Saturday, June 18, 2011

विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी



 
जम्बुद्वीपे भरतखंडे  क्षिप्रा तटे सुन्दर रम्य अशी अवन्ती नगरी होती.  क्षिप्रा तटावर विक्रमादित्य दररोज नियमितपणे राज्यलक्ष्मीची 'पत्र, पुष्प, धुप, दीप आणि नैवेद्य' दाखवून पूजा करायचा. अखेर 'राज्यलक्ष्मी' प्रसन्न झाली. तिच्या कृपेने आज विक्रमादित्य सिंहासनावर बसणार होता. राजदरबार गच्च भरलेला होता. मंत्री, सामंत, आमंत्रित अतिथि व विदेशी पाहुणे उपस्थित होते. विक्रमादित्याची नजर सुवर्णजडित भव्य सिंहासनाकड़े गेली. आता फक्त तीन पायर्या  चढून तो सिंहासनावर बसणार होता.  विक्रमादित्य पहिल्या पायरीवर पाय ठेवणार, तेवढ्यात पायरीतून एक पुतळी प्रगट झाली.  तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती.  ती विक्रमादित्याला उदेश्यून म्हणाली विक्रमा, "राजाची नजर कशी असावी"?  विक्रम म्हणाला  "राजा गरुडा सारखा असतो", आपल्या तीक्ष्ण नजरेने प्रजेला त्रास देणार्या सर्पसमान  मंत्री, सामंत आणि सरकारी अधिकार्याना दण्डित करून प्रजेच कल्याण करतो".  पुतळी हसली, विक्रम तू भोळा आहेस. "राजाने कधी वाईट पाहू नये". मंत्री कितीही 'आदर्श  स्पेक्ट्रम''  घोटाळे करोत तुझी नजर तिथे पड़ता कामा नये.  या पायरीवर पाय ठेवण्याआधी तुला आपले डोळे झाकावे लागतील.   विक्रमादित्याने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली व पायरी वर पाय ठेवला. 

आता तो दुसर्या पायरी वर पाय ठेवणार,  दुसरी  पुतळी त्याचा समोर प्रगट झाली तिचे दोन्ही कान झाकलेले होते. ती विक्रमाला म्हणाली: विक्रमा "राजाने कधी वाईट ऐकू नये".  जर कुणी म्हणत असेल, शेतकरी भुकेने आत्महत्या करीत आहे, राज्यात रोगराई पसरलेली आहे, राशनचे धान्य काळया बाजारात विकल्या जाते, सरकारी कर्मचारी रिश्वत घेतल्या शिवाय कोणाचेही काम करीत नाही, ईत्यादी गोष्टी ऐकताना आपले कान झाकले पाहिजे म्हणजे अश्या वाईट बातम्या ऐकू येणार नाही. आपले कर्मचारी ईमानदार आहेत, प्रजा खुशाल आहे, 'कॉमनवेल्थ' सफल झाले, अश्या चांगल्या बातम्या फक्त ऐकाव्या.  विक्रमादित्य म्हणाला, पुतळी तुझी ही अट मला मान्य आहे.  त्याने  आपले कान झाकले आणि दुसर्या पायरीवर पाय ठेवला.  


आता  सिंहासनावर बसण्यासाठी आता तिसर्या   पायरीवर पाय ठेवणार,   तेवढ्यात  तीसरी पुतळी त्याचा समोर प्रगट झाली.  तिच्या ओठांवर  बोट ठेवलेले होते.  ती म्हणाली विक्रमा "राजाने कधी वाईट बोलू नये".  मंत्री प्रजेचे कल्याण सोडून स्वत:च्या कल्याण्यात गुंतले असले आणि तुमचे कुठलेही आदेश मान्य करीत नसले तरीही कोणासही रागवू नये, सर्वकाही 'राज्यलक्ष्मीवर' सोडून द्यावे व स्वत: शांत रहावे विक्रमादित्य म्हणाला पुतळी तुझी ही अट सुद्धा मी आनंदाने मान्य करतो. असे म्हणत विक्रमादित्य सिंहासनावर बसणार, तेवढ्यात सिंहासनातून चौथी व शेवटची  पुतळी प्रगट झाली.  ती म्हणाली विक्रमा, डोळे बंद असेल, कान झाकलेले असेल तरीही आत्म्याची आवाज माणसाला बैचैन करते. जो राजा न्याय मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो तो व  राजा हरिश्चंद्रा प्रमाणे सत्ता गमावतो.  विक्रमा  आपली आत्मा मला देऊन टाक आणि खुशाल सिंहासनावर बैस.  सिंहासनावर बसण्यास उत्सुक  विक्रमाने लगेच आपली आत्मा तिच्या स्वाधीन केलीविक्रमादित्य  सिंहासनावर बसला, त्याचा नावाचा जयघोष सुरु झाला. स्वर्गीय मधुर संगीताचा आनंद घेत विक्रमादित्याने  डोळे मिटले.  त्याला दिसू लागली-  हिरवीगार शेती, प्रसन्न शेतकरी, स्वस्थ आणि खुशहाल प्रजा, सर्वत्र आनंदी-आनंद-  संगीताचा तालावर ताल देत तो गुणगुणु लागला- आनंदी आनंद गड़े, इकडे तिकडे चोहुकडे ....  अशा रितीने राज्यलक्ष्मीच्या कृपेने राजा विक्रमादित्याने अनंत  काळापर्यंत राज्य केले.  

No comments:

Post a Comment