Showing posts with label पाककृती. Show all posts
Showing posts with label पाककृती. Show all posts

Thursday, May 22, 2025

तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप





आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर  सौ.ने मुगाची डाळ भाजीत  टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250  ग्राम, उरले. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. माझ्या सुपीक डोक्यात विचार आला, आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविणार होती. कोथिंबिर कापल्या नंतरच्या  काड्या उरलेल्या होत्या. मी कड्यांसोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला. एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पाणी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोह्या सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. दोडक्याची भाजी न खाणारे  छोटे बच्चे  ही, हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो. 

टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता).


Tuesday, January 21, 2025

हिवाळ्यातील मौज: टोमॅटो मिक्स सूप

हिवाळ्यात गर्मागरम सूप पिण्याचा आनंद काही औरच असतो. एक तर हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त असतात आणि खिश्याला परवडतात. अनेकांची तक्रार असते घरी बाजार सारखे  टोमॅटो सूप बनत नाही. सूप पातळ बनते. सूप घट्ट करण्यासाठी त्यात मैदा इत्यादि पदार्थ मिळविणे केंव्हाही उचित नाही. या शिवाय बाजारात लाल भडक टोमॅटो मिळत ही नाही. देसी टोमॅटो आंबट असतात, ते जास्त टाकले तर सूप ही आंबट बनणार. त्यात साखर घालणे ही योग्य नाही. आता एक स्वास्थ्यवर्धक स्वादिष्ट सूप बाजार सारखे घरी कसे करायचे. सौ. घरात टोमॅटो बनविते. तिने यावर सौपा उपाय शोधला. यासाठी ती टोमॅटो, गाजर आणि बिट्स रूट (हिंदीत चुकुंदर) वापरते. गाजर गोड स्वाद देते आणि बिट्स रूट लाल भडक रंग देते. दोन्ही टाकल्याने सूप किती घट्ट करायचे आपण स्वत: ठरवू शकतो. आता तर मी ही सूप बनविण्यात एक्स्पर्ट झालो आहे. चार ते सहा लोकांसाठी सूपची विधी:  पाच ते सहा सामान्य आकाराचे टोमॅटो (टोमॅटो जास्त आंबट असतील तर कमी ही चालतील), एक गाजर आणि एक लहान आकाराचे बिट्स रूट (मोठे असेल तर अर्धे). या शिवाय एक हिरवी मिरची (नाही टाकली तरी चालेल). टोमॅटो, गाजर, बिट्स रूटचे छोटे तुकडे करून आणि साबूत मिरची कुकर मध्ये टाकून थोडे पाणी घालून उकळून घ्यायचे. (कोथिंबीरीच्या काड्या ही टाकू शकतात त्या ही स्वाद वाढवितात).  गॅस वर दोन शिट्या पुरे. त्यानंतर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घ्यायचे. सूप एका भांड्यात काढून आता तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे त्यानुसार त्यात पाणी मिसळायचे. स्वादासाठी, जिरे, मिरपूड, आणि मीठ घालून चार- पाच  मिनिटे उकळून घ्यायचे. सूप बाउल किंवा कपात  सर्व करताना, एक चमचा क्रीम किंवा ताजे लोणी. ते ही घरात नसेल तर दुधावरची साय ही टाकता येते. इथे चित्रात दुधावरची साय टाकली आहे. स्वाद अप्रतिम लागतो. आवडत असेल तर कोथिंबिर ही सूप वर टाकाता येते. 


हिवाळ्यात पालकचे सूप ही छान लागते. पालक सूप बनविताना त्यात एखाद टोमॅटो  घातला की ते ही स्वादिष्ट लागते आणि लहान मुले ही  पिताना नखरे करत नाही. भाज्यांच्या मिक्स सूप मध्ये ही टोमॅटो आणि बिट्स रूट घातले की ते ही स्वादिष्ट बनते. 





Saturday, December 7, 2024

सासर्‍याचा सैपाक: पित्झा

 

गेल्या शनिवारी सकाळी सौ. माहेरी गेली. आता घरात  मुलगा, सून आणि मी. सौ. नसताना अस्मादिकांना खाण्याचे नवीन प्रयोग करायला स्वैपाकघर मोकळे होते. माझी सून  म्हणाली बाबा आपण रविवारी ब्रेकफास्ट साठी डोमिनो मधून पित्झा मागवू. मी उत्तर दिले, बाजारातून महागडा पित्झा मागविण्यापेक्षा स्वैपाक घरात ओवन आहे घरीच पित्झा बनवू. ओवनचा काही उपयोग तरी होईल. या शिवाय विदेशी कंपनीचा पित्झा मागवून आपल्या देशाचे नुकसान कशाला करायचे. आमच्या लेकाने माझ्या मताशी सहमति दाखविली. बाजारात जाऊन चार पित्झा बेस (त्यावर दोन फुकट मिळाले), अमूलचे ग्रेटेड चीज आणि पनीर, शिमला मिरची, बेबी कॉर्न आणले. घरात स्वदेशी कंपनीचा  चिली सौस आणि टमाटो सौस  आणि पित्झा वर टाकण्यासाठी हर्ब ही होते (फोटू टाकला आहे). पित्झावर भपुर सौस पसरवावे लागते म्हणून तो ही तैयार करण्याचा विचार केला. एक किलो लाल भडक हायब्रिड टमाटो शनि बाजारातून विकत आणले. रविवारी सकाळी चहा पिताना  चार टमाटो, दोन  हिरव्या मिरच्या, सहा सात काळी मिरी, एक  छोटा अदरकचा तुकडा इत्यादि साहित्य एका भांड्यात घालून अर्धा वाटी पाणी टाकून उकळून घेतले. थंड झाल्यावर टमाटोचे साल काढून सर्व साहित्य त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सित ग्राइंड करून टमाटो प्यूरी बनवून घेतली. प्यूरी थोडी पातळ वाटली म्हणून गॅस वर थोडी गाढी करून घेतली.  


पित्झा बाजार सारखा बनविण्याची एक ट्रिक आहे. माइक्रो ओवन खालून जास्त हिट देत नाही. त्या मुळे पित्जा बाजार सारखा करारा बनत नाही. आधी ओवन 200 डिग्री वर प्री हिट करून घ्यावे. नंतर पित्झा घेऊन खालच्या बाजूने तीन मिनिटे कन्वेंशन मोड वर शेकून घ्यावे. यामुळे पित्झाची खालची बाजू थोडी करारी होते. आता तो पित्झा घेऊन वरच्या बाजूला घरात बनविलेला भरपूर टमाटो पसरवून घेतला.  त्या नंतर पनीर, कांदे, टमाटो, बारीक कापलेले बींस, बेबी कॉर्न, पनीर आणि  शेवटी ग्रेटेड चीज  पित्झा वर पसरविले. नंतर चिली सौस आणि बाजारातील विकत घेतलेले टमाटो सौस पित्झा वर शिंपडले. आता पित्झा ओवन मध्ये स्टँड वर ठेऊन 20 मिनिट कन्वेंशन मोड वर शेकून घेतला. अश्यारीतीने बाजार सारखा करारा पित्जा तैयार झाला. त्यावर हर्ब टाकून गर्मा-गर्म पित्झाचे तीन हिस्से करुन लगेच खायला घेतले. चार पित्झे आम्ही तिघांनी तासाभरात फस्त केले. पित्झाचे फोटू काढून सौ.ला व्हाट्सअप वर पाठविले. तिची प्रतिक्रिया इथे देणे उचित नाही. पण मजा आली. दोन पित्झा उरले  होते.  दुसर्‍या दिवशी पनीर आणि शिमला मिरी नव्हती. पण भरपूर चीज आणि टमाटो कांदा स्वीट कॉर्न टाकून पुन्हा पित्झा नाश्ता केला. पहिला फोटो दुसर्‍या दिवशीचा आहे. 

Thursday, April 18, 2024

किस्सा झीरो ऑईल मूगाच्या डाळीच्या गोळ्यांची कढ़ी

 दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. सवयी  प्रमाणे माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. चिरंजीवांना माझ्या खाद्य प्रयोगांची भीती वाटते. तो सदैव सौ.ची अर्थात  आईंची घेतो. पण आज सोन्याचा दिवस उगवला वरक् फ्रॉम होम असले तरी चिरंजीव आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जातात. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 असते. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनकपुरी- विकासपुरी भागातील सांस्कृतिक चळवळींचे आदान-प्रदान करून, पोटातला भार हलका करून तीन एक वाजेपर्यंत सर्व  प्रसन्न मनाने घरी परततात.



सकाळी  लवकर उठून स्वैपाक केला कारण चिरंजीव आठ वाजता निघणार होते. चिरंजीव गेल्यावर सौ.अंघोळीला गेली. हा मौका साधून तृतीयांश वाटी मूग डाळ एका वाटीत गरम पाण्यात भिजवली. वाटी बैठीकीच्या खोलीत माझ्या पुस्तकांची रेक आहे. त्यात ठेऊन दिली. माझ्या बाबतीत सौ.चे नाक कान आणि डोळे अत्यंत  तीष्ण तरी तिला वास लागला नाही. अकरा वाजता सौ. बीसीला गेली आता तीन वाजेपर्यंत काळजी नव्हती. वाटी आणून स्वैपाक घरात ठेवली. 

दुपारी बारा वाजता गच्चीवर जाऊन कढीपत्ता तोडून आणला. डाळ धुवून पाणी निथळायला चहाच्या गाळणीत ठेवून दिली.  दोन चमचे  दही आणि त्यात एक चमचा बेसन घालून मिक्सीत फेटाळून घेतले आणि ४०० ml दहा रू वाली छाज मध्ये मिसळून कढईत टाकले. त्यात अंदाजे हळद, मीठ, चिमूट भर हिंग, एक चहाचा चमचा जिरे आणि सौंप, दोन लाल मिर्च्या, कढी  पत्ता आणि आले किसून टाकले. गॅस लावला. आता मिक्सर मध्ये चार लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि चार पाच काळी मिरी टाकून  भिजलेली डाळ पिसून घेतली. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळद, गरम मसाला, मीठ आणि एक मोठा चमचा बेसन मिश्रण एक जीव आणि घट्ट केले. कढईत टाकलेली कढी उकळू लागल्यावर त्यात  मिश्रणाचे दहा एक छोटे-छोटे गोळे टाकले. तीन एक मिनिटात गोळे वर दिसू लागले. आता मिश्रणाच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी टाकून उरलेले मिश्रण ही कढीत टाकले. दोन एक मिनिटात  कढ़ीचा रंग बदलून पिवळा झाला. आता एक गोळा काढून तपासला. थोडा कच्चा वाटला. थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ स्वाद ठीक करण्यासाठी टाकले. दोन एक मिनिटांनी एक चहाचा चमचा काश्मिरी लाल मिरची टाकली. कढ़ी  थोडावेळ उकळू दिली. गॅस बंद केला. मोबाईल वर कढईतल्या कढ़ीचा फोटो घेतला. समाधान झाले नाही. पुन्हा नेहमीसारखा फोटू घेतला. 

कढ़ी खरोखर मस्त झाली होती. अर्धी सौ. आणि चिरंजीवासाठी ठेवली.  दोघांना आवडली. 


Wednesday, April 3, 2024

वाढदिवस स्पेशल आलू बोंडे

आज माझा ६३वां  वाढदिवस. सौ. ने  वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून  गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत  शिऱ्याचा नैवैद्य दाखविला. नंतर आलू बोंड्याची तैयारी सुरू केली.


पाच-सहा बटाटे कुकर मध्ये उकडायला ठेवले. कोथिंबीर, कैरी, पुदिना (घरचा), आले, लसूण आणि भरपूर हिरवी मिरची टाकून झणझणीत हिरवी चटणी बनवली. एक कांदा, चार टॉमेटो, लसूण, आले, आणि  थोडे तिखट टाकून थोडी टॉमेटोची लाल रंगाची सौम्य चटणी बनवली.

उकडलेले बटाटे थंड पाण्यात टाकून थंड करून किसले (असे केल्याने स्वाद उत्तम राहतो), त्यात १०० ग्राम पनीर ही किसून टाकले (पनीर हे पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही), थोडी फुल गोबी ही किसून टाकली.(चव मस्त येते). कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून टाकली. हळद, आंबट, तिखट, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ टाकून मिश्रण एक जीव केले. हळद आणि मीठ टाकून बेसनाचा घोळ तैयार केला. मिश्रणाचे गोळे करून बेसनात बुडवून तेलात तळले.  सौ. ने सोम बाजारातून कमी तिखट वाल्या मोठ्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. उरलेल्या बेसनाच्या घोळात बुडवून मिरचीचे भजे केले. आलू बोंड्या सोबत चवीसाठी काही मिरच्या तेलात तळल्या. त्या मिरच्यांवर लिंबू पिळले.

झणझणीत भजे खाल्यानंतर. शिऱ्यावर ताव मारला. अश्या रीतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. 

