Saturday, January 2, 2016

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ



काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले-पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला  माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेल तर आपण कुठेच पोहचू शकत नाही.  डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.  योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.

अखंड पुरुषार्थ: एकदा लक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा  आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.

स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे.  'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे. 

ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावर चढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.

अनासक्त कर्म:  आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडीबहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड  पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.  

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment