Friday, December 25, 2015

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूसकालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे  भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता.  गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला  जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी  बहुत संवेदनशील और अच्छे  इन्सान है. रेल का सफर  करने वाले आम आदमी का ख्याल रखते हैं. फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत  असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या  समस्या ते चुटकीसरशी दूर करतात.

या आधी दिल्लीत मराठी नेत्यांची प्रशंसा मी क्वचितच ऐकली असेल. काही मुंबईकर नेत्यांमुळे, मराठी माणूस म्हणजे परप्रांतीय लोकांशी द्वेष करणारा, या ना त्या कारणाने सतत राडा करणारा. अशी मराठी माणसाची प्रतिमा. पण आज प्रभु साहेबांची प्रशंसा ऐकून माझी छाती चौडी झालीच.  एकमात्र खरे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे एका अनोळखी तरुणाने,  मला बसायला जागा दिली.  मी त्याच तरुणाचे  आभार मानले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटले नाही. श्री सुरेश प्रभू  प्रधानमंत्री कार्यालयात इंडियन शेरपा म्हणून कार्यरत असताना, मी त्यांच्या अखत्यारीत  पीएस म्हणून जवळपास दीड एक महिना काम केले आहे. त्याच वेळी मला त्यांच्या मानवीय भावनेने परिपूर्ण अश्या संवेदनशील मनाचा अनुभव आला होता.

जुलै, 2014 महिन्यात माझी हृदयाची बाईपास सर्जरी झाली होती. तीन महिन्याची सख्तीची रजा मिळाली. बहुधा वीस-एक सप्टेंबरची तारीख असेल, ऑफिस मधून  एका  अधिकार्याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर फोन करण्याचे खरे कारण- अर्थात पटाईतजी आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो. मी उत्तर दिले,  तीन महिन्याची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करेल. थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या? मी विचारले, का?  माननीय सुरेश प्रभुजी की  जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधान मंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (श्री सुरेश प्रभूंची इंडियन शेरपा या पदावर नियुक्ति झाली आहे, ते शीघ्र कार्यालय ज्वाइन करणार आहेत).  अधिकारी पुढे म्हणाले, ते काही रोज कार्यालयात  येणार नाही, आले तरी जास्ती वेळ बसणार ही नाहीत.  फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स, चर्चा, मुलाकाती वैगरेह होतील. तुम्हाला सहज जमेल. दोन एक  महीने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला चारा फेंकना, असे ही म्हणतात).  प्रधानमंत्री कार्यालयात २-३ महीने आरामात निघून जातील, हे काही थोड़े-थोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो.

प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव किती ही मोठे असले तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथे हि जागेची समस्या आहेच. दुसर्या माल्यावर कॅन्टीन आणि किचन(स्वैपाकघर) आहे. किचनच्या उजव्या बाजूचा एक मोठा रूम श्री सुरेश प्रभु  साहेबांच्या बसण्यासाठी तैयार केला. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्र हि त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. त्यांना केबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असला तरी  स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक सिपाही, असे आम्ही दोघेच होतो. एकट्यानेच सर्व काम करायचे होते. तरीही त्यांच्या सोबत काम करताना मला कधीच दडपण जाणविले नाही.  इतके सहज होते ते. 

एक दिवस दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभु साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या कक्षात गेलो. ते म्हणाले मला भूक लागली आहे, काही  मिळेल का? मी म्हणलो  साहेब जेवणात काय मागवू. तैयार करायला जास्तीस्जास्त १०-१५ मिनिटे लागतील. साहेब म्हणाले, किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवतात आहेत, त्यांना त्रास देऊ नका. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच मागवा.  दुसर्या माल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते.  रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचन आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच बनविणारा कॅाउन्टर उघडा असतो. बहुधा  साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाचा ऑर्डर दिला तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड सेंडविचवर आपली भूक भागवली.   मला नाही वाटत या आधी वेटर- कुक सारख्या लहान लोकांचा विचार कुणी मंत्री- अधिकारी यांनी केला असेल.  त्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचा ओलावा मला हि जाणविला.

Sunday, December 20, 2015

मटार -कांदे परांठाहिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते.  गेल्या रविवारी भाजी  स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे  निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला.   मटारच्या वरील   सर्व  भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली.  साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला.  त्याचीच कृती खाली देत आहे. 

साहित्य : निवडलेले मटार २ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी,  बारीक चिरलेली कोथिंबीर -अर्धा वाटी, हिरवी मिरची -२-४ (इच्छेनुसार),   तिखट २-३ छोटे चमचे, जिरेपूड १ छोटा चमचा,, मिरे पूड १ छोटा चमचा, हळद १ छोटा चमचा  आणि  चाट मसाला (१ मोठा चमचा ) [चाट मसाला टाकला कि इतर मसाले टाकायची आवश्यकता नसते आणिक स्वाद हि मस्त येतो], मीठ स्वादानुसार [ चाट मसाल्यात हि मीठ असते, हे लक्षात ठेवावे].  तेल २ चमचे. 

कणिक चार वाटी  परांठ्यांसाठी आणि देसी तूप किंवा तेल परांठ्यांना लावण्यासाठी.

कृती: गॅसवर कढई ठेऊन २ चमचे तेल घालून, त्यात  मटार आणि हिरवी मिरची परतून, २ मिनिटासाठी झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी.  नंतर थंड झाल्यावर मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.   बारीक वाटलेल्या मटार मध्ये तिखट, जिरे, मिरे पूड, हळद  , चाट मसाला, मीठ,  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून  परांठ्यांत भरण्यासाठी गोळे मळून घ्यावे. 

आता मळलेल्या कणकीची पारी बनवून त्यात  त्यात वरील मिश्रणाचे गोळे भरून परांठा लाटून, तव्यावर चारीबाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.

ज्याना तूप कमी खायचे असेल त्यांच्या साठी - तव्यावर पोळीसारखा परांठा भाजून नंतर गर्मागरम परांठ्यावर थोडे तूप लाऊन  गर्मागरम परांठा  वाढवा. 

टीप:तुपा एवजी तेल हि वापरू शकतात.

हा परांठा दही आणि हिरव्या चटणी सोबत मस्त लागतो.  सौ. ने दही आणि आवळ्याच्या हिरव्या चटणी सोबत परांठा वाढला. 


Thursday, December 17, 2015

व्यथा एका कठपुतळी राजाचीकठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार.  हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतली नाचविणार्याचे हात दिसायचे.  क्षणात स्वप्न भंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची. 


एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो. प्रजेला कष्ट देणार्यांना चोर, डाकू, तस्कर, काळाबाजार करणार्यांना धडा शिकवितो. सर्वत्र आनंदी आनंद. लोक हि टाळ्यावाजवून राजाची प्रशंसा करतात.  खेळ संपतो.


एकदा असाच खेळ सुरु होता. पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र धारण करून, पांढर्या शुभ्र घोड्यावर स्वार इमानी राजा मंचावर अवतारला.  येताच त्याने आरोळी ठोकली, प्रधानजी कुठे आहात. अचानक, काळ्या घोड्यावर स्वार एक काळाकुट्ट माणूस मंचावर प्रगटला. राजाने विचारले, कोण रे तू, आणि एवढा काळा का.? लोक तुला पाहून घाबरतील. त्याने राजाला मुजरा करीत म्हंटले, महाराज, मी तुमचा प्रधान. पूर्वी मी असा काळा नव्हतो. काळ्याकुट्ट अमावस्याच्या रात्रीत मी काळ्या लक्ष्मीची कठोर अघोरी उपासना केली. काळ्यालक्ष्मीची कृपा मजवर झाली. त्यामुळे मी असा काळा आहे. मला आपल्यासोबत राज्याच्या दौऱ्यावर घेऊन चला, काळ्या लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हि होईल. त्याचे बोलणे ऐकून, राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण राजाने असे काहीही केले नाही. माणसाच्या हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या नशीबात होते. तेवढ्यात संगीत सुरु झाले, घोड्यांच्या टापा आणि माणसाचा आवाज गुंजला, आधीच उशीर झाला आहे, चला प्रधानजी निघू या, टप टप, दुड दुड करत राजा काळ्याकुट्ट प्रधानासोबत दौर्यावर निघाला, प्रजेच्या कल्याणासाठी ????