Wednesday, March 15, 2023

मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले.  पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता.  मुगाच्या डाळीत  उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर  लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो. मनात विचार आला उपमा प्रमाणे  भाजलेल्या मूगाच्या डाळीचे सूप ही पाच मिनिटांच्या आत निश्चित बनू शकते. मग काय. संध्याकाळी  तीन -चार चमचे मुगाची डाळ कढईत मंद गॅस वर रंग बदले पर्यन्त भाजली. बहुतेक पाच मिनिटे लागली असतील. थंड झाल्या वर मिक्सर मध्ये डाळीचे पावडर करून घेतले. गॅस वर एका भांड्यात चार कप पाणी ठेवले. पानी थोडे गरम होताच, भाजलेल्या डाळीचे तीन चमचे पावडर पाण्यात ढवळले.  गॅस वर  सूप  उकळू दिले. तो पर्यंत थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. दोन मिनिटांत पाण्याला उकळी येताच गॅस मंद केला, त्यात स्वादानुसार मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर टाकले. गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकली. दोन चमचे सूप आमच्या चिरंजीवाला स्वाद तपासायला दिले. त्याने  आंगठा वर करून उत्तम स्वादाचे प्रमाणपत्र दिले. बाकी तो आठ-दहा वर्षांचा होता तेंव्हा पासून माझ्या पाकशास्त्राचे प्रयोग आधी त्याच्यावरच करतो. काही कमी जास्ती असेल तर तो सांगतो.

 सूप पिण्यासाठी तीन बाउल घेतले (एक माझ्यासाठी, एक सौ आणि एक चिरंजीव साठी). मला तूप आवडते म्हणून चहाच्या चमच्या एवढे तूप सूपात घातले. चित्रात तूप वर तरंगताना दिसत आहे. तूप घातल्याने चव वाढते असे माझे मत आहे. पण आमची सौ. त्यावर सहमत नाही. असो.  

बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल. या सूपाला तूप जिर्‍याची फोडणी ही देऊ शकतात. ज्यांना तिखट आवडते ते थोडे तिखट किंवा लाल मिरची घालू शकतात. याशिवाय चिंच गूळ टाकून  मूग/तुरीची डाळ भाजून पावडर करून इन्स्टेंट सार किंवा आमटी ही बनविता येऊ शकते. अजून प्रयोग करून बघितला नाही आहे.  बाकी आज दोन वाटी मूगची डाळ भाजून बरणीत भरून ठेवणार आहे. 



Monday, August 8, 2022

आज मी पेढे केले

आज सकाळी  फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे,  महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का?  उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.

पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई  गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळले.  ते चार ते पाच मिनिटे

व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे  मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून  जाईल. मला काम  करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले. 

मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला,  काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम  तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.      

Friday, April 10, 2020

कारल्याची भाजी

कारल्याची भाजी माझी अत्यंत आवडती भाजी. कोवळे कारले दिसले की मला भाजी करण्याचा हुरूप येतो. कारल्याची भाजी म्हणजे कडू, गोड, तिखट आणि आंबट स्वादाचा अप्रतिम अनुभव. 

काल सौ.ने एक पाव कारले विकत घेतले. कारले मस्त व कोवळे होते. मी आधी कारले गोल-गोल पातळ चिरले बटाटे चिप्स सारखे. कापताना कारल्याच्या बिया वेगळ्या होतात त्या मी फेकत नाही.  भाजीत या बिया खाताना मस्त करकर असा आवाज येतो. मजा येते. 

गॅस वर कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल टाकले. ही भाजी तेलातच जास्त स्वादिष्ट बनते. तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी टाकली. मोहरी फुटल्यावर गॅस हळू करून त्यात स्वादानुसार तिखट आणि हळद टाकून लगेच कारले त्यात घातले. अशाने हळद आणि तिखट जळत नाही. कढईवर झाकण ठेवले. दर दोन मिनिटांनी झाकण काढून, कारले परतून घेतले. अशाने कारले जळणार नाही. सात-आठ मिनिटांनी भाजी तेल सोडू लागेल. मग भाजीत स्वादानुसार आंबट, गूळ, धने पावडर आणि मीठ टाकून भाजी परतून घेतली. पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेऊन वाफ काढली. नेहमी प्रमाणे भाजी मस्त झाली होती.

Thursday, July 25, 2019

स्वास्थ्यवर्धक उकडीचे दहीवडे


गेल्या रविवारी पहाटे-पहाटे दहीवड्याचे स्वप्न पडले. पहाटेचे स्वप्न  खरे ठरतात हि म्हण आहे. पण स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्न हा करावाच लागतो. सौ. सहज-सहजी वडे करणार नाही. आजकाल तिला अस्मादिकांच्या सेहतची चिंता जास्त असते.  मलाच काहीतरी करावे लागणार होते. सौ. आंघोळीला गेली. मला मौका मिळाला. पटकन स्वैपाघरात गेलो. डब्बे उघडणे सुरु केले. पहिल्या डब्ब्यात चण्याची दाळ होती. अचानक आठवले सौ. नागपंचमीला चण्याची दाळ टाकून उकडीचे वडे करते. अर्धी वाटी चण्याची दाळ घेतली. एका डब्ब्यात उडीदाची धुतलेली दाळ सापडली. तीहि अर्धी वाटी घेतली. मुगाची डाळ शोधू लागलो. एका डब्यात छिलके वाली मुगाची डाळ दिसली तीहि अर्धी वाटी घेतली. सर्व डाळी धुऊन  पाण्यात भिजायला एका भांड्यात ठेवल्या. चटणीसाठी चिंच आणि ६ ते ७ खारका शोधल्या. त्याही वेगवेगळ्या वाटीत भिजवून ठेवला. फ्रीज मध्ये दही थोडेसे होते पण गॅस वर सकाळी एका भांड्यात तापवून ठेवलेले जवळपास अर्धा किलो गायीचे दूध  होते. दूध कोमट आणि दही लावण्यास उपयुक्त वाटले. पटकन विरजण टाकून दहीहि लाऊन टाकले. स्वैपाकघरातून बाहेर पडलो. 

सौ.ची आंघोळ आणि पूजा आपटली. नवरोबांनी स्वैपाघरात काही लुडबुड केली आहे, याचा वास तिला लागलाच. आमची देवीच्या दरबारात पेशी झाली.  जमेल तेवढ्या मृदू आवाजात म्हंटले "'देवी आज सकाळी सकाळी दही वड्याचे स्वप्न पडले."  सकाळी पडलेले स्वप्न नेहमीच खरे होतात.  आता सौ. काय कपाळ बोलणार. नवरोबांनी आधीच पूर्व तैयारी केल्यामुळे तिच्यापाशी नाही म्हणण्याचा विकल्प उरलाच नव्हता.  

दुपारी चारला चहा झाल्यावर तिने दहीवडे बनविण्याची तैयारी सुरु केली. आधी ४ चमचे जिरे तव्यावर भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतले.

भिजलेल्या खारका व चिंच बियांना काढून थोडे पाणी टाकून मिक्सर मधून पातळ करून घेतले.  एका भांड्यात हे पाणी गाळून घेतले. गॅॅस वर भांडे ठेऊन त्यात २-३ चमचे स्वादानुसार तिखट टाकले. एक उकळी आल्यावर त्यात ८ चमचे मधुरम (स्वदेश गुळाची साखर) टाकली. अश्यारितीने आंबट गोड आणि तिखट चटणी तैयार झाली.

त्या नंतर भिजलेल्या डाळींची  मिक्सर मध्ये पेस्ट केली (थोडी जाड) व एका भांड्यात काढून घेतली.  या शिवाय चार हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुनाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घेतली.  घरात हिरवी कोथांबीर नव्हती. पण गच्चीवर असलेल्या गमल्यात हिरवा पुदिना भरपूर होता. १० -१२ पाने तोडून आणली. डाळींच्या  पेस्ट मध्ये मिरची-लसुणाची पेस्ट मिसळली. पुदिन्याची पाने तोडून टाकली. हळद, धनिया पावडर व मीठ अंदाजे घातले (आपल्या स्वादानुसार यावस्तू टाकाव्या).  

इडली स्टेन्डला  थोडे तेल लाऊन तैयार केले. आमच्या घरच्या इडली स्टेन्ड मध्ये १६ वडे एकाच वेळी होऊ शकतात. (तेल लावल्याने शिजल्यावर वडे इडली स्टेन्ड मधून सहज काढता येतात). सर्वात शेवटी एक चमचा इनो डाळीच्या पेस्ट मध्ये टाकून मस्त पैकी ढवळून घेतले आणि पटकन ते मिश्रण इडली स्टेन्डवर  टाकले. अर्थात हे सर्व मलाच करावे लागले.  इनो टाकल्याने वडे हलके बनतात व आत छिद्रहि बनतात.  इडली पात्रात  एक गिलास पाणी टाकून त्यात इडली स्टेन्ड  ठेवले.  मध्यम आंचेवर १५  मिनिटांत  वडे शिजतात. (टीप: इडली पात्र  नसेल तर कुकर वापरता येते. फक्त कुकरला  सिटी  लाऊ नका.)  

सर्वात शेवटी दह्याला पाणी न टाकता व्यवस्थित घुसळूण पातळ केले. जर दही थोडे आंबट असेल तर थोडी साखर त्यात मिसळता येते. आजकाल उन्हाळा असल्यामुळे  दह्यात बर्फहि टाकली.  आता वड्यांसोबत मीठ तिखट, काळी मिरी, पावडर, जीरा पावडर  आणि दही ठेऊन सर्व साहित्याचा एक फोटू काढला. एवढी मेहनत केल्यानंतर  साहजिकच आहे वडे खाताना मस्त लागले.   




Saturday, September 2, 2017

पोष्टिक थालिपीठ


काल संध्याकाळी लेकीचा फोन आला. बाबा आज आमच्या हॉस्पिटल मध्ये पोष्टिक पदार्थ बनविण्याची प्रतियोगिता झाली. मी बनविलेल्या थालीपीठला पहिला पुरस्कार मिळाला. मी भाग घेण्याचे ठरविल्या बरोबरच  थालीपीठ बनविण्याचचा निश्चय केला. पुरस्कार नाही मिळाला तरी मराठमोळ्या थालीपिठाबाबत सर्वांना कळेल तरी. आमची सौ. दिवाळीच्या आधी भाजणीचे पीठ तैयार करते, ते जवळ-सात ते आठ महिने चालते.  साहजिकच आमच्या लेकीने तिच्या आईला विचारले. भाजणीचे पीठ संपले हे कळल्यावर तिची निराशा झाली. पण तीही माझ्या सारखी जिद्दी (आमच्या पटाईत खानदानची विशेषता, एकापेक्षा एक जिद्दी आणि सनकी). थोडा गुण लेकीत हि उतरला आहे. थालीपीठ बनवायचे ठरविले म्हणजे ठरविले. प्रतियोगिताचा एक दिवस आधी संध्याकाळी घरी परतताना तिला एका किरणाच्या दुकानात पतंजालीचा नवरत्न आटा दिसला आणि तिच्या डोक्याची ट्यूब लाईट पेटली.  गहू ,ज्वार, बाजरा, जौ, मक्का, चणा, सिंघाडा, चौलाई आणि सोयाबीन या पासून तैयार झालेला नवरत्न आटा. आता तिने थालीपीठ कसे केले तिच्याच शब्दांत. 

दोन वाटी नवरत्न आटा घेतला. एका कढईत (लोखंडी) रवा भाजतो तसा हा आटा ३-४ मिनिटे परतला.  अर्धी वाटी बेसन हि घेतले, तेही ३-४ मिनिटे परतले. अश्या रीतीने भाजणी तैयार केली व परातीत टाकली. एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, १०-१२ काळी मिरीची पूड हि तैयार केली.  त्या नंतर एक पाव पालक आणि २ हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या  धुऊन कढई वर झाकण ठेऊन वाफवून घेतल्या. नंतर मिक्सरमध्ये पालक टाकून प्युरी तैयार केली.   भाजणीत पालकाची प्युरी, तैयार केलेली पूड, व अंदाजे मीठ टाकून पीठ मळून घेतले. पाणी गरजेनुसार टाकले.  गॅस वर तवा ठेवला. थोड्या मंद आंचेवर. तव्यावर अर्धा चमचा तेल लावून थालीपीठ थापून घेतले व २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवले. पुन्हा परतून खरपूस भाजून घेतले. बाकी हास्पिटल मध्ये गेल्यावर सोबत टमाटो, काकडी, गाजर, ढोबळी मिरची पासून केलेली कोशिंबीरिची साईड डिश सोबत ठेवली.  एक आगळीवेगळी मराठमोळी व पोष्टिक डिश परीक्षकाला आवडली आणि तिला पहिले पारितोषिक मिळाले.










Thursday, October 20, 2016

हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)



भटुरे नाव ऐकल्यावर  मैद्याचे  छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी  मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात.  या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे  हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात.  (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो. चित्रावरून भटुरे कसे बनतात याचा अंदाज घेता येईल. 



