Wednesday, December 27, 2023

इच्छापूर्ती

स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, ईच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू  समयी  त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही. स्वामीजी धर्मदेव कडे पहात  हसत-हसत म्हणाले, त्यांच्या सर्व इच्छा तू सहज पूर्ण करू शकतो. स्वामीजींनी धर्मदेवला एक कान मंत्र दिला.

पुढील २० वर्षांत धर्मदेव यांनी वडिलांच्या स्मृतीत अनेक शाळा, कॉलेजेस अनाथाश्रम, वृध्दाश्रम बांधले. एक मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल ही बांधले. कोट्यवधी  रुपये दरवर्षी ते यासाठी खर्च करतात. एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला, तुम्ही कोणताही व्यापार, धंधा,  उद्योग करत नाही, मग हे सर्व तुम्हाला कसे काय जमते. धर्मदेव म्हणाले ही सर्व भगवंताची कृपा आहे. स्वामी महाराजांनी मला कान मंत्र दिला आणि हे सर्व साध्य झाले. पत्रकाराने विचारले स्वामीजींनी तुम्हाला कोणता कानमंत्र दिला होता. "स्वामीजींनी मला भगवंताचे भव्य मंदिर उभारण्याचा आदेश दिला आणि म्हणाले भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील". आपली सर्व जमापूंजी आणि व्यापार विकून मी इच्छापूर्ती करणाऱ्या भगवंताचे भव्य मंदिर बांधले. मी भगवंताची सेवा करतो आणि भगवंताने माझ्या स्वर्गीय वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या.  




Monday, December 4, 2023

वार्तालाप: कर्माची फळे का मिळत नाही


श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला  प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही  कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म  केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर  बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी  असतात.

एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.  शेताची उत्तम निगा राखतो. उत्तम पीक ही येते.  पण  पीक कापणीच्या पूर्वी  अचानक वादळ वारे, येतात गारपीट होते आणि सर्व पीक हातातून जाते. कधी पेरणी नंतर पाऊस दगा देतो. शेतकऱ्याला दैवी आपदांमुळे कर्माचे फळ मिळत नाही. वादळ वारे भूकंप सारख्या दैवी आपदा आपल्या कर्मावर पाणी फिरवितात. नुकतेच हिमाचल राज्यात हजारो घरे, हॉटेल्स, शेती पर्वत ढासळत्या मुळे नष्ट झाली. इजराईल आणि गाझा मध्ये ही आतंकवाद्यांची संबंध नसलेल्या हजारो लोकांना त्यांच्या आसुरी कृत्यांची फळे भोगावी लागली.  हजारो मृत्युमुखी पडले, हजारो लोकांचे उद्योग धन्दे बुडाले, घरे नष्ट झाली.  अचानक लागलेल्या किंवा कुणी लावलेल्या आगी दर वर्षी हजारो घर दुकान फेक्ट्री नष्ट करतात. असे शेकडो उदाहरणे आपल्याला नेहमीच दिसतात. तात्पर्य  उत्तम कर्म केले तरी त्या कर्माची अनुरूप फळे अनेकदा मिळत नाही. 

श्रीमद्भगवत गीतेत बहुतेक आधिभौतिक तापांचा प्रभावामुळे कर्म फळांवर  आपला अधिकार नसतो, हे समजविण्यासाठी  भगवंतांनी अर्जुनाला या श्लोकाचा  उपदेश दिला. तू क्षत्रिय आहे, युद्धातून पलायन करण्याचा विचार करू नको. परिणाम काय होईल याचाही विचार करू नको. फक्त तू आपले कर्तव्य कर. क्षत्रिय  धर्माचे  पालन कर. धर्म रक्षणासाठी युद्ध कर.

शेती असो, उद्योग धंधा असो, व्यापार असो किंवा नौकरी, नेहमीच कर्माच्या अनुरूप फळे मिळणे शक्य नाही. तरीही शेतकरी हजारो वर्षांपासून सतत शेती करतो. उद्योजक आणि व्यापारी आपापले धंदे करत राहतात. चाकरी करणारा चाकरी करत राहतो. असो.

Thursday, November 30, 2023

ढाब्याच्या जेवणात कुणाचा हिस्सा ?

आपण ढाब्यात जेवतो.आपल्याला वाटते सर्व नफा हा ढाब्यावाल्याचा. पण त्या नफ्यात ही ही अनेक वाटेकरू असतात. ढाबेवाला खाण्या - पिण्याची सामग्री  ज्या कंपन्यांकडून घेतो, त्यांच्या वाटा ही असतो. त्याच अनुषंगाने देशातील एका महान नेत्याने, एका भाषणात म्हटले, जेव्हा लोक ढाब्यात शंभर रुपये खर्च करतात तेव्हा दहा ते पंधरा रुपये देशातील एका उद्योगपतीच्या खिश्यात जातात. त्या महान नेत्याच्या वक्तव्यात कितपत सत्य आहे.  हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला.

आधी पिण्याचे पदार्थ. चहाचे दोन मोठे ब्रँड brook bond आणि लिफ्टन हे विदेशी कंपनी युनिलिव्हर पेप्सिकोचे आहेत. देशात  कॉफी नेस्लेची विकल्या जाते. सद्याची लोकप्रिय स्टारबॅग ही पण विदेशी आहे. कोल्ड ड्रिंक म्हणाल तर इथे कोक आणि पेप्सीचे राज्य आहे. अर्थात नफा विदेशात जातो त्या उद्योगपतीच्या खिश्यात नाही.

जेवणाचे म्हणाल तर महामार्गांवर पित्झा, सँडविच बर्गर विकणारे डोमिनो, केएफसी, पित्झाहट मेक., बर्गर किंग इत्यादी जागोजागी दिसतात. रस्त्यावर मिळणारी मेग्गी, केचप इत्यादी विदेशी आहेत. यांच्या ही नफा विदेशातच जाणार.

तुम्ही म्हणाल आम्ही तर ढाब्यात दाल रोटी सब्जी खातो. ढाब्यात वापरणारे खाण्याचे  ७० टक्के तेल विदेशातून येते. अधिकांश खाद्य तेल विकणाऱ्या कंपन्यांचे स्वामित्व कारगिल, बंजे ऑईल, युनिलिव्हर इत्यादींचे आहे उदा.- डालडा, रथ, गिन्नी, सनफ्लावर, फारच्यून, Gemini, स्वीकार इत्यादी इत्यादी.  किराण्याच्या धंद्यात ही आटा इत्यादी विकणाऱ्या विदेशी कंपन्या आहेतच. 

थोडक्यात आपण खाण्या-पिण्यावर, घरात किंवा रस्त्यांवर असलेल्या ढाब्यांत जर १०० रू खर्च करतो तर  अंदाजे दोन ते तीन रुपये नफा निश्चितच विदेशी कंपन्याच्या खिशात जातो. अर्थातच त्या नेत्याच्या विधानात सत्यता कमी, राजनीती जास्त होती. 

देशातील पैसा देशात रहावा असे वाटत असेल तर, तर स्वदेशी किराणा विकत घ्या. स्वदेशी कंपन्यांचा पित्झा, बर्गर आणि नुडल्स खा. असो.

Wednesday, November 8, 2023

दिल्ली.: प्रदूषण, फटाके इत्यादी

 

फार पूर्वी एक गोष्ट वाचली होती. लेखकाचे नाव लक्षात नाही. पण गोष्ट अशी होती, एकदा वन विभागाच्या खर्चाची बचत करण्यासाठी वन खात्याचे मंत्री जंगलाच्या दौऱ्यावर आले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था वन खात्याच्या गेस्ट हाऊस मध्ये गेली. मंत्री महोदयांना जंगल फिरविण्यासाठी एक हत्ती आणला. अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना पटवून दिले की हत्ती खात्याच्या कामांसाठी  किती गरजेचा आहे. मंत्री महोदयांनी हत्ती, माहूत आणि हत्तीच्या चाऱ्यासाठी मोठे बजेट मंजूर केले. रात्री जेवल्यानंतर मंत्री महोदय शतपावली करत होते, त्यांना एक कर्मचारी एका वाटीत दूध घेऊन जाताना दिसला.  मंत्री महोदयांनी त्याला विचारले, हे दूध कुणासाठी घेऊन जात आहे. तो म्हणाला या बंगल्यात उंदिरांचा त्रास आहे, त्यासाठी मांजर पाळली आहे. त्या मांजरीसाठी हे दूध. मंत्री महोदय, त्याच्यावर ओरडले, मांजरीला दूध द्याल तर ती उंदीर पकडेल का? बंद करा हा व्यर्थचा खर्च. त्या रात्री मंत्री महोदयांना शांत झोप लागली. अखेर, खात्याच्या खर्च कमी करण्याचा त्यांच्या उद्देश्य पूर्ण झाला होता. दिल्लीत दिवाळीच्या फटाक्यांवर प्रतिबंध ही असाच उपाय आहे. हे वेगळे, दिवाळीच्या दिवशीही फटाक्यांच्या हिस्सा प्रदूषण वाढविण्यात पाच टक्के ही असण्यावर शंका आहे. तरीही प्रदूषण साठी दिवाळीचे फटाके दोषी ठरविले जातात. फटाक्यांवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रतिबंध असतो. डिसेंबर शेवटी दाट धुक्यामुळे प्रदूषण भयंकर असते पण फटाक्यांवर प्रतिबंध नसते. 

दिल्लीत ऑक्टोबरपासून धुकं पडू लागते. वारे चालत नसेल तर  धुकं, धूर आणि धूळ यांच्या मिलाप म्हणजे गंभीर प्रदूषण. सूर्य देवाची किरणे ही दुपारी तीन-चार वाजेपर्यंत जमीनी पर्यंत पोहचत नाही. बाहेरून येणाऱ्या वाटते  की आकाशात ढग असावे. ही परिस्थिती संक्रांतीचे वारे सुरू होण्यापर्यंत राहणारच. चुकून पाऊस पडला तर एखाद दिवस प्रदूषण कमी होईल. उन्हाळ्यात तर धूळ आकाशात राहतेच. त्यामुळे पावसाळा आणि फेब्रुवारी - मार्च सोडला तर वर्षभर गंभीर स्वरूपाच्या प्रदूषणापासून  दिल्लीकरांना मुक्ती नाही. 

दिवाळीचे फटाके दोन - तीन दिवस मोठ्या प्रमाणात जळतात. फटाके विकून हजारो छोट्या दुकानदारांची दिवाळी साजरी होते. प्रदूषणाच्या नावावर गल्ली बोळ्यातील हजारो दुकानदारांचा, पटरी वर फटाके विकणाऱ्यांचा रोजगार बुडतो. त्यांची दिवाळी काळीच  राहते. लोक उत्तरप्रदेश, हरियाणातून मागवितात. दिल्ली बॉर्डर वर कमाईचा एक नवीन मार्ग. 

पराली ही फक्त तीन ते  चार महिने जळते. प्रदूषण दहा महिने राहते. उन्हाळयात जूनमध्ये पाऊस झाला की प्रदूषण आटोक्यात येते. पण उत्तर पश्चिम भारतात सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबर पाऊस क्वचित पडतो. त्यामुळे पराली धूर आकाशात जास्त काळ टिकतो. या वर्षी उत्तर प्रदेश हरियाणात पराली कमी जळाली. पण पंजाब मध्ये मात्र पराली जाळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सहा नोव्हेंबरच्या उपग्रह फोटोत पूर्ण पंजाब लाल दिसत आहे. व्होटबँक साठी  किंवा दिल्लीला धडा शिकविण्यासाठी तिथली सरकार काहीही करत नाही. कदाचित् ,  हम तो डूबेंगे सनम पर आपको भी साथ ले डूबंगे, मानसिकता.

