Tuesday, June 30, 2015

रामायण कथा - रुमा - एक मूक स्त्रीरामायणात रुमाची ओळख सुग्रीव पत्नी असे आहे. जिथे ताराच्या प्रखर व्यक्तित्वाची जाणीव रामायणात होते,  तिथे रुमाच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. कारण स्पष्ट आहे, रुमा एक सामान्य स्त्री होती. सर्व अन्याय चुपचाप सहन करणारी.  अश्या सामान्य स्त्री साठी कोण कवी आपले शब्द सामर्थ्य खर्च करेल.  तरीही तिला काय सहन करावे लागले याची कल्पना आपण करू शकतो.

वानर समाजात पतीच्या मृत्यू नंतर  स्त्री पुन:विवाह करू शकत होती. वालीने जर सुग्रीवचा वध केला असता तर रुमाला सुग्रीवच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा तरी मिळाला असता. पण वालीने सुग्रीवचा वध केला नाही अपितु त्याला पळवून लावले आणि त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याची पत्नी रुमा हिला आपल्या जवळ ठेवले. वानर समाजात ही नवरा जिवंत असताना, स्त्री दुसरा पती करू शकत नव्हती. बिना विवाह न करता परपुरुषा बरोबर संबंधाना त्या काळी समाजात मान्यता नव्हती.  सुग्रीव जिवंत असल्यामुळे रुमाला वालीच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा मिळणे सुद्धा अशक्य होते. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर  रुमा वालीची केवळ भोगदासी होती. वालीने तिच्या बरोबर जबरदस्तीचे शारीरिक संबंध निश्चितच ठेवले असतील आणि त्या संबंधातून अपत्य ही झाले असतील. त्या काळच्या परंपरेनुसार अवैध संबंधातून होणार्या  अपत्यांना वानर समाजात ही दासीपुत्रांचा  दर्जाच मिळाला असेल. अश्या दयनीय परिस्थितीत रुमाला  जगावे लागले. त्या वेळी  तिला  किती मानसिक त्रास होत असेल, याची कल्पना करणे ही अशक्य.  

सुग्रीव पुन्हा राजा झाला.  म्हणायला रुमा किष्किंधा नगरीची पट्टराणी झाली होती.  पण  सुग्रीवच्या हृदयाची पट्टराणी तर ताराच होती. सुग्रीव  अधिकांश वेळ तारेचाच निवासी राहायचा. राजदरबारात ही तारेचीच चलती होती. कठीण प्रसंगी सुग्रीव तारेचाच सल्ला घ्यायचा. एकारितीने तारा त्याची तारणहार होती.  एवढेच नव्हे, रुमाच्या जखमेवर मीठ म्हणून तारेचा पुत्र अंगद किष्किंधानगरीचा युवराज झाला होता. भविष्यात तोच  राजा होणार होता.  हे सर्व पाहून रुमाच्या मनात किती जळफळाट होत असेल, सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या खंडोबा या मालिकेत 'बानू' वरून  खंडोबाच्या प्रथम पत्नी म्हाळसाबाईचा होणारा जळफळाट पाहून आपण कल्पना करू शकतो.

वाली पासून उत्पन्न होणार्या रुमाच्या पुत्रांचे भविष्य तर अंधकारमय होतेच. सुग्रीव पासून उत्पन्न पुत्रांवर ही एकारितीने म्हणाल तर अन्यायच झाला होता. राजाचे पुत्र असूनही ते सिंहासनाचे अधिकारी नव्हते.  

पट्टराणी असूनही  रुमाने  सर्व अन्याय  निमूटपणे सहन केला.  त्या  विरुद्ध आपला आवाज कधीच उठविला नाही.  अत्याचार सहन करणाऱ्या दुर्बल लोकांचा इतिहास कधीच गुणगान करत नाही.  कुठल्या ही कवी, चारण, भाट यांना त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा मिळत नाही. साहजिकच आहे रूमाला ही कुणी  लक्षात ठेवले नाही.


रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ

रामायण कथा : सीता ???

 


 Saturday, June 27, 2015

रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ


वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर  व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा  सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर  वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत  सर्वात जास्त महत्व दिले आहे. 


वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे.  इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला.  तारेला किती मानसिक यातना  झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. तरी ही आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी  आणि वानरांच्या हितासाठी तिने सर्व यातना आनंदाने सहन केल्या.  रामायणात तारे सारखी प्रखर स्त्री अन्य नाही.

तारा केवळ वालीची पत्नी आणि किष्किंधा नगरीची सम्राज्ञी नव्हती  अपितु राजकार्यात ही तिचा पर्याप्त  दखल होता. गुप्तचर तंत्राचा कसा वापर करावा हे ही तिला माहित होते. राज्यात आणि संपूर्ण भरतखंडातल्या घडामोडींचे त्याचे ज्ञान ही तिला होते. वालीपासून लपून राहणार्या  सुग्रीवने, वालीला द्वंद युद्धासाठी ललकारले आणि तो पराजित झाला. पण तारचे मस्तक ठणकले, सुग्रीवच्या असे दुस्साहस कारण काय, हे शोधून काढण्याचे  तिने ठरविले.  गुप्ताचरांकडून इत्यंभूत  माहिती मिळवली. त्याच दिवशी भरपूर मार खाऊन ही सुग्रीवने पुन्हा द्वंद युद्धासाठी वालीला ललकारले निश्चितच या मागे काही षड्यंत्र असणारच असे तारेला वाटलेतिने वालीला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तारेने वालीला किमान सकाळपर्यंत तरी थांबण्याचा सल्ला दिला. पण क्रोधग्रस्त वाली तिचे ऐकायला तैयार नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून तारेने गुप्तचरांकडून मिळालेली सूचना आपल्या पतीला दिली.  इक्ष्वाकू वंशातील  श्रीराम आणि लक्ष्मण ज्यांनी दंडकारण्यातल्या खर दूषण सहित हजारों राक्षसांचा वध  केला आहे आणि दंडकारण्यातल्या जनतेची राक्षसी अत्याचारांपासून मुक्तता केली आहे. अश्या श्रीरामांशी सुग्रीवने मैत्री केली आहे आणि श्रीरामाने त्यांना किष्किंधाचे राज्य देण्याचे ही प्रलोभन दिले आहे. तारेने बालीला सल्ला दिला, परिस्थितीला ओळखा, या घटकेला श्रीरामासारख्या पराक्रमी व्यक्तीशी वैर पत्करणे हिताचे नाही. त्यांना शरण जा. सम्मानपूर्वक रुमाला सुग्रीवच्या स्वाधीन करून, त्याचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा करा.  वालीला तिची सूचना आवडली नाही.  कदाचित् वालीला असे वाटले असेल, श्रीराम न्यायी आहेत दोन भावांच्या युद्धात ते पडणार नाही.  वालीने तारेच्या  सल्ल्याकडे लक्ष दिले नाही.  

वालीचे हितचिंतक वानरांनी वालीच्या मृत्यूची वार्ता तारेला कळवली आणि तिला अंगद सहित पलायन करण्याचा सल्ला दिला. पण तारेने ते मान्य केले नाही. ती  कुठे  ही पळून  गेली  नाही. अपितु  युद्धाच्या  जागी गेली. त्या परिस्थितीत ही आपला क्रोध आवरून, आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले.  वाली वधाचा  दोष तिने श्रीरामावर  लावला नाही. तारेला माहित होते इक्ष्वाकु कुलभूषण श्रीरामचंद्र हे न्यायी आहेत, ते कधी ही अन्याय करत नाही. जे काही घडले त्याला तिचा पतीच कारणीभूत आहे. तिने वाक्चातुर्य दाखवत श्रीरामाला तिचा ही वालीप्रमाणे वध करण्याची  विंनती केली. तिची मात्रा बरोबर लागू पडली. श्रीरामाने सुग्रीवचा किष्किंधा नगरीच्या राजपदावर अभिषेक केला आणि  वाली पुत्र अंगद याचा युवराज पदावर अभिषेक केला. अश्यारितीने  तारेने आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. भविष्यात त्याचा राजा होण्याचा मार्ग मोकळा केला.

क्रोधीत लक्ष्मण नगरात आले. तेंव्हा सुग्रीव तारेच्या निवासी होते. या वरून कळते, तारेने सुग्रीवला ही आपल्या मुठीत ठेवले होते. लक्ष्मणाच्या येण्याची वार्ता ऐकून वानरराज सुग्रीव घाबरून गेले, या विकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुग्रीवणे  तारेलाच  पुढे केले.  

