Sunday, January 17, 2016

गाजराचा शिरा




पूर्वभाग: कीस बाप्या कीस गाजर कीस

साहित्य: गाजर ४  किलो, साखर ३-४ वाटी,   दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची)  १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.

प्रारंभिक तैयारी. सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले. 

संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री  ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे   भांडे  असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, छोटी इलायची आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.

जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा  बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का? ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो. 



सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले. 

दुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.    

 

No comments:

Post a Comment