दिल्लीत 70 टक्के लोक अनधिकृत  कॉलनीत  राहतात. इथे ग्राउंड फ्लोअर 15X60 (100 टक्के कवर, प्रथम माला 15X 64/66 ही  राहू शकतो). घरात आणि गल्लीत झाडे लावण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या उत्तम नगर भागात दूर-दूर एक ही झाड दिसणार नाही. या शिवाय इथल्या गल्ली - बोळ्यांत कधीच झाडू लागत नाही.  आमच्या गल्लीत तर कधीच लागलेली बघितली नाही. प्रत्येक घरमालक घरा समोरचा भाग स्वतः स्वच्छ करतो. मोठ्या गल्यांत तर रस्त्यावर नेहमीच धूळ उडत राहते. रस्त्यांची साफ -सफाई म्हणा, तर आमच्या भागातील पंखा रोड वर जर तुम्ही दहा वर्ष आधी रस्त्याच्या मधल्या डीवाईडर मध्ये लागलेल्या झाडांच्या बाजूला कचरा फेकला असेल तर तो आज ही तिथेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंखा रोड वर एका बाजूला मोठा नाला आहे, नाल्या शेजारच्या रोड वर गूगल करून बघा, तिथे कचऱ्याचे मोठे-मोठे ढिगारे दिसतील. दिल्लीत पावसाळ्यात एक दोन सेंटीमीटर पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते त्याचे हेच मुख्य कारण. जरी  वारे सुटलेले असेल तरी ही धूळ, प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर उडत राहतात. गल्लोगल्ली रोज कचरा जाळला जातो.  दिल्लीत साफ सफाईचे कार्य निजी संस्थांना दिले तर गल्ली-बोळ्यात रोज झाडू लागू शकतो. गरिबांना खात्यात सबसिडी दिली जाऊ शकते. मोठ्या रस्त्यांच्या स्वच्छते साठी कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. रस्त्याची  स्वच्छ्ता कशी ठेवावी हे इंदौर कडून शिकता येते. 

वाहने प्रदूषणसाठी सर्वाधिक जिम्मेवार आहेत. आज NCR  मध्ये 70 लाखाच्या जवळ लोक मेट्रोने प्रवास करतात. मा.शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तेंव्हा मेट्रोचे सर्व प्रोजेक्ट्स वेळे आधीच पूर्ण होत होते. पण दुर्भाग्य सरकार गेली, मेट्रोच्या कामात उशीर होऊ लागला. जे प्रोजेक्ट्स 2024 मध्ये पूर्ण होणार होते दोन वर्ष उशिरा पूर्ण होतील. दिल्ली सरकारने दिल्ली-मेरठ RRTS ची मंजूरी ही उशिराने दिली. परिणाम उत्तर प्रदेश मध्ये काम पूर्ण होत आहे. पण दिल्ली भागात दोन वर्ष आणिक लागतील.  इतर RRTS प्रोजेक्ट्स ही थंड्या  बस्त्यात  आहे. 

२०१३ मध्ये  डीटीसी बसेसची संख्या  १५००० करण्याची घोषणा केल्या होत्या.  पण झाले विपरीत बसेसची संख्या २०१३ पेक्षाही कमी  झालेली आहे. हे वेगळे डीटीसीचा वार्षिक तोटा २०१३ला ६०० कोटी वार्षिक पासून २०२२-२३ मध्ये ३००० कोटींपेक्षा जास्त आहे. फक्त ईमानदार व्यक्तीच याचे कारण सांगू शकते. वाढती जनसंख्या आणि कमी होणाऱ्या बसेस मुळे बाईक, स्कूटी इत्यादी गरजेची झाली आहे कारण मेट्रो सर्व रस्त्यांवर नाही. 

दिल्ली शहरातून अधिकांश भागातून मोठे कल-कारखाने आधीच बाहेर हलविल्या गेलेले आहेत. तरीही दिल्लीच्या 500हून जास्त गांवात लाल डोरा क्षेत्रांत, हजारो  लहान छोटे - मध्यम कारखाने चालतात. त्यांच्यावर  कायद्यांच्या पालन करण्याचे कोणतेही निर्बंध नाही.  नोएडा, गाझियाबाद,  साहिबाबाद ,  वल्लभ गढ, बहादुर गढ, सोनीपत पर्यंत हजारो कारखाने आहेत. कारखान्यांच्या चिमन्या धूर हवेत फेकणारच. त्यावर पर्यावरण दृष्टीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. 

दोन दिवसांपूर्वी दिल्लीची मंत्री महोदय म्हणाली, दिल्ली सरकारपाशी विभिन्न कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा डाटा नाही. त्यामुळे ठोस उपाय करणे शक्य नाही. काही वर्षांपूर्वी दिल्लीत दोन ठिकाणी प्रदूषण टॉवर प्रायोगिक स्वरुपात लावले होते. पण देखरेख अभावी तेही बंद पडलेले आहे. 

शेवटी, दिल्लीला राज्य सरकारचा दर्जा दिला नसता तर कदाचित दिल्लीत प्रदूषण समस्या एवढी गंभीर झाली नसती, असे माझे व्यक्तिगत मत आहे. दिल्लीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांचे विचार आवडतील.

Saturday, October 14, 2023

आमच्या छकुलीची मराठी अस्मिता उर्फ भाषाई राजनीती


आपल्याला वाटते तसे लहान पोरं ही निष्पाप असतात ही भारी गैर समजूत आहे. जन्माच्या पहिली दिवसापासून ते आपला स्वार्थ सिद्ध करण्याची राजनीती शिकू लागतात.  जशी निवडणूक जवळ येते मुंबईत अनेक नेत्यांची मराठी अस्मिता जागृत होते. तसेच आमच्या छकुलीची ही मराठी अस्मिता अचानक जागृत झाली.  असाच एक किस्सा.  

छकुलीचा लहान भाऊ तेजस ( बदलेले नाव) तिला बडी दीदी म्हणतो. त्याच्यापेक्षा सहा महिने मोठ्या चुलत बहीणीला तो छोटी दीदी म्हणतो.  तिन्ही  मुले मला आबा आणि सौ.ला आजी म्हणतात

छकुलीने कारोना काळातील दोन वर्ष अर्थात केजी आणि पहिलीचा ऑनलाईन अभ्यास  आमच्या घरी केला. दोन वर्षांत ती मराठी उत्तम बोलू लागली होती. छकुली उन्हाळ्याच्या सुट्टीत मंडी जिल्हयातील पहाडावर असलेल्या त्यांच्या गावी जाते. गावात बडी अम्मा आणि आणि चुलत आजी फक्त मंडीयाली बोलतात, त्यामुळे ती भाषा ही तिला समजते. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर तिला घरची आठवण ही येत नाही. पंधरा-सोळा खोल्यांचे भले मोठे घर, गाईचा गोठा, दोन बकऱ्या  आणि मागे एक मोठे आंगण. याशिवाय चित्र-विचित्र पक्ष्यांचा गोंगाट, दूर दिसणारी व्यास नदी, दरीतील गावांत पसरलेले धुके. घरची आठवण येणे शक्यच नाही. तेजसला मात्र उन्हाळी सुट्टीत गावी सोडत नाही. एक तर वय कमी आणि खोडकर स्वभाव  असल्यामुळे  गावी गेल्यावर त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते.   


वेगळा विषय. यावर्षी जलपा मातेची अवकृपा झाली. पहाडावर भयंकर पाऊस झाला. शेकडो घरे नष्ट झाली. मृत्यूचे तांडव झाले. घराचा मागचे आंगण गायीच्या गोठ्या समोरचा भाग पूर्ण कोसळला.  थोडक्यात घर बचावले. (छकुली आजीच्या कडेवर, आता हे आंगण कालातीत झाले आहे)

गेल्या वर्षी नियमित शाळा सुरू झाली. छकुली आपल्या घरी परतली. छकुली मराठी भाषा ही हळू -हळू विसरू लागली होती.  आठवड्यातून  एकदा किंवा दोनदा आमची लेक व्हिडिओ कॉल करते. तिन्ही पोरांशी बोलणे होते.  छकुलीला मराठी समजत असली तरीही ही व्हिडिओ कॉल वर ती हिंदीत बोलू लागली होती. 

आता छकुली तिसरीत आहे. छोटी दीदी आणि तेजस दोन्ही एकाच वर्गात अर्थात केजीत आहे. तिन्ही एकाच शाळेत शिकतात. सर्व छोटी मुले शाळेत खोड्या करतातच. फक्त मुलांच्या खोड्या  मुलींपेक्षा वेगळ्या असतात. सुरवातीला छोटी दीदी आपल्या भावाच्या खोड्यांची तक्रार बडी मम्माला करायची. पण दोन -तीन महिन्यात तिला वर्गात भाऊ असण्याचे फायदे कळून चुकले. दोघांची युती झाली. तिने भावाची तक्रार करणे बंद केले. आता दोघांचे सिक्रेट तिसर्याला कळने अशक्य झाले होते. 

दोन दिवस आधी गंमत झाली रात्री नऊ वाजता छकुलीचा व्हिडिओ कॉल आला. छकुलीने चक्क शुद्ध मराठीत विचारले, आबा कसे आहात. तुमची तब्येत कशी आहे. पुढे ती म्हणाली, आबा मला मराठी आवडते. मी तुमच्याशी नेहमी मराठीतच बोलत जाईन. छकुलीचे उतू जाणारे मराठी प्रेम पाहून, माझ्या मनात पाल चुकचुकली. 

शेवटी आमच्या लेकीने खुलासा गेल्या. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी हॉस्पीटल  मधून घरी परतल्या-परतल्या छकुली आईला म्हणाली, मम्मा आज ना तेजस ने.....पण लगेच छकुलीचे लक्ष शेजारी उभ्या असलेल्या तेजस कडे गेले आणि तक्षणी विषय बदलत म्हणाली, आज ना हमने स्कूल में बहुत मजे किये, इत्यादी इत्यादी. मग हळूच आईच्या कानात मराठीत तेजसच्या खोडयांची तक्रार केली. साहजिकच होते, बडी  दीदी आईला काय म्हणते आहे हे तेजसला कळले नाही. पण तेजस लक्ष देऊन ऐकतो आहे, हे लक्षात आल्यावर छकुली त्याला म्हणाली, मै ना मराठी में तुम्हारी तारीफ कर रही थी की तेजस बहुत अच्छा है. बिचाऱ्या तेजस ने बडी दीदीला थॅन्क्स म्हंटले. हा प्रकार पाहून आमच्या लेकीची हसता-हसता पुरेवाट झाली. छकुलीला मराठी का आवडू लागली याचे कारण कळले. आता छकुली आई सोबत सिक्रेट गोष्टींसाठी आणि स्वतः च्याच फायद्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करणार.  

शेवटी छोटे बच्चे असो की राजनेता, स्वत:चा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी भाषाई अस्मिता जागृत होते, हेच सत्य. बाकी कारण काही ही असो पुढच्या पिढीत मराठी जिवंत राहणार, याचा आनंद ही झाला.



 

Sunday, October 8, 2023

किस्सा अब की बार सौ पार.

भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन.  

बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार.  खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल. मी उतरलो, जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. तो जोरात हसला आणि म्हणाला,  देशभक्त जरा मागचे रेकॉर्ड तपासून बघ. पदक वाढले तरी जास्तीत जास्त दहा-पंधरा वाढतील 100 तर निश्चित होणार नाही. (आकड्यांची खेळण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची सवय), पैज लाव. मी पैज लावत नाही, हे तुला माहित आहे. पण भेटल्यावर माझ्या तर्फे चाय पकौडे किंवा तुझ्या तर्फे लंच. 

