Friday, September 8, 2017

एका प्यादा (कठपुतली/कठपुतला )ची जीवन गाथा




प्यादाला बोलवा 
प्यादाला न्हावू  घाला 
प्यादाला जेवू घाला
प्यादाला दक्षिणा द्या.


प्यादाचा वापर करा 
प्यादाला डोक्यावर बसवा 
काम झाले कि प्यादाला
पटावर शहीद करा.

मग
नावावर त्याच्या
मेणबत्या लावा
नावाने दुसर्यांच्या 
जोरात बोंबला.

(शेवटच्या क्षणी प्यादाला सत्य कळते, पण उशीर झालेला असतो) 
.


Wednesday, September 6, 2017

भू-भू भुंकणारे कुत्रे



कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल.  कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुत्र्यांचा स्वभावच दुसरे काय.  पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात  सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात. कुणाच्या हाती इवलासा मांसाचा तुकडा किंवा फक्त हाड हि लागले तरी जणू काही त्यानेच हत्तीची शिकार केली आहे असा अविर्भाव आणून जोरात वाघा सारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. कितीही झाले तरी कुत्रा वाघ बनू शकत नाही. शेवटी तोंडातून भू-भूच निघणार. 

या झुंडीतल्या कुत्र्यांचे अनेक प्रकार असतात. काही कागदांवर भुंकतात. तर काही दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भुंकतात. आपण हत्तीची कधी आणि कशी शिकार केली याचे रसभरून वर्णन करतात. दुसर्या कुत्र्यांचा झुंडींच्या हाती काही लागू दिले नाही किंवा ते कुत्रे हत्तीचीच मदत करत होते इतपर्यंत यांची मजल जाते. आपणच खरे हे दाखविण्यासाठी सोबत सबूत म्हणून मांसाचा तुकडा किंवा हाड हि दाखवितात.   

एक आणखीन हि प्रकार असतो, हे कुत्रे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना'.  फ़क्त वरील उल्लेखित कुत्र्यांचे  हत्तीच्या शिकारीचे वर्णन ऐकून, जणू काही आपणच हत्तीची  शिकार केली आहे असा आभास यांना होतो. हे पण शिकारीचे वर्णन आणि हत्तीच्या मांसाचे हाडाच्या स्वादाचे वर्णन एवढ्या खूबीने करतात कि दुसर्यानां वाटेल हेच कुत्रे प्रत्यक्ष घटनेच्या जागी होते आणि शिकार यांनीच केली. फरक एवढाच कि या कुत्र्यांनी कधी हत्तीला पाहिलेही हि नसते. मांसाचा किंवा हाडाचा तुकडा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असो. या आभासी जगात वावरणाऱ्या कुत्र्यांचा वापर कागदावर आणि दृश्य श्रव्य माध्यमात भुंकणार्या कुत्र्यांच्या झुंडी स्वत:च्या स्वार्थासाठी नेहमीच करतात. अफवांचे पिक पसरवण्यासाठी किंवा कुणाचे चारित्र्यहनन या कुत्र्यांच्या मदतीने सहज करता येते. फक्त ठिणगी सोडा आग हे लावतील. पण हे कुत्रे स्कड मिसाईल सारखे असतात, कुठेही जाऊन पडतात.  आपल्या मालकांना हि चावायला कमी करत नाही. असो. 

हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावर लिहिला आहे, अन्यथा घेऊ नये. तरी हि सर्वांची माफी मागतो.  

Saturday, September 2, 2017

पोष्टिक थालिपीठ


काल संध्याकाळी लेकीचा फोन आला. बाबा आज आमच्या हॉस्पिटल मध्ये पोष्टिक पदार्थ बनविण्याची प्रतियोगिता झाली. मी बनविलेल्या थालीपीठला पहिला पुरस्कार मिळाला. मी भाग घेण्याचे ठरविल्या बरोबरच  थालीपीठ बनविण्याचचा निश्चय केला. पुरस्कार नाही मिळाला तरी मराठमोळ्या थालीपिठाबाबत सर्वांना कळेल तरी. आमची सौ. दिवाळीच्या आधी भाजणीचे पीठ तैयार करते, ते जवळ-सात ते आठ महिने चालते.  साहजिकच आमच्या लेकीने तिच्या आईला विचारले. भाजणीचे पीठ संपले हे कळल्यावर तिची निराशा झाली. पण तीही माझ्या सारखी जिद्दी (आमच्या पटाईत खानदानची विशेषता, एकापेक्षा एक जिद्दी आणि सनकी). थोडा गुण लेकीत हि उतरला आहे. थालीपीठ बनवायचे ठरविले म्हणजे ठरविले. प्रतियोगिताचा एक दिवस आधी संध्याकाळी घरी परतताना तिला एका किरणाच्या दुकानात पतंजालीचा नवरत्न आटा दिसला आणि तिच्या डोक्याची ट्यूब लाईट पेटली.  गहू ,ज्वार, बाजरा, जौ, मक्का, चणा, सिंघाडा, चौलाई आणि सोयाबीन या पासून तैयार झालेला नवरत्न आटा. आता तिने थालीपीठ कसे केले तिच्याच शब्दांत. 

