फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥ मनाचे
श्लोक ११४॥
समर्थ म्हणतात, हे मना,
देवनाम किंवा कोणतेही चांगले बोलणे तोंडाने फुकट करता येते, त्यात काही खर्च नसतो. पण दिवसेंदिवस आतून गर्व (अहंकार) साठत जातो. केवळ
बोलणे (वाचाळता) आणि कृती (कर्म) नसल्यास ते सर्व व्यर्थ आहे. म्हणून तू स्वतःच
विचारपूर्वक आत शोध घे आणि पाहा की तुझे बोलणे आणि आचरण जुळते का.
समर्थ स्वामी मनाला सांगतात की, नामस्मरण किंवा उपदेश तोंडाने करणे सोपे आहे, पण
त्यामागे खरी साधना, नम्रता आणि कर्म नसेल तर आतून फक्त
अहंकार वाढतो. म्हणून बोलण्यासारखे चालण्याचा प्रयत्न कर. समर्थ उदाहरण देताना म्हणतात, प्राचीन काळात असे अनेक विद्वान होते जे शास्त्रे बोलत, पण आचरण करत नव्हते, त्यामुळे ते ब्रह्मराक्षस झाले:
जनीं हीत पंडित सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ (मनाचे श्लोक ११३).
महाभारतातील शल्य हा वाचाळवीर होता. शल्यपर्वात तो
दुर्योधनाला गर्वाने म्हणतो: “हे दुर्योधन, तू दोन
कृष्णांना (अर्जुन-कृष्ण) श्रेष्ठ रथी समजतोस, पण ते दोघे
मिळूनही माझ्या बाहुबलाच्या समान नाहीत. मी क्रोधित झालो तर देव, असुर आणि मानव यांच्या संपूर्ण जगाशी लढू शकतो. पांडव आणि सोमक यांचा मी
सहज नाश करीन. मी तुझा सेनापती होऊन असे व्यूह रचेन की शत्रू त्यांना भेदू शकणार
नाहीत.” पण युद्धात तो पराक्रम गाजवू शकला नाही. भीम-अर्जुनाचा सामना करण्याची
त्याची हिम्मत झाली नाही. शेवटी महाराज युधिष्ठिराने त्याला पराभूत करून ठार केले.
आजच्या काळातही अनेक पर्यावरणवादी लोक भाषण, लेख, सेमिनार यांतून पर्यावरणावर उपदेश करतात,
पण प्रत्यक्ष कृतीत फारसे काही करत नाहीत. तसेच आरोग्य आणि
व्यायामाबद्दल बोलणारे अनेक लोक स्वतः मात्र नियमितपणे व्यायाम करत नाहीत. याच्या
उलट स्वामी रामदेव रोज सकाळी योगक्लास स्वतः घेतात, आणि
सातत्याने योगाभ्यास करतात. त्यामुळे साठ वर्षांहून अधिक वय असूनही ते तंदुरुस्त
आणि ऊर्जावान आहेत. म्हणूनच कोट्यवधी लोक त्यांना अनुसरतात आणि प्रेरणा घेतात.
त्यांनी सुचवलेले उपाय आचरणात ही आणतात.
सारांश: समर्थ रामदासांनी मनाला
सांगितले की केवळ बोलणे, उपदेश किंवा नामस्मरण पुरेसे नाही; कृतीशिवाय ते व्यर्थ ठरते आणि अहंकार वाढतो. महाभारतातील शल्य याचे उदाहरण
आहे. त्याने दुर्योधनाला मोठी आश्वासने दिली, पण युद्धात
अपयशी ठरला आणि युधिष्ठिराने त्याचा वध केला. आजही अनेक पर्यावरणवादी वा
आरोग्याविषयी बोलणारे लोक प्रत्यक्ष कृती करत नाहीत,त्यांचे
कोणीही ऐकत ही नाही. दुसरी कडे स्वामी
रामदेव रोज योगाभ्यास करून तंदुरुस्त राहतात आणि कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतात.
यावरून स्पष्ट होते की बोलणे सोपे आहे, पण खरा अर्थ कर्मातच
आहे; “बोलण्यासारखे चाले” हाच
खरा मार्ग आहे.

No comments:
Post a Comment