या वेळी पहिल्यांदा सोनी लिव्ह वर सर्व खेळ पहिले. दिवसभर  टीव्ही समोर बसून, चहाचे घोट घेत खेळाडूंना प्रोत्साहन देणे सुरू केले. एक दिवस सौ. ने कंटाळून आयुष्यात प्रथमच विचारले, आजकाल लिहणे सोडून दिले आहे का? मी उतरलो १०० पूर्ण होऊ दे, मग ठरवेल काय लिहायचे ते. दिवसभराच्या भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची चीरफाड करणाऱ्या समीक्षकांना ही १०० पदक मिळतील याची खात्री नव्हती. माझे मन ही सांशक होते. पण विश्वास होता बाकी मंत्रालयाच्या टार्गेट प्रमाणे हे लक्ष्य ही निश्चित पूर्ण होईल. बाकी १०७ पदक मिळाले तरी सोनी लिव्हच्या समीक्षकांपाशी सरकारची तारीफ करण्यासाठी शब्द नव्हते. असो.

काल मित्राला फोन करून त्याला विचारले, कुठे सुजले असेल तर बरनाल  घेऊन येऊ का? दोन चार शिव्या देत तो म्हणाला, मला माहित आहे, दिवसभर टीव्ही समोर बसून तू काळी जादू करत असणार, त्या शिवाय हे शक्य नाही. मी उतरलो, तुला माहित होते, तर पैज का लावली. मी लवकरच भेटायला येणार आहे लंच  तैयार ठेव.

चला शंभरी पार झाली. आता १५० करायचे असेल तर तैराकी, जिमनॅस्टिक आणि इतर खेळांवर वर ही काम करण्याची गरज आहे.  निवडणुकीत विपरीत घडले नाही तर २०३० पर्यंत हे लक्ष्य निश्चित पूर्ण होऊ शकते. 

शेवटी, मी ऑलम्पिक चॅम्पियन आहे.  मला ट्रायल देण्याची गरज नाही. मी सरकारला ब्लॅकमेल केले. एशियन गेम्सचे तिकीट पटकावले. पण गर्वाचे घर नेहमीच खाली होते.  हे मात्र त्याला कळले नाही.


Monday, October 2, 2023

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

 (काल्पनिक कथा)

वंचित समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकारी नौकरीत आरक्षण दिले गेले. आरक्षित वर्गाला पात्रता मार्क्स कमी असेल तरी सरकारी नौकरी मिळू शकते. वय मर्यादा ही वाढवून दिली आहे. पण या विशेष सुविधांचा विपरीत परिणाम ही होतो. अशाच एका तरुणाची कथा...

आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी  कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो. काही म्हंटले की अंगावर येतो. मी कारण विचारले.  त्याने पूर्ण कथा सांगितली

सुनीलचे वडील सरकारी नौकरीत होते. साहजिकच होते मुलांना सरकारी नौकरी मिळावी अशी त्यांची ईच्छा होती. सुनील कसा बसा बीए पास झाला. त्याने स्टनोग्राफी शिकली. त्याला सरकारी नौकरी मिळाली. त्याचा लहान भाऊ हुशार होता, तो प्रथम श्रेणीत तो एम.ए. झाला. त्याच वेळी त्याचे वडील ही हार्ट अटॅक ने गेले. आईला सरकारी पेन्शन मिळू लागली. त्याने ही सुनील सारखे सरकारी नौकरीसाठी परीक्षा देणे सुरू केले. आता सरकारी परीक्षा कोणत्याही पदासाठी असली प्राथमिक परीक्षेत अंग्रेजी सोबत गणित, सामान्य ज्ञान आणि रिजनींगचे पेपरस् असतात. अर्ध्या तासात ५० प्रश्न सोडविणे आर्ट्सचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी जरा जडच. या शिवाय आरक्षण असेल तरी एका पोस्ट साठी 25 ते 100 तरुण परीक्षा देणारे असतात. असेच चार पाच वर्ष निघून गेले घरात खटके उडू लागले. तुझे वय वाढत चालले आहे, आधी नौकरी शोध आणि नौकरी करता करता परीक्षा दे. जास्त वय झाल्यावर नौकरी मिळणे कठीण होईल. अनेकांना वयाच्या तिशी पर्यंत सरकारी नौकरी मिळाल्याची अनेक उदाहरणे त्याच्या बिरादरीत होती. शिवाय आईची शह ही त्याला होती. खरे म्हणाल तर एक दोन परीक्षा दिल्यानंतर आपली पात्रता आपल्याला कळून चुकते.  तरीही फक्त आशेच्या जोरावर तरुण मुले परीक्षा देत राहतात. किंवा घरच्यांना मूर्ख बनवित राहतात (हे सर्वांनाच लागू). पण सतत अपशायामुळे मानसिक तणाव वाढू लागतो. अखेर एकदाची त्याची तिशी ही उलटली. आता सरकारी नौकरीचा मार्ग खुंटला. 

आर्ट्स विषय घेऊन एम.ए. करणाऱ्याला चांगल्या पगाराची निजी क्षेत्रात नौकरी मिळणे कठीण आणि त्यातच तिशी उलटलेल्या माणसाला कोण नौकरी देणार. नौकरीच्या शोधात एक वर्ष निघून गेले. आता आईही टोमणे मारू लागली. एक दिवस त्याने त्याच्या घरा जवळच जनकपुरीत नवीन उघडलेल्या शोरूमच्या बाहेर  सेल्समनच्या नौकरीचे विज्ञापन बघितले. त्या दिवशी इंटरव्यू साठी दोनच उमेदवार आले होते. त्यातला एक बारावी पास 20 वर्षाचा तरुण मुलगा होता. मालकाने दोघांचा एकत्रच इंटरव्ह्यू घेतला. त्या मुलाला साधी अंग्रेजी ही येत नव्हती. सुनीलच्या भावाला वाटले किमान इथे तरी त्याला नौकरी मिळेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शोरुम मध्ये गेला तर पाहतो काय तिथे तो 20 वर्षाचा तरुण काम करत होता. त्याला राग आला, त्याने मालकाला जाब विचारला.  मालकाने त्याला उत्तर दिले, या मुलाला आम्ही सर्व कामे सांगू शकतो. पण तू जास्त शिक्षित असल्यामुळे तुला सांगता येणार नाही. बाकी अंग्रेजी भाषेचे विशेष काय, कामचलाऊ अंग्रेजी तो काही दिवसांत शिकून जाईल. सुनीलच्या भावाला वाटले असावे बहुतेक त्याला कधीच नौकरी मिळणार नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच दिवसापासून त्याने बोलणे सोडले. घरात शून्यात पहात बसून राहू लागला. 

ग्रुप सी आणि डी सरकारी नौकरीसाठी जिथे जास्तीसजास्त शैक्षणिक पात्रता स्नातक असते. तिथे वय मर्यादा २५-२६ पेक्षा जास्त नसली पाहिजे. कारण निजी क्षेत्रात अश्या पदांसाठी मोठ्या वयाच्या तरुणांना नौकरी मिळण्याची संभावना फारच कमी असते. परिणामाचा विचार न करता व्होट बँक राजनीती साठी सरकार नौकरीची वय मर्यादा सतत वाढवत जात आहे. परीक्षा देणाऱ्यांपैकी  फक्त एक -दोन टक्यांना सरकारी नौकरी मिळणार आणि बाकीचे वय परिक्षा देण्यातच निघून जाणार. त्यांचे काय होणार हा विचार कुणीच करत नाही. वय जास्ती झाल्याने शारीरिक त्यांच्यात मेहनतीचं काम करून धनार्जन करण्याची क्षमता ही राहत नाही. इतर कौशल्य  शिकणे ही तिशी नंतर अवघड जाते.

सुनीलचा भाऊ मानसिक उपचारानंतर ठीक झाला. मोठ्या भावाच्या प्रयत्नाने त्याला नौकरी ही मिळाली आणि नौकरी करणारी छोकरी ही. आज त्या दोघांना मिळून ३०-३५ हजार मिळतात. पाठीमागे खंबीर मोठा भाऊ असल्यामुळे साठा उत्तराची कहाणी सफल झाली. पण सर्वांचे असे नशीब नसते. अधिकांश तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. 

या विषयावर सहकर्मीं सोबत अनेकदा चर्चा केली असेल. सरकारी नोकरीत बिगर तकनीकी ग्रुप डी, सी आणि बी पदांसाठी वय मर्यादा २५ च्या वर नको या बाबतीत सर्वच एकमत होते. आयएएस, राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी ही, तकनीकी पद, सोडून वय मर्यादा ३० पेक्षा कमी पाहिजे. याशिवाय २५ नंतर पार्ट टाईम का असेना, रोजगार सुरू केला पाहिजे.  



Thursday, September 28, 2023

पीए नामा: किस्सा ए साक्षर अशिक्षिताचा

 (काल्पनिक किस्सा)

हा दहा बारा वर्षांपूर्वीचा किस्सा. आपल्या देशात  बी.टेक + एमबीए  केल्यावर ही जर केम्पस  सिलेक्शन झाले नाही, तर उत्तम पगाराची नौकरी मिळणे अवघड.  याशिवाय सप्लाय ही डिमांड पेक्षा भरपूर जास्त आहे. अधिकांश तरुणांना कमी पगारावर नौकरी करावी लागते. त्याने कमी पगाराची नौकरी करण्यापेक्षा जास्त पगाराच्या सरकारी नौकरीसाठी तैयारी सुरू केली आणि त्याला सरकारी नोकरी लागली. त्याच्या सेक्शन मध्ये साहजिकच तो सर्वात जास्त साक्षर होता. सेक्शन ऑफिसर ही त्याच्या पेक्षा कमी साक्षर होता. सेक्शन मधल्या समस्यांचे समाधान करत कार्य करणे/कर्मचाऱ्यांकडून करवून हे सेक्शन ऑफिसरचे दायित्व असते. पण आपले नंबर वाढविण्यासाठी अनेक कर्मचारी सरकारी  सरळ मोठ्या साहेबांकडे धाव घेतात. त्याने ही हेच केले, परिणाम? 

मी त्यावेळी एका आयएएस अधिकाराचा पीएस होतो. हा अधिकारी थोडा सनकी होता. प्रत्येक काम नियमानुसार करणारा. सकाळचे नऊ म्हणजे काम सुरू करण्याची वेळ. रोजचे काम रोज पूर्ण करा आणि घरी जा. सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे करणे, गप्पा मारणे इत्यादी त्याला चालत नव्हते. तीन वर्षांत त्याने एकदाही त्याचे व्यक्तिगत काम स्टाफला सांगितले नाही. वरून हरियाणवी असल्यामुळे, कुणाला काय बोलेल त्याचा नेम नाही.  फक्त एक जमेची बाजू होती कागदावर कुणाचाही रेकॉर्ड खराब केला नाही. साहेबांचा कार्याचा ल्लेख एका प्रसिद्ध मालिकेत ही झाला होता. 

