Friday, October 5, 2018

हरवलेली विहीर



साहेब महानगरच्या एका मोठ्या शाळेची पाहणी करता आले होते. एका वर्गात विद्यार्थांना पाहून त्यांची परीक्षा घेण्याचा निश्चय साहेबांनी केला. साहेब म्हणाले आपण एक खेळ खेळू,  तुमच्यापैकी अधिकांश विद्यार्थ्यांनी विहीर बघितली नसेल. तरी हि प्रत्येकाजवळ विहिरी बाबत काही न काही माहित अवश्य असेल. विहिरीवर एक-एक वाक्य प्रत्येकांनी बोलायचे आहे, भरपूर माहिती एकत्र होईल. चला सुरु करा. 

"सर, विहीर म्हणजे, जमिनीत खोदलेला गोल गड्डा. त्यात पाणी असते. पूर्वी लोक विहिरीचे पाणी वापरायचे". 

गुड. पुढे. 

"सर, आमच्या गावातल्या चौकात विहीर आहे. लोक त्यात कचरा टाकतात. भयंकर घाण वास येतो". 

बर. पुढे. 

"सर, माझ्या मामाच्या गावात विहीरीत एक बिबळ्या पडला होता. सर्व गाव गोळा झाला होता तमाशा बघायला. वन विभागवाल्यांनी त्याला बाहेर काढले. माझ्या मामाने बिबळ्यासोबत सेल्फी हि काढली होती". 

धाडसी आहे, तुझा मामा, साहेब खोचकपणे म्हणाले. पुढे, 

"सर कालच टीवी वर बातमी बघितली होती, काही तरुणांनी एका मुलीवर बलात्कार करून तिचे प्रेत विहीरीत टाकले होते". 

हं!...पुढे,

"सर, मराठवाड्यात एका शेतकर्याने विहीरीसाठी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. लाखो रुपये खर्च करून पाणी लागले नाही. त्या शेतकर्यावर शेत विकायची पाळी. त्याने कीटनाशक पिऊन आत्महत्या केली".  

बर, पुढे,

"सर, वर्तमान पत्रात बातमी वाचली होती. कुणीतरी विहीर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती". 

"सर, हा काहीच्या काही फेकतो, एक विद्यार्थी मध्येच तडफडला".

"माझे वडील सरकारी दफ्तरात काम करतात. मी त्यांना विचारले होते, ते म्हणाले कागदावर बनलेली विहीर हरवणारच. माझे वडील कधीच खोट बोलत नाही". 

ठीक आहे, हरवली असेल विहीर. आपला तो विषय नाही. आणिक कुणाला विहीर बाबत काही माहिती आहे का?  

"सर, रागवणार नसाल तर मी काही बोलू".  

नाही रागवणार, बोल,

"सर, पोरगी गटविण्यासाठी हि विहीरीचा उपयोग होतो. त्या परश्याने विहीरीत उडी मारून पोरगी पटवली होती"....वर्गात एकच हशा पिकला. 

साहेबांना कळेना काय बोलावे. साहेबांची अपेक्षा आणि आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती, काहीच ताळमेळ नव्हता. साहेबांनी विचार केला यात विद्यार्थ्यांचा काय दोष. जी माहिती त्यांच्यापाशी होती तीच त्यांनी दिली. साहेबांना त्यांच्या गावातील विहीर आठवली. 

पाणी भरण्यासाठी निघाल्या गावातील सासवा, सुना, माहेरी आलेल्या लेकी, नणंद-भावजया.., रस्त्यावरून जाताना छम छम पैंजणांचा आवाज. त्यांचे हसणे-खिदळणे. पाणी भरता-भरता विहरीवर, जीवा-भावाच्या मैत्रिणीची भेट, सासरची व्यथा, सुख-दुखाच्या गोष्टी... गावाच्या जीवन्तपणाची साक्षी विहीर...

घट डोई वर, घट कमरेवर..., बहुतेक काळाच्या ओघात हरवली ती पाणदार विहीर....

1 comment: