Thursday, July 25, 2019

स्वास्थ्यवर्धक उकडीचे दहीवडे


गेल्या रविवारी पहाटे-पहाटे दहीवड्याचे स्वप्न पडले. पहाटेचे स्वप्न  खरे ठरतात हि म्हण आहे. पण स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्न हा करावाच लागतो. सौ. सहज-सहजी वडे करणार नाही. आजकाल तिला अस्मादिकांच्या सेहतची चिंता जास्त असते.  मलाच काहीतरी करावे लागणार होते. सौ. आंघोळीला गेली. मला मौका मिळाला. पटकन स्वैपाघरात गेलो. डब्बे उघडणे सुरु केले. पहिल्या डब्ब्यात चण्याची दाळ होती. अचानक आठवले सौ. नागपंचमीला चण्याची दाळ टाकून उकडीचे वडे करते. अर्धी वाटी चण्याची दाळ घेतली. एका डब्ब्यात उडीदाची धुतलेली दाळ सापडली. तीहि अर्धी वाटी घेतली. मुगाची डाळ शोधू लागलो. एका डब्यात छिलके वाली मुगाची डाळ दिसली तीहि अर्धी वाटी घेतली. सर्व डाळी धुऊन  पाण्यात भिजायला एका भांड्यात ठेवल्या. चटणीसाठी चिंच आणि ६ ते ७ खारका शोधल्या. त्याही वेगवेगळ्या वाटीत भिजवून ठेवला. फ्रीज मध्ये दही थोडेसे होते पण गॅस वर सकाळी एका भांड्यात तापवून ठेवलेले जवळपास अर्धा किलो गायीचे दूध  होते. दूध कोमट आणि दही लावण्यास उपयुक्त वाटले. पटकन विरजण टाकून दहीहि लाऊन टाकले. स्वैपाकघरातून बाहेर पडलो. 

सौ.ची आंघोळ आणि पूजा आपटली. नवरोबांनी स्वैपाघरात काही लुडबुड केली आहे, याचा वास तिला लागलाच. आमची देवीच्या दरबारात पेशी झाली.  जमेल तेवढ्या मृदू आवाजात म्हंटले "'देवी आज सकाळी सकाळी दही वड्याचे स्वप्न पडले."  सकाळी पडलेले स्वप्न नेहमीच खरे होतात.  आता सौ. काय कपाळ बोलणार. नवरोबांनी आधीच पूर्व तैयारी केल्यामुळे तिच्यापाशी नाही म्हणण्याचा विकल्प उरलाच नव्हता.  

दुपारी चारला चहा झाल्यावर तिने दहीवडे बनविण्याची तैयारी सुरु केली. आधी ४ चमचे जिरे तव्यावर भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतले.

भिजलेल्या खारका व चिंच बियांना काढून थोडे पाणी टाकून मिक्सर मधून पातळ करून घेतले.  एका भांड्यात हे पाणी गाळून घेतले. गॅॅस वर भांडे ठेऊन त्यात २-३ चमचे स्वादानुसार तिखट टाकले. एक उकळी आल्यावर त्यात ८ चमचे मधुरम (स्वदेश गुळाची साखर) टाकली. अश्यारितीने आंबट गोड आणि तिखट चटणी तैयार झाली.

त्या नंतर भिजलेल्या डाळींची  मिक्सर मध्ये पेस्ट केली (थोडी जाड) व एका भांड्यात काढून घेतली.  या शिवाय चार हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुनाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घेतली.  घरात हिरवी कोथांबीर नव्हती. पण गच्चीवर असलेल्या गमल्यात हिरवा पुदिना भरपूर होता. १० -१२ पाने तोडून आणली. डाळींच्या  पेस्ट मध्ये मिरची-लसुणाची पेस्ट मिसळली. पुदिन्याची पाने तोडून टाकली. हळद, धनिया पावडर व मीठ अंदाजे घातले (आपल्या स्वादानुसार यावस्तू टाकाव्या).  

इडली स्टेन्डला  थोडे तेल लाऊन तैयार केले. आमच्या घरच्या इडली स्टेन्ड मध्ये १६ वडे एकाच वेळी होऊ शकतात. (तेल लावल्याने शिजल्यावर वडे इडली स्टेन्ड मधून सहज काढता येतात). सर्वात शेवटी एक चमचा इनो डाळीच्या पेस्ट मध्ये टाकून मस्त पैकी ढवळून घेतले आणि पटकन ते मिश्रण इडली स्टेन्डवर  टाकले. अर्थात हे सर्व मलाच करावे लागले.  इनो टाकल्याने वडे हलके बनतात व आत छिद्रहि बनतात.  इडली पात्रात  एक गिलास पाणी टाकून त्यात इडली स्टेन्ड  ठेवले.  मध्यम आंचेवर १५  मिनिटांत  वडे शिजतात. (टीप: इडली पात्र  नसेल तर कुकर वापरता येते. फक्त कुकरला  सिटी  लाऊ नका.)  

सर्वात शेवटी दह्याला पाणी न टाकता व्यवस्थित घुसळूण पातळ केले. जर दही थोडे आंबट असेल तर थोडी साखर त्यात मिसळता येते. आजकाल उन्हाळा असल्यामुळे  दह्यात बर्फहि टाकली.  आता वड्यांसोबत मीठ तिखट, काळी मिरी, पावडर, जीरा पावडर  आणि दही ठेऊन सर्व साहित्याचा एक फोटू काढला. एवढी मेहनत केल्यानंतर  साहजिकच आहे वडे खाताना मस्त लागले.   




1 comment:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete