Tuesday, May 31, 2016

वात्रटिका - झिंगाट प्रेम
हिरव्या शालूत 
कळी लाजली 
फुलपाखराचे जी 
झिंगाट झाले जी. 

फिरफिर  नाचला 
शिट्टी वाजवली 
झिंगत म्हणाला 
आय लव यू.

झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.

प्रिन्स चिमण्याने 
डाव साधला  
बेसुध फुलपाखरू 
चोचीत  धरला. 

फुलपाखरू  खाऊन 
चिवताई खुश 
 चिवचिव  प्रिन्स 
आय लव यू. 

झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.

दूर झाडावर काळा कावळा त्यांचे प्रेमाचे चाळे  बघत  होता,.... 

Saturday, May 28, 2016

सहावा वेतन आयोग - पगार झाले कमीसहावा वेतन आयोग लागू झाल्याचा काही महिन्यानंतरची गोष्ट.  माझा एक दाक्षिणात्य  मित्र नागराजन (टोपण नाव) माझ्या केबिन मध्ये आला.  येताच म्हणाला पटाईतजी, आपको मालूम है, हमारे साथ धोका हुआ है. मी विचारले कसे काय. नागराजन हा हिशोबात  हुशार. रोकड अनुभागात काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव. निश्चित बिना कुठल्या ठोस आधारा शिवाय तो असे म्हणणार नाही. त्याचे म्हणणे होते जिथे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार वाढ १.८६% दिली तिथे उच्च श्रेणीच्या अधिकार्यांना २.६७% पगार वाढ दिली यातच सर्व गोम आहे. (अर्थात त्यांचा पगार १.८६  च्या हिशोबाने २६०४० च्या जागी २.६७च्या हिशोबाने ३७४०० वर  निश्चित केला गेला). 


तब्बल तीस महिन्यानंतर अर्थात ३० सेप्टेम्बर२००८ला  सहाव्या वेतन आयोगच्या सिफारीशी अमलात आणल्या गेल्या. त्यामुळे गेल्या तीस महिन्याचा घरभाडे भत्ता जो पगारचा ३०% टक्के असतो आणि इतर भत्यांचे नुकसान झाले होते, पण अचानक भरपूर पगार वाढल्यामुळे ते कर्मचार्यांच्या ध्यानात आले नाही. ब्रुटसने सीजरच्या पाठीत खंजीर खुपसली, पण मरण्याच्या आधी सीजरला किमान कुणी दगा दिला कळले तरी होते. पण इथे सरळ-सरळ कर्मचाऱ्यांचा पाठीत खंजीर खुपसल्या गेली पण कुणाला कळलेच नाही. 

पे कमिशनची रिपोर्ट ३० सेप्टेम्बर रोजी आली.  त्या वेळी जुलै महिन्याचा महागाई भत्ता पगारात जोडल्या गेला नव्हता. अर्थात १ जानेवारी  रोजी पगार डीपी सहित होता: १०० + ५० = १५०  आणि महागाई भत्ता ४७% अर्थात पाचव्या वेतन आयोगाच्या हिशोबाने १ जानेवारी २००८ला एका सरकारी कर्मचारीचा पगार  प्रत्येक  शंभर रुपयांवर १०० =  २२०.५० रुपये होता.

सहाव्या आयोगानुसार त्याचा पगार ठरला: १०० = १८६ आणि त्यावर १२% महागाई भत्ता. अर्थात १८६ + २२.३२ = २०८.३२ =  २०८.५० धरले तरी १२ DA  वर दर शंभर रुपयांवर १२ रुपये कमी मिळाले. का?. किमान १८ DA मिळाले असते तर पगार २२० रुपये झाला असता. अर्थात चक्क ६% DAचे नुकसान. अर्थात  ३ DA च्या जागी २ DA मिळाले. दुसर्या शब्दांत DAचा फार्मुला सरकारने बदलला होता.  दुसरीकडे उच्चभ्रू अधिकार्यंचा पगार २.६७ वर निश्चित झाला होता.  अर्थात DA सहित पगार २६७ +२८ = २९५रुपये  झाला. कुठे २०८.५० रुपये  आणि कुठे २९५ रुपये.  एवढ्या मोठ्या अंतराचे कारण काय???  याचे उत्तर शोधण्याचा नागराजनने निश्चय केला आणि त्याला जे कळले त्यानी मला कागदावर समजावून सांगितले. 

कर्मचार्यांचा पगार भले १.८६ वर ठरविला गेला असला तरी  कर्मचार्यांना ग्रेड पे पण मिळाली होती.  त्या वर हि महागाई भत्ता मिळणार होता.  एका बाबूचा अर्थात लाल दुखीचंदचा (LDC) सहाव्या वेतन आयोगच्या हिशोबाने पगार होता ५२०० रुपये  आणि ग्रेड पे २००० रुपये.  आता आपण हिशोब करू. 

१.१.२०१६: ५२०० वर १२५% DA= ६५००रुपये DA कर्मचार्यांना मिळाला. पण DA मिळाला पाहिजे होता १८७% अर्थात ८७०० रुपये. २००० रुपये ग्रेड पे वर हि त्याला १२५% DA मिळाला आहे. अर्थात २००० + २५०० = ४५००रुपये.  DAच्या ८७०० रुपयांमधून ग्रेड पे + त्यावरचा  DA= ४५०० रुपये वजा केल्यावर उरतात ४२०० रुपये.  अर्थात एका बाबूला चक्क ४२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. माझ्या सारख्यांना (ग्रुप ब, राजपत्रित) कर्मचार्यांना तर चक्क १०,००० रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊन गेलेले आहे. पण उच्च श्रेणीच्या अधिकार्यांला पगार वृद्धी २.६७ दिल्या मुळे  त्यांना नुकसान झाले नाही.  

एवढे नुकसान झाले तरी कर्मचार्यांना कळले कसे नाही. याचे  कारण ३० महिन्याचा स्थगित वाढीचा पैसा, या शिवाय तीन वार्षिक वेतन वृद्धी हि त्यात जोडल्या गेल्यामुळे कर्मचार्यांना पगारात भरपूर वाढ झाली असे वाटणे स्वाभाविक होते.  या शिवाय महागाई सुद्धा सरासरी दरवर्षी १२.५ टक्के असल्यामुळे, महागाई भत्ता हि भरपूर मिळत होता. सापेक्षरूपेण आपला पगार कमी होतो आहे, हे कळणे सामान्य कर्मचारीला तरी अशक्य होते. आता म्हणाल कर्मचारी संगठन इत्यादी काय करत होते, त्यांना कसे कळले नाही. यावर एकच उत्तर या संगठनांवर काहीच बोलणे योग्य नाही. 

Thursday, May 26, 2016

लाकूडतोड्याची लोखंडी कुल्हाडी - कथेचा सारलाकुडतोड्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहित असेल. लाकुडतोड्याची कुल्हाडी पाण्यात पडली. लाकुडतोड्याने जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. जलदेवता सोन्याची, चांदीची आणि लोखंडी कुल्हाडी घेऊन वर आले. लाकुडतोड्याने लोखंडी कुल्हाडी आपली म्हणून ओळखली. जल देवता प्रसन्न झाले, लोखंडी कुल्हाडी सोबत सोन्या आणि चांदीच्या कुल्हाडी हि त्याला दिल्या. 

काही दिवस आधी एका फेसबुक मित्राचा लेख वाचला होता. लेखाचा सार काहीसा असा होता- नीती कथा चतुर लोकांनी सामान्य लोकांना मूर्ख बनविण्यासाठी लिहिल्या आहे. सामान्य माणसांनी केवळ श्रम करावे आणि दाल-रोटी खाऊन गुजरा करावा. लेखकाचे म्हणणे होते, त्या लाकुडतोड्याने सोन्याची कुल्हाडी आपली म्हणून ओळखायला पाहिजे होती. कुल्हाडीतल्या सोन्याचा निवेश करून दुसर्याच्या श्रमावर लाकुडतोड्या चैन करू शकत होता.  बहुतेक नीती कथांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी असल्यामुळे त्यांना तसे वाटले असेल. 

लाकुडतोड्या हा सामान्य माणसाचा प्रतीक आहे. समजा त्याने सोन्याची कुल्हाडी स्वत:ची म्हणून ओळखली असती. ते सोने विकून त्याला आजच्या हिशोबाने २५-५०  लाख रुपये मिळाले असते.  आता श्रम करण्याएवजी हा पैसा त्याने निवेश करायचे ठरविले.  सरकारी योजनांमध्ये ८-9 टक्क्यापेक्षा जास्त मिळत नाही.  शिवाय वाढत्या महागाईमुळे पुढील काही वर्षांनी त्या व्याजावर चरितार्थ चालविणे त्याला शक्य होणार नाही.  दुसरा मार्ग म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक.  पण  त्या साठी हि  मानसिक श्रम हे लागतेच. कुठली कंपनी चांगली. त्या कंपनीचे भविष्य काय आहे याचे आंकडे सामान्य माणसांना हि थोडे मानसिक श्रम करून मिळविणे शक्य आहे. पण सरकारी आणि आंतरराष्ट्रीय नीती आणि नियम, त्यांच्यात होणारे बदलाव आणि आपल्या देशात तर मालकांची नियत, याचा अंदाज सामान्य माणसे सोडा, शिकलेल्यानाही करता येणे शक्य नाही. या शिवाय बाजारात प्रतिस्पर्धा हि असतेच. माझ्या  अनेक मित्रांनी, अगदी चांगल्या शिकलेल्या आणि सरकारी नौकरी करणार्यानी, बाजारात गुंतवणूक केली. एखाद-दुसरा अपवाद सोडता, सर्वांनाच नुकसान झालले पाहिले आहे.  बाबूलोक शिकलेले असले तरीही गुंतवणूक केल्याने त्यांना नुकसानच होते. लाकुडतोड्या सारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांचे काय होईल. तूर्त सामान्य माणसांसाठी शेअर बाजार नाही. तिसरा मार्ग, व्याजावर पैसा उधार देणे. पण पैसा वसूल करण्यासाठी  दबंगई लागते.  सामान्य माणूस ती कुठून आणणार. शिवाय श्रम न करणार्याला लक्ष्मीची किंमत कळणे शक्य नाही. आपल्या बाप दादांची जायदाद फुंकतानाचे अनेक उदाहरण मी स्वत: डोळ्यांनी पाहिले आहे. आपण हि पाहिले असतील. 

लाकूडतोड्या कडे स्वत:ची लोखंडी कुल्हाडी आहे. अविरत परिश्रम करण्याची त्याची मानसिक आणि शारीरिक तैयारी आहे.  वाढत्या महागाई सोबत तोडलेल्या लाकडांची किंमत हि महागाई अनुसार त्याला मिळत राहील.  नुकसान होण्याची संभावना नाही. पण लोखंडी कुल्हाडी सोबत चांदी,सोन्याची कुल्हाडी मिळविणे हि त्याला शक्य होणार नाही.   

काल रात्री सहज आस्था चेनल लावले. रामदेवबाबांचे भाषण सुरु होते. त्यात त्यांनी म्हंटले अविरत परीश्रामासोबत ज्ञान, तकनिकी आणि स्किल यांचा मिलाप केला तर परिस्थिती सहज बदलता येते.  विषय वेगळा होता तरी सर्वव्यापक सत्य त्यात दडलेले होते. 

लाकुडतोड्या ज्या गावात किंवा नगरात लाकूड विकतो. तिथल्या लोकांना लाकडाच्या कुठल्या वस्तूंची गरज आहे हि माहिती मिळविणे म्हणजे ज्ञान. त्या वस्तूंचा निर्माण सर्वश्रेष्ठ पद्धतीने कसा करायचा, त्या साठी लागणारी औजारे, निर्मितची पद्धत इत्यादी म्हणजे तकनीक आणि ती आत्मसात करणे म्हणजे स्कील.  शिवाय त्याने निर्मित केलेल्या वस्तू ग्राहकांच्या खरोखरच गरजेच्या आहे, हे त्यांच्या  डोक्यात  उतरविण्यासाठी पण ज्ञान आणि स्किल दोन्ही लागतात.  थोडे मानसिक आणि शारीरिक श्रम करून लाकूडतोड्यासारखा सामान्य माणूस हि काहीप्रमाणात ज्ञान, तकनीक आणि स्कील आत्मसात करू शकतो. 

लाकूडतोड्याने आपल्या अविरत परिश्रमाला ज्ञान, तकनिकी आणि स्कीलची जोड दिली आणि लाकडांं सोबत अन्य घरगुती किंवा शेतकऱ्याला लागणार्या वस्तूंची पण निर्मिती केली आणि ती विकली तर त्याचे उत्पन्न निश्चित वाढेल. लोखंडी कुल्हाडी सोबत चांदी आणि सोन्याच्या कुल्हाडी लाकूडतोड्याला सहज उपलब्ध  होतील.  

जलदेवताने बहुतेक हाच संदेश लाकूडतोड्याला दिला आणि त्याने तो प्रत्यक्षात उतरविला. हेच  या नीती कथेचे  सार आहे.  

Sunday, May 22, 2016

उप संपादकाची व्यथा- असत्यं वद धनं चरसन १९८५ची गोष्ट असेल. नागपूरहून  दिल्लीला परत येत होतो. गुप्ता (टोपणनाव) नावाच्या एका इसमाशी परिचय झाला. २७-२८ एक वर्षाचे वय असेल, माझ्या वयापेक्षा थोडे जास्त. लवकरच आमची गट्टी जमली. तो धंद्याच्या कामानिमित्त  दिल्लीला चालला होता. त्याने पत्रकारिताचा अभ्यास केला होता. विदर्भात एका हिंदी वर्तमानपत्रात काही महिने त्याने उपसंपादक या पदावर काम केले होते. परंतु त्याला ती नौकरी सोडावी लागली. मी त्याचे कारण विचारले.  तो म्हणाला सत्यं वद धर्मम चर असे शास्त्रात म्हंटले आहे, पण असत्यं वद, धनं चर असे कुठेच  म्हंटलेल नाही. शास्त्र नियमांचे पालन केले, त्याचेच परिणाम भोगावे लागले. 

पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केल्यावर त्याला, एका वर्तमानपत्रात उपसंपादक पदाची नौकरी मिळाली. नवीन नौकरी, साहजिकच रात्री पाळीची ड्युटी. रात्री ११ वाजता वर्तमान पत्र छापण्याचे काम सुरु व्हायचे. त्या दिवशी रात्रीचे ९ वाजले होते.  अचानक एक ताजी बातमी मिळाली. एका मोठ्या ब्रान्डेड, मिठाईच्या दुकानदारावर छापा पडला होता.  त्याने ती बातमी छापायचा निश्चय केला. तासभराने त्याला फोन आला. 'साहेब, मी मिठाईच्या दुकानदाराचा मेनेजर बोलतो आहे, तुम्ही ती बातमी छापू नका'. गुप्ताने उत्तर दिले, वर्तमानपत्र छापण्याची तैयारी पूर्ण झाली आहे, बातमी काढणे आता शक्य नाही. दुसरी कडून उत्तर आले, 'साहेब अजून तास भराचा अवकाश आहे, शिवाय आम्ही तुम्हाला विज्ञापन हि देतो'. विज्ञापन देऊन काही उपकार करत नाही, आम्ही नाही छापली तरी दुसरे छापतीलच, उद्या मला या बाबत विचारले तर मी काय उत्तर देणार म्हणत रागानेच गुप्ताने फोन ठेवला.  

अर्धा तास आणखीन गेला असेल, एक माणूस मिठाईचा डब्बा घेऊन, गुप्ताचा केबिन मध्ये शिरला. शिरताच म्हणाला, 'साहेब, मला कळले आहे, तुम्ही इथे नुकतेच आला आहात, तुम्हाला या धंद्याची कल्पना नाही. कुठल्या  हि वर्तमानपत्रात हि बातमी येणार नाही याचा बंदोबस्त आम्ही केला आहे. उद्या जर तुमच्या वर्तमान पत्रात हि बातमी छापल्या गेली तर आमचे नाव उगाच खराब होईल आणि आपले संबंध हि.   हि छोटीसी भेट घेऊन इथे आलो आहे म्हणत मिठाईचा डब्बा समोर ठेवला.  गुप्ताने विचारले काय आहेत यात.  साहेब, मिठाई आहे, शुद्ध देसी  तुपातली. काळजी करू नका यात काही  भेसळ नाही. साहेब एवढे मोठे दुकान आहे, काही शाखा हि आहेत. कुठवर लक्ष ठेवणार आम्ही. कधी कधी चूक होतेच.  त्यासाठी आम्हाला बदनाम करावे हे उचित नाही. तुमच्या वर्तमानपत्रात हि कधी-कधी चुकीच्या बातम्या छापल्या जातात. पुढच्या अंकात क्षमा मागून तुम्ही तो विषय संपवतात. त्याने डब्बा उघडून गुप्ता समोर ठेवला.  यात मिठाई सोबत १००० रुपये हि आहेत, तो म्हणाला. पैशे पाहून गुप्ताचे डोके सटकले,तो ओरडला, हे काय आहे, मला काय समजले आहे, इथून तत्काळ निघून जा. अन्यथा धक्के मारून बाहेर काढेन. त्या माणसाला हि राग आला, जाता जाता म्हणाला, साहेब, आमचे तर काही नुकसान होणार नाही, थोड्या दिवसांत लोक विसरून जातात. पण तुम्हाला याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. 

जवळपास ७-८ दिवसांनी, वर्तमानपत्राच्या संपादकानी गुप्ताला ऑफिसमध्ये बोलविले.  गुप्ता संपादकाच्या केबिनमध्ये गेला. संपादकाने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले. संपादक महोदय शांत आवाजात म्हणाले,  गुप्ता, आपल्या ऑफिसमध्ये फोन आहे, कुठलीही विवादास्पद बातमी छापण्या आधी, किमान मला तरी विचारले पाहिजे होते.   

गुप्ताला थोडी कल्पना आली, तरी हि त्याने विचारले, कुठली बातमी.  

'ती छाप्यावाली बातमी छापण्या आधी मला का नाही विचारले'.?  

गुप्ता म्हणाला, मला तशी गरज वाटली नाही.  शिवाय त्यांचा माणूस मला रिश्वत देत होता.  ते लोक चुकीचे काम करतात. त्यानां धडा मिळालाच पाहिजे. 

संपादक म्हणाले, हे सर्व मलाही कळते.  पण आपल्या वर्तमानपत्रात शनिवारी आणि रविवारी त्यांचे पूर्ण पानभर विज्ञापन राहते.  त्यांनी आपल्या वर्तमान पत्राला विज्ञापन न देण्याचा निर्णय घेतला आहे आणि गेल्या शनिवार आणि रविवारी आपल्या वर्तमानपत्राला  त्यांचे विज्ञापन मिळाले नाही.  आपण जर त्यांचा स्वार्थ जपणार नाही तर दुसरे लोक हि आपल्या वर्तमान पत्रात विज्ञापन देण्याचे टाळतील. स्वार्थाची दुनिया आहे हि.  आता तूच सांग बिना विज्ञापनाचे वर्तमान पत्र चालविणे शक्य आहे का? 


या वर गुप्ता मौन राहिला. संपादक पुढे म्हणाले, आपल्या मालकांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहे. ते पुन्हा विज्ञापन द्यायला तैयार झाले आहेत, फक्त एका अटीवर. 

गुप्ताने विचारले कुठल्या अटीवर.  संपादक म्हणाले, तुला नौकरी सोडावी लागेल.....

मी विचारले, पुढे काय झाले. गुप्ता म्हणाला होणार काय, राजीनामा दिला. त्याच दिवशी शपथ घेतली, पुन्हा वर्तमानपत्रात तर सोडा कुठे हि नौकरी करायची नाही. एक छोटेसे दुकान उघडले आहे. दिल्लीच्या सदर बाजारातून  माल मागवितो आणि नागपूरला विकतो. जास्त नाही, पण पोट-पाण्याचा प्रश्न कि सुटलेला आहे. आता कुठले हि वर्तमानपत्र वाचीत नाही. बातम्यांवर विश्वास ठेवीत नाही. पत्रकारीताची डिग्री हि अग्नीदेवाला समर्पित करून टाकली आहे. 

त्या काळी, एक मोठा मिठाईचा दुकानदार, छोट्या शहरात एका वर्तमान पत्राला आपल्या इशार्यावर नाचवू शकत होता. आज मोठे व्यवसायिक आणि सरकार हि  कोट्यावधी रुपये विज्ञापनांवर खर्च करतात.  समाचार वाहिनी चालवायला हि कोट्यावधी रुपयांची गरज असते. अश्या परिस्थितीत  ब्रेकिंग न्यूज इत्यादींवर विश्वास कसा ठेवायचा?  विशिष्ट उद्देश्याने चर्चा सुरु ठेवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त दराने विज्ञापन दिल्याचे नुकतेच ऐकिवात आले आहे.  जुना किस्सा आठवला. 

