Friday, September 28, 2018

वात्रटिका (लघु एकांकी): राधिकेचा फोन


गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची  घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो 

गुरुनाथ: हं, बोल राधिका 

राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे.

गुरुनाथ: का! म्हणून?

राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही. सुखानी नांदू आपण सर्व एकत्र घरात. 

गुरुनाथ (कोर्टाचा निर्णय ऐकून, हिचे डोके तर फिरले नाही ना. काहीबाही बडबडते आहे - तिचे बोलणे मध्ये तोडत):  राधिका, तू थकलेली वाटते, ऐक माझे, घरी ये मग आपण निवांत बोलू.

राधिका: अहो, तसे काही नाही, मी तर आज एकदम जोश मध्ये आहे. फोन करण्याचे मुख्य कारण म्हणजे, आज रात्री फाईव स्टार हॉटेल मध्ये आपल्या बिजिनेस पार्टनर सोबत रात्र भर मजा करणार.  गुड नाईट, माय डियर हसबंड. मजा कर शयाना सोबत.सकाळी भेटूच.

गुरुनाथ भोवळ येऊन पडतो....

Thursday, September 27, 2018

प्रदूषण: यक्ष प्रश्न



यक्ष,  देणार मी  आज 
सर्व प्रश्नांची उत्तरे.

जिंवंत कराल का 
माझ्या बंधूंना?
पाजणार का आम्हाला 
अमृततुल्य पाणी?
 
हा! हा! हा!
गुंजले  नभी
यक्षचे भयंकर हास्य  


युधिष्ठिर,
हे एकमेव जलस्त्रोत 
विद्यमान आहे पृथ्वीवर 
पाणी आहे ह्या  सरोवराचे
हलाहल पेक्षा विषाक्त. 

पर्याय आहे दोनच आहे 
प्राशन करून जल 
शीघ्र मिळेल तुला स्वर्ग 

किंवा 

  तडफडत वाळवंटात 
गमवावे लागेल प्राण.
 
कींकर्तव्यमूढ़ युधिष्ठिरने 
केला थोडा विचार 

आणि 

प्राशन करून जल  
  गेला तो स्वर्गाला.

अश्यारितीने पृथ्वीवर 
मानवाचा अंत झाला. 

Tuesday, September 25, 2018

चिमणीची नवीन गोष्ट


एक होते आटपाट नगर. रहात होती तिथे, एक म्हातारी आजीबाई. घरात होते आंगण आणि आंगणात होता एक पिंजरा. पिंजर्यात होती एक चिमुकली चिमणी. रोज खायला मिळायचे तिला गोड-धोड अन्न. पिंजऱ्याचा दरवाजा होता बाहेरून बंद.

पिंजरा शेवटी पिंजराच असतो. एक दिवस हिम्मत करून, चिमणी म्हणाली  "आजीबाई आजी बाई, पिंजर्याचे दार उघड. गुदमरतो इथे श्वास हा माझा. आकाशी उडण्याच्या ध्यास लागला आहे जीवा. वाटते नेहमीच दूर कुणी चिमणा राजा वाट माझी पाहतो". आजीबाई उतरली, "माझी वेडी चिमणी, भास आहे हा मनाचा, पिंजर्याच्या बाहेरचे जग आहे वैरी. कावळे-गिधाडे करतील घात. मला आहे तुझी काळजी. म्हणून ठेवले तुला पिंजर्यात बंद". चिमुकली चिमणी हिरमुसली. पण करणार तरी काय. पिंजर्याचे दार होते बाहेरून बंद. 

एक काळा कावळा, चोरून ऐकत होता त्यांचे बोलणे. अवसेच्या राती डाव त्याने साधला. पिंजर्याचे दार कावळ्याने ठोठावले, "चिवताई चिवताई, मी कावळा दादा, सोडवायला तुला आलो." चिवताई म्हणाली, "मी नाही ओळखत तुला, आजीबाई म्हणते, कावळे असतात दुष्ट, करतील तुझा घात." कावळा म्हणाला, "भोळी माझी चिमणी, आजीबाईला ठेवायचे आहे तुला पिंजर्यात बंद सदा. मी भोळा कावळा, चिमण्यांचा आहे दादा, पिंजर्याचे दार उघडून, तुला मी सोडवणार. आजच्या राती घरट्यात माझ्या रहा, उद्या पहाटे, भेट तुझ्या राजाला. मला माहित आहे, त्याचे सुंदर घरटे".  भोळी चिमणी कावळ्याच्या बातांत फसली.  पिंजर्याच्या बाहेर ती पडली. कावळ्या सोबत त्याच्या घरट्यात पोहचली. 

कावळी होती उपाशी. चिमणीला पाहताच ती झाली खुश. चिमणीवर ती तुटून पडली, पंज्याने चिमणीचा गळा आवळला. चिमणीचा जीव घुटमळू लागला. "कावळा दादा, कावळा दादा, हे काय करतो, मी आहे तुझी छोटी बहिण, घरी आलेली पाहुणी. कावळीच्या पंज्यातून मला तू सोडव."  "हा! हा! हा!, मूर्ख भोळी चिमणी, कावळी माझी उपाशी, तू साजूक चिमणी, आहे आमचा नाश्ता." म्हणत कावळ्याने आपली चोंच नरडीत तिच्या खुपसली. चिमणीची किंकाळी आसमंती घुमली. आजीबाईची झोप तक्षणी तुटली. दिवा घेऊन ती बाहेर आली. पहाते, पिंजर्याचे दार होते उघडे, चिमणी नव्हती त्यात. अवसेच्या राती घात झाला. बेचारी चिमणीचा जीव नाहक गेला. आजीबाईने डोक्यावर हात मारला.

दुसर्या दिवशी आजीबाई बाजारात गेली. पारध्याकडून एक चिमणी विकत घेतली. पिंजर्यात ठेवण्यापूर्वी पंख तिचे छाटले. आजीबाई म्हणाली, "चिवताई चिवताई रागावू नको, तुझी भल्यासाठी छाटले तुझे पंख. बाहेरच्या जगात फिरतात दुष्ट सारे कावळे, त्यासाठी केला हा उपद्व्याप. गोड-धोड खा आणि पिंजर्यात सुखी रहा."  त्या दिवसापासून चिमणी पिंजर्यात आयुष्य कंठत आहे.


Monday, September 24, 2018

वात्रटिका: पेपरलेस रिकॉर्ड रूम

 
पूर्वी सरकारी रिकार्ड रूम मध्ये उंदीर फाईल कुरतडत होते आणि वाळवी त्यांवर अंत्यक्रिया करत होती आणि आज:


कागदांच्या जागी 
हार्डडिस्क खा 
काळानुसार 
भोजन बदला.


वाळवीची जागा
वायरसने घेतली 
पेपरलेस रिकॉर्डची 
  अंत्यक्रिया केली 


Thursday, September 20, 2018

क्षणिका: आसमंती आस



 
माहित आहे 
अपूर्णत्वेचा श्राप. 

तरीही 

 तुटलेल्या पंखांना  
आसमंती आस.





Tuesday, September 18, 2018

चिवताई आणि कावळ्याची गोष्ट : मराठी भाषेत (???)


(भाषा एका नदी सारखी आहे, सोबतीचे नदी, नाले समाहित करून सतत पुढे जाणारी- दिल्लीतली एक आई आपल्या बाळाला गोष्ट सांगत आहे)

एक होती चिव. तिचे काय नाव होते, स्पैरो. एक होता काऊ त्याचे नाव होते क्रो. एकदा काय झाले. काऊचा बंगलो पाऊसात डेमज झाला. काऊ चिवताईच्या घरी गेला आणि दार वाजवले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर".  

स्पैरो म्हणाली, "थांब मी आपल्या बाळाची मालीशी-मालीशी करते", प्लीज वेट. 

थोड्या वेळानी क्रो पुन्हा दार वाजविले, "स्पैरो स्पैरो ओपन द डोर". 

"थांब मी आपल्या बाळाची न्हाई न्हाई करते", प्लीज वेट. 

थोड्यावेळ आणिक वाट पाहून क्रो दार वाजवतो "स्पैरो स्पैरो ओपन द डोर".  स्पैरो डोर उघडते. क्रो म्हणतो, चिवताई माझा बंगलो पाऊसात वाहून गेला. मला घरात घेशील का?  

स्पैरो म्हणाली ठीक आहे, आजच्या नाईट इथेच रहा, उद्या दुसरे घर बघ.  

"थेंकस् थेंकस् स्पैरो", क्रो म्हणाला. 

क्रो होता गंदा बच्चा, त्यानी रात्री बिस्तरावर पोट्टी केली. 

बाळ - मग चिवताईला गुस्सा आला असेल

हो न! चिवताईला भयंकर गुस्सा आला, तिने क्रोचे कान पकडले आणि म्हणाली डर्टी क्रो गेट आउट. 

बाळ- ममा, मी तर पॉट मध्ये पोट्टी करते, अच्छी बच्ची आहे न मी.

माझी सोनी, किती शहाणी, स्मार्ट-स्मार्ट बेबी, म्हणत आईने बाळाचा प्रेमाने गालगुच्चा घेतला. 

गोष्टीत अनेक भाषा आणि बोलीचे शब्द आले असले तरी हि गोष्ट मराठी भाषेत आहे, हे नक्कीच. भाषा अशीच बदलणार, कुणी कितीही थांबविण्याचा प्रयत्न केला तरी. 

Monday, September 10, 2018

दुग्ध अक्रांतीचे जनक उर्फ गौवंशा विरुद्ध षड्यंत्र



दिल्लीतील शहरीकृत एका गावात गायी-म्हशी बांधलेल्या होत्या. गायींची तोंडे जाळीदार कपड्याने बांधलेली होती. बहुतेक बाहेरचे कुणी काही खाऊ घालू नये म्हणून. एका भिंतीवर दुधाचा भाव लिहिलेला होता देशी गायींचे दूध ८०रु लिटर आणि म्हशीचे ६०रु लिटर. अचानक मला जुने दिवस आठवले. ७०-७२चा काळ, डीएमएसच्या दुधाच्या  डीपो वर गायीचे दुध ८०-८५ पैसे लिटर आणि म्हशीचे ६०-६५ पैसे लिटर मिळायचे. गायीच्या दुधाचा भाव बाजारात हि म्हशीच्या दुधापेक्षा जास्त होता. हरियाणात एक म्हण आहे, हुशार मुलगा पाहिजे असेल तर त्याला गायीचे दूध पाजा. पेहलवान पाहिजे असेल तर  म्हशीचे  दूध पाजा'.

अचानक देशात दुग्ध अक्रांतीचे जनक अवतरले. अदुग्ध क्रांतीची सुरुवात झाली. देशी गायी जास्ती दूध देत नाही. म्हशीच्या दुधाचे उत्पादन वाढविले पाहिजे. म्हशीच्या दुधात सिंग्धता जास्त असते, म्हशी पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी दुधाचा भाव गुणवत्तेनुसार नव्हे तर फक्त सिंग्धताच्या आधारावर ठरविण्याचा निर्णय घेतला. म्हशीचा दूध उत्पादन वाढविण्यासाठी म्हशीच्या दुधाचा भाव सिंग्धतानुसार ठेवला असता तर त्यात काहीच गैर नव्हते. पण गौपालकांचा काय दोष कि हा नियम गायींच्या दुधावर हि लावला. गायींच्या दुधात सिंग्धता कमी, त्यामुळे गायीच्या दुधाचा भाव अर्धा झाला. म्हशी जास्त दूध देतात, शेतकर्यांनी म्हशी पाळल्या पाहिजे. म्हशीच्या दुधाचा भाव वाढला तर लोक जास्त म्हशी पाळतील. देशात दुधाचे उत्पादन वाढेल. दुधाची कमतरता दूर होईल. पण या साठी गायीच्या दुधाचा भाव कमी करण्याचे कारण काय? याचे उत्तर तथाकथित दुग्ध अक्रांतीच्या जनकांपाशी नव्हते.  देशात गायींची संख्या त्यावेळी म्हशीन्पेक्षा दुप्पट होती. मग गायीच्या दुधाचा भाव किमान स्थिर तरी ठेवता येत होता. देशातील गायींचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न केले असते. आज हि सर्वच सरकारी व सहकारी संस्था गायीच्या दुधाला कमी भाव देतात.

देशात दुधासोबत गौमांस उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय गायींच्या जातींचा संपूर्ण नाश करणे हा दुग्ध अक्रांतीचा मुख्य उद्देश्य होता. त्यासाठी  कमी गुणवत्तेच्या पण अधिक दूध देणाऱ्या विदेशी गायी/ गायींचे वीर्य मागवून, संकर जाती तैयार करण्याचे कार्य सुरु झाले. प्रचार सुरु झाला, विदेशी गायी जास्त दूध देतात. या गायींच्या दुधामध्ये सिंग्धता जास्ती आहे. या गायी पाळल्या तर गौपालकांची आय वाढेल इत्यादी. पण या विदेशी गायी भारतीय वातावरणाशी ताळमेळ बसवू शकेल का? हा विचार करण्याची कुणाला हि गरज भासली नाही. भारतातील मौसमी वातावरण आणि युरोपच्या वातावरणात फरक आहे. हेच संकर गायींच्या बाबतीत घडले. जिथे कमी दूध देणाऱ्या भारतीय गायी दहा वासरू आणि ३००० दिवस दूध देतात तिथे विदेशी संकर गायी चार ते सहा वासरू आणि १५०० ते २००० दिवस दूध. शिवाय त्यांच्या रखरखाव वर खर्च हि जास्त.  विदेशी गायींच्या वासुरूंना कुबड नसल्याने, फक्त मांस उत्पादनासाठी उपयुक्त ठरले.  

फक्त दूध विकून गायी पाळण्याचा खर्च निघाला नाही पाहिजे, या साठी दुधाची ग्रेडिंग करून फुल क्रीम, फुलक्रीम, टोंन्ड व डबल टोंन्ड या आधारावर दूध विकणे सुरु झाले.  केवळ दूधच नव्हे, दही, पनीर व तूप हि गायीच्या नावानी मिळणे बंद झाले. गौपालकांना नुकसान होऊ लागले. विशेष करून देशी गायी पाळणार्यांना जास्त. कारण जनकांचा उद्देश्य, दुग्ध उत्पादन नव्हे तर गौमांस उत्पादन वाढविणे होता. भारतातून गौमांस निर्यात भयंकर गतीने वाढला. ज सर्वात जास्त गौमांस निर्यात करणारा देश म्हणजे जिथे गायीची पूजा करतात, तो आपला भारत देश. भारतात जिथे जनसंख्या जास्त, तिथे शेत जमिनीचा वापर गौमांससाठी चारा उत्पन्न करण्यासाठी होऊ लागला.

शंभर एक वर्षांपूर्वी पोर्तीगीज मोठ्या प्रमाणात भारतीय गायी आणि वळू दक्षिण अमेरिकेत घेऊन गेले. कारण तिथले वातावरण युरोपियन गायींच्या अनकूल नव्हते. आज उरुग्वे, ब्राजील इत्यादी देशांत भारतीय गायी ५० लिटर पर्यंत दूध देतात. भारतातहिउपलब्ध विभिन्न जातींच्या उत्तम वळूंचे संगोपन करून, गौपालाकांना त्यांचे वीर्य पुरवून, गायींची दुग्ध उत्पादन क्षमता सहज वाढविता आली असती. सरकारचा पैसा हि कमी खर्च झाला असता. पण असे केल्या गेले नाही. तात्पर्य एवढेच, ज्यांना आपण दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतो, ते भारतात दुग्ध अभावाचे जनक होते. भारतीय गौपालकांचे  हितचिंतक नव्हतेच.

आज हि देशात गायींची संख्या म्हशींच्या संख्येत दीडपट आहे. त्यात देशी गायी किमान ८ कोटींच्या वर आहेत. देशाचे सौभाग्यच म्हणा स्वामी रामदेव नावाचा संन्यासी भारतात अवतरला. योगासोबत भारतीय गायींच्या दुधाचे गुणगान हि त्याने सुरु केले. परिणाम, बिना सरकारी मदत आज गौपालकांनी स्वत: भारतीय गायीना पाळणे सुरु केले आहे. त्याचाच परिणाम आज तब्बल ४५ वर्षांनतर गायीच्या दुधाचा दर दिल्लीत म्हशीपेक्षा जास्त दिसला. ग्राहक पुन्हा गायीचे दुध मागू लागले आहे. अनेक दुग्ध सहकारी संस्था हि आता गायींचे दूध विकू लागल्या आहेत. 

देशी गायींचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी अनुसंधान देशात सुरु झाले आहे. खर्या अर्थाने एका नवीन दुग्ध क्रांतीची सुरुवात झाली आहे. जिथे गायीचे दूध, तूप, पनीर व गौमूत्र आणि शेणाला हि चांगला भाव मिळणार आहे. गेल्या वर्षीच पतंजली ने देशातील अनेक गौशाळांंना आत्मनिर्भर होण्यासाठी पत्येकी ५० लाख ते काही कोटींची मदत केली. पुढील महिन्यात गायीच्या दुध, लोणी, पनीर, छाछ हि पतंजलि बाजारात आणणार आहे. अनेक भारतीय दुग्ध उत्पादक त्यांचे अनुसरण करतीलच. खर्या अर्थाने भारतात दुग्ध क्रांतीला सुरुवात होईल. भारतीय गायींचे व गौपालकांचे अच्छे दिन सुरु होतील. दुग्ध अक्रांतीच्या जनकाचे षडयंत्र विफल यात काही शंका नाही.


Friday, September 7, 2018

मातीचे प्रेम मातीशीच -समलिंगी संबंध


"ऋतू पावसाळी, ऋतू माती आणि बियाण्याच्या प्रेमाची" गुणगुणत एक बियाणे मातीपाशी पोहचले. "चल, दूरहट, पावसाळी किडा."  काय झाले तुला, ओळखले नाही, मी तुझा अनादी काळापासूनचा प्रेमी.  "कधी होता, आता नाही, आता मी शेजारच्या शेतातील मातीशी प्रेम करते". हे चुकीचे आहे, मातीने बियाण्यावर प्रेम केले पाहिजे, अन्यथा सृष्टीचक्र भंगेल. वसंत येणार नाही. फुलांविना फुलपाखरू मरेल. गवत विना चरणारे जीव मरतील. जंगलाचा राजा शेरखानचा जीव हि जाईल. दाण्या-दाण्यासाठी भांडत मनुष्य हि कालवश होईल. "मी ठेका घेतला आहे, का या सर्वांचा, एवढेच प्रेम उतू जात असेल तर दुसर्या बियाण्यावर प्रेम कर".  बियाणे मातीत रुजले नाही आणि धरती ओसाड पडली. असे आपण पाहिले आहे का? मातीने-मातीशी प्रेम करण्याचा अधिकार आपण मान्य करतो का? नाही.  कारण हे सृष्टीचक्राच्या विरुद्ध आहे.

मातीत बियाणे रुजत नसेल तर मातीचा डॉक्टर मातीला तपासतो. रोग निदान करतो. मातीची उर्वरा शक्ती वाढविण्याचे  औषध देतो.  युरिया, नत्र, जिंक,  रासायनिक खत, शेण व सेंद्रिय खते इत्यादींचा वापर करून मातीची पोत सुधारल्या जाते. सारांश मातीत बियाणे रुजले पाहिजे याची आपण काळजी घेतो.

मनष्य तर सर्वात बुद्धिमान आणि जीवित प्राणी आहे. पुरुषाने-पुरुषाची शारीरिक संबंध स्थापित करणे असो वा  एका स्त्रीने दुसर्या स्त्रीशी विवाह करणे, हे सर्व सृष्टी नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे सृष्टीचक्र भंगते. समलिंगी आकर्षण, एक मानसिक आजार आहे, विकृती आहे. विकृती नेहमीच समाजात वेगाने पसरते.  याचेच उदाहरण, उपचार करण्याची गोष्टच सोडा, अनेक तथाकथित बुद्धिमान लोक या  रोगाला, रोग मानायला तैयार नाही. उलट अश्या संबंधाना प्रोत्साहन देतात. समलिंगी लोकांना वार्यावर सोडून देतात. पण काही वर्षांनी विकृत प्रेमाचे भूत उतरल्यावर त्यांच्या हाती फक्त निराशा येते. त्यांचे जगणे दूभर होते. 

या संबंधांना, मानसिक आजार मानून, योग-ध्यान, उचित औषध-उपचार, इत्यादी करून हा आजार  वेळीच दूर केला पाहिजे. हेच समाजाच्या हिताचे आहे.


Wednesday, September 5, 2018

काही हायकू : साक्ष

 
न्यायाच्या दारी 
साक्ष खात्रीची 
*खानदानी.
  
साक्ष फिरली 
न्याय मिळाला 
अपराध्याला.

साक्ष ऐकते 
सजा सुनाविते  
देवता आंधळी.

* साक्ष देण्याचा  धंदा करणारे.

Tuesday, September 4, 2018

कुचर्चा: युरेशियन ब्राह्मण-आणि इतिहासकार


आमचे सौभाग्य, एका  महान इतिहासकारासोबत चर्चा करायला मिळाली. काय ते  मानवी आनुवांशिकतेचा इतिहास ......

इतिहासकार: पटाईत, इतिहास म्हणजे  पुराणातील वांगी नव्हे,  मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन असते. काही डोक्यात घुसले का? युरेशिअन भटुर्क्या?

मी: म्हंजे मी युरेशिअन, तुमि कोण?

इतिहासकार: आम्ही मूळ निवासी, तुम्ही गायी मेंढ्या हाकत साडे तीन हजार वर्षांपूर्वी इथे आलात.

मी: म्हंजे, दुग्धक्रांती साडेतीन हजार वर्षांपूर्वी  झाली, मी उगाच कुरियन साहेबांना श्रेय देत होतो. 

