Friday, April 25, 2014

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय


भल्या पहाटे  उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला कि मन कसं प्रसन्न होत. सकाळचे सोनेरी कोवळे ऊन हवे-हवे से वाटते. तसेंच सोनेरी रंगाचे सुवर्ण ही माणसाला प्रिय आहे. सुवर्णाच्या कृपेने  माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. कपडे-लत्ते, टीवी, गाडी, बंगला आणि जास्त सुवर्ण असेल तर बंगल्यात राहायला पत्नी रुपात जागतिक सुंदरी ही मिळू शकते.  

फार पूर्वीची गोष्ट आहे, एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले. काही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिश्यात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसाला ही रस्त्यात सोन्याचे नाणे दिसले. त्याने आजू-बाजूला बघितले. जवळपास कोणी माणूस दिसत नाही याची खात्री केली आणि नाणे उचलून स्वत:च्या खिश्यात टाकले. आणखीन काही वेळ गेला, एक शिक्षित आणि विचारवंत माणूस तिथे आलात्याला ही सोन्याचे नाणे दिसले. नाणे दिसतात, त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरु झाले, कुणाच्या खिश्यातून हे सोन्याचे नाणे पडले असावे? त्याने चौफेर नजर टाकली, कुणीच दिसत नाही. आतां काय करावे, नाणे उचलून खिश्यात टाकावे का? लगेच मनात दुसरा विचार आला, हे करणे बरोबर नाही, दुसऱ्याची वस्तू उचलणे म्हणजे चोरी. छे-छे दुसर्यांच्या वस्तूंकडे ढुंकून ही बघितले नाही पाहिजे. पुन्हा विचार आला, आलेल्या लक्ष्मीचा तिरस्कार करणे योग्य नाही. अश्याने लक्ष्मीचा अनादर होतो. लक्ष्मी कुपीत झाली तर  दारिद्र्यात खितपत पडावे लागेल. त्याला पूर्वी ऐकलेली कथा आठवली. “एकदा शंकर- पार्वती विमानातून जात असताना, शंकराने पार्वतीस म्हंटले, तो पहा खाली पृथ्वीवर जो माणूस दिसतो आहे, तो माझा प्रिय भक्त आहे. वादळ असो वा पाऊस, थंडी असो व शरीरला भाजणार भयंकर उन्हाळा, हा न चुकता रोज सकाळी गावाच्या मंदिरात माझी पूजा अर्चना करतो आणि मंदिराच्या शंभर प्रदिक्षणा ही घालतो. याने आज पर्यंत मजपाशी स्वत: साठी काहीही मागितले नाही, म्हणूनच मला हा प्रिय आहे.  पार्वतीने खाली बघितले, फाटके कपडे घातलेल्या त्या दरिद्री माणसाला पाहून पार्वती म्हणाली, देवाधिदेव, त्याने आपणास काहीच  मागितले नाही, हे खरे असले तरी  भक्ताची काळजी घेणे आपले कर्तव्य नाही का? विष्णू भगवान तर सतत आपल्या भक्तांचे कल्याण करण्यात मग्न राहतात. त्या वर शंकर म्हणाले, हा भाग दुष्काळी आहे, इथे सर्वच लोक दरिद्री आहे. आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी हा मला सोडून परदेसी जाणार नाही आणि जो पर्यंत हा या गावात राहील ह्याचे दारिद्र्य दूर होऊ शकत नाही. तरी ही तुझ्या आग्रहास्त मी प्रयत्न करतो. भगवान शंकरांनी प्रदिक्षणेच्या मार्गात काही सोन्याचे नाणे ठेवले,  दरिद्री असून ही त्या ब्राह्मणाला सोन्याच्या नाण्यांना उचलण्याचा मोह झाला नाही. असो, शंकर भगवान त्याचे दारिद्र्य दूर करू शकले नाही.” विचारवंत माणसाने निर्णय घेतला. देवाने आपल्या वर कृपा केली आहे, भगवंताचा कृपा प्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण करायला काहीच हरकत नाही. असा विचार करून त्याने सोन्याचे नाणे उचलून खिश्यात टाकले.

योगायोगाने तिन्ही माणसे एकाच दिवशी मरण पावली. यमदूतांनी त्यांना न्याय निवाड्यासाठी धर्मराजा समोर उभे केले. धर्मराजाने पहिल्या माणसाच्या पाप-पुण्याचा हिशोब केला आणि त्यास म्हंटले, तू एकदा सोन्याचे नाणे चोरले होते, तुला १ वर्ष नरकवासाची शिक्षा. तो म्हणाला, मी नाणे चोरले नव्हते, रस्त्यावर सापडले होते, मी ते उचलले आणि नाणे विकून काही दिवस मौज केली. त्यावर धर्मराज म्हणाले, ते नाणे, दुसऱ्याचे होते.  तुझ्या मेहनतीचे नव्हते  म्हणून तुला एक वर्षाचा नरकवास.

