Thursday, June 11, 2015

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच - इमानदार सत्यवादी

स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत त्यांच्या पुढ्यात बसलो होतो. अचानक स्वामीजींनी डोळे उघडले. क्षण ही न गमावता मी लगेच प्रश्न विचारला, स्वामीजी एक शंका आहे. आजकाल इंद्रप्रस्थि जे काही चालले आहे, ते बघून सत्यवादी इमानदार या शब्दांबाबत  शंका उपस्थित झाली आहे.    स्वामीजींच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, इमानदार व्यक्ती हा सत्यवादी असतो, सत्यवादी हा इमानदार असतो.   इमानदार सत्यवादी कधीच खोटे बोलत नाही.  संभ्रमात पडलेल्या अज्ञानी मानवांना हे कळणे कठीणच आहे. त्या साठी दिव्य दृष्टीची आवश्यकता असते.

मी म्हणालो, स्वामीजी मला काहीच समजले नाही, माझ्या सारख्या अज्ञ बालकाला समजेल अश्या भाषेत स्पष्ट करा.  स्वामीजी म्हणाले, रस्त्यावर भटकणारा रेडा, मानवी भाषेत बोलू शकतो, असे जरी मी म्हंटले तरी तुझा या वर विश्वास बसेल का? स्वामीजी क्षणभर थांबले. माझ्या चेहऱ्यावर उमटणारे भाव निखरत म्हणाले, अर्थातच नाही. पण 'ज्ञानिया वेद बोले, रेडा भी वेद बोले' असे म्हंटले तर तुझा विश्वास त्यावर बसेल. ज्ञानेश्वर माउलीचे वचन असत्य ठरू शकत नाही.  तसेच राजा हरिश्चंद्राने म्हंटले उद्या सूर्य पश्चिमेस  उगवणार आहे, तर ब्रह्मदेवाला ही सूर्याला मार्ग बदलण्याची आज्ञा द्यावी लागेल. सूर्य पश्चिमेला उगवेल.   


इमानदार सत्यवादी माणसाच्या मुखातून कधीच असत्य बाहेर पडू शकत नाही. जर इमानदार सत्यवादी म्हणतो, माझे अनुयायी इमानदार आहे, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही आहे. तर ते दुसर्यांना कितीही खोटे वाटत असले तरी ते सत्यच असते. त्यांच्या अनुयायांनी केलेले प्रत्येक कृत्य हे सत्यावर आधारित असते फक्त डोळ्यांवर पसलेल्या अज्ञानाच्या परद्यामुळे सत्य अज्ञानी लोकांना दिसत नाही. असे म्हणत स्वामीजींनी डोळे बंद केले, ते पुन्हा ध्यानावस्थेत गेले.   

  


No comments:

Post a Comment