Thursday, January 22, 2026

छोट्या कुटुंबाचे महत्त्व : दासबोधाच्या दृष्टीने

आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठीहम दो, हमारे दोयोजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते. आपल्या धर्मात पूर्वापासून पुत्रप्राप्ती ही गृहस्थाश्रमातील एक पवित्र धार्मिक उद्देश मानली जाते, जी पितृऋण चुकवण्यासाठी, कुलवृद्धीसाठी आणि वंशपरंपरेच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. चाणक्यनीतीतील एका श्लोकात म्हटले आहे:

एकोऽपि गुणवान् पुत्रो निर्गुणेन शतेन किम्।
एकश्चन्द्रस् तमो हन्ति ताराः सहस्रशः॥

याचा अर्थ असा की एकच गुणवान पुत्र शंभर निःगुण पुत्रांपेक्षा श्रेष्ठ असतो; जसा एकच चंद्र अंधकार दूर करतो, तसे हजारो तारे करू शकत नाहीत. या श्लोकातून संतानोत्पत्तीचा उद्देश वासना किंवा संख्या वाढवणे नसून, सद्गुणी पुत्राला जन्म देणे आहे, जो ज्ञान, धर्म आणि सामर्थ्याने युक्त राहून कुटुंबाची उन्नती करेल, पितरांचे तृप्त करेल आणि जीवनाला सार्थकता देईल. धर्माची शिकवण अशी की पुत्र हे ओझे नसून गुणवान वारसा आहे, ज्यामुळे कुलाची ज्योती कायम राहते.

समर्थ रामदास स्वामींनी देशांटण करताना जास्त संतान असलेल्या कुटुंबांची दारुण दशा पाहिली असेल. श्रीमत् दासबोधातील दशक तिसरा आणि समास चौथा यात त्यांनी मोठ्या कुटुंबामुळे (उदंड अपत्यांमुळे) निर्माण होणारे दारिद्र्य, चिंता, उद्वेग आणि कष्टांचे मार्मिक वर्णन केले आहे. एका श्रीमंत व्यक्तीच्या कथेद्वारे त्यांनी दाखवले की अनेक मुलांना जन्म दिल्यामुळे संपत्तीचा नाश झाला, कुटुंब भिकारट झाले आणि जीवन दुःखमय झाले. या कथेतून समर्थ अप्रत्यक्षपणे छोट्या कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करतात. जास्त मुले म्हणजे जास्त जबाबदारी; त्यामुळे धन-वैभवाची रक्षा होत नाही, वैयक्तिक सामर्थ्य विखुरते आणि ईश्वरभक्ती विसरते.

समर्थ म्हणतात:

लेंकुरें उदंड जालीं। तों ते लक्ष्मी निघोन गेली।
बापडीं भिकेसी लागलीं। कांहीं खाया मिळेना॥

जास्त मुले झाल्याने कुटुंबाचा खर्च वाढतो, पगार अपुरा पडतो, संपत्ती नष्ट होते आणि पोटभर अन्नही मिळत नाही. मोठ्या परिवाराचे पोट भरण्यासाठी खर्च वाढत जातो पण उत्पन्न वाढत नाही. मुलींच्या लग्नासाठी पैशाची कमतरता भासते, त्यामुळे घरातील मूल्यवान वस्तू सावकाराकडे गहाण ठेवाव्या लागतात. कर्जाचे ओझे वाढते आणि भिक्षा मागण्याची वेळ येते. कर्त्या पुरुषाला घरदार सोडून परदेशात नीच नोकऱ्या कराव्या लागतात. अतोनात मेहनतीमुळे मानसिक ताण वाढतो आणि शरीराला रोगराई लागते.
या कथेचा सारांश असा की मोठ्या कुटुंबात जीवन सुखाऐवजी दुःखाचे केंद्र बनते; माणूस ईश्वरस्मरण विसरून प्रपंचाच्या ओझ्यात बुडतो. कुटुंबाचे पालन करता करता त्याची शक्ती संपते आणि शेवटी कोणीही त्याच्या उपयोगाला येत नाही. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे:

कुटुंबकाबाडीं कानकोंडा। जाला ईश्वरीं।
प्रपंच ओझे वाढले सुख नाहीं॥

मोठ्या कुटुंबात सततच्या भांडणांमुळे आणि गोंधळामुळे जीवनात शांतता राहत नाही. प्रपंचाचे ओझे वाढते, पण त्यातून खरे सुख मिळत नाही.

समर्थांनी त्या काळातच परिवार नियोजनाचे महत्त्व ओळखले होते. त्यांच्या दृष्टिकोनातून छोटे कुटुंब असल्यास आर्थिक स्थैर्य टिकते, खर्च नियंत्रित राहतो आणि संसाधनांचा योग्य वापर होतो. मानसिक शांती वाढते आणि परस्परांतील प्रेम दृढ होते. घरातील प्रमुखाला छोटे कुटुंब असल्यामुळे आई-वडील, पत्नी आणि एक-दोन मुलांकडे पुरेसा वेळ, योग्य लक्ष आणि स्नेह देता येतो. त्यांच्या आरोग्याकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येते आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करता येतात. यामुळे परिवारीक जीवन सुखी, सामर्थ्यपूर्ण आणि भक्तिमय होते. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, छोटे कुटुंब हे केवळ सामाजिक गरज नसून अध्यात्मिक प्रगतीसाठीही आधारभूत पाया आहे.
 

No comments:

Post a Comment