साहित्य: एक पेला कणिक, अर्धी वाटी उडीत डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, आले १/२ इंच, लसूण १०-१२ पाकळ्या, मिरची २-३, अर्धा चमचा काळी मिरी, १/२ चमचा जीरा पावडर. स्वादासाठी *कोथिंबीर आणि मीठ. गोडे तेल आवश्यकतानुसार. हिमाचल मध्ये सरसोंचेच तेल वापरतात (*या भागात भाबरी नावाची झुडूपा सारखी वनस्पती असते. भाबरीला कढीपत्या सारखे छोटी-छोटी पाने असतात. भाबरीच्या पानांना एक प्रकारचा सुगंध असतो. भाबरीचा प्रयोग चटणी सारखा किंवा पकौडे इत्यादींचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. भाबरीच्या काळ्या रंगांच्या बियांचा हि वापर स्वादासाठी केला जातो. गावात खालेल्या भटूर्यात भाबरीच्या पानांचा आणि बियांचा वापर केला  होता. शहरात भाबरी बाजारात मिळणार नाही.  त्या जागी कोथिंबीर वापरता येईल). 

कृती:   उडीत डाळ आणि  चणा डाळ, रात्रीच भिजवून ठेवायची.  सकाळी कणिकत खमीर मिसळून कणकीला भरपूर मळावे किमान दहा एक मिनिटे. नंतर मळलेल्या कणकीला खमीर उठण्यासाठी एक ते दीड तास झाकून ठेवा.  


सारण बनविण्यासाठी मिक्सरमध्ये, रात्र भर  भिजलेली  उडीत डाळ, चणा डाळ आले, लसूण, मिरची, काळी मिरी, जीरा पावडर टाकून जाडसर पिसून घ्या. स्वादानुसार मीठ. (पाटा-वरवांट्यावर जाडसर पिसल्या जाते). खाताना आल आणि लसणाच्या तुकड्यांचा स्वाद जिभेला आला होता. 

कढईत तेल गरम झाल्यावर. कणकीच्या गोळ्यांची पारी करून त्यात सारण टाकून हाताने, किंवा पोळी सारखे लाटून भटुरा तैयार करून, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. ज्यांना तळलेले चालत नाही. एका तव्यावर थोडे तेल लाऊन मध्यम आचेवर वर भटूरे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. हे भटुरे छोल्या सोबत खायला चांगले लागतात.  (हे भटुरे डाळींएवजी पनीर इत्यादी टाकून हि आपण करू शकतो. सारणात काय टाकायचे हे सर्वस्व आपल्यावर आहे.  कृतीत परंपरागत पद्धत दिली आहे).

(भाबरी)

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल



सक्रेणादेवीचा फोटो 


Sunday, September 4, 2016

स्वादिष्ट आटा नूडल्स






काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते.  मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण  मैदा वाले नूडल्सच्या  जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा  बाहेर पडला. 

घरात कांदे होते,  टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले.  फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील.  एक हिरवी मिरची हि घेतली.  सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले.  आमचे  चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला. 

गॅस वर  पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली.  मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली. 

गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद  आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात  घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.  

गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता. 




भाज्यांचे लोणचे


Sunday, June 19, 2016

पाव भाजीची गोष्ट



गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी  तिची दिल्लीची  पाव भाजी खाण्याची इच्छा  राहून  गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला  न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे. वयाने मोठा झालो असलो तरी  एखाद्या शैतान मुलासारखे दुसर्यांची विशेष करून बालगोपाळांची फिरकी घ्यायला अजूनही आनंद मिळतो. सौ.ला आमची कल्पना काही विशेष आवडली नाही. पण तिने विरोध हि केला नाही फक्त एवढेच म्हंटले, मी काही यात मदत करणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा. 

रविवारी सकाळी चहा पिऊन, जवळपास ६ वाजता भाज्या चिरायला घेतल्या.  घरी बाजी चिरण्यासाठी लाकडाचा ट्रे आहे. चाकूने बारीक बारीक भाज्या चिरायचे ठरविले. सर्व प्रथम ३-४ बटाटे (२५०ग्राम) बारीक चिरले, नंतर लाल भोपळा आणि दुधी भोपळा (प्रत्येकी २५० ग्राम) वरचे जाड साल काढून बारीक चिरला.  एक वांगे (वरचे साल काढून टाकले) बारीक चिरले. वांग्यामुळे भाजीला एक वेगळा तेज स्वाद येतो. एक फुलगोबी (फ्लावर-  ३०० ग्रामचे असेल) बारीक चिरले.  मटार २५०ग्राम (एक वाटी) घेतला. दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून टाकल्या. या शिवाय लोबियाच्या हिरव्या शेंगा (मराठीत काय म्हणतात माहित नाही- तश्या कुठल्याही शेंगा चालतील) बारीक चिरून टाकल्या. ५ लिटरचे कुकर भाज्यांनी भरून गेल्यावर भाज्या कापणे बंद केले.  भाज्या चिरायला १ तास लागला. 

 