आजकालचे पत्रकार मोठ्या- मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात. कोठी, कार आणि बंगला त्यांना सहजच प्राप्त होतो.  मान-सम्मान, पद-प्रतिष्टा आणि धन मिळत असेल तर सत्यं वद धर्मम चरला कोण विचारणार. अधिकांश पत्रकारांच्या दृष्टीकोणातून असत्यं वद धनं चर हीच आजची पत्रकारिता आहे.

ययाति- पुन्हा एकदादिल्लीचे वाढते प्रदूषण असो वा  महाराष्ट्राचा  दुष्काळ, कारणीभूत आपणच  आहोत.  जो पर्यंत मनुज पुत्र धर्तीवर असलेल्या अन्य जीवनालाही मग जीव जंतू असो वा वनस्पती, जगण्याचा हक्क आहे, हे मान्य करत नाही, असे परिणाम भोगावेच लागेल.  माझी एक जुनी कविता पुन्हा एकदा.....

क्षमा, दया आणि सहिष्णुता
आहेत मानवतेची भूषणं
आहे त्यागसहित भोगच
मानव जीवनाची सार्थकता हे जाण.
इति ऋषि वचन.

पाहुनी चिरकुमारी
अक्षय अखंडित वसुन्धरेला
विसरून गेला
ययाति ऋषि वचनाला. म्हणाला,
"क्षमा आणि दया
आहे दुर्बलांचे वचन
वसुंधरा आहे वीरभोग्या 
दुर्बलांना नाही इथे
अधिकार जगण्याचा."

पायदळी तुडवलं त्यानी
शुद्रतम जीवनं
मोठी होती बनली तीही
मृगया मनोरंजनाची साधनं.

राक्षसी अट्टाहास करीत
विक्षिप्त बलात्कारी मनुष्य
तुटुन  पडला धरतीवरी
टर्र फाडली की तो त्यानी
वसुधेची वसने पूरी.


धरतीच्या कोमल हृदयात हि
खोल रुतवले अपुले राक्षसी दात
सर्वत्र पसरल्या घावांतून
विषाक्त वायु पसरु लागला
प्राण त्यात ययातिचाही
कासाविस मग झाला.

स्वर्गस्थ देव ओरडले
"धरणीशी बांधली आहे
तुझ्या जीवनाची गाठ
त्यागून भोगाचा वसा
वाचव आपल्या धरणीला".

बघुन धरतीची दशा
करू लागला ययाति विचार
की शोधली पाहिजे आता
अंतरिक्षात  दूसरी धरा कुठे तरी दूर.

किंवा
आपल्या शक्तिने देवताना करेन च्युत
मग भोगू शकेन स्वर्णिम स्वर्गातुन
अप्सरांना  नित-नवीन.
कदाचित!अक्षय अमृताचे पात्रच
भागवू शकेल माझी तहान.

काळातच दडलेलं आहे
भाग्य मनुष्य पुत्राचं
त्यजुन नीच भोग मार्ग
धरेल का ययाति
त्याग-तपस्येचा मार्ग?

की हरवून जाईल
मनुष्य पुत्र
अंतरिक्षाच्या असीम
अंधारात?

सध्या तरी ययाति
किं कर्तव्यमूढ़.
विचारात.   

Wednesday, May 18, 2016

यक्ष प्रश्न - भस्मासुराला वरदान देणारेभस्मासुराची कहाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे. तरीही थोडक्यात सांगतो. भस्मासुराने उग्र तपस्या केली. महादेव प्रसन्न झाले. भस्मासुराने वरदान मागितले, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होईल. महादेवाने पुढचा काहीच विचार न करता तथास्तु म्हंटले. भस्मासुराने महादेवाने दिलेल्या वरदानाचा प्रयोग महादेवावारच करण्याचे ठरविले. महादेवाला  स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. महादेवाने भगवान विष्णूंचा धावा केला. भगवंताने मोहिनी रूप धारण केले. स्वत:च्याच डोक्यावर हात ठेऊन भस्मासुर भस्म झाला.  इति. 

भस्मासुराची कथा काल्पनिक असली तरी त्यात सर्वकालिक सत्य दडलेले आहे. प्रेमाने डोक्यावर हात फिरविणार हा नेहमीच तुमचा  हितैषी नसतो, कधी-कधी भस्मासुर हि प्रेमाने डोक्यावर हात फिरवितो. तुम्हाला आमिष दाखवितो, तुमची महत्वाकांशा पूर्ण करण्यास मदत करतो. स्वाभाविकच आहे, पुढचा मागचा विचार न करता, तुम्ही हि त्याची मनोवांच्छित इच्छा पूर्ण करालच. पण भविष्यात भस्मासुरी हात तुमच्या डोक्यावर पडला तर तुम्हाला कोण वाचवेल. महादेवाला वाचविण्यासाठी भगवंताने मोहिनी अवतार घेतला पण या कलयुगात तुम्हाला वाचविण्यासाठी कुणी हि येणार नाही. परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील.  

पण जेंव्हा महत्वाकांशा आणि स्वार्थाचा चष्मा डोळ्यांवर  चढलेला असतो, भस्मासुराला मदत करण्याचे भविष्यात  काय परिणाम होणार हे दिसत नाही. राज प्रमुखांची महत्वाकांशा मोठी असते, ती पूर्ण करण्यासाठी भस्मासुराची हि मदत घेण्यास ते कचरत नाही. असा आपला इतिहास आहे. पण ज्या -ज्या राज प्रमुखांनी  भस्मासुरांची मदत घेतली, त्यांना त्याचे फळ हि भोगावे लागले.  भस्मासुरांच्या हातून ते तर भस्म झालेच पण प्रजेला हि त्याची मोठी किंमत मोजावी लागली.  असो.  

सामान्य माणसांच्या बाबतीत, म्हंटल तर त्यांच्या काही मोठ्या महत्वाकांशा नसतात. काही लोक थोड्या भौतिक सुखासाठी,  काही मान-सम्मान किंवा प्रमोशनसाठी भस्मासुरांची मदत करतात. काही लोक तर केवळ दबावाला बळी पडून भस्मासुरांची मदत करतात. अश्या लोकांच्या इच्छित महत्वाकांशा बहतेक पूर्ण होतात हि.  पण जेंव्हा भस्मासुराचा हात त्यांच्या डोक्यावर पडतो, त्यांना आपला प्राण हि गमवावा लागतो. पण त्यांच्या करणीचे परिणाम इतरानाही भोगावे लागतात, त्याचे काय. ???


Saturday, May 14, 2016

अमलतास आणि आत्महत्या करणारे


दिल्लीच्या रिज रोड वर शंकर रोड पासून बुद्ध गार्डन पर्यंत पसरलेले जंगल आहे.  जंगलाचा चारी बाजूला भिंत आहे. हे वेगळे, भिंतीत कित्येक ठिकाणी भगदाड आहेत. गुज्जर लोक आपली जनावरे जंगलात चरविण्यासाठी या भगदाडांचा वापर करतात. रिजच्या बस स्टैंड वर तो उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत  बायकोची एक जुनी साडी होती. भिंतीत पडलेल्या एका भगदाडातून आत जंगलात शिरला. दुपारचे १२ वाजलेले होते, त्यात मईचा महिना. ऊन मी-मी म्हणत होते.  त्याचे सर्वांग घामाने भिजलेले होते. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला होता. आपल्या माथ्यावरचा घाम पुसत त्याने दूरवर पसरलेल्या जंगलावर एक नजर टाकली.  पिंपळाचे किंवा किंवा मजबूत फांदीचे झाड असेल तर झाडाच्या फांदीला साडीचा दोरी सारखा वापर करून आत्महत्या करण्याचा त्याचा मनसुबा होता.    

