Wednesday, March 15, 2023

मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले.  पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता.  मुगाच्या डाळीत  उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर  लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो. मनात विचार आला उपमा प्रमाणे  भाजलेल्या मूगाच्या डाळीचे सूप ही पाच मिनिटांच्या आत निश्चित बनू शकते. मग काय. संध्याकाळी  तीन -चार चमचे मुगाची डाळ कढईत मंद गॅस वर रंग बदले पर्यन्त भाजली. बहुतेक पाच मिनिटे लागली असतील. थंड झाल्या वर मिक्सर मध्ये डाळीचे पावडर करून घेतले. गॅस वर एका भांड्यात चार कप पाणी ठेवले. पानी थोडे गरम होताच, भाजलेल्या डाळीचे तीन चमचे पावडर पाण्यात ढवळले.  गॅस वर  सूप  उकळू दिले. तो पर्यंत थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. दोन मिनिटांत पाण्याला उकळी येताच गॅस मंद केला, त्यात स्वादानुसार मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर टाकले. गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकली. दोन चमचे सूप आमच्या चिरंजीवाला स्वाद तपासायला दिले. त्याने  आंगठा वर करून उत्तम स्वादाचे प्रमाणपत्र दिले. बाकी तो आठ-दहा वर्षांचा होता तेंव्हा पासून माझ्या पाकशास्त्राचे प्रयोग आधी त्याच्यावरच करतो. काही कमी जास्ती असेल तर तो सांगतो.

 सूप पिण्यासाठी तीन बाउल घेतले (एक माझ्यासाठी, एक सौ आणि एक चिरंजीव साठी). मला तूप आवडते म्हणून चहाच्या चमच्या एवढे तूप सूपात घातले. चित्रात तूप वर तरंगताना दिसत आहे. तूप घातल्याने चव वाढते असे माझे मत आहे. पण आमची सौ. त्यावर सहमत नाही. असो.  

बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल. या सूपाला तूप जिर्‍याची फोडणी ही देऊ शकतात. ज्यांना तिखट आवडते ते थोडे तिखट किंवा लाल मिरची घालू शकतात. याशिवाय चिंच गूळ टाकून  मूग/तुरीची डाळ भाजून पावडर करून इन्स्टेंट सार किंवा आमटी ही बनविता येऊ शकते. अजून प्रयोग करून बघितला नाही आहे.  बाकी आज दोन वाटी मूगची डाळ भाजून बरणीत भरून ठेवणार आहे. 



No comments:

Post a Comment