त्या दिवशी सकाळी नऊ वाजता, साहेब दिवसभराच्या कामांचा आढावा घेत मला त्याबाबत निर्देश देत होते. त्याच वेळी हा चेंबर मध्ये आला आणि साहेबांना म्हणाला, सर आपल्या एडमिन मध्ये  एक एमटीएस (शिपाई) रिकामा आहे, त्याला अंग्रेजी लिहता- वाचता येते आणि टायपिंग ही येते. त्याची पोस्टिंग जर आमच्या सेक्शन मध्ये झाली तर  इतर कामांत त्याची मदत होईल. सध्या जो  शिपाई आहे, तो फक्त आठवी पास आहे. साहेबांनी मला विचारले, "पीएस साहेब, जरा सांगा सध्याचा  शिपाई जेंव्हा नोकरीला लागला, तेंव्हा शिपाईच्या नियुक्तीची पात्रता काय होती. मी म्हणालो, तेंव्हा रोजगार कार्यालयातून सरळ भर्ती होत होती. पात्रता आठवी पास होती. साहेबांनी विचारले, "शिपाईला अंग्रेजी किंवा हिंदी विषय शिकण्याची बाध्यता होती का"? मी म्हणालो नाही, त्याने मराठीत माध्यमातून आठवी पास केली असती, तरी तो शिपाई पदावर नियुक्तीसाठी पात्र होता. साहेबांनी त्याच्या कडे पाहिले, पण त्याला साहेबांचा इशारा त्याला कळला नाही. आपल्याच नादात तो पुढे म्हणाला, सर, एक अडाणी आणि गंवार शिपाई ज्याला अंग्रेजी येत नाही, पेक्षा एक ग्रेजुएट शिक्षित शिपाई निश्चित उत्तम काम करेल. सरकारी नौकरीत जुम्मा- जुम्मा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडून जुन्या अनुभवी शिपाईचा 'गंवार'  शब्दाने उल्लेख करणे साहेबांना आवडले नाही, ते रागातच त्याला म्हणाले, "अच्छा तुम्ही स्वतःला शिक्षित समजतात. किती शिकले आहात"? सर, मी बी.टेक एमबीए केले आहे. साहेबांनी गुगली फेकली, "म्हणजे, तुम्ही चार-पाचशे पुस्तके वाचून पाठ केली, परीक्षा दिली आणि युनिव्हर्सिटी ने तुमच्या डिग्रीवर शिक्का मारला". नाही सर, विषय समजावा लागतो त्या शिवाय परीक्षा पास करणे शक्य नाही. साहेब म्हणाले, अच्छा, त्या आठवी पास शिपाई ने अंग्रेजी शिकली नाही म्हणून त्याला ती भाषा येत नाही. तुम्हाला तुमच्या विषयांचे ज्ञान असते तर तुम्ही आज पुणे- बंगलौर मध्ये चांगल्या पगाराची नौकरी करत असता किंवा युएस मध्ये डॉलर छापत असता".  तुम्ही तर त्या शिपाई पेक्षा जास्त अडाणी आहात. आता इथून जा. वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून काम शिका. दुसऱ्यांची चुगली करणे सोडा. जास्ती त्रास होत असेल तर नौकरी सोडून जा. हां, मी बोलविल्या शिवाय इथे येऊ नका". तो गेल्यावर साहेब मला म्हणाले दोन शब्द वाचून लोक स्वत:ला शिक्षित समजतात आणि अहंकारी होतात. दुसऱ्यांना तुच्छ लेखतात. खरे अशिक्षित असेच लोक असतात. आमचा साक्षर अशिक्षित सेक्शन मध्ये गेला आणि रडू लागला. तावातावाने त्याने त्यागपत्र टंकले. सेक्शन ऑफिसरने त्या त्यागपत्राचे तुकडे करून केराच्या टोपलीत टाकले आणि त्याला चांगला समज  दिला. असो.

ज्ञानार्जन करून आपण साक्षर होऊ शकतो. अर्थशास्त्रात एमए पीएचडी करून आपण साक्षर अर्थशास्त्री होऊ शकतो. उत्तम  प्रबंध लिहून नोबेल पुरस्कार ही मिळवू शकतो.  पण शिक्षित अर्थशास्त्री नाही होऊ शकत.  ज्या व्यक्तीला अर्जित ज्ञानाचा उपयोग करता येतो, तोच शिक्षित. बाकी सर्व साक्षर अशिक्षित, हेच बहुधा साहेबांना म्हणायचे होते.





Monday, September 4, 2023

वार्तालाप (२९): बिना हिशोबाचा व्यापार


लिहणें न येंता व्यापार केला. 
कांही एक दिवस चालिला.
पुसतां सुरनीस भेटला.
तेव्हां खोटे.

समर्थ रामदास म्हणतात व्यवसाय करताना त्याचा लिखित हिशोब ठेवला नाही तर व्यवसाय फक्त काही दिवस चालेल. जेंव्हा सुरनीस (हिशोब तपासनीस) हिशोब तपासायला येईल तेंव्हा व्यवसाय तोट्यात चालला आहे, हे कळेल. ही ओवी वाचल्यावर आपल्याला हेही कळते त्याकाळी ही समर्थांना व्यवसायांची आर्थिक हिशोब लिखित ठेवण्याचे महत्त्वही माहीत होते.

सरकार असो किंवा मोठे व्यवसाय हिशोब तपासणी ठेवतातच, त्या शिवाय त्यांना गत्यंतर नाही. पगारदार आणि छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना ही स्वतः हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला सर्व जमा-खर्च लक्षात राहतो या मानसिकतेतून मुक्त होणे गरजेचे आहे.  एखाद्याने गल्ली-बोळ्यात जरी दुकान उघडले तरी त्याला किमान ५० ते  १०० वस्तू  विकायला ठेवावी लागतात. जर दुकानदार प्रत्येक वस्तूचा खरीद- विक्रीचा हिशोब ठेवणार नाही तर किती माल दुकानात भरायचा आहे हे  कळणार नाही. दुकानातील कर्मचारी/ ग्राहकांनी चोरी केली तरी कळणार नाही. काही वस्तू दुकानात एकत्र होत राहतील आणि त्यांची एक्सपायरी डेट निघून जाईल. हिशोब न ठेवण्याने खर्चावर नियंत्रण राहणार नाही. व्यवसायातील नफा-तोटा करणार नाही. घर खर्चासाठी किती पैसा दुकानातून घ्यायचा हेही कळणार नाही. गल्ली-बोळ्यात नवीन उघडलेली किमान अर्धी दुकाने वर्षाच्या आत बंद होतात त्याचे मुख्य कारण लिखित हिशोब न ठेवणे आहे. 

पगारी नोकरदारालाही खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो. त्यानुसार महिन्याचे बजेट बनवावे लागते. तो तसे करणार नाही तर महिना पूर्ण होण्या आधीच पगार संपून जाईल. दुकानदाराची उधारी करावी लागेल. मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागतील. मित्रांनी मना केल्यावर सावकार कडून व्याजावर पैसे उसने घ्यावे लागतील. क्रेडिट कार्डचा हिशोब चुकता करणे अशक्य होईल आणि पठाणी व्याज द्यावे लागेल. महिना दर महिना हे कर्ज वाढतच जाईल.  त्याला कर्जातून बाहेर पडणे शक्य होणार नाही आणि शेवटी त्याला घरदार ही विकावे लागेल.
 
आजच्या ऑनलाईन आणि क्रेडिट खरिदीच्या जमान्यात जमा-खर्चाचा लिखित हिशोब ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण तसे नाही केले तर दोन-चार महिन्यातच तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अटकणार, हे निश्चित. असो.


Tuesday, August 29, 2023

वार्तालाप (२८): घांसा मागे घांस घातला, पुढें कैसें


घांसा मागे घांस घातला.
अवकाश नाही चावायला.
अवघा बोकणा भरिला. 
पुढें  कैसें. 


समर्थ म्हणतात तोंडामध्ये एका मागून एक बोकणा वाघ मागे लागल्यासारखा आपण भरत राहिलो तर आपले काय होणार. समर्थांना आरोग्य शास्त्राचे उत्तम ज्ञान होते, हे या ओवी वरून सिद्ध होते. समर्थांनी या ओवीत शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जेवण कसे करावे हे सांगितले आहे. 

जेवणाचा मुख्य उद्देश्य शरीराला उत्तम पोषण मिळाले पाहिजे. आपले शरीर स्वस्थ्य असेल तरच आपण आपले सांसारिक आणि अध्यात्मिक उद्दिष्ट सिद्ध करू शकतो. म्हंटलेच आहे "शरीर मध्यम खलु धर्म साधनं". 

आपल्या परंपरागत वैद्यकीय शास्त्रात म्हंटले आहे, माणसाने तोंडातील अन्नाच्या घासाला किमान 32 वेळा दांतानी चर्वण केले पाहिजे. जेवढे जास्त आपण अन्नाला चावतो, अन्नाचे तेवढे लहान तुकडे होतात आणि तेवढी जास्त लार अन्नात मिसळते. पोटात अन्नाचे पचन उत्तमरीत्या होते. अन्नात असलेले सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात. याशिवाय दातांचा उत्तम व्यायाम ही होतो. दात ही मजबूत राहतात. पण आजच्या धगधगीच्या युगात अधिकांश लोक भूक शमविण्यासाठी भरभर जेवतात. अन्नाचे छोटे तुकडे होत नाही. आपल्या पचन संस्थेला हे जेवण पचविता येत नाही. बिना चावता लवकर लवकर अन्न गिळले तर पोटात अन्नाचे पचन होणार नाहीच आणि पोषक तत्व ही शरीराला मिळणार नाही. परिणाम आज देशातील अधिकांश जनता पोटाच्या विकारांनी  ग्रस्त आहे. 

आयुर्वेदाच्या मते पोट हे अधिकांश रोगांचे मूळ कारण आहे. अन्न न पचल्यामुळे पोटाची जळजळ होते, पोटात गॅस होते, पोटावर सूज येते, वजन वाढते, आंतड्यात अनेक रोग उत्पन्न होतात, नेहमी पोट दुखत राहते इत्यादी. माणूस चिडचिड  करू लागतो, कामात लक्ष लागत नाही. अधिकांश वात रोगांचा, सर्व प्रकारच्या दुखण्यांचा  पोटाशी थेट संबंध आहे. पोटाकडे सतत दुर्लक्ष केले तर  हृदयरोग, मधुमेह, केंसर इत्यादी होण्याचीही शक्यता वाढते. असो. 

ही ओवी वाचून आपण शांतपणे बसून अन्न चावून चावून जेवायला सुरुवात केली तरच ओवी वाचणे सार्थकी लागेल. असो. 




Sunday, August 27, 2023

दोन लघुकथा: चांदसा मुखडा आणि गगनचुंबी इमारत

शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.  चंद्रमाचा फोटो पाहून मुलाने कपाळावर हात मारला आणि तेंव्हापासून तो एकच गाणे  गुणगुणत राहतो. चाँद सी बायको हो मेरी ऐसा मैंने क्यों सोचा था.

आजोबांनी एका प्लॉटवर एक चंद्रमौळी झोपडी बांधली. आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली. नातू खुश झाला. आपण ही गगनचुंबी इमारत कशी बांधली सर्वांना सांगू लागला. पण  त्या इमारतीची प्रशंसा करत नातेवाईकांनी त्याला म्हंटले या गगनचुंबी इमारतीचे श्रेय  तुला नाही फक्त तुझ्या आजोबांना आहे. 

Sunday, August 20, 2023

वार्तालाप (२७): नेणतां वैरी जिंकती

नेणतां वैरी जिंकती. 
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.

समर्थ म्हणतात नेणतेपणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.  

या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. 

समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे. एका राजनेत्याला प्रजा सुखी आहे की नाही, प्रजेच्या गरजा किती, सरकारी अधिकारी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत आहेत की नाही, इत्यादी जाणण्याची गरज असते. ते जाणूनच राजा प्रजेच्या हितासाठी पाऊले उचलतो. या शिवाय राजाला त्याचे आंतरिक आणि बाह्य शत्रू किती, शत्रूंची शक्ती किती, त्यांचे मनसुबे काय, त्यांच्या हालचाली काय, इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. जो राजा शत्रूचे मनसुबे जाणण्याच्या प्रयत्नात कसूर करतो त्याचा पराभव होतो. त्याची सत्ता जाते आणि कधी- कधी जीव ही जातो. हे सर्व जाणण्यासाठी राजा गुप्तचर ठेवतो. जे त्याला सर्व माहिती पुरवितात. ज्या राजा जवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणा असते त्याचा पराभव होणे शक्य नाही. छत्रपति शिवाजी महाराजांपाशी सक्षम गुप्तहेर यंत्रणा होती. ती प्रत्येक मोहिमे पूर्वी शत्रूचे बल, त्याच्या हालचाली, त्याचे दुर्बळ पक्ष इत्यादींची अचूक माहिती पुरवायची. या माहिती आधारावर राजे रणनीती निर्धारित करत होतो. त्यामुळेच राजे अफझल खानाचा वध करू शकले, शाहिस्ता खानाचे बोटे कापू शकले आणि आग्र्याहून सकुशल स्वराज्यात परत येऊ शकले. 

दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी, चीन ने 1950 मध्ये तिब्बत गिळंकृत केला, तरी ही ते हिंदी चिनी भाई-भाईच्या दिवास्वप्नात मग्न राहिले. चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. परिणाम 1962 मध्ये आपला दारुण पराभव झाला. त्यांनी चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्न केला असता तर 1950 ते 1962 हा १२ वर्षांचा कालावधी चीन सोबत असलेल्या सीमेला सुरक्षित करण्यासाठी पर्यात होता. आपला पराजय झाला नसता.

राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी  नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. 
 

Tuesday, August 15, 2023

वार्तालाप (26): दुराशेच्या धार्मिक पोथी.


श्रवणी लोभ उपजेल तेथे 
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते 
तया अधोगती.

समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य  इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः.

आज समाजात प्रचलित धार्मिक कथेंचे दोन भाग असतात. एक वास्तविक कथा आणि दुसरी स्वार्थासाठी त्यात केलेली भेसळ. यासाठी कथा अधिकारी  व्यक्तीकडून श्रवण करण्याची गरज असते. नंतर कथा समजल्यावर कथेत सांगितलेल्या मार्गावर चालणे. पण हा मार्ग कठीण असतो. दुसरा सौपा मार्ग म्हणजे स्वार्थासाठी पोथीत केलेल्या भेसळ अनुसार कृती करणे अर्थात पोथीत सांगितले आहे, उपवास, दान दक्षिणा इत्यादी केल्याने सांसारिक फळे मिळतात. हा मंत्र जपा, परीक्षेत उत्तम गुण मिळतील. अभ्यास सोडून मंत्र जप केला तर परिणाम काय होईल हे सांगण्याची गरज नाही. मग आपण कथेला दोष देतो. आता साहजिक आहे, इच्छित फळे मिळाली नाही तर मनातील दुराशाही वाढणार आणि प्रपंचात असफलता ही मिळणार.

धार्मिक कथा आपल्याला काय सांगत आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे चुकीचा अर्थ लावून आपण फक्त विधी विधानात रमून जातो आणि इच्छित फळे नाही मिळाली तर मनात नैराश्य येते. आपण पोथीला दोष देतो. सत्यनारायणाच्या कथें पैकी एका कथेचे उदाहरण.  साधूवाणी हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे.  हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. त्याला कैद हि भोगावी लागली आणि व्यापारात मोठे नुकसान झाले. आजकाल ही अनैतिक रीतीने धन अर्जित करणाऱ्यांचे लाखो कोटी सरकारने जब्त करते. काहींना कारावास ही भोगावा लागतो. कथेच्या अखेर साधुवाणीला सत्य धर्माच्या मार्गावर चालून व्यापार करण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो. सत्यनारायण कथा श्रवण करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून सांसारिक कर्तव्य पूर्ण केले तर घरात सुख-समृद्धी आपसूक येते आणि आध्यात्माच्या मार्गावर वाटचाल ही सहज सुरू होते. यासाठीच नवीन संसार सुरू करताना सत्यनारायण कथा श्रवण करण्याची प्रथा आपल्या समाजात आहे.

शेवटी ज्या पोथ्या फक्त देवी चमत्काराने भरलेल्या आहेत,  श्रवण करणाऱ्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देत नाही. त्या श्रवण करणे आणि त्यानुसार वागल्याने फक्त दुराशाच नशिबी येणार.

Thursday, August 10, 2023

वार्तालाप (२४) : दुराशेची पोथी.

मोक्षेंविण फळश्रुती.
ते दुराशेची पोथी.
ऐकतां ऐकतां पुढती.
दुराशाचि वाढे.

श्री समर्थ म्हणतात मोक्षा शिवाय इतर फळे ज्या ग्रंथाची सांगितली आहे तो ग्रंथ म्हणजे दुराशा वाढविणारी पोथी होय. असे ग्रंथ ऐकता/वाचता दुराशाच वाढत जाते. 

अनेकदा वाचली तरी समर्थांची ही ओवी मला समजली नाही. अनेक दिवस विचार केल्यावर मनात विचार आले शब्द कानावर पडणे किंवा पुस्तक वाचणे हे श्रवण नव्हे. लाखो शब्द तर दररोज फेसबूक, व्हाट्सअप, ट्यूटर, दूरदर्शन, रेडियो, वर्तमान पत्र इत्यादि माध्यमांनी कानात पडत राहतात किंवा डोळ्यांनी त्यांचे वाचन करत राहतो. पण त्यातला एक टक्का ही आपल्या लक्षात राहत नाही. शाळेत शिक्षक म्हणायचे, एका कानाने ऐकले आणि दुसर्‍याने काढून टाकले. डोक्यात काहीच गेले नाही. परीक्षेच्या एक दिवस अगोदर घोकमपट्टी कण्याचा उद्देश्य परीक्षेच्या दिवशी उत्तर लक्षात राहावे, हाच होता. कानात पडलेले शब्द आपल्या स्मृतीत जाऊन सुरक्षित होतात, त्या शब्दांना आपण विसरत नाही, बहुतेक त्यालाच समर्थांनी श्रवण म्हणले आहे. त्याच स्मृतीच्या आधारावरच आपण कृती ही करतो.

प्रापंचिक ज्ञान प्राप्तीसाठी आपण अनेक पुस्तके वाचतो किंवा श्रवण करतो. वेगवेगळ्या ग्रंथांची वेगवेगळी फळे असतात आणि त्या श्रवण केलेल्या ग्रंथांच्या आधारावर आपण नौकरी, व्यापार किंवा उद्योग करतो. पण ह्या सर्व ग्रंथांचे श्रवण आपल्याला मोह मायेच्या जाळ्यात ही अटकवितात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दुराशा वाढते. पोथी श्रवण करून तो  हृदयरोग तज्ञ झाला. अल्प काळात हजारो ऑपरेशन केले. एक दिवस हृदयघाताने त्याची मृत्यू झाली. ड्रीम इलेव्हन किंवा ऑनलाईन लॉटरी खेळून कोट्यावधीचे बक्षीस मिळते हे श्रवण करून, कोट्यावती तरुण अब्जावधी रुपयांचा जुआ खेळतात. त्यातल्या निण्यानऊ टक्क्यांचा पदरी निराशा येते. त्यांचे आयुष्य  उद्ध्वस्त होतात. उद्योग आणि धंद्यात सफल झाला तरी ते यश टिकविण्यासाठी अनेक नैतिक आणि अनैतिक कार्य करावे लागतात. मनावर सतत दडपण असते. कोणावर विश्वास नाही. माणूस एकटा पडतो आणि सदैव चिंताग्रस्त राहतो. कधी कधी निराश होऊन आत्महत्या ही करतो. तात्पर्य फक्त प्रापंचिक ग्रंथ वाचत राहू तर त्याची फळे मिळतील पण दुराशाही वाढत राहील. प्रपंचात ही सुख आणि समाधान मिळणार नाही. आजच्या काळात वाढत चाललेल्या लाईफ स्टाईल रोगांचे, डिप्रेशन, आत्महत्येची प्रवृत्ती किंवा हिंसक आचरण इत्यादींचे मुख्य कारण शारीरिक आणि मानसिक  दुराशाच आहे.

मानव जीवनाचा उद्देश उत्तम प्रपंच करून परमार्थ साध्य करणे होय. श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी हाच उपदेश श्रवण करणाऱ्यांना दिला आहे. श्रीमद् भागवत गीता आणि श्री सार्थ दासबोध वाचल्यावर आपल्याला कळते आपण फक्त निमित्त आहोत कर्ता करविता हा परमेश्वर आहे. हे ग्रंथ वाचून आपली बुद्धी स्थिर होते. आयुष्यात जय-पराजय, लाभ-हानि आणि सुख- दुःख आले तरीही चित्त कधीही ढळत नाही. राजा हरिश्चंद्राची कथा वाचून आपल्याला बिकट  परिस्थितीत ही सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. दुराशा आपल्यापासून दूर राहते. प्रपंच आणि परमार्थ साधण्यात आपण सफल होतो. समर्थांनी म्हंटलेच आहे:

मी कर्ता ऐसे म्हणसी.
तेणे तू कष्टी होसी.
राम कर्ता ऐसे म्हणविसी.
तेणे पावसी येश कीर्ती प्रताप.

श्री सार्थ दासबोध श्रवण करण्याचा एक हेतु मनातील दुराशा दूर करणे ही आहे. 

Sunday, August 6, 2023

वार्तालाप (१९): दुर्जनांचा ही सन्मान करा.


दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे. 
सज्जना परीस आळवावे.  
महत्त्व देऊनी.

समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न  करत होते तर दुसरीकडे विजापूर आणि आदिलशाही स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अश्या बिकट परिस्थितीत दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंहला स्वराज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत पाठविले. मिर्झा राजा जयसिंग मोठी फौज घेऊन दक्षिणेत आले. एवढ्या विशाल फौजेशी युद्ध करणे म्हणजे स्वराज्याचा विनाश. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांनी दासबोधात सांगितलेला मार्ग निवडलामहाराजांनी स्वराज्याचा हितासाठी दुर्जन मुघलांशी तह केला आणि स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांच्या हवाली केले. एका दुर्जन शत्रूला प्रसन्न केले आणि त्याच्या वापर दुसऱ्या शत्रू विरुद्ध केला. मुगल फौजा विजापूर विरुद्ध युद्ध करण्यात गुंतल्या. स्वराज्याचे दोन्ही विरोधी दुर्बळ झाले. त्याचा फायदा स्वराज्याला झाला. अखेर मराठी साम्राज्य अटक ते कटक पर्यंत पसरले.

वर्तमान काळात ही भाजपने मेहबूबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली. हजारो काश्मिरी हिंदूंना काश्मीर मधून पलायन करावे लागले होते, त्यात तिच्या पक्षाचा ही हात होता, असे अधिकांश भारतीयांना वाटत होते. तरीही भाजप ने तिच्या सारख्या दुर्जन शत्रूला मुख्यमंत्री पद दिले. भाजपचे हे कृत्य अधिकांश भारतीयांना पटले नाही. पण भाजपने त्याच सत्तेचा फायदा घेऊन काश्मीर मधून धारा 370 हटवली. आपले उद्दिष्ट साध्य केले. 

राजकारणात दुर्जन शत्रूचा उपयोग ही जे स्वतःच्या हितासाठी करू शकतात त्यांनाच खरे राजकारण कळले असते.


Friday, August 4, 2023

स्मशानातील लग्नाची पूर्ण कथा

तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले. 

त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. समाजात लग्न संबंधी पसरलेल्या परंपरेंना तडा देण्यासाठी त्याने गुरुजी ऐवजी एका अघोरीला लग्न लावून देण्याचे कार्य सोपविले. अघोरीने त्याचा लग्नाचा मुहूर्त रात्री दोन वाजताचा ठरविला. आघोरीच्या मते त्यावेळी स्मशानातील सर्व भूत-प्रेत जागृत होऊन या लग्नात उपस्थित राहतील. ब्रेकिंग न्यूज देणारे मराठी पत्रकार ही तिथे पोहचले. आघोर लक्षण  मुहूर्तावर लग्न पार पडले. लग्नात अग्नी ऐवजी जळत्या चितेच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या गेल्या. लग्नात उपस्थित सर्व अंधश्रद्धा विरोधकांनी चितेवर भाजलेल्या चिकन आणि मटनच्या सोबत देशी दारूवर ताव मारला.  त्यांच्या लग्नाची बातमी मिडियात प्रसिद्ध झाली. काही ब्रेकिंग पत्रकारांचे म्हणणे होते त्या लग्नात हडळीनीं हडळाष्टक म्हंटले होते. काहींच्या दावा होता, कवट्या वेताळ आणि तात्त्या विंचू ने प्रत्यक्ष येऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद ही दिला होता. असो.

लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कळले त्याची बायको त्याच्यापेक्षा ही एक पाऊल पुढे होती. ती त्याला म्हणाली दिवसा जागणे आणि रात्री झोपणे ही पण एक अंधश्रद्धा आहे. मी रात्री जागणार आणि दिवसा झोपणार आहे. त्याला वाटले, आपण हा विचार आधी का नाही केला. अंधश्रद्धेच्या पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय सर्वांसमोर मांडला पाहिजे. दिवसा जागे राहाण्याच्या अंधश्रद्धेचा विरोध हा केलाच पाहिजे.  पण बायकोची दुसरी अट त्याला खटकली. बायको म्हणाली आपण हनिमून गोवा ऐवजी स्मशानात साजरा करू. लोक हनिमून रात्री साजरा करतात. आपण शहरातील प्रसिद्ध मोक्षधाम स्मशानात दिवसाच्या वेळी हनिमून साजरा करू. तो तिला म्हणाला मला तुझे विचार पटतात. पण दिवसाच्या वेळी स्मशानात हनिमून साजरा करणे शक्य नाही. एक तर तिथे लोकांची वर्दळ असते आणि समजा एकांत मिळाला तरी तिथले कर्मचारी तिथे असे काही करू देणार नाही. पकडून पोलिसात देतील. त्यावर ती म्हणाली, तुम्ही जर खरे अंधश्रद्धा विरोधक असाल तर तुम्हाला माझी ही अट मान्य करावीच लागेल त्याशिवाय मी तुम्हाला माझ्या अंगाला हातही लावून देणार नाही. आता मात्र त्याची पंचाईत झाली. काय करावे त्याला सुचेनासे झाले. आधीच पस्तीशी उलटून गेलेली होती.  तब्बल दहा लाख रुपये तिच्या बापाला दिल्यानंतर ती लग्नाला राजी झाली होती. लग्नाचा सर्व खर्चही त्यानेच उचलला होता. सर्व जमापूंजी त्यात खर्च झाली होती. 

आता तुमच्या मनात प्रश्न येईल पुढे काय झाले असेल.  अखेर दोन चार दिवस विचार करून त्याने हात जोडून तिला विनंती केली, काही दुसरा उपाय आहे का. ती म्हणाली हो आहे. तुला इतरांसारखे अंधश्रद्ध बनावे लागेल. आपण पुन्हा देव ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करू. खर्चाची चिंता करू नको. तू आधीच दहा लाख माझ्या बापाला दिले आहेत. त्यातच सर्व होईल. लग्नानंतर आपण आधी घराण्याच्या कुलदेवीचे दर्शन घेऊ आणि मग हनिमूनला गोव्याला जाऊ. काम वासना ही निसर्गाने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हक्काची बायको मिळाल्यानंतर स्वाभाविकच होते त्याची कामवासना ही भयंकर भडकलेली होती. बायकोची अट मान्य करण्याशिवाय त्याच्यापाशी दुसरा मार्ग नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी आणि दहा लाख हुंडा देऊन मिळालेली बायको गमावणे तेही फक्त एका विचारधारेसाठी, कदापि उचित नाही, एवढे कळण्या लायक बुध्दी ही त्याच्यापाशी होती. बायकोच्या इच्छेला मान देत त्याने देव ब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा लग्न केले. अंधश्रद्धा विरोधकांनी त्याच्या कृत्याची निंदा केली आणि त्याला संस्थेतून बाहेर काढले. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. बायकोला खुश ठेवण्यासाठी तो रोज सकाळी उठून स्नान संध्या आणि देवाची पूजा करतो. अभक्ष्य खाणे आणि पिणे त्याने सोडून दिले आहे. एक मात्र खरं, रात्री बायकोच्या हाताने केशर मिश्रित सुगंधीत दूध प्राशन करण्याचा आनंद तो घेतो. .....

Monday, July 31, 2023

वार्तालाप (१८): जाणण्याचे विज्ञान

जाणते  लोक ते शहाणे. 
नेणते वेडे दैन्यवाणे.
विज्ञान तेही जाणपणे.  
कळो आले.

समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते  लोकांच्या नशिबी  फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते.

समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रपंच उत्तम करण्यासाठी जाणण्याचे विज्ञान ही समजण्याची गरज आहे. उदाहरण- एका शेतकऱ्याला उत्तम शेती करायची आहे. फक्त बी पेरून, खत-पाणी देऊन उत्तम शेती होत नाही. शेत जमिनीची पोत, पाण्याचे व्यवस्थापन, त्या भागातील हवामान, हवामान खात्याचे अंदाज,  शेतीचे नवीन-नवीन तंत्र, कृषी विशेषज्ञांचे मार्गदर्शन, दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, विभिन्न ऋतूत शेतमालला मिळणारा बाजार भाव,  प्राकृतिक विपत्ती- अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, आग, काळ-वेळ, सरकारची आयात- निर्यात नीती, एमआरपी, प्रोत्साहन अनुदान, इत्यादी सर्व जाणून  शेती  करणे म्हणजे शेतीचे विज्ञान जाणणे. अनुभवाने हे विज्ञान सिद्ध होते. असा शेतकरी आत्महत्या ही करत नाही, दुःखी आणि दरिद्री राहत नाही. दुसरे शेतकरी त्याच्या पासून प्रेरणा घेतात.  जे लोक जाणण्याचे विज्ञान समजतात ते उद्योग-धंदे, व्यापार सर्व ठिकाणी  सफल होतात.

आत्ताचेच एक उदाहरण- मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटो शंभर रुपये किलोच्या भावाने विकले. असो. 


Saturday, July 29, 2023

पीएनामा : (2) झाडाची फांदी आणि एसीआर

 

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस  इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से  सांगण्यासाठी काही टोपण नावे  मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) 

(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) 

त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची. एक पेक्षा जास्त प्रमोशन पीए लोकांच्या भाग्यात नव्हती. फक्त एक मार्ग होता विभागीय परीक्षा पास करणे. वर रिक्त जागा अत्यंत कमी असल्याने, प्रतिस्पर्धा भयंकर होती. २० टक्के मार्क असलेल्या एसीआरचे (कर्मचाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल) भरी महत्व होते. जर गेल्या पाच वर्षांची एसीआर सर्वोत्कृष्ट (outstanding) नसेल तर लिखित परीक्षा पास होऊन ही प्रमोशनची संभावना शून्य होती. त्यावेळी एसीआर ही गोपनीय होती. काही अधिकारी उत्तम एसीआर लिहली असेल तर पीएला दाखवायचे. उत्तम एसीआर मिळविण्यासाठी पीए अधिकार्‍यांना खुश करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ-दहा वाजे पर्यन्त कपाळावर आठी न येऊ देता काम करायचे. अर्थातच मी ही त्याला अपवाद नव्हतो.

त्यावेळी माझी पोस्टिंग एक वरिष्ठ महिला अधिकारीच्या दरबारात झाली होती. तिथे पीएस आणि एक पीए आधीच होता. याशिवाय क्लार्क, एमटीएस इत्यादि. त्याकाळी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकान्श अधिकारी पीए लोकांच्या तिन्ही वर्षाच्या वार्षिक एसीआर बहुतेक शेवटच्या वर्षी लिहायचे. (मोदीजी सत्तेत आल्यानंतर हे सर्व बदलले आहे. आता प्रत्येक वर्षाची एसीआर त्याच वर्षी एका निश्चित अवधीत ऑनलाईन लिहावी लागते). माझी पोस्टिंग सप्टेंबर महिन्यात तिच्या दरबारात झाली तेंव्हा तिचे फक्त सहा महीने केंद्रीय प्रतिनियुक्तीचे उरले होते. पण पीएस आणि दूसरा पीए तीन वर्षांपासून तिच्या अधीन कार्यरत होते.     

दिल्लीत डिसेंबर महिन्यात थंडी भरपूर असते. हिवाळ्यात ऊन शेकायला सर्वांनाच आवडते. साहजिक आहे तिच्या म्हातार्‍या आईला ही ऊन्हात बसायला आवडत असेलच. एक दिवस सकाळी येताच तिने पीएस साहेबांना तिच्या केबिन मध्ये बोलविले. तिने आदेश दिला, झाडांच्या फांदींमुळे घरात ऊन येत नाही आहे. त्या कापण्याचा बंदोबस्त करा. एनडीएमसी भागात पावसाळयानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात झाडांच्या फांद्या छाटण्याचे सरकारी नियमांनुसार ठेके दिले जातात, त्या वेळी एनडीएमसीला फक्त विनंती केली असती तरी काम झाले असते. पण आता डिसेंबर सुरू झालेला होता. पीएस पन्नासी उलटलेला अनुभवी होता. अश्या समस्या त्याने पूर्वीही हाताळलेल्या होत्या. 'ठीक आहे मॅडम, उद्या फांद्या कापण्याचा बंदोबस्त करतो'. ती थोड्या नाराजगीने म्हणाली, कसे करणार??? पीएस-  झाडांच्या फांद्या छाटणार्‍यांकडून हे काम करवून घेईल. दोन-एकशे रुपये खर्च येईल. पीएसचे उत्तर ऐकून ती भडकली. एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करणाऱ्यांना  गैरकानूनी काम करताना लाज वाटली पाहिजे.  

आता पीएस साहेब काय करणार. एनडीएमसीला पत्र लिहले. दिल्लीत मोठ्या-मोठ्या अधिकार्‍यांनाही पीडब्ल्यूडी, एनडीएमसी आणि स्थानीय प्रशासन घास टाकत नाही (भाव देत नाही). त्यांनी पीएसच्या पत्राला आणि फोनला दाद दिली नाही. वसंत ऋतुत पक्षी घरटे बांधतात त्यामुळे आता फांद्या छाटणे आता शक्य नाही. झाडाच्या फांद्या कापणे अत्यंत गरजेचे असेल तर वन विभागाची अनुमति घ्यावी लागेल, असे उत्तर आले. कागद वन विभागाकडे गेला. लालफिताशाहीत कागद फिरत राहिला. अनेक खेटे आम्ही तिघांनी घातले असेल. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आले. फेब्रुवारी महिन्यात झाडाच्या फांद्या छाटण्याची अनुमति मिळाली. पीएस साहेब अनुमतिचा कागद घेऊन मॅडमच्या केबिन मध्ये गेले. मॅडमने कागद वाचला आणि त्याचे दोन तुकडे करून  केराच्या टोपलीत टाकले. ती रागाने पीएस वर ओरडली. "आता फांद्या छाटण्याची गरज आहे का?" पुढच्या हिवाळ्यात मी इथे राहणार नाही. तुम्ही तीन-तीन नालायक मिळून एक साधे काम करू शकले नाही. मार्च अखेर तिने आम्हा तिघांच्या एसीआर लिहल्या. आम्हाला दाखविल्या नाही. त्या पीएची सलग तीन वर्षांची सीआर तिने लिहली होती. 

त्यानंतर  त्या पीएची पोस्टिंग एका वरिष्ठ अधिकार्‍यासोबत झाली. पीएच्या नौकरीत त्याचे पाच वर्ष पूर्ण झाल्याने तो पीएसच्या विभागीय परीक्षेसाठी पात्र झाला होता. त्याचा अधिकारी त्याला समोर बसवून त्याची उत्कृष्ट एसीआर लिहायचा. तरीही सतत तीन वर्ष लिखित आणि स्किल परीक्षा पास करून ही त्याचे प्रमोशन झाले नाही. अखेर चौथ्या वर्षी परीक्षा पास झाल्यानंतर त्याचे प्रमोशन झाले. अर्थात चार वर्ष 365 दिवस न चुकता त्याला स्टेनोग्राफीचा अभ्यास करावा लागला (100ची स्पीड टिकवून ठेवण्यासाठी). 

