आहेत आणि अब्जावधी संपत्तिचे मोठे साम्राज्य स्थापित केले आहे.  

दुर्योधन: मामा तो काळ गेला, आता ईव्हीएम आली आहे. त्या बदलणे शक्य नाही. त्यात हेराफेरी ही करता येत नाही. तसे असते तर तुमच्या या भाच्याने कधीच हेराफेरी करून निवडणूक जिंकली असती. आता तर मला वाटते, माझ्या भाग्यात फक्त वनवास आहे. 

शकुनी: एवढ्यात निराश होऊ नको, तुझा मामा जिवंत आहे. आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. आपण मीडिया विकत घेऊ, एनजीओ  विकत घेऊ, सामाजिक संस्थांना विकत घेऊ. ईव्हीएम विरुद्ध जोमाने प्रचार करू. जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत शंका उत्पन्न करु. मग जनताच म्हणेल बेलेट पेपर वर मतदान घ्या. एकदा की बेलेट पेपर वर मतदान घेतले की तुझा विजय निश्चित समज.

दुर्योधन: मामा,  खरोखर असे होईल? तो मायावी कृष्ण असे होऊ देईल का. 

शकुनी मामा: का नाही होणार. आपण प्रचार करू मायावी कृष्ण ईव्हीएम हेक करतो आणि पांडव निवडणूक जिंकतात. मायावी कृष्ण संविधान विरोधी आहे, प्रजातंत्र विरोधी आहे, तांनाशाह आहे. हस्तिनापूरची संपत्ति लुटून तो द्वारकेत नेतो आहे. जो पर्यन्त शकुनी जीवंत आहे, कृष्णाला असे करू देणार नाही. .. दुर्योधना कसे वाटले माझे उद्याचे भाषण?

दुर्योधन: मामा. आता माझ्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली आहे. तुम्ही आदेश द्या, मी ईव्हीएम विरोधात उद्या पासूनच देशभराचा दौरा सुरू करतो. 

असे म्हणत दुर्योधनाने जोरात घोषणा केली, ईव्हीएम मुर्दाबाद, बेलेट पेपर झिंदाबाद. पुढची निवडणूक, बेलेट पेपर वर. त्याच बरोबर कावळ्यांनी ही कांव-कांव करत प्रतिसाद दिला. 


Monday, December 2, 2024

आज मी साबणाने आंघोळ केली


या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ. सकाळी उठून ब्रेकफास्टची तैयारी करते, मा की दाल, राजमा, छोले किंवा भाजी इत्यादिला फोडणी देते आणि कणीक मळून ठेवते. त्या नंतर सौ. चहा करते. सून ही सहाच्या आधी उठते. चहा पिऊन, पराठे, पोळ्या इत्यादि करते. नंतर आंघोळ करून, तैयार होऊन, नाश्ता करून, धावत-पळत आठच्या आधी घरातून निघते. संध्याकाळी सून साडे सात पर्यन्त घरी परतते. त्या आधी सौ. स्वैपाकाची कच्ची तैयारी करून ठेवते. सौ.च्या हातचा चहा पिऊन, सून स्वैपाकाचे काम बघते. त्यामुळे न मागता, मला ही संध्याकाळचा दुसरा चहा मिळतोच. ऑफिस मधून घरी यायला मुलाला ही रात्रीचे 9 वाजतात. रात्री साडे नऊ नंतर जेवण. मग सर्व आटोपता-आटोपता रात्रीचे साडे दहा-अकरा रोजच होतात. दुसर्‍या शब्दांत म्हणा, लेक आणि सून दोघांचे एका रीतीने यंत्रवत जगणे सुरू झाले आहे. महानगरात जगण्याचा संघर्ष हा यंत्रासारखाच असतो. 

एक दिवस संध्याकाळी सात वाजता मित्रांसोबत पार्क पे चर्चा करून घरी परतलो. पाहतो काय सौ.ने भाजीला फोडणी टाकलेली होती आणि पोळ्या करत होती. मी आश्चर्याने तिच्या कडे पाहिले. सौ. म्हणाली सून थकून घरी येते, म्हंटले आज संध्याकाळचा स्वैपाक करून टाकते. मला आपल्या कानांवर विश्वास झाला नाही. मी म्हंटले, खरे सांग, तुला सुनेचा एवढा पुळका काहून आला. सौ. माझ्या कडे पाहत हसत म्हणाली, तुमचा लेकरू आज सकाळी ऑफिस जाताना सुनेला म्हणत होता, आज त्याने साबण लाऊन आंघोळ केली आहे. सौ.चे शब्द कानात पडले आणि मी भूतकाळात पोहचलो. 

मुले शाळेत जाऊ लागली होती. मुलांची शाळा सकाळची होती. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्शा सकाळी पाउणे सातला यायचा. मला ही सकाळी सातला घरातून निघावे लागायचे. त्याचे कारण बसस्टॉप घरापासून एक किमी दूर होता. या शिवाय त्यावेळी दिल्लीत मेट्रो सुरू झाली नव्हती. बस ने कमीत-कमी दीड तास कार्यालयात पोहचायला लागत असे. आम्ही दोघ सकाळी पाचला उठायचो. चहा पिऊन सौ. सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि तिघांचे डब्बे तैयार करायची. मुलांसाठी सौ.ला दुपारी ही स्वैपाक करावेच लागायचा. या शिवाय घराची साफ-सफाई, कपडे धुणे, भांडे घासणे सर्वच सौ.ला करावे लागायचे. आता किमान झाडू-पोंछा आणि भांडे घासण्यासाठी बाई आहे. मला रोज संध्याकाळी घरी यायला रात्रीचे नऊ किंवा साडे नऊ होत असे. मुले ही रात्री दहा-साडेदहा पर्यन्त अभ्यास करायाची. रोजचे रुटीन आटोपता-आटोपता रात्रीचे 11 व्हायचेच. दिवसभराच्या कामाने सौ. थकून जायची. भारत सरकारात पीएसची नौकरी, त्यात मोठ्या कार्यालयात मोठ्या अधिकार्‍यांसोबत, असल्याने शनिवार आणि रविवारची सुट्टी क्वचित मिळायची. अश्या बिकट परिसस्थितीत रात्रीच्या नाटकाचा चौथा अंक सुरू करणे जमत नव्हते. शेवटी यावर उपाय काढला. ज्या दिवशी इच्छा अनावर होत असे, सकाळीच आंघोळ झाल्यावर सौ.ला म्हणायचो, आज साबणाने आंघोळ केली आहे. सौ. दिवसाचे काम त्या हिशोबने आटपायची. त्या दिवशी संध्याकाळी बहुधा वरण भात किंवा खिचडी इत्यादि करायची. त्यात वेळ आणि मेहनत कमी लागते. रात्री साडे नऊ होताच, सौ. मुलांवर तोफ डागायची, तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा नसतो. रात्री पुस्तके उघडून बसता आणि  सकाळी उठताना नखरे करतात. मी दिवा बंद करते आहे, निमूट पणे जाऊन झोपा आणि सकाळी वेळेवर उठा. मुले झोपली तरच आमचा नाटकाचा चौथा अंक सुरू व्हायचा. 

काही क्षणात मी भानावर आलो, च्यायला, आपला परवलीचा शब्द मुलांना माहीत आहे. आज तोच शब्द लेकराने वापरला. याचा अर्थ आपले गुपित सुनेला ही माहीत झाले असेल. मी हसत सौ.ला म्हणालो, अब पोल तो खुल चुकी है, आज अपुन भी सोने से पहले साबण लगाकर आंघोळ करेगा. तुमच्या जिभेला काही हाड...... काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते. 



Sunday, October 20, 2024

आरक्षण चोरी

आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर".

सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील (काल्पनिक नाव) एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश (काल्पनिक नाव) दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला. सुशील ने सतीशला विचारले, तू इथे चर्च बाहेर काय करतो आहे. सतीश म्हणाला, मी इसाई आहे. दर रविवारी, प्रार्थनेसाठी इथे येतो.

सोमवारी ऑफिस मध्ये आल्यावर सुशीलच्या लक्षात आले. सतीशची क्लार्क पदावर नियुक्ती एससी कोट्यातून झाली होती. सुशील ही एससी होता. तो गेल्या तीन चार वर्षापासून एसएससीची क्लार्क ग्रेडीची परीक्षा देत होता, पण त्याच्या हाती निराशा येत होती. सरकारी भरतीत इसाई लोकांना आरक्षण नाही, हेही सुशीलला माहीत होते. आपण नापास झालो त्याचे कारण सतीश सारखे आरक्षण चोर आहेत, याची त्याला खात्री झाली. त्याची तळपायातील आग मस्तकात गेली. तो सतीशची तक्रार करायला प्रशासनिक अधिकाऱ्याच्या चेंबर मध्ये गेला. तो म्हणाला सर, सुशील हा एससी नाही, इसाई आहे. अधिकाऱ्याने विचारले, हे तुला कुणी सांगितले. सुशील म्हणाला, स्वतः सतीश ने मला हे सांगितले. तुम्ही म्हणाल तर मी लिखित तक्रार करायला तैयार आहे. त्याची इन्क्वायरी करून त्याला नोकरीतून बरखास्त करा. अधिकारी सुशीलला समजावत म्हणाला, चर्च जाणे, गळ्यात क्रॉस घालणे, घरात मदर मेरीची मूर्ती ठेवल्याने कोणी इसाई होत नाही. सरकारी कागदावर तो एससी आहे. जोपर्यंत तो सरकारी कागदावर तो एससी आहे, तो पर्यंत आपण काहीही करू शकत नाही. परीक्षा देताना सतीश कागदावर  एससी  होता. हेच सत्य आहे. सुशील ने ओळखीच्या दलित नेत्यांना ही याबद्दल माहिती दिली पण त्याचा हाती निराशा आली. 

