Wednesday, June 8, 2016

मी आणि टीपू सुल्तान - एक आठवण

  मी १०-११ वर्षांचा असेल, तेंव्हाची गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी अर्थात भंडारा येथे आलो  होतो.  आजोबा वैद्य होते.  त्यांचे पूर्वज तीन-चार पिढ्यांपूर्वी आंध्र प्रदेशाहून भंडारा येथे आले होते. भंडार्याच्या नवाबाने त्यांना एक  वाडा बांधून दिला आणि काही शेती हि त्यांच्या  नावे केली होती. वाडा मोठा आणि दुमंजली होता.    

आजोळी पोहचल्यावर पहिले दर्शन एका भल्या मोठ्या कुत्र्याचे झाले. त्याला पाहून भीती वाटली. पण मामा म्हणाला, अरे हा  कुत्रा फकीर आहे, कुणाला काहीच करत नाही.  गल्लीतल्या मरतुकड्या कुत्रांसमोर हि शेपूट टाकतो.  मामाचे म्हणणे खरेच होते. छोटे-छोटे बच्चे सुद्धा त्या कुत्र्याला   त्रास द्यायला कमी करायचे नाही. कुणी त्याचे दात मोजायचे, कुणी शेपूट ओढायचे.  तरीही तो कुत्रा कधी कुणावर भुंकला कि चावला, असे झाले नाही. अश्या या शांत स्वभावाच्या कुत्र्याचे नाव टीपू सुलतान होते.  मी आधीच शंकाळू, मामाला विचारले, हा एवढा शांत आहे, मग याचे नाव टीपू सुल्तान का ठेवले?  मामानी किस्सा सांगितला.  टीपूच्या आईचे नाव चिंपी होते. तिला पाहताच गल्लीतले सर्व कुत्रे शेपूट टाकून पळ काढायचे. ती दरवाज्यावर उभी असेल तर कुणाची ही वाड्यात येण्याची हिम्मत व्हायची नाही. शेजारी-पाजारी तिला शेरनी म्हणायचे. पण दुर्भाग्य, टीपूचा जन्माच्या वेळी, कुणास ठाऊक काय झाले, चिंपी दगावली.  शेजारी राहणार्या एका मियांजीनी प्रेमाने  कुत्र्याचे  नाव टीपू असे ठेवले.  आशा होती टीपू ही चिंपी सारखा शेर होईल. पण  प्रेमळ आणि सहृदय माणसांनी त्याचे मुला सारखे पालन पोषण केले होते. बाहेरच्या कुत्र्यांसोबत जास्त मिसळू दिले नाही. चांगले पोषण मिळाल्यामुळे तो धडधाकड झाला पण कुत्रोचित गुणांना मुकला. आम्ही सर्व बाल-गोपाल त्याला टीपू फकीर म्हणून आवाज द्यायचो. 

मला घराच्या बाहेर उनाडक्या करण्याची भारी सवय. दिल्लीत संध्या काळी बहुतेक कंपनी बागेत फिरायला जायचो.  एक दिवस हुक्की आली. संध्याकाळी बाहेर फिरायचे ठरविले. पण कुणीच तैयार झाले नाही. कुठे जाणार, हे कुणालाही न सांगता मी एकटाच वाड्या बाहेर पडलो. टीपू हि मागे मागे आला.  वस्ती बाहेर थोडे दूर गेल्यावर रंगारी तलाव आहे. (सध्या मरण अवस्थेत). तलावात दोन्ही पाय टाकून, बसलो. तलावातल्या बद्कांकडे, कमळांच्या फुलांकडे आणि वर फिरणार्या पक्ष्यांकडे बघण्यात दंग असताना मला कळलेच नाही, केंव्हा सूर्यास्त झाला. अंधार झाल्यावर तंद्रा भंग झाली. त्या काळी  भंडाऱ्यात  वीज  होती. पण उन्हाळ्याच्या दिवसात २-३ दिवस लगातार वीज जाणे हि सामान्य बाब होती. एवढेच काय, ४ वर्ष आधी महाराष्ट्राचे वीज उत्पादनाचे माहेरघर चंद्रपूर येथे गेलो होतो.  ऐन उन्हाळ्यात दिवसाला १०-१० तास वीज गायब राहायची. वेगळा विदर्भ मागण्यामागचे मुख्य कारण बहुतेक हेच असावे.  

चहुकडे अंधार आणि शुकशुकाट.  शिवाय टीपू हि कुठे निघून गेला होता. या पूर्वी  कधीच काळाकुट्ट अंधार बघितलेला नव्हता. जुन्या दिल्लीत सूर्यास्त होताच, रस्त्यावरचे, दुकानांतले दिवे तर लागायचेच या शिवाय कंपनी  बागेतले  दिवे लागायचे. सर्वत्र झगमगाट व्हायचा. तसे हि जुन्या दिल्लीत रात्र झाली तरी उजेड  आणि चहल-पहल राहायचीच. साहजिकच आहे, १०-११ वर्षाचा ज्या मुलाने कधी अंधार बघितला नव्हता, त्याची किती घाबरगुंडी उडाली असेल.  कल्पना करणे शक्य नाही.   

काय करावे काही सुचेनासे झाले. पण म्हण आहे ना, मरता क्या न करता. अंदाजाने वस्तीच्या दिशेने चालायला सुरवात केली. थोड्यावेळ चालल्यावर  वाटले,  वाट चुकलेली आहे. पुन्हा मागे फिरून रंगारी तलावा जवळ पोहोचलो.  ऐकलेल्या भूत-प्रेतांच्या गोष्टी आठवू लागल्या. भीतीने अंग थरथरू लागले होते. अर्धवट पाठ असलेली रामरक्षा मनातल्या मनात म्हणत, आता कुठल्या दिशेने जायचे हा विचार करीत असतना, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आयुष्यात पहिल्यांदाच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून भीती वाटण्याजागी, आनंद झाला.  तो कुत्रा टीपूच होता. माझ्या जवळ उभा राहून शेपटी हलवू लागला. मला हि कळत नव्हते काय करायचे. थोडा वेळ असाच गेला.  मी त्याला म्हणालो रस्ता विसरलो आहे, तूच घेऊन चल मला. टीपूला काही कळले असेल कि नाही, सांगता येत नाही. पण बहुतेक कंटाळून तो घराच्या दिशेने चालू लागला. मी हि त्याच्या मागे मागे. अंधार झाल्यावर माझी शोधाशोध सुरू झाली होतीच. एका हातात टाॅर्च घेतलेला मामाही रस्त्यात भेटला. अनोळखी जागेत, एकट्याने उनाडक्या करणार्या मुलाची कान पिळणी सर्वानीच केली. मी रस्ता भटकलो होतो हे कुणालाही  सांगायची हिम्मत झाली नाही. पण कधी कधी वाटते त्या दिवशी टीपू बरोबर नसता तर???

1 comment: