Wednesday, September 22, 2021

भगवद्गीता : मध्यस्थ लक्षण


उद्योग, व्यापार, नौकरी, परिवार जिथेहि द्विपक्षीय व्यवहार आहे, तिथे विवाद होण्याची संभावना सदैव असतेच.  परस्पर  विवाद जर न्यायालयात गेले तर दोन्ही पक्षांत कटुता येते. पुन्हा व्यवहार करणे कठीण जाते. याशिवाय वेळहि भरपूर लागतो. अश्यावेळी मध्यस्थाच्या मदतीने विवादाचे दोन्ही पक्षांना मान्य असे समाधान काढले जाते.  दोन्ही पक्षांचा ज्या व्यक्ती/ संस्थेवर विश्वास असतो तो मध्यस्थाचे कार्य करतो. जुन्या दिल्लीत अनेक व्यक्ती पिढीजात मध्यस्थाचे कार्य करणारे आहेत. त्यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य असतो.  

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या ९व्या श्लोकात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीचे लक्षण दिलेले आहे.   

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥

मध्यस्थ हा सहृदय अर्थात कोमल मनाचा, दुसर्यांचे सुख-दुख ज्याला कळते असा असतो. मध्यस्थ  नेहमी उदासीन अर्थात तटस्थ राहतो. बंधू-बांधव, मित्र-शत्रू, धर्मात्मा आणि दुराचारी इत्यादी प्रति मध्यस्थाची बुद्धी सम असते. अर्थात तो कुणाचाही पक्ष घेत नाही निष्पक्ष राहून निर्णय देतो. मध्यस्थ कुठल्याही उपकारची इच्छा न ठेवता दोन्ही पक्षांचे भले चिंतणारा असतो.  
 
  


Tuesday, September 7, 2021

श्रीमद् भगवद् गीता: यज्ञ आणि कृषी


श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत  या मृत्यू  लोकात  कर्म  करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म  यज्ञ आहे.  कृषी कर्महि यज्ञ आहे. यज्ञाने प्रसन्न होऊन भूमाता शेतकर्याला भरपूर अन्न प्रदान करते. काही महिन्यांपूर्वी पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण या विषयावर एक लेख वाचला होता. त्यात रासायनिक शेतीहि एक मुख्य कारण दिले होते. पंजाबच्या प्रसिद्ध कैन्सर रेलचे उदाहरणहि दिले होते. भगवद् गीता वाचताना तिसर्या अध्यायातील १२व्या श्लोकाने माझे लक्ष वेधले आणि तो लेख आठवला,  श्रीकृष्ण म्हणतात:  

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥ ३.१२ 

यज्ञाने प्रसन्न होऊन देवता तुम्हाला इच्छित भोग  प्रदान करतात. पण देवांनी प्रदान केलेल्या भोगांत त्यांच्या हिस्सा न देणे हि  चोरी आहे.  

मनात प्रश्न येणारच शेतकरी भूमातेला काय परत करू शकतो. ती आपल्या सारखी जेवत नाही, अन्नातला तिचा हिस्सा तिला कसा देता येईल. उत्तर सौपे आहे,  अन्नापासून निर्मित मनुष्य आणि जनावरांची विष्ठा खताच्या रूपाने भूमातेला परत करता येते. तसेच शेतीसाठी वापरलेले पाणीही पुन्हा तलाव इत्यादी माध्यमाने तिला परत करता येते. प्रत्येक व्यवहार हा द्विपक्षीय असतो. एक पक्षीय व्यवहार म्हणजे चोरी. आपण पाहतोच आहे, शेतकरी पराली पुन्हा जमिनीला परत करण्याएवजी जाळून टाकतात, कारण शेत पुन्हा लवकर तैयार करायचे असते. अन्न निर्मित शेणखत आणि विष्ठा जमिनीला परत मिळत नाही. अधिक अन्नासाठी शेतकरी विषाक्त  रासायनिक खतांचा वापर करतात, पण हि  खते धरती माता प्रदत्त अन्न  नाही.  

देवांचा न्याय कठोर असतो, चोरांना क्षमा नाही. दरवर्षी अप्रिल, मई आणि ऑक्टोबर महिन्यात पंजाब हरियाणा सहित दिल्लीकरांचाहि भयंकर प्रदूषणमुळे दम घुटू लागतो. रासायनिक शेतीमुळे आज पंजाबच्या अधिकांश भागात जमिनीतले पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. पुढील काही वर्षांत बहुतेक आंघोळीलायकहि राहणार नाही. कुपित धरती विषाक्त अन्न प्रदान करू लागली आहे. दरवर्षी फक्त पंजाबात हजारो लोक कैन्सरग्रस्त होऊन मरतात. विषाक्त अन्न खाऊनहि कोट्यावधी लोक विभिन्न असाध्य  रोगांनी ग्रस्त होत आहे. भारतात  कैन्सर ने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी  तीव्र गतीने वाढत आहे.  असो. तात्पर्य एवढेच किमान कृषी विशेषज्ञांनी श्रीमद् भगवद् गीता वाचली पाहिजे. कर्म सिद्धांत समजला पाहिजे.