दोन वाटी नवरत्न आटा घेतला. एका कढईत (लोखंडी) रवा भाजतो तसा हा आटा ३-४ मिनिटे परतला.  अर्धी वाटी बेसन हि घेतले, तेही ३-४ मिनिटे परतले. अश्या रीतीने भाजणी तैयार केली व परातीत टाकली. एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, १०-१२ काळी मिरीची पूड हि तैयार केली.  त्या नंतर एक पाव पालक आणि २ हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या  धुऊन कढई वर झाकण ठेऊन वाफवून घेतल्या. नंतर मिक्सरमध्ये पालक टाकून प्युरी तैयार केली.   भाजणीत पालकाची प्युरी, तैयार केलेली पूड, व अंदाजे मीठ टाकून पीठ मळून घेतले. पाणी गरजेनुसार टाकले.  गॅस वर तवा ठेवला. थोड्या मंद आंचेवर. तव्यावर अर्धा चमचा तेल लावून थालीपीठ थापून घेतले व २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवले. पुन्हा परतून खरपूस भाजून घेतले. बाकी हास्पिटल मध्ये गेल्यावर सोबत टमाटो, काकडी, गाजर, ढोबळी मिरची पासून केलेली कोशिंबीरिची साईड डिश सोबत ठेवली.  एक आगळीवेगळी मराठमोळी व पोष्टिक डिश परीक्षकाला आवडली आणि तिला पहिले पारितोषिक मिळाले.










Monday, August 21, 2017

धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम

मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे.  "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तुएक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर. मानव ऋषीने सांशक होऊन विचारले, खरंच! तू सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. धूम्राक्ष म्हणाला, प्रत्यक्षला प्रमाण कशाला. तुमच्या मनात मध खाण्याची इच्छा आहे, याच झाडावरच मधमाश्यांचा पोळआहे. 'नको रे, भयंकर दंश देतात मधु माश्या'.  आता  मधु-माश्यांची भीती नाही. मधाच्या पोळां खाली लाकडे जाळली, धूर निघाला, मानव ऋषी धुर्यामुळे खोकलू  लागले.  मधुमाश्या पोळ सोडून निघून गेल्या, मधुर मधु चाखायला मिळाले. मानव ऋषी आनंदी झाले. धूम्राक्ष हात जोडून मानव ऋषी समोर उभा राहिला पुढच्या आदेशासाठी. 

खांडववन जळत होते, आगीचे डोंब आकाशाला भिडत होते. काळाकुट्ट धूर सर्वत्र पसरला होता. अर्जुनाचा आवाज गुंजला, माणसाला त्रास देणारा एक हि हिंस्त्र पशु जिवंत राहिला नाही पाहिजे. धूम्राक्ष एक-एक करून वनातील सर्व जीव-जंतूंना गिळू लागला. प्राण कासावीस झाल्याने काही वनवासी वनातून बाहेर पडले.अर्जुनाला शरण गेले. बहुतेक जगातील पहिले विस्थापित. खांडववनाच्या राखेवर नवीन भव्यदिव्य विशाल इंद्रप्रस्थ नगर उभे राहिले. नवी मुंबई आणि अमरावती सारखे भव्य महानगर हि उभे राहिले. हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला. आग आणि धुर्यात गुदमरून लक्षावधी लोग मरण पावलें. धूम्राक्षाच्या मदतीने विजय हि मिळाला. माणसाची प्रत्येक इच्छा हा पूर्ण करता-करता, धूम्राक्ष धूर गिळत-गिळत एवढा मोठा झाला आहे, कि आज संपूर्ण पृथ्वी त्याच्या अशरीरी शरीराने झाकल्या गेली आहे.
  