ही तर झाली चाळीस वर्षांपूर्वीची कथा. आज पर्यंत लाखो दलितांचे धर्म परिवर्तन झाले आहे. पण सरकारी नौकरीसाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी  कागदावर ते आज ही दलित हिंदू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकाही दलित नेत्याने या आरक्षण चोरीचा कधी विरोध केलेला मला तरी स्मरणात नाही. आता तर धर्मांतरित कर्मचारी नौकरी लागल्या नंतर डंके की चोट पर आपण मसीह आहोत सांगतात. २६ डिसेंबर नंतर  केक घेऊन कार्यालयात येतात. हिंदू दलित कर्मचारी विवश होऊन हा तमाशा बघतात. गेल्या काही वर्षांत कॅनडा आणि इतर देशातून येणार्‍या पैश्यांच्या जोरावर पंजाबत तर अंदाजे पाच ते दहा लक्ष सिख इसाई झाले आहेत पण कागदावर ते सिखच आहेत.  या शिवाय इतर जातीचे लोक ही सरकारी नौकरी साठी खोटे कागद तैयार करून आरक्षणाचा लाभ घेतात. पण  कुणी तक्रार केली तर त्यांच्या पकडल्या जाण्याची थोडी फार संभावना असते. सरकारचे म्हणाल तर, अजून तरी आरक्षण चोरी बाबत कठोर कायदा बनलेला नाही. 

बाकी वेगळा विषय. फक्त दलित नव्हे तर इतर जातींचे लाखो लोग धर्म परिवर्तन केल्या नंतर ही सरकारी कागदांवर आणि सार्वजनिक जीवनात हिंदू राहतात. यात अनेक नेता ही असतील.  क्रिफ्टो क्रिश्चन हा शब्द या लोकांसाठीच वापरला आहे. 


Wednesday, September 18, 2024

सरडा आणि रंग बदलणारा नेता


कधीतरी जंगलात राहणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळवण्याचा विचार केला. तो जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात, डोक्यावर पांढरी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला.

सरडा त्या माणसाजवळ गेला आणि म्हणाला, “मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा किंवा फुलावर बसतो, त्याच रंगात मिसळून जातो.”

सरड्याने पुढे सांगितले, “मी तुम्हाला ही कला दाखवतो.”

तो हिरव्या पानांवर बसला—तो हिरवा झाला.

तो लाल फुलावर बसला—तो लाल झाला.

अशा रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून ती कला त्या माणसाला दाखवली.

सरड्याने विचारले, “तू माझ्यासारखा रंग बदलून दाखवू शकतोस का?”
तो माणूस हसत म्हणाला, “त्यात काय विशेष आहे? मी या खुर्चीत बसल्या-बसल्या रंग बदलू शकतो. तू फक्त माझ्या टोपीकडे बघ.”

सरड्याने त्या माणसाच्या टोपीकडे पाहिले.

क्षणातच टोपीचा रंग हिरवा झाला, दुसऱ्या क्षणी लाल, नंतर निळा आणि मग भगवा. अखेरीस पुन्हा पांढरा झाला.

तो माणूस रंग बदलण्याची कला इतक्या सहजतेने दाखवत होता की सरडा आश्चर्यचकित झाला.

सरडा म्हणाला, “आजवर मी कोणत्याही माणसाला रंग बदलताना पाहिले नाही. आपण खरोखर कोण आहात?”

तो माणूस शांतपणे म्हणाला, “मी सदा सत्तेच्या खुर्चीत विराजमान राहतो. त्यासाठीच ही टोपीचा रंग बदलण्याची कला आत्मसात केली आहे.”

सरड्याला वाटले की त्याची फसवणूक झाली आहे. तो निराश झाला. जंगलात रंग बदलण्यात त्याच्याशी स्पर्धा करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. पण आता त्याचा चेहरा लाल होता—लज्जेने की रागाने, सांगता येईना; आणि शरीर हिरवे—मत्सराने भरलेले. तो झाडावर हळूच चढला आणि खाली मानवी-सरड्याकडे पाहून म्हणाला, "आज मी माणूसरूपी सरड्याच्या हातून पराजित झालो. पण आमचं जंगल आणि त्याचे जीव अधिक चांगले—ते स्वार्थासाठी रंग बदलत नाहीत."