Monday, July 31, 2023

वार्तालाप (१८): जाणण्याचे विज्ञान

जाणते  लोक ते शहाणे. 
नेणते वेडे दैन्यवाणे.
विज्ञान तेही जाणपणे.  
कळो आले.

समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते  लोकांच्या नशिबी  फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते.

समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रपंच उत्तम करण्यासाठी जाणण्याचे विज्ञान ही समजण्याची गरज आहे. उदाहरण- एका शेतकऱ्याला उत्तम शेती करायची आहे. फक्त बी पेरून, खत-पाणी देऊन उत्तम शेती होत नाही. शेत जमिनीची पोत, पाण्याचे व्यवस्थापन, त्या भागातील हवामान, हवामान खात्याचे अंदाज,  शेतीचे नवीन-नवीन तंत्र, कृषी विशेषज्ञांचे मार्गदर्शन, दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, विभिन्न ऋतूत शेतमालला मिळणारा बाजार भाव,  प्राकृतिक विपत्ती- अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, आग, काळ-वेळ, सरकारची आयात- निर्यात नीती, एमआरपी, प्रोत्साहन अनुदान, इत्यादी सर्व जाणून  शेती  करणे म्हणजे शेतीचे विज्ञान जाणणे. अनुभवाने हे विज्ञान सिद्ध होते. असा शेतकरी आत्महत्या ही करत नाही, दुःखी आणि दरिद्री राहत नाही. दुसरे शेतकरी त्याच्या पासून प्रेरणा घेतात.  जे लोक जाणण्याचे विज्ञान समजतात ते उद्योग-धंदे, व्यापार सर्व ठिकाणी  सफल होतात.

आत्ताचेच एक उदाहरण- मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटो शंभर रुपये किलोच्या भावाने विकले. असो. 


Saturday, July 29, 2023

पीएनामा : (2) झाडाची फांदी आणि एसीआर

 

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस  इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से  सांगण्यासाठी काही टोपण नावे  मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) 

(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) 

त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची. एक पेक्षा जास्त प्रमोशन पीए लोकांच्या भाग्यात नव्हती. फक्त एक मार्ग होता विभागीय परीक्षा पास करणे. वर रिक्त जागा अत्यंत कमी असल्याने, प्रतिस्पर्धा भयंकर होती. २० टक्के मार्क असलेल्या एसीआरचे (कर्मचाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल) भरी महत्व होते. जर गेल्या पाच वर्षांची एसीआर सर्वोत्कृष्ट (outstanding) नसेल तर लिखित परीक्षा पास होऊन ही प्रमोशनची संभावना शून्य होती. त्यावेळी एसीआर ही गोपनीय होती. काही अधिकारी उत्तम एसीआर लिहली असेल तर पीएला दाखवायचे. उत्तम एसीआर मिळविण्यासाठी पीए अधिकार्‍यांना खुश करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ-दहा वाजे पर्यन्त कपाळावर आठी न येऊ देता काम करायचे. अर्थातच मी ही त्याला अपवाद नव्हतो.

त्यावेळी माझी पोस्टिंग एक वरिष्ठ महिला अधिकारीच्या दरबारात झाली होती. तिथे पीएस आणि एक पीए आधीच होता. याशिवाय क्लार्क, एमटीएस इत्यादि. त्याकाळी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकान्श अधिकारी पीए लोकांच्या तिन्ही वर्षाच्या वार्षिक एसीआर बहुतेक शेवटच्या वर्षी लिहायचे. (मोदीजी सत्तेत आल्यानंतर हे सर्व बदलले आहे. आता प्रत्येक वर्षाची एसीआर त्याच वर्षी एका निश्चित अवधीत ऑनलाईन लिहावी लागते). माझी पोस्टिंग सप्टेंबर महिन्यात तिच्या दरबारात झाली तेंव्हा तिचे फक्त सहा महीने केंद्रीय प्रतिनियुक्तीचे उरले होते. पण पीएस आणि दूसरा पीए तीन वर्षांपासून तिच्या अधीन कार्यरत होते.     

