Thursday, June 30, 2016

पे कमिशन

गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी  खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही.  बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी.  बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे  दिनोंं कि सुरुवात झाली. 


कढईतल्या तेलात आज 
पकौडे नाही नाचले.

चहाच्या कपबश्या आज 
टेबलावर नाही खिदळल्या .

रंगीत बर्फी हि आज 
स्वाद हरवून  बसली. 

बाबूंच्या  नशिबी आज 
झाली बुरे दिनों कि शुरुवात. 

Thursday, June 23, 2016

६३ गुणांचा योगा + योगयाला योगायोगच म्हणातात ना!  नमोजी प्रधान सेवक झाले आणि संपूर्ण जगाने २१ जून रोजी  योग दिवस साजरा केला. नमोजींची  छाती  ५६ इंचां पासून ७२  इंचाची झाली असेल. कदाचित्  या पेक्षा जास्ती हि. पण गेल्या ३० वर्षात अस्मादिकांचा छातीचा घेर कमी होत गेला आणि पोटाचा वाढत गेला.  नमो सारखे योग करणे अस्मादिकांना  तरी  शक्य होणार नाही.  

योग म्हणजे जमा, जोड किंवा अंकांचा खेळ, काही हि म्हणा. असाच एक योगा + योग माझ्या आयष्यात ३० वर्षांपूर्वी आला. ३६ गुणांच्या जाळयात न कळत अडकलो.  काय  करणार, जूनचा महिना होता बाहेर चक्क ४५% तापलेले होते. अंगाची भयंकर लाही लाही होत होती. आमच्या नावाचे कुंकू कपाळावर लाऊन सौभाग्यवती शीतल पावसाळी वार्या सारखी अस्मादिकांच्या आयुष्यात आली.   गृहप्रवेश करताना सौ. एखाद्या महाराणी सारखी शोभत होती. अस्मादिकांना हि आपण कुणी तरी महाराजा आहोत असा भास झाला.  त्या वेळी जाणती  पुरुष मंडळी गालातल्या गालात का हसत होती, याचे रहस्य त्या घटकेला कळले नाही. कळणार तरी कसे, लग्न जुळविणार्या ब्राम्हणाने चक्क ३६ गुण जुळविले होते. आता अस्मादिकांना काय माहित होते, राणीला राजापेक्षा आज्ञाधारक गुलामच अधिक प्रिय असतात. जिथे सीजर सारख्या जगत्जेत्याला महाराणी क्लिओपात्रा समोर गुलाम बनावे लागले, तिथे आमच्या सारख्या अकिंचन माणसाचा किती वेळ निभाव लागणार होता. बुद्ध आणि नमो प्रमाणे घर त्याग करण्याची हिम्मत हि अस्मादिकात नव्हती.  शिवाय आमचे आदर्श मनु महाराजांनी म्हंटलेच आहे,"यस्य पूज्यन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:".  बहुतेक स्वत:च्या प्रिय पत्नीला प्रसन्न करण्यासाठीच त्यांनी असे म्हंटले असावे. (पहिला जोरू का गुलाम बहुधा मनु महाराज असावे) त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला.   

यथाशीघ्र ३ गुणांना ३ गुणात बदलण्याचा प्रयत्न सुरु केला. सासू-सासरा, साळी-साला सौच्या सर्व माहेरच्या मंडळीना प्रसन्न केले. स्वाभाविकच होते,  घरात आनंदाचे वातावरण पसरले. सौ.ची गुलामगिरी करण्यातच संसाराचे खरे सुख दडलेले आहे, हे लवकरच कळले. यथाशीघ्र घरातले सर्व अधिकार राणीसाहेबांच्या हाती सुपूर्द केले आणि चिंतामुक्त झालो. अद्याप हि राणीसाहेब विदेश मंत्रालयापासून ते गृह मंत्रालय, व्यवहार मंत्रालयापासून ते खर्चिक मंत्रालय.  सर्व भूमिका आनंदाने पार पाडत आहे. आमचे कार्य फक्त रेवेन्यु मंत्रालय अर्थात पगार सौच्या हातात देणे एवढेच आहे. एक मात्र  खरं, एवढ्या वर्षात अस्मादिकांचा मासिक भत्ता अर्थात जेबखर्चीचे काय करतो, कधी विचारले नाही. (तशी ती हिशोबात पक्की आहे, रिक्ष्याचे, मेट्रोचे या शिवाय दोन वेळच्या चहाचे १० रुपये जोडून महिन्याचा खर्च निर्धारित करते). शिवाय अस्मादिकांचे स्वास्थ्य चांगले राहावे याची हि विशेष काळजी घेते. या बाबतीत तरी ती सावित्रीपेक्षा हि दोन पाउले पुढे आहेच. अनेकदा यमराजाच्या पाशापासून आमची सुटका केली आहे.  ६३ गुणांचीच कृपा म्हणा.  

नमोच्या योगाचा देशाला काय फायदा होईल, सांगता येत नाही. पण ६३ गुणांचा योग जुळवून अस्मादिकांनी मात्र आपले आयुष्य सुखी केले आहे. असो. 


टीप:  लेख  काल्पनिक आहे.  शिवाय आमची सौ. अस्मादिकांचे लेख कधीच वाचत नाही. 

Sunday, June 19, 2016

पाव भाजीची गोष्टगेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी  तिची दिल्लीची  पाव भाजी खाण्याची इच्छा  राहून  गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला  न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे. वयाने मोठा झालो असलो तरी  एखाद्या शैतान मुलासारखे दुसर्यांची विशेष करून बालगोपाळांची फिरकी घ्यायला अजूनही आनंद मिळतो. सौ.ला आमची कल्पना काही विशेष आवडली नाही. पण तिने विरोध हि केला नाही फक्त एवढेच म्हंटले, मी काही यात मदत करणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा. 

रविवारी सकाळी चहा पिऊन, जवळपास ६ वाजता भाज्या चिरायला घेतल्या.  घरी बाजी चिरण्यासाठी लाकडाचा ट्रे आहे. चाकूने बारीक बारीक भाज्या चिरायचे ठरविले. सर्व प्रथम ३-४ बटाटे (२५०ग्राम) बारीक चिरले, नंतर लाल भोपळा आणि दुधी भोपळा (प्रत्येकी २५० ग्राम) वरचे जाड साल काढून बारीक चिरला.  एक वांगे (वरचे साल काढून टाकले) बारीक चिरले. वांग्यामुळे भाजीला एक वेगळा तेज स्वाद येतो. एक फुलगोबी (फ्लावर-  ३०० ग्रामचे असेल) बारीक चिरले.  मटार २५०ग्राम (एक वाटी) घेतला. दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून टाकल्या. या शिवाय लोबियाच्या हिरव्या शेंगा (मराठीत काय म्हणतात माहित नाही- तश्या कुठल्याही शेंगा चालतील) बारीक चिरून टाकल्या. ५ लिटरचे कुकर भाज्यांनी भरून गेल्यावर भाज्या कापणे बंद केले.  भाज्या चिरायला १ तास लागला. 

 
आता दीड गिलास पाणी टाकून कुकर गॅस वर ठेवले.   एक पूर्ण लसूण,८-१० हिरव्या मिरच्या आणि १ इंच अदरक यांची पेस्ट  तैयार करून घेतली. अर्धा किलो टमाटर (आंबट वाले नको) आणि अर्धा किलो कांदे बारीक चिरले. या पैकी काही फोडणी साठी आणि काही नंतर सर्व करण्यासाठी. एक जुडी कोथिंबीरआणि तीन लिम्बांचे चार-चार तुकडे करून ठेवले.  दोन शिट्या   झाल्यावर कुकर गॅस वरून उतरवून घेतले. तो पर्यंत चिंकीचे  हि घरात पदार्पण झाले होते. काका कशी भाजी बनवितात आहे,हे पाहण्यासाठी स्वैपाकघरात आली. त्या वेळी मी पनीर (२५० ग्राम) बारीक चिरीत होतो. तिला पाहताच मी गुगली फेकली, म्हणालो चिंता करून नको तुझ्या आवडीच्याच भाज्या आहेत, यात फ्लावर, बटाटे, बिन्स आणि पनीर  आहे.  शिवाय माझ्या सारखा अडाणी तुझ्या सारख्या डॉक्टरीण बाईला मूर्ख बनवू शकतो का? काका तू किनई,.... म्हणत ती बाहेर पडली. तिने कुकर उघडून  पाहण्याची जुर्रत केली नाही. हायसे वाटले.  आता वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. घरात एक मोठी कढई आहे. ती गॅस वर ठेवली. २-३ डाव तेल टाकले. एक चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडलल्या वर अदरक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. नंतर कांदे घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर, टमाटर टाकले. टमाटरला तेल सुटे पर्यंत ४-५ मिनिटे लागतातच. तो पर्यंत वाट पहावीच लागते. घाई केल्यास टमाटर व्यवस्थित तळल्या जात नाही. अपेक्षित स्वाद हि मिळत नाही.  कुकर उघडून, एका पळीने भाजी ढळवून काढली.  टमाटरला तेल सुटू लागल्यावर, १ मोठा चमचा, हळद, तिखट आणि गरम मसाला आणि २ चमचे धने पूड त्यात घातली. नंतर  भाजी घातली.  आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून जास्त पाणी घातले नाही. नंतर बारीक चिरलेले पनीर त्यात घातले. एक उकळी आल्यावर तीन चमचे MDH पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ त्यात घातले. २-३ मिनिटानंतर गॅस बंद केला. कुठलाही पदार्थ झाल्यावर चिरंजीवाला स्वाद पाहण्यासाठी  बोलवतोच. त्याची पावती मिळाली म्हणजे पदार्थ चांगला झाला आहे, हे समजावे. त्यांनी टेस्ट करून पावती दिली.  मी  स्वैपाक घरातून बाहेर आलो. घामाघूम झाल्यामुळे सरळ स्नान घरात जाऊन आंघोळ केली.  तो पर्यंत सौ. ने स्वैपाकघराचा ताबा घेतला होता.  घरात काढलेल्या लोण्यात पाव परतून पावभाजी सर्व केली. चिंकीला  पाव भाजी भारी आवडली.  तरी हि तिने म्हंटले, मला माहित आहे काका, तुम्ही निश्चित मला न आवडणार्या भाज्या यात घातल्या असतील. आम्ही सर्व जोरात हसलो... Tuesday, June 14, 2016

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोलहिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील  सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो.  पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी  दिवसात तर बाहेरच्या जगाशी  संबंध हा नेहमीच तुटतो.    

या भागात  वसाहत विरळ आहे.  इथले लोक  उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे. झोल, हा तांदूळापासून बनणारा पोष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, शिवाय बनवायला अत्यंत सौपा. तांदूळा खेरीज  मक्याच्या कणसाचे दाणे किंवा सोयाबीन  इत्यादी  कडधान्याचा वापर हि झोल बनविताना होतो. नुसत्या तांदुळाचा हि झोल बनविता येतो. 

साहित्य: तांदूळ २ वाट्या (तुकडा तांदूळ जास्ती चांगला), मक्याच्या कणसाचे दाणे १ वाटी, मेथी दाने ६-७, काळी मिरी जिरे पूड १ चमचा किंवा स्वादानुसार आणि मीठ. (जिरे मिरे पुडच्या जागी  चाट मसाला हि वापरू शकतात किंवा दोन्ही हि).  लोणी काढलेली छाछ, किंवा १/२ किलो दह्याची थोड़े पानी टाकून केलेली लस्सी किंवा बाजारात मिळणारी अमूलची लस्सी ४०० gmचे २ पॅकेट.

गावात हा पदार्थ  चुल्ह्या वर बनवितात. पण शहरी माणसाजवळ टाईम नाही व शिवाय कुकर हि घरी असतोच. 

आधी मक्याच्या दाण्यांना एका खलबत्यात थोडे कुटून घ्या. एका दाण्याचे २-३ तुकडे झाले तरी चालतील.   कुकरमध्ये तांदूळ आणि मक्याचे कुटलेले दाणे आणि मेथी दाणा टाकून  दीड गिलास पाणी टाकून गॅस वर ठेवा. एक सिटी झाल्यावर गॅस बंद करून, थोडे थंड झाल्यावर भाताला पळीने घोटून घ्या. थोडी लस्सी त्यात घाला. नंतर  मंद गॅसवर ठेऊन हळू-हळू सर्व लस्सी त्यात घाला. (अंदाजाने आपल्याला जास्त पातळ आणि जास्त घट्ट झोल करायचा नाही आहे). पळीने सतत चालविणे आवश्यक आहे अन्यथा लस्सी फाटू शकते. नंतर त्यात जिरे-मिरे पूड आणि स्वादानुसार मीठ हि टाका. (सर्व करताना चाट मसाला हि टाकल्या जाऊ शकतो).  उकळी आल्यावर गॅस बंद करा.  

उन्हाळ्याच्या दिवसात हा पेय थंड करून आणि हिवाळ्यात गरमागरम पिण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात फ्रीज मध्ये दोनेक दिवस झोल सहज टिकतो. 

Saturday, June 11, 2016

चिअर्स सुंदरीची व्यथा कथा(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो). 

अत्यंत तोडके कपडे घातलेल्या, ३६-२४-३६ कमनीय देहयष्टीच्या या चिअर्स सुंदरी त्यांच्या टीमच्या फलंदाजाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारा सोबत  मंचकावर येऊन आपल्या  देहाचे प्रदर्शन करत नृत्याचे  हावभाव करतात. दर्शक त्यांचे  नर्तन पाहून शिट्या वाजवितात, टाळ्या पिटतात.  जो पर्यंत टीम जिंकत राहते, चिअर्स सुंदरी हि टीम सोबत विमानात प्रवास करतात, उंची हॉटेलात राहतात, बोनस, उपहार आणि अन्य अनेक पुरस्कारांचा वर्षाव या सुंदरींवर होत असतो. पण एकदा टीम हरली कि चिअर्स सुंदरीं हि बेरोजगार होतात.  आपल्या टीमचा  जोश टिकून राहो, या साठी काही चिअर्स सुंदरी देहासोबत  आत्मा  हि विकायला सदैव तैयार असतात. 

पूर्वी आपल्या देश्यात  राजे-महाराजे, आंग्ल भाषेत निपुण असे  अभिजात्य जन क्रिकेट  खेळायचे.  दिपाली अश्याच एका अभिजात्य टीमची चिअर्स सुंदरी होती. टीम सोबत विमानाचा प्रवास, उंची हॉटेलात राहणे, सतत उंची उपहारांचा वर्षाव, याची तिला सवयच होती. तीही आपले सर्वस पणाला लाऊन अभिजात्य टीमचा उत्साह वाढवायची. त्या साठी निर्लजपणे देहाचे प्रदर्शन करायला तिला किंचितहि लज्जा कधी वाटली नाही. 

पण म्हणतातना, दैव गति अति न्यारी.  गिरच्या  जंगलातल्या रहिवासिंच्या अडाणी, अशिक्षित टीम ने अभिजात्य टीमचा पार धुव्वा उडविला. विराट आणि गेल ज्याच्या  समोर पाणी भरतील असा जंगली टीमचा कप्तान रक्त पिपासू राक्षस म्हणून कुप्रसिद्ध असा चहावाला एकटाच एवढे चौकार आणि षटकार मारायचा की टीमच्या दुसर्या फलंदाजांना मैदानात उतरण्याची गरजच पडायची नाही.  गिर टीमच्या पूर्ण कपडे घातलेल्या अडानी, अशिक्षित आंग्ल भाषेच्या गंध नसलेल्या  चिअर्स सुन्दरिंच्या जंगली नृत्यावर दर्शक शिट्या आणि टाळ्या का वाजवितात  हेच दीपालीला कळत नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून अभिजात्य टीम सतत पहिल्याच  राउंड मध्ये पराजित होत असल्यामुळे दीपालीचे विमानात प्रवास करणे, उंची हॉटेलात राहणे, परदेसी दौरे सर्वच बंद झाले. इतक्या वर्षांत भरपूर माया जमविल्यामुळे जीवनयापनाची तिला चिंता नव्हती. पण मंचकावर नाचण्याचा आनंद आणि दर्शकांच्या शिट्या यांना हि ती मुकली. 

गिरच्या जंगली टीम कितीही चांगली खेळत असली तरी, पाताळेश्वर बळीराजाच्या देशात तिला जायला मज्जाव होता. अर्थातच अभिजात्य टीमने माझ्या सारख्या चिअर्स सुंदरीनींना हाताशी धरून त्या टीमचे नेतृत्व करणार्या चहावाल्याला नरराक्षस म्हणून सर्वत्र कुप्रसिद्ध  मिळवून दिली होती. 
  