काल संध्याकाळी गच्ची वर उभा होतो, दिसला मला तो धूम्राक्ष. विचारले, अरे तुझ्यामुळे प्राण कासावीस झाला आहें, श्वास हि घेता येत नाही आहे, दिवस रात्र खोकलत राहतो, अस्थमा झाला आहे, मला. तो म्हणाला मालक यात माझा काय कसूर. तुमच्या इच्छा पूर्ण करता करता मी एवढा मोठा झालो आहे. मला रागच आला, त्याचा, तुझ्या  कृत्यांना मी कसा काय दोषी. तो म्हणाला, घरात AC आहे का. मी म्हणालो, संपूर्ण घर ACच आहे. बाहेरची प्रदूषित हवा घरात येऊ नये म्हणून लावला. हो पण त्या AC साठी वीज कुठून येते. कोळसा जळतो, धूर निघतो, मग वीज मिळते, म्हणत धूम्राक्ष जोरात हसला. पुढे म्हणाला,मालक समोर पहा काय दिसत आहे, मी म्हणालो दूर मायापुरीतील कारखान्यांच्या धूर ओकणाऱ्या चिमण्या. तुझे सातमंजली घर मायापुरीतल्या लोखंडी सळ्यानींच बनले आहे. किती गाड्यला आहेत घरी? मी उतरलो, एक माझी, एक माझ्या सौची, एक चिरंजीवाची आणि एक मोठी कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर. तो म्हणालापेट्रोल जळते, धूर निघततो, मगच कार चालते. मी चिडून म्हणालो, माझ्या अस्थम्यासाठी  मीच दोषी आहें, हेच म्हणायचे आहे का तुला? मालिक चिडू नका शांत व्हा. सत्य तेच सांगतो आहे. बाकी मला काय, मी दास आहे, मानवाच्या आदेशाचे पालन करणें माझे कर्तव्य. आपण आदेश द्या. मी पुढे काही न बोलता गुपचूप खाली उतरलो. खोलीत येऊन AC सुरु केला. पण तरीही रात्री मला झोप आली नाही. 

अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम. मंत्राचा अर्थच कळला नाही. सर्व मलाच पाहिजे. त्या साठी कितीही किमंत आपण मोजायला तैयार असतो. कदाचित मानवाच्या अपरमित इच्छांची पूर्ती करता-करता एक दिवस धूम्राक्ष मानवाला हि गिळून टाकेल.
 

Saturday, August 19, 2017

संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?


शर्माजी ज्यूस स्टाल समोर उभे होते, मला येताना पाहून सहज विचारले, पटाईतजी ज्यूस पिओगे क्या? आपण हि पक्के बेशरम, हाँ हाँ क्यों नहीं. झक मारून शर्माजीने दोन गिलास संत्र्याचे ज्यूस मागविले. ज्यूस पिता पिता शर्मा म्हणाला, हा दुकानदार भेसळ करत नाही, किती गाढे स्वादिष्ट ज्यूस आहे. मी उतरलो, शर्माजी हे संत्र्याचे ज्यूस नाही, किन्नूचे आहे. समोर पहा दुकानात किन्नू सजवून ठेवलेले आहे. पैसे देताना, शर्माने दुकानदाराला सहज विचारले, आप संत्रे कि जगह किन्नू पिलाते हो, कभी- असली संत्रे का ज्यूस भी पिलाया करो. दुकानदार हसून बोलला, ग्राहक दुगनी कीमत देने को तैयार हो तो संतरा भी पिला देंगे. 

भगव्या रंगाचे आंबट गोड ज्यूस म्हणजे संत्र्याचे ज्यूस, हि सामान्य ग्राहकाची कल्पना. त्याला किन्नू, माल्टा आणि संत्र्यातील फरक कळत नाही. भारतात संत्र्याच्या नावावर किन्नूचे ज्यूस देशी विदेशी कंपन्या विकतात. कारण स्पष्ट आहे, किन्नूत संत्र्याच्या तुलनेत जास्त रस. रस हि जास्त गाढ आणि  जास्त गोड. शिवाय स्वस्त: हि. 

पण विदर्भात संत्रा होतो. ८० हजाराहून जास्त हेक्‍टरवर संत्र्याच्या बागा आहेत. दरवर्षी पाच ते सहा लक्ष टन संत्र्याचे उत्पादन होते. कमी पाऊस झाला कि कमी उत्पादन  होते आणि  शेतकर्याचे नुकसान होते. चांगला पाऊस झाला, उत्पादन जास्त झाले तरी संत्र्याला विदर्भा बाहेर पाठविण्याची व्यवस्था चांगली नसल्याने रुपयाचे २ संत्रे विकण्याची पाळी शेतकर्यावर येते.  दुसर्या शब्दांत संत्र्याची शेती हि नुकसानीची शेती. जो पर्यंत संत्र्यावर मोठ्याप्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग लागत नाही संत्र्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाग्योदय होणे नाही. 

