Saturday, October 27, 2018

सुरक्षा विमा आहे, साहेब?


कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा  बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता. रिक्षा चालकाने लगेच उत्तर दिले, साहेब विमा घेतलेला आहे, काळजी करू नका. चालक शेजारी बसलेला माणूस उद्गरला, गाढवा विम्याचे पैशे तू मेल्यावर तुझ्या बायकोला मिळतील आणि त्या पैश्याने ती तुझ्या सारखाच एक गाढव नवरा पुन्हा विकत घेईल. एकच हशा रिक्षात पिकला.  

काही वेळ विचार करून रिक्षा चालक म्हणाला, साहेब मला दोन मुले आहेत, सरकारी शाळेत शिकतात. बायको तीन-चार घरी झाडू-पोंंछा करून चार-पाच हजार घरी आणते. मला काही झाले तर, विम्याचे पैशे पोरांच्या शिक्षणाच्या कामी येतील, असा विचार करून मी बँक खाते उघडले आणि विमा हि घेतला.  त्याच्या उत्तराने आम्ही सर्व निरुत्तर झालो. 

घरी येऊन विचार केला. बँक खाते आणि १२ रुपयात मिळणारा सुरक्षा विमा, गरीब आणि अडाणी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत  क्रांती घडवितात आहे. तो हि आता आपल्या परिवाराचा, मुलांचा भविष्याचा सकारात्मक रूपेण विचार करू लागला आहे. 

Wednesday, October 24, 2018

हरवला माणूस



 

सुगंधित वार्याला 
कोवळ्या  उन्हाला
पावसाळी थेंबांना
झाला पारखा. 

  उंच इमारतीत
एसी वाळवंटात
 हरवला  माणूस.







 

Monday, October 22, 2018

रेल्वे अपघात: दोषी कोण


अमृतसर येथे रेल्वेच्या खाली येऊन अनेक लोक चिरडले गेले. रात्री अंधार झालेला होता, रेल्वे लाईनवर गाड्यांची ये-जा होती, तरी लोक रेल्वे लाईनवर उभे होते. रावण दहन आणि गाडीचे येणे एकत्र घडले. लोकांना फटाक्यांच्या आवाजात गाडीची शिटी ऐकू आली नाही आणि अपघात झाला. या भयावह अपघातासाठी एका दुसर्यावर दोषारोपण हि सुरु झाले.  पण खरे कारण काय आहे, या बाबत सर्वच मौन आहेत.  

पहिले कारण आपली शिक्षण व्यवस्था. आपल्या देशात शालेय शिक्षण म्हणजे 'रटंतु विद्या'. शाळेत विध्यार्थींना अनुशासित रीतीने कायद्याचे पालन करणे शिकवलेच जात नाही. विदेशात स्थानांतरीत झालेल्या एका नातलगाचा फोन आला. त्यांनी आपल्या मुलीला पहिल्या वर्गात टाकले होते. तिथे त्याच्या मुलीला पहिल्याच दिवशी वर्गातील मुलांना एका लाईनीत वर्गाचा बाहेर आणण्याचे काम दिले. वर्गातील प्रत्येक मुलाला आळीपाळीने हे कार्य करावे लागते. छोटेसे उदाहरण बोलके आहे. शाळेत पहिल्यादिवशी पासून अनुशासन काय असते, हे मुलांना शिकविले जाते. 

दुसरे मुख्य कारण, व्यवस्थेला कायद्याचे पालन जनते कडून करवून घ्यायचे असते, याचे भानच नाही. फक्त मोठा गुन्हा घडला कि व्यवस्थेला जाग येते. रस्त्यावर थुंकणार्यांवर, कचरा फेकणार्यांवर हेल्मेट न घालता बाईक चालविणार्यांवर क्वचितच कायद्याची कार्रवाई होते. रेल्वे फाटकावर तर विचित्र परिस्थिती असते. फाटक बंद झाल्यावर हि बाईक व सायकल वाले, पायी चालणारे रेल्वे लाईन क्रास करत राहतात अगदी गाडी जवळ येत पर्यंत. जिथे फाटक नसेल तर आपले वाहन गाडीपेक्षा जास्त वेगात चालते, हे दाखविण्याचा प्रयत्न वाहन चालक करतात. परिणाम दरवर्षी हजारो लोक मरतात. पादचारी मार्गावर दुकानदारांचे अतिक्रमण, रेल्वे लाईनच्या किनार्यावर अवैध बनलेल्या झुग्गी वस्त्या इत्यादीवर कधी व्यवस्थेची कार्रवाई झाल्याचे ऐकिवात नाही.  

सुरक्षा नियमांप्रती अनास्था हे तिसरे प्रमुख कारण. कुठला हि कार्यक्रम असो, सुरक्षा नियमांचे पालन केले पाहिजे, याची जाणीव कुणालाच नसते. कार्यक्रम सुरु होण्या अगोदर, त्या जागेतून सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग कोणते, दुर्घटना झाल्यास काय करावे, याचे मार्गदर्शन कधीच केले जात नाही. शाळा असो व कालेज, नौकरीच्या जागी- सरकारी असो वा निजी, साधी आग विझवण्याचे ज्ञान सुद्धा कुणालाच दिले जात नाही. एवढेच काय कमी, जेथून सरकारचा कारभार चालतो, अश्या इमारतीत हि सुरक्षा नियमांना डावलून इमारतीच्या आत अनेक अवैध निर्माण केले जातात. इमारत अग्नी पासून सुरक्षित आहे, याचे प्रमाण पत्र अनेक इमारतींच्या संदर्भात नाही. कधी आग इत्यादी लागली तर कर्मचारीच नव्हे तर मंत्र्यांचे जीव सुद्धा धोक्यात येतील अशी अवस्था आहे. पण कुणालाच चिंता नाही. 

आपल्या देशात आज अशी पिढी निर्माण झाली आहे, जी कुठल्याही कायद्याचे व नियमांचे पालन करत नाही. या पिढीला स्वत:च्या जीवाची सुद्धा चिंता नाही. परिणाम एकच, अश्या दुर्घटना होत राहतील. राजनेता एका-दुसर्यावर खापर फोडत राहतील. कुणाला तरी दोषी ठरवून, त्याच्यावर कार्रवाई होईल.  मुख्य कारण दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही.

Wednesday, October 17, 2018

प्रदूषण, पराली आणि दिल्ली


ऑक्टोबर महिना येताच दिल्लीत प्रदूषणावर चर्चा सुरु होते. वायु गुणवत्ता निदेशांक २०० वर अर्थात खतरनाक स्तरावर पोहचतो. त्यात जर पाऊस पडला नाही तर प्रदूषण अत्यंत खतरनाक स्तरावर अर्थात ३००च्या वर पोहोचतो. आज हि दिल्लीत अधिकांश ठिकाणी वायु गुणवत्ता निदेशांक ३००च्या वर आहे. त्यात भर म्हणजे शेतकरी पराली (धानचे अवशेष) जाळणार आणि दिवाळीत फटाके हि फुटणार. 

शेतकर्यांनी पराली शेतात जाळली नाही पाहिजे आणि दिवाळी फटाके उडविले नाही पाहिजे, हि बोंब मिडीया पासून ते व्यवस्थेच्या स्तरावर जोरात सुरु होते. फटाके फोडणे हि धार्मिक विधी नाही. प्रदूषण मुक्त दिवाळी चळवळीला जोर चढतो. परालीच्या अनेक उपयोगांवर दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भारी चर्चा होते. पराली जाळणार्या शेतकर्यांवर कार्रवाईचे आदेश हि दिले जातात. तरीही  शेतकरी मोठ्या प्रमाणात पराली  जाळतातच.

कालच मेट्रो प्रवासात एका जाट चौधरीला पाहून तोंडावर मास्क बांधलेला एक तरुण म्हणाला हे लोक शेतात पराली जाळतात आणि त्याचे परिणाम दिल्लीत आम्हाला भोगावे लागतात. चौधरीच्या कानात त्या तरुणाचे शब्द पडले. त्याचे डोके भडकले. चौधरी  आवाज चढवीत म्हणाला, वर्षातून १५ दिवस आम्ही पराली जाळतो, त्याचा तुम्हाला त्रास होते, आणि दिल्लीत लाखो कार काय रोज प्रदूषण मुक्त सुगंधित स्वच्छ वारा सोडतात? दिल्लीतील वायू प्रदूषण वार्या सोबत हरियाणा पंजाबात पोहचते त्याची कधी चर्चा होते का? सत्य कटू असतेच. तो तरुण निमूटपणे गप्प बसला. 

आजच्या घटकेला दिल्लीत कोटीहून जास्त वाहने आहेत. त्यात ३२ लाखाहून जास्त कार आहेत. त्यात ९० टक्के कार वाले आयकर हि भरत नाही, हे वेगळे. सरकार हि पेट्रोल/ डीजेल वर सबसिडी देते. मोठ्या महागड्या गाड्या तर डीजेल वरच चालतात. बँक हि कारसाठी स्वस्तात लोन देतात. "स्वस्तात कार विकत घ्या आणि प्रदूषण पसरवा' बहुतेक हीच व्यवस्थेची नीती. दुसरी कडे पराली जाळण्याने वायू गुणवत्ता निदेशांक जास्तीस्जास्त फक्त २५ ते ५० अंक वाढत असेल. तरीही शेतकर्यांवर प्रदूषणचे खापर फोडल्या जाते. मला तरी हा सर्व प्रकार विचित्र वाटतो.  

व्यवस्थेला जर दिल्लीत खरोखरच प्रदूषण कमी करायची इच्छा असेल तर पहिले काम, कारांची  संख्या कमी करण्यासाठी पाउले उचलणे.  त्यासाठी कारांच्या किमती वाढविणे, पार्किंग शुल्क वाढविणे व पेट्रोल वर सबसिडी बंदच नव्हे तर भाव हि किमान १०० ते १५०  रु केले तरी काही फरक पडणार नाही.  बाकी पेट्रोलचे भाव वाढवून डीजेल वर चालणार्या कार वर कर लावून डीजेलचे भाव कमी ठेवता येणे सहज शक्य आहे. तो  पैसा मेट्रोचा विस्तार  व सार्वजनिक बस व्यवस्था सुधारण्यासाठी वापरता येईल. दिल्लीत डीटीसीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. डीटीसीपाशी १९९७ मध्ये ८५०० होत्या आज फक्त ४५०० हजार आहे. दिल्लीची जनसंख्या हि ८५ लाख पासून २.५० कोटी झालेली आहे. अर्थात मोठ्या प्रमाणावर नवीन बसेस विकत घेण्याची गरज आहे. नवीन मेट्रो रूट्स वर त्वरित कार्य सुरु होणे गरजेचे. परंतु प्रत्यक्षरूपेण असे होताना दिसत नाही. मेट्रो फेज -IV वर दिल्ली सरकार अजून पर्यंत निर्णय घेऊ शकली नाही आहे. फक्त प्रदूषण साठी कधी पराली, कधी दिवाळी, तर कधी राजस्थान मधून येणार्या धुळीला दोष दिला जातो. पराली जाळण्याचे मी कधीही समर्थन करणार नाही. पण पेट्रोलवर सबसिडी देण्याजागी, परालीची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने शेतकर्यांना सबसिडी देणे जास्त गरजेचे, मला तरी असेच वाटते. असो.

Tuesday, October 16, 2018

तीन वात्रटिका : मिटू-मिटू पोपट बोला


मिटू-मिटू पोपट बोला 
त्याला हार्ट अटेकच आला.
पाहुनी नर्स देखणी 
तो कोमातच गेला. 

