Monday, June 20, 2011

यमुना तीरे एक आठवण / (दिल्लीतली यमुना काल आणि आज)



तीस वर्षानंतर यमुनेच्या घाटावर मी उभा होतो. काठावरच्या मंदिरांना  टाळे लागलेले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. चिट-पाखरुही दिसत नव्हते. यमुनाही घाटापासून दूर गेलेली होती. वाळूत व घाणीत  चालत-चालत यमुनेच्या काठी पोहचलो. नाल्या सदृश्य दिसणाऱ्या यमुनेच्या काळ्याकुट्ट पाण्याला घाण वास येत होता. आंघोळीच सोडा पाण्याला हात लावायची पण हिम्मत नाही झाली.  यमुनेत फक्त नाल्यांचे पाणी होते. अश्या यमुनेकाठी कोण फिरायला येणार आणि कोण्या भक्ताची हिम्मत आंघोळ करण्याची होईल, हा विचार सहज मनात डोकावून गेला. साहजिकच यमुना काठच्या या घाटांच अस्तित्व संपुस्टात आले होत. यमुनेची ही दशा पाहून डोळ्यांत पाणी आल, जुन्या आठवणी जागा झाल्या.  

सत्तर आणि ऐंशीचा काळ- उन्हाळ्याच्या सुट्यात आमच्या मोहल्यातले सर्व मुल-मुली सकाळी पाच वाजता यमुने वर फिरायला जायचे.  मोरीगेट मधून बाहेर पडल्यावर तिकोना पार्क लागायचा. अन्ग्रेजांचा राजवटीत बांधलेला हा अतिशय सुंदर बगीचा होता. पुढे  रस्ता क्रॉस केल्यावर मुगल कालीन  सुंदर आणि विस्तीर्ण  बगीचा  लागायचा. त्या  बगीच्यात विभिन्न प्रकारच्या फुलांची व झाडांची भरमार होती. त्यात मुगल शहजादी 'कुद्सिया बेगमचा' मकबरा असल्या मुळे त्याला कुद्सिया बगीचा असे नाव होते.  थोड्यावेळ बगीच्यात खेळायचो आणि दमल्यावर  सध्याचा 'रिंग रोड' क्रॉस करून यमुनेच्या तीरा वर पोहचायचो. आंघोळ करून पुन्हा परतताना बागीच्यातून मोगरा, चंपक, गुलाब, सदाफुली, झेंडू, घंटेची अश्या वेगवेगळ्या फुलांना एकत्र करून घरी परत यायचो. रस्त्याकाठी कडुलिंबाची व जांभळाची झाडे ही होती.  त्याकाळी यमुनेच्या काठावर भरपूर मंदिरे होती. एका घाटावर यमुनेची मूर्ती ही होती. संध्याकाळच्या वेळी लोक यमुनेकाठी फिरायला यायचे व नदीत नौका सफरीचा आनंद घ्यायचे. फार कमी लोकांना माहित असेलसंध्याकाळी यमुनेची आरतीही व्हायची. वातावरण गजबजलेल असायचं. काठावर काही मोठ्या पैलवानाचे आखाडे ही होते. एका घाटावर पोहण्याच शिक्षण देणारा एक क्लब ही होता कदाचित "जुगलकिशोर तैराकी संघ' नाव असाव. त्या काळचे काही प्रसिद्ध तैराक या क्लब मधून तैयार झाले होते.  उन्हाळ्यातही यमुनेचे  पात्र रुंद असायचे. भरपूर व स्वछ पाणी असल्या मुळे सध्या डोळ्यानाही मासोळ्या  पाण्यात दिसायच्या.  

सन ऐंशी मधे आम्ही जुनी दिल्ली सोडली आणि त्या बरोबर यमुनेशी असलेल नात ही तुटल. यमुनेला मानवाची नजर लागली. विकासाच्या नावावर  बाग-बगीच्यांची ९०% जागा, रस्ते, उडाणपूल, अंतर्राजीय बस स्थानकांनी बळकावली.  मेट्रो साठी ही काही जागा गेली.  ऐंशीच्या दशकात हरियाणात बनण्यार्या कालव्यांमुळे व दिल्ली शहरातल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी मोढ्या प्रमाणात नदीचे पाणी अडविण्यात आले. वजीराबाद नंतर फारच थोड्या पाण्यानिशी यमुना दिल्लीत प्रवेश करते. आणि दिल्लीत प्रविष्ट झाल्या बरोबरच दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या टोकावर वसलेल्या नजफगढ झील मधून निघणारी कधी-काळची एक पावसाळी  नदी  २०-२५ किलोमीटरची यात्रा करून यमुनेत मिळायची.  आज तिला नजफगढ नाला अस म्हणतात. संपूर्ण उत्तर आणि पश्चिम दिल्लीचे सांड पाणी व कारखान्याचे प्रदूषित पाणी घेऊन  हा नजफगढ नाला दिल्लीच्या सीमेंवरच  यमुनेला येऊन मिळतो. वेगळ सांगायला नको नजफगढ झील ही आज आपल्या अस्तित्व करता संघर्ष करीत आहे. भू-माफियांची नजर हिला लागलेली आहे. दिल्लीत आज वाहणाऱ्या यमुनेत ९०% टक्के पाणी  नाल्यांचेच आहे. भारी-मनाने घरी परतलो. कालियनागाची कथा आठवली. यमुनेच्या डोहात कालियनागचे वास्तव्य होते.  गाई-म्हशी पाणी पिऊन मरू लागल्या होत्या.  एकदा खेळता-खेळता बालगोपाळांचा  चेंडू नदीत पडला. चेंडू आणायला कृष्णाने यमुनेत उडी टाकली व कालियनागाला पराजित करून यमुनेपासून दूर केले. त्या वेळी कृष्ण होता पण आज यमुनेचे रक्षण कोण करणार? कालीयनागापेक्षाही अत्यंत विषारी नागांना आपल्या नद्यांमधून  कोण हाकलून लावणार? हाच यक्ष प्रश्न  आज डोळ्यांसमोर आहे. 


No comments:

Post a Comment