यमदूतांनी दुसऱ्या माणसाला, धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराज म्हणाले, तुला ५ वर्षाचा नरकवासाची शिक्षा. दुसरा माणूस म्हणाला,  पहिल्या माणसा सारखे मी ही नाणे उचलले होते, दोघांना सारखी शिक्षा मिळाली पाहिजे.  त्याला १ वर्ष आणि मला ५ वर्ष हा तर अन्याय आहे. धर्मराज हसत म्हणाले, मूर्खा, त्याने नाणे उचलले होते आणि तू चोरले होते. नाणे उचलताना चौफेर नजर टाकून तू आधी खात्री केली कि कुणी आपल्याला पहात तर नाही ना. अश्यारितीने कार्य करणाऱ्याला चोर म्हणतात. आता समजले तुला ५ वर्षांची शिक्षा का दिली ते.

यमदूतांनी आता विचारवंत माणसाला धर्मराजा समक्ष उभे केले, त्याला पाहताच धर्मराजाने त्याला मानवाचे संपूर्ण आयुष्य अर्थात १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली आणि त्यास विचारले, तुलाही या वर काही म्हणायचे आहे का? विचारवंत म्हणाला, या दोघांप्रमाणे मी चोरी केलेली नाही. मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण केले. मी निर्दोष आहे. तो पुढे म्हणाला, माफी असावी, पण  मला वाटते  ‘एखाद्या लहरी माणसाप्रमाणे मनात येईल ती शिक्षा सुनावून तुम्ही आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहात’. मी तुमची तक्रार भगवंतापाशी करेल, न्याय न मिळाल्यास उपोषणावर बसेल. त्याचे बोलणे ऐकून, धर्मराजाला क्रोध आला, ते म्हणाले, हा भारत देश नाही जिथे कुणी ही दीडशहाणा अन्याय-अन्याय ओरडत उपोषणावर बसतो, हे धर्मराजाचे न्यायालय आहेइथे कुणावर ही अन्याय होत नाही. तू स्वत:ला शिक्षित समजतो, तुला न्याय-अन्याय, उचित-अनुचित काय आहे हे नक्कीच समजत असणार,. तरी ही तू चोरी तर केलीच, पण त्याहून घोर गुन्हा म्हणजे त्या चोरीत तू भगवंताला ही गोवले. चोरीला ‘भगवंताचा कृपा प्रसाद म्हणाला’ तुला क्षमा नाही.  त्या दोघांपेक्षा तुझा गुन्हा फार मोठा आहे, म्हणून तुला १०० वर्ष नरकवासाची शिक्षा.

अश्यारीतीने धर्मराजाने तिघांचाही न्याय-निवडा केला. तुम्हाला धर्मराजाने दिलेला न्याय पटतो आहे का?

Tuesday, April 22, 2014

आजोबा तुम्ही पुअर आहात का?

(माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना, त्याचाच शब्दात).

माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात, तिला, पण सावधान राहा,  वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र  खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे.

रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत?  जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ. तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही?  आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे.  आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही. खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा, तुमच्या कडे कार नाही का?  मी म्हणालो,  स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’. खैर, हलवाईच्या दुकाना  जवळ  पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे).   मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते.अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने  शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे  क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच पुटपुटली,  जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का? 

Saturday, April 19, 2014

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)


आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी,  वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.

स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले. गुणाचा माझा पोर म्हणत आईने प्रेमाने हात त्याचा पाठीवर फिरविला आणि  नमो-नमो म्हणत ते गुलाबाचे फुल देवाच्या चरणी अर्पित केले. दुसऱ्या दिवशी पहाटे  निर्माल्य झालेले फुल तिने रस्त्यावर फेकून दिले. अनेक वर्ष रस्त्यावर झाडू लावल्या मुळे अस्थमासम आजाराने ग्रस्त झाडूवाला खोकलत-खोकलत झाडू लावत होता. त्याने कचऱ्या सोबत गुलाबाच्या फुलाला ही उचलून कचरा गाडीत टाकले. स्वामीजी थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने मजकडे बघितले. मी म्हणालो, स्वामीजी माझ्या सारख्या अल्प ज्ञानी जीवाला, काहीच उमगले नाही.

स्वामीजी ने स्मित केले आणि म्हणाले ‘नादान है, बच्चा’ आणि डोळे मिटून पुन: समाधिस्थ झाले. 

Sunday, April 6, 2014

कचरा


कचरा आम्हाला  आवडतो
आमच्या  घरात कचरा
गल्लीत कचरा
रस्त्यावर कचरा
नाक्यावर कचरा
अड्यावर  कचरा
स्टेशन वर कचरा

जिथे पहा तिथे
कचराच कचरा.

विदेशी कचरा
जास्तस आवडतो
कचऱ्याची दलाली
आम्ही आनंदी घेतो.


पडणारी विमाने असो
कि जंग लागलेली  जहाजे
किंवा बुडणाऱ्या डुब्या
देशाची सुरक्षा सुद्धा
करतो विदेशी कचरा .

सडलेल्या द्राक्षांचा
सुवास दरवळला
झिंगून डुक्कर
कचऱ्यात   पहुडला
परमानंदी टाळी
त्यास लागली.
कचऱ्याचा जयघोष
आकाशी दुमदुमला.