विवाह्बाह्य संबंधाना  
त्याने दुजोरा दिला.

स्त्री संग एकांताचे 
फळ आता भोगा.

पोपट बोला 
मिटू मिटू.

वकील बोला 
नोटीस आला. 

पोलीस बोला 
चला सासरी.



Friday, October 12, 2018

पुरुषार्थ आणि प्रारब्ध: एकाच नाण्याच्या दोन बाजू


कालच सद्गृहस्थ मेट्रोत भेटले. ४० मिनिटांचा प्रवास. सहज चर्चा सुरु झाली. ते म्हणाले ध्येय प्राप्तीसाठी पुरुषार्थाला प्रारब्धाची जोड लागतेच. प्रारब्ध म्हणजे मागील जन्मांचे संचित कर्म- चांगले आणि वाईट दोन्ही. काही लोक आपल्या क्षेत्रात विशेषज्ञ असतात पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना पुरुषार्थ दाखविण्याची संधी मिळत नाही. काहीना लवकर संधी मिळते. उदा. सचिन तेंडुलकरला अल्प अनुभव कोवळे वय तरीही भारतीय संघात जागा मिळते, हे प्रारब्ध कर्मांचे फळ. काही खेडाळू दहा-दहा वर्ष रणजी खेळतात. हजारो रन हि बनवितात पण त्यांना कधी संधीच मिळत नाही. 

पुरुषार्थ हि दोन प्रकारचा असतो. सकारात्मक पुरुषार्थ आणि नकारात्मक पुरुषार्थ. वर्तमान जन्मात तुमच्या वर चांगले संस्कार झाले नसेल. संसारिक मोह-मायेत अटकून पद-प्रतिष्ठेमागे धावणारे असाल तर स्वत:च्या स्वार्थासाठी नकारात्मक पुरुषार्थ कराल. उदाहरण देत ते म्हणाले, आठवी पास गल्लीतला दुकानदार ज्याला जमा-घटा, गुणाकार-भागाकार आणि व्याज एवढेच गणितीय ज्ञान असते, तरी तो ज्या करारांवर कधीच स्वाक्षरी करणार नाही, पण त्या करारांवर स्वार्थात अटकलेले महान अर्थशास्त्री स्वाक्षरी करतात. अर्थात स्वाक्षरी करताना त्यांना चांगलेच ठाऊक असते, यात देशाचे लक्षावधी कोटींचे नुकसान होणार आहे. तर काही घरांचे स्वप्न दाखवून, लोकांकडून पैसे गोळा करतात आणि नंतर ग्राहकांना वार्यावर सोडून देतात. सत्तेत असलेल्या नेत्यांचे किंवा नौकरशाहीच्या नकारात्मक पुरुषार्थाचे फळ  देशातील समस्त जनतेला भोगावे लागतात.  

मी म्हणालो स्वामी रामदेव तर २४ तास अन्खंड प्रचंड पुरुषार्थाच्या बांता करतात. ते म्हणले मान्य आहे, त्यांच्यात अखंड पुरुषार्थ करण्याची भारी क्षमता आहे. दिवसाचे १८ तास ते कार्य करतात. या जन्मी गुरुकुलात त्यांच्यावर  उत्तम संस्कार झाले असतील. देशासाठी काही करण्याची त्यांच्या मनात तीव्र इच्छा होती. पण काय करत होते, हरिद्वार मध्ये रोग्यांना आयुर्वेदिक औषधी देणे आणि तिथे येणार्यांना योग शिकविण्याचा थोडा बहुत पुरुषार्थ.  

प्रारब्ध संचित चांगल्या कर्मांच्या फळांची त्यांच्या पुरुषार्थाला जोड मिळाली. याच प्रारब्धाने त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी एक दिवस गुजरातहून एका  हीरा व्यापारीला हरिद्वारला पाठविले. सूरतमध्ये पहिला योग शिवीर लागला. पुढे योग शिविरांच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत त्यांनी योग पोहचविला. हे वेगळे त्यासाठी देशांतर्गत २० लाख किमी भटकण्याचा अखंड पुरुषार्थ हि त्यांनी केला.