आता दीड गिलास पाणी टाकून कुकर गॅस वर ठेवले.   एक पूर्ण लसूण,८-१० हिरव्या मिरच्या आणि १ इंच अदरक यांची पेस्ट  तैयार करून घेतली. अर्धा किलो टमाटर (आंबट वाले नको) आणि अर्धा किलो कांदे बारीक चिरले. या पैकी काही फोडणी साठी आणि काही नंतर सर्व करण्यासाठी. एक जुडी कोथिंबीरआणि तीन लिम्बांचे चार-चार तुकडे करून ठेवले.  दोन शिट्या   झाल्यावर कुकर गॅस वरून उतरवून घेतले. तो पर्यंत चिंकीचे  हि घरात पदार्पण झाले होते. काका कशी भाजी बनवितात आहे,हे पाहण्यासाठी स्वैपाकघरात आली. त्या वेळी मी पनीर (२५० ग्राम) बारीक चिरीत होतो. तिला पाहताच मी गुगली फेकली, म्हणालो चिंता करून नको तुझ्या आवडीच्याच भाज्या आहेत, यात फ्लावर, बटाटे, बिन्स आणि पनीर  आहे.  शिवाय माझ्या सारखा अडाणी तुझ्या सारख्या डॉक्टरीण बाईला मूर्ख बनवू शकतो का? काका तू किनई,.... म्हणत ती बाहेर पडली. तिने कुकर उघडून  पाहण्याची जुर्रत केली नाही. हायसे वाटले.  आता वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. घरात एक मोठी कढई आहे. ती गॅस वर ठेवली. २-३ डाव तेल टाकले. एक चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडलल्या वर अदरक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. नंतर कांदे घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर, टमाटर टाकले. टमाटरला तेल सुटे पर्यंत ४-५ मिनिटे लागतातच. तो पर्यंत वाट पहावीच लागते. घाई केल्यास टमाटर व्यवस्थित तळल्या जात नाही. अपेक्षित स्वाद हि मिळत नाही.  कुकर उघडून, एका पळीने भाजी ढळवून काढली.  टमाटरला तेल सुटू लागल्यावर, १ मोठा चमचा, हळद, तिखट आणि गरम मसाला आणि २ चमचे धने पूड त्यात घातली. नंतर  भाजी घातली.  आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून जास्त पाणी घातले नाही. नंतर बारीक चिरलेले पनीर त्यात घातले. एक उकळी आल्यावर तीन चमचे MDH पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ त्यात घातले. २-३ मिनिटानंतर गॅस बंद केला. कुठलाही पदार्थ झाल्यावर चिरंजीवाला स्वाद पाहण्यासाठी  बोलवतोच. त्याची पावती मिळाली म्हणजे पदार्थ चांगला झाला आहे, हे समजावे. त्यांनी टेस्ट करून पावती दिली.  मी  स्वैपाक घरातून बाहेर आलो. घामाघूम झाल्यामुळे सरळ स्नान घरात जाऊन आंघोळ केली.  तो पर्यंत सौ. ने स्वैपाकघराचा ताबा घेतला होता.  घरात काढलेल्या लोण्यात पाव परतून पावभाजी सर्व केली. 



चिंकीला  पाव भाजी भारी आवडली.  तरी हि तिने म्हंटले, मला माहित आहे काका, तुम्ही निश्चित मला न आवडणार्या भाज्या यात घातल्या असतील. आम्ही सर्व जोरात हसलो... 



Tuesday, June 14, 2016

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल



हिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील  सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो.  पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी  दिवसात तर बाहेरच्या जगाशी  संबंध हा नेहमीच तुटतो.    

या भागात  वसाहत विरळ आहे.  इथले लोक  उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे. झोल, हा तांदूळापासून बनणारा पोष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, शिवाय बनवायला अत्यंत सौपा. तांदूळा खेरीज  मक्याच्या कणसाचे दाणे किंवा सोयाबीन  इत्यादी  कडधान्याचा वापर हि झोल बनविताना होतो. नुसत्या तांदुळाचा हि झोल बनविता येतो. 

साहित्य: तांदूळ २ वाट्या (तुकडा तांदूळ जास्ती चांगला), मक्याच्या कणसाचे दाणे १ वाटी, मेथी दाने ६-७, काळी मिरी जिरे पूड १ चमचा किंवा स्वादानुसार आणि मीठ. (जिरे मिरे पुडच्या जागी  चाट मसाला हि वापरू शकतात किंवा दोन्ही हि).  लोणी काढलेली छाछ, किंवा १/२ किलो दह्याची थोड़े पानी टाकून केलेली लस्सी किंवा बाजारात मिळणारी अमूलची लस्सी ४०० gmचे २ पॅकेट.

गावात हा पदार्थ  चुल्ह्या वर बनवितात. पण शहरी माणसाजवळ टाईम नाही व शिवाय कुकर हि घरी असतोच. 

आधी मक्याच्या दाण्यांना एका खलबत्यात थोडे कुटून घ्या. एका दाण्याचे २-३ तुकडे झाले तरी चालतील.   कुकरमध्ये तांदूळ आणि मक्याचे कुटलेले दाणे आणि मेथी दाणा टाकून  दीड गिलास पाणी टाकून गॅस वर ठेवा. एक सिटी झाल्यावर गॅस बंद करून, थोडे थंड झाल्यावर भाताला पळीने घोटून घ्या. थोडी लस्सी त्यात घाला. नंतर  मंद गॅसवर ठेऊन हळू-हळू सर्व लस्सी त्यात घाला. (अंदाजाने आपल्याला जास्त पातळ आणि जास्त घट्ट झोल करायचा नाही आहे). पळीने सतत चालविणे आवश्यक आहे अन्यथा लस्सी फाटू शकते. नंतर त्यात जिरे-मिरे पूड आणि स्वादानुसार मीठ हि टाका. (सर्व करताना चाट मसाला हि टाकल्या जाऊ शकतो).  उकळी आल्यावर गॅस बंद करा.  

उन्हाळ्याच्या दिवसात हा पेय थंड करून आणि हिवाळ्यात गरमागरम पिण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात फ्रीज मध्ये दोनेक दिवस झोल सहज टिकतो. 

Saturday, April 16, 2016

पनीर पुरी



रविवारचा दिवस होता. सौ ने सकाळच्या नाश्त्या साठी छोले आणि पुरीचा बेत ठरविला होता.  छोल्यांना  फोडणी टाकली आणि पुरीची कणिक मळून ठेवली होती.  तेवढ्यात पहाटे फिरायला गेलेले चिरंजीव पनीर घेऊन घरी परतले. येताच म्हणाले आई, सकाळी नाश्त्यासाठी पनीरचे काहीतरी कर. सौने उत्तर दिले राजा, पुरीची कणिक आधीच मळलेली आहे. तो म्हणाला आई मग पनीर टाकून पुरी कर. चिरंजीवांची सूचना आमच्या सौ.ला पटली. पण या आधी सौ. ने कधी पनीरची पुरी केली नव्हती आणि मी हि कुठे खाल्ली आहे, हे आठवत नव्हते. तसे बटाटा आणि पनीरचे  परांठे  पुष्कळदा खाल्ले आहेत. सौ. ने पनीर किसले त्यात तिखट मीठ आणि चाट मसाला घातले. नंतर लक्ष्यात आले घरात कोथिंबीर नाही. कोथिंबीर एवजी १ चमचा कसुरी मेथी टाकली. नंतर मिश्रण एकजीव केले. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून ठेवले.



साहित्य:  पनीर: 200 ग्राम, कसुरी मेथी १ चमचा, १ चमचा तिखट, १ चमचा चाट मसाला आणि चिमूटभर मीठ (मिश्रणात जास्ती मीठ टाकायची गरज नाही, कारण पुरी आपण छोल्यांसोबत खाणार आहोत).

कणिक ३ वाटी पुरी साठी आणि तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार (२ वाटी).









कणकिच्या पारीत पनीरचा गोळा भरून सौ.  पुरी लाटत होती आणि मी त्या तेलात तळत होतो.  पुरी तळणे मला नेहमीच आवडते. सौ. चे हि म्हणणे आहे, तुमच्या हाताला तेल कमी लागते. यात किती तथ्य आहे, अजून तरी मला कळलेले नाही. पण एक मात्र खरं, मेहनत का फळ मीठा होता ही है.   छोल्या सोबत सौ. ने माझ्या आवडीची  सेवईची  खीर हि केली होती. 



Friday, April 1, 2016

चिंकीचे ना (आवडते सूप)




 कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती.  ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या  अपराध्यांना हुडकून काठायचा.  "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले." तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली.  आता काय उत्तर देणार तिच्या मावशी आणि काकांचे मार्क्स मिळून हि तेवढे आले नसतील. मला धर्म संकटात पाहून सौ. लगेच माझ्या मदतीला देवाप्रमाणे धावून आली. तिने चिंकीला विचारले,  चिंकी तुला कुठकुठल्या भाज्या आवडतात, एकदाचे सांगून दे, म्हणजे मला तुला आवडणार्या भाज्या बनविता येईल. चिंकी सुरु झाली, मला किनई, गाजर, दुधी, लाल भोपळा, वांग....... . तात्पर्य तिला बटाटा, गोभी, शिमला मिरची, भेंडी सोडून कुठल्याच भाज्या आवडत नव्हत्या. शेवटी, माझ्या कडे बघत म्हणाली, काका, मला मला माहित आहे, तुम्हाला भाज्या चांगल्या करता येतात, शक्कल लढवून  नावडत्या भाज्या मुलांच्या गळ्यात मारतात.  पण लक्ष्यात ठेवा मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, अस्सल मुंबईकर आहे मी. मुंबईकराने आव्हान दिल्यावर दिल्लीकर मागे का राहणार? च्यायला तिच्या नावडत्या भाज्या तिच्या गळ्यात मारण्याची तैयारी सुरु केली. तसे म्हणाल तर दिल्लीकर  दरवर्षीच्या बजेटमध्ये  नेहमीच  मुंबईकरांना मूर्ख बनवितातच. 

संध्याकाळी सौ. दारावर भाजी विकत  घेत होती. ठेल्यावर मस्त लाल टमाटर होते. हिवाळ्यात दिल्लीत लालसुर्ख मस्त टमाटर मिळतात. मला मौका मिळाला. मी विचारले, चिंकी तुला टमाटर सूप आवडते का? हो, ती म्हणाली. माझ्या डोक्यात त्या क्षणी चिंकीला कसे  मूर्ख बनविता येईल याची  आयडिया आली.

दुसर्या दिवशी रविवार होता. सर्व ताणून झोपले होते. मी नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. स्वैपाक घरात गेलो.  थोडे  भोपळा, दोन गाजर, २-३ टमाटर, आल्याचा एक छोटा तुकडा, ४-५ लसुणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि हुकमाचा इक्का म्हणून बीट्सचा एक तुकडा. सर्व साहित्य कापून थोड पाणी टाकून कुकर मध्ये  टाकले. कुकर गॅस वर ठेऊन एक शिट्टी दिली. सर्व सबूत नष्ट करण्यासाठी भाज्यांचा कचरा एका कागदात गुंडाळून  कचरा पेटीत टाकला. 

कुकर थोडा थंड झाल्यावर, थोडे पाणी टाकून सर्व शिजलेल्या मिक्सितून पातळ करून सूप एका भांड्यात काढून घेतले.  एक दुसरे भांडे गॅस वर ठेवले. दोन चमचे देसी तूप टाकून, त्यात जिरे घातले. नंतर पातळ झालेले सूप त्यात टाकले. थोडी काळी मिरीची  पूड आणि स्वादानुसार मीठ त्यात घातले. 

सकाळी सौ.ने नाश्त्या साठी उपमा केला. अर्थातच चिंकीला उपम्यात टाकलेले गाजराचे तुकडे काढून  उपमा वाढला.  पण टमाटरचे लालसुर्ख सूप, बीट्स टाकल्यामुळे सूपचा लाल रंग काही जास्तीस उठून आलेला. होता चिंकीने मिटक्या मारत  त्या स्वादिष्ट टोमाटो सूपाचा आस्वाद घेतला.   दुसर्या दिवशीतर चक्क दुधीभोपळाचे सूप फक्त २-३ टमाटर अणि बीट्सचा एक तुकडा टाकून बनविले आणि तिच्या गळ्यात मारले.   अश्या रीतीने अस्मादिकांनी  चिंकीच्या  सर्व नावडत्या भाज्या तिच्या घश्यात ओतल्या.

मुंबईला परतल्यावर चिंकीच्या आईने एकेदिवशी दुधीची भाजी केली. नेहमीप्रमाणे चिंकीने नाक मुरडले. तिची आई तिच्यावर डाफरली, च्यायला, काकांनी बनविलेले दुधीचे सूप तर तू मिटक्या मारीत पीत होती, आता काय झाले, गुपचूप  ताटात वाढलेली दुधीची भाजी  संपव मुकाट्याने. बेचारी चिंकी.


Sunday, January 17, 2016

गाजराचा शिरा




पूर्वभाग: कीस बाप्या कीस गाजर कीस

साहित्य: गाजर ४  किलो, साखर ३-४ वाटी,   दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची)  १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.

प्रारंभिक तैयारी. सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. 

संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री  ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे   भांडे  असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, छोटी इलायची आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.

जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा  बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का? ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो. 



सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले. 

दुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.    

 

Saturday, January 9, 2016

कीस बाप्या कीस गाजर कीस


ताजे ताजे गाजर हि  आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला  पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली.  मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे.  गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात).  आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील.  जिभेचा स्वाद माणसा करून काय काय करवून घेतो, निमूटपणे गाजर किसायला घेतली......


कीस बाप्या कीस
गाजर कीस.
किसता किसता
कविता हि कीस.

जिभेच्या स्वदापायी
गाजर कीस.
किसता किसता
बोट हि कीस.





लाल लाल गाजर
लाल लाल रक्त
हलव्याचा  स्वाद
लागणार मस्त.


गाजर किसताना
शेजार्याने पहिले.
गल्लीत आमचे
नाकच कापले. 

कीस बाप्या कीस
गाजर कीस
जोरु का गुलाम
गाजर कीस.






Sunday, December 20, 2015

मटार -कांदे परांठा



हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते.  गेल्या रविवारी भाजी  स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे  निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला.   मटारच्या वरील   सर्व  भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली.  साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला.  त्याचीच कृती खाली देत आहे. 

