Friday, October 12, 2018

पुरुषार्थ आणि प्रारब्ध: एकाच नाण्याच्या दोन बाजू


कालच सद्गृहस्थ मेट्रोत भेटले. ४० मिनिटांचा प्रवास. सहज चर्चा सुरु झाली. ते म्हणाले ध्येय प्राप्तीसाठी पुरुषार्थाला प्रारब्धाची जोड लागतेच. प्रारब्ध म्हणजे मागील जन्मांचे संचित कर्म- चांगले आणि वाईट दोन्ही. काही लोक आपल्या क्षेत्रात विशेषज्ञ असतात पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना पुरुषार्थ दाखविण्याची संधी मिळत नाही. काहीना लवकर संधी मिळते. उदा. सचिन तेंडुलकरला अल्प अनुभव कोवळे वय तरीही भारतीय संघात जागा मिळते, हे प्रारब्ध कर्मांचे फळ. काही खेडाळू दहा-दहा वर्ष रणजी खेळतात. हजारो रन हि बनवितात पण त्यांना कधी संधीच मिळत नाही. 

पुरुषार्थ हि दोन प्रकारचा असतो. सकारात्मक पुरुषार्थ आणि नकारात्मक पुरुषार्थ. वर्तमान जन्मात तुमच्या वर चांगले संस्कार झाले नसेल. संसारिक मोह-मायेत अटकून पद-प्रतिष्ठेमागे धावणारे असाल तर स्वत:च्या स्वार्थासाठी नकारात्मक पुरुषार्थ कराल. उदाहरण देत ते म्हणाले, आठवी पास गल्लीतला दुकानदार ज्याला जमा-घटा, गुणाकार-भागाकार आणि व्याज एवढेच गणितीय ज्ञान असते, तरी तो ज्या करारांवर कधीच स्वाक्षरी करणार नाही, पण त्या करारांवर स्वार्थात अटकलेले महान अर्थशास्त्री स्वाक्षरी करतात. अर्थात स्वाक्षरी करताना त्यांना चांगलेच ठाऊक असते, यात देशाचे लक्षावधी कोटींचे नुकसान होणार आहे. तर काही घरांचे स्वप्न दाखवून, लोकांकडून पैसे गोळा करतात आणि नंतर ग्राहकांना वार्यावर सोडून देतात. सत्तेत असलेल्या नेत्यांचे किंवा नौकरशाहीच्या नकारात्मक पुरुषार्थाचे फळ  देशातील समस्त जनतेला भोगावे लागतात.  

मी म्हणालो स्वामी रामदेव तर २४ तास अन्खंड प्रचंड पुरुषार्थाच्या बांता करतात. ते म्हणले मान्य आहे, त्यांच्यात अखंड पुरुषार्थ करण्याची भारी क्षमता आहे. दिवसाचे १८ तास ते कार्य करतात. या जन्मी गुरुकुलात त्यांच्यावर  उत्तम संस्कार झाले असतील. देशासाठी काही करण्याची त्यांच्या मनात तीव्र इच्छा होती. पण काय करत होते, हरिद्वार मध्ये रोग्यांना आयुर्वेदिक औषधी देणे आणि तिथे येणार्यांना योग शिकविण्याचा थोडा बहुत पुरुषार्थ.  

प्रारब्ध संचित चांगल्या कर्मांच्या फळांची त्यांच्या पुरुषार्थाला जोड मिळाली. याच प्रारब्धाने त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी एक दिवस गुजरातहून एका  हीरा व्यापारीला हरिद्वारला पाठविले. सूरतमध्ये पहिला योग शिवीर लागला. पुढे योग शिविरांच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत त्यांनी योग पोहचविला. हे वेगळे त्यासाठी देशांतर्गत २० लाख किमी भटकण्याचा अखंड पुरुषार्थ हि त्यांनी केला.

मी म्हणालो स्वामीजी आता व्यापार हि करतात. ते म्हणाले यात हि प्रारब्धाचा हात आहे. प्रारब्ध कर्मांनीच त्यांना व्यापारात उतरण्याचा मार्ग दाखविला, आवळा उत्पादक शेतकर्यांच्या रूपाने. स्वामीजीचा शब्दांत, एक दिवस काही आवळा उत्पादक शेतकर्यांसोबत चर्चा करताना, ते म्हणाले झाडांवर आवळा आहे, पण कुणीही विकत घेणारा नाही. त्यांनी आर्थिक दृष्टीने निरुपयोगी झाडांना तोडण्याचा निश्चय केला आहे. स्वामीजी म्हणाले, तुम्ही झाडे तोडू नका, जवळच्या शेतकर्यांना हि तोडू देऊ नका. मी विकत घेईल. स्वामीजींना वाटले होते, काही टन आवळा  इथे आला तरी त्याचा उपयोग योगपीठात येणाऱ्या प्रशिक्षार्थींना आवळा ज्यूस पाजण्यासाठी करता येईल. झाडे हि वाचतील. पण स्वामीजी आवळा विकत घेणार हि बातमी संपूर्ण प. उत्तर प्रदेशात पोहचली. पाहता-पाहता ६०० टन आवळा पतंजलीच्या परिसरात शेतकरी टाकून गेले. स्वामीजी त्यांचे पैशे बुडविणार नाही हि खात्री बहुतेक शेतकऱ्यांना असावी. शब्द दिल्या असल्यामुळे स्वामीजीनी कुणालाहि मना केले नाही. आता या आवळ्यांचे काय करायचे हा प्रश्न होता. पुन्हा प्रारब्ध कर्मांनी मार्ग दाखविला. आवळ्याचे ज्यूस लोक पैसा देऊन विकत घेतील याची शाश्वती त्यावेळी कुणालाही नव्हती. पैशे बुडण्याची शक्यता १००% होती, तरी हि पंजाब सरकारच्या कंपनीने उधारीवर आवळ्याचे ज्यूस काढून दिले. पुढचा इतिहास सर्वांना माहित आहे. ते पुढे म्हणाले पुरुषार्थाला प्रारब्ध कर्मांची साथ मिळते, तेंव्हा लता मंगेशकर ते  तेंडूलकर, अंबानी ते रामदेव इत्यादी आपल्या समोर येतात. 

त्या सद्गृहस्थांच्या बोलण्यात तथ्य होते. अखंड पुरुषार्थ करण्याची क्षमता अनेकांमध्ये असते. पण प्रारब्ध संचित कर्मांची पूंजी नसल्यामुळे त्यांच्या मदतीला कुणी धाऊन येत नाही किंवा कुणी त्यांना मार्ग हि दाखवत नाही. त्यांना संधीच मिळत नाही. तर दुसरी कडे प्रारब्ध कर्मांची पूंजी असल्यामुळे काहींना पुरुषार्थ करण्याची संधी मिळते. ते त्या संधीचे सोने करतात आणि जगात प्रसिद्ध होतात. प्रारब्ध संचित कर्म आणि पुरुषार्थ दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किमान मला तरी त्यांचे बोलणे पटले.

No comments:

Post a Comment