विदर्भात संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उद्योग  वेळोवेळी लागले आणि बंद हि पडले. उदा. अमरावती फ्रुट ग्रोअर इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने १९५८ मध्ये   सुरू केलेला प्रकल्प १९६३ मध्ये बंद पडला. नोगा (NOGA) ची स्थापना 1972 मध्ये झाली. या सरकारी कंपनीची वार्षिक क्षमता ४९५० टन अर्थात दिवसाची फक्त १५ टन आहे. हि कंपनी हि संत्र्याचे ज्यूस लोकप्रिय करण्यास असमर्थ ठरली. सध्या टमाटो केचप हे ह्या कंपनीचे मुख्य उत्पादन आहे.  निजी क्षेत्रात हि अनेक संयंत्र सुरु झाले आणि बंद पडले. सरकारी क्षेत्रातला काटोल संयंत्र हि तोट्यामुळे बंद पडला. मार्केटची सद्य परिस्थितीत पाहता मुफ्त जागा आणि संयंत्रासाठी ५०% टक्के अनुदान दिले तरी कुणी संत्र्याचे ज्यूस काढणारे संयंत्र लावण्याची हिम्मत करणार नाही.  सत्य हेच आहे, संत्रा किन्नू किंवा माल्टा सोबत प्रतियोगिता करू शकत नाही. असे कृषी भवन मधल्या माझ्या एका जुन्या सहकारीचे मत.  

अश्या परिस्थितीत बातमी आली, पतंजली नागपूर मध्ये मेगा फूडपार्क आणि संत्र्याचे ज्यूस काढण्याचे मोठे संयंत्र लावणार आहे.  पतंजलीचा कारभार अत्यंत पारदर्शी असल्यामुळे, काही दिवसांपूर्वी या विषयावर आस्था चेनेल वर चर्चा आणि आचार्य बाळकृष्ण यांचे विचार ऐकले. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल, नक्षलवाद संपवायचा असेल, तर ग्रामीण भागात मोठ्या संख्येत रोजगार निर्मिती झाली पाहिजे. नागपुरात  मेगा फूडपार्क  लावण्यामागचा हाच उद्देश्य. 

विदर्भात संत्रा होतो, संत्र्याचा ज्यूस काढण्याचा एक मोठा संयंत्र विदर्भातील शेतकर्यांचे भाग्य बदलू शकतो. पण एक खंत हि त्यांच्या भाषणात दिसली, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत जिथे उद्योगांना कौड़ियों के भाव जमीन दिली जाते, तिथे फक्त विदर्भातील शेकऱ्यांच्या कल्याणासाठी २५ लाख प्रती एकर भाव बाबाजीनी मोजला.  शेती आधारित उद्योगांबाबत सरकारी उदासीनता स्पष्ट दिसून येते.  बाबांची आज्ञा, जगातल्या संत्र्या उद्योगाबाबत माहिती गोळा करणे सुरु केले. माहिती मिळाली, संत्र्याचे ज्यूस काढण्याचा संयंत्र किती हि मोठा असला तरी, फक्त ज्यूस काढून त्याला चालविणे अशक्य.  संत्र्याच्या साली आणि बियांपासून इतर उत्पादने घेतली तर संत्रा संयंत्र चालविल्या जाऊ शकते. इथे तर ग्राहकांना संत्र्याचे ज्यूस इतरांपेक्षा स्वस्त: हि विकायचे आहे.

विदर्भात ५ लक्ष टनपेक्षा जास्त संत्रा होतो. उच्च दर्जेचा संत्रा सोडल्यास बाकी संत्र्याचे अधिकाधिक ज्यूस काढल्यास शेतकर्यांना संत्र्याचा जास्त पैसा मिळू शकतो.   सर्व  बाबींचा विचार करून पतंजलीने  ८०० टन रोज अर्थात वार्षिक २,९०,००० टन क्षमतेचे विशाल संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला. पाच महिने तरी संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी हा संयंत्र वापरला गेला तरी दिडेक लाख टन संत्र्यापासून ज्यूस निश्चित काढल्या जाईल. हे वेगळे हा नवीनतम तकनीकवर आधारित संयंत्र इटालियन कंपनी पुरविणार आहे. 

२०१९च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, कि पतंजलीचे हात हि यात जळतील. या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे. 

Wednesday, August 16, 2017

प्रदूषण (२९) निघाला शिकारीला कालीयानाग



  घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला 
दहाफणांनी ओकीत विषारी आग 

निघालाआहे शिकारीला 

 कालीयानाग.


अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे  
 मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.

कारण 

दशेंद्रीयांच्या  रथावर स्वार होऊनच  
निघाला आहे शिकारीला
 कालीयानाग. 








Saturday, August 12, 2017

प्रदूषण (५) श्रावणात : अंत आणि आरंभ



जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे... 



जीर्ण-शीर्ण  कातडी 
शेषाने टाकली. 

प्रलय अमृतात  
धरती न्हाली.

हिरव्या शालूत 
नववधू लाजली. 

प्रीतीचे गाणे 
नभी गुंजले'

  अंकुर चैतन्याचे 
पुन्हा प्रगटले. 

Saturday, July 8, 2017

आर्य हे दक्षिण भारतीय होते.


आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे. 

पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे. पण त्या काळातील माणूस आज हि जिवंत आहे. आजच्या माणसांचे अध्ययन करून संस्कृत भाषी आर्य कुठले हे ठरवणे सहज शक्य आहे. 

इतिहासाचा सारांश: हिस्ट्री चेनेल वर माणसांचा प्रवास हा कार्यक्रम २-३ वेळा तरी पहिला असेल.  हा कार्यक्रम माणसांच्या DNA अध्ययनावर आधारित होता. आजपासून पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून  माणूस आंध्रप्रदेशच्या व दक्षिण भारताच्या किनार्यावर पोहचला. पन्नास हजारवर्षांपूर्वी आजपेक्षा समुद्राची पातळी २०० फूटहून अधिक खोल असल्यामुळे हा प्रवास सहज शक्य होता. आफ्रिकेतून आलेल्या टोळ्यांची जनसंख्या वाढली, काही दंडकारण्यात इत्यादी जंगलात स्थिरावले व वनवासी संस्कृती विकसित झाली. काही कावेरी, कृष्णा आणि गोदावरीच्या किनार्यांवर स्थिरावले. तिथे सभ्यता आणि संस्कृत भाषेचा जन्म झाला. मानवीय आचरणाचे नियम आखल्या गेले. त्या नियमांचे पालन करणारे स्वत:ला आर्य म्हणवू लागले. पालन न करणार्यांसाठी अनार्य शब्द वापरला जाऊ लागला. जनसंख्या वाढली, काही प्रवास करत प.समुद्र तटावर पोहचले व सरस्वती नदीच्या किर्नार्यावर प्रवास करीत सप्तसिंधू प्रदेशात पोहचले. जगातील सर्वात उपजाऊ अश्या सप्तसिंधू प्रदेशात सभ्यता स्थिरावली. नगर आणि ग्राम विकसित झाले, वैदिक साहित्य निर्मिती हि सुरु झाली. संस्कृत भाषा अधिक विकसित झाली.  बदलत्या वातावरणात वावरू लागल्यामुळे  मूळ संस्कृत शब्दांचे उच्चारण करणे त्यांना जड जाऊ लागले. काही संस्कृत शब्द लुप्त हि झाले. माणूस शेती करू लागला. भूमी आणि गौ धनासाठी युद्ध होऊ लागले. ऋग्वेदातील ऋचा या घटनांच्या साक्षी आहेत. बहुतेक १२-१३ हजार वर्षांपूर्वी  एक मोठे दशराज्ञ युद्ध झाले. तृत्सु वंशातील राजा सुदास याने १० आर्य वंशातील राजांना पराजित केले. हजारो सैनिक मरण पावले. ऋग्वेदात राजा सुदासचे पुरोहित वशिष्ठ ऋषीला राक्षस म्हणून हि संबोधले आहे कारण या विनाशासाठी ते हि दोषी होतेच. याचा अर्थ सभ्य आणि सुसंकृत लोक म्हणजे आर्य आणि असंस्कृत हिंसाचारी म्हणजे राक्षस किंवा अनार्य. पुढे आर्य  सभ्यता गंगा -यमुनेच्या खोर्यात पोहचली. काही "केस्पिअन सागर पार करून मध्य आशियात, युरोपात आणि काही पुढे सैबेरिया पार करून अमेरिकेत पोहचले"(असे हिस्ट्री चेनेल वाले म्हणतात). इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो. माझा एक सहयोगी गंगाराम काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सौबत मक्सिको येथे गेला होता. मी परतल्यावर विचारले मेक्सिको कसा वाटला. तो म्हणाला 'पटाईतजी वहां ऐसा लगा जैसे भारत में है, कोई बिहारी लग रहा था कोई पंजाबी'. निश्चित ही भारत का कोई रिश्ता मेक्सिको से अवश्य है".असो. 

