Monday, August 22, 2022

समर्थ रामदास: सुखी संवाद

 
जनी वाद-वेवाद सोडूनि द्यावाl
जनी सुख-संवाद सुखें करावाll
 जगी तोचि तो शोक संतापहारीl
तुटे वाद संवाद तो हीतकारी ll
(मनाचे श्लोक 109)

समर्थ म्हणतात हे मना, लोकांशी सुख संवाद आनंदाने करावा. वाद विवाद  कदापि करू नये. जो संवाद, वाद दूर करतो, सुखी आणि समाधानी करतो. जो आपले दुख हरतो. तोच संवाद करणे योग्य.

घर असो, कार्यालय असो किंवा सामाजिक आणि राजनीतिक संस्था असो. प्रत्येक ठिकाणी काही समस्या असतात किंवा कार्यक्रम असतात. कार्यक्रम  ठरविण्यासाठी आणि समस्येंवर तोडगा काढण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. साहजिकच आहे जिथे दहा लोक असतील, तिथे प्रत्येकाचे विचार आणि कार्य करण्याची पद्धत ही वेगळी असणारच. सर्वांची मते ऐकून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. पण संवादाचे रूपांतरण वादात झाले तर कार्याचा नाश हा होतोच. लोकही तुटून दूर होतात. संवादातून समाधान शोधाचे असेल तर आपल्याला निम्न बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. 

1. आपला अहंकार हा बाजूला ठेवणे.
2. मी म्हणेल ती पूर्व दिशा हा हेका सोडणे.  
3. कुणालाही हीन लेखू नये.
4. अडाणी व्यक्तीच्या मतांचा ही सम्मान करणे.  
5. कुणी काहीही बोलले तरी क्रोध न करणे. 
6. बोलताना सदैव वाणी वर संयम ठेवणे. 
7. व्यर्थचे प्रश्न न विचारणे. 
8. दुसर्‍यांचे दोष न दाखविणे.
9. फक्त विषयवस्तु वरच चर्चा करणे. 

संवाद करताना वरील बाबी लक्षात ठेवल्या तर, समस्यांचे समाधान शोधता येतात. अश्या प्रकारचा संवाद सर्वांना संवाद सुखदायी आणि समाधानी करतो. शेवटी जे काही आपण सुचवितो त्याचे पालन आपल्यालाही करता आले पाहिजे. अन्यथा आपल्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 


Friday, August 19, 2022

समर्थ रामदास: पाण्याचे नियोजन आणि शेती



नदीचे उदक वहात गेले. तो ते निरर्थक चालले.
जरी बोंधोनी काढले. नाना तीरी कालवे.
उदक निगेने वर्तविले. 
नाना जीनसी पीक काढले.
पुढे उदकाचे झाले. पीक सुवर्ण. 
नाना उंच आम्र फळे. अंजीर,ऊस, द्राक्ष, केले; 
नाना पिके यत्नजळे. निर्माण झाली.  

एका टीव्ही वाहिनीवर एक छोट्या शेतकर्‍याची गोष्ट दाखविली होती. त्याच्या छोट्या शेतात नाना पिके, भाज्या, फळे घेऊन तो चांगली कमाई करत होता. तो कार्यक्र्म बघताना मला समर्थांच्या वरील ओळी आठवल्या. पुराणात म्हण आहे, जे कृषि करतात ते ऋषि. आपले सर्व ऋषि मुनि हे शेती ही करायचे. वैदिक काळात त्यांच्या आश्रमात शेतीवर अनुसंधान ही होत होते. बहुतेक त्यामुळेच आपल्या देशात शेतीत विविधता आली असेल. समर्थ ही एक ऋषि होत. समर्थांनी 12 वर्ष देशाचे भ्रमण केले होते. समर्थांनी भ्रमण करताना देशातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणल्या. पाणी आणि पिकांचे नियोजन केल्या शिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. हे त्यांनी जाणले. समर्थांनी शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपायही सुचविले. समर्थ म्हणतात, व्यर्थ वाहणारे नदीचे पाणी अडवून बंधारे बांधले पाहिजे. कालवे बांधून पाणी शेतात पोहचविले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाण्याची जेवढी उपलब्धता आहे त्यानुसार पिके घेतली पाहिजे. पिकाला जेवढे पाहिजे, तेवढेच पाणी दिले पाहिजे. एकाच वेळी शेतात नाना प्रकारची पिके घेतली पाहिजे. अनेकदा शेतकरी लोभाला बळी पडून संपूर्ण शेतात एकच पीक घेतात. वादळ, वारे, कमी-जास्त पाऊस, पिकाला लागणारी कीड इत्यादि कारणांमुळे पीक हातात येत नाही. शेतकर्‍याचे नुकसान होते.  कधी कधी नगदीच्या लालची ने एखाद्या भागात अनेक शेतकरी एकच पीक घेतात. मग बाजारात भाव मिळत नाही. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. बाजारात टमाटो, कांदे इत्यादींचे भाव अचानक गडगडण्याचे हेच मुख्य कारण.  नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. अधिकान्श आत्महत्या करणारे शेतकरी एकच पीक घेणारे असतात. शेतात एकापेक्षा जास्त पीक घेतले असेल तर, शेतकर्‍यावर अशी विपरीत परिस्थिति येणार नाही. समर्थ म्हणतात, शेतात  निश्चित जागी विविध प्रकारची फळ देणारी झाडे ही लावली पाहिजे. झाडे वार्‍यापासून पिकांची सुरक्षा तर करतातच पण फळे देऊन शेतकर्‍याची आर्थिक मदत ही करतात. समर्थांनी सुचविलेल्या वरील उपायानुसार जर शेतकर्‍यांनी शेती केली तर आज ही ते सुवर्ण पीक घेऊ शकतात. 

Wednesday, August 17, 2022

भारतीय शिक्षा बोर्ड

 

1835 पूर्वी देशात 6 लाख गुरुकुल होते. विद्यार्थी गुरुकुलांत सुरवातीच्या पाच-सहा वर्ष स्थानिक भाषा, गणित इत्यादीचे जीवनावश्यक ज्ञान अर्जित करायचे। सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकान्श विद्यार्थी गुरूंकडून पारंपरिक पेशेवर ज्ञान प्राप्तकरून आत्मनिर्भर होत असे.  उरलेले हुशार विद्यार्थी गणित, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, तलाव निर्मितीचे शास्त्र, वैद्यक शास्त्र, विज्ञान, संस्कृत भाषा, व्याकरण, दर्शन, वेद उपनिषद  इत्यादि विषय शिकायचे. परिणामी शिक्षित बेरोजगारी हा शब्द अस्तित्वात नव्हता. या शिवाय 1850च्या पूर्वी जगात सर्वात जास्त साक्षर लोक आपल्या देशात होते.  

ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट करून मैकाले शिक्षण भारतात आणले. शिक्षणाचे मुख्य उद्देश्य होता, भारतीयांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, त्यांच्यात हीन भावना भरणे आणि ब्रिटीशांसाठी चाकर निर्मिती करणे. या व्यवस्थेत 11/12 वर्ष शालेय शिक्षण घेऊन ही, पारंपरिक ज्ञानापासूनही वंचित झालेले, अधिकान्श विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नव्हते. भारत स्वतंत्र झाला. पण शालेय शिक्षणात बदल झाला नाही. आपल्या इतिहास, परंपरा आणि मुळांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. आजची भारतीय शिक्षा म्हणजे 'बिना नींव की  इमारत'. आज देशातील सीबीएससी समेत अधिकान्श शैक्षणिक बोर्डांचा  उद्देश्य,  '"इधर से आलू डालो, उधर से सोना निकलो"  अर्थात सर्वांना पास करून 12वी पास प्रमाणपत्र देण्या इतका राहिला आहे.  12 वर्ष शिकूनही अर्जित ज्ञांनाच्या मदतीने  विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नाही, हे कटू सत्य आहे. आपल्याच मुळांशी नाते तुटल्यामुळे तो आत्म सम्मानरहित हीनभावनेने ग्रस्त ही असतो. परिणाम आज देशात डिग्रीधारिच सर्वात जास्त बेरोजगार आहेत. कारण त्यांच्यापाशी अर्थार्जन करण्याचे ज्ञान नाही आणि सर्वांना सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही. 

देशात अनेक सरकारी बोर्ड आहेत. मग भारतीय शिक्षा बोर्डाची आवश्यकता कशाला. देशाच्या लोकांशी  नाळ मुळांशी जोडून त्यांच्यात आत्मसम्मांनाची भावना भरण्याचे शिक्षण आजच्या व्यवस्थेत दिले जात नाही. सरकारी नौकरशाही आणि राजनीति मुळे शिक्षणात बदल काळानुसार होणे शक्य नाही. त्यासाठी गैर सरकारी बोर्डाची आवश्यकता आहे. या शिवाय सरकारचा शिक्षणावर होणारा खर्च ही कमी होईल. 

भारतीय शिक्षा बोर्डाचे गठन झाले आहेत. भारत सरकारने ही या बोर्डाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांची नाळ आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी जोडण्यासाठी संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. प्रत्येक भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्‍या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही असू शकते. विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले जाईल. गणित, विज्ञान ,इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले जाईल. ज्ञान विज्ञानात होणारे बदल वेळोवेळी समाविष्ट केले जातील. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले जाईल. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य जवळपास पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आशा आहे, हा बोर्ड शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांति घडवून आणेल. 

Monday, August 8, 2022

आज मी पेढे केले

आज सकाळी  फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे,  महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का?  उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.

पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई  गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळले.  ते चार ते पाच मिनिटे

व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे  मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून  जाईल. मला काम  करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले. 

मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला,  काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम  तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.