मी म्हणालो स्वामीजी आता व्यापार हि करतात. ते म्हणाले यात हि प्रारब्धाचा हात आहे. प्रारब्ध कर्मांनीच त्यांना व्यापारात उतरण्याचा मार्ग दाखविला, आवळा उत्पादक शेतकर्यांच्या रूपाने. स्वामीजीचा शब्दांत, एक दिवस काही आवळा उत्पादक शेतकर्यांसोबत चर्चा करताना, ते म्हणाले झाडांवर आवळा आहे, पण कुणीही विकत घेणारा नाही. त्यांनी आर्थिक दृष्टीने निरुपयोगी झाडांना तोडण्याचा निश्चय केला आहे. स्वामीजी म्हणाले, तुम्ही झाडे तोडू नका, जवळच्या शेतकर्यांना हि तोडू देऊ नका. मी विकत घेईल. स्वामीजींना वाटले होते, काही टन आवळा  इथे आला तरी त्याचा उपयोग योगपीठात येणाऱ्या प्रशिक्षार्थींना आवळा ज्यूस पाजण्यासाठी करता येईल. झाडे हि वाचतील. पण स्वामीजी आवळा विकत घेणार हि बातमी संपूर्ण प. उत्तर प्रदेशात पोहचली. पाहता-पाहता ६०० टन आवळा पतंजलीच्या परिसरात शेतकरी टाकून गेले. स्वामीजी त्यांचे पैशे बुडविणार नाही हि खात्री बहुतेक शेतकऱ्यांना असावी. शब्द दिल्या असल्यामुळे स्वामीजीनी कुणालाहि मना केले नाही. आता या आवळ्यांचे काय करायचे हा प्रश्न होता. पुन्हा प्रारब्ध कर्मांनी मार्ग दाखविला. आवळ्याचे ज्यूस लोक पैसा देऊन विकत घेतील याची शाश्वती त्यावेळी कुणालाही नव्हती. पैशे बुडण्याची शक्यता १००% होती, तरी हि पंजाब सरकारच्या कंपनीने उधारीवर आवळ्याचे ज्यूस काढून दिले. पुढचा इतिहास सर्वांना माहित आहे. ते पुढे म्हणाले पुरुषार्थाला प्रारब्ध कर्मांची साथ मिळते, तेंव्हा लता मंगेशकर ते  तेंडूलकर, अंबानी ते रामदेव इत्यादी आपल्या समोर येतात. 

त्या सद्गृहस्थांच्या बोलण्यात तथ्य होते. अखंड पुरुषार्थ करण्याची क्षमता अनेकांमध्ये असते. पण प्रारब्ध संचित कर्मांची पूंजी नसल्यामुळे त्यांच्या मदतीला कुणी धाऊन येत नाही किंवा कुणी त्यांना मार्ग हि दाखवत नाही. त्यांना संधीच मिळत नाही. तर दुसरी कडे प्रारब्ध कर्मांची पूंजी असल्यामुळे काहींना पुरुषार्थ करण्याची संधी मिळते. ते त्या संधीचे सोने करतात आणि जगात प्रसिद्ध होतात. प्रारब्ध संचित कर्म आणि पुरुषार्थ दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किमान मला तरी त्यांचे बोलणे पटले.

Wednesday, October 10, 2018

अहरित क्रांतीच्या जाळ्यात बळीराजा.


देशात हरित क्रांती झाली. खाद्यान्न उत्पन्न कित्येक पट वाढले. बळीराजाच्या घरी मात्र लक्ष्मी आली नाही. विचार केला कारण काय असावे. म्हणतात ना! प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. हरित क्रांतीची मागची बाजू म्हणजे अहरित क्रांती. आज बळीराजा या अहरित क्रांतीच्या जाळ्यात न कळत अडकलेला आहे. 

पहिले शेतकर्यांच्या घरात स्वत:चे बियाणे राहायचे. त्या साठी रुपये  मोजावे लागायचे नाही. आता बियाणे शेतकर्या जवळ नाही. बाजारातून भारी किंमत देऊन विकत घ्यावे लागतात. शिवाय बियाण्यांवर विदेशी कंपन्यांचा कब्जा झालेला आहे. 

पहिले बळीराजापाशी बैल जोडी होती. शेण व मूत्र होते. बैलाचा उपयोग शेतीच्या कामांसाठी, शेताला पाणी देण्यासाठी व्हायचा. शेणाचा उपयोग खतांसाठी. मूत्राचा उपयोग परंपरागत ज्ञानाचा आधारावर कीटनाशक इत्यादी बनविण्यासाठी करायचा. आता खत बाजारातून विकत घ्यावी लागतात. किटनाशक इत्यादीं साठी हि पैशे मोजावे लागतात. शेत नांगरण्यासाठी ट्रक्टर भाड्याने घ्यावे लागते किंवा विकत घ्यावे लागते.  

पहिले बैलांच्या मदतीने शेताला पाणी दिले जायचे. बैलांना मदतीतून जमिनीतून जास्त खोलातून पाणी उचलणे शक्य नव्हते पण आता ट्यूबवेलच्या मदतीने ३००-४०० फूट खोलातून पाणी उचलले जाते. परिणाम शेतातील पाणी हि संपले. पाण्यासाठी लाखो रुपये शेतकर्याला मोजावे लागतात.

पहिले शेतकरीच ठरवायचा कुठले पीक घ्यायचे. हरित क्रांती सोबत एमएसपी, नावाचा सरकारी प्रकार आला आणि पीक घेण्याचे स्वातंत्र्य हरवले. शेतकरी जास्त नफ्याच्या मागे लागला. त्यासाठी जास्त पाणी आणि जास्त खत व किटनाशक वापरू लागला. 

पहिले शारीरिक मेहनत जास्त आणि खर्च कमी होता. पीक हातातून गेले तर नुकसान कमी व्हायचे. पण आता एक पीक जरी हातातून गेले किंवा भाव नाही मिळाला तर शेतकर्याला जबरदस्त नुकसान होते. आज जवळपास सर्वच शेतकरी कर्जबाजारी आहे. आज कर्जाला कंटाळून शेतकार्यांनी आत्महत्या करणे  सामान्य  बातमी आहे.

सारांश, पहिले शेतकरी आत्मनिर्भर होता, शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य त्याच्या घरातच होते. आता तो परावलंबी झाला, भारी पैशे मोजून सर्व साहित्य विकत घ्यावे लागते. परिणाम, हरित क्रांतीने खाद्यान्न उत्पादन वाढले, पण अहरित क्रांतीने शेतकर्यांचे दिवाळे काढले. हेच आजचे सत्य आहे.

Tuesday, October 9, 2018

हायकू : सीता


सीता म्हणजे शेतातून प्रगटलेली लक्ष्मी. लक्ष्मी राजाच्या घरी नव्हे तर बळीराजाच्या घरी पोहचली पाहिजे. रामायणाचा मूळ गाभा हाच आहे.  


बळीराजाचा 
शेतातून प्रगटली 
सुवर्ण लक्ष्मी.


दरबारात 
कैद झाली 
एैयाशीसाठी.


त्याग केला 
जन कल्याणार्थ
सीतेचा

अवसेच्या राती 
उजळले शिवार 
पाऊल लक्ष्मीचे.


  

Monday, October 8, 2018

वात्रटिका : मधुमेय इत्यादी


गोड खाता खाता 
शरीर झाले गोड 
कडू पाल्याचा रस 
प्यावा लागतो आज.

लवंगी मिरची तिखट  
खात होतो रोज 
पोटात झाला अल्सर 
बेचव खातो आज.