पण आता तर हद्दच झाली. पाताळेश्वरने स्वत: गिरच्या जंगली टीमला निमंत्रण दिले. तिथे होणार्या मैत्री सामन्यामध्ये चहावाल्याने एवढे षडकार आणि चौकार मारले कि तिथल्या दर्शकांचे हात टाळ्या वाजविता-वाजविता लाली-लाल झाले. एवढ्या टाळ्या तर माझ्या देह  दिखाऊ निर्लज्ज नृत्यावर हि कधी दर्शकांनी वाजविल्या नसतील.  स्वाभाविकच आहे, माझ्या अंगाची लाही-लाही झाली. रागाने मी म्हंटले, हा कसला फलंदाज हा तर चिअर्स सुंदरी आहे, आम्हापेक्षा जास्त चांगला नाचतो. याला नाचण्यासाठी १00 पैकी  ११० गुण दिल्या जाऊ शकतात. केविलवाणा रडका चेहऱ्याने ती म्हणाली, आता तुम्हीच सांगा यात काय चूक म्हंटले मी. या घटकेला सर्व क्रिकेट प्रेमी  मला शिव्या देत माझी निंदा करीत आहे. असे म्हणत तिच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले. मनात आले रुमालाने तिचे अश्रू पुसावे, तिला सांत्वना द्यावी, पण विचार केला,  विराट कोहलीपेक्षा सरस  महान फलंदाजाला, चिअर्स सुंदरी म्हणणार्या या मूर्ख मुलीचे अश्रू मी का म्हणून पुसावे?  

टीप:  आजकाल  प्रधानमंत्री  आपल्या सोबत पत्रकारांना विदेश दौऱ्यावर घेऊन  जात नाही. 

Wednesday, June 8, 2016

मी आणि टीपू सुल्तान - एक आठवण

  मी १०-११ वर्षांचा असेल, तेंव्हाची गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी अर्थात भंडारा येथे आलो  होतो.  आजोबा वैद्य होते.  त्यांचे पूर्वज तीन-चार पिढ्यांपूर्वी आंध्र प्रदेशाहून भंडारा येथे आले होते. भंडार्याच्या नवाबाने त्यांना एक  वाडा बांधून दिला आणि काही शेती हि त्यांच्या  नावे केली होती. वाडा मोठा आणि दुमंजली होता.    

आजोळी पोहचल्यावर पहिले दर्शन एका भल्या मोठ्या कुत्र्याचे झाले. त्याला पाहून भीती वाटली. पण मामा म्हणाला, अरे हा  कुत्रा फकीर आहे, कुणाला काहीच करत नाही.  गल्लीतल्या मरतुकड्या कुत्रांसमोर हि शेपूट टाकतो.  मामाचे म्हणणे खरेच होते. छोटे-छोटे बच्चे सुद्धा त्या कुत्र्याला   त्रास द्यायला कमी करायचे नाही. कुणी त्याचे दात मोजायचे, कुणी शेपूट ओढायचे.  तरीही तो कुत्रा कधी कुणावर भुंकला कि चावला, असे झाले नाही. अश्या या शांत स्वभावाच्या कुत्र्याचे नाव टीपू सुलतान होते.  मी आधीच शंकाळू, मामाला विचारले, हा एवढा शांत आहे, मग याचे नाव टीपू सुल्तान का ठेवले?  मामानी किस्सा सांगितला.  टीपूच्या आईचे नाव चिंपी होते. तिला पाहताच गल्लीतले सर्व कुत्रे शेपूट टाकून पळ काढायचे. ती दरवाज्यावर उभी असेल तर कुणाची ही वाड्यात येण्याची हिम्मत व्हायची नाही. शेजारी-पाजारी तिला शेरनी म्हणायचे. पण दुर्भाग्य, टीपूचा जन्माच्या वेळी, कुणास ठाऊक काय झाले, चिंपी दगावली.  शेजारी राहणार्या एका मियांजीनी प्रेमाने  कुत्र्याचे  नाव टीपू असे ठेवले.  आशा होती टीपू ही चिंपी सारखा शेर होईल. पण  प्रेमळ आणि सहृदय माणसांनी त्याचे मुला सारखे पालन पोषण केले होते. बाहेरच्या कुत्र्यांसोबत जास्त मिसळू दिले नाही. चांगले पोषण मिळाल्यामुळे तो धडधाकड झाला पण कुत्रोचित गुणांना मुकला. आम्ही सर्व बाल-गोपाल त्याला टीपू फकीर म्हणून आवाज द्यायचो. 