वेळप्रसंग ओळखून ताराने  लक्ष्मणाची मनधरणी केली, हे वीर राजकुमार  ही क्रोध करण्याची वेळ नाही. सुग्रीवच्या मनात तुमचे कार्य करण्याची इच्छा आहे, काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. क्रोधग्रस्त असल्यामुळे तुला कामासक्त माणसाच्या परिस्थितीची कल्पना नाही. कामासक्त होऊन वानरराज माझ्याकडे आले होते, कामाच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या हातून चूक झाली असेल, त्यांना आपला बंधु समजून क्षमा करावी. 

महर्षयो धर्मतपोऽभिकामाः
कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः
अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु
कथं सज्जेत सुखेषु राजा  
किष्किंधाकांड (३३/)
(तपस्यारत महर्षी ही कामाच्या अधीन होतात, सुग्रीव तर एक चंचल वानर आहे, तो  कामाच्या अधीन झाला, त्यात चूक काय).  

तारा पुढे म्हणाली, जरीही सुग्रीव  कामासक्त झाले असतील तरी ही त्यांनी आपले कार्यसिद्ध करण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. लवकरच लाखोंच्या संख्येने वानर इथे येऊन पोहचतील आणि कार्याला सुरवात करतील.  अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाचा क्रोध काही अर्थी शांत केला.

सुग्रीवला भेटल्यावर ही लक्ष्मणाचा क्रोध पुन्हा जागा झाला. लक्ष्मणाने अत्यंत कठोर शब्दात सुग्रीवची नालस्ती सुरु केली. या वेळी मात्र  ताराने  कठोर भूमिका घेतली.  तिने  कठोर शब्दात लक्ष्मणाला बजावले, सुग्रीव हे वानरांचे राजा आहेत. राजा समोर कटू बोलणे कुठल्याही परिस्थितीत उचित नाही. तिने लक्ष्मणाला सांगितले, सुग्रीव कृतघ्न  तर नाही, पण असत्य ही बोलत नाही. ते निश्चितच  अधम राक्षसांचा वध करून, सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करतील. तारा पुढे म्हणाली वर्षोनुवर्षे दुखी असलेल्या माणसाला सुख मिळाले आणि  त्याचा उपभोग घेण्यात तो दंग झाला तर  त्यात गैर काय. थोडा उशीर झाला, म्हणून त्याच्याशी कठोर वागणे उचित नाही. तारेने लक्ष्मणा समोर श्रीरामाच्या न्यायाची प्रशंसा केली. तिने रावणच्या सैन्यबलाचे ही वर्णन करत लक्ष्मणाला स्पष्ट शब्दात बजावले:

ते शक्या रणे हन्तुमसहायेन लक्ष्मण:l
रावण: क्रूरकर्मा सुग्रीवेण विशेषत:l
(किष्किंधाकांड ३५/१७)

[
सारांश: कुणा एकट्याला  रावणाचा आणि राक्षसांचा वध करणे अशक्य आहे. वानरराज सुग्रीवची मदतची  श्रीरामाला ही तेवढीच  आवश्यकता आहे].

अश्यारितीने आपल्या वाक्चातुर्य आणि युक्तिवादाने तारेने लक्ष्मणाला  सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.  लक्ष्यात असू द्या, ज्या प्रमाणे  सुग्रीवला तुम्ही मदत केली, त्याच प्रमाणे सुग्रीवच्या मदतीची तुम्हाला  ही तेवढीच  गरज आहे. लक्ष्मणाला  तिचा युक्तिवाद पटला. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. त्याचा क्रोध शांत झाला. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाच्या क्रोधापासून सुग्रीव  आणि वानरांचे रक्षण  केले. 

तारेचे प्रखरव्यक्तित्वाचा प्रभाव त्या वेळचा समाजावर पडला, म्हणून तारेला प्रात:स्मरणीय  पंच कन्येत  स्थान मिळाले. 

अहल्या द्रोपदी कुंती तारा  मंदोदरी तथा:l
पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम् l


या पाच ही स्त्रियांनी अन्याय सहन केला नाही आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. पण  तारा या पाच ही स्त्रियेत सर्वश्रेष्ठ आहे कारण तिने केवळ स्वत:चाच स्वार्थ नाही सिद्ध केला अपितु संपूर्ण वानरजातीचे ही हित साध्य केले.