दिल्लीत डिसेंबर महिन्यात थंडी भरपूर असते. हिवाळ्यात ऊन शेकायला सर्वांनाच आवडते. साहजिक आहे तिच्या म्हातार्‍या आईला ही ऊन्हात बसायला आवडत असेलच. एक दिवस सकाळी येताच तिने पीएस साहेबांना तिच्या केबिन मध्ये बोलविले. तिने आदेश दिला, झाडांच्या फांदींमुळे घरात ऊन येत नाही आहे. त्या कापण्याचा बंदोबस्त करा. एनडीएमसी भागात पावसाळयानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात झाडांच्या फांद्या छाटण्याचे सरकारी नियमांनुसार ठेके दिले जातात, त्या वेळी एनडीएमसीला फक्त विनंती केली असती तरी काम झाले असते. पण आता डिसेंबर सुरू झालेला होता. पीएस पन्नासी उलटलेला अनुभवी होता. अश्या समस्या त्याने पूर्वीही हाताळलेल्या होत्या. 'ठीक आहे मॅडम, उद्या फांद्या कापण्याचा बंदोबस्त करतो'. ती थोड्या नाराजगीने म्हणाली, कसे करणार??? पीएस-  झाडांच्या फांद्या छाटणार्‍यांकडून हे काम करवून घेईल. दोन-एकशे रुपये खर्च येईल. पीएसचे उत्तर ऐकून ती भडकली. एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करणाऱ्यांना  गैरकानूनी काम करताना लाज वाटली पाहिजे.  

आता पीएस साहेब काय करणार. एनडीएमसीला पत्र लिहले. दिल्लीत मोठ्या-मोठ्या अधिकार्‍यांनाही पीडब्ल्यूडी, एनडीएमसी आणि स्थानीय प्रशासन घास टाकत नाही (भाव देत नाही). त्यांनी पीएसच्या पत्राला आणि फोनला दाद दिली नाही. वसंत ऋतुत पक्षी घरटे बांधतात त्यामुळे आता फांद्या छाटणे आता शक्य नाही. झाडाच्या फांद्या कापणे अत्यंत गरजेचे असेल तर वन विभागाची अनुमति घ्यावी लागेल, असे उत्तर आले. कागद वन विभागाकडे गेला. लालफिताशाहीत कागद फिरत राहिला. अनेक खेटे आम्ही तिघांनी घातले असेल. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आले. फेब्रुवारी महिन्यात झाडाच्या फांद्या छाटण्याची अनुमति मिळाली. पीएस साहेब अनुमतिचा कागद घेऊन मॅडमच्या केबिन मध्ये गेले. मॅडमने कागद वाचला आणि त्याचे दोन तुकडे करून  केराच्या टोपलीत टाकले. ती रागाने पीएस वर ओरडली. "आता फांद्या छाटण्याची गरज आहे का?" पुढच्या हिवाळ्यात मी इथे राहणार नाही. तुम्ही तीन-तीन नालायक मिळून एक साधे काम करू शकले नाही. मार्च अखेर तिने आम्हा तिघांच्या एसीआर लिहल्या. आम्हाला दाखविल्या नाही. त्या पीएची सलग तीन वर्षांची सीआर तिने लिहली होती. 

त्यानंतर  त्या पीएची पोस्टिंग एका वरिष्ठ अधिकार्‍यासोबत झाली. पीएच्या नौकरीत त्याचे पाच वर्ष पूर्ण झाल्याने तो पीएसच्या विभागीय परीक्षेसाठी पात्र झाला होता. त्याचा अधिकारी त्याला समोर बसवून त्याची उत्कृष्ट एसीआर लिहायचा. तरीही सतत तीन वर्ष लिखित आणि स्किल परीक्षा पास करून ही त्याचे प्रमोशन झाले नाही. अखेर चौथ्या वर्षी परीक्षा पास झाल्यानंतर त्याचे प्रमोशन झाले. अर्थात चार वर्ष 365 दिवस न चुकता त्याला स्टेनोग्राफीचा अभ्यास करावा लागला (100ची स्पीड टिकवून ठेवण्यासाठी). 