मला घराच्या बाहेर उनाडक्या करण्याची भारी सवय. दिल्लीत संध्या काळी बहुतेक कंपनी बागेत फिरायला जायचो.  एक दिवस हुक्की आली. संध्याकाळी बाहेर फिरायचे ठरविले. पण कुणीच तैयार झाले नाही. कुठे जाणार, हे कुणालाही न सांगता मी एकटाच वाड्या बाहेर पडलो. टीपू हि मागे मागे आला.  वस्ती बाहेर थोडे दूर गेल्यावर रंगारी तलाव आहे. (सध्या मरण अवस्थेत). तलावात दोन्ही पाय टाकून, बसलो. तलावातल्या बद्कांकडे, कमळांच्या फुलांकडे आणि वर फिरणार्या पक्ष्यांकडे बघण्यात दंग असताना मला कळलेच नाही, केंव्हा सूर्यास्त झाला. अंधार झाल्यावर तंद्रा भंग झाली. त्या काळी  भंडाऱ्यात  वीज  होती. पण उन्हाळ्याच्या दिवसात २-३ दिवस लगातार वीज जाणे हि सामान्य बाब होती. एवढेच काय, ४ वर्ष आधी महाराष्ट्राचे वीज उत्पादनाचे माहेरघर चंद्रपूर येथे गेलो होतो.  ऐन उन्हाळ्यात दिवसाला १०-१० तास वीज गायब राहायची. वेगळा विदर्भ मागण्यामागचे मुख्य कारण बहुतेक हेच असावे.  

चहुकडे अंधार आणि शुकशुकाट.  शिवाय टीपू हि कुठे निघून गेला होता. या पूर्वी  कधीच काळाकुट्ट अंधार बघितलेला नव्हता. जुन्या दिल्लीत सूर्यास्त होताच, रस्त्यावरचे, दुकानांतले दिवे तर लागायचेच या शिवाय कंपनी  बागेतले  दिवे लागायचे. सर्वत्र झगमगाट व्हायचा. तसे हि जुन्या दिल्लीत रात्र झाली तरी उजेड  आणि चहल-पहल राहायचीच. साहजिकच आहे, १०-११ वर्षाचा ज्या मुलाने कधी अंधार बघितला नव्हता, त्याची किती घाबरगुंडी उडाली असेल.  कल्पना करणे शक्य नाही.   

काय करावे काही सुचेनासे झाले. पण म्हण आहे ना, मरता क्या न करता. अंदाजाने वस्तीच्या दिशेने चालायला सुरवात केली. थोड्यावेळ चालल्यावर  वाटले,  वाट चुकलेली आहे. पुन्हा मागे फिरून रंगारी तलावा जवळ पोहोचलो.  ऐकलेल्या भूत-प्रेतांच्या गोष्टी आठवू लागल्या. भीतीने अंग थरथरू लागले होते. अर्धवट पाठ असलेली रामरक्षा मनातल्या मनात म्हणत, आता कुठल्या दिशेने जायचे हा विचार करीत असतना, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आयुष्यात पहिल्यांदाच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून भीती वाटण्याजागी, आनंद झाला.  तो कुत्रा टीपूच होता. माझ्या जवळ उभा राहून शेपटी हलवू लागला. मला हि कळत नव्हते काय करायचे. थोडा वेळ असाच गेला.  मी त्याला म्हणालो रस्ता विसरलो आहे, तूच घेऊन चल मला. टीपूला काही कळले असेल कि नाही, सांगता येत नाही. पण बहुतेक कंटाळून तो घराच्या दिशेने चालू लागला. मी हि त्याच्या मागे मागे. अंधार झाल्यावर माझी शोधाशोध सुरू झाली होतीच. एका हातात टाॅर्च घेतलेला मामाही रस्त्यात भेटला. अनोळखी जागेत, एकट्याने उनाडक्या करणार्या मुलाची कान पिळणी सर्वानीच केली. मी रस्ता भटकलो होतो हे कुणालाही  सांगायची हिम्मत झाली नाही. पण कधी कधी वाटते त्या दिवशी टीपू बरोबर नसता तर???

Sunday, June 5, 2016

गाढवा समोर वाचली गीता - गोंधळ घालणारा गाढव ?
गाढवा समोर वाचली  गीता,
कालचा गोंधळ बरा होता. 


