Wednesday, June 29, 2011

समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे


अखंड सावधान असावे I दुश्चित कदापि नसावे Iत्याचा त्याचा जो व्यापार I तेथे असावे खबरदार I 

हिंदीत एक म्हण आहे "सावधानी हटी और दुर्घटना घटी". प्रत्येकाला सावध व खबरदार रहावेच  लागते मग  नौकरी असो वा धंधा.  राजकारणी  लोकांना तर जास्त सावध राहावे लागते. त्यांच्या थोड्याश्या असावधानिमुळे  देशाचा इतिहास बदलून जातो. बिजापुरचा  सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी  सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला.   आधी आदर-सत्कार नंतर ...

त्या योगी पुरुषाला देशात पसरलेल्या भ्रष्टाचाराचा नायनाट करायचा होता. त्या साठी त्याने जीवाचे रान केले. संपूर्ण देश आपल्या पायदळी तुटविला.  जनते समोर आपले विचार मांडले.  भ्रष्टाचार विरुद्ध जनतेत काही अंश का होईना,   जागृती ही  निर्माण केली. त्याला वाटले करोडो लोग आपल्या मागे आहेत. सरकार आपल्या मागण्या पूर्ण करेल,  काळ्याधना विरुद्ध आपली मोहीम अवश्य यशस्वी होईल.  ह्या इराद्याने त्याने दिल्लीत तळ ठोकला. सरळ सत्तेला आव्हान दिले. मुरब्बी राजनेत्यांनी  त्याला हातोहात मूर्ख बनविले. भ्रष्टाचारा विरूद्धचे हे आंदोलन, एका रात्रीतच पार पडले. जनतेचे समर्थन असतानाही आंदोलन असफल झाले, याचे कारण शोधताना समर्थांचे विचार आठवले:- 
जनांचा प्रवाह चालला I 
म्हणजे कार्यभाग आटोपला I  
जन ठायी ठायी तुंबला I
 म्हणजे खोटे I  
जनतेला आपले विचार कळले आहे व आपल्या विचारांशी सहमत ही आहे. याचा अर्थ आपले कार्य सिद्ध झाले असे वाटणे म्हणजे खोटे. इतिहासात अशीच एक घटना: पन्नास हजारांपेक्षा जास्त फौजेनिशी हेमू अकबरचा पाठलाग करीत होता. शेवटी पानिपतच्या मैदानात हेमूने अकबरास गाठले. नाईलाजाने बैरम खानच्या नेतृतवाधीन असलेल्या तीन हजाराज्या तटपुंज्या फौजेनिशी अकबर ने झुंज दिली. पण युद्धात काय झाले. एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला. तो हत्ती वरून खाली पडला. हत्तीवर राजा नाही हे कळताच त्या विशाल सेनेने पलायन केले. देशाचा इतिहास बदलला. अकबर युद्ध जिंकला. दिल्लीचा बादशाह झाला. मोगलांचे  राज्य देशभर पसरले.  हेमू जवळ पन्नास हजारांच  सैन्य होते. सैनिकांना  बाण, तलवार, भाले इत्यादी अस्त्र-शस्त्र ही चालविता येत होते. त्यांना युद्ध सहज जिंकायला पाहिजे होते, तरीही ते हरले कारण? सेनेच नेतृत्व करणारा अन्य कोणीही नव्हता. 
अचूक यत्न करवेना I 
म्हणून केलेले सजेना I 
आपला अवगुण जाणवेना I 
काही केल्या II (१२-२-६) 
आपला उद्येश्य कितीही पवित्र असला तरीही, अचूक प्रयत्न व नियोजनाचा अभावी कार्य सिद्ध होत नाही. आपल्या दोषांमुळे आपण अयशस्वी होतो. आपल्यातल्या दोषांना दूर करून, योग्य मार्गाचा अवलंबन केल्यानेच कार्य सिद्ध होते. दुसर्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.  इतिहासातले असेच एक उदाहरण.  शाईस्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. या मुरलेल्या  सरदार सोबत लाखांच्यावर सैन्य होत. तरीही शिवाजीने त्याचा पराभव केला. शिवाजीने जाणले, सरळ युद्धात शाईस्ताखाणास पराजित करणे शक्य नाही. शिवाजी ने दुसरा मार्ग निवडला. रात्रीच्या वेळी छापा मारला व युद्ध जिंकले.  त्यांनी अचूक मार्ग निवडला होता व कार्य सिद्ध करण्यासाठी योग्य नियोजन ही केले होते. आपल्या हातून काय चुका झाल्या हे आपल्याला कळल तर आपण त्या चुका दुरुस्त करू शकतो.  समर्थांनी म्हटले आहे:  
मूर्खपणा सांडीत जाते I 
शहाणपण शिकता येते I 
कारभार करिता उमजते I 
 सकळ काही (१४-६-६ )

Monday, June 20, 2011

यमुना तीरे एक आठवण / (दिल्लीतली यमुना काल आणि आज)तीस वर्षानंतर यमुनेच्या घाटावर मी उभा होतो. काठावरच्या मंदिरांना  टाळे लागलेले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. चिट-पाखरुही दिसत नव्हते. यमुनाही घाटापासून दूर गेलेली होती. वाळूत व घाणीत  चालत-चालत यमुनेच्या काठी पोहचलो. नाल्या सदृश्य दिसणाऱ्या यमुनेच्या काळ्याकुट्ट पाण्याला घाण वास येत होता. आंघोळीच सोडा पाण्याला हात लावायची पण हिम्मत नाही झाली.  यमुनेत फक्त नाल्यांचे पाणी होते. अश्या यमुनेकाठी कोण फिरायला येणार आणि कोण्या भक्ताची हिम्मत आंघोळ करण्याची होईल, हा विचार सहज मनात डोकावून गेला. साहजिकच यमुना काठच्या या घाटांच अस्तित्व संपुस्टात आले होत. यमुनेची ही दशा पाहून डोळ्यांत पाणी आल, जुन्या आठवणी जागा झाल्या.  

सत्तर आणि ऐंशीचा काळ- उन्हाळ्याच्या सुट्यात आमच्या मोहल्यातले सर्व मुल-मुली सकाळी पाच वाजता यमुने वर फिरायला जायचे.  मोरीगेट मधून बाहेर पडल्यावर तिकोना पार्क लागायचा. अन्ग्रेजांचा राजवटीत बांधलेला हा अतिशय सुंदर बगीचा होता. पुढे  रस्ता क्रॉस केल्यावर मुगल कालीन  सुंदर आणि विस्तीर्ण  बगीचा  लागायचा. त्या  बगीच्यात विभिन्न प्रकारच्या फुलांची व झाडांची भरमार होती. त्यात मुगल शहजादी 'कुद्सिया बेगमचा' मकबरा असल्या मुळे त्याला कुद्सिया बगीचा असे नाव होते.  थोड्यावेळ बगीच्यात खेळायचो आणि दमल्यावर  सध्याचा 'रिंग रोड' क्रॉस करून यमुनेच्या तीरा वर पोहचायचो. आंघोळ करून पुन्हा परतताना बागीच्यातून मोगरा, चंपक, गुलाब, सदाफुली, झेंडू, घंटेची अश्या वेगवेगळ्या फुलांना एकत्र करून घरी परत यायचो. रस्त्याकाठी कडुलिंबाची व जांभळाची झाडे ही होती.  त्याकाळी यमुनेच्या काठावर भरपूर मंदिरे होती. एका घाटावर यमुनेची मूर्ती ही होती. संध्याकाळच्या वेळी लोक यमुनेकाठी फिरायला यायचे व नदीत नौका सफरीचा आनंद घ्यायचे. फार कमी लोकांना माहित असेलसंध्याकाळी यमुनेची आरतीही व्हायची. वातावरण गजबजलेल असायचं. काठावर काही मोठ्या पैलवानाचे आखाडे ही होते. एका घाटावर पोहण्याच शिक्षण देणारा एक क्लब ही होता कदाचित "जुगलकिशोर तैराकी संघ' नाव असाव. त्या काळचे काही प्रसिद्ध तैराक या क्लब मधून तैयार झाले होते.  उन्हाळ्यातही यमुनेचे  पात्र रुंद असायचे. भरपूर व स्वछ पाणी असल्या मुळे सध्या डोळ्यानाही मासोळ्या  पाण्यात दिसायच्या.  

सन ऐंशी मधे आम्ही जुनी दिल्ली सोडली आणि त्या बरोबर यमुनेशी असलेल नात ही तुटल. यमुनेला मानवाची नजर लागली. विकासाच्या नावावर  बाग-बगीच्यांची ९०% जागा, रस्ते, उडाणपूल, अंतर्राजीय बस स्थानकांनी बळकावली.  मेट्रो साठी ही काही जागा गेली.  ऐंशीच्या दशकात हरियाणात बनण्यार्या कालव्यांमुळे व दिल्ली शहरातल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी मोढ्या प्रमाणात नदीचे पाणी अडविण्यात आले. वजीराबाद नंतर फारच थोड्या पाण्यानिशी यमुना दिल्लीत प्रवेश करते. आणि दिल्लीत प्रविष्ट झाल्या बरोबरच दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या टोकावर वसलेल्या नजफगढ झील मधून निघणारी कधी-काळची एक पावसाळी  नदी  २०-२५ किलोमीटरची यात्रा करून यमुनेत मिळायची.  आज तिला नजफगढ नाला अस म्हणतात. संपूर्ण उत्तर आणि पश्चिम दिल्लीचे सांड पाणी व कारखान्याचे प्रदूषित पाणी घेऊन  हा नजफगढ नाला दिल्लीच्या सीमेंवरच  यमुनेला येऊन मिळतो. वेगळ सांगायला नको नजफगढ झील ही आज आपल्या अस्तित्व करता संघर्ष करीत आहे. भू-माफियांची नजर हिला लागलेली आहे. दिल्लीत आज वाहणाऱ्या यमुनेत ९०% टक्के पाणी  नाल्यांचेच आहे. भारी-मनाने घरी परतलो. कालियनागाची कथा आठवली. यमुनेच्या डोहात कालियनागचे वास्तव्य होते.  गाई-म्हशी पाणी पिऊन मरू लागल्या होत्या.  एकदा खेळता-खेळता बालगोपाळांचा  चेंडू नदीत पडला. चेंडू आणायला कृष्णाने यमुनेत उडी टाकली व कालियनागाला पराजित करून यमुनेपासून दूर केले. त्या वेळी कृष्ण होता पण आज यमुनेचे रक्षण कोण करणार? कालीयनागापेक्षाही अत्यंत विषारी नागांना आपल्या नद्यांमधून  कोण हाकलून लावणार? हाच यक्ष प्रश्न  आज डोळ्यांसमोर आहे. 


Saturday, June 18, 2011

विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी 
जम्बुद्वीपे भरतखंडे  क्षिप्रा तटे सुन्दर रम्य अशी अवन्ती नगरी होती.  क्षिप्रा तटावर विक्रमादित्य दररोज नियमितपणे राज्यलक्ष्मीची 'पत्र, पुष्प, धुप, दीप आणि नैवेद्य' दाखवून पूजा करायचा. अखेर 'राज्यलक्ष्मी' प्रसन्न झाली. तिच्या कृपेने आज विक्रमादित्य सिंहासनावर बसणार होता. राजदरबार गच्च भरलेला होता. मंत्री, सामंत, आमंत्रित अतिथि व विदेशी पाहुणे उपस्थित होते. विक्रमादित्याची नजर सुवर्णजडित भव्य सिंहासनाकड़े गेली. आता फक्त तीन पायर्या  चढून तो सिंहासनावर बसणार होता.  विक्रमादित्य पहिल्या पायरीवर पाय ठेवणार, तेवढ्यात पायरीतून एक पुतळी प्रगट झाली.  तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती.  ती विक्रमादित्याला उदेश्यून म्हणाली विक्रमा, "राजाची नजर कशी असावी"?  विक्रम म्हणाला  "राजा गरुडा सारखा असतो", आपल्या तीक्ष्ण नजरेने प्रजेला त्रास देणार्या सर्पसमान  मंत्री, सामंत आणि सरकारी अधिकार्याना दण्डित करून प्रजेच कल्याण करतो".  पुतळी हसली, विक्रम तू भोळा आहेस. "राजाने कधी वाईट पाहू नये". मंत्री कितीही 'आदर्श  स्पेक्ट्रम''  घोटाळे करोत तुझी नजर तिथे पड़ता कामा नये.  या पायरीवर पाय ठेवण्याआधी तुला आपले डोळे झाकावे लागतील.   विक्रमादित्याने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली व पायरी वर पाय ठेवला. 