पित्झा बर्गर केक 
खातो होतो रोज 
हृदय रोगाच्या गोळ्या 
खाव्या लागतात आज.









Friday, October 5, 2018

हरवलेली विहीर



साहेब महानगरच्या एका मोठ्या शाळेची पाहणी करता आले होते. एका वर्गात विद्यार्थांना पाहून त्यांची परीक्षा घेण्याचा निश्चय साहेबांनी केला. साहेब म्हणाले आपण एक खेळ खेळू,  तुमच्यापैकी अधिकांश विद्यार्थ्यांनी विहीर बघितली नसेल. तरी हि प्रत्येकाजवळ विहिरी बाबत काही न काही माहित अवश्य असेल. विहिरीवर एक-एक वाक्य प्रत्येकांनी बोलायचे आहे, भरपूर माहिती एकत्र होईल. चला सुरु करा. 

"सर, विहीर म्हणजे, जमिनीत खोदलेला गोल गड्डा. त्यात पाणी असते. पूर्वी लोक विहिरीचे पाणी वापरायचे". 

गुड. पुढे. 

"सर, आमच्या गावातल्या चौकात विहीर आहे. लोक त्यात कचरा टाकतात. भयंकर घाण वास येतो". 

बर. पुढे. 

"सर, माझ्या मामाच्या गावात विहीरीत एक बिबळ्या पडला होता. सर्व गाव गोळा झाला होता तमाशा बघायला. वन विभागवाल्यांनी त्याला बाहेर काढले. माझ्या मामाने बिबळ्यासोबत सेल्फी हि काढली होती". 

धाडसी आहे, तुझा मामा, साहेब खोचकपणे म्हणाले. पुढे, 

"सर कालच टीवी वर बातमी बघितली होती, काही तरुणांनी एका मुलीवर बलात्कार करून तिचे प्रेत विहीरीत टाकले होते". 

हं!...पुढे,

"सर, मराठवाड्यात एका शेतकर्याने विहीरीसाठी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. लाखो रुपये खर्च करून पाणी लागले नाही. त्या शेतकर्यावर शेत विकायची पाळी. त्याने कीटनाशक पिऊन आत्महत्या केली".  

बर, पुढे,

"सर, वर्तमान पत्रात बातमी वाचली होती. कुणीतरी विहीर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती". 

"सर, हा काहीच्या काही फेकतो, एक विद्यार्थी मध्येच तडफडला".

"माझे वडील सरकारी दफ्तरात काम करतात. मी त्यांना विचारले होते, ते म्हणाले कागदावर बनलेली विहीर हरवणारच. माझे वडील कधीच खोट बोलत नाही". 

ठीक आहे, हरवली असेल विहीर. आपला तो विषय नाही. आणिक कुणाला विहीर बाबत काही माहिती आहे का?  

"सर, रागवणार नसाल तर मी काही बोलू".  

नाही रागवणार, बोल,

"सर, पोरगी गटविण्यासाठी हि विहीरीचा उपयोग होतो. त्या परश्याने विहीरीत उडी मारून पोरगी पटवली होती"....वर्गात एकच हशा पिकला. 

साहेबांना कळेना काय बोलावे. साहेबांची अपेक्षा आणि आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती, काहीच ताळमेळ नव्हता. साहेबांनी विचार केला यात विद्यार्थ्यांचा काय दोष. जी माहिती त्यांच्यापाशी होती तीच त्यांनी दिली. साहेबांना त्यांच्या गावातील विहीर आठवली. 

पाणी भरण्यासाठी निघाल्या गावातील सासवा, सुना, माहेरी आलेल्या लेकी, नणंद-भावजया.., रस्त्यावरून जाताना छम छम पैंजणांचा आवाज. त्यांचे हसणे-खिदळणे. पाणी भरता-भरता विहरीवर, जीवा-भावाच्या मैत्रिणीची भेट, सासरची व्यथा, सुख-दुखाच्या गोष्टी... गावाच्या जीवन्तपणाची साक्षी विहीर...

