Tuesday, April 22, 2014

आजोबा तुम्ही पुअर आहात का?

(माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना, त्याचाच शब्दात).

माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात, तिला, पण सावधान राहा,  वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र  खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे.

रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत?  जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ. तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही?  आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे.  आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही. खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा, तुमच्या कडे कार नाही का?  मी म्हणालो,  स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’. खैर, हलवाईच्या दुकाना  जवळ  पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे).   मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते.



अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने  शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे  क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच पुटपुटली,  जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का? 

No comments:

Post a Comment