आता माणसाचे अध्ययन करून आर्य दक्षिण भारतीय होते हे सिद्ध करायचे आहे. माणूस म्हणजे मीच. मी ब्राम्हण कुळातील आहे अर्थातच भाकड इतिहासकारांच्या मते आर्य. माझे अध्ययन करून संस्कृत भाषिक आर्य मूळचे कुठले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

बालपणी संध्याकाळी वडील घर परतल्यावर, देवा समोर दिवा लावल्यावर, रामरक्षा इत्यादी स्त्रोते आम्ही म्हणायचो. शाळेत गेल्यावर कळले या भाषेला संस्कृत असे म्हणतात. आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. पहाडगंज येथील नूतन मराठी मराठी शाळेत शिक्षण सुरु झाले. शाळा मराठी असली तरी ५ टक्क्याहून कमी मराठी मुले असतील. ५ टक्के आरामबाग येथील सरकारी कर्मचार्यांची मुले त्यात अधिकांश दाक्षिणात्य. शाळेत शिकणारी बहुसंख्यक मुले पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची. त्यात हि सर्वातजास्त मुलतानी टांडा येथील. (मुलतान म्हणजे आर्यांचे मूलस्थान असे काहींचे मत आहे). उंच पुरे घार्या डोळ्यांच्या मुलतानी मुलांमुळे नूतन मराठी शाळा कैक वर्ष बास्केटबॉल विजेता राहिली होती. त्या काळी ११वी बोर्ड होता. आठवीत संस्कृत भाषेत ९० टक्के मार्क मिळाले तरी ९वीत प्रवेश घेताना मी हिंदी हा विषय घेतला. संस्कृत शिकविणार्या शास्त्री सरांना हे कळले त्यांनी प्रेमाने मला जवळ बोलविले. (शास्त्री सर हे बनारसचे होत. चांगले संस्कृत शिकवायचे. संस्कृत घेणाऱ्या अधिकांश मुलांना ७५ टक्केहून जास्त मार्क मिळायचे.). मला समजावीत म्हणाले अरे गाढवा, संस्कृत हि भाषा तुम्हा मद्रासी-मराठी मुलांसाठीच आहे. संस्कृत घेशील तर तुला सहज ८०-८५ टक्के मार्क्स मिळतील. संस्कृतच्या भरोश्यावर प्रथम श्रेणीत हि पास होशील. हिंदीत तर बोर्डात प्रथम येणार्यालाही ७५ टक्के मार्क्स मिळत नाही. ज्यांना संस्कृत कळणे आणि बोलणे शक्य नाही अश्या पंजाबी, सिंधी आणि मुलतानी मुलांसाठी हिंदी भाषा आहे.  हे वेगळे मी निश्चय बदलला नाही. हिंदीत ५४ टक्के मार्क्स मिळाले आणि ९ मार्कांनी प्रथमश्रेणी चुकली. माझ्या  भावाने संस्कृत घेतली. त्याचे ८० टक्क्याहून जास्त मार्क्स आले व प्रथम श्रेणी हि. असो. पण एक मात्र खर देशातील उत्तर पश्चिमेच्या भागातील लोकांना संस्कृत बोलणे जड जाते. काही दिवसांपूर्वी आस्था टीवी वर संस्कृत मधील एक कार्यक्रम पहिला. दक्षिण भारतीय विद्वान सहज आणि समजणारी संस्कृत बोलत होते, पण एका उत्तर भारतीय हरियाणवी अतिप्रसिद्ध संस्कृत विद्वानाचे उच्चारण स्पष्ट नव्हते. दिल्लीतही दक्षिण भारतीय आणि मराठी ब्राह्मणांची डिमांड पूजापाठ साठी जास्त आहे. त्यांना दक्षिणाही जास्त मिळते. कारण एकच संस्कृत भाषेतील स्पष्ट उच्चारण. संस्कृत भाषेचे अधिकांश विद्वान् विन्ध्याचल पार अर्थात दक्षिणात्य आहेत. आता विचार करा मध्य आशिया किंवा युरोपात संस्कृत भाषा विकसित होणे संभव आहे का?