दोन एक वर्षांपूर्वी बिहारहून दुसर्या जातीच्या एक मुली सोबत पळून तो दिल्लीत आला होता. इथे आल्यावर त्याने आर्यसमाज मंदिरात लग्न केले. त्याची किस्मत चांगली होती. बाह्य दिल्लीत एका अवैध कालोनीतल्या एका चाळीत त्याला खोली मिळाली. त्याच कोलोनीत एका ठिकाणी पुलाचे काम सुरु होते. तो तिथे दिहाडीवर काम करू लागला. अर्थातच रोज काम मिळायचे नाही.  गावात कळल्यावर पंचायतीच्या आदेशानुसार, दोघांच्या परिवारांनी  त्यांच्या सोबत आपले सर्व संबंध तोडून टाकल होते.   दोन एक महिन्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले. त्याचा रोजगार केला. तेंव्हा पासून तो कामाच्या  शोधात भटकत होता.  पण  दोन-चार दिवसापेक्षा जास्तीचे काम त्याला मिळाले नाही. घरी बायको आणि सहा महिन्याची मुलगी होती. बनियाने उधारी देणे बंद केले. घरात खायला तर सोडा, पोरीच्या दुधासाठी हि पैशे काही उरले नव्हते.  या वरून काल घरात भयंकर भांडण झाले होते. बायकोने जात काढली, 'पोसू शकत नव्हता तर लग्न का केले, मीच मूर्ख होते, तुमच्या नादी लागुन आयुष्याचा सत्यानास केला. बायकोचे असे जहरी बोलणे त्याला बोचले. आपण नालायक आहो, आपल्या परिवाराचे पोषण करू शकत नाही.आपल्या वर विश्वास ठेऊन जी स्त्री सर्वस्व सोडून आपल्या सोबतआली तिला काही सुख देऊ शकलो नाही. आपल्यासोबत आपण तिच्या हि आयुष्याचा सत्यानाश केला.   


मन घट्ट करून आत्महत्या करण्याचा निश्चय केला. दूर पिवळ्या फुलांनी नटलेले अमलतासचे झाड दिसले. जिथे जंगलातली सर्व झाडे पर्णहीन, शुष्क आणि कोरडी दिसत होती. अमलतासचे झाड ऐन उन्हाळ्यात हि वासंतिक रंग उधळत होते. उन्हाळ्याने हि अमलतासच्या पुढे घुटने टेकले होते. अमलतासच्या झाडाजवळ पोहचल्यावर त्याने पाहिले तिथे एक बाईक उभी आहे. झाडाखाली अमलतासच्या फुलांचा पिवळा गालीचा पसरलेला होता.  एक २० एक वर्षाचा मुलगा आणि तेवढ्याच वयाची एक मुलगी दोघे झाडाखाली  बसले होते. दोघांच्या  बोलण्याचा  आवाज त्याला स्पष्ट  ऐकू येत होता. तो कान लाऊन ऐकू लागला.  

तो: तुझे लग्न टाळता नाही का येणार. 

ती:  मी अनेक वेळा आई-बाबाना म्हंटले शिक्षणाचे शेवटचे वर्ष आहे, एकदा बीए झाले कि लग्न ठरवा. पण बाबा म्हणतात, कुठला तरी तारा बुडणार आहे, पुढच्या महिन्यातच लग्न करणे गरजेचे.  शिवाय लग्नंतर हि तू शिक्षण पूर्ण करू शकते. तुला माहित आहे, राजा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नाही.  आपली जाती वेगळी. घरचे लग्नाला तैयार होणार नाही. आता दोनच मार्ग  कुठेतरी पळून जाऊ किंवा  आत्महत्या.... 

तो: माझ्या हि घरच्यांना तुझ्या सोबत लग्न मान्य होणार नाही. घरातून पळून जाऊन लग्न करावे लागेल.  पण लोचा एकच आहे, माझे ग्रेजुएशन पूर्ण झाले नाही आहे. कोण नौकरी देईल मला.  मला हि तुझे मत पटते, आपण एकत्र जगू शकत नाही पण एकत्र आत्महत्या तर करू शकतो. 

मुलगी: मला मरण्याची भीती वाटते, त्या पेक्षा पळून मुंबईला जाऊ. म्हणतात, मुंबई शहरात सर्वांना काम मिळते. माझ्या जवळ दोन हजार रुपये आहेत, काही दिवस पुरतील. 

मुलगा: जशी तुझी इच्छा.  माझ्या हि मनात हा विचार येत होता.  मी हि घरून ५००० रुपये घेऊन आलो आहे. 

मुलगी: आज संध्याकाळच्या गाडीनेच मुंबईला निघू. तुझ्या सोबत कुठल्या हि परिस्थितीत मी राहायला तैयार आहे. 

आता त्याला राहवले नाही. तो एकदम त्यांच्या समोर आला आणि रागानेच त्या मुलाला म्हणाला, पळून जाणार, ठेवणार कुठे हिला?  पोसणार कसा? काही विचार केला आहे का?  तुझ्या सारख्या सिंगल हड्डीच्या माणसाच्या हातून शारीरिक श्रम होणार नाही,  बिना शिक्षणाचे कारकुनी काम हि मिळणार नाही. काय खाऊ घालेल हिला. प्रेमाचा बुखार उतरल्या वर हीच रोज शिव्या देईल तुला. 

मुलगा:  आम्ही आत्महत्या करू कि पळून जाऊ, तुला काय करायचे. नजर ठेवायला आला आहे का, आमच्या वर. कुणी पाठविले तुला. 

तो: रागातच, नजर ठेवण्यासाठी नाही, मी या झाडा खाली आत्महत्या करायला आलो आहे. आपल्या पिशवीतून साडी काढत, ह्या साडीचा उपयोग दोरी सारखा करून फासावर लटकणार आहे.  दोघे हि क्षणभर स्तब्ध राहतात आणि मग विचारतात, का म्हणून? 

दोन वर्षांपूर्वी मी शिक्षण अर्धवट सोडून मी तिच्या सोबत पळून आलो होतो. दिहाडी मजदूरी करून कसाबसा संसाराचा गाडा रेटू लागलो.  पोटाची भूक प्रेमापेक्षा मोठी असते. काही महिन्यातच प्रेम आटलं. तिला हि वाटू लागले चूक झाली. पण केलेल्या चुकीचे भोग भोगावेच लागतात. हाड-हाड निघाले आहे, तिचे. अर्धपोटी राहते ती. शिवाय  सहा महिन्याची मुलगी हि आहे. पण रोज काही काम मिळत नाही. काही पैशे असते तर, भाजीचा ठेला टाकला असता. पण कोण उधार देणार?  घरभाडे हि तुंबले आहे.  त्या छोट्या पोरीसाठी दुधाचा बंदोबस्त हि करणे शक्य नाही.  विचार केला, आत्महत्या करावी, सुटकारा मिळेल यातून. 