हि  मऱ्हाटी म्हण कित्येक वेळा वाचली किंवा ऐकली असेल.  नेहमीच मनात एक प्रश्न उभा राहतो,  गाढवाला  मिठाच्या  आणि कापूसाच्या  गोणीतला फरक कळला नाही.  कापूस घेऊन पाण्यात उतरल्या मुळे त्याची कंबर मोडली. गाढवाला  अतोनात कष्ट सहन करावे लागले.  जर गाढवाला  मीठ आणि  कापूस  यातला फरक माहित असता तर  तो कापूसाची गोणी घेऊन नदीत उतरला नसता.  गाढव अडाणी होता, पण अडाणी माणसाला गीता किंवा  उपदेशातले  काही समजले नाही तरीही  तो  गोंधळ निश्चित घालणार नाही. बहुधा अडाणी लोक आपले ज्ञान वाढविण्यासाठी काही ना काही समजण्याचा प्रयत्न निश्चित करतात. अडाणी माणसांच्या व्यतिरिक्त मानसिक विकास न झालेल्या मंदबुद्धी आणि काही कारणांमुळे  मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसांना हि लोक मूर्ख म्हणतात. पण अश्या माणसांसमोर जाऊन  कुणी विद्वान किंवा समजदार व्यक्ती  निश्चित  गीता वाचणार नाही.   

समोर प्रश्न उभा राहतोच, या म्हणीत गाढव कुणाला म्हंटले  आहे.  एक जुनी कथा बहुतेक एका धार्मिक चेनल वर ऐकली होती, थोडी बदलून सांगतो - एकदा एका ज्ञानी माणसाने बघितले, गाढवावर ठेवलेल्या गोणीच्या एका बाजूच्या कप्यात दोन तेलाचे पीपे ठेवले होते, दुसर्या बाजूच्या कप्यात गाढवाचा मालक माती भरत होता. हा विचित्र प्रकार बघून त्या ज्ञानी माणसाला राहवले नाही. तो गाढवाच्या मालकाजवळ गेला, त्याला विचारले, हे काय करतोस आहे?  दिसत नाही माती भरतो आहे. पण का? एवढे कळत नाही, दोन्ही बाजूंचे वजन एकसारखे असेल तर गाढवाला कमी त्रास होईल.  ज्ञानी माणसाला हसू आले, तो म्हणाला, मूर्खा, माती उकरून भरण्याचे कष्ट करण्या एवजी, त्या तेलाच्या दोन पीप्यांपैकी एक पीपा दुसर्या बाजूला ठेव. दोन्ही बाजूनां सारखे वजन होईल. गाढवाला हि जास्त ओझें  वाहावे लागणार नाही. गाढवाच्या मालकाला राग आला, त्याने विचारले, मालक कोण, मी. गाढवाचा पाठीवर किती ओझें ठेवायचे याचा निर्णय करणार, मी. तू कोण? गाढवाचा नातेवाईक आहे का? गाढवाची  दया येत असेल तर तुझ्या पाठीवर ठेवतो, ओझें .  एवढे सर्व ऐकल्यावर, ज्ञानी माणूस निमूटपणे तेथून चालता झाला.   

गाढवाचा मालक मूर्ख नव्हता, शहाणा होता. त्याला माहित होते, गाढवाच्या दोन्ही बाजूनां एक सारखे वजन ठेवायचे असते.  तो दोन्ही बाजूंना तेलाचा एक-एक पीपा ठेऊ शकत होता. पण त्याने तसे केले नाही. गाढवाला त्रास देण्यासाठी, त्याच्या पाठीवर  जास्ती वजन ठेवले.  त्या साठी त्याला हि कष्ट करावे लागले.  पण गाढवाला कष्ट  देण्यात त्याला जास्ती आनंद मिळत असावा.  ज्ञानी माणूस त्याच्या समोर गीता वाचायला गेला, गाढवाच्या मालकाने त्याच्या समोर गोंधळ घातला आणि त्याला पळवून लावले.   

आता आपल्याला कळलेच असेल, गोंधळ घालणारी गाढवे कशी असतात. अडाणी, अशिक्षित माणसांपेक्षा शिक्षित सवरलेली माणसेच जास्त गोंधळ घालतात. अश्या लोकांसाठीच समर्थ म्हणतात परपीडेचेंं मानी सुख. परसंतोषाचें मानी दु:ख. तो एक मूर्ख.  अर्थात  दुसर्याला कष्ट देण्यात ज्याला आनंद मिळतो आणि दुसर्याला  सुखी पाहून ज्याला  दु:ख होते, तो एक मूर्ख.