काही म्हणतात, आर्य गोर्या रंगाचे व उंच पुरे होते. रंगाचा आणि उंचीचा संबंध जातींनुसार नव्हे तर वातावरणाशी आहे. माझे वडील दिल्लीत स्थायी झाले.  दिल्लीत लालनपालन झाल्यामुळे माझ्या चुलत भावांपेक्षा आम्हा दिल्लीकर भावंडांची उंची जास्त आहे व रंग ही उजळ. पुढील पिढी अर्थात माझे पुतणे, भाचा आणि माझा मुलगा यांची उंची आमच्या पिढी पेक्षा जास्त आहे. हि काही माझ्या घरची परिस्थिती नाही. आता मी जनकपुरी जवळ बिंदापूर या शहरी गावात राहतो. जनकपुरीत बरेच मराठी ३०-४० वर्षांपासून राहतात. एखाद अपवाद सोडता सर्वांच्याच घरी आजची पिढी पूर्वीपेक्षा जास्त उंच आहे. दोन-तीन पिढीत एवढा फरक पडतो. शेकडो पिढ्यात रंग आणि उंची यात किती फरक पडेल. निश्चितच दक्षिणेतून उत्तरेकडे गेलेल्या आर्यांचे रंग आणि रूप बदलले. तरीही मूळ रंगाची आठवण नेहमीच स्मृतीत राहिली. आपल्या सर्व देवता काळ्या रंगाच्या आहेत. क्षीर सागर मध्ये निवास करणारे आर्य देवता विष्णू, काळ्या रंगाचे, राम आणि कृष्ण काळ्या रंगाचे, परशुराम हि काळेच होते. नीलकंठ शंकर हि काळेच. रावण मात्र गोरा आणि सुंदर होता. कालिका देवी काळीच होती. सीता ते शकुंतला सर्वच सुंदर कन्या सावळ्या होत्या. जिच्यामुळे महाभारत घडले ती अग्नीवर्णी द्रौपदी सावळी होती. संस्कृत साहित्यात विदर्भ कन्या सुंदर (सावळ्या) असतात. आमची सौ. हि वैदर्भी आहे. अर्थात सुंदर आहे. देवी -देवतांच्या मूर्त्या काळ्या दगडातच तैयार करण्याची परंपरा आज हि आहे. मुगल देशात आल्यानंतरच संगमरमरच्या पांढर्या मूर्त्या बनू लागल्या. 

सारस्वत ब्राह्मण केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान ते पंजाब पर्यंत पसरलेले आहे. ते आर्यांचा दक्षिण ते उत्तर भारताच्या प्रवासाचे जिवंत साक्षीदार आहेत. सारस्वत ब्राह्मण गंगा-यमुनेच्या मैदानापासून ते बंगाल पर्यंत हि  पसरले आहेत. अर्थात संपूर्ण भारतात मानवी प्रवासाचे (आर्यांच्या प्रवासाचे) जिवंत प्रमाण हि आहेत. या शिवाय मी आणि सर्व दक्षिण भारतीय हि आर्य दक्षिण भारतीय असण्याचे जिवंत पुरावे आहोत.  

निष्कर्ष एकच जर स्वत: आर्य  म्हणवणारी  कुठली जाती असेल तर निश्चित ती दक्षिण भारतीयच आहे. संस्कृत भाषी आर्य हे दक्षिण भारतीय होते हेच सत्य.  बाकी सर्व भाकड कथा. 

Sunday, June 25, 2017

योग: कर्मसु कौशलम्- सौपा अर्थ.



बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते .
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् .
(भगवद्गीता. २/५०)


(सामान्य अर्थ:  बुद्धी वापरून कर्म करणारा व्यक्ती  चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होऊ शकतो. म्हणून योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो.)   

योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकतो. योगयुक्त होणे म्हणजे काय? हा प्रश्न मनात आलाच. 

योग माणसाला पर्मार्थाशी जोडतो. म्हणून इशोपनिषदात काही मिळते का म्हणून ग्रंथ उघडून बघितला. ईशोपनिषदात भगवंत म्हणतात "पूर्णातून कितीही पूर्ण निघत गेले तरी शेवटी पूर्णच उरते. त्या साठी त्याग सहित उपभोग करावा लागतो". अर्थात जे घेतले आहे, ते परत करावेच  लागते. असे केल्याने पूर्ण पूर्णच राहते. (१-१=०). या पद्धतीने कर्म करणे म्हणजे योगयुक्त कर्म करणे. दुसर्या शब्दात कर्माचे चक्र पूर्ण करणे म्हणजे योगयुक्त कर्म. 

आपण सर्वांनाच माहित आहे, वाईट कर्मांचे वाईट फळ भोगावेच लागतात. त्या शिवाय मुक्ती नाही. कधी-कधी बुद्धी वापरून चांगले कर्म केले तरी माणूस कर्म बंधनातून मुक्त होत नाही. कसे काय? हा प्रश्न मनात आला. उदा:  एक कारपेंटर लाकडापासून आपले सर्व ज्ञान आणि अनुभव वापरून अतिशय सुंदर फर्निचर बनवितो. चांगले कर्म केले तरी तो कर्मबंधनातून मुक्त  होत नाही. कारण फर्निचरसाठी लाकूड लागते. लाकडासाठी झाड तोडावे लागते. असेच झाडतोड सुरु राहिली तर एक दिवस फर्निचर बनविण्यासाठी लाकूडच मिळणारच  नाही. अर्थातच त्याच्या कर्मावर बंधन आले. पुन्हा त्याला फर्निचर तैयार करता येणार नाही.  तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नव्याने झाडांची लागवड केल्याशिवाय कारपेंटरचे कर्म पूर्ण होणार नाही.  पूर्णापासून पूर्ण वेगळे केले तरी पूर्ण पूर्णच राहते.(झाडापासून फर्निचर बनले तरी झाड पूर्णच राहिले पाहिजे).    

एक प्रश्न पुन्हा मनात येतो, योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म  कसे करता येईल?  

उदा: एक शेतकरी शेतात  गहू किंवा धान पिकवितो. काही स्वत: साठी ठेवतो, काही विकतो आणि काही पुढच्या वर्षी बियाण्यांसाठी ठेवतो. बियाणांसाठी धान्य वेगळे ठेवले नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा पिक घेता येणार नाही, हे त्याला लक्षात ठेवावे लागते. (या साठी बुद्धी लागतेच). 

जनावर आणि माणसांनी खालेल्या अन्नाचा त्याग मल-मूत्र आणि शेण या मार्गाने होतो. अर्थात  शेतीतून मिळालेल्या अन्नाच्या अवशेषांचा त्याग मनुष्य आणि जनावरे करतात.  मल मूत्र आणि शेण पुन्हा खताचा माध्यमाने जमिनीला परत करणे म्हणजे "तेन त्यक्तेन भुञ्जीथा". जेवण रुपी कर्माचे चक्र पूर्ण करणे. शेतातील सर्व कचरा-कडबा जाळण्याजागी तो जमिनीला परत करायला पाहिजे तो माणसांच्या किंवा जनावरांचा उपयोगाचा नाही पण तो जमिनीतून मिळाला आहे, तो जमीनीला परत केलाच पाहिजेच.  त्या शिवाय शेतकर्याचे  कर्मचक्र पूर्ण होणार नाही. 
शेती जगविण्यासाठी पाणी पाहिजेच. ऋग्वेद काळात इंद्राने वज्राच्या सहाय्याने पर्वतांचे हृदय फोडून नद्यांना मुक्त केले. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली.  कृष्णाने हि द्वापर युगात, ब्रज (जिथे दहा हजार गायी पाळल्या जातात) ९९ तीर्थांची स्थापना केली आणि इंद्राच्या लहरी (अतिवृष्टी आणि कमीवृष्टी) पासून गायींची आणि  ग्वालांची  रक्षा केली. आज हि सरकार पाणी अडवून, बंधारे बांधून आणि कालवे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करते. शेतकरी हि शेतात विहीर आणि तलाव बांधून पाण्याची व्यवस्था करतो. जेवढे पाणी आपल्याला कालव्यातून मिळते, जेवढे पावसाचे पाणी विहिरीत आणि तलावात साठविल्या जाते, तेवढ्याच पाण्याचा उपयोग शेतकर्याने केला पाहिजे. जास्त केला तर पुढे शेतीसाठी पाणीच मिळणार नाही तो शेती करू शकणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. कर्माचे चक्र तुटेल आणि शेतकरी कर्मबंधनात अटकेल. त्याचे फळ त्याला भोगावे लागेल. गेल्या दुष्काळात कर्मबंधनाची झळ मराठवाड्याने सोसली आहे, शेती तर सोडा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आगगाडीने करावी लागली. उपलब्ध पाण्याच्या कौशल्याने शेतीसाठी उपयोग करणे व पुन्हा तेवढेच पाणी साठविणे म्हणजे योगयुक्त रीतीने पाण्याचा उपयोग करणे.

वरच्या उदाहरणाने योगयुक्त कर्म म्हणजे काय. हे समजले असेलच. पुन्हा एक प्रश्न मनात आला.  श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून अर्जुनाला युद्धासाठी का तैयार केले? एक सुदर्शन चक्र युद्धासाठी पुरेसे होते. पण श्रीकृष्णाने तसे केले नाही. कारण तसे केल्याने कुरुक्षेत्राच्या रणमैदानात सर्व योध्यांचे कर्मचक्र पूर्ण झाले नसते. कुणालाहि मुक्ती मिळाली नसती.