मुलगा: भैया, तू तर सुटेल, पण तिचे काय होईल, जिने तुझ्यावर विश्वास टाकला.  प्रेम केले. 

तो: हाच प्रश्न मी तुला विचारला तर.  काही क्षणाची शांतता. 
   
मुलगा:  भैया, आत्महत्या करू नको, हे ५००० रुपये घे.  पैशे जास्ती नाही आहे, पण तुझा काही दिवसांचा बंदोबस्त होईल. तो पर्यंत कदाचित तुला कुठल्या कारखान्यात काम हि मिळेल. किंवा या पैश्यात भाजीचा  ठेला हि लाऊ शकतो.  

तो : पैशे हातात घेत, नाही करणार आत्महत्या,  पण तुम्ही काय करायचे ठरविले आहेत? 

मुलगी: भैया, तुमची कहाणी ऐकून,  मला तुमचे म्हणणे पटते.  आत्महत्या करणे किंवा पळून जाने योग्य मार्ग नाही. पुन्हा  आई-बाबांशी  बोलून पाहते किंवा ज्या मुलाशी लग्न होणार आहे, त्याचाशी बोलून पाहते. काही मार्ग निश्चित निघेल. 

मुलगा:  मार्ग निघे पर्यंत मी हि थांबेल. नाही निघाला तरी आम्ही आमचे  प्रेम हृदयात जपून ठेऊ.  ते कुणी आमच्या पासून हिरावून शकत नाही. 

तेवढ्यात वार्याची एक झुळूक आली. पिवळीधम्म फूलेंं त्यांच्या अंगावर पडली. जणू अमलतासने कौल दिला होता. त्याने झाडाकडे पहिले. अमलतास हसत होता.  त्याचे मन शांत झाले. आपल्या बायको मुलीची आठवण आली. तो त्या मुलाकडे पाहत म्हणाला, हे ५००० रुपये उधार. उद्या पासून  मी भाजीचा ठेला लावणार.  जमले तर पुढच्यावर्षी याच दिवशी तुमचे पैशे परत करेल.  

Friday, May 13, 2016

बडबड गीत - काहीच्या काही डिग्रीआपण आपली डिग्री राजपत्रित अधिकाऱ्या कडून सत्यापित करवून घेतो. पण आजकाल  इमानदार माणसाकडून  सत्यापित करवून घेणे गरजेचे अन्यथा तुमच्यावर हि खोटी डिग्री ठेवण्याचा आरोप लागू शकतो.....

(१)   डिग्री


मुंबईची नको,दिल्लीची नको 
गुजरातची तर नकोच  नको.

डिग्री हवी मना सारखी 
आपल्याला आवडणारी 
*सत्यापित मुहर वाली 
इमानदार युनिव्हर्सिटीची. 

*सत्यापित =verified

(२)

पण पोलिसांकडून  डिग्री  बाबत विचारले तर त्याचे  परिणाम 

पोलीस दादा पोलीस दादा

दाखव अपुली  डिग्री
पोलीस दादाला आला ताव
दाखवली त्याला
डिग्री थर्ड .

Monday, May 9, 2016

शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित


सन १९७०-७२चा काळ.  जुन्या दिल्लीत  नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे  जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे  मंदिर होते. मंदिराच्या  प्रांगणात  शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक / जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे.  मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी   मंदिर सकाळी १० पर्यंत  उघडे राहात होते.  मंदिराच्या बाहेर एका पायाने अधू असलेली भिकारीण भिक मागण्यासाठी बसत होती. तिची कहाणी हि अत्यंत दारूण होती.  जवळपास दोन एक वर्षांपूर्वी आपल्या नवर्यासोबत ती मजदूरी करायला जुन्या दिल्लीत आली होती. पण  वर्षी तिचा नवरा अपघातात वारला आणि तिचा ही एक पाय  कापावा लागला. त्या वेळी ती गदोदर होती. आजू बाजूच्या लोकांनी काही काळ मानवीय आधारावर तिला मदत केली. पण लोक तरी किती काळ मदत करणार.  नाईलाजाने आता आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन मंदिराच्या बाहेर सकाळी भिक मागते.     कहाणीचे दुसरे पात्र लक्ष्मीचंद. लक्ष्मीचंद नित्य नेमाने महादेवाला दुधाचाअभिषेक करायचे.  लग्नानंतर बरीच वर्ष लक्ष्मीचंद यांना मुल झाले नव्हते. कुणीतरी त्यांना रोज महादेवाचा दुधाने अभिषेक करायला सांगितले. महादेवाच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली म्हणून मुलाचे नाव शिवप्रसाद ठेवले.  शिवप्रसाद चार-पाच वर्षांचा असताना लक्ष्मीचंदच्या बायकोचे निधन झाले. लक्ष्मीचंदने पुन्हा दुसरे लग्न केले नाही. शिवप्रसादच्या आजीने त्याला आईची कमी भासू दिली नाही.  इतर दिल्लीकर  मुलांप्रमाणे शिवप्रसादला हि  रात्री झोपण्या आधी एक मोठा पेला गरम दूध पिण्याची सवय होती. शिवाय त्याची आजी  रात्री त्याला रामायण, महाभारत, पुराणातल्या गोष्टी सांगायची.  सकाळी शाळेत जाताना शिवप्रसादची  आजी त्याला १० पैशे खाऊ साठी हि द्यायची.  बहुतेक वेळा तो ते पैशे आपल्या मातीच्या गुल्लकीत टाकायचा.   

लक्ष्मीचंदला काही कामा निम्मित ७-८ दिवसा करता परगावी  जावे लागले. मुलगा मोठा झाला, किमान एकटा मंदिरा पर्यंत जाऊ शकतो. परगावी जाताना त्यांनी शिवप्रसादला रोज सकाळी महादेवाला दुग्धाभिषेक करण्याची जिम्मेदारी दिली.  सकाळी ऊठून आंघोळ करून शिवप्रसाद एक तांब्याचा गिलास घेऊन घरातून बाहेर पडला.  