इतिहासकार: दुध क्रांतीचा आणि इतिहासाचा काय संबंध? विषयांतर करू नको भटुर्क्याSSS

मी:  तेच तर मी म्हणतो, ते भटुकडे आय मीन माझे पूर्वज, युरोपियन गायींना हाकत इथे आले असतील ना. हे खरे असते तर तेंव्हाच दुग्ध क्रांती घडली असती. आता बघा न पुराण कथेत काय लिवले आहे, "गायीला नव्हता पान्हा, गोकुळात उपाशी कान्हा आणि  दुधावरून बेचार्या  कंसाला नाहक जीव गमवावा लागला रे S S S".

इतिहासकार: अरे, गाढवा, इतिहास म्हणजे गायी म्हशी नव्हे. तुझ्या फालतू किस्से-कहाण्या नव्हे. इतिहास म्हणजे, मानवी आनुवांशिकतेचे अध्ययन. तुमची ती भटुकडी संस्कृत भाषा युरोपिंन परिवारातील आहे या देशातील नाही. 

मी: च्यायला, आमच्या संस्कृतच्या शास्त्री सरांना खोटारडा म्हंटलेले, अस्मादिकांना मुळीच खपणार नाही.  शास्त्री सर कधीच खोटे बोलत नाही.

इतिहासकार: मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नको, मानवी इतिहासाच्या चर्चेत, हे शास्त्री सर, कुठून उपटून काढले.

मी: तेच म्हणतो, आमच्या पहाडगंजच्या शाळेत संस्कृत शिकवायचे,  शास्त्री सर. मला आठवीत संस्कृत मध्ये ९० टक्के मार्क असतानाही मी ९वीत हिंदी विषय घेतला. जाम रागावले शास्त्री सर. मला म्हणाले, हिंदीत तर टाॅपरला हि ७५ टक्के मिळत नाही. संस्कृत मध्ये  मराठी / मद्रासी   मुलांना सुद्धा ७५ टक्के सहज मिळतात (अस्मादिकांची लायकी). हिंदी भाषा तर ज्यांना संस्कृत बोलणे आणि शिकणे जमत नाही त्यांच्यासाठी.  (पहाडगंजच्या मराठी शाळेत ९० टक्के विध्यार्थी पाकिस्तान मधून आलेले शरणार्थी - मुलतानी, पंजाबी आणि सिंधी इत्यादी, उरलेले १० टक्के मराठी आणि मद्रासी इत्यादी).  प्रथम श्रेणीत पास व्हायचे असेल तर संस्कृत घे. मी शास्त्री सरांचे ऐकले नाही आणि हिंदी फक्त ५५ टक्के मार्क्स मिळाले. शास्त्री सरांची भविष्यवाणी खरी ठरली. 

इतिहासकार: तुझ्या या टुकार कहाणीचा इतिहासाची काय संबंध, 

मी: कसा नाही, बघा मद्रासी माणूस कसा खणखणीत संस्कृत म्हणतो आणि पंजाबी माणसाला संस्कृत बोलणे कठीण जाते. मग युरेशिअन लोकांना संस्कृत कशी जमनार, काही विचार केला का यावर. मानवी  आनुवांशिकतेचा इतिहास...

इतिहासकार: तुला म्हणायचे तरी काय आहे,

मी:  हेच, बामन असो किंवा द्रविड सर्वच इथले मूळ निवासी.  संस्कृत हि मूळ निवासी लोकांची आदी भाषा. बाकी आर्य जाती, युरेशिअन सर्व थोतांड आहे. फूट डालो राज करो नीती राबविण्यासाठी. 

इतिहासकार: मी मूर्ख आहे. गाढव आहे. तुझ्या सारख्या बिनडोक माणसासोबत चर्चा करतो आहे. 

मी:  ओळख पटली ना. 

पुढे चर्चा होणे शक्य नव्हते.

(राखीगढ येथे सापडलेल्या रथस्वाराचे डीएनए दक्षिण भारतीय वनवासी जमातीशी मिळतात. कुमारी कंदम १५००० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेले. गेल्या २० हजार वर्षांत समुद्र किमान २० मीटर वर आला आहे, मानवाला स्थानांतरीत व्हावे लागले.  

आपल्या साहित्याच्या आधारावर आपण आपला इतिहास शोधला पाहिजे न कि विदेशी गुलामीचा चष्मा लावलेल्या तथाकथित इतिहासकारांच्या नजरेतून. )