Thursday, December 31, 2020

मूक साक्षीदार

 

निर्जन जंगलातील एक देवालय. देवतेची पूजा सुरु होती. देवालयाच्या गाभार्यात पुजारी आणि दोन लोक उपस्थित होते. पूजा झाल्यावर पुजारी म्हणाला, ही जागृत देवता आहे, जो कोणी सच्च्या मनानी अपराधांची क्षमा मागतो, त्याला देवता क्षमा करते. पहिल्या व्यक्तीने देवते समोर हात जोडून प्रार्थना केली, भगवंत,आपण जाणता मी आपले कर्म पूर्ण निष्ठेने करतो. पण मी ज्या इस्पितळात कार्य करतो तिथे यावर्षी साथीच्या आजाराने मृत व्यक्तींनाहि काही दिवस जीवनरक्षक प्रणालीवर ठेऊन  इस्पितळाने लुटीचा धंधा केला. या घटनांचा मी साक्षीदार होतो. आपल्या पासून काय लपले आहे, पोटपाण्याचा प्रश्न मोठा बिकट असतो. हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहून सुद्धा मी अबोल राहिलो.  मी विवश होतो, भगवंत मला क्षमा कर. 

दुसरा व्यक्तीने देवासमोर प्रार्थना केली, माझे वडील साथीच्या आजाराशी झुंझ देत इस्पितळात मरण पावले. ते सज्जन पुरुष होते. तरीही त्यांच्या हातून न कळत काही अपराध झाले असेल तर त्यांना क्षमा कर. आपल्या चरणी त्यांना स्थान दे. 

पुजारीने तथास्तु म्हंटले. दोघेही मंदिराच्या बाहेर पडले. पहिला व्यक्ती दुसर्याला म्हणाला, साहेब आपले वडील कुठल्या इस्पितळात  स्वर्गवासी झाले. दुसर्या  व्यक्तीने इस्पितळाचे नाव सांगितले. पहिला व्यक्ती त्याच्या पाया पडत म्हणाला, साहेब मी त्याच इस्पितळात नौकरी करतो. तुमची माफी मागतो. दुसर्‍या  व्यक्तीच्या मनात राग, द्वेष घ्रुणा सर्वच भावना उचंबळून आल्या. त्याने डोळे बंद करून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. काही क्षणात त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.  दुसर्‍या व्यक्तीने विचारले, साहेब तुमच्या डोळ्यांत अश्रू .... पहिला व्यक्ती म्हणाला, मीहि तुझ्याच सारखा मूक साक्षीदार आहे, मलाही कल्पना आली होती, पण मी हि विवश होतो.