अखेर एसीआरचे नियम बदलले. एसीआरची गोपनीयता संपली. एसीआर पाहण्याचा आणि त्यावर  टिप्पणी करण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना मिळाला. एक दिवस त्या पीएचा  (आता तो पीएस होता) फोन आला, पटाईत, तुझी तिने लिहलेली एसीआर एकदा तुझ्या कार्यालयाच्या एडमिन मध्ये जाऊन बघ. मी म्हंटले, तुझी एसीआर कशी लिहली होती. तिच्या नावाचा उद्धार करत तिला दोन-चार शिव्या देत तो म्हणाला, तिन्ही वर्षांच्या एसीआरवर  तिने फक्त "गुड" असा शेरा दिला होता. एक पीएसाठी 'गुड' ही निकृष्ट एसीआर असते.  मी ही एडमिन मध्ये जाऊन तपासले, 39 वर्षांच्या नौकरीत मला मिळालेली एकमेव निकृष्ट 'गुड' शेरा असलेली एसीआर होती. मला ती जुनी एसीआर दाखविणार्‍या बाबूने विचारले, पटाईत, सर, काय भांडण वैगरे केले होते का तिच्याशी. मी उतरलो, नाही रे, तिच्या बंगल्यातील झाडाची फांदी तोडू शकलो नाही. त्याला काहीच कळले नाही, तो फक्त माझ्या कडे पहात राहिला. 


Friday, July 28, 2023

विडंबनकार आणि कवी

 विडंबनकाराच्या घरी

लक्ष्मी भरते पाणी.

कवी संमेलनात मिळते

बिदागी रक्कम मोठी.


कबीर.दास बेचारा

शेला विणतो सदा.

एक वेळ जेवणाचा

हिशोब करतो सदा.

Wednesday, July 26, 2023

पौलोमी शची: नवरा माझ्या मुठीत


एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको त्याला ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून  जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात. तिच्या आदेशानुसारच सर्वांना जगावे लागते. जी तुझी अवस्था तीच माझीहि आहे. पुरुषांना वैदिक काळापासूनच बायकोच्या मुठीत राहण्याचा श्राप मिळालेला आहे. एवढेच काय, वज्र धारण करणारा देवांचा राजा इंद्रहि त्याच्या बायकोच्या मुठीत होता. माझा सहकर्मी उद्गारला, काहीही बोलू नको, पूर्वी कोण पुरुष बायकोच्या मुठीत राहत होता. काहि पुरावा आहे का?

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५९ ( सपत्नी नाशनसूक्त)
(ऋषिका - शची पौलोमी : देवता - आत्मस्तुती)l

उत् असौ सूर्यः अगात् उत् अयं मामकः भगः  
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः 

अर्थ: हा पहा सूर्य जसा उदय पावला, तसे माझे दैवहि उघडले. मी हे जाणूनच आपल्या पतीला पूर्णपणे वश केले. मी त्याची स्त्री आहे; तरी पण त्याला अगदी माझ्या मुठीत ठेवणारी अशी आहे.

देवांचा राजा महापराक्रमी वज्र  धारण करणारा इंद्र. असुरांचे दुर्ग उद्ध्वस्त करणारा इंद्र. वृत्रासुराचा वध करणारा इंद्र. इंद्र कृपेसाठी ऋषीमुनी त्याची स्तुती करायचे. त्याच्या विजयाची गाथा गायचे.  त्याकाळच्या परंपरेनुसार देवराज इंद्राच्या अनेक पत्नी होत्या.  इंद्राची एक पत्नी शचीहि होती. इंद्र पत्नी शचीचा त्या काळी एवढा दरारा होताकि तिने स्वत:च्या स्तुतीसाठी सवतीचा नाश सूक्त रचले आणि त्या सूक्ताला ऋग्वेदात स्थानहि मिळाले. 

स्वत:ची आत्मस्तुती करताना ती म्हणते. मीच घराण्याची शोभा आहे. मीच मस्तक आहे. मी कठोर स्वभावाची आहे. मी विजय शालिनी आहे. मी सर्व सवतींचा वर चष्मा नाहीसा केला आहे. माझे पुत्र शत्रूचा फडशा उडवितात. माझी पुत्रीहि चक्रवर्ती  आहे. माझे पती ओजस्वी व सर्वश्रेष्ठ आहेत. जो भक्त त्यांना हविभाग अर्पित करतो त्यांचे इच्छित  पूर्ण करतात. तेच मीहि केले आहे अर्थात मीही भक्तांकडून हवि भाग स्वीकार करते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते.  त्यामुळे मी सवत रहित झाले आहे.  माझ्या प्रत्येक कृत्याचे अनुमोदन माझे पती करतात. (करणे भाग आहे). मी माझ्या पतीला पूर्णपणे वशमधे केले आहे. तो माझ्या मुठीत आहे. जसे मी माझ्या पतीवर अधिकार गाजवते तसेच मी इतरांवरहि गाजवते.

आजच्या काळातही बायकोच्या अधीन राहणारे नवरे सुखी असतात. बायकांच्या मुठी सारखी सुरक्षित जागा जगात दुसरी नाही. बायकांच्या अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या नावर्यांवर सरकारी पाहुणचार घेण्याची नौबत येते.  माझ्या त्या सहकर्मीने पूर्वापारपासून चालत आलेले कठोर सांसारिक सत्य जाणले. नंतर त्याने कधीही त्याच्या  बायकोची तक्रार केली नाही.

माझे म्हणाल तर मी माझ्या गृहराज्याचे प्रधानमंत्री पद सौ.ला अर्पित केले आहे आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले आहे. माझ्या नावावर सौ. सर्व निर्णय घेते आणि मी तिच्या सर्व निर्णयाचे राजी खुशी समर्थन करतो. मी सुखी आहे कारण मी बायकोच्या मुठीत आहे.

Thursday, July 20, 2023

वार्तालाप(१७): भिक्षा ही कामधेनु

समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले. "जय जय रघुवीर समर्थ" आरोळी ऐकल्याबरोबर सामान्य जनता ही मूठभर भिक्षा आनंदाने त्यांच्या भिक्षा पात्रात घालायची. महाराष्ट्राच्या जनतेत  शौर्य आणि स्वाभिमान निर्मित करण्यात समर्थ सफल झाले आणि त्याची स्वराज्याला बहुमोल मदत झाली. हा इतिहास आहे. 

समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी वाढतात, लोकांचे मनोगत समजते आणि त्यांच्या समस्या कळतात. भिक्षेच्या माध्यमातून समाज कल्याणाची मोठी-मोठी कार्य ही सहज सिद्ध होतात. आजच्या काळातली काही उदाहरणे -स्वामी दयानंद सरस्वती गुरुकुल आणि डीएवी शाळांची  श्रृंखला सामान्य जनते कडून मिळालेल्या भिक्षेच्या बळावरच निर्मिती केली.  संघाच्या प्रचारकांनी ही भिक्षेच्या माध्यमातून समाज सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सहज सिद्ध केले आणि आजही करत आहे. कोटीहून जास्त लोकांनी शंभर ते हजार रुपयांची भिक्षा स्वामी रामदेवांच्या  झोळीत टाकली आणि  कामधेनु रुपी त्या भिक्षेच्या प्रतापाने स्वामी रामदेव यांनी पतंजली योगपीठ, अनेक गुरुकुल, पतंजली विश्व विद्यालय, आयुर्वेदात रिसर्च करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा, आयुर्वेद फार्मेसी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी फूड पार्क, इत्यादी इत्यादी. या शिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्डची स्थापनाही केली.  

स्पष्ट आहे, निस्वार्थ भावनेने समाज सेवेसाठी मागितलेली भिक्षा ही कामधेनु समान आहे. 



Monday, July 17, 2023

वार्तालाप (16) भगवंताचा आशीर्वाद घेणारे वैज्ञानिक असतात का?

 

समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे

इसरोच्या वैज्ञानिकांनी तिरुपति येथे जाऊन भगवंताचे आशीर्वाद चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी घेतले. ते वैज्ञानिक होते, तरीही त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले ही बातमी वाचल्यावर अनेक अतिविद्वान लोकांच्या पोटात दुखू लागले। स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या अतिविद्वानांनी सोशल मीडियावर देशाचा मान सम्मान वाढविणार्‍या वैज्ञानिकांची खिल्ली उडविन्याचा दारुण प्रयास केला. "सत्यासाठी शिरले असत्याच्या गाभार्‍यात" अशाही टिप्पणी झाल्या. काहींच्या मते हिंदू देवतांची पूजा करणारे वैज्ञानिक नसतात ते फक्त तंत्रज्ञ असतात. हे सर्व वाचून हे लोक मानसिक विकृत असावे किंवा हिंदू धर्म विषयी त्यांच्या मनात अत्यंत द्वेष भरलेला असावा. तरीही वैज्ञानिक कोण हे या लेखात उदाहरण सहित स्पष्ट केले आहे. 

दोन दगड़ एकमेकवर आपटले की अग्नि प्रगट होते हे जाणने म्हणजे ज्ञान.  विशिष्ट पद्धतिने और विशिष्ट वेगाने आघात केल्याने दगडातून अग्नि प्रगट होतो हे जाणने  म्हणजे  शास्त्र/ तंत्रजे लोक या शास्त्रावर प्राविण्य मिळवून अग्नीच्या मदतीने विविध आविष्कार करतात ते शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ

आता मनात प्रश्न येणे स्वाभाविक आहे, विज्ञान म्हणजे काय आणि वैज्ञानिक कुणाला म्हणायचे?  विज्ञान शब्दातच अर्थ दडलेला आहे.  विज्ञान म्हणजे विवेक पूर्ण ज्ञान।अग्नीचा उपयोग घरे जाळण्यासाठी होतोआणि अन्न शिजविण्यासाठीही. सौप्या भाषेत ज्या संशोधानांनी समाजाचे आणि मानवतेचे कल्याण होते ते संशोधन करणार्‍यांना वैज्ञानिक म्हणणे उचितचंद्रयान मोहिमेच्या उद्देश्य समाज आणि मानवतेचे कल्याण असल्याने या मोहिमेशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ हे वैज्ञानिक आहे. असो. 

ज्ञात असलेल्या तंत्राचे सर्व गणित अचूक असतांनाही नासाच्या असो, किंवा इसरोच्या अनेक मोहिमी अयशस्वी झालेल्या आहेत. क्रिकेट मध्ये तर हा अनुभव प्रत्येक मॅच मध्ये येतोच. कठीण झेल घेणार्‍या खेळाडू सौपा झेल ही सोडतो. फूलटॉस चेंडूवर ही खेळाडू बाद होतात. स्वत:च्या मेहनती सोबत भगवंतावर विश्वास असेल तर अपयशानंतर ही माणूस निराश होत नाही. पुन्हा जोमाने मेहनत करू लागतो. 

आपल्या वैज्ञानिकांचा भगवंतवर आणि स्वत:च्या संशोधनावर विश्वास आहे म्हणून त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले. 

Saturday, July 8, 2023

छंद बायकोचा

(काल्पनिक कथा) 

मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो.  फावल्या वेळात: 
बायकोने छंद जोपासला. 
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला 
नोटांचा. 

तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे  उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा  लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर. पूर्वीच कथा लिहिली असती तर  मलाहि घरी हिरा सापडला असता. पण आता फार उशीर झाला आहे. माझ्या बाबतीत नेहमी हे असेच होते. पण 'अब पछताए होत क्या, जब चिड़ियाँ चुग गई खेत".

तरीही सौ.ला हिम्मत करून विचारले, अग! एखादा छंद जोपासला पाहिजे होता तू. तुझा वेळ मस्त गेला असता. सौ.ने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात विचारले, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सुचले. बायकोलाहि काही छंद वैगरे असतात. काय विचार चालला आहे तुमच्या मनात. मी उतरलो, सहज विचारले. सौ. "सहSSज!, तुम्ही एक नंबरचे मतलबी आणि स्वार्थी आहात, उगीच काही विचारणार नाही. बाकी छंद जोपासायला पैका लागतो, एक दमडीहि कधी ठेवली होती माझ्या हातात, कंजूस-मक्खीजूस. शेवटी वैतागून म्हणालो, अग ए, भवानी, चूक झाली माझी, तुला हा प्रश्न विचारला. 

पण आता माझे ऐकावेच लागेल. मला किनई लाॅटरीचे तिकीट घ्यायला लई आवडायचे. पण तुमची पैश्यांवर उल्लू सारखी नजर. तरीहि कधी-कधी मौका मिळाल्यावर तुमच्या खिश्यातून पैशे काढून तिकीट विकत घ्यायची. पण एखाद दुसरे लाॅटरीचे तिकीट घेऊन काही नंबर लागत नाही. त्यासाठी मोठी इन्वेस्टमेंट लागते. तुम्ही जर तुमचा पगार माझ्या हातात दिला असता तर लाॅटरी खेळून मी केंव्हाच कोट्याधीश झाले असते. आपले दु:ख-दारिद्र्य केंव्हाच संपले असते. पण माझे नशिबच फुटके, तुमच्या पदरी पडली. 

च्यायला! माझी विकेटच उडाली. डोळ्यांसमोर चित्रपट सुरु झाला बायकोचा छंद जोपासण्यासाठी, महिन्याच्या पहिल्या दिवशी सौ.च्या हातात पगार आणून ठेवला, तिने तो लाॅटरीच्या तिकीटांंवर उडविला. हळू हळू बँकेतील बचत अदृश झाली. मग बनियाने उधार देणे बंद केले. नातेवाईक आणि मित्रांनी दरवाजे बंद केले. फी न भरल्याने मुलांच्या शाळा सुटल्या. घरातील एक-एक करून सर्व वस्तू अदृश्य झाल्या. घर गेले, नौकरी गेली. शेवटी एका पुला खाली संसार थाटवा लागला. जो दे उसका भी भला, जो न दे उसका भी भला, दे दाता के नाम ... भिकेवर गुजराण सुरु झाली.  

थंडीचे दिवस होते, रात्रीची वेळ, दानमध्ये मिळालेली कम्बल पांघरून कसाबसा दिल्लीच्या थंडीपासून स्वताला  वाचण्याचा प्रयत्न करत होतो. एका लॉटरीवाल्याची आवाज ऐकू आली. 'न्यू यिअर स्पेशल' १० करोड का ईनाम तिकीट केवल १० रुपया. सौ.चा आवाज ऐकू आला, भैया  मुझे लगता है, कल मेरी ही लाटरी लगेगी. एक टिकिट मुझे भी चाहिये पर मेरे पास पैसा नहीं  है. यह कम्बल चलेगा क्या म्हणत, माझ्या अंगावरचे कम्बल ओढू लागली. 

अग! ए, काय करतेस, हेच एक शेवटचे  उरले आहे. थंडीत मारणार आहे का मला?  सौ. जोरात ओरडली, सकाळचे सात वाजले आहे, ऑफिसला जायचे आहे कि नाही? रात्री उशिरा पर्यंत काही-बाही वाचता, मग झोपेत बडबडतात. मीच आहे, म्हणून सहन करते हे सर्व. चहा तैयार आहे, नरड्यात ओता आणि ऑफिससाठी तैयार व्हा.  हुश्श्!  वाचलो. बरेच झाले, बायकोला कुठलाही छंद नाही. अन्यथा हिर्याच्या जागी कोळसा सापडला असता.

Thursday, July 6, 2023

लग्न झाले नी अंकल झालो


गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या  होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते.  त्यादिवशी: 

गुलाबाची कळी: काल न, संध्याकाळी रिक्ष्यात बसून बाजारात जात होते, तेवढ्यात एक बाइकस्वार जवळून गेला  १७-१८ वर्षाचा पोरगा असेल.  मला पाहत त्याने डोळा मारला व फ्लायिंग किसहि केले. हा किस्सा सांगताना  तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत होता.

गोबीचे फूल: (मनातल्यामनात, कपाळावर कुंकू लावत नाही आणि गळ्यातहि मंगळसूत्र घालत नाही. स्वत:ला जुही चावला समजते. मी काही मूर्ख नाही, मलाहि कळते, तुझ्या बोलण्यामागचा हेतू. बघ कशी तुझी बोलती बंद करते): त्या मुलाची काय चूक, तू अजूनहि १६ वर्षाच्या तरुणी सारखी दिसते. मुंबईला गेली असती तर जुही एवजी तुलाच सिनेमात काम मिळाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रयत्न करून बघ. इथे उगाच दिवस भर यस सर/यस मॅडम करत वेळ घालविते. ते जाऊ दे, पण एक खटकते, तू एवढी सुंदर पण तुझ्या मिस्टरांचे पोट सुटत चालले आहे. डोक्यावरचे काही केसहि पांढरे झाले आहेत. असेच सुरु राहिले तर एक दोन वर्षांत ते तुझे अंकल दिसू लागतील. बघ जरा त्यांच्या कडे. 

तिचे बोलणे ऐकून मला हसू आले. गोबीच्या फुलाला मनातल्यामनात दाद दिली. काय शालजोडी मारली आहे, गुलाबाच्या कळीच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले. मला हसताना पाहून गुलाबाच्या कळीला राग आला. ती माझ्यावर भडकली, काहीना बायकांच्या गोष्टी टवकारून ऐकण्याची भारी हौस असते. मी ही बेशरमपणे म्हणालो, देवाने कान दिले आहे, त्याचा सदुपयोग करणे हा काही गुन्हा नाही. असो. 

गोबीचे फूल:  लक्ष देऊ नको त्याच्या कडे. एक नंबरचा बेशरम आहे. बाकी काही ही म्हण पटाईत अजूनही हेंडसम दिसतो. 

लग्नाला दोन एक  वर्ष झाले असले तरीहि माझे काही पोट निघाले नव्हते व केसहि काळे होते. अजूनही मी हंड्सम आणि स्मार्ट  दिसत होतो. तरुण पोऱ्या किमान आपल्याला 'अंकल' म्हणणार नाही,  प्रयत्न केला तर आजहि त्या आपल्याला  'घास'  टाकतील, असा गैरसमज होता. 

त्याच दिवशी ऑफिसहून थोडा लवकर निघालो. सूर्यास्ताच्या आधी घराच्या गल्लीत शिरलो. घराच्या दरवाजाच्या बाहेर सौ. शेजारच्या २२-२३ वर्षाच्या तरुणी सोबत बोलत होती. सौ.ची पाठ माझ्याकडे होती. पण त्या तरुणीचे लक्ष माझ्याकडे गेले, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाली, "दीदी, अंकल आ रहे हैं". च्यायला सौ. दीदी आणि मी अंकल, कुठे तरी जळत आहे असे वाटले. घराजवळ पोहचताच, ती तरुणी मधुर आवाजात म्हणाली, 'अंकलजी नमस्ते'. आतामात्र तळपयाची आग मस्तकात गेली. मी भडकलेले डोके शांत ठेवीत तिला म्हणालो, "जिजाजी को अंकल कहोगी तो दीदी को भी आंटी कहना पड़ेगा". नकळत मी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. मी घरात शिरलो, सोफ्यावर जाऊन बसलो. सौ. ही पाठोपाठ आत आली. नेहमीप्रमाणे तिने प्यायला पाणी आणून दिले. पाणी पिणे झाल्यावर सौ.कडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. ती रागातच म्हणाली, आजकाल तुमची जीभ जास्तस चरचर करू लागली आहे. तोंडावर ताबा ठेवा, तुमचे लग्न झालेले आहे, किमान हे तरी लक्षात असू द्या.  "मी दीदी असली तरी, शेजार-पाजारच्या तरुणी तुमच्या साळ्या नाहीत. तुम्ही त्यांचे अंकल आहात. 
तिच्या बोलण्यातील वैधानिक चेतावनी स्पष्ट होती तिच्या  बहिणीशी जास्त गूटरगूँ केलेली तिला आवडत नाही. 

तात्पर्य एवढेच, लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात.



Monday, July 3, 2023

वार्तालाप (15): गुरूचा शोध

आज गुरुपौर्णिमा आहे आज आपण श्रद्धा सुमन आपल्या गुरूंच्या चरणी  वाहतो. आपले प्रथम गुरू आई वडील जे आपल्याला संस्कार देतात. दुसरे गुरु आपले शिक्षक जे आपल्याला ज्ञान प्रदान करतात. 

आई-वडील आणि शिक्षक निवडणे आपल्या हातात नसते पण संसार उत्तम करण्यासाठी आणि परमार्थ साधण्यासाठी गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. विद्यमान आणि पूर्वकाळात झालेल्या महान संत, महात्मांपासून आपण प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतो, ते आपले आध्यात्मिक गुरु. 

आता गुरु कुणाला करावे, हा प्रश्न आपल्या समोर येतो. समर्थ रामदास म्हणतात, "बोलण्यासारीखें  चालणें l स्वयें करून बोलणेंl तयाची वचनें प्रमाणेl मानिती जनीl" बोलणे आणि कर्म ज्याचे एक सारखे त्याला गुरू मानावे. एक उदाहरण स्वामी रामदेव यांना लोक योग गुरू म्हणतात. कारण ते स्वतः सकाळी तीन तास नियमित योग ही करतात आणि करूवून घेतात. जगाच्या कुठल्याही टोकाला असेले तरीही भारतीय वेळे प्रमाणे सकाळी पाच वाजता त्यांची योग कक्षा सुरू होते. त्यात कधीच बाधा येत नाही. असेच गुरु आपल्याला शोधले पाहिजे. दुसरा प्रश्न गुरूकडून आपण काय शिकायचे जेणे करून संसार सुरळीत होईल. भागवतात "कृष्ण वंदे जगद्गुरु" असे म्हटले आहे. श्रीकृष्णाला जगतगुरु म्हणतात कारण त्यांनी निस्वार्थ भावनेने अधर्माच्या विनाशासाठी आयुष्यभर कार्य केले. पृथ्वीवर सत्य आणि धर्माची स्थापना केली. असे करताना श्रीकृष्णाचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता फक्त समाजाचे कल्याण हाच त्यांचा आयुष्याचा उद्देश्य होता. त्यांनी चंगाई चमत्कार केले नाही, जादू - टोणा केला नाही, कोणाची घोडी शोधून दिली नाही, पाण्यात दिवे लावले नाही, आणि कुणावर कृपाही बरसवली नाही. श्रीकृष्णाने संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला सत्य आणि धर्माचा मार्गावर चालत निष्काम कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्याला असेच गुरु शोधले  पाहिजे. 

शेवटी आपण एक लक्षात ठेवले पाहिजे गुरू काही व्यक्तिगत स्वार्थ सिद्ध करण्याचे साधन नाही. कुणी तसे आश्वासन देत असेल तर निश्चित तो गुरू करण्यायोग्य नाही. 

माझे म्हणाल तर मी श्रीकृष्णाला, समर्थ रामदास, स्वामी दयानंद आणि त्यांच्या परंपरेला स्वीकार करून समाजाच्या आर्थिक आणि आध्यात्मिक  उन्नतीचे कार्य करतात त्यांना गुरू समान मनातो आणि प्रेरणा घेतो.