Showing posts with label समर्थ विचार. Show all posts
Showing posts with label समर्थ विचार. Show all posts

Tuesday, September 8, 2026

दासबोध: - दशक १७, समास ६, देहात्मनिरूपण

 

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या सतराव्या दशकात "प्रकृतिपुरुष" हा विषय हाताळला आहे. जड सृष्टी म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे पुरुष अर्थात आत्मा. यांचा संबंध. समर्थ देहात्मनिरूपण समासात सांगतात की जो पर्यन्त जीवात्मा हा देहाशी जोडलेला (देहबुद्धीयुक्त) असतो, तोपर्यंत त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यू, वार्धक्य, रोग हे सर्व भोगावेच लागते. मग प्रश्न येणारच देह बंधंनातून जीवत्म्याला मुक्ति काशी मिळणार. मग आपल्या शरीरात आत्मा आपण कसा ओळखणार.
 
मुंडूक उपनिषद मध्ये ऋषि म्हणतात: द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते । ...अर्थात दोन सुंदर पक्षी नेहमी एकत्र राहणारे, परस्परांचे जिवलग मित्र (सखा) असलेले एकाच वृक्षावर बसलेले असतात. त्यांतील एक पक्षी त्या वृक्षाची गोड-कडू फळे चाखत राहतो, म्हणजे सांसारिक सुख आणि दुख भोगत राहतो; तर दुसरा पक्षी कोणतेही फळ न खाता, केवळ शांतपणे पाहत राहतो, साक्षीभावाने. हा वृक्ष म्हणजे शरीर. जो पक्षी फळे खात राहतो तो म्हणजे मनाने अर्थात देहबुद्धीने बांधलेला जीवात्मा, सुख-दुःखांचा भोक्ता, कर्मफळांत गुंतलेला "मी". जो पक्षी न खाता निव्वळ पाहत राहतो तो म्हणजे परमात्मा. कर्मबंधनातून मुक्त होऊन आपल्याला परमात्म्याशी जवळीक साधायची आहे. या समासात हाच भाव सामान्य माणसाला समजणार्‍या भाषेत समर्थांनी सांगितलं आहे.
 
या दोन पक्ष्यांचे उदाहरण आजच्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण एखादा चित्रपट पाहताना ज्याप्रमाणे पडद्यावरील घटनांशी भावनिकरीत्या इतके गुंततो की स्वतःला त्या कथेचाच भाग समजू लागतो, तो झाला "फळ चाखणारा" पक्षी. पण जेव्हा चित्रपट संपतो आणि आपण थिएटरबाहेर येतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण फक्त 'प्रेक्षक' होतो, कथेतील पात्र नव्हतो. हा जो 'साक्षीभाव' आहे, तोच दुसरा पक्षी म्हणजे परमात्मा.  रोजच्या आयुष्यात राग, मत्सर, मोह यांच्या प्रसंगी आपणही अनेकदा 'पात्र' बनून जातो; पण थोडे थांबून, श्वास घेऊन 'हे माझ्या मनात घडते आहे, मी ते फक्त पाहतो आहे' असे जाणणे,  हाच साक्षीभावाचा सराव आहे.
 
"आत्मा देहाअध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो ।
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥"
 
आत्मा शरीरात राहतो, त्याच्याद्वारे सुख-दुःखे भोगतो आणि शेवटी अचानक शरीर सोडून निघून जातो. देह हे तात्पुरते वास्तव्यस्थान आहे, कायमचे घर नाही. समर्थ पुढे म्हणतात,
 
"ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म ।
नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥ ६ ॥"
 
हा दोन दिवसांचा, क्षणभंगुर भ्रम आहे, त्यालाच लोक परब्रह्म समजून बसतात आणि नाना प्रकारच्या सुख-दुःखाच्या गोंधळालाच "मी" म्हणून स्वीकारतात. हे आजच्या सोशल मीडियावरील "परफेक्ट लाईफ"सारखेच आहे. फोटो, लाईक्स, रील इत्यादि पाहून दुसर्‍यांना आपले खरे स्वरूप कळणे शक्यच नाही. आपल्यालाही वाटते तेच "आपण" आहोत. पण उद्या तब्येत बिघडली किंवा परिस्थिती पालटली, तर ती ओळखच कोसळते. आपल्या खर्‍या स्वरूपाशी आपला साक्षात्कार होतो.
 
उदाहरणार्थ, एखाद्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे हजारो फॉलोअर्स असतात, त्याचे आयुष्य 'परफेक्ट' भासते. पण त्याच व्यक्तीला जर अचानक एखादा गंभीर अपघात झाला, किंवा नात्यात मोठा तुटवडा आला, तर तेच फॉलोअर्स, त्या लाईक्स, कोणीही प्रत्यक्ष दुःखात सोबत देऊ शकत नाहीत. ती चकचकीत प्रतिमा ही केवळ एक क्षणभंगुर मुखवटा असते; आतला खरा 'मी' त्या प्रतिमेपेक्षा वेगळाच असतो, हे तेव्हा उमगते.
 
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केलेले संसारिक सुख-दुःखांचे स्वरूप मानवी देह आणि त्याच्या मर्यादांवर आधारित आहे. तरुणपणी शरीरात ताकद आणि सौंदर्य असते, तोवर माणूस नानाविध भौतिक सुखे उपभोगतो आणि स्वतःचे अस्तित्व, पद किंवा सौंदर्याच्या गर्वात वावरतो. मात्र, वृद्धापकाळात किंवा प्रतिकूल परिस्थितीत हेच शरीर अशक्त होते, अवयव साथ देईनासे होतात आणि माणूस इतरांवर अवलंबून राहतो. दैनंदिन आयुष्यातही पूर्ण सुख कधीच मिळत नाही; जुन्या काळात ढेकूण, माश्या आणि उंदरांचा त्रास जसा माणसाला छळायचा, तसाच आजच्या काळात वीज जाणे, भेसळयुक्त अन्न, कामाचा ताण, क्रेडिट कार्ड आणि किस्त देण्याची चिंता किंवा नात्यांमधील दुरावा यांसारख्या रोजच्या लहान-मोठ्या समस्या माणसाला अस्वस्थ करतात.
 
याचे आणखी एक साधे उदाहरण म्हणजे, नोकरीच्या सुरुवातीच्या काळात तरुण मंडळी नवीन पगारात मोठी स्वप्ने रंगवतात,  नवी गाडी, मोठे घर, परदेशवारी. पण काही वर्षांनी हप्ते (EMI), मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची काळजी, आणि कामाच्या ठिकाणची स्पर्धा यांचे ओझे वाढत जाते. जे सुख कमावण्यासाठी इतकी धावपळ केली, तेच सुख हाती येईपर्यंत नवीन चिंता निर्माण होतात. हाच 'दों दिसांचा भ्रम' आहे.  सुख मिळाल्यासारखे वाटते, पण ते टिकत नाही, त्याची जागा लगेच दुसरी चिंता घेते.
 
मृत्यूसमयीचे साम्य
 
पुढे समर्थ सांगतात मृत्यूसमयीचे दैन्य व लाचारी श्रीमंत-गरीब किंवा राजा-रंक सर्वांना सारखीच असते. देहावर उभी असलेली प्रतिष्ठा, मग ती आजच्या भाषेत बँक बॅलन्स असो, सोशल मीडियावरचा स्टेटस असो, की शारीरिक सौंदर्य असो, शेवटी काहीही टिकत नाही. मृत्यूचा क्षण अत्यंत कठीण असतो; शरीरातून प्राण सहज जात नाहीत. म्हणूनच अज्ञानात न राहता, या नश्वर देहालाच सर्वस्व मानणाऱ्या 'देहबुद्धीच्या' पलीकडे जाऊन शाश्वत तत्त्वाकडे (आत्मज्ञानाकडे) लक्ष द्यावे, हाच समासाचा सार आहे.
 
तरुणपणी सुखांचा उपभोग घेत तो स्वतःची किंमत या नश्वर गोष्टींमध्येच शोधत असतो. पण वयाच्या उत्तरार्धात किंवा अचानक आलेल्या एखाद्या गंभीर आजारपणात हे चित्र पूर्णपणे बदलते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमुळे ते ग्लॅमर ओसरते, सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि डिजिटल स्टेटस त्याला आजाराच्या वेदनेतून वाचवू शकत नाहीत. अचानक कंपनीत 'ले-ऑफ' झाला किंवा नोकरी गेली, तर ती प्रतिष्ठा एका रात्रीत निघून जाते. गंभीर आजारपणात जेव्हा आयसीयूमध्ये (ICU) व्हेंटिलेटरवर पडून राहावे लागते, तेव्हा कोट्यवधींचा बँक बॅलन्स असणारा श्रीमंत असो वा सामान्य व्यक्ती, मृत्यूसमयीचे दैन्य आणि लाचारी दोघांसाठीही अगदी सारखीच असते. आयुष्यभर ज्या देहाला, सौंदर्याला आणि पदाला तो स्वतःचे अस्तित्व ('मी') समजत होता, ते किती क्षणभंगुर होते याची जाणीव त्याला शेवटी हताश झाल्यावर होते. देहावर आधारित सुख आणि अहंकार हे शेवटी असमाधान आणि दुःखातच संपतात, हेच यावरून स्पष्ट होते.
इतिहासातही याची अनेक उदाहरणे सापडतात. मोठमोठे सम्राट, ज्यांच्या एका आदेशावर लाखो लोकांचे भवितव्य ठरत असे, तेही शेवटी एका साध्या तापाने किंवा वृद्धापकाळाने खितपत पडलेले दिसतात. आजच्या काळातही, मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा सेलिब्रिटींना जेव्हा गंभीर आजार होतो, तेव्हा त्यांचे पैसे उत्तम उपचार मिळवून देऊ शकतात, पण मृत्यूचा अंतिम क्षण, ती शारीरिक वेदना आणि हतबलता टाळू शकत नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की देहावर आधारित कोणतीही श्रीमंती किंवा प्रतिष्ठा शेवटी तात्पुरतीच ठरते.
 
कर्मयोगाचा मार्ग
 
जर देवाने आपल्याला देह दिला आहे तर सुख आणि दुख येणारच मग माणसाने या जगात जगावे कसे भगवद्गीतेत भगवंत म्हणतात:
 
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥
 
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्तव्यकर्म करताना त्याच्या फळाची (सुख मिळेल की दुःख, जिंकू की हरू) चिंता न करता, समबुद्धीने कर्म करावे. हीच स्थितप्रज्ञतेची सुरुवात आहे. मन सुख-दुःखाच्या हेलकाव्यांपासून अलिप्त राहिले, तरच खरी शांती आणि कर्मयोग साधतो. आपल्या आत्म्याशी आपली ओळख होते.
 
याचे एक व्यावहारिक उदाहरण म्हणजे एखादा खेळाडू. सामना जिंकणे किंवा हरणे हे त्याच्या हातात पूर्णपणे नसते.  प्रतिस्पर्धीचा खेळ, नशीब, पंचांचे निर्णय असे अनेक घटक कारणीभूत असतात. पण जो खेळाडू केवळ स्वतःच्या सरावावर, तंत्रावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो, आणि निकालाची फारशी चिंता न करता खेळत राहतो, तोच दीर्घकाळ स्थिर राहतो आणि खरा आनंद घेतो. हरल्यावर कोसळत नाही आणि जिंकल्यावर हुरळून जात नाही. हीच वृत्ती स्थितप्रज्ञतेच्या जवळ जाणारी आहे.  फळाची आसक्ती सोडून कर्तव्य चोख करणे.
 
देहात्मनिरूपण समासात समर्थांनी एकच मूलभूत सत्य वेगवेगळ्या उदाहरणांतून संगितले आहे. देह हा नाशवंत, बदलणारा आणि सुख-दुःखाने भरलेला आहे, आणि याच देहाशी बांधलेल्या, सतत सुख-दुःखात हेलपाटणाऱ्या जीवभावालाच अज्ञानी लोक चुकून "परब्रह्म" किंवा आपली खरी, कायमची ओळख समजून बसतात. परब्रह्म म्हणजे आपले खरे, शाश्वत स्वरूप. कधीही नाश न पावणारे, दुःखरहित आणि स्तुती-निंदेच्या पलीकडचे आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, आपण देह, त्याची सुख-दुःखे आणि त्यावर आधारित तात्पुरत्या ओळखी यांना अवाजवी महत्त्व न देता, त्यांच्या पलीकडे असलेल्या स्थिर आत्मतत्त्वाकडे विवेकाने लक्ष द्यावे. साधकाला जर जन्म मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे असेल तर, मृत्यू येण्यापूर्वी आपले मन देहातून काढून घ्यावे आणि मुक्त व्हावे. हाच खरा आत्म साक्षात्काराचा मार्ग आहे. समर्थांच्या शब्दांत:
 
ऎसें जयास ज्ञान जालें । तयाचें बंधन तुटलें ॥
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेकें ॥१४॥(आत्माराम)
 
असा ज्याला स्वरूपसाक्षात्कार झाला त्याचे सर्व बंधन तुटलें, तो मुक्त झाला. हे बंधन वास्तविक नसून केवळ काल्पनिकच असल्याने, खरे पाहता कोणालाच ते नाही. परंतु अज्ञानाने 'मी जीव मज बंधन' या अविवेकाच्या भ्रांतीने, या जीवांनी आपल्याला संसारात दृढ बांधून घेतले आहे.
 
याचे एक सोपे उदाहरण म्हणजे स्वप्नात एखाद्याला वाघाने पकडले आणि तो घाबरून ओरडतो, घाम फुटतो.  पण जागा झाल्यावर त्याला कळते की तो वाघ, ती भीती, सगळे स्वप्नातलेच होते, प्रत्यक्षात काहीच घडले नव्हते. त्याचप्रमाणे देहबुद्धीचे बंधन हे एक प्रकारचे 'जागृत स्वप्न' आहे. ज्याला आत्मज्ञान होते, तो या स्वप्नातून जागा होतो आणि त्याला कळते की बंधन कधी खरे नव्हतेच,  ते फक्त अज्ञानामुळे खरे भासत होते. हीच समर्थांची शिकवण आजच्या काळातही तितकीच लागू पडते: बाह्य गोष्टींच्या मागे धावताना, आपल्या आतल्या शाश्वत, अविनाशी स्वरूपाचा विसर पडू देऊ नये.

Tuesday, August 18, 2026

ईशोपनिषद आणि पर्यावरण: शाश्वत जगण्याचा वैदिक मार्ग

 
 

 
आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगतीचे शतक मानले जाते. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विज्ञानाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. परंतु, या तथाकथित प्रगतीच्या अंधाधुंद धावण्यात आपण ज्या निसर्गाच्या कुशीत जन्मलो, त्यालाच ओरबाडत चाललो आहोत. हवामान बदल, जलसंकट आणि वाढते प्रदूषण यांमुळे आज मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्वच धोक्यात आले आहे. या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्याचा आणि प्रगतीसोबतच निसर्गाचे रक्षण करण्याचा जादुई मंत्र हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी उपनिषदांच्या माध्यमातून देऊन ठेवला आहे. 'ईशावास्य उपनिषद' (ईशोपनिषद) आपल्याला केवळ अध्यात्म शिकवत नाही, तर निसर्गाचा आदर करून जगण्याचा खरा 'शाश्वत मार्ग' (Sustainable Way of Life) दाखवते.
 
वैदिक विचार आणि शांतीपाठ
 
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ 
(शांतीपाठ)

ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्॥१॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे॥२॥
[ईशोपनिषद (मंत्र १ व २)]
 
'ईशोपनिषद' हे शांतीपाठाने सुरू होते. ऋषी म्हणतात की, त्या ईश्वरीय पूर्णातून हे जगद्रूपी पूर्ण निर्माण झाले तरी ते पूर्णच शेष राहिले. उपनिषदाच्या पहिल्या मंत्रात ऋषी अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात-‘त्यागपूर्वक उपभोग घ्या’. दुसऱ्याच्या वाट्यावर किंवा हक्कावर गदा आणू नका. परमेश्वराने प्रत्येक जीवासाठी या सृष्टीत एक वेगळा आणि निश्चित वाटा ठेवला आहे; आपल्या वाट्याला आलेल्या घटकांचा कृतज्ञतेने उपभोग घेत प्रत्येक जीवाला इथे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसऱ्या मंत्रात ऋषी पुढे म्हणतात की, अशा रीतीने निसर्गाचा आदर करत जर तुम्ही कर्म केले, तर शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरली तरीही कर्मबंधने मानवाला बांधू शकत नाहीत.
 
उपनिषदकार ऋषींना “मंत्रदृष्टा” का म्हणतात, हे ईशोपनिषद वाचल्यावर सहज समजते. त्यांच्यात भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची अलौकिक क्षमता होती. निसर्गाच्या नियमानुसार विधात्याने निर्माण केलेली ही पृथ्वी आणि त्यावरील समस्त जीवसृष्टी कधी ना कधी नष्ट होणार, हे जरी अंतिम सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने पूर्ण आनंदाने व समाधानाने जगले पाहिजे. त्यासाठीच या मंत्रदृष्ट्या ऋषींनी या मंत्रांद्वारे आपल्याला जगण्याचा आदर्श मार्ग दाखवला आहे.
 
निसर्गाचे अनुकूल संतुलन आणि मानवी स्वार्थ
 
अग्नी, वायू, जल आणि माती या तत्त्वांपासून पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झाली. पृथ्वीवरील आजचे वातावरण, हवा, पाणी, ऊर्जा आणि माती यांचे संतुलन मानव आणि सध्या अस्तित्वात असलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अत्यंत अनुकूल आहे. जोपर्यंत हे वातावरण अनुकूल राहील, तोपर्यंतच मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवर टिकून राहील.
 
परंतु, आजचा माणूस स्वतःला बुद्धिमान आणि काही वेळा निसर्गापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला आहे. आपल्या अवाजवी स्वार्थासाठी वातावरणात अनैसर्गिक बदल करण्याची घातक क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या सुखासाठी इतर मूक प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वार्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे समजत नाहीये की, जर पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले, तर मानवजातही टिकणार नाही. निसर्गाचा हा समतोल बिघडल्यास आपल्याच कर्माचे भयानक परिणाम मानवाला भोगावे लागतील. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे, जेणेकरून मानवजात आपले अस्तित्व टिकवून आपली शंभर वर्षे जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल? याचे अप्रतिम मार्गदर्शन ऋषींनी केले आहे.
 
‘निर्मिती’ विरुद्ध ‘उत्पादन’ आणि त्यागाचा सिद्धांत
 
‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ (रोटी, कपडा और मकान) या आपल्या तीन मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि त्यांचा ‘उपभोग’ घेतो. आज आपण निसर्गाचा कोणताही विचार न करता, केवळ मानवी फायद्यासाठी कच्च्या मालापासून नवीन वस्तू बनवतो (उदा. प्लास्टिक, रासायनिक पदार्थ). आपण यालाच निर्मिती किंवा उत्पादन समजतो. परंतु, ऋषी खऱ्या “उत्पादनाचा” (True Production) अर्थ सांगताना म्हणतात, खरे उत्पादन तेच आहे जे ‘शाश्वत’ (Sustainable) असते, ज्याच्यामुळे निसर्गाचे चक्र तुटत नाही आणि पर्यावरणाची झालेली हानी भरून काढली जाते; अर्थात ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत नाही.
 
आता मनात प्रश्न निर्माण होणारच की, निसर्गाचे संतुलन न बिघडवता कोणत्याही वस्तूची निर्मिती करणे माणसाला कसे शक्य आहे? कारण मानवी निर्मितीमुळे वातावरणात काही ना काही बदल हा होतोच. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, आपण जे काही उपभोगतो, “त्याचा त्याग करा.” याचा अर्थ असा की, आपण निसर्गाकडून जे काही घेतो, त्याचा योग्य प्रमाणात त्याग करणे गरजेचे आहे. म्हणजेच, निसर्गाकडून जे घेतले, ते दुसऱ्या स्वरूपात निसर्गाला परत दिले पाहिजे.  हे कसे शक्य आहे, हे समजून घेण्यासाठी आपण निसर्गातीलच काही उदाहरणे पाहूया:

  • झाडे आणि वनस्पती: जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात, परंतु बदल्यात आपली पिकलेली पाने जमिनीवर गाळून मातीला पुन्हा सुपीक (खत) करतात. तसेच ती वातावरणाला प्राणवायू (ऑक्सिजन) देतात आणि पावसाचे पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात.
  • प्राणी: जनावरे निसर्गातील चारा खातात आणि विष्ठेच्या (शेणाच्या) स्वरूपात उत्कृष्ट सेंद्रिय खत जमिनीला पुन्हा परत करतात. यामुळे निसर्गाचे चक्र आणि संतुलन अविरत कायम राहते.
 
मानवाचे निसर्गविरोधी वर्तन आणि त्याचे दुष्परिणाम
 
याउलट आपण काय करतो? आपण जेवढी प्रगती करत आहोत, तेवढे निसर्गचक्र अधिक असंतुलित करत आहोत आणि त्याचे गंभीर परिणामही भोगत आहोत. हे चक्र जर असेच सुरू राहिले, तर पृथ्वीवरील मानवजात एक दिवस नष्ट होईल आणि विधात्याने दिलेले १०० वर्षांचे आयुष्य आपण जगू शकणार नाही. आपल्या वाढत्या गरजांमुळे आपण खालील प्रमुख घटकांमध्ये असंतुलन निर्माण केले आहे:

१. लाकडाचा अनिर्बंध वापर आणि जंगलतोड: झाडे वातावरणातील दूषित वायू शोषून घेऊन हवा शुद्ध करतात आणि हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढवतात. मानव आपल्या वाढत्या गरजांसाठी (जळण, फर्निचर, इमारती) मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरतो. याशिवाय, देशाच्या विकासासाठी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि विविध पायाभूत उद्योग उभे करताना मोठ्या प्रमाणावर जुनी व घटstandard झाडे कापली जात आहेत.

शासनाचे प्रयत्न (One for Ten Tree Plantation): विकासाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी सरकारने ‘एका झाडाऐवजी दहा झाडे लावणे’ ही महत्त्वपूर्ण आणि बंधनकारक योजना सुरू केली आहे. यामुळे तोडलेल्या झाडांची नुकसानभरपाई तर होत आहेच, शिवाय लोकांमध्येही वृक्षारोपणाची जाणीव वाढली आहे.

सामाजिक पुढाकार: उदाहरणार्थ, आचार्य बाळकृष्ण आपला वाढदिवस 'जडी-बुटी दिवस' म्हणून साजरा करतात आणि त्यांचे अनुयायी त्या आठवड्यात लाखो औषधी वृक्ष आणि वनस्पतींची लागवड करतात. अश्याच सामान्य लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारताचे हरित क्षेत्र (Green Cover) १८ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा एक आदर्श मेळ देशात साधला जात आहे.
 
२. वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील संकट: पृथ्वीच्या पोटातून कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ काढून मानव वातावरणात विषारी वायू उधळत आहे. या दूषित वायूचे परिणाम आज आपण आजारांच्या रूपाने भोगत आहोत. वायू प्रदूषण ही आजच्या काळातील एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या आजारांमुळे (जसे की श्वसनसंस्थेचे रोग, हृदयरोग, निमोनिया आणि फुफ्फुसांचे आजार) भारतात दरवर्षी किमान १८ लाख लोकांचा मृत्यू होतो; आणि दुर्दैवाने ही संख्या दरवर्षी वाढतच जाणार आहे. झाडे काही प्रमाणात हवेचे प्रदूषण दूर करू शकतात, पण जर आपल्याला निसर्गाची ही हानी पूर्णपणे भरून काढणे शक्य नसेल, तर या विनाशकारी जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuels) वापर आपण कमी केला पाहिजे.  यासाठी भारत सरकारने उचललेली पाऊले:
 
अपारंपरिक ऊर्जेची क्रांती: भारत सरकार या बाबतीत सकारात्मक पावले टाकत आहे. गेल्या १० वर्षांत भारताने सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून, ऋषींनी सांगितलेल्या 'निसर्गाला धक्का न लावता केलेल्या आदर्श उत्पादनाचे' हे उत्तम उदाहरण आहे. या काळात देशातील सौर ऊर्जेचे उत्पादन तब्बल १५ पटीने वाढून १०० गिगावॉट (GW) पर्यंत पोहोचले आहे, तर पवन ऊर्जाही २६ गिगावॉटवरून ४६ गिगावॉट झाली आहे. शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आता गावागावांमध्ये ‘हर घर सौर घर’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे, ज्यामुळे ग्रामीण भाग ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे.

इतर गैर-पारंपरिक स्रोत: सौर आणि पवन ऊर्जेव्यतिरिक्त जलविद्युत ऊर्जा, जैवभार ऊर्जा (Biomass), बायोगॅस, भू-औष्णिक ऊर्जा (Geothermal), सागरी लाटांची ऊर्जा (Tidal) आणि 'ग्रीन हायड्रोजन' यांसारख्या प्रदूषणमुक्त मार्गांचा वापर वाढवला जात आहे. यामुळे निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता ऊर्जा मिळवणे शक्य होत आहे, परंतु ही फक्त सुरुवात असून अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.
 
३. पाण्याचे प्रदूषण आणि जलसंकट: विहिरी किंवा बोअरवेलद्वारे जमिनीखालचे पाणी उपसणे म्हणजे 'उपभोग' आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरवून ते पुन्हा पृथ्वीला देणे म्हणजे 'त्याग'. पाण्याच्या शाश्वत उपयोगासाठी हे संतुलन साध्य करणे गरजेचे होते, पण ते बिघडल्यामुळे आज मोठे जलसंकट उभे राहिले आहे.

शेतीमधील अति-वापर: शेतीमध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी आपण गहू, तांदूळ आणि ऊस यांसारखी नगदी पिके (Cash Crops) घेण्यावर भर देत आहोत, ज्यांना अफाट पाणी लागते. रासायनिक खते, कीटकनाशके आणि जिवाणूनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीखालील पाणी आणि नद्यांचे स्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. नद्यांचे पाणी पिण्यालायक सोडा, आता अंघोळीसाठीही योग्य राहिलेले नाही.

शहरी जीवनशैलीतील अपव्यय: शहरांमधील आधुनिक घरांमध्ये पाण्याचा अपव्यय कमालीचा वाढला आहे. बाथटब, कुलर, पाश्चात्य पद्धतीची स्वच्छतागृहे आणि रोज तीन-तीन वेळा कपडे धुण्याची सवय यांमुळे पाण्याचा वापर प्रमाणाबाहेर वाढला आहे. रासायनिक साबण आणि कारखान्यांतून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जलवाहिन्या मृत होत आहेत.

परिणाम: या दुहेरी मार्यामुळे भूजल पातळी (Groundwater Level) प्रचंड खाली गेली असून, अनेक ठिकाणी ३०० फुटांपेक्षाही जास्त खोल बोअरवेल खणाव्या लागत आहेत. या अति-उपशामुळे शेतजमिनीचा पोतही बिघडत चालला आहे. जर हीच परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पंजाबसारखी देशातील अत्यंत सुपीक जमीनही येत्या काही वर्षांत वाळवंट बनण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल.

जलसंकटावर आवश्यक उपाययोजना
 
ऋषींच्या "निसर्गाकडून जे घेतले, ते परत दिले पाहिजे" या नियमानुसार, खालील उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे:

1.  शेती क्षेत्रातील सुधारणा (Agricultural Reforms): ऊस आणि गव्हासारख्या पिकांना मोकळे पाणी देण्याऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन वापरणे बंधनकारक केले पाहिजे, ज्यामुळे ५०% पाण्याची बचत होते. तसेच, टंचाईच्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्ये, तेलबिया किंवा भरडधान्ये (ज्वारी, बाजरी) घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.

2.  सेंद्रिय शेतीला प्राधान्य: रासायनिक खतांना पर्याय म्हणून शेतीत शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय (ऑर्गेनिक) खतांचा व जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकून राहते.

3.  पाण्याचे ऑडिट आणि जलसंधारण: प्रत्येक गावात 'Water Audit' करून पिके ठरवली पाहिजेत. तसेच पावसाचे पाणी अडवण्यासाठी 'जलयुक्त शिवार' सारख्या योजना आणि ग्रामीण भागात सांडपाण्यासाठी 'शोष खड्डे' (Soak Pits) मोठ्या प्रमाणावर तयार केले पाहिजेत.

4.  शहरी भागातील कायदेशीर उपाय: शहरांमधील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेसाठी (Housing Society) सांडपाण्याचा पुनर्वापर (Mandatory Water Recycling) आणि इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे (Rainwater Harvesting) कायद्याने सक्तीचे केले पाहिजे. उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचा पुनर्वापर (त्याग) केला नाही, तर येणारी पिढी पाण्यासाठी तडपडेल.
 
वन्यजीव संवर्धन आणि मानवी सहअस्तित्व: 

ऋषी म्हणतात की, या सृष्टीतील प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार आहे, कारण पृथ्वीवरील सर्वच जीव अन्नसाखळीसाठी आणि अस्तित्वासाठी एकमेकांवर निर्भर आहेत. ही साखळी तुटली तर माणूसही शंभर वर्षे जिवंत राहू शकणार नाही.
 
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे जंगले नष्ट झाल्याने वन्यजीव धोक्यात आले आहेत. यावर उपाय म्हणून भारताने वन्यजीव संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, ज्याच्या परिणामी आज देशातील अभयारण्यांची संख्या ५६० च्या पार गेली आहे. ‘प्रकल्प वाघ’ (Project Tiger) आणि ‘प्रकल्प हत्ती’ यांसारख्या मोहिमांसोबतच, मानवी वस्ती आणि जंगलांमधील संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर विशेष ‘इको-ब्रिज’ (Eco-Bridges) आणि प्राण्यांसाठी भुयारी मार्ग (Underpasses) तयार केले आहेत; ज्यामुळे वन्यजीव कोणत्याही अपघाताशिवाय जंगलात सुरक्षितपणे वावरू शकत आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना सरकारतर्फे तातडीने मोठी आर्थिक मदत (नुकसानभरपाई) दिली जाते. तसेच, वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे किंवा पाळीव जनावरांचे नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून मानवी व वन्यजीव सहअस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
'ईशावास्य उपनिषद' आणि निसर्गाचा नियम आपल्याला एकाच सूत्रात बांधतो—"जे काही आपण पर्यावरणातून घेतो, ते आपल्याला त्याच किंवा अधिक चांगल्या स्वरूपात निसर्गाला परत करता आले पाहिजे." निसर्गाची झालेली हानी भरून काढणे (त्याग करणे) जर आपल्याला शक्य नसेल, तर निसर्गाच्या संसाधनांचा अनिर्बंध उपभोग घेण्याचा मोह आपण तातडीने टाळला पाहिजे. ज्या घटकांची भरपाई मानवाला करणे शक्य आहे, त्यांचाच उपभोग घ्यावा. ऋषींनी सांगितलेला ‘त्यागसहित भोग’ हाच खऱ्या अर्थाने सृष्टीचा “सर्वोत्तम उपभोग” आहे. निसर्गाकडून घेतलेले कर्ज जेव्हा आपण वृक्षारोपण, जलपुनर्भरण आणि प्रदूषणमुक्तीच्या माध्यमातून परत करू, तेव्हाच सृष्टीचे संतुलन कायम राहील. अशा प्रकारे निसर्गाशी ताळमेळ ठेवून जगल्यास, आपण आणि आपली येणारी पिढी निश्चितपणे समृद्ध आयुष्य जगून विधात्याने दिलेली ‘शंभरी’ गाठू शकेल.
 
 

Saturday, July 25, 2026

“गीता-दासबोधातील तामसिक तप, लोकशाहीचे आणि डॉ. आंबेडकरांची चेतावणी”

 
भारतीय तत्त्वज्ञानात तपाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. परंतु तप सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारांत विभागला जातो. भगवद्गीता आणि दासबोध या दोन ग्रंथांनी तामसिक तपाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. आजच्या लोकशाही व्यवस्थेतही या विचारांचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

दासबोधातील दृष्टिकोन समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात,

“दुसऱ्याचा प्राण घ्यावा। आपला आपण स्वयें द्यावा।
विसरवी जीवभावा। तो तमोगुण॥”

या ओवीत त्यांनी जीवनमूल्याचा विसर घडवणाऱ्या प्रवृत्तीला तमोगुण म्हटले आहे. हिंसा ही कोणत्याही स्वरूपात असो, आत्महत्येच्या रूपाने किंवा दुसऱ्याला मारण्याच्या रूपाने, ती जीवनाच्या पवित्रतेला नाकारणारी ठरते.
गीतेतील विवेचन भगवद्गीतेच्या अध्याय १७ मध्ये तामसिक तपाचे वर्णन आहे,

“मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्॥”

म्हणजे मूर्ख हट्टाने, स्वतःला पीडा देऊन किंवा दुसऱ्याचा नाश करण्याच्या हेतूने केलेले तप तामसिक ठरते. पुढील श्लोकांत अशा तपाला "आसुरी संकल्प" म्हटले आहे. अहंकार, दंभ आणि कामरागाने प्रेरित होऊन केलेले घोर तप हे अध्यात्मिक प्रगतीचे नव्हे तर अधोगतीचे लक्षण आहे.

आजच्या वास्तवाशी संबंध लोकशाही व्यवस्थेत धोरण बदलण्याचा मार्ग संघटन, निवडणुका आणि संसदीय प्रक्रिया हा आहे. उपोषण, आत्मपीडा किंवा जीव धोक्यात घालून सरकारला वाकवण्याचा प्रयत्न हा तामसिक मार्ग ठरतो. जर अशा मार्गाने यश मिळाले, तर प्रत्येक असंतुष्ट गट संविधानिक मार्ग सोडून देईल आणि अराजकतेचा धोका निर्माण होईल.

उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्यास समर्थकांचा उद्रेक देशव्यापी अराजकतेत बदलू शकतो.  संविधान सभेत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना सत्याग्रह-असहकारासारखे मार्ग "Grammar of Anarchy" ठरतील. म्हणजेच, लोकशाहीतील असंतोष व्यक्त करण्यासाठी हिंसक किंवा आत्मपीडात्मक मार्ग स्वीकारणे ही अराजकतेची पायरी आहे.

स्वातंत्र्यानंतरचे वास्तव: काही आंदोलनकर्त्यांनी उपोषण करून सरकारवर दबाव आणला. काही ठिकाणी सरकार झुकले, परंतु नंतर अशा पद्धतींचा दुरुपयोग वाढला आणि समाजात अस्थिरता निर्माण झाली. दीर्घकालीन धोरणात्मक बदल घडले नाहीत; उलट समाजात नकारात्मकता आणि हिंसक प्रवृत्ती वाढली. लोकशाही ही नदीसारखी आहे.  तिचा प्रवाह संघटन, निवडणुका आणि संसदीय प्रक्रिया या किनाऱ्यांनी नियंत्रित होतो. जर हे किनारे फोडून आत्मपीडात्मक प्रवाह वाहू लागला, तर तो समाजाला अराजकतेच्या समुद्रात नेईल.

गीता आणि दासबोध दोन्ही सांगतात की आत्मपीडा किंवा दुसऱ्याला पीडा देणे हे तप नव्हे, तर तमोगुण आहे. तप म्हणजे प्रकाशाचा मार्ग; पण आत्मपीडा हा   तर अंधाराचा जाळ आहे.

लोकशाहीत अशा मार्गांचा अवलंब केल्यास ते अराजकतेला आमंत्रण देतात. इतिहास दाखवतो की अशा तामसिक तपामुळे तात्कालिक उद्रेक होतो
, पण दीर्घकालीन परिणाम समाजासाठी घातक ठरतात. म्हणूनच घटनात्मक, संघटनात्मक आणि विवेकपूर्ण मार्ग हाच खरा सात्त्विक तप आहे.

Saturday, July 4, 2026

समर्थ विचार: मंदिर आणि मठांचे व्यवस्थापन

 


आपल्या सनातन धर्मात मंदिर हे केवळ देवदर्शन आणि पूजापाठापुरते मर्यादित स्थान नसून, ते संपूर्ण समाजाला एकत्र बांधणारे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे मुख्य केंद्र आहे. मंदिरात साजरे होणारे देवांचे बहुदिवसीय उत्सव, जत्रा, भागवत सप्ताह, प्रवचन आणि कीर्तने याद्वारे केवळ आध्यात्मिक प्रबोधन होत नाही, तर लोककलेचे आणि व्यापाराचे एक विराट व्यासपीठ निर्माण होते. या जत्रांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला आणि कलाकाराला हक्काचे स्थान मिळते. नट, बहुरूपी, जादूगार, दशावतारी व गोंधळी कलाकार आणि लोकनृत्य सादर करणाऱ्या नर्तकी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतात; ज्यामुळे आपल्या पारंपरिक लोककलांचे जतन होते.
 
यासोबतच, लहान मुलांची खेळणी विकणारे, सुवासिक द्रव्ये, गृहोपयोगी वस्तू आणि विविध साहित्याचे स्टॉल्स लावणारे छोटे व्यापारी, तसेच ज्ञानप्रसाराचे काम करणारे पुस्तक विक्रेते यांना या निमित्ताने मोठी बाजारपेठ मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या या जत्रांमुळे त्या भागातील शेतकरी, कुंभार, विणकर आणि हस्तकला कारागिरांच्या उत्पादनांना थेट ग्राहक मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला (Rural Economy) मोठे चलन मिळते. उत्सवकाळात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात येणारी मोफत वैद्यकीय (मेडिकल) शिबिरे आणि अन्नछत्रे हे मंदिराच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचे तर, आपली मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती कला, संस्कृती, व्यापार, आरोग्य आणि समाजकल्याण यांचा मेळ घालणारी एक आदर्श, स्वयंपूर्ण व्यवस्था आहे.
 
संत समर्थ रामदास स्वामी हे केवळ पारमार्थिक संत नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसंघटक आणि कुशल व्यवस्थापक होते. त्यांनी शिवकाळात महाराष्ट्रात उभारलेली मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती, तर ती संकटकाळात समाजाला धान्य, आश्रय आणि बळ देणारी प्रमुख केंद्रे होती. समर्थांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ११०० पेक्षा जास्त मठांची आणि मारुती मंदिरांची स्थापना केली. एका मध्यवर्ती केंद्रातून (चाफळ) या सर्व मठांचे जाळे आणि तिथे काम करणारे शेकडो तरुण 'रामदासी' कार्यकर्ते सांभाळणे, हे उत्कृष्ट नेटवर्क मॅनेजमेंट (Network Management) आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. असे करताना मठ आणि मंदिर कसे बांधले पाहिजे, तिथली व्यवस्था कशी असायला पाहिजे, याचे विस्तृत वर्णन श्री सार्थ दासबोधातील 'अर्चन भक्ती' आणि इतर समासांमध्ये केले आहे.
 
१. मंदिराचा परिसर वैभवपूर्ण असावा
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, जुनी झालेली देवळे व मंदिरे यांचा जीर्णोद्धार करावा आणि त्यासाठीचे आवश्यक ते काम तत्परतेने पूर्ण करावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखावह वाहने, मंचक, डोलारे, विमाने इत्यादी सर्व साधने नूतनीकरण करून सज्ज ठेवावीत. मेघडंबरी, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, निशाणे या वस्तू काळजीपूर्वक सांभाळाव्यात. देवाची नाना प्रकारची वाहने, बसण्यासाठी उत्तम ठिकाणे आणि विविध प्रकारची सुवर्णासने वगैरे प्रयत्नपूर्वक जपून ठेवावीत. भुवने, कोठड्या, पेट्या, पेटारे, रांजण, हौद, घागरी अशा मौल्यवान व उपयुक्त वस्तू अतिप्रयत्नाने जमा कराव्यात.
 
संकटप्रसंगी उपयोगी पडणारी अनेक भुयारे, तळघरे आणि त्यांना जोडणारे गुप्त बोगदे, विविध स्थळांना जोडणारी गुप्त द्वारे आणि अत्यंत मूल्यवान वस्तूंची भांडारे (खजिना) प्रयत्नपूर्वक निर्माण करून त्यांचे जतन करावे. उत्तम जागा निवडून भव्य मंदिराची निर्मिती करावी. तिथे अनेक देवकुळे, शिखरे, मोठी पटांगणे, मंडप, धर्मशाळा, विहिरी, सरोवरे, मठ इत्यादींचे बांधकाम करावे. मंदिराच्या परिसरात सुंदर वन-उपवने आणि सुगंधी फुलांच्या बागा (पुष्पवाटिका) असाव्यात; जिथे ऋषी-मुनी आणि तपस्वी शांत वातावरणात तपश्चर्या करू शकतील. शुक (पोपट), सारिका (मैना), मोर (मयूर) व कोकिळा यांसारखे पक्षी आपल्या मधुर आवाजाने तो परिसर जिवंत ठेवतील. या निसर्गरम्य आणि पवित्र परिसरात देवाच्या सेवेसाठी व वैभवासाठी गाई, म्हशी, घोडे, हत्ती, तसेच तलावात विहार करणारी बदके यांसारखे पशू-पक्षी मंदिराला अर्पण करावेत.
 
२. भक्तांची व्यवस्था
 
तडाग कूप आणि सरोवर। निर्मळोदके भरले दिसावे।
धर्मशाळा आणि अन्नछत्र। जेथे विसावे साधूपात्र॥
 
मंदिरात होणाऱ्या उत्सवांमध्ये भाग घेण्यासाठी आणि जत्रेसाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांची तसेच साधू-संतांची सोय करणे हे मंदिराचे प्रमुख कर्तव्य आहे. त्या काळात लोक पायी चालत देवदर्शनासाठी येत असत. अनेकदा त्यांच्याजवळ पुरेसा पैसा किंवा खाण्या-पिण्याचे साहित्य नसायचे. समर्थांनी यासाठी मंदिर उभारताना मंदिराच्या परिसरात स्वच्छ पाण्याची, निवासाची आणि भोजनाची चोख व्यवस्था असावी, असे निर्देश दिले आहेत. भक्तांना स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मंदिराच्या आवारात तलाव (तडाग), विहीर (कूप) किंवा सरोवर असावे, जे नेहमी निर्मळ पाण्याने भरलेले असेल. तसेच प्रवाशांच्या हक्काच्या निवासासाठी 'धर्मशाळा' आणि भुकेलेल्यांसाठी अखंड 'अन्नछत्र' चालवले जावे, जेणेकरून तिथे येणाऱ्या साधू-संतांना व गरिबांना हक्काचा आश्रय मिळेल.
 
३. अन्नभंडार (धान्यकोठी) आणि सामग्री व्यवस्था
 
मंदिराच्या कोठारांमध्ये नेहमी मुबलक धान्य भरून ठेवलेले असावे आणि सर्व प्रकारची सामग्री आधीच तयार करून ठेवावी. गरजेच्या वेळी, उत्सवाप्रसंगी किंवा दुष्काळासारख्या आपत्कालीन परिस्थितीत ती सामग्री अत्यंत आदराने, नियोजित पद्धतीने आणि चातुर्याने लोकांच्या सेवेसाठी वापरावी.

४. संकटकालीन व्यवस्थापन (Crisis Management) व सुरक्षा
 
शिवकाळात परकीय आक्रमणे आणि दुष्काळ या दोन्ही संकटांचा सातत्याने सामना करावा लागत होता. अशा वेळी मंदिरांमध्ये तळघरे आणि धान्य कोठारे सज्ज ठेवण्याचा समर्थांचा विचार म्हणजेच आजच्या काळातील 'Risk & Crisis Management' होय.

भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावीं ॥  
 
समर्थ म्हणतात की, मंदिरात गुप्त भुयारे, तळघरे, विवरे अशी अनेक गुप्त स्थळे आणि त्यांना जोडणाऱ्या गुप्त वाटा तयार कराव्यात. तसेच अमूल्य वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्त भांडारे प्रयत्नपूर्वक बनवावीत. भारताच्या इतिहासात मंदिरांवर वारंवार परकीय आक्रमणे झाली. लुटारू राज्यकर्त्यांनी मंदिरांतील सोने, मूर्ती व मौल्यवान संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला. अशा संकटकाळात गुप्त भुयारे व तळघरांमुळे देवाची मूर्ती तसेच खजिना शत्रूच्या नजरेपासून सुरक्षित राहत असे. गुप्त द्वारांमुळे पुजारी व भाविक संकटसमयी सुखरूप बाहेर पडू शकत असत. भांडारांमध्ये साठवलेले धन पुढे मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी, धर्मकार्यासाठी व गरजू भक्तांच्या मदतीसाठी उपयोगी पडत असे. थोडक्यात, संकटकाळात मंदिराचे अस्तित्व, देवतेची प्रतिष्ठा आणि शतकानुशतके जमवलेली संपत्ती या सर्वांचे रक्षण या गुप्त व्यवस्थेमुळे शक्य होत असे. समर्थांनी हे केवळ आध्यात्मिक नव्हे, तर अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगितले आहे.
 
५. आदर्श मंदिर प्रबंधक: समर्थांच्या 'महंत लक्षणां'तील व्यवस्थापकीय दृष्टी
 
समर्थ रामदास स्वामींच्या मते, मंदिराची भव्य व्यवस्था सांभाळणारा 'महंत' किंवा प्रबंधक (Manager) हा अत्यंत कार्यक्षम, चतुर आणि उत्तम जनसंपर्क असणारा असावा. समर्थांनी 'महंत लक्षणे' सांगताना स्पष्ट केले आहे की, प्रबंधकाने केवळ एकांतात न बसता 'जनांत मिसळावे' (लोकसंग्रह करावा), पण आपले अंतःकरण ईश्वराशी जोडून ठेवावे.
 
एका आदर्श प्रबंधकाकडे प्रचंड सोशीकपणा आणि 'सावधपण' असावे, जेणेकरून मंदिराच्या कोठारातील धान्य, हिशोब आणि सुरक्षितता यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे महंताने स्वतः कष्ट करून इतरांसमोर आदर्श ठेवावा. त्याने कोणाचेही मन न दुखवता, सर्वांना सोबत घेऊन मंदिराचे उत्सव, अन्नछत्रे आणि सामाजिक कार्ये तडीस न्यावीत. प्रबंधकाकडे 'राजकारण' (म्हणजेच व्यवहारातील चातुर्य व मुत्सद्दीपणा) असावे, जेणेकरून तो बाह्य संकटांपासून मंदिराचे रक्षण करू शकेल आणि अंतर्गत व्यवस्था शिस्तीत राखेल. थोडक्यात, समर्थांचा महंत हा आजच्या काळातील एका सक्षम 'CEO' सारखा आहे, ज्याच्याकडे आध्यात्मिक नैतिकतेचे अधिष्ठान आणि व्यावहारिक प्रशासनाचे (Administration) अजोड कौशल्य आहे. समर्थ म्हणतात:
 
महंतें महंत करावें। युक्तीबुद्धीनें भरावें।
कळावंत करूनि सोडावें। बहुतां जनां॥  
 
महंताने केवळ स्वतःच काम करू नये, तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आपल्यासारखेच कार्यक्षम आणि कलावंत (कुशल) बनवावे, जेणेकरून मंदिराची व्यवस्था अविरत आणि सक्षमपणे चालू राहील. यालाच आजच्या कॉर्पोरेट भाषेत 'Succession Planning' (उत्तराधिकारी नियोजन) किंवा 'Team Empowerment' (संघ सक्षमीकरण) म्हणतात.
 
६. भगवंताची पूजा-अर्चा
 
पंचामृतें गंधाक्षतें | पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें |
धूपदीप असंख्यातें | नीरांजनें कर्पुराचीं ||

समर्थ म्हणतात की, अनेक प्रकारच्या उत्तम सामग्रीने परमेश्वराची पूजा करावी. पंचामृत, गंध-अक्षता, फुले, पुष्कळ परिमळद्रव्ये, धूप-दीप, अनेक प्रकारच्या आरत्या व कापूर नीरांजने; तसेच सुग्रास नैवेद्य, विविध प्रकारची फळे, तांबूल, दक्षिणा, नाना अलंकार, उत्तम वस्त्रे, वनमाळा, पालख्या, छत्रे, आरामदायक सुखासने, मेघडंबरी, अब्दागिऱ्या, दिंड्या, पताका, निशाणे, आणि टाळ-मृदंगाच्या गजर करून देवाचे वैभव वाढवावे.

परंतु, जर प्रतिकूल परिस्थिती असेल आणि बाह्य साधनांची कमतरता असेल, तर समर्थांनी यावरही मार्ग सुचवला आहे. अनुकूल परिस्थिती नसताना आपल्या अंतर्यामी, मनाने षोडशोपचारे भगवंताची पूजा करावी. अशा प्रकारे केलेल्या पूजेला 'मानसपूजा' असे म्हणतात. जे जे भव्य-दिव्य अलंकार आणि वैभव आपल्याला प्रत्यक्ष अर्पण करता येत नाही, ते कल्पनेने निर्माण करून मनातील परमात्म्याला अत्यंत मनोभावे अर्पण करावे.
 
ऐसी पूजा न घडे बरवी | तरी मानसपूजा करावी |
जें जे आपणांस पाहिजे | तें तें कल्पून वाहिजे |
येणें प्रकारें कीजे | मानसपूजा ||
 
सारांश: समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या माध्यमातून मांडलेली मंदिर व मठ व्यवस्था ही केवळ धार्मिक कर्मकांडांपुरती मर्यादित नसून, ते एक अत्यंत प्रगत, व्यवहार्य आणि आदर्श सामाजिक-प्रशासकीय मॉडेल (Administrative Model) आहे. समर्थांच्या काळात मंदिरांना केवळ भक्तीचे केंद्र न ठेवता, समाजप्रबोधन, आपत्कालीन साहाय्य आणि लोककल्याणाचे मुख्य व्यासपीठ बनवले गेले.

आजच्या २१ व्या शतकातील आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा (Modern Management) विचार केला तर, समर्थांचे हे विचार थक्क करणारे आहेत. त्यांनी 'अर्चन भक्ती'च्या बहाण्याने दिलेले धडे प्रत्यक्षात Infrastructure Management (मंदिराचा परिसर व वास्तू विकास), Hospitality & Supply Chain (भक्तांची सोय, धर्मशाळा आणि अन्नछत्रांचे नियोजन), Crisis Management (संकटसमयी भुयारे व खजिन्याचे रक्षण), आणि Human Resource & Leadership Development (महंत लक्षणे आणि कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण) यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.
 
थोडक्यात सांगायचे तर, आजच्या काळातील कोणत्याही मोठ्या संस्थेला, कॉर्पोरेट कंपनीला किंवा सार्वजनिक व्यवस्थेला यशस्वीपणे चालवण्यासाठी ज्या नेतृत्वाची, दूरदृष्टीची आणि शिस्तीची गरज असते, ती सर्व मूल्ये समर्थांनी शतकांपूर्वीच आपल्या मंदिर व्यवस्थापनात गुंफली होती. आध्यात्मिक अधिष्ठानाला जेव्हा चतुर व्यवहाराची आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळते, तेव्हाच एक स्वयंपूर्ण आणि आदर्श समाज निर्माण होऊ शकतो, हाच समर्थांच्या या मंदिर व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे. त्यांचे हे विचार आजच्या आधुनिक व्यवस्थापकांसाठी आणि मंदिर प्रशासकांसाठी मार्गदर्शक दिवा ठरतात.
 

Friday, June 19, 2026

समर्थ विचार: क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।





फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥ मनाचे श्लोक ११४॥
  
समर्थ म्हणतात, हे मना, देवनाम किंवा कोणतेही चांगले बोलणे तोंडाने फुकट करता येते, त्यात काही खर्च नसतो. पण दिवसेंदिवस आतून गर्व (अहंकार) साठत जातो. केवळ बोलणे (वाचाळता) आणि कृती (कर्म) नसल्यास ते सर्व व्यर्थ आहे. म्हणून तू स्वतःच विचारपूर्वक आत शोध घे आणि पाहा की तुझे बोलणे आणि आचरण जुळते का.
 
समर्थ स्वामी मनाला सांगतात की, नामस्मरण किंवा उपदेश तोंडाने करणे सोपे आहे, पण त्यामागे खरी साधना, नम्रता आणि कर्म नसेल तर आतून फक्त अहंकार वाढतो. म्हणून बोलण्यासारखे चालण्याचा प्रयत्न कर.   समर्थ उदाहरण देताना म्हणतात, प्राचीन काळात असे अनेक विद्वान होते जे शास्त्रे बोलत, पण आचरण करत नव्हते, त्यामुळे ते ब्रह्मराक्षस झाले: जनीं हीत पंडित सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ (मनाचे श्लोक ११३).
 
महाभारतातील शल्य हा वाचाळवीर होता. शल्यपर्वात तो दुर्योधनाला गर्वाने म्हणतो: “हे दुर्योधन, तू दोन कृष्णांना (अर्जुन-कृष्ण) श्रेष्ठ रथी समजतोस, पण ते दोघे मिळूनही माझ्या बाहुबलाच्या समान नाहीत. मी क्रोधित झालो तर देव, असुर आणि मानव यांच्या संपूर्ण जगाशी लढू शकतो. पांडव आणि सोमक यांचा मी सहज नाश करीन. मी तुझा सेनापती होऊन असे व्यूह रचेन की शत्रू त्यांना भेदू शकणार नाहीत.” पण युद्धात तो पराक्रम गाजवू शकला नाही. भीम-अर्जुनाचा सामना करण्याची त्याची हिम्मत झाली नाही. शेवटी महाराज युधिष्ठिराने त्याला पराभूत करून ठार केले.
 
आजच्या काळातही अनेक पर्यावरणवादी लोक भाषण, लेख, सेमिनार यांतून पर्यावरणावर उपदेश करतात, पण प्रत्यक्ष कृतीत फारसे काही करत नाहीत. तसेच आरोग्य आणि व्यायामाबद्दल बोलणारे अनेक लोक स्वतः मात्र नियमितपणे व्यायाम करत नाहीत. याच्या उलट स्वामी रामदेव रोज सकाळी योगक्लास स्वतः घेतात, आणि सातत्याने योगाभ्यास करतात. त्यामुळे साठ वर्षांहून अधिक वय असूनही ते तंदुरुस्त आणि ऊर्जावान आहेत. म्हणूनच कोट्यवधी लोक त्यांना अनुसरतात आणि प्रेरणा घेतात. त्यांनी सुचवलेले उपाय आचरणात ही आणतात.
 
सारांश: समर्थ रामदासांनी मनाला सांगितले की केवळ बोलणे, उपदेश किंवा नामस्मरण पुरेसे नाही; कृतीशिवाय ते व्यर्थ ठरते आणि अहंकार वाढतो. महाभारतातील शल्य याचे उदाहरण आहे. त्याने दुर्योधनाला मोठी आश्वासने दिली, पण युद्धात अपयशी ठरला आणि युधिष्ठिराने त्याचा वध केला. आजही अनेक पर्यावरणवादी वा आरोग्याविषयी बोलणारे लोक प्रत्यक्ष कृती करत नाहीत,त्यांचे कोणीही ऐकत ही नाही. दुसरी कडे  स्वामी रामदेव रोज योगाभ्यास करून तंदुरुस्त राहतात आणि कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतात. यावरून स्पष्ट होते की बोलणे सोपे आहे, पण खरा अर्थ कर्मातच आहे; “बोलण्यासारखे चाले” हाच खरा मार्ग आहे.
 

Sunday, June 14, 2026

समर्थ विचार: विचारूनि बोले विवंचूनि चाले।

 

विचारूनि बोले विवंचूनि चाले।
तयाचेनि संतप्त तेही निवाले॥
बरें शोधल्यावीण बोलो नकों हो।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥(म.श्लोक १३२)
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बोलण्याआधी माणसाने विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्याचा उद्देश काय आहे, याची काळजीपूर्वक आणि समजूतदारपणे विवंचना केली पाहिजे. योग्य उद्देशाने केलेले बोलणे आणि वर्तन संतप्त लोकांनाही शांत करू शकते. पूर्ण माहिती आणि तथ्य न घेता बोलू नका. समाजात आपले आचरण शुद्ध, नियमबद्ध आणि शिस्तबद्ध ठेवा. समर्थ रामदास स्वामी यांचा हा उपदेश मनाला समजावतो की, विचारशून्य बोलणे हे संकटाचे मूळ आहे. उलट, विचारपूर्वक बोलणे हे शांती आणि यशाचे साधन आहे. हाच आशय मनुस्मृतीत ही आहे,
 
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यं अप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥ ( म.स्मृ. 4/138)
 
भगवान मनू म्हणतात, सत्य बोलावे, प्रिय (आनंददायक, सौम्य) बोलावे, पण सत्य असले तरी अप्रिय (दुखावणारे, कटू) बोलू नये. प्रिय वाटेल असे खोटेही बोलू नये. हा सनातन धर्म आहे.
 
माणसाने सदा सत्य बोलले पाहिजे, प्रिय बोलले पाहिजे आणि विचार करून बोलले पाहिजे. सत्य आणि प्रियता यांचा समन्वय साधता आला पाहिजे. अप्रिय सत्य बोलण्याने संबंध बिघडतात, वैर निर्माण होते आणि अनेकदा मोठे संघर्ष उद्भवतात. दुसरीकडे, दुसऱ्याला प्रसन्न करण्यासाठी खोटे बोलण्याने नैतिकता नष्ट होते, विश्वासघात होतो आणि परिणाम वाईटच होतात.  इतिहासात याचे अनेक उदाहरण मिळतात: 
 
राजा दशरथ सदैव सत्य धर्माचे पालन करणारा होता. देवासुर युद्धात ते जखमी झाले असता राणी कैकेयीने त्यांचे प्राण वाचवले. प्रसन्न होऊन दशरथ म्हणाले, “तुला दोन वर माग, मी देईन.” विचार न करता दिलेल्या या वचनामुळे, कैकेयीने रामराज्याभिषेकाच्या वेळी दोन वर मागितले: १. भरताला राज्याभिषेक. २. रामाला १४ वर्ष वनवास. सत्यवचनी दशरथाने वचन पाळले. परिणाम? श्रीराम वनात गेले आणि दशरथांचा शोकाने मृत्यू झाला. गिरधर कविराय म्हणतात: “बिना विचारे जो करै, सो पाछे पछिताय”,  विचार न करता केलेल्या कृतीचा पश्चाताप नंतर उपयोगी पडत नाही.
 
दूसरा प्रसंग महाभारतातला आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी महाराणी द्रोपदी दुर्योधनाला उद्देश्यून म्हणाली आंधळ्याचे पुत्र आंधळे असतात. महाराणी द्रोपदीने बोलण्या आधी विचार केला नाही. आपल्या कटू शब्दांनी दुसर्‍याचा अपमान होईल असा क्षणिक विचार ही तिने केला नाही. परिणाम महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरू वंशाचा विनाश झाला.  
 
एका राजकारण्याने बिना तथ्य तपासता म्हटले की गुजरातचे लोक अशिक्षित आहेत आणि त्यांना कोणीही फसवू शकतो. या विधानाचा तीव्र विरोध झाला. नेत्याने माफी मागितली. पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाहीत. अशा बिना विचारी वक्तव्यांचा परिणाम निवडणुकीत पक्षाला भोगावा लागतो. भारतीय राजकारणात असे अनेकदा घडले आहे, एका नेत्याच्या एका चुकीच्या बोलण्याने संपूर्ण पक्षाला हानी झाली आहे.
 
दुसरीकडे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करून बोलतात. जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी म्हटले होते, “प्रत्येक घरात शौचालय बांधणार.” प्रत्यक्षात १२ कोटी शौचालये बांधून दाखवली. त्यांनी जाहीर केले, “प्रत्येक गरीबाला बँक खाते मिळेल.” आज ५० कोटीहून अधिक जनधन खाती उघडली गेली आहेत.
 
ते म्हणाले, “पैसा थेट गरीबांच्या खात्यात जाईल, मध्यस्थ संपतील.” JAM ट्रिनिटी (जनधन + आधार + मोबाइल) द्वारे ४४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम Direct Benefit Transfer (DBT) ने थेट खात्यात पोहोचवली. यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आणि प्रत्येक रुपया योग्य हातात पोहोचला.
 
जर त्यांनी बोललेले पूर्ण करून दाखवले नसते, तर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नसते. विचारपूर्वक बोलणे आणि त्यानुसार कृती करणे यामुळे लाखो कुटुंबांचे जीवन बदलले. हेच खरे यशाचे साधन आहे. जसे समर्थ रामदास म्हणतात: “विचारूनि बोले, विवंचूनि चाले.”