एकदा सहा ऋषी, जनकल्याणाच्या दिव्य प्रेरणेने प्रेरित होऊन, हिमालयाच्या हृदयात पोहोचले. त्यांच्या नेत्रांत जिज्ञासा होती, हृदयात तपश्चर्या, आणि आत्म्यात एकच ध्यास— सत्याचा शोध. त्यांनी एका हिमाच्छादित पर्वतावर कठोर तप सुरू केले. काळ थांबला, वारा स्तब्ध झाला, आणि अखेर... सत्य प्रकट झाले.
सत्याचे तेज इतके प्रखर होते की प्रत्येक ऋषीने त्याला वेगळ्या रूपात पाहिले—कोणाला ते करुणेचे प्रतीक वाटले, कोणाला न्यायाचे, कोणाला प्रेमाचे, कोणाला शून्याचे. सर्वांनी सत्याचे वर्णन केले, आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येकाचे वर्णन वेगळे होते. तरीही कुणीही असत्य बोलत नव्हता. अखेर वृद्ध ऋषीने मौन सोडले. ते शिष्यांना म्हणाले, "सत्य हे एकच असते, पण त्याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या अंतःकरणात वेगळे उमटते. सत्याचे पालन केले की ते अमृत बनते. आपण अनुभव केलेले सत्य दुसर्यांवर लादण्याचा प्रयत्न केला की ते विष बनते. जगाच्या विनाशासाठी करणीभूत बनते". त्याने शिष्यांना पृथ्वीवर परत पाठवले - एकच उपदेश देऊन—सत्याचा प्रचार करा, पण त्याचे बंधन घालू नका.
ऋषी पृथ्वीवर परतले. त्यांनी सत्य सांगितले, पण काळाच्या ओघात ते वृद्ध ऋषीचा उपदेश विसरले. अहंकाराने अंध झालेले त्यांचे शिष्य सत्याचे झेंडे घेऊन दुसऱ्यांवर चाल करून गेले. सत्य प्रचाराचे माध्यम राहिले नाही, ते शस्त्र बनले. मठ-मंदिरं जळू लागली, विचारांचे युद्ध पेटले, आणि अखेर...
आज सत्यच मानवाच्या विनाशाचे कारण बनू पाहत आहे.
सत्य हे तेज आहे—जगाला प्रकाशित करणारे, पण अंतःकरण जाळणारे. त्याला पचविण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो, आणि इतरांच्या अनुभूतींचा आदर करावा लागतो. कारण सत्य हे एकच नसून, अनेक रूपांत प्रकटणारे आहे. हेच अंतिम सत्य आहे—ते स्वीकारले पाहिजे, लादले नाही.
No comments:
Post a Comment