काळ्याकुट्ट आकाशात
कडाडल्या प्रलयंकर विजा
"आई गं!" म्हणत, ती शिरली
माऊलीच्या कुशीत.
आईच्याही नयनांतून मग,
वाहू लागल्या, गंगा-जमुनी जलधारा.
"आई, अशी का रडतेस?"
लेकीने हळूच विचारले,
आई म्हणाली, सांगते
आज तुला,
तुझ्या जन्माचे रहस्य?
असाच एक दिवस होता, उताळा होता
वादळवारा,
काळ्याकुट्ट ढगांतून, कोसळत होत्या विजा,
विजांच्या त्या तांडवाने थरथरली सारी धरा,
"घाबरले मी, किंचाळले,
बिलगले एका काळ्या धिप्पाड पहाडाला,
कुशीत माझ्या 'चैतन्याचे दान'
टाकून,
परदेशी तो निघून गेला...
याच माळरानावर,
एका कुमारी परित्यक्ता मातेच्या अश्रूंनी,
आणि नभाच्या बरसत्या जलधारांनी,
स्वागत केले एका 'नवांकुराचे'!"
लेकीने मान वर केली,
आईचे डोळे पुसत म्हणाली
"आई, जाणले मी जन्माचे रहस्य॰
ताठ मानेने, निर्भय
नजरेने,
ढगांकडे पाहत ती उद्गारली,
आजपासून मी आहे 'वरुणा',
वरुणदेवाची लेक, जलदेवी!"
बरसत्या त्या जलधारांनी,
दिला वरुणास आशीर्वाद,
वरुणदेवानेही जणू नभातून,
दिला तिच्या अस्तित्वास साद.
त्या दिवशी आईने लावले,
कपाळावर 'स्वाभिमानाचे' कुंकू,
जगाला ठणकावून सांगितले
"माझी लेक नाही 'मनुज-पुत्री',
ती आहे साक्षात देवपुत्री,
वरुणा- जलदेवी!"
No comments:
Post a Comment