साहित्य : निवडलेले मटार २ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी,  बारीक चिरलेली कोथिंबीर -अर्धा वाटी, हिरवी मिरची -२-४ (इच्छेनुसार),   तिखट २-३ छोटे चमचे, जिरेपूड १ छोटा चमचा,, मिरे पूड १ छोटा चमचा, हळद १ छोटा चमचा  आणि  चाट मसाला (१ मोठा चमचा ) [चाट मसाला टाकला कि इतर मसाले टाकायची आवश्यकता नसते आणिक स्वाद हि मस्त येतो], मीठ स्वादानुसार [ चाट मसाल्यात हि मीठ असते, हे लक्षात ठेवावे].  तेल २ चमचे. 

कणिक चार वाटी  परांठ्यांसाठी आणि देसी तूप किंवा तेल परांठ्यांना लावण्यासाठी.

कृती: गॅसवर कढई ठेऊन २ चमचे तेल घालून, त्यात  मटार आणि हिरवी मिरची परतून, २ मिनिटासाठी झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी.  नंतर थंड झाल्यावर मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.   बारीक वाटलेल्या मटार मध्ये तिखट, जिरे, मिरे पूड, हळद  , चाट मसाला, मीठ,  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून  परांठ्यांत भरण्यासाठी गोळे मळून घ्यावे. 

आता मळलेल्या कणकीची पारी बनवून त्यात  त्यात वरील मिश्रणाचे गोळे भरून परांठा लाटून, तव्यावर चारीबाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.

ज्याना तूप कमी खायचे असेल त्यांच्या साठी - तव्यावर पोळीसारखा परांठा भाजून नंतर गर्मागरम परांठ्यावर थोडे तूप लाऊन  गर्मागरम परांठा  वाढवा. 

टीप:तुपा एवजी तेल हि वापरू शकतात.

हा परांठा दही आणि हिरव्या चटणी सोबत मस्त लागतो.  सौ. ने दही आणि आवळ्याच्या हिरव्या चटणी सोबत परांठा वाढला. 






Wednesday, November 25, 2015

सकाळचा नाश्ता : अरबी(अळू) परांठा, स्पेशल रेड सूप आणि आंवळा चटणी




काल संध्याकाळी लेक माहेरी आली.   तिचे सासरे नुकतेच हिमाचलच्या आपल्या गावातून दिल्लीला परतले होते. लेकी सोबत एक पिशवीभर अरबी आणि आले (त्यांच्या सीढ़ीदार शेतातले– शुद्ध नेसर्गिक) पाठविले होते. आज सकाळी उठल्यावर ती म्हणाली आज सकाळचा नाश्ता मी बनविणार. (लेकी माहेरी आराम करायला येतात, पण माहेरी आल्यावर काम करायचा उत्साह का संचारतो, कधीच कळत नाही) असो. पराठा, सूप आणि चटणी असे करायचे ठरले.




घरात दुधी होती, टमाटर महाग असल्यामुळे १/२ किलोच आणले होते. पण लाल सुर्ख लौह तत्वाने भरपूर बिट्स हि घरात होते. सूप म्हंटले कि लाल रंग हा पाहिजेच.  तिने सर्व वस्तू एकदम बनवायला सुरुवात केली (कसे जमते तिला, मला कधीच कळले नाही) .


आंवळा चटणी (साहित्य): साहित्य  आंवळे ५-६, कोथिंबीर, हिरवी मिरची २, आले  १/ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, जिरे १/२ मोठा चमचा, १/२ काळीमिरी पूड, हिंग १/२ लहान चमचे, गुळ एक लहान तुकडा, ओले खोबरं २ चमचे आणि मीठ स्वादानुसार.


प्रथम आवळ्यांच्या बिया काढून चिरून घेतले. नंतर  खोबर, कोथिंबीर, आले, लसून, चिरे, हिंग, गुळ आणि मीठ इत्यादी सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घेतले.  आवळ्याची चटणी तैयार झाली.



स्पेशल रेड सूप (साहित्य): अर्धा किलो दुधी भोपळा, १/२ बिट्स (चुकुंदर), २ टोमाटो, २ आवळे, गाजर २ लहान. या शिवाय  आले १/२ इंच, (१/२ चमचे जिरेपूड, १/२ चमचा काळी मिरी पूड, हिंग १/२ छोटा चमचा, मीठ स्वादानुसार.


कृती: दुधी भोपळा, गाजर, बिट्स, आवळा, टमाटरचे तुकडे करून १ गिलास पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घेतले. कुकरचे झाकण उघडून त्यात १ गिलास थंड पाणी टाकले. घरी हाताचे मिक्सर असल्यामुळे कुकरमध्येच फिरवून घेतले.  सूप जास्त पातळ करायची गरज नाही किंवा गाळून घेण्याची हि नाही. नंतर त्यात आले किसून जिरे, काळी मिरी आणि हिंगाची पूड हि टाकून कुकर गॅस वर ठेऊन एक उकळी काढून घेतली.   

अरबी परांठा (साहित्य): अर्धा किलो अरबी, १/२ बिट्स (चुकुंदर),२ कांदे, ५-६ लसणाच्या पाकळ्या, ३-४ हिरव्या  लसणाच्या दांड्या, कोथिंबीर  १/२ जुडी, ३-४ हिरव्या मिरच्या  (मोठा चमचा: १/२ चमचे जिरे, १ ओवा, १०-१५ काळीमिरी दाणे यांची पूड करून घेतली), १ चमचा धने पूड, १ चमचा अमचूर, २ चमचे चाट मसाला, १/२ चमचे हळद, १/२ चमचे तिखट  आणि मीठ स्वादानुसार.

शिवाय तीन वाटी कणिक. पराठ्यांसाठी.          

कृती: (पराठ्याचे सारण): प्रथम गॅस वर अरबी उकळून घेतली. थंड झाल्यावर अरबीचे साल काढून, अरबी किसून घेतली. बिट्स हि किसून घेतले. कांदा, कोथिंबीर, हिरवे लसूण, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. सर्व मिश्रण एकत्र करून त्यात धने, अमचूर, चाट मसाला, जिरे-ओवा-काळीमिरीची पूड आणि  हळद टाकून मिश्रण एकजीव केले.  (तिखट खाणारे  जास्त तिखट हि टाकू शकतात).  हे झाले पराठ्याचे सारण.



आता जसे बटाट्याचे पराठे करतो त्याच प्रमाणे कणकीच्या गोळ्यात भरपूर सारण भरून, पोळी लाटून तव्यावर तेल/ तूप सोडून खरपूस परांठे भाजून घ्या.