घट डोई वर, घट कमरेवर..., बहुतेक काळाच्या ओघात हरवली ती पाणदार विहीर....

Wednesday, October 3, 2018

वात्रटिका - क्रांतीची कविता उर्फ लाल-लाल मुंग्याची गोष्ट


जंगलातून भटकंती करत होतो, सोबत दोन मित्र हि होते. मी गमतीने त्यांना दाएँ-बाएँ म्हणायचो. का? हे कळेलच. जंगलात भटकताना मुंग्यांचे एक भले मोठे वारूळ दिसले. हजारो लाल-लाल रंगाच्या मुंग्या कीटक, झाडांची पाने इत्यादी घेऊन शिस्तबद्ध रीतीने मार्च करत वारुळाच्या दिशेने जास्त होत्या.  त्या मुंग्यांना पाहून दाएँला एक कविता सुचली:

मुंग्यांच्या वारुळासाठी
सोनेरी भविष्यासाठी 
अहोरात्र श्रम करती
देशभक्त ह्या मुंग्या


"डोंबलाची देशभक्ती, शोषण आहे हे शोषण", बाएँ खसकन ओरडला. त्याने हि कविता गान सुरु केले:

वारुळाच्या राणी साठी
दरबारी सुख-चैनी साठी 
अहोरात्र ह्या खटती 
दलित, शोषित पिडीत 
गुलाम श्रमिक मुंग्या. 

लाल-लाल मुंग्यानो, हाती घ्या क्रांतीचा लाल झंडा, विध्वंस करा साम्राज्य राणीचे, जाळून टाका वारुळाला. घ्या मुक्त हवेत, स्वातंत्र्याचे मोकळे श्वास. ओरडत-ओरडत, खिश्यातून कागदी लाल झंडा काढून, तो लाल-लाल मुंग्यांच्या वारूळावर लावला. बेंबीच्या देठापासून ओरडत घोषणा केल्या. क्रांती अमर रहे, लाल मुंगी राणीचा नाश हो, श्रमिक मुंग्या जिंदाबाद. अचानक तो थांबला, विचित्र हावभाव करत, मेलो-मेलो, अय्यो-अय्यो करत नाचत-धावत परत आला. मी विचारले काय झाले. अंगावरचे कपडे काढत म्हणाला, दगाबाज आणि मूर्ख आहेत ह्या मुंग्या. मी त्यांची मदत करायला गेलो,आणि क्षणभरात काय हाल केले माझे. सर्वांगाला चावतात आहे, भयंकर वेदना होत आहे. च्यायला हसू येत होते, तरीही आम्ही दोघांनी त्याच्या अंगावर चढलेल्या मुंग्या वेचून काढल्या. त्याचे दोन्ही हात-पाय, शरीर सुजून लाल झाले होते. 

थोड्यावेळाने वातावरण निवळल्या वर त्याला म्हंटले खरंच तुझी कविता एकदम जहाल क्रांतिकारक आहे. मुग्यांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या वारूळावर हल्ला करणार्या एका माणसाविरुद्ध क्रांती केली. बघ तुझे शरीर किती किती सुजले आणि लाल-लाल झाले आहे. 

दाएँ खोखो करून जोर-जोरात हसू लागला आणि म्हणाला उद्या आपण प्राणी संग्रहालय पाह्यला जाऊ. मी वाघाच्या पिंजर्यासमोर उभा राहून कविता करणार. मग हा वाघाच्या पिंजर्यात जाऊन त्यांना  क्रांतीची कविता ऐकविणार. काय मजा येईल. "मला मारण्याचा कट रचतो लेका, तुझी तेरवी खाल्या शिवाय मरणार नाही", बाएँ गरजला. 

शेवटी मीच म्हणालो, बाबानो भांडू नका, आता मी ऐकवितो तुम्हाला मुंगीची खरी कहाणी. एक होती इवलीशी मुंगी आणि एक होता हत्ती. ....