Sunday, June 5, 2016

गाढवा समोर वाचली गीता - गोंधळ घालणारा गाढव ?




गाढवा समोर वाचली  गीता,
कालचा गोंधळ बरा होता. 


हि  मऱ्हाटी म्हण कित्येक वेळा वाचली किंवा ऐकली असेल.  नेहमीच मनात एक प्रश्न उभा राहतो,  गाढवाला  मिठाच्या  आणि कापूसाच्या  गोणीतला फरक कळला नाही.  कापूस घेऊन पाण्यात उतरल्या मुळे त्याची कंबर मोडली. गाढवाला  अतोनात कष्ट सहन करावे लागले.  जर गाढवाला  मीठ आणि  कापूस  यातला फरक माहित असता तर  तो कापूसाची गोणी घेऊन नदीत उतरला नसता.  गाढव अडाणी होता, पण अडाणी माणसाला गीता किंवा  उपदेशातले  काही समजले नाही तरीही  तो  गोंधळ निश्चित घालणार नाही. बहुधा अडाणी लोक आपले ज्ञान वाढविण्यासाठी काही ना काही समजण्याचा प्रयत्न निश्चित करतात. अडाणी माणसांच्या व्यतिरिक्त मानसिक विकास न झालेल्या मंदबुद्धी आणि काही कारणांमुळे  मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसांना हि लोक मूर्ख म्हणतात. पण अश्या माणसांसमोर जाऊन  कुणी विद्वान किंवा समजदार व्यक्ती  निश्चित  गीता वाचणार नाही.   

समोर प्रश्न उभा राहतोच, या म्हणीत गाढव कुणाला म्हंटले  आहे.  एक जुनी कथा बहुतेक एका धार्मिक चेनल वर ऐकली होती, थोडी बदलून सांगतो - एकदा एका ज्ञानी माणसाने बघितले, गाढवावर ठेवलेल्या गोणीच्या एका बाजूच्या कप्यात दोन तेलाचे पीपे ठेवले होते, दुसर्या बाजूच्या कप्यात गाढवाचा मालक माती भरत होता. हा विचित्र प्रकार बघून त्या ज्ञानी माणसाला राहवले नाही. तो गाढवाच्या मालकाजवळ गेला, त्याला विचारले, हे काय करतोस आहे?  दिसत नाही माती भरतो आहे. पण का? एवढे कळत नाही, दोन्ही बाजूंचे वजन एकसारखे असेल तर गाढवाला कमी त्रास होईल.  ज्ञानी माणसाला हसू आले, तो म्हणाला, मूर्खा, माती उकरून भरण्याचे कष्ट करण्या एवजी, त्या तेलाच्या दोन पीप्यांपैकी एक पीपा दुसर्या बाजूला ठेव. दोन्ही बाजूनां सारखे वजन होईल. गाढवाला हि जास्त ओझें  वाहावे लागणार नाही. गाढवाच्या मालकाला राग आला, त्याने विचारले, मालक कोण, मी. गाढवाचा पाठीवर किती ओझें ठेवायचे याचा निर्णय करणार, मी. तू कोण? गाढवाचा नातेवाईक आहे का? गाढवाची  दया येत असेल तर तुझ्या पाठीवर ठेवतो, ओझें .  एवढे सर्व ऐकल्यावर, ज्ञानी माणूस निमूटपणे तेथून चालता झाला.   

गाढवाचा मालक मूर्ख नव्हता, शहाणा होता. त्याला माहित होते, गाढवाच्या दोन्ही बाजूनां एक सारखे वजन ठेवायचे असते.  तो दोन्ही बाजूंना तेलाचा एक-एक पीपा ठेऊ शकत होता. पण त्याने तसे केले नाही. गाढवाला त्रास देण्यासाठी, त्याच्या पाठीवर  जास्ती वजन ठेवले.  त्या साठी त्याला हि कष्ट करावे लागले.  पण गाढवाला कष्ट  देण्यात त्याला जास्ती आनंद मिळत असावा.  ज्ञानी माणूस त्याच्या समोर गीता वाचायला गेला, गाढवाच्या मालकाने त्याच्या समोर गोंधळ घातला आणि त्याला पळवून लावले.   

आता आपल्याला कळलेच असेल, गोंधळ घालणारी गाढवे कशी असतात. अडाणी, अशिक्षित माणसांपेक्षा शिक्षित सवरलेली माणसेच जास्त गोंधळ घालतात. अश्या लोकांसाठीच समर्थ म्हणतात परपीडेचेंं मानी सुख. परसंतोषाचें मानी दु:ख. तो एक मूर्ख.  अर्थात  दुसर्याला कष्ट देण्यात ज्याला आनंद मिळतो आणि दुसर्याला  सुखी पाहून ज्याला  दु:ख होते, तो एक मूर्ख.

No comments:

Post a Comment