Saturday, July 8, 2017

आर्य हे दक्षिण भारतीय होते.


आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे. 

पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे. पण त्या काळातील माणूस आज हि जिवंत आहे. आजच्या माणसांचे अध्ययन करून संस्कृत भाषी आर्य कुठले हे ठरवणे सहज शक्य आहे. 

इतिहासाचा सारांश: हिस्ट्री चेनेल वर माणसांचा प्रवास हा कार्यक्रम २-३ वेळा तरी पहिला असेल.  हा कार्यक्रम माणसांच्या DNA अध्ययनावर आधारित होता. आजपासून पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून  माणूस आंध्रप्रदेशच्या व दक्षिण भारताच्या किनार्यावर पोहचला. पन्नास हजारवर्षांपूर्वी आजपेक्षा समुद्राची पातळी २०० फूटहून अधिक खोल असल्यामुळे हा प्रवास सहज शक्य होता. आफ्रिकेतून आलेल्या टोळ्यांची जनसंख्या वाढली, काही दंडकारण्यात इत्यादी जंगलात स्थिरावले व वनवासी संस्कृती विकसित झाली. काही कावेरी, कृष्णा आणि गोदावरीच्या किनार्यांवर स्थिरावले. तिथे सभ्यता आणि संस्कृत भाषेचा जन्म झाला. मानवीय आचरणाचे नियम आखल्या गेले. त्या नियमांचे पालन करणारे स्वत:ला आर्य म्हणवू लागले. पालन न करणार्यांसाठी अनार्य शब्द वापरला जाऊ लागला. जनसंख्या वाढली, काही प्रवास करत प.समुद्र तटावर पोहचले व सरस्वती नदीच्या किर्नार्यावर प्रवास करीत सप्तसिंधू प्रदेशात पोहचले. जगातील सर्वात उपजाऊ अश्या सप्तसिंधू प्रदेशात सभ्यता स्थिरावली. नगर आणि ग्राम विकसित झाले, वैदिक साहित्य निर्मिती हि सुरु झाली. संस्कृत भाषा अधिक विकसित झाली.  बदलत्या वातावरणात वावरू लागल्यामुळे  मूळ संस्कृत शब्दांचे उच्चारण करणे त्यांना जड जाऊ लागले. काही संस्कृत शब्द लुप्त हि झाले. माणूस शेती करू लागला. भूमी आणि गौ धनासाठी युद्ध होऊ लागले. ऋग्वेदातील ऋचा या घटनांच्या साक्षी आहेत. बहुतेक १२-१३ हजार वर्षांपूर्वी  एक मोठे दशराज्ञ युद्ध झाले. तृत्सु वंशातील राजा सुदास याने १० आर्य वंशातील राजांना पराजित केले. हजारो सैनिक मरण पावले. ऋग्वेदात राजा सुदासचे पुरोहित वशिष्ठ ऋषीला राक्षस म्हणून हि संबोधले आहे कारण या विनाशासाठी ते हि दोषी होतेच. याचा अर्थ सभ्य आणि सुसंकृत लोक म्हणजे आर्य आणि असंस्कृत हिंसाचारी म्हणजे राक्षस किंवा अनार्य. पुढे आर्य  सभ्यता गंगा -यमुनेच्या खोर्यात पोहचली. काही "केस्पिअन सागर पार करून मध्य आशियात, युरोपात आणि काही पुढे सैबेरिया पार करून अमेरिकेत पोहचले"(असे हिस्ट्री चेनेल वाले म्हणतात). इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो. माझा एक सहयोगी गंगाराम काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सौबत मक्सिको येथे गेला होता. मी परतल्यावर विचारले मेक्सिको कसा वाटला. तो म्हणाला 'पटाईतजी वहां ऐसा लगा जैसे भारत में है, कोई बिहारी लग रहा था कोई पंजाबी'. निश्चित ही भारत का कोई रिश्ता मेक्सिको से अवश्य है".असो. 

आता माणसाचे अध्ययन करून आर्य दक्षिण भारतीय होते हे सिद्ध करायचे आहे. माणूस म्हणजे मीच. मी ब्राम्हण कुळातील आहे अर्थातच भाकड इतिहासकारांच्या मते आर्य. माझे अध्ययन करून संस्कृत भाषिक आर्य मूळचे कुठले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

बालपणी संध्याकाळी वडील घर परतल्यावर, देवा समोर दिवा लावल्यावर, रामरक्षा इत्यादी स्त्रोते आम्ही म्हणायचो. शाळेत गेल्यावर कळले या भाषेला संस्कृत असे म्हणतात. आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. पहाडगंज येथील नूतन मराठी मराठी शाळेत शिक्षण सुरु झाले. शाळा मराठी असली तरी ५ टक्क्याहून कमी मराठी मुले असतील. ५ टक्के आरामबाग येथील सरकारी कर्मचार्यांची मुले त्यात अधिकांश दाक्षिणात्य. शाळेत शिकणारी बहुसंख्यक मुले पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची. त्यात हि सर्वातजास्त मुलतानी टांडा येथील. (मुलतान म्हणजे आर्यांचे मूलस्थान असे काहींचे मत आहे). उंच पुरे घार्या डोळ्यांच्या मुलतानी मुलांमुळे नूतन मराठी शाळा कैक वर्ष बास्केटबॉल विजेता राहिली होती. त्या काळी ११वी बोर्ड होता. आठवीत संस्कृत भाषेत ९० टक्के मार्क मिळाले तरी ९वीत प्रवेश घेताना मी हिंदी हा विषय घेतला. संस्कृत शिकविणार्या शास्त्री सरांना हे कळले त्यांनी प्रेमाने मला जवळ बोलविले. (शास्त्री सर हे बनारसचे होत. चांगले संस्कृत शिकवायचे. संस्कृत घेणाऱ्या अधिकांश मुलांना ७५ टक्केहून जास्त मार्क मिळायचे.). मला समजावीत म्हणाले अरे गाढवा, संस्कृत हि भाषा तुम्हा मद्रासी-मराठी मुलांसाठीच आहे. संस्कृत घेशील तर तुला सहज ८०-८५ टक्के मार्क्स मिळतील. संस्कृतच्या भरोश्यावर प्रथम श्रेणीत हि पास होशील. हिंदीत तर बोर्डात प्रथम येणार्यालाही ७५ टक्के मार्क्स मिळत नाही. ज्यांना संस्कृत कळणे आणि बोलणे शक्य नाही अश्या पंजाबी, सिंधी आणि मुलतानी मुलांसाठी हिंदी भाषा आहे.  हे वेगळे मी निश्चय बदलला नाही. हिंदीत ५४ टक्के मार्क्स मिळाले आणि ९ मार्कांनी प्रथमश्रेणी चुकली. माझ्या  भावाने संस्कृत घेतली. त्याचे ८० टक्क्याहून जास्त मार्क्स आले व प्रथम श्रेणी हि. असो. पण एक मात्र खर देशातील उत्तर पश्चिमेच्या भागातील लोकांना संस्कृत बोलणे जड जाते. काही दिवसांपूर्वी आस्था टीवी वर संस्कृत मधील एक कार्यक्रम पहिला. दक्षिण भारतीय विद्वान सहज आणि समजणारी संस्कृत बोलत होते, पण एका उत्तर भारतीय हरियाणवी अतिप्रसिद्ध संस्कृत विद्वानाचे उच्चारण स्पष्ट नव्हते. दिल्लीतही दक्षिण भारतीय आणि मराठी ब्राह्मणांची डिमांड पूजापाठ साठी जास्त आहे. त्यांना दक्षिणाही जास्त मिळते. कारण एकच संस्कृत भाषेतील स्पष्ट उच्चारण. संस्कृत भाषेचे अधिकांश विद्वान् विन्ध्याचल पार अर्थात दक्षिणात्य आहेत. आता विचार करा मध्य आशिया किंवा युरोपात संस्कृत भाषा विकसित होणे संभव आहे का?

काही म्हणतात, आर्य गोर्या रंगाचे व उंच पुरे होते. रंगाचा आणि उंचीचा संबंध जातींनुसार नव्हे तर वातावरणाशी आहे. माझे वडील दिल्लीत स्थायी झाले.  दिल्लीत लालनपालन झाल्यामुळे माझ्या चुलत भावांपेक्षा आम्हा दिल्लीकर भावंडांची उंची जास्त आहे व रंग ही उजळ. पुढील पिढी अर्थात माझे पुतणे, भाचा आणि माझा मुलगा यांची उंची आमच्या पिढी पेक्षा जास्त आहे. हि काही माझ्या घरची परिस्थिती नाही. आता मी जनकपुरी जवळ बिंदापूर या शहरी गावात राहतो. जनकपुरीत बरेच मराठी ३०-४० वर्षांपासून राहतात. एखाद अपवाद सोडता सर्वांच्याच घरी आजची पिढी पूर्वीपेक्षा जास्त उंच आहे. दोन-तीन पिढीत एवढा फरक पडतो. शेकडो पिढ्यात रंग आणि उंची यात किती फरक पडेल. निश्चितच दक्षिणेतून उत्तरेकडे गेलेल्या आर्यांचे रंग आणि रूप बदलले. तरीही मूळ रंगाची आठवण नेहमीच स्मृतीत राहिली. आपल्या सर्व देवता काळ्या रंगाच्या आहेत. क्षीर सागर मध्ये निवास करणारे आर्य देवता विष्णू, काळ्या रंगाचे, राम आणि कृष्ण काळ्या रंगाचे, परशुराम हि काळेच होते. नीलकंठ शंकर हि काळेच. रावण मात्र गोरा आणि सुंदर होता. कालिका देवी काळीच होती. सीता ते शकुंतला सर्वच सुंदर कन्या सावळ्या होत्या. जिच्यामुळे महाभारत घडले ती अग्नीवर्णी द्रौपदी सावळी होती. संस्कृत साहित्यात विदर्भ कन्या सुंदर (सावळ्या) असतात. आमची सौ. हि वैदर्भी आहे. अर्थात सुंदर आहे. देवी -देवतांच्या मूर्त्या काळ्या दगडातच तैयार करण्याची परंपरा आज हि आहे. मुगल देशात आल्यानंतरच संगमरमरच्या पांढर्या मूर्त्या बनू लागल्या. 

सारस्वत ब्राह्मण केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान ते पंजाब पर्यंत पसरलेले आहे. ते आर्यांचा दक्षिण ते उत्तर भारताच्या प्रवासाचे जिवंत साक्षीदार आहेत. सारस्वत ब्राह्मण गंगा-यमुनेच्या मैदानापासून ते बंगाल पर्यंत हि  पसरले आहेत. अर्थात संपूर्ण भारतात मानवी प्रवासाचे (आर्यांच्या प्रवासाचे) जिवंत प्रमाण हि आहेत. या शिवाय मी आणि सर्व दक्षिण भारतीय हि आर्य दक्षिण भारतीय असण्याचे जिवंत पुरावे आहोत.  

निष्कर्ष एकच जर स्वत: आर्य  म्हणवणारी  कुठली जाती असेल तर निश्चित ती दक्षिण भारतीयच आहे. संस्कृत भाषी आर्य हे दक्षिण भारतीय होते हेच सत्य.  बाकी सर्व भाकड कथा. 

No comments:

Post a Comment