आता तो दुसर्या पायरी वर पाय ठेवणार,  दुसरी  पुतळी त्याचा समोर प्रगट झाली तिचे दोन्ही कान झाकलेले होते. ती विक्रमाला म्हणाली: विक्रमा "राजाने कधी वाईट ऐकू नये".  जर कुणी म्हणत असेल, शेतकरी भुकेने आत्महत्या करीत आहे, राज्यात रोगराई पसरलेली आहे, राशनचे धान्य काळया बाजारात विकल्या जाते, सरकारी कर्मचारी रिश्वत घेतल्या शिवाय कोणाचेही काम करीत नाही, ईत्यादी गोष्टी ऐकताना आपले कान झाकले पाहिजे म्हणजे अश्या वाईट बातम्या ऐकू येणार नाही. आपले कर्मचारी ईमानदार आहेत, प्रजा खुशाल आहे, 'कॉमनवेल्थ' सफल झाले, अश्या चांगल्या बातम्या फक्त ऐकाव्या.  विक्रमादित्य म्हणाला, पुतळी तुझी ही अट मला मान्य आहे.  त्याने  आपले कान झाकले आणि दुसर्या पायरीवर पाय ठेवला.  


आता  सिंहासनावर बसण्यासाठी आता तिसर्या   पायरीवर पाय ठेवणार,   तेवढ्यात  तीसरी पुतळी त्याचा समोर प्रगट झाली.  तिच्या ओठांवर  बोट ठेवलेले होते.  ती म्हणाली विक्रमा "राजाने कधी वाईट बोलू नये".  मंत्री प्रजेचे कल्याण सोडून स्वत:च्या कल्याण्यात गुंतले असले आणि तुमचे कुठलेही आदेश मान्य करीत नसले तरीही कोणासही रागवू नये, सर्वकाही 'राज्यलक्ष्मीवर' सोडून द्यावे व स्वत: शांत रहावे विक्रमादित्य म्हणाला पुतळी तुझी ही अट सुद्धा मी आनंदाने मान्य करतो. असे म्हणत विक्रमादित्य सिंहासनावर बसणार, तेवढ्यात सिंहासनातून चौथी व शेवटची  पुतळी प्रगट झाली.  ती म्हणाली विक्रमा, डोळे बंद असेल, कान झाकलेले असेल तरीही आत्म्याची आवाज माणसाला बैचैन करते. जो राजा न्याय मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो तो व  राजा हरिश्चंद्रा प्रमाणे सत्ता गमावतो.  विक्रमा  आपली आत्मा मला देऊन टाक आणि खुशाल सिंहासनावर बैस.  सिंहासनावर बसण्यास उत्सुक  विक्रमाने लगेच आपली आत्मा तिच्या स्वाधीन केलीविक्रमादित्य  सिंहासनावर बसला, त्याचा नावाचा जयघोष सुरु झाला. स्वर्गीय मधुर संगीताचा आनंद घेत विक्रमादित्याने  डोळे मिटले.  त्याला दिसू लागली-  हिरवीगार शेती, प्रसन्न शेतकरी, स्वस्थ आणि खुशहाल प्रजा, सर्वत्र आनंदी-आनंद-  संगीताचा तालावर ताल देत तो गुणगुणु लागला- आनंदी आनंद गड़े, इकडे तिकडे चोहुकडे ....  अशा रितीने राज्यलक्ष्मीच्या कृपेने राजा विक्रमादित्याने अनंत  काळापर्यंत राज्य केले.  

Monday, June 13, 2011

शेतकऱ्याची आत्महत्या


शेतकऱ्याने आत्महत्या केली

सरकार दफ्तरात तो
एक 'आंकड़ा' झाला.

विरोधी पक्ष नेत्यांसाठी तो
विधानसभेत 'गोंधळाचा' विषय झाला.
 
मुख्यमंत्र्यांसाठी तो
मुआवजेची 'घोषणा' झाला.
 
वृतपत्र - वाहिनीं साठी तो
एक 'ज्वलंत समस्या' झाला.

माझा सारख्या कवींसाठी तो
कवितेचा 'कच्चामाल' झाला.
 
पण त्या बळीराजासाठी
एक अश्रु
कुणी ही नाही गाळला.