नवी बस्तीत एक दूधवाल्या भैयाचे दुकान होते, तेंव्हा गायीचे दूध २ रुपये किलो असेल. शिवप्रसादच्या तांब्यात त्याने  १०० मिली लिटर अर्थात २० पैश्याचे दूध टाकले.  दूध घेऊन शिवप्रसाद मंदिराच्या जवळ पोहचला. मंदिराच्या बाहेर बसलेला एक म्हातारा भिकारी आणि पायाने अधू असलेलील भिकारीण दिसली. तिच्या खांद्यावर ७-८ महिन्याचा  हडकुळा मुलगा होता. तो जोर जोरात रडत होता.  शिवप्रसादच्या कानात म्हातार्या भिकार्याचे  शब्द पडले.  किती वेळापासून मुलगा रडतो आहे दुध का नाही पाजत. ती भिकारीण म्हणाली  'दूध होवे जो पिलाऊँ'.  त्या वर म्हातारा भिकारी शिवप्रसाद कडे पाहत उतरला, कैसा जमाना है, पत्थर पर चढाने के लिए दूध है, पर ज़िंदा बच्चे के लिए नहीं.  ते शब्द ऐकून शिवप्रसादला विचित्र वाटले.  मंदिरात येऊन त्याने पाय धुतले. महादेवावर दुग्धाभिषेक केला.  शिवाच्या पिंडीवर टाकलेले दूध एका छिद्रातून नालीत वाहून जाताना पाहून त्याला  म्हाताऱ्या भिकारीचे शब्द आठवले, शेवटी दूध नालीत वाहून गेले, त्या पेक्षा त्या भिकारीणला दिले असते, तिच्या पोराचे पोट भरले असते. त्याने मंदिरात आत जाऊन त्याने  राधा-कृष्णाचे दर्शन घेतले, पुजारीने प्रसाद म्हणून  खडीसाखर त्याच्या  हातावर ठेवली. पण खडीसाखर काही त्याला गोड लागली नाही. त्या दिवशी शिवप्रसादला काही चैन पडले नाही. अभ्यासातही लक्ष लागले नाही. सतत त्या भिकारीणच्या हडकुळ्या पोराचे चित्र डोळ्यांसमोर येत होते. त्याला जर दूध नाही मिळाले तर तो भुकेने मरून जाईल. महादेवाला दूध वाहण्या एवजी त्याला पाजले तर... पण वडिलांच्या आज्ञेचे काय होईल.??? 

काय करावे त्याला सुचेनासे झाले. रात्री झोपायचा वेळी त्याला आजीने सांगितलेली महात्मा आणि गाढवाची गोष्ट आठवली. त्याने आजीला विचारले, आजी त्या महात्म्याची गोष्ट सांगना, ज्यानी गाढवाला गंगाजळ पाजले होते.  आजी गोष्ट सांगू लागली,  महादेवावर अभिषेक करण्यासाठी तो महात्मा गंगाजळाची कांवड घेऊन, महादेवाच्या दर्शनासाठी निघाला होता.  रस्त्यात वाळवंटात एक गाढव पाण्याविना तडफडताना महात्म्याला दिसले. महात्म्याने क्षणभरचा विचार न करता, कांवडीतले गंगाजळ त्या गाढवाला पाजले. गाढवाचे प्राण वाचले.  शिवप्रसादने आजीला विचारले, आजी, महादेवाच्या अभिषेकासाठी आणलेले गंगाजळ त्या महात्म्याने गाढवाला पाजले, महादेव रागावला नाही का त्याच्यावर. आजी हसून म्हणाली, महादेव का बरे रागावेल.  महात्म्याने एका प्राण्याचा जीव वाचविला. गाढवाचे प्राण वाचवून महात्म्याने एका रीतीने महादेवाचा अभिषेकच केला होता.   मनुष्य असो वा प्राणी जीव वाचविणारा सर्वात मोठा पुण्यात्मा.  आजीचे उत्तर ऐकून शिवप्रसादला चैन पडले. रात्री तो शांत झोपला. दुसर्या दिवशी सकाळी ऊठून, स्नान करून तो मंदिरात जायला निघाला. पेल्या कडे बघताना  त्याच्या  लक्ष्यात आले थोड्याश्या दुधाने काही मुलाचे पोट भरणार नाही.  थोडे दूध आणखीन विकत घ्यावे लागेल. थोड्यावेळ विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली, तो आजीला म्हणाला,  आजी, खाऊचे पैशे आत्ता देते का? "कशाला, शिव". मला पण महादेवाला अभिषेक करायचा आहे. पण बाबांच्या पैश्याने नाही, माझा खाऊच्या पैश्यानी.  माझा गुणाचा ग, बाळ म्हणत आजीने त्याच्या हातावर १० पैशे ठेवले. 

शिवप्रसाद दूधवाल्या भैयाचा दुकानात पोहचला. भैयाने नेहमीप्रमाणे २० पैश्याचे दूध  पेल्यात टाकले.  शिवप्रसादने त्याला १० पैश्याचे दूध आणखीन टाकायला सांगितले आणि १० पैशे दिले. भैया म्हणाला, पैशे कशाला, खात्यात टाकून देईल. शिवप्रसाद म्हणाला खाते वडिलांचे आहे, माझा हिशोब नगदीचा. भैयाने चुपचाप १० पैशे खिश्यात टाकले. तो मनातल्या मनात पुटपुटला, बनियाची पोरं हिशेबात पक्के असतात. म्हणूनच हे कधी धंद्यात मार खात नाही. 

शिवप्रसादमंदिराजवळ पोहचला. ती भिकारीण तिथेच बसलेली होती. शिवप्रसादने पेल्यातले दूध तिच्या कटोर्यात ओतले अणि तिला म्हणाला बच्चे को पिला देना.  जुगजुग जियो बेटा भिकारीण पुटपुटली.  वेगळ्याच उर्मीने फटाफट मंदिराच्या पायर्या चढून शिवप्रसाद  मंदिरात पोहचला. नळाच्या पाण्याने पेला भरला आणि पाण्याच्या अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत मनातल्या मनात पुटपुटला, महादेव माफ कर मला, मी वडिलांची आज्ञा मोडली. पण मी काही चूक केले नाही, हे तुला माहित आहे.  असेच पुढचे सहा-सात दिवस निघून गेले. त्या दिवशी संध्याकाळी वडील घरी परतले. शिवप्रसादने वडिलांच्या नजरेला नजर देणे टाळले.  रात्री झोपताना तो आजीला म्हणाला, आजी एक सांगायचे आहे, मी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्याएवजी ते दूध त्या भिकारीणला देत होतो. तिच्या छोट्या मुलासाठी. तेवढे दूध पुरणार नाही, म्हणून आपल्या खाऊच्या पैशे दूधासाठी मोजत होतो.  आजी तूच म्हणाली होती ना,  कुणाचे प्राण वाचविणे सर्वात मोठे पुण्य. उद्या बाबांनी विचारले, तर मी खोट कसं बोलणार, तूच म्हणते  ना! खोट बोलणे पाप असते.  माझी काही हिम्मत नाही, बाबाना सांगायची, तूच बाबाना सांग ना मी काही चूक केली नाही. आजीने शिवला आपल्या कुशीत घेतले आणि म्हणाली, बाळ, तू काही चूक केले नाही, बाबा कशाला तुला रागवतील.  

दुसर्या दिवशी शिव सकाळी जरा लवकरच उठला. त्याचे वडील झोपलेलेच होते. शिवने पट्कन आंघोळ केली आणि रोजच्या प्रमाणे आजीकडून पैशे घेऊन मंदिरात गेला. मंदिरातून परतल्यावर त्याने नाश्ता केला आणि दफ्तर खाद्यावर घेऊन शाळेत जाण्यासाठी  तैयार झाला. वडिलांनी त्याला हाक मारली. भीत-भीत तो वडिलांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातावर १० पैशे  ठेवत लक्ष्मीचंद म्हणले, बेटा हे खाऊ साठी. क्षणभर शिव प्रसाद आपल्या वडिलांना बघत राहिला आणि त्याला रडू कोसळले, तो वडिलांना जाऊन बिलगला. रडता-रडता म्हणाला, बाबा मी तुमच्याशी खोट... लक्ष्मीचंद शिवप्रसादच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाले, एक अक्षर बोलू नको बेटा, तू महादेवाचा खरा अभिषेक केला आहे. खरोखरच तू महादेवाचा प्रसाद आहे, बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाह लागले. त्या दिवशी प्रथमच लक्ष्मीचंद यांनी महादेवाचा खरा अभिषेक केला होता.

Tuesday, May 3, 2016

कोवळ्या मुलांची प्रेम कथा उर्फ पैश्यांचा वर्षावशास्त्रात म्हंटले आहे, वयाच्या पंचविशी पर्यंत ब्रम्हचारी राहून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्यावरच संसारात पडले पाहिजे. बाबा साहेब अम्बेडकर ते प. नेहरू सर्वांनी आधी आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर राजनीती केली. एकाने संविधान घडविले आणि दुसर्याने राज्याचा कार्यभार सांभाळला. शिक्षण सोडून ते प्रेमात पडले असते आणि घरातून पळाले असते तर  बाबा साहेबानी संविधान लिहिले असते का? सध्याचेच एक ताजे उदाहरण, एका विद्यार्थीने शिक्षण घेता-घेता राजनीती सुरु केली. राजनीती करण्याचे साईड इफेक्ट त्याच्या समोर आले. तो त्यांच्या सामना करण्यास असमर्थ ठरला कारण त्याच्या पंखात तेवढी शक्ती नव्हती.  निराश होऊन त्याने आत्महत्या केली. जर त्याने शिक्षण पूर्ण केले असते आणि नंतर राजनीतीत आला असता तर त्याचा असा दारूण अंत नसता झाला. असो. 

दोन-तीन वर्षांपूर्वी बालक पालक हा सिनेमा आला होता. टीवी वर बघितला होता. त्यात शाळेकारी मुलांच्या लेन्गिक विषयावरील समस्या दाखविल्या होत्या. तो सिनेमा अफाट चालला.  शाळेत शिकणारे  विद्यार्थी हि एक मोठा बाजार आहे, हे चाणाक्ष मराठी निर्मात्यांनी ओळखले. आता शाळेत शिकणार्या कोवळ्या मुलांना प्रेम कशाशी खातात कळण्याची अक्कल असते का याचा विचार हि त्यांनी केला नाही. डोळ्यांसमोर फक्त पैश्यांचा वर्षाव दिसत होता. 

टाईमपास नावाचा सिनेमा आला. सिनेमा बनविण्याचा फार्मुला नेहमीचाच. पूर्वीच्या काळी नायक एक मिल मध्ये काम करणारा मजदूर असायचा आणि हिरोईन मालकाची मुलगी. त्यांची   प्रेम कथा आणि संघर्ष पडद्या वर रंगविल्या जायची.  त्याच धर्तीवर शाळेत शिकणारी शिक्षित कुटुंबातली विद्यार्थिनी म्हणजे नायिका आणि झुग्गीत राहणारा शिक्षणा पासून वंचित मुलगा म्हणजे नायक. सिनेमात दोघांचे प्रेम प्रकरण दाखविले. सिनेमा सुपर डुपर हिट झाला. अधिकांश शाळेकारी मुलांनी चोरून का असेना हा सिनेमा बघितला असेलच. सिनेमा पासून प्रेरणा घेऊन शाळेत शिकणारे विद्यार्थी अभ्यास सोडून टाईमपास  करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या मुलांचे भविष्य काय, हे सांगायची गरज नाही. 

टाईमपासची सफलता पाहून निर्मात्यांनी आणखीन पुढे एक पाऊल टाकले. हीच कहाणी शहरातून गावात आणली.  मराठी वाहिनींवर सैराट सिनेमाचे ट्रेलर  बघितले. गावच्या पाटील म्हणजे खलनायक हि मराठी सिनेमांची परंपराच. साधा-भोळा गरिब परिवारातील सच्चा इन्सान म्हणजे नायक. फरक एवढाच पूर्वी त्याची जात कुठली बहुतेक हे कळायचे नाही. सैराट सिनेमात शहरात झोपडीत राहणारा नायक गावात खालच्या जातीचा मुलगा झाला.  मुलगी पाटलाची कन्या झाली (नायिका नववीत शिकणारी मुलगी आहे). दोघेही अभ्यास सोडून प्रेमाची गाणी गुणगुणू लागले अर्थात झिंगत नाचू लागले. बाकी प्रेमात अडथळे आणणारे नेहमीचेच खलनायक. एक बदल आणखीन केला शिकणार्या विद्यार्थीनीच्या हातात पिस्तुल हि दाखविले आहे. प्रेमाच्या आड येणार्यांना पिस्तुलच्या गोळीने ठोका. 

उद्या जर शाळेत विद्यार्थी पिस्तुल  घेऊन येऊ लागली. आपले प्रेम प्रकरण निकालात लावण्यासाठी पिस्तुलीचा वापर करू लागले तर काय होईल, कल्पनाच करवत नाही. या वरून आठवले गेल्या वर्षी एका शाळेच्या शिक्षकाने एक किस्सा सांगितला होता.  एका मुलाला त्याच्या वर्गातली एक मुलगी आवडायची, त्याचाच वर्गातला एक दुसरा मुलगा सुद्धा त्या पोरीवर लाईन मारायचा.  पहिला मुलगा वडिलांची पिस्तुल घेऊन शाळेत आला. त्याने आपल्या एका मित्राला सांगितले कि तो आज आपल्या रस्त्यातला रोडा दूर करणार आहे आणि पिस्तुलहि दाखविले. त्याच्या मित्र घाबरला. मित्राने लगेच प्रिन्सिपलला या बाबत कळविले. तत्काळ त्याच्या दफ्तरातून पिस्तुल बरामद केले. त्याच्या वडिलांना सूचना दिली. अनुचित प्रकार न झाल्यामुळे दोन्ही मुलांचे भविष्य वाचले. 

कोवळ्या मुलांवर सिनेमाचा प्रभाव पडतोच. शिक्षण घेता-घेता प्रेम करणे काही गुन्हा नाही, किंबहुना अभ्यास सोडून प्रेम करणे जास्त चांगले. घरातून पळून जाण्यात हि काही दोष नाही. परंतु घराची सुरक्षा सोडून पाळणाऱ्यांचे काय हाल होतात याची त्यांना कल्पना नसते. प्रेमात आड येणार्यांवर पिस्तुलची गोळी चालविणे हि गुन्हा नाही इत्यादी इत्यादी. पण या गोष्टींचा काय परिणाम काय होणार हे समजण्याची क्षमता कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन शाळेकारी/ कालेजच्या मुलां/मुलींमध्ये असते का? अल्प वयीन मुलीला पळविण्याचा परिणाम काय, माहित असते का? शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यावर, त्यांचे भविष्य हि अंधकारमय होणार हे माहित असते का?  

सैराट सिनेमात जर नायक आणि नायिका मोठ्या वयाचे, स्वत:च्या पायावर उभा असलेला, पळून जाण्या एवजी गावात राहून संघर्ष करणारा परशा दाखविला असता तर चालले नसते का? पण मग पैश्यांचा वर्षाव कसा झाला असता???