Tuesday, September 25, 2018

चिमणीची नवीन गोष्ट


एक होते आटपाट नगर. रहात होती तिथे, एक म्हातारी आजीबाई. घरात होते आंगण आणि आंगणात होता एक पिंजरा. पिंजर्यात होती एक चिमुकली चिमणी. रोज खायला मिळायचे तिला गोड-धोड अन्न. पिंजऱ्याचा दरवाजा होता बाहेरून बंद.

पिंजरा शेवटी पिंजराच असतो. एक दिवस हिम्मत करून, चिमणी म्हणाली  "आजीबाई आजी बाई, पिंजर्याचे दार उघड. गुदमरतो इथे श्वास हा माझा. आकाशी उडण्याच्या ध्यास लागला आहे जीवा. वाटते नेहमीच दूर कुणी चिमणा राजा वाट माझी पाहतो". आजीबाई उतरली, "माझी वेडी चिमणी, भास आहे हा मनाचा, पिंजर्याच्या बाहेरचे जग आहे वैरी. कावळे-गिधाडे करतील घात. मला आहे तुझी काळजी. म्हणून ठेवले तुला पिंजर्यात बंद". चिमुकली चिमणी हिरमुसली. पण करणार तरी काय. पिंजर्याचे दार होते बाहेरून बंद. 

एक काळा कावळा, चोरून ऐकत होता त्यांचे बोलणे. अवसेच्या राती डाव त्याने साधला. पिंजर्याचे दार कावळ्याने ठोठावले, "चिवताई चिवताई, मी कावळा दादा, सोडवायला तुला आलो." चिवताई म्हणाली, "मी नाही ओळखत तुला, आजीबाई म्हणते, कावळे असतात दुष्ट, करतील तुझा घात." कावळा म्हणाला, "भोळी माझी चिमणी, आजीबाईला ठेवायचे आहे तुला पिंजर्यात बंद सदा. मी भोळा कावळा, चिमण्यांचा आहे दादा, पिंजर्याचे दार उघडून, तुला मी सोडवणार. आजच्या राती घरट्यात माझ्या रहा, उद्या पहाटे, भेट तुझ्या राजाला. मला माहित आहे, त्याचे सुंदर घरटे".  भोळी चिमणी कावळ्याच्या बातांत फसली.  पिंजर्याच्या बाहेर ती पडली. कावळ्या सोबत त्याच्या घरट्यात पोहचली. 

कावळी होती उपाशी. चिमणीला पाहताच ती झाली खुश. चिमणीवर ती तुटून पडली, पंज्याने चिमणीचा गळा आवळला. चिमणीचा जीव घुटमळू लागला. "कावळा दादा, कावळा दादा, हे काय करतो, मी आहे तुझी छोटी बहिण, घरी आलेली पाहुणी. कावळीच्या पंज्यातून मला तू सोडव."  "हा! हा! हा!, मूर्ख भोळी चिमणी, कावळी माझी उपाशी, तू साजूक चिमणी, आहे आमचा नाश्ता." म्हणत कावळ्याने आपली चोंच नरडीत तिच्या खुपसली. चिमणीची किंकाळी आसमंती घुमली. आजीबाईची झोप तक्षणी तुटली. दिवा घेऊन ती बाहेर आली. पहाते, पिंजर्याचे दार होते उघडे, चिमणी नव्हती त्यात. अवसेच्या राती घात झाला. बेचारी चिमणीचा जीव नाहक गेला. आजीबाईने डोक्यावर हात मारला.

दुसर्या दिवशी आजीबाई बाजारात गेली. पारध्याकडून एक चिमणी विकत घेतली. पिंजर्यात ठेवण्यापूर्वी पंख तिचे छाटले. आजीबाई म्हणाली, "चिवताई चिवताई रागावू नको, तुझी भल्यासाठी छाटले तुझे पंख. बाहेरच्या जगात फिरतात दुष्ट सारे कावळे, त्यासाठी केला हा उपद्व्याप. गोड-धोड खा आणि पिंजर्यात सुखी रहा."  त्या दिवसापासून चिमणी पिंजर्यात आयुष्य कंठत आहे.


No comments:

Post a Comment