Wednesday, April 25, 2018

आठवणीतून -चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग! खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

Sunday, April 22, 2018

तीन क्षणिका : कवी(१) 

कवी दरबारात गेला 
चारण-भाट तो झाला 
खोटी प्रशस्ती गायली 
कवी कोट्याधीश झाला

(२) 

कवी अरण्यात गेला 
प्रकृती सवे रमला 
स्वान्त:सुखाय रचना केली 
महाकवी तो झाला

(३)

कवी बाजारात गेला 
शून्य भाव मिळाला 
शून्याने केली निर्मिती 
कवी सृष्टा झाला 

सृष्टा: जगाची निर्मिती करणारा 


Thursday, April 19, 2018

आठवणीतून - तपश्चर्येचे फळमधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते.  गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते. माझा नाईलाज आहे, असे म्हणत त्याने धूम ठोकली. लोकांपासून दूर तो घनघोर अरण्यात पोहचला. स्वर्ग प्राप्ती साठी त्याने कठोर तपश्चर्या सुरु केली. वल्कल परिधान केले. झोपायला धरती आणि पांघरायला आकाश. कंद मूळ, फळे हाच त्याचा आहार. कधी ही संसारिक भोगांचा विचार त्याचा मनात आला नाही. सतत नामस्मरणात तो दंग राहायचा. काळ लोटला. तो म्हातारा झाला आणि मरण पावला. 

चित्रगुप्ताने त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब केला. एक दिवस स्वर्गात राहण्याचे पुण्य त्याचा पदरी पडले. त्याला आनंद झाला. एक दिवस का होईना, त्याला स्वर्गीय देवतांचे दर्शन घेता येईल. जन्माची तपस्या सफल होईल. देवदूत त्याला स्वर्गात घेऊन आले. अनेक सुगंधित उबटने अंगाला लाऊन, त्याला स्नान घातले. उंच भरजरी रेशमी वस्त्र त्याला नेसायला दिले. इंद्राच्या सभेत त्याला घेऊन पोहचले. सभेत इंद्र आणि इतर देवता, रम्भा, उर्वशीचे इत्यादी अप्सरांचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून उठला, त्याचे स्वागत केले. त्याला आपल्या जवळच्या मंचकावर बसवले. एक अप्सरा सोमरसाचे पात्र घेऊन त्याच्या  जवळ आली. इंद्र त्याला म्हणाला, स्वर्गीय अप्सरांचा नृत्याचा आनंद घेत सोमरसाचे प्राशन कर. आज आपल्या आवडत्या अप्सरे बरोबर तू मनसोक्त रमण करू शकतो. वेळ घालवू नको. हा एका दिवसाचा स्वर्गीय आनंद तुझ्या कठोर तपस्येचे फळ आहे. उचल ते सोमरसाचे पात्र. त्याने समोर पहिले, रम्भा-उर्वशी सोमरसाच्या धुंदीत देहभान विसरून नाचत होत्या. दोघींचे वस्त्र अस्तव्यस्त झाले होते, दिसू नये ते सर्व दिसत होते. पण त्यांना त्याची लाज नव्हती. सर्व देवता ही मद्याच्या धुंदीत होते. चिरयौवना सुंदर अप्सरांच्या ओठांचे स्पर्श झालेले सोमरस देवगण आनंदाने प्राशन करीत होते. आजच्या सिने तारकांना लाज वाटेल असे वस्त्र अप्सरांनी परिधान केले होते. अप्सरांच्या गळ्यात गळे घालून देवगण कामोत्सव साजरा करण्यात मग्न होते. हे सर्व पाहून, त्याला आठवले, काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र त्याला फार्म हाऊस वर नवीन वर्षाच्या पार्टीत घेऊन गेला होता. तिथे तोडक्या वस्त्रातल्या बारबाला लोकांना ड्रिंक्स सर्व करीत होत्या. तिथे सर्व स्त्री-पुरुष लोक-लाज विसरून मद्याच्या धुंदीत नाचत होते. खुलेआम भोगविलास सुरु होता. त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली.  इथे येऊन पाहतो तर स्वर्गात ही तोच प्रकार. त्याला प्रश्न पडला, त्याच्या कठोर तपस्येचे फळ हेच का? असा आनंद तर काही पैका खर्च करून पृथ्वीवर सहज प्राप्त होतो. संपूर्ण आयुष्य अश्या स्वर्ग सुखा साठी मोजले. त्याला त्याचीच लाज वाटली. परित्यक्ता पत्नीची आठवण आली. आपण तिची प्रतारणा केली, एवढ्या शुल्लक गोष्टी साठी. तिची माफी मागितली पाहिजे. इंद्रसभा सोडून तो निघाला, पण तिला शोधणार कुठे?  कुठे असेल ती आज. अचानक त्याला एक अंधुक आकृती दिसली, तीच ती त्याची पत्नी. तो जोरात ओरडला, माफ कर मला. अहो, काय झाले तुम्हाला, कसली माफी, काही स्वप्न पहिले का?  तो दचकला, आपण बिछान्यावर झोपलेलो आहे, हे त्याच्या लक्ष्यात आले. त्याने लगेच स्वत:ला सावरले. तिच्या हातातला केशरमिश्रित दुधाचा गिलास आपल्या हातात घेत तो म्हणाला, मधुमिलनाची रात्र जागून काढायची असते, डोळा लागला, गुनाह घडला आहे हातून. अपराधीला दंड हा मिळालाच पाहिजे. तिला त्याचे ऐकून हसू आले, ती म्हणाली अजून भरपूर रात्र उरली आहे, तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला शिक्षा करीन. त्या नंतर काय झाले कुणी-कुणाला शिक्षा केली, कशी केली, अंधार असल्या मुळे काहीच कळले नाही.

