Tuesday, November 25, 2014

मला बी बाबा व्हायचं.


पन्नासी उलटली तरी  अनेक संसारिक इच्छा अपूर्णच आहेत. विदेशी गाडी, बंगला इत्यादी सोडा, एक सादी नोनो घेण्याची ऐपत सुद्धा नाही, असे सौ. चे मत आहे. स्वर्ग सुख भोगण्याची इच्छा तर प्रत्येकाचा मनात असतेच, माझ्या ही मनात आहे.  सध्या तरी स्वर्गीय सुख आणि  स्वर्गातील अप्सरा स्वप्नातच भेटतात. दुसऱ्या शब्दात 'दुधाची तहान ताकावर भागवितो'. कालच टीवी वर एका बाबांच्या आश्रमाच दर्शन झाले. काय काय नव्हत, त्या आश्रमात. विदेशी गाड्या, उंची सिंहासन, उंची कपडे, बंदुका, स्वीमिंग पूल, अर्थात स्वर्गातील सर्व सुख सोयी तिथे होत्या.   अश्या बाबांचा हेवा हा वाटणारच. 

सकाळी उठल्यावर टीवी वर कुठले ही चेनेल लावा. समोर एक बाबा प्रवचन करताना दिसतो. अश्या बाबांच्या डोक्यावर पांढरे केस असतात. मस्त पैकी सिंहासनावर बसून लोकांना माया मोहापासून दूर राहण्याचा उपदेश देत असतात.  भक्तांनी मायेचा त्याग केला की माया  भक्तांच्या खिश्यातून, बाबांच्या झोळीत येऊन पडणार, हे आलंच.  माया जवळ असेल तर सर्व स्वर्ग सुख आपसूकच पायावर लोटांगण घालतात. अश्या या बाबा लोकांना तर  स्वर्गातील अप्सरा ही  पृथ्वीवर सहज उपलब्ध होतात. 

एक दिवस मनात विचार आला, आपण ही बाबा बनाव, बाबा बनण्यासाठी काय लागते याचा विचार करू लागलो.  आरश्यात पहिले  डोक्यावरचे केसं ही पांढरे झाले आहेत, डोक्यावरचे पांढरे केसं ही विद्वान् माणसाची निशाणी.  या शिवाय    संत रामदास, ज्ञानेश्वर आणि  तुकोबांचे  काही अभंग ही तोंडपाठ आहेत. रामायण महाभारतातल्या काही कथा ही अवगत आहे. इतकेच नव्हे तर कबीर आणि तुलसी यांचे ही काही दोहे ही तोंडपाठ आहेत. आपला आवाज ही चांगला बुलंद आहे. घरात भांडण झाले की संपूर्ण मोहल्याला कळते.  कधी कधी चार चौघांसमोर भाषण देण्याचा ही योग आला आहे. मला तरी वाटते बाबा बनण्याची संपूर्ण योग्यता आपल्यात आहे. फक्त  कोणत्या ही  टीवी  चेनेल वर , प्रवचन देण्याचा मौका  मिळाला पाहिजे. काही दिवसांच्या प्रवचनानंतर  माणूस आपोआप प्रसिद्ध होतो, एकदा  टीवी वर प्रसिद्धी मिळाली की भक्तांची कमी नाही.  भक्त मिळाले की त्यांची माया आपसूक आपल्या खिश्यात येईल. माया असेल तर स्वर्गसुख ही पायाशी लोटांगण घालतील. आयुष्यातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.  आजच संध्याकाळी एका ज्योतिष मित्राला आपला हात दाखविला, त्याला ही विचारले बाबा बनण्याचा काही योग आहे का. तो म्हणाला योग तर आहे, पण पुढे धोका ही आहे,. स्वर्गसुख भोगल्यावर, काही वर्षानंतर बाबांना नरक यातना (जेलची कोठरी) ही भोगाव्या लागतात. तुझी तैयारी असेल तर, तू निश्चित बाबा बनू शकेल.....  

Monday, November 24, 2014

बळी


(कथा काल्पनिक आहे) 

काही वर्षांपुर्वी देशात खाद्य तेलांची कमी दूर करण्यासाठी  सोयाबीन तेलाचे उत्पादन  वाढविण्याचे धोरण सरकारने राबवायला सुरवात केली, अल्प दरात बँके कडून कर्ज, सुरवातीच्या काही वर्ष व्याज  माफी इत्यादी सुविधा सरकारने   सोयाबीन तेल उत्पादकांना देऊ केल्या. या  सरकारी धोरणांचा कृषी विज्ञानी श्रीयुत वाघमारे यांनी वीआरएस घेऊन विदर्भात त्यांच्या राहत्या गावी, सोयाबीन  ऑयल मिल टाकली. सुरवातीच्या दोन-तीन वर्षानंतर  गाडी रूळावर येऊ लागली,  पण  नफा काही त्यांच्या हातात आला नव्हता.  त्यासाठी मिलची उत्पादन क्षमता किमान ७०% तरी गाठणे आवश्यक होते. अनेक समस्या समोर होत्या, काहींचे समाधान त्यांच्या हातात नव्हते,  उदाहरणार्थ, विदर्भात वीज उत्पादन  गरजेपेक्षा कित्येक पट जास्त, पण ती वीज मुंबई पुणेवाल्यांकरता, विदर्भातील उद्योगांना  वीज कपातिला तोंड द्यावे लागत होते. गावांत तर वीज कपात आणखीन जास्त.  

काही समस्यांचा समाधान त्यांच्या हातात होते, सोयाबीनच्या चढत्या भावांचा फटका त्यांना  बसायचा. यावर उपाय म्हणून त्यांनी, सोयाबीन साठवणीसाठी गोदाम ही बांधले. सीजनच्या सुरवातीलाच  जवळपासच्या शेतकऱ्यांना काही अडवान्स देऊन  शासनाद्वारा घोषित एमएसपी वर सोयाबीन खरेदीचा  करार केला आणि  बऱ्यापैकी खरेदी ही केली. दुसरी समस्या सोयाबीन तेल विक्रीची होती.  त्यांच्या उत्पादनाचा  ६०-७०% तेल नागपूरचा तेलवाणी नावाचा  व्यापारी विकत घायचा. त्याची नागपुरात पेकेजिंग युनिट होती. १,२ आणि ५ किलोच्या पेकिंग मध्ये  आपल्या ब्रांड नावाने पुढे तेल विकायचा. तेलवाणी धंद्यात चोख होता. ज्या दिवशी बाजारात जो भाव असेल त्या भावाने तो तेल विकत घेत असे. त्याचे पेमेंट ही व्यवस्थित आणि नियमित होते.  कसली ही तक्रार नव्हती.  वाघमारे यांनी विचार केला त्याच्या  बरोबर  विक्री करार गेला तर  त्यात दोघांना ही फायदा होईल, आपली  विक्रीच चिंता पुष्कळ प्रमाणात कमी होईल आणि तेलवाणी यांना एका निश्चित दरात पूर्ण सीजन तेल मिळेल. अर्थात  तेलवाणी यांना ही फायदा होईलच. वाघमारे तेलवाणी यांना भेटायला नागपूरला गेले. त्यांच्या समोर आपले मनोगत स्पष्ट केले. तेलवाणी म्हणाला, वाघमारे, धंद्यात केवल स्वत:च्या विचार करायचा असतो, दुसऱ्यांच्या नाही. आपल्या सारखे लोक समुद्रातले लहान मासे, मोठा घास घेणे शहाणपण नाही.  मी तेल पॅक करून विकतो. माल विक्री झाल्यावर पुन्हा खरेदी करतो. साठवून ठेवत नाही.  कमी नफा मिळतो, पण नुकसान होत नाही, झाले तरी कमीच  होईल. तेवढे मी सहन करू शकेन. समजा  सोयाबीनची डिमांड कमी झाली तर दुसरे तेल विकेन. पण आधीच करार केला तर मला तुझ्या कडून निश्चित दरात सोयाबीन तेल विकत घ्यावेच लागेल, मग नुकसान कोणाला होणार आणि नाही घेतला कोर्ट-कचेऱ्या होईल. आपले संबंध नेहमी करता खराब होतील.   

वाघमारे यांनी  तेलवाणी यांना समजविण्याचे प्रयत्न केले, वाघमारे म्हणाले, सोयाबीन तेलाचे भाव सतत वाढत आहे, भविष्यात ही कमी होणार नाही. सरकारचे धोरण ही देशात तेल उत्पादन वाढविण्याचे आहे. शिवाय करार झाल्याने तुमच्या साठी माल वेगळा काढून ठेवता येतो. गेल्या वेळी, तुमचा टेंकर दोन दिवस, वाट पाहत उभा राहिला. करार झाल्याने तसे घडणार नाही. तेलवाणी हसत म्हणाला, मी काय शिकायत गेली का, त्या बाबतीत. धंद्यात अस चलायचं. पण एक लक्षात ठेव वाघमारे, शेतमालाच्या धंद्यात सरकार काही जास्त लुडबुड करते,  आपल्या फायद्या साठी सरकार केंव्हाही शेतकऱ्यांच्या आणि शेतमालावर उद्योजकांच्या पाठीत  खंजीर खुपसू शकते. तुम्हा शिकलेल्या लोकांना करार वैगरे यांचे जास्त फेड. माझ ऐक, तू ही शेतकऱ्यांशी करार वैगरे करण्याच्या भानगडीत पडू नकोस, नाहक बळी जाईल तुझा. 

वाघमारे घरी परतले, त्यांनी  ही मनात विचार केला, तेलवाणी ठीकच म्हणतो, धंद्यात स्वत:चा विचार केला पाहिजे.  जो ग्राहक पहिले येईल आणि जास्त भाव देईल त्यालाच माल विकायचा. रोज झोपण्याच्या आधी, वाघमारे समाचार अवश्य बघायचे. त्या दिवशी ही रात्री १० वाजता, समाचार बघण्यासाठी टीवी लावला. समोर ब्रेकिंग न्यूज सुरु होती.  आज सायंकाळी केबिनेट मध्ये  खाद्य तेलांचे वाढते भाव रोखण्यासाठी, सरकारने  पामोलीन तेलावर आयात शुल्क पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्व राजकीय पक्षांनी आणि ग्राहक संगठनानी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्णय होताच क्षणी खाद्य तेलांचे भाव जवळपास ३०% टक्क्यांनी खाली आले. बातमी पाहताच वाघमारेंच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. आता सोयाबीनचे भाव गडगडणार. तेलाचे भाव ही कमी होतील. नफा तर सोडा, होणारे नुकसान त्यांना झेपेल का? शेतकऱ्यांसोबत केलेल्या कराराला पाळणे त्यांना शक्य होणार नाही, त्यांना तोंड कसे दाखविणार. बेंकेचे  कर्ज कसे चुकविणार,  विचार करता करता  त्यांच्या छातीत कळ उठली..... 

एका माणसाचा नाहक बळी गेला

(आयातीत पामोलीन तेल भारतीयांच्या स्वास्थ्य दृष्टीने खाण्यासाठी योग्य तेल नाही. तरी ही स्वस्त असल्यामुळे सरकार आयात करते. सरकारच्या दृष्टीने महागाई कमी करणे म्हणजे  खाद्यपदार्थांच्या किंमती नियंत्रित करणे.  मग कुणाचा ही जीव जावो, त्याची सरकारला चिंता नाही) 
Monday, November 10, 2014

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय ।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l

अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते. विरही मीरा विचार करीत आहे, गगन मंडल पे सेज पिया की , किस विध मिलना होय. जर कान्हा वृंदावनात असता तर मीरा नावाच्या गोपीची हाक ऐकताच, एका क्षणात धाऊन आला असता. पण आधीच रुक्मिणी, सत्यभामा समेत अनेक पत्नींचे लफडे सोडविता-सोडविता द्वारकाधीश कृष्णाला नाकी नऊ येत होते, त्यात मीरेची आणखीन भर कशाला.  मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच.

असा विचार करत-करत मी स्वामी त्रिकालदर्शींच्या आश्रमात पोहचलो. नेहमी प्रमाणे स्वामीजी ध्यानमग्न होते. मी ही त्यांच्या समोर बसलो. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले, स्वामी जी एक शंका आहे, मी म्हणालो. स्वामीजी म्हणाले बच्चा, हीच न तुझी शंका, त्यांनी एक श्लोक  म्हंटला:

मुँह में राम बगल में छुरी
मित्राने-मित्राला मारली मिठी.

मी प्रश्नार्थक मुद्रेने स्वामीजी कड़े पाहिले, स्वामीजींच्या चेहर्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, दोघे ही रामभक्त, सतत राम नाम जपणारे, मंदिर बनविण्याची जागा शोधण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यात त्यांना ‘तिलोत्तमा’ समान एक सुन्दर अप्सरा भेटली, आता सुन्दर नार समोर दिसली की कलह हा होणारच. त्यांना मित्रतेचा विसर पडला, हातातली रामनामी माळ ही त्यांनी फेकून दिली आणि बगलेत लपवलेली छुरी हातात घेऊन सुन्द-उपसुंद प्रमाणे एक दुसर्यावर तुटून पडले. स्वामीजी बोलता बोलता थांबले. माझ्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराज आणि अफज़लखानच्या  भेटीचे दृश्य तरळले. एका दुसर्याच्या रक्ताने न्हालेले मित्र पुन्हा जवळ येणे शक्य नाही. आले तरी पहिले सारखे प्रेम उरणार नाही.  मी म्हणालो, स्वामीजी, आता मला रहीमदासच्या दोह्याचा अर्थ कळला. पण तरीही एक शंका मनात येते. सांग बच्चा, काय शंका आहे, स्वामीजी म्हणाले. मी म्हणालो, स्वामीजी, अर्जुनाचा पौत्र परीक्षित हस्तिनापूरच्या गादीवर बसला होता. भारतीय युद्धात अर्जुनाने मोठा पराक्रम गाजविला होता, भीष्म पितामह, कर्णा सारख्या योद्धानां त्याने पराभूत केले होते, शिवाय असंख्य कौरव सैन्याला, आपल्या बाणांनी यमसदनी पाठविले होते. मोठा असला तरी काय झाले, युधिष्ठिरने युद्धात विशेष पराक्रम गाजविला नव्हता, हे सर्व पाहता कदाचित् युधिष्ठिरा एवजी अर्जुनच गादीवर बसला असेल. हा! हा! हा! स्वामीजी जोरात हसले, बच्चा, सद्य परिस्थिती पाहता, तुझे म्हणणे रास्त वाटते, कदाचित् असेही झाले असेल. पण त्या साठी पुन्हा एकदा महाभारत तपासून पाहावे लागेल, असे म्हणत स्वामी त्रिकालदर्शी पुन्हा ध्यानमग्न झाले.

Saturday, November 8, 2014

वात्रटिका- अभियान स्वच्छताआज एक ब्रेकिंग न्यूज  पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला

आधी शुभ्र वस्त्र धारण करावे
एक डिझाईनर झाडू आणावे
मग मिडीयाला बोलवावे
स्मायली फोटो चमकावे.

रस्त्यावरी कचरा पसरविला
तोची झाडून स्वच्छ केला
असा स्वच्छता अभियानाचा
नेत्यांनी बोऱ्या वाजविला.Monday, November 3, 2014

एक लक्ष वाचक - एक प्रवास

 आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती,  आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती.    

चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात  आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली.  वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.  रोज मराठी सृष्टी ही वेबसाईट उघडायचो आणि  आपल्यातील दडलेल्या लेखकाला कसं  जागे करावे याचा विचार करायचो.  मनातील दडलेल्या लेखकाला जागवल तरी अनेक समस्या होत्या.  पहिली समस्या होती, मराठी टंकन येत नव्हते. दुसरी समस्या  मी मराठीत लिहू शकतो का, हा मोठा प्रश्न होता?  स्वत:च्या मराठी बाबत  म्हणाल तर दिल्लीत मराठी शाळेत ५ वी पर्यंत मराठी हा विषय होता. ही गोष्ट वेगळी मराठीच्या  क्लास मध्ये आम्ही चक्क कंचे खेळायचो. कारण मराठीचे मार्क्स जोडल्या जात नव्हते.  ११वी पर्यंत हिंदी हा विषय होता. नंतर तो ही सुटला. आंग्ल भाषेत शॉर्टहंड शिकून, सरकारी नौकरीत रुजू झालो. त्यानंतर मराठी तर सोडा कधी हिंदीत ही लिहिले नसेत किंवा टंकले नसेल. पुस्तके वाचण्याचा छंद होता, सरकारी वाचनालयात जाऊन भरपूर हिंदी /मराठी पुस्तके वाचत असे, एवढाच  काय तो मराठीचा संबंध.  सौ. ही दिल्लीचीच असल्यामुळे घरी कुणालाही मराठी वाचण्याची, लिहिण्याची आवड नव्हती. (आता मराठी मालिकांमुळे मुलांना थोडी तरी मराठी समजू लागली आहे).  तिसरी समस्या वय ५०सीच्या जवळ झाले होते आणि डोळ्यांना चष्मा ही लागलेला होता. तरी ही आपल्या मायबोलीत मराठीतच लिहिण्याच्या निश्चय केला. जिथे मराठी धड बोलता येत नाही तिथे मराठीत लिहायचा  निश्चय करणे म्हणजे एखाद्या पर्वतावर चढण्या सारखे कार्य.   

पहिली समस्या चिरंजीवानी दूर केली, आंग्ल भाषेत टंकून करून ही आपण मराठीत लिहू शकतो, हे कळले.  मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सुरु केला. काही कविता मराठी सृष्टी कडे पाठविल्या, त्या सहजपणे तिथे प्रकाशित झाल्या. उत्साह वाढला.आपल्या तुटक्या-फुटक्या मराठीला सुद्धा अंतर्जालावर वाव आहे हे कळले.

एकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे  काय  नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच  नाव ब्लॉगला दिले आणि  लिहायला सुरुवात गेली.  ब्लॉग वर पहिली कविता कवितेचा कीड़ा/ डोक्यात शिरल्यावर काय होते ते लिहिली.  पण उत्साह काही दिवसांतच मावळला. कारण ब्लॉग  कुणीच वाचत नव्हते. 

कुणी तरी सांगितले चांगले लिहिण्यासाठी, चांगले वाचणे गरजेचे, नियमित पणे ब्लॉग वाचणे सुरु केले, ब्लॉग्स वाचत असताना, अनेक मराठी संकेत स्थळांबाबत माहित मिळाली. आपला ब्लॉग ही 'मराठी ब्लॉगर्स', मराठी ब्लॉग विश्व' आणि 'मराठी कॉर्नर'  या संकेत स्थळांशी दोन तीन वर्षांच्या कालखंडात जोडला.  अनेक मराठी वेबसाईट 'मिसळपाव, ऐसी अक्षरे' यांची माहिती मिळाली. तिथे हात आजमावला. हळू हळू कळू लागले, आपली मराठी धड नाही, लिहिताना अनेक चुका होतात. तरी ही चुका सुधारत-सुधारत लिहिणे सुरु ठेवण्याचा निश्चय केला.

पहिले वाटत होते, विचार केला कि डोक्यात कल्पना सहज येतात, पण हे काही खरे नव्हे.  डोक्यात आलेले विचार टंकणे ही  काही सहज कार्य नाही, हे ही जाणले.  त्या मुळे कधी कधी महिन्याभरात ही एखाद कविता किंवा क्षणिका लिहिणे कसे बसे जमत असे. शेवटी निश्चय केला 'स्वत: अनुभवलेले,  दिसलेले आणि समजलेले समाजातले सत्य लोकांसमोर मांडावे'. त्या दृष्टीने विचार सुरु केला. एकदा  सुट्टीच्या दिवशी सकाळी फिरायला जनकपुरीच्या डीस्ट्रीक्ट पार्क मध्ये जात होतो. तिथे काही म्हातारे दिवसभर रमी खेळायचे त्यांना पाहून मला  सारखे वाटायचे, यांच्या जीवनात आता काही राहिलेले नाही, फक्त मृत्यूची वाट पाहत हे जिवंत राहण्याचे नाटक करीत आहेत. (वाट मृत्युची).  ययाति कादंबरी  वाचताना जाणीव झाली कि  आपण ही आज ययाति सारखेच वागतो आहे, आपली भोगलिप्सा वाढतच चालली आहे, आपण सृष्टीतल्या सर्व जीवांना संपवतो आहे, असे सुरु राहिले तर माणूस एक दिवस स्वत:ला ही संपवणार आणि यातून   ययाति-- ययातिच्या मनातिल द्वंद्व  या कवितेचा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी बाणभट्टची 'कादंबरी' वाचली होती. तरीही प्रेम म्हणजे काय, हे समजले नाही. असेच एकदा एका आजीला हा प्रश्न विचारला (हिम्मत करून) आणि  प्रेम म्हणजे काय? http://vivekpatait.blogspot.in/2011/05/blog-post_10.html  हा लेख खरडला.  एक विचित्र अनुभव वाट्याला आला.  हा लेख आधी मराठी सृष्टी वर प्रकशित केला होता. नंतर काही महिन्यांनी ब्लॉग वर टाकला. काही काळानंतर ऐसी अक्षरे  वर टाकला. त्या साईट वर मिळालेल्या प्रतिसाद वाचताना कळले,  काहींनी हा लेख चक्क चोरून आपल्या नावानी ब्लॉग वर टाकला.  ब्लॉग वर ही साहित्य चोरी होते आणि प्रामाणिक मराठी माणूस  ही अश्या प्रकारची चोरी करतो,  हे ही कळले. (अर्थातच त्यांचे ईमेल शोधून त्यांना जाब विचारला व त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही साईट वर प्रतिसादात दिली, तेंव्हा कुठे मनाला चैन मिळाले ). पण एक मात्र खरं, पहिल्यांदा वाटले आपण काही तरी निश्चित चांगले लिहित आहोत.  ही घटना उत्साह वाढविणारी नक्की होती. दिल्लीत राहत असल्यामुळे किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी कार्यरत असल्यामुळे राजनीती वर ही काही वात्रटिका, क्षणिका आणि रूपक लिहिले.  सचिवालयात लागलेल्या आगीच्या आधारावर   हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद हा लेख लिहला.  एकदा सकाळी बगीच्यात एका बेंच वर बसलो होतो आणि सूर्याचे कोवळे सोनेरी किरणे अंगावर पडत होती, मस्त वाटत होते,  ईशान उपनिषदातला श्लोक आठवला, मनातल्या मनात गुणगुणू लागलो: हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं...पण थोड्यावेळाने तीच सूर्य किरणे बोचू लागली. त्यातून या लेखाचा जन्म झाला  -सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य

अश्या रीतीने लेखनाची गाडी सुरु झाली. तरी ही अनेक शंका होत्याच. आपला ब्लॉग लोक वाचतील का? आपल्या मोडक्या- तोडक्या  मराठीला ही लोक स्वीकारतील का?  पण ब्लॉग वाचकांनी माझ्या मराठीला सहजपणे स्वीकार केले त्या बाबत पुन्हा त्यांचे अभिनंदन करायला हवे तेवढे कमीच. या शिवाय माझ्यातील दडलेल्या लेखकाला जाग केल त्या मराठी सृष्टी या वेबसाईटचा ही मी ऋणी राहिलं. आपल्या अनुभव वरून आजच्या दिवशी मला एकच म्हणायचे आहे,  प्रत्येक माणूस जो विचार करतो, तो लिहू शकतो. फक्त लिहिण्याची सुरुवात करायची गरज आहे. 


Saturday, November 1, 2014

ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोलसत्तेचा आनंदनाक कान डोळे
ठेवा सर्व बंद

गुपचूप चिडीचूप

  सत्तेचा आनंद

नागपुरी संत्रानागपुरी संत्रा

पहा कसा बहरला

लवकरच कळेल

गोड आहे कि कडू.टोल प्रश्नगादीवर बसतात

  सत्ताधारी झाला

प्रश्न टोलचा

झाडावर टांगला.