कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी बहुत संवेदनशील और अच्छे इन्सान है. रेल का सफर करने वाले आम आदमी का ख्याल रखते हैं. फक्त टयूटर वर संदेश पाठविण्याची गरज. मग लहान मुलाला दूध पाहिजे असेल किंवा कुण्या तरुणीची गुंड मुले छेड़ काढीत असेल. संकटात सापडलेल्या प्रवासाच्या समस्या ते चुटकीसरशी दूर करतात.
या आधी दिल्लीत मराठी नेत्यांची प्रशंसा मी क्वचितच ऐकली असेल. काही मुंबईकर नेत्यांमुळे, मराठी माणूस म्हणजे परप्रांतीय लोकांशी द्वेष करणारा, या ना त्या कारणाने सतत राडा करणारा. अशी मराठी माणसाची प्रतिमा. पण आज प्रभु साहेबांची प्रशंसा ऐकून माझी छाती चौडी झालीच. एकमात्र खरे, त्यांच्या चांगल्या कार्यामुळे एका अनोळखी तरुणाने, मला बसायला जागा दिली. मी त्याच तरुणाचे आभार मानले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटले नाही. श्री सुरेश प्रभू प्रधानमंत्री कार्यालयात इंडियन शेरपा म्हणून कार्यरत असताना, मी त्यांच्या अखत्यारीत पीएस म्हणून जवळपास दीड एक महिना काम केले आहे. त्याच वेळी मला त्यांच्या मानवीय भावनेने परिपूर्ण अश्या संवेदनशील मनाचा अनुभव आला होता.
जुलै, 2014 महिन्यात माझी हृदयाची बाईपास सर्जरी झाली होती. तीन महिन्याची सख्तीची रजा मिळाली. बहुधा वीस-एक सप्टेंबरची तारीख असेल, ऑफिस मधून एका अधिकार्याचा फोन आला. प्रथम शिष्टाचार म्हणून त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर फोन करण्याचे खरे कारण- अर्थात पटाईतजी आप कब दफ्तर जॉईन कर रहे हो. मी उत्तर दिले, तीन महिन्याची रजा आहे, पूर्ण होताच जॉईन करेल. थोडा जल्दी जॉईन कर सकते हो क्या? मी विचारले, का? माननीय सुरेश प्रभुजी की जी-२० के लिए इंडियन शेरपा के पद पर नियुक्ति हुई है. वह प्रधान मंत्री कार्यालय जॉईन कर रहें हैं. (श्री सुरेश प्रभूंची इंडियन शेरपा या पदावर नियुक्ति झाली आहे, ते शीघ्र कार्यालय ज्वाइन करणार आहेत). अधिकारी पुढे म्हणाले, ते काही रोज कार्यालयात येणार नाही, आले तरी जास्ती वेळ बसणार ही नाहीत. फक्त जी-२०च्या संदर्भात काही मीटिंग्स, चर्चा, मुलाकाती वैगरेह होतील. तुम्हाला सहज जमेल. दोन एक महीने तुमचे आरामात निघून जातील. (दिल्लीच्या सरकारी भाषेत याला चारा फेंकना, असे ही म्हणतात). प्रधानमंत्री कार्यालयात २-३ महीने आरामात निघून जातील, हे काही थोड़े-थोडके नव्हे. मासा गळाला लागला. दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो. फिटनेस सर्टिफिकेट घेतले आणि कार्यालयात रुजू झालो.
प्रधानमंत्री कार्यालयाचे नाव किती ही मोठे असले तरी इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे इथे हि जागेची समस्या आहेच. दुसर्या माल्यावर कॅन्टीन आणि किचन(स्वैपाकघर) आहे. किचनच्या उजव्या बाजूचा एक मोठा रूम श्री सुरेश प्रभु साहेबांच्या बसण्यासाठी तैयार केला. शिवाजी महाराजांचे एक मोठे तैलचित्र हि त्यांच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लावण्यात आले. त्यांना केबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला असला तरी स्टाफमध्ये पीएस म्हणून मी आणि एक सिपाही, असे आम्ही दोघेच होतो. एकट्यानेच सर्व काम करायचे होते. तरीही त्यांच्या सोबत काम करताना मला कधीच दडपण जाणविले नाही. इतके सहज होते ते.
एक दिवस दुपारी सव्वादोन वाजता श्री सुरेश प्रभु साहेब कार्यालयात आले. आल्यावर नेहमीप्रमाणे मी त्यांच्या कक्षात गेलो. ते म्हणाले मला भूक लागली आहे, काही मिळेल का? मी म्हणलो साहेब जेवणात काय मागवू. तैयार करायला जास्तीस्जास्त १०-१५ मिनिटे लागतील. साहेब म्हणाले, किचनमध्ये सध्या कुक आणि वेटर जेवतात आहेत, त्यांना त्रास देऊ नका. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच मागवा. दुसर्या माल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यावर समोरच किचन दिसते. रोज २ वाजता कॅन्टीन बंद होते. दोन ते अडीच या वेळात किचन आणि कॅन्टीनमध्ये काम करणारे कुक आणि वेटर इत्यादी जेवतात. फक्त चहा आणि ब्रेड सेंडविच बनविणारा कॅाउन्टर उघडा असतो. बहुधा साहेबांनी त्यांना जेवताना बघितले असेल. आपण जर जेवणाचा ऑर्डर दिला तर तो पूर्ण करण्यासाठी त्यांना अर्धवट जेवण सोडून उठावे लागेल. साहेबांच्या संवेदनशील मनाला हे पटले नसेल. साहेबांनी केवळ ब्रेड सेंडविचवर आपली भूक भागवली. मला नाही वाटत या आधी वेटर- कुक सारख्या लहान लोकांचा विचार कुणी मंत्री- अधिकारी यांनी केला असेल. त्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचा ओलावा मला हि जाणविला.
No comments:
Post a Comment