 ( २ जुन २०१५ हा लेख त्या वेळी हि सर्वांना आवडला होता).       .


Wednesday, April 18, 2018

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत


अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ  हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते. डोळे लाल होणे, खोकला सुरु होणे, एलर्जी व अस्थमाचा त्रास वाढणे हे सर्व सामान्य झाले आहे. आठवड्यात किमान एकदा तरी प्रदूषित धुळीची आंधी येतेच. इतर ठिकाणी प्रचंड उन्हामुळे लू लागते पण दिल्लीत लू सोबत प्रदूषित धुळीचा त्रास हि सहन करावा लागतो.

संध्याकाळचे पाच एक वाजले असतील. जोरात आंधी सुरु झाली. खिडक्या वाजू लागल्या. धावत जाऊन खिडक्या बंद केल्या. दरवाजा बंद करताना एक स्त्री आवाज आला, गाढवा किती हि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला तरी तू मला रोखू शकत नाही. मी चमकून इकडे-तिकडे पहिले कुणीच दिसले नाही, वाटले मनाचा भ्रम असावा. पुन्हा आवाज आला, मूर्खा, मी धुळीची आंधी बोलते आहे, कुणी मानवी स्त्री नाही, जी तुला डोळ्यांनी दिसेल. मला हि राग आला म्हणालो, तसे हि मला सध्या डोळ्यांनी काहीच  दिसत नाही. तू धुळीची आंधी आहे, मान्य करतो. माझेच घर सापडले का तुला, त्रास द्यायला. जोरात हसण्याचा आवाज ऐकू आला. मी म्हणालो, हसतेच कशाला, मी काही चूक म्हंटले का, कुणालाच आवडणार नाही, तुझे घरात शिरणे. त्या वर धुळीच आंधी म्हणाली, पूर्वी मी रस्त्याच्या काठी असलेल्या झाडांवर किंवा आंगणातल्या झाडांवर विसावा घ्यायचे. तुझ्या घराच्या आंगणात एखादे पेरूचे झाड असते तरी त्यावर आपली हाडे टाकून मस्त झोपले असते. हो आलं लक्ष्यात, तुझ्या घरात आंगणच नाही, तर झाड कुठून येणार. शोभे साठी ठेवलेली प्लास्टिकची झाडे दिसत आहेत बैठकीत.  चालेल, फूल न फुलाची पाकळी इथेच विसावा घेते.  

मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही.  थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी. 

थोड्या वेळात आंधी संपली. झाडू-पोंछा घेऊन घरभर पसरलेली धूळ स्वच्छ केली. डोळ्यांत जळजळ होऊ लागली होती, खोकलता-खोकलता हालत खराब झाली होती. शेवटी नाईलाज होऊन डॉक्टर कडून औषध आणावे लागले. 
 

Tuesday, April 17, 2018

बिहारच्या चिमुरडीची व्यथा
कॅन्डल मार्च नाही काढला
कुणी नेत्याने माझ्यासाठी.

शर्मसार नाही झाला 
धर्म कुणाचा माझ्या साठी.

रान नाही उठविले जगभर
पेड मिडीयाने माझ्यासाठी 

मोर्चे नाही निघाले मला 
न्याय मिळवून देण्यासाठी .

माझा  काहीच उपयोग नव्हता 
वोट बँक राजनीती साठी.


(प्रत्येक बलात्कार घृणित असतो. बलात्कारीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आपल्या देश्यात बलात्कारचा उपयोग घृणित राजनीती साठी होतो.  पीडिता आणि बलात्कारीच्या धर्माच्या आधारावर ठरविल्या जाते कि शांत राहायचे कि हल्ला करायचा.  घृणित वोट बँक राजनीती).