भस्मासुराची कहाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे. तरीही थोडक्यात सांगतो. भस्मासुराने उग्र तपस्या केली. महादेव प्रसन्न झाले. भस्मासुराने वरदान मागितले, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल तो भस्म होईल. महादेवाने पुढचा काहीच विचार न करता तथास्तु म्हंटले. भस्मासुराने महादेवाने दिलेल्या वरदानाचा प्रयोग महादेवावारच करण्याचे ठरविले. महादेवाला स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. महादेवाने भगवान विष्णूंचा धावा केला. भगवंताने मोहिनी रूप धारण केले. स्वत:च्याच डोक्यावर हात ठेऊन भस्मासुर भस्म झाला. इति.
भस्मासुराची कथा काल्पनिक असली तरी त्यात सर्वकालिक सत्य दडलेले आहे. प्रेमाने डोक्यावर हात फिरविणार हा नेहमीच तुमचा हितैषी नसतो, कधी-कधी भस्मासुर हि प्रेमाने डोक्यावर हात फिरवितो. तुम्हाला आमिष दाखवितो, तुमची महत्वाकांशा पूर्ण करण्यास मदत करतो. स्वाभाविकच आहे, पुढचा मागचा विचार न करता, तुम्ही हि त्याची मनोवांच्छित इच्छा पूर्ण करालच. पण भविष्यात भस्मासुरी हात तुमच्या डोक्यावर पडला तर तुम्हाला कोण वाचवेल. महादेवाला वाचविण्यासाठी भगवंताने मोहिनी अवतार घेतला पण या कलयुगात तुम्हाला वाचविण्यासाठी कुणी हि येणार नाही. परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील.
पण जेंव्हा महत्वाकांशा आणि स्वार्थाचा चष्मा डोळ्यांवर चढलेला असतो, भस्मासुराला मदत करण्याचे भविष्यात काय परिणाम होणार हे दिसत नाही. राज प्रमुखांची महत्वाकांशा मोठी असते, ती पूर्ण करण्यासाठी भस्मासुराची हि मदत घेण्यास ते कचरत नाही. असा आपला इतिहास आहे. पण ज्या -ज्या राज प्रमुखांनी भस्मासुरांची मदत घेतली, त्यांना त्याचे फळ हि भोगावे लागले. भस्मासुरांच्या हातून ते तर भस्म झालेच पण प्रजेला हि त्याची मोठी किंमत मोजावी लागली. असो.
सामान्य माणसांच्या बाबतीत, म्हंटल तर त्यांच्या काही मोठ्या महत्वाकांशा नसतात. काही लोक थोड्या भौतिक सुखासाठी, काही मान-सम्मान किंवा प्रमोशनसाठी भस्मासुरांची मदत करतात. काही लोक तर केवळ दबावाला बळी पडून भस्मासुरांची मदत करतात. अश्या लोकांच्या इच्छित महत्वाकांशा बहतेक पूर्ण होतात हि. पण जेंव्हा भस्मासुराचा हात त्यांच्या डोक्यावर पडतो, त्यांना आपला प्राण हि गमवावा लागतो. पण त्यांच्या करणीचे परिणाम इतरानाही भोगावे लागतात, त्याचे काय. ???
No comments:
Post a Comment