अखेर एसीआरचे नियम बदलले. एसीआरची गोपनीयता संपली. एसीआर पाहण्याचा आणि त्यावर  टिप्पणी करण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना मिळाला. एक दिवस त्या पीएचा  (आता तो पीएस होता) फोन आला, पटाईत, तुझी तिने लिहलेली एसीआर एकदा तुझ्या कार्यालयाच्या एडमिन मध्ये जाऊन बघ. मी म्हंटले, तुझी एसीआर कशी लिहली होती. तिच्या नावाचा उद्धार करत तिला दोन-चार शिव्या देत तो म्हणाला, तिन्ही वर्षांच्या एसीआरवर  तिने फक्त "गुड" असा शेरा दिला होता. एक पीएसाठी 'गुड' ही निकृष्ट एसीआर असते.  मी ही एडमिन मध्ये जाऊन तपासले, 39 वर्षांच्या नौकरीत मला मिळालेली एकमेव निकृष्ट 'गुड' शेरा असलेली एसीआर होती. मला ती जुनी एसीआर दाखविणार्‍या बाबूने विचारले, पटाईत, सर, काय भांडण वैगरे केले होते का तिच्याशी. मी उतरलो, नाही रे, तिच्या बंगल्यातील झाडाची फांदी तोडू शकलो नाही. त्याला काहीच कळले नाही, तो फक्त माझ्या कडे पहात राहिला. 


Friday, July 28, 2023

विडंबनकार आणि कवी

 विडंबनकाराच्या घरी

लक्ष्मी भरते पाणी.

कवी संमेलनात मिळते

बिदागी रक्कम मोठी.


कबीर.दास बेचारा

शेला विणतो सदा.

एक वेळ जेवणाचा

हिशोब करतो सदा.

Wednesday, July 26, 2023

पौलोमी शची: नवरा माझ्या मुठीत


एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको त्याला ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून  जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात. तिच्या आदेशानुसारच सर्वांना जगावे लागते. जी तुझी अवस्था तीच माझीहि आहे. पुरुषांना वैदिक काळापासूनच बायकोच्या मुठीत राहण्याचा श्राप मिळालेला आहे. एवढेच काय, वज्र धारण करणारा देवांचा राजा इंद्रहि त्याच्या बायकोच्या मुठीत होता. माझा सहकर्मी उद्गारला, काहीही बोलू नको, पूर्वी कोण पुरुष बायकोच्या मुठीत राहत होता. काहि पुरावा आहे का?

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५९ ( सपत्नी नाशनसूक्त)
(ऋषिका - शची पौलोमी : देवता - आत्मस्तुती)l

उत् असौ सूर्यः अगात् उत् अयं मामकः भगः  
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः 

अर्थ: हा पहा सूर्य जसा उदय पावला, तसे माझे दैवहि उघडले. मी हे जाणूनच आपल्या पतीला पूर्णपणे वश केले. मी त्याची स्त्री आहे; तरी पण त्याला अगदी माझ्या मुठीत ठेवणारी अशी आहे.

देवांचा राजा महापराक्रमी वज्र  धारण करणारा इंद्र. असुरांचे दुर्ग उद्ध्वस्त करणारा इंद्र. वृत्रासुराचा वध करणारा इंद्र. इंद्र कृपेसाठी ऋषीमुनी त्याची स्तुती करायचे. त्याच्या विजयाची गाथा गायचे.  त्याकाळच्या परंपरेनुसार देवराज इंद्राच्या अनेक पत्नी होत्या.  इंद्राची एक पत्नी शचीहि होती. इंद्र पत्नी शचीचा त्या काळी एवढा दरारा होताकि तिने स्वत:च्या स्तुतीसाठी सवतीचा नाश सूक्त रचले आणि त्या सूक्ताला ऋग्वेदात स्थानहि मिळाले. 

स्वत:ची आत्मस्तुती करताना ती म्हणते. मीच घराण्याची शोभा आहे. मीच मस्तक आहे. मी कठोर स्वभावाची आहे. मी विजय शालिनी आहे. मी सर्व सवतींचा वर चष्मा नाहीसा केला आहे. माझे पुत्र शत्रूचा फडशा उडवितात. माझी पुत्रीहि चक्रवर्ती  आहे. माझे पती ओजस्वी व सर्वश्रेष्ठ आहेत. जो भक्त त्यांना हविभाग अर्पित करतो त्यांचे इच्छित  पूर्ण करतात. तेच मीहि केले आहे अर्थात मीही भक्तांकडून हवि भाग स्वीकार करते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते.  त्यामुळे मी सवत रहित झाले आहे.  माझ्या प्रत्येक कृत्याचे अनुमोदन माझे पती करतात. (करणे भाग आहे). मी माझ्या पतीला पूर्णपणे वशमधे केले आहे. तो माझ्या मुठीत आहे. जसे मी माझ्या पतीवर अधिकार गाजवते तसेच मी इतरांवरहि गाजवते.

आजच्या काळातही बायकोच्या अधीन राहणारे नवरे सुखी असतात. बायकांच्या मुठी सारखी सुरक्षित जागा जगात दुसरी नाही. बायकांच्या अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या नावर्यांवर सरकारी पाहुणचार घेण्याची नौबत येते.  माझ्या त्या सहकर्मीने पूर्वापारपासून चालत आलेले कठोर सांसारिक सत्य जाणले. नंतर त्याने कधीही त्याच्या  बायकोची तक्रार केली नाही.

माझे म्हणाल तर मी माझ्या गृहराज्याचे प्रधानमंत्री पद सौ.ला अर्पित केले आहे आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले आहे. माझ्या नावावर सौ. सर्व निर्णय घेते आणि मी तिच्या सर्व निर्णयाचे राजी खुशी समर्थन करतो. मी सुखी आहे कारण मी बायकोच्या मुठीत आहे.

Thursday, July 20, 2023

वार्तालाप(१७): भिक्षा ही कामधेनु

समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. समर्थांनी हे सर्व बदलण्याचे ठरविले. भिक्षेच्या बळावर ज्या काळी मंदिरे आणि मठ उध्वस्त होत होती त्या काळात त्यांनी समर्थ मठांची स्थापना केली. भिक्षेच्या मदतीने त्यांनी त्यांच्यासारखे शेकडो समर्थ ब्रह्मचारी तयार केले. "जय जय रघुवीर समर्थ" आरोळी ऐकल्याबरोबर सामान्य जनता ही मूठभर भिक्षा आनंदाने त्यांच्या भिक्षा पात्रात घालायची. महाराष्ट्राच्या जनतेत  शौर्य आणि स्वाभिमान निर्मित करण्यात समर्थ सफल झाले आणि त्याची स्वराज्याला बहुमोल मदत झाली. हा इतिहास आहे. 

समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी वाढतात, लोकांचे मनोगत समजते आणि त्यांच्या समस्या कळतात. भिक्षेच्या माध्यमातून समाज कल्याणाची मोठी-मोठी कार्य ही सहज सिद्ध होतात. आजच्या काळातली काही उदाहरणे -स्वामी दयानंद सरस्वती गुरुकुल आणि डीएवी शाळांची  श्रृंखला सामान्य जनते कडून मिळालेल्या भिक्षेच्या बळावरच निर्मिती केली.  संघाच्या प्रचारकांनी ही भिक्षेच्या माध्यमातून समाज सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सहज सिद्ध केले आणि आजही करत आहे. कोटीहून जास्त लोकांनी शंभर ते हजार रुपयांची भिक्षा स्वामी रामदेवांच्या  झोळीत टाकली आणि  कामधेनु रुपी त्या भिक्षेच्या प्रतापाने स्वामी रामदेव यांनी पतंजली योगपीठ, अनेक गुरुकुल, पतंजली विश्व विद्यालय, आयुर्वेदात रिसर्च करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा, आयुर्वेद फार्मेसी आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी फूड पार्क, इत्यादी इत्यादी. या शिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्डची स्थापनाही केली.  

स्पष्ट आहे, निस्वार्थ भावनेने समाज सेवेसाठी मागितलेली भिक्षा ही कामधेनु समान आहे. 



Monday, July 17, 2023

वार्तालाप (16) भगवंताचा आशीर्वाद घेणारे वैज्ञानिक असतात का?

 

समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे

इसरोच्या वैज्ञानिकांनी तिरुपति येथे जाऊन भगवंताचे आशीर्वाद चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी घेतले. ते वैज्ञानिक होते, तरीही त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले ही बातमी वाचल्यावर अनेक अतिविद्वान लोकांच्या पोटात दुखू लागले। स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या अतिविद्वानांनी सोशल मीडियावर देशाचा मान सम्मान वाढविणार्‍या वैज्ञानिकांची खिल्ली उडविन्याचा दारुण प्रयास केला. "सत्यासाठी शिरले असत्याच्या गाभार्‍यात" अशाही टिप्पणी झाल्या. काहींच्या मते हिंदू देवतांची पूजा करणारे वैज्ञानिक नसतात ते फक्त तंत्रज्ञ असतात. हे सर्व वाचून हे लोक मानसिक विकृत असावे किंवा हिंदू धर्म विषयी त्यांच्या मनात अत्यंत द्वेष भरलेला असावा. तरीही वैज्ञानिक कोण हे या लेखात उदाहरण सहित स्पष्ट केले आहे. 

दोन दगड़ एकमेकवर आपटले की अग्नि प्रगट होते हे जाणने म्हणजे ज्ञान.  विशिष्ट पद्धतिने और विशिष्ट वेगाने आघात केल्याने दगडातून अग्नि प्रगट होतो हे जाणने  म्हणजे  शास्त्र/ तंत्रजे लोक या शास्त्रावर प्राविण्य मिळवून अग्नीच्या मदतीने विविध आविष्कार करतात ते शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ

आता मनात प्रश्न येणे स्वाभाविक आहे, विज्ञान म्हणजे काय आणि वैज्ञानिक कुणाला म्हणायचे?  विज्ञान शब्दातच अर्थ दडलेला आहे.  विज्ञान म्हणजे विवेक पूर्ण ज्ञान।अग्नीचा उपयोग घरे जाळण्यासाठी होतोआणि अन्न शिजविण्यासाठीही. सौप्या भाषेत ज्या संशोधानांनी समाजाचे आणि मानवतेचे कल्याण होते ते संशोधन करणार्‍यांना वैज्ञानिक म्हणणे उचितचंद्रयान मोहिमेच्या उद्देश्य समाज आणि मानवतेचे कल्याण असल्याने या मोहिमेशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ हे वैज्ञानिक आहे. असो. 

ज्ञात असलेल्या तंत्राचे सर्व गणित अचूक असतांनाही नासाच्या असो, किंवा इसरोच्या अनेक मोहिमी अयशस्वी झालेल्या आहेत. क्रिकेट मध्ये तर हा अनुभव प्रत्येक मॅच मध्ये येतोच. कठीण झेल घेणार्‍या खेळाडू सौपा झेल ही सोडतो. फूलटॉस चेंडूवर ही खेळाडू बाद होतात. स्वत:च्या मेहनती सोबत भगवंतावर विश्वास असेल तर अपयशानंतर ही माणूस निराश होत नाही. पुन्हा जोमाने मेहनत करू लागतो. 

आपल्या वैज्ञानिकांचा भगवंतवर आणि स्वत:च्या संशोधनावर विश्वास आहे म्हणून त्यांनी भगवंताचे आशीर्वाद घेतले. 

Saturday, July 8, 2023

छंद बायकोचा

(काल्पनिक कथा) 

मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो.  फावल्या वेळात: 
बायकोने छंद जोपासला. 
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला 
नोटांचा. 

तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे  उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा  लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर. पूर्वीच कथा लिहिली असती तर  मलाहि घरी हिरा सापडला असता. पण आता फार उशीर झाला आहे. माझ्या बाबतीत नेहमी हे असेच होते. पण 'अब पछताए होत क्या, जब चिड़ियाँ चुग गई खेत".

तरीही सौ.ला हिम्मत करून विचारले, अग! एखादा छंद जोपासला पाहिजे होता तू. तुझा वेळ मस्त गेला असता. सौ.ने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात विचारले, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सुचले. बायकोलाहि काही छंद वैगरे असतात. काय विचार चालला आहे तुमच्या मनात. मी उतरलो, सहज विचारले. सौ. "सहSSज!, तुम्ही एक नंबरचे मतलबी आणि स्वार्थी आहात, उगीच काही विचारणार नाही. बाकी छंद जोपासायला पैका लागतो, एक दमडीहि कधी ठेवली होती माझ्या हातात, कंजूस-मक्खीजूस. शेवटी वैतागून म्हणालो, अग ए, भवानी, चूक झाली माझी, तुला हा प्रश्न विचारला. 

पण आता माझे ऐकावेच लागेल. मला किनई लाॅटरीचे तिकीट घ्यायला लई आवडायचे. पण तुमची पैश्यांवर उल्लू सारखी नजर. तरीहि कधी-कधी मौका मिळाल्यावर तुमच्या खिश्यातून पैशे काढून तिकीट विकत घ्यायची. पण एखाद दुसरे लाॅटरीचे तिकीट घेऊन काही नंबर लागत नाही. त्यासाठी मोठी इन्वेस्टमेंट लागते. तुम्ही जर तुमचा पगार माझ्या हातात दिला असता तर लाॅटरी खेळून मी केंव्हाच कोट्याधीश झाले असते. आपले दु:ख-दारिद्र्य केंव्हाच संपले असते. पण माझे नशिबच फुटके, तुमच्या पदरी पडली. 

च्यायला! माझी विकेटच उडाली. डोळ्यांसमोर चित्रपट सुरु झाला बायकोचा छंद जोपासण्यासाठी, महिन्याच्या पहिल्या दिवशी सौ.च्या हातात पगार आणून ठेवला, तिने तो लाॅटरीच्या तिकीटांंवर उडविला. हळू हळू बँकेतील बचत अदृश झाली. मग बनियाने उधार देणे बंद केले. नातेवाईक आणि मित्रांनी दरवाजे बंद केले. फी न भरल्याने मुलांच्या शाळा सुटल्या. घरातील एक-एक करून सर्व वस्तू अदृश्य झाल्या. घर गेले, नौकरी गेली. शेवटी एका पुला खाली संसार थाटवा लागला. जो दे उसका भी भला, जो न दे उसका भी भला, दे दाता के नाम ... भिकेवर गुजराण सुरु झाली.  

थंडीचे दिवस होते, रात्रीची वेळ, दानमध्ये मिळालेली कम्बल पांघरून कसाबसा दिल्लीच्या थंडीपासून स्वताला  वाचण्याचा प्रयत्न करत होतो. एका लॉटरीवाल्याची आवाज ऐकू आली. 'न्यू यिअर स्पेशल' १० करोड का ईनाम तिकीट केवल १० रुपया. सौ.चा आवाज ऐकू आला, भैया  मुझे लगता है, कल मेरी ही लाटरी लगेगी. एक टिकिट मुझे भी चाहिये पर मेरे पास पैसा नहीं  है. यह कम्बल चलेगा क्या म्हणत, माझ्या अंगावरचे कम्बल ओढू लागली. 

अग! ए, काय करतेस, हेच एक शेवटचे  उरले आहे. थंडीत मारणार आहे का मला?  सौ. जोरात ओरडली, सकाळचे सात वाजले आहे, ऑफिसला जायचे आहे कि नाही? रात्री उशिरा पर्यंत काही-बाही वाचता, मग झोपेत बडबडतात. मीच आहे, म्हणून सहन करते हे सर्व. चहा तैयार आहे, नरड्यात ओता आणि ऑफिससाठी तैयार व्हा.  हुश्श्!  वाचलो. बरेच झाले, बायकोला कुठलाही छंद नाही. अन्यथा हिर्याच्या जागी कोळसा सापडला असता.

Thursday, July 6, 2023

लग्न झाले नी अंकल झालो


गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या  होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते.  त्यादिवशी: 

गुलाबाची कळी: काल न, संध्याकाळी रिक्ष्यात बसून बाजारात जात होते, तेवढ्यात एक बाइकस्वार जवळून गेला  १७-१८ वर्षाचा पोरगा असेल.  मला पाहत त्याने डोळा मारला व फ्लायिंग किसहि केले. हा किस्सा सांगताना  तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत होता.

गोबीचे फूल: (मनातल्यामनात, कपाळावर कुंकू लावत नाही आणि गळ्यातहि मंगळसूत्र घालत नाही. स्वत:ला जुही चावला समजते. मी काही मूर्ख नाही, मलाहि कळते, तुझ्या बोलण्यामागचा हेतू. बघ कशी तुझी बोलती बंद करते): त्या मुलाची काय चूक, तू अजूनहि १६ वर्षाच्या तरुणी सारखी दिसते. मुंबईला गेली असती तर जुही एवजी तुलाच सिनेमात काम मिळाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रयत्न करून बघ. इथे उगाच दिवस भर यस सर/यस मॅडम करत वेळ घालविते. ते जाऊ दे, पण एक खटकते, तू एवढी सुंदर पण तुझ्या मिस्टरांचे पोट सुटत चालले आहे. डोक्यावरचे काही केसहि पांढरे झाले आहेत. असेच सुरु राहिले तर एक दोन वर्षांत ते तुझे अंकल दिसू लागतील. बघ जरा त्यांच्या कडे. 

तिचे बोलणे ऐकून मला हसू आले. गोबीच्या फुलाला मनातल्यामनात दाद दिली. काय शालजोडी मारली आहे, गुलाबाच्या कळीच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले. मला हसताना पाहून गुलाबाच्या कळीला राग आला. ती माझ्यावर भडकली, काहीना बायकांच्या गोष्टी टवकारून ऐकण्याची भारी हौस असते. मी ही बेशरमपणे म्हणालो, देवाने कान दिले आहे, त्याचा सदुपयोग करणे हा काही गुन्हा नाही. असो. 

गोबीचे फूल:  लक्ष देऊ नको त्याच्या कडे. एक नंबरचा बेशरम आहे. बाकी काही ही म्हण पटाईत अजूनही हेंडसम दिसतो. 

लग्नाला दोन एक  वर्ष झाले असले तरीहि माझे काही पोट निघाले नव्हते व केसहि काळे होते. अजूनही मी हंड्सम आणि स्मार्ट  दिसत होतो. तरुण पोऱ्या किमान आपल्याला 'अंकल' म्हणणार नाही,  प्रयत्न केला तर आजहि त्या आपल्याला  'घास'  टाकतील, असा गैरसमज होता. 

त्याच दिवशी ऑफिसहून थोडा लवकर निघालो. सूर्यास्ताच्या आधी घराच्या गल्लीत शिरलो. घराच्या दरवाजाच्या बाहेर सौ. शेजारच्या २२-२३ वर्षाच्या तरुणी सोबत बोलत होती. सौ.ची पाठ माझ्याकडे होती. पण त्या तरुणीचे लक्ष माझ्याकडे गेले, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाली, "दीदी, अंकल आ रहे हैं". च्यायला सौ. दीदी आणि मी अंकल, कुठे तरी जळत आहे असे वाटले. घराजवळ पोहचताच, ती तरुणी मधुर आवाजात म्हणाली, 'अंकलजी नमस्ते'. आतामात्र तळपयाची आग मस्तकात गेली. मी भडकलेले डोके शांत ठेवीत तिला म्हणालो, "जिजाजी को अंकल कहोगी तो दीदी को भी आंटी कहना पड़ेगा". नकळत मी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. मी घरात शिरलो, सोफ्यावर जाऊन बसलो. सौ. ही पाठोपाठ आत आली. नेहमीप्रमाणे तिने प्यायला पाणी आणून दिले. पाणी पिणे झाल्यावर सौ.कडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. ती रागातच म्हणाली, आजकाल तुमची जीभ जास्तस चरचर करू लागली आहे. तोंडावर ताबा ठेवा, तुमचे लग्न झालेले आहे, किमान हे तरी लक्षात असू द्या.  "मी दीदी असली तरी, शेजार-पाजारच्या तरुणी तुमच्या साळ्या नाहीत. तुम्ही त्यांचे अंकल आहात. 
तिच्या बोलण्यातील वैधानिक चेतावनी स्पष्ट होती तिच्या  बहिणीशी जास्त गूटरगूँ केलेली तिला आवडत नाही. 

तात्पर्य एवढेच, लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात.



Monday, July 3, 2023

वार्तालाप (15): गुरूचा शोध

आज गुरुपौर्णिमा आहे आज आपण श्रद्धा सुमन आपल्या गुरूंच्या चरणी  वाहतो. आपले प्रथम गुरू आई वडील जे आपल्याला संस्कार देतात. दुसरे गुरु आपले शिक्षक जे आपल्याला ज्ञान प्रदान करतात. 

आई-वडील आणि शिक्षक निवडणे आपल्या हातात नसते पण संसार उत्तम करण्यासाठी आणि परमार्थ साधण्यासाठी गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. विद्यमान आणि पूर्वकाळात झालेल्या महान संत, महात्मांपासून आपण प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतो, ते आपले आध्यात्मिक गुरु. 

आता गुरु कुणाला करावे, हा प्रश्न आपल्या समोर येतो. समर्थ रामदास म्हणतात, "बोलण्यासारीखें  चालणें l स्वयें करून बोलणेंl तयाची वचनें प्रमाणेl मानिती जनीl" बोलणे आणि कर्म ज्याचे एक सारखे त्याला गुरू मानावे. एक उदाहरण स्वामी रामदेव यांना लोक योग गुरू म्हणतात. कारण ते स्वतः सकाळी तीन तास नियमित योग ही करतात आणि करूवून घेतात. जगाच्या कुठल्याही टोकाला असेले तरीही भारतीय वेळे प्रमाणे सकाळी पाच वाजता त्यांची योग कक्षा सुरू होते. त्यात कधीच बाधा येत नाही. असेच गुरु आपल्याला शोधले पाहिजे. दुसरा प्रश्न गुरूकडून आपण काय शिकायचे जेणे करून संसार सुरळीत होईल. भागवतात "कृष्ण वंदे जगद्गुरु" असे म्हटले आहे. श्रीकृष्णाला जगतगुरु म्हणतात कारण त्यांनी निस्वार्थ भावनेने अधर्माच्या विनाशासाठी आयुष्यभर कार्य केले. पृथ्वीवर सत्य आणि धर्माची स्थापना केली. असे करताना श्रीकृष्णाचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता फक्त समाजाचे कल्याण हाच त्यांचा आयुष्याचा उद्देश्य होता. त्यांनी चंगाई चमत्कार केले नाही, जादू - टोणा केला नाही, कोणाची घोडी शोधून दिली नाही, पाण्यात दिवे लावले नाही, आणि कुणावर कृपाही बरसवली नाही. श्रीकृष्णाने संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला सत्य आणि धर्माचा मार्गावर चालत निष्काम कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्याला असेच गुरु शोधले  पाहिजे. 

शेवटी आपण एक लक्षात ठेवले पाहिजे गुरू काही व्यक्तिगत स्वार्थ सिद्ध करण्याचे साधन नाही. कुणी तसे आश्वासन देत असेल तर निश्चित तो गुरू करण्यायोग्य नाही. 

माझे म्हणाल तर मी श्रीकृष्णाला, समर्थ रामदास, स्वामी दयानंद आणि त्यांच्या परंपरेला स्वीकार करून समाजाच्या आर्थिक आणि आध्यात्मिक  उन्नतीचे कार्य करतात त्यांना गुरू